Saturday, July 16, 2022

मनात घर करून बसलेला 'लंपन'

१९६४ साली, सत्यकथेत 'वनवास' नावाची, प्रकाश नारायण संत याची एक कथा छापून आली होती. त्यातला शाळकरी वयाचा 'लंपन' वर्षानुवर्ष मनात घर करून बसला होता. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत ह्या लंप्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडी चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस - अतिशय आर्जवी. एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं.


सत्यकथेत तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे. ज्या उत्सुकतेनं आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्‍याच उत्सुकतेनं आणि आनंदानं, प्रकाशने तीस वर्षांच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि ह्या संग्रहात आलेल्या लंपनच्या कथा वाचल्या. पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे.
          
पौगंडदशा ओलांडताना यौवनाच्या सुगंधी झुळुका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड. लंप्या म्हणतो तसं 'सुमीची आठवण आली की पोटात काहीतरी गडबड होते आहे' असं वाटायला लावणारी ही अवस्था, कोणीतरी ह्या वयाच्या अवस्थेला 'Emotional Sea-Sickness' म्हटलं आहे. ह्या अवस्थेचं इतक्या सहजतेनं दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही. लंप्याची ही कथा त्या वयाचा मॅडनेस अंगात मुरवून लिहावी लागते. त्या लेखनात प्रकाश यशस्वी झाला आहे.

लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, 'एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या' तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चटकन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे.

प्रकाशला धन्यवाद आणि त्याचं अभिनंदन.
- पु.ल. देशपांडे

वनवास पुस्तक खालील लिंकवरून मिळवता येईल.
--> वनवास - प्रकाश नारायण संत

0 प्रतिक्रिया: