वेळ: रात्रीचे दोन
टेलिफोनची घंटा वाजते. आम्ही दचकून उठतो. छातीवरील प्रा. कादंबिनी किरमिजे यांचा लेख असलेले--सॉरी, छातीवरील 'प्रायोगिक रंगभूमीवरील नवीन समस्या' हा कादंबिनी किरमिजे यांचा लेख असलेले मासिक खाली पडते. निद्रानाशावर त्यांचे लेख हा एक अक्सीर इलाज आहे.
टेलिफोन : ट्रिंग... ट्रिंग...
मी : हलो
टेलिफोन : मी दैनिक 'जनजागरण' मधून बोलतोय.
मी : बोला.
जनजागरण : आपली प्रतिक्रिया हवी आहे.
मी : कोण गेलं हो?
जनजागरण : गेलं नाही कुणी
मी : मग कसली प्रतिक्रिया ? ( एके काळी कुणी आटोपले की 'क्रिया' करण्यात माणसे गुंतायची. आता 'प्रतिक्रिया'ही करावी लागते.
जनजागरण : कापूस एकाधिकार योजनेसंबंधी जे सरकारचे धोरण आहे त्यासंबंधी तुमची एक साहित्यिक म्हणून प्रतिक्रिया हवी.
मी : (अद्यापीही मी त्या लेखरूपी झोपेच्या गोळीच्या अमलाखाली आहे की काय अशी शंका येऊन) कापूस एकाधिकार योजना ?
जनजागरण : यस !
मी: कुणाला फोन करायचा होता आपल्याला ?
जनजागरण : आपल्यालाच ! एक साहित्यिक म्हणून प्रतिक्रिया हवी आहे.
मी : पण कापूसखरेदीतलं मला काय कळतंय ?
जनजागरण : साहित्यिक असून ह्या ज्वलंत प्रश्नाकडे आपलं लक्ष नाही?
मी : कापूस एक ज्वलंत वस्तू आहे एवढं मला ठाऊक आहे.
जनजागरण : विनोद न कराल तर बरं होईल.
मी : कुणाचं? आज कापसावर प्रतिक्रिया विचारलीत, उद्या कोळशावर विचाराल.
जनजागरण : पण एक साहित्यिक म्हणून तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत.
मी : अहो, त्या पुऱ्या करायला आम्ही कागदावर प्रयत्न करतो-कापसावर नव्हे.
जनजागरण : पुन्हा तुम्ही विनोदात शिरताय.. 'जनजागरणा'ला ह्याचा गंभीरपणाने विचार करावा लागेल.
मी : प्लीज .. असं काही करू नका. रातपाळीच्या वेळी गंभीर विचार करायला लागलात तर झोप येईल. काही नोकरीचा विचार करा.
जनजागरण : (दाबात) म्हणजे कापूस एकाधिकार योजनेबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही तर--
मी : अशी प्लीज दमदाटी वगैरे नका करू. तुम्ही सांगा ना तुमची प्रतिक्रिया काय ते.
जनजागरण : आम्हाला जनतेच्या प्रतिक्रिया हव्यात--
मी : तुम्ही जनता नाही वाटतं?
जनजागरण : आम्ही ह्या क्षणी पत्रकाराच्या भूमिकेत आहोत.
मी : आम्हीही यावेळी झोपेतून जागं केलेल्या माणसाच्या भूमिकेत आहोत--थांबा थांबा . ही घ्या प्रतिक्रिया.. कापूस एकाधिकार योजना हे शब्द कानी पडल्याबरोबर मला खडबडून जाग आली. मी म्हणालो, हे काय चाललंय? एवढं पुरे ना?
जनजागरण : जस्ट ए मिनिट.. हो.. सोळा शब्द आहेत. बरोबर बसताहेत..थँक्यू.
(काही साहित्यिक भोग - अघळपघळ )
लेखक - पु. ल. देशपांडे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment