Tuesday, November 28, 2023

बहिणाईचे देणे

बहिणाबाईंच्या काव्याबद्दल मी अभिप्राय काय लिहिणार? जिथे 'झरा मुळचाचि खरा' याचा प्रत्यय येतो, तिथे शब्दांनी त्या अनुभूतींना प्रकट करणे अशक्य असते. 'देख ज्ञानियाच्या राजा/ आदिमाया पान्हावली सर्वाआधी रे/ मुक्ताई पान्हा पीइसनी गेली।' हे बहिणाबाईंनी मुक्ताईसंबंधी म्हटले आहे. तेच मी बहिणाबाईंच्या बाबतीत म्हणेन. 'रुक्मिणीच्या तुलसीदलाने ब्रह्म तुळीयेले' बहिणाईच्या एकेका ओवीला मराठी भावकवितेच्या संदर्भात त्या तुलसीदलाचेच मोल आहे.

कवितेचे दळण घालणारे असंख्य असतात. पण सुखदुःखाच्या जात्याचे दळण मांडून त्यातून कविता देणारी बहिणाई 'मनुष्याणाम् सहस्रेषु' अशी एखादीच. जीवनात अपरिहार्यपणाने येणारे भोग मराठी भाषेच्या इतक्या लडिवाळ स्वरूपात सांगणारी बहिणाई उत्कट वात्सल्याने आम्हाला आंजारीत गोंजारीत, खेळत, हसवत गीताईच सांगून गेली, व्यास- वाल्मिकींच्या विद्यापीठातल्या या दुहितेने त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मंथन कसे आणि कधी केले, ते बहिणाबाई जाणो आणि तिचे ते जाते जाणो.

जात्यातल्या पिठाच्या भाकरीबरोबर विचारमंथनातून आलेला लोण्याचा गोळा आमच्या हाती ठेवून बहिणाबाई गेली. तो वारंवार चाखावा आणि वयाचा हिशेब विसरून बाळगोपाळ होऊन जीवनसरितेच्या काठी हुतुतु-हमामा घालावा. बहिणाईचे हे देणे आम्ही लेणे म्हणूनच वागवतो.

(पुलंच्या एका पत्रातून )
-आणखी पु.ल.


0 प्रतिक्रिया: