पुलंची आठवण काढायला काही खास दिवस यायची गरज नसते. ती रोज कुठल्यातरी प्रसंगात येतच राहाते. पण आज ८ नोव्हेंबर, पुलंची १०१ वी जयंती. त्या निमित्ताने त्यांच्याबद्दल लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही.“महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व” ही ओळ जर माझ्या लेखात आली नाही तर कदाचित तुम्हाला पटणारच नाही की हा लेख पु.लंवर आहे. हे वाक्य फक्त पु.लं साठी राखीव आहे. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात एकही इतकं लाडकं व्यक्तिमत्व झालेलं नाही आणि होणारही नाही.
पु.लंची ओळख झाली ती शाळेत असताना, ती सुद्धा कॅसेटच्या स्वरूपात “आसा मी असामी” ऐकताना. ८ वी -९ वीत असताना शाळेतल्या काही मैत्रिणींबरोबर क्राफ्टचा एक प्रोजेक्ट करताना ही कॅसेट पहिल्यांदा ऐकली. आता लगेच पु.लंची ओळख ८ वी-९ वीत झाली?? असा प्रश्न विचारु नका. मी इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन टेक केलं आहे. त्यामुळे आमची अवस्था साधारण गुप्तेकाकांच्या निमासारखी!! त्यामुळे ‘डॅडी जर्मनीला फ्लाय करून गेले, दोन किंवा तीन मंथ्सनी येणार आहेत’ ही वाक्य आम्हाला नवीन नव्हती. ‘असा मी आसामी’ पुस्तकाच्या रूपात हातात यायला डिग्री उजाडावी लागली. त्यानंतर आजपर्यंत त्याची इतकी पारायणं झाली आहेत की त्याच्या ऐवजी दासबोध किंवा विष्णुसहसत्रनाम वाचलं असतं तर समर्थ किंवा विष्णू प्रसन्न झाले असते. ते प्रसन्न होवो किंवा न होवो आम्ही मात्र प्रसन्न झालो ते पु.लं मुळे.
कुठे कुठे पु.ल आठवतात म्हणून सांगू..
मुलं निरागसपणे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्या निरागसतेचं कौतुक करायचं नंतर सुचतं, आधी ‘शंकर आपल्या निरागसता का काय म्हणतात त्याने काळजाला कधी हात घालेल सांगता येत नाही’ हे तरी आठवतं किंवा ‘हल्लीची पिढी बरीच चौकस आहे बरं का गणपुले!!’ म्हणणारे आणि महाराष्ट्रात बावीस वडगावं आहेत ही माहिती असणारे पार्ल्याचे आजोबा आठवतात. व्होटिंगच्या काळात ऑफिसमध्ये शिरताना आमचा ऑफिसबॉय विचारायचा ‘मॅडम मत दिलं का? किंवा ‘मॅडम तुमच्याकडे कोण येणार’, ‘नमो”च येणार’. त्याला उत्तर द्यायच्या आधी ‘अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग ठाऊक असलेला बेनसन जानसनमधला दत्तोबा कदम आठवतो. फॅमिली डॉक्टर म्हंटलं की कुशाभाऊंचे ‘फॅमिली ऑफ माय डॉक्टर’ दिसतात. ऑफिसमध्ये ऑफिसच्या प्रिंटरवर जेव्हा लोक आपल्या प्रवासाच्या तिकीटांची किंवा वैयक्तिक प्रिंटआऊट काढताना दिसायचे तेव्हा माझा धोंडो भिकाजी व्हायचा; कारकुनी इमान जळायला लागायचं. भाजी आणायला गेल्यावर चवळीची जुडी आणि सुरणाची टोपली दिसली की अप्पा भिंगार्डे आणि गुरुदेवांच्या दर्शनाला आलेल्या पारशिणीची आठवण येते. कोणी लंडनला निघालं की आपोआप ‘तेवढा कोहिनूर हिरा बघून या हो’ म्हणणारे अंतु बर्वा आठवतात. कॉलेजच्या रस्त्यावरून जाताना ‘शिजन’ कसा आहे हे बघायला आलेला एखादा नाथा कामत शोधावासा वाटतो.
पु.लंची व्यक्तिचित्र अंगात किती भिनलेली आहेत ह्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आला. मी सकाळी नवऱ्याशी पेस्ट कंट्रोल करायला हवा, फ्रीजचं सर्विसिंग करून घ्यायला हवं अश्या काही प्रापंचिक विवंचनांवर चर्चा करत होते. तितक्यात धाकटे चिरंजीव, वय वर्ष १०, झोपेतून उठून आले. माझ्या बाजूला बसून त्याने चिंताग्रस्त चेहरा केला आणि म्हणाला ‘आई, आज एक मोठ्ठा प्रॉब्लेम होऊ शकतो’ मला वाटलं बहुतेक काही तरी सबमीट किंवा कंप्लीट करायचं राहिलं शाळेचं. मी विचारलं ‘काय?’ तो म्हणाला ‘आज रात्री जर RCBहरली तर Mumbai Indians पॉईंट्स टेबलमध्ये वर जाईल’ मी दोन मिनिटं त्याच्याकडे पाहिलं आणि मग मला हसूच फुटलं. मी हळूच त्याच्या केसांतून हात फिरवला आणि म्हंटलं ‘बाबा रे, तुझं जग निराळं आणि माझं जग निराळं!!’
एकदा गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सोसायटीने एका स्पर्धेत भाग घेतला होता. दोन नृत्यांच्यामधे सूत्रसंचालन करणारी मुलगी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारत होती. त्यात तिने एक प्रश्न विचारला ‘जशी हिंदूंची “गीता”, मुसलमान बांधवांचं “कुराण” तसं पारसी बांधवांचं काय?’ पूर्ण ऑडिटोरियम शांत झालं आणि मी जोरात ओरडले “झेंद अवेस्था”. माझ्या मागच्या पुढच्या रांगेतले सगळे माझ्याकडे कौतुकाने बघत होते. साधारणपणे यूपीएससी किंवा एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांनाच ह्या प्रश्नाचं उतर माहित असू शकतं. मला ते उत्तर माहीत होतं ह्यामागे माझा अभ्यास किंवा सामान्य ज्ञान वगैरे काहीही नव्हतं. ती केवळ आणि केवळ “थ्रीटी नारीएलवाला”ची कृपा होती दुसरं काही ही नाही.
बटाट्याच्या चाळीत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये नाही म्हणायला एक साम्य आहे; आमच्याही बिल्डिंगच्या गच्चीला कुलूप असतं!! आचार्यांना ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे?’ विचारणारा बटाट्याच्या चाळीतला फर्टाडो हा खरंतर एक आदर्श माणूस आहे असं मला नेहमी वाटतं. ‘वर्क इज वर्शिप’ हा त्याचा जगण्याचा कानमंत्र आहे. तो संडेला चर्चला जाऊन टाईम वेस्ट करत नाही. त्या वेळेचा उपयोग तो गळे आणि खिसे कापण्यासाठी करतो. वादावादी करायला ही त्याला फुरसत नसते ‘मी टेरेस वगैरे काय वरी करत नाय, उगीच झगडी कशाला करता रे? तू तुझा धंदा कर मी माझा धंदा करतो’ असं म्हणत तो आपलं काम इमानदारीत करा हे सांगून जातो.
महाराष्ट्रात अनेक मोठे लेखक लेखिका होऊन गेल्या, मग पुलंवर आपलं इतकं प्रेम का? ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पुलंनी मध्यमवर्गीयांना, सामान्य माणसांना त्यांच्या सामान्य असण्यात एक असमान्य धाडस आहे हे जाणवून दिलं. त्यांनी बदलावं असा नियमही घातला नाही आणि बदलावं लागलंच तर त्यात काही चूक आहे असा निष्कर्षही काढला नाही. शाळेत प्रत्येक स्पर्धेत आपण भाग घेत नव्हतो. काही स्पर्धांमध्ये घेतला तर काहींमध्ये फक्त प्रेक्षक होऊन त्यांचा आस्वाद घेतला किंवा मागे बसून टवाळक्या आणि भाग घेणाऱ्यांवर टीका केल्या. त्यात ही वेगळाच आनंद होता हे त्या वयातही कळलं होतं पण पुढे जाऊन त्याचा विसर पडला आणि प्रत्येकच स्पर्धेत धावत राहिलो. आजच्या स्पर्धात्मक युगात आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन जाणवतं की प्रत्येक स्पर्धेत आपण भाग घेतलाच पाहिजे असं नाही किंवा भाग घेतलाच तर त्यात पहिल्या काही क्रमांकांमद्धे आपला नंबर यायलाच पाहिजे असं ही नाही कारण धोंडो भिकाजी जोशी सांगून गेले आहेत...
‘कुणीही मान मोडून काम न करता आमची बेनसन जानसन कंपनी कशी टिकली हे एक कोडं आहे. म्हणूनच हे जग टिकायला कुणीही खास काही करण्याची आवश्यकता आहे असा मला वाटत नाही. ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो तसा जातानादेखील आपल्या हातून त्या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक आसामी आहे’
©गौरी नवरे
८ नोव्हेंबर २०२०
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Wednesday, November 11, 2020
पुलंवर आपलं इतकं प्रेम का?
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
आठवणीतले पु.ल.,
चाहत्यांचे पु.ल.,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment