Monday, April 24, 2017

पु, ल. नावाचं मोरपीस


नेहमीप्रमाणं धावत-पळत "डेक्कन‘ गाठली. हुश्‍शहुश्‍श करत विसावतो तर काय, समोरच्या खिडकीत "पु.ल.‘ चक्क एकटेच बसलेले. यापूर्वी अनेकदा त्यांच्या सहवासाचा, पंक्तीचा योग आला, पण मनसोक्त गप्पा रंगल्याच नव्हत्या. आता त्याची संधी मिळाली अन्‌ चार तास आनंदाचा ठेवा लुटत राहिलो.

नोकरीच्या काळात 1970 ते 90 च्या दरम्यान डेक्कन क्वीनमधून प्रवास सतत व्हायचा. तेव्हाचं डेक्कन क्वीनचं रूप खूपच वेगळं होतं. एअरकंडिशन डबे नसले तरी ऐसपैस जागा असायची. एका ओळीत चार सीट्‌स असल्यानं सध्यासारखं दाटीवाटीनं बसण्याचा प्रश्‍नच नव्हता. तो प्रवास मजेचा असायचा. दिवसभराचं काम ओटापून संध्याकाळी डेक्कन क्वीन गाठायची आणि त्या सिंहासनासारख्या आसनावर दमलाभागला देह लोटून द्यायचा. गाडी सुटता सुटता कॅफेटेरियाचा वेटर आला, की त्याला ऑम्लेट किंवा फ्राइड फिशची ऑर्डर द्यायची आणि ठाण्यापर्यंत समोरची प्लेट संपली, की डोळे मिटून आत्मचिंतन (?) करताना मस्तपैकी झोप लागायची ती कर्जत येईपर्यंत. मग पाय मोकळे करायला खाली उतरायचं आणि त्या प्रसिद्ध वड्याचा आस्वाद घेईपर्यंत, मागचं इंजिन लागल्यावर गाडी प्रस्थान करायची. मग काय, घाट सुरू झाल्यावर कितीही वेळा पाहिलं तरी समाधान न होणारी खंडाळ्याच्या दरीची शोभा पाहण्यात मन गुंगून जायचं.

एकदा गाडीला उशीर झालेला असताना गाडी घाट चढायला लागेस्तोवर रात्र होऊन गेली होती. पौर्णिमेची ती रात्र होती आणि निरभ्र आकाशातल्या धवल शुभ्र चांदण्यानं संपूर्ण दरी भरून गेली होती. देवादिकांना दुर्लभ अशा त्या दृश्‍यानं मी भारावून गेलो होतो. जगाचं रहाटगाडगं जिथल्या तिथं थांबून तो क्षण तिथंच गोठून जावा, असं वाटलं होतं. पावसाळ्यात तर काय, त्या वनश्रीला बहार आलेला असायचा. किती नटू आणि किती नाही, असं त्या दरीला व्हायचं. हिरव्या पाचूंची सगळीकडं उधळण झालेली दिसायची. त्यातून पांढरे शुभ्र धबधबे. कुठं धुक्‍याची शाल आणि ढगांचा संचार! वाटायचं, हा सुखद गारवा सतत अंगाला लपेटून ठेवावा. अशा वेळी गप्पा मारायला समविचारी सहप्रवासी असला, की बघायलाच नको. लोणावळा गेलं, की पुढचा प्रवास मात्र कंटाळवाणा! घाट चढून आल्यावर घरचे वेध लागलेले असायचे. मग कधी एकदा शिवाजीनगर येतंय आणि धावत जाऊन रिक्षा पकडतोय, असं व्हायचं. आता मात्र त्या बंदिस्त एसी डब्यात अंग चोरून बसल्यावर फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं एवढाच कर्मभाव उरतो. काळ्या काचांमुळं बाहेरची शोभाही पाहता येत नाही आणि बुफे कारचा तो भूक प्रज्वलित करणारा संमिश्र वासही दुरावलाय. प्रवासाची मजाच संपली.

असंच एकदा एका पावसाळी संध्याकाळी धावत-पळत डेक्कन क्वीन गाठली. त्या दिवशी माझ्या कुंडलीतले सर्व शुभ ग्रह एकवटले असावेत. गाडीला अगदी तुरळक गर्दी आणि डब्यात आपल्या सर्वांचं आराध्यदैवत, साक्षात पु.ल. खिडकीशी चक्क एकटे बसलेले, त्या वेळी ते एन.सी.पी.ए.मध्ये पदाधिकारी होते. तशी माझी त्यांच्याशी बरीच चांगली ओळख होती. त्यांचे अतिशय जवळचे सहायक मित्र (कै.) मधू गानू आमच्या नात्यातले असल्यानं आमचं पु.ल. आणि सुनीताबाई यांच्याकडे येणं-जाणं होतं. त्यांच्या पंक्तीचा लाभही आम्हाला झाला होता. माझी पत्नी सौ. सुजाताच्या पदन्यास नृत्यसंस्थेच्या "गीत गोपाळ‘ या नृत्यनाट्याच्या कार्यक्रमालासुद्धा ते आवर्जून आले होते आणि नंतर सर्व कलाकारांशी त्यांनी संवाद साधला होता. तरी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचा योग आला नव्हता, असो. तर मी त्यांच्याजवळ जाऊन, नमस्कार करून त्यांना ओळख दिली. दिलखुलास हसून त्यांनी मला शेजारी बसण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतरचा चार तासांचा पुण्यापर्यंतचा विनाव्यत्यय प्रवास म्हणजे स्वर्गलोकीच्या गंधर्वांनी हेवा करावा, असा झाला.

अजूनही त्या सुखद आठवणींचं मोरपीस अंगावरून फिरतं. मी "पु.ल.‘ यांच्या लिखाणाचा भोक्ता असल्यानं अनेक दाखले देत आमच्या गप्पा चालल्या होत्या. मी "पार्ल्यामध्ये गेल्यावर शितू सरमळकरांचं वेलकम स्टोअर शोधण्याचा प्रयत्न केला होता,‘ हे सांगितल्यावर ते मिस्कीलपणे हसले. त्यांच्या "माझे खाद्य जीवन‘ या लेखाबद्दल मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही दिल्लीमधल्या छोले गल्ली आणि पराठा गल्लीबद्दल लिहिलंत, पण चांदणी चौकात अजून पुढे गेल्यावर असलेल्या ""काके दी हट्टी‘‘मध्ये मिळणारा रबडी फालुदा विसरून मला चालणार नाही.‘ हे ऐकल्यावर त्यांनी दिल्लीच्या पुढच्या ट्रीपमध्ये तिथे नक्की जाईन, असं सांगितलं. "व्यक्ती आणि वल्ली‘मधल्या दिनेशची आठवण निघाली. ""आता तो खूपच मोठा झाला असेल. मग तो त्या लेखातल्या (नंगू) फोटोमुळे रागवला नाही का?‘‘ असं विचारल्यावर, ""नाही नाही, आता तो अमेरिकेला असतो. आणि मला तपासणारा नाही, पण दुसऱ्याच विषयात डॉक्‍टर झाला आहे,‘‘ असं म्हणाले. त्यांना कर्जतचा वडा खूप आवडतो, हे माहीत असल्यानं मी तिथं उतरून तो आणल्यावर ते फारच खूष झाले. कर्जतला गाडी थांबली, की शेजारून, घाटात गाडीच्या मागे लागणारं "बॅंकर‘ इंजिन संथपणे जातं. ते बघितल्यावर मी "पु.ल.‘ना, चिं. वि. जोशी यांची त्यासंबंधित एक गोष्ट सांगण्याचं धाडस केलं. ""आलेलं इंजिन धापा टाकत गेलं आणि नवीन इंजिन मात्र संथपणे धूम्रपान करत उभं होतं,‘‘ ही वाफेच्या इंजिनांना त्या गोष्टीत दिलेली उपमा त्यांना फारच आवडली.

मी मूळचा मुंबईकर आणि पु.ल. यांचा पिंडही मुंबईकराचाच. त्यामुळे आमच्या मुंबईबद्दलच्या गप्पासुद्धा मस्त रंगल्या. एके काळी मलबार हिलवरून दिसणारं क्वीन्स नेकलेसचं रूप, दादरचा शांत स्वच्छ समुद्रकिनारा इत्यादी आठवणींना उजाळा मिळाला. त्यांनीही त्यांच्या त्या वेळच्या पार्ल्याच्या आठवणी सांगितल्या. घरी आईकडं ते थालीपिठाचा आग्रह कसा धरत, थालीपिठाला मधे भोक पाहिजे, बरोबर लोण्याचा गोळा पाहिजे, वगैरे आठवणी भूतकाळात रंगून जाऊन सांगत होते. गप्पा रंगत होत्या, हा प्रवास संपूच नये, असं वाटत होतं. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतोच, या उक्तीप्रमाणे शेवटी पुणे स्टेशन आलं. गर्दीतून वाट काढत त्यांना रिक्षामध्ये बसवलं आणि त्यांच्याशी हात मिळवत म्हटलं, ""आय एंजॉइड एव्हरी मोमेंट ऑफ द जर्नी टुडे.‘‘ यावर त्यांचं उत्तर ""सेम हिअर.‘ आणि रिक्षा चालू होताना ती थांबवून (माझ्या कानांवर माझा विश्‍वासच बसला नाही) म्हणाले, "आय मीन इट!‘ त्या महान व्यक्तिमत्त्वाचा तो चार तासांचा सहवास आणि त्यांचं घडलेलं आगळंच दर्शन, हा माझ्या आयुष्यातला न विसरण्याजोगा अनमोल ठेवा आहे.
- सुरेश नातू
मुळ स्रोत -- मुक्तपीठ

Tuesday, April 18, 2017

नवं वर्ष आणि सुखाचा चेहरा

नव्या वर्षाची चाहूल शहरी सुशिक्षित लोकांना ‘हॅपी न्यू इयर’,’नवं वर्ष सुखाचं जावो’ अशा सदिच्छा व्यक्त करीत पोस्टातून येणाऱ्या सुबक, सचित्र, रंगीत कार्डांतून लागते. मोठमोठ्या शहराचं ऋतूशी नातं तुटलेलं असतं. ऋतुचक्राचा फेरा पाहण्याची कुणाला फारशी संधीही मिळत नाही आणि सवडही नसते. त्यातून इंग्रजांनी आपल्या देशात खिस्ती शक सुरू केल्यापासून बहुसंख्य भारतीयांच्या जुन्या वर्षाचं शेवटचं पान हे फक्त कॅलेंडरवरून गळून पडतं. नवं पान पाहायला नवं कॅलेंडर आणावं लागतं. चैत्रपालवीतून त्यांना ही नव्या वर्षाची चाहूल लागत नाही. ते काही असलं तरी नवं वर्ष सुरू झालंय म्हटल्यावर कोणीतरी आपल्याला ते सुखाचं जावो अशी इच्छा व्यक्त करतंय याचं मनाला समाधान असतं. क्षणभर जुन्या वर्षानं आपल्याला काय दिलं आणि आपल्यापासून काय हिरावून नेलं याचाही एक ताळेबंद झर्रकन मनावरून सरकून जातो.

रोजच्या अनुभवांचा तपशीलवार जमाखर्च मांडणं मला फारसं जमलं नाही. पण माझ्या टेबलावर रोजच्या तारखेचं सुटंसुटं चतकोर पान असलेलं एक टेबल कॅलेंडर आहे. तिथे नव्या वर्षाच्या पानांचा जुडगा बसण्यापूर्वी ती जुनी पानं मी सहज चाळतो. एखाद्या लहानशा नोंदीनंही एखादा दिवस चटकन माझ्या डोळ्यांपुढे उभा राहतो. एखादी नोंद बुचकळ्यात टाकते. एका पानावर ‘कुळकर्णी-पाच वाजता’ ही नोंद सापडली. सात ऑक्टोबरला मी माझ्या माहितीतल्या शेपन्नास कुळकर्ण्यांतल्या कुठल्या कुळकर्ण्याला भेटलो ते आठवेना. मी पान उलटलं.

दुसऱ्याच दिवशी कुळकर्णी आणि वाघ यांची सहा वाजता भेट ठरल्याचा उल्लेख सापडला. आणि ती संध्याकाळ डोळ्यापुढे उभी राहिली. वाघांच्या मुलाला नाटकात जायचं होतं. त्याबद्दल त्यांना माझा सल्ला हवा आहे, हे सांगायला आदल्या दिवशी कुळकर्णी आले होते. त्यांना म्हणे मी दहा वर्षांपूर्वी एकदा बसमध्ये भेटलो होतो. त्यामुळे त्यांनी वाघांना माझी आणि त्यांची दोस्ती आहे असं सांगितलं होतं. मीदेखील कुळकर्ण्यांना भेटल्याची आठवण असल्याचं केवळ शिष्टाचारादाखल कबूल केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हे कुळकर्णी वाघापुढे माझ्याशी ते आणि मी प्राथमिक शाळेपासून जोडीने कॉपी करीत आल्यासारखे वागत होते, वाघ मात्र मुलगा नाटकात जाणार या धसक्यानं माझ्यापुढे शेळी होऊन बसले होते. संध्याकाळ मोठ्या मजेत फुकट गेली होती, त्या सात ऑक्टोबरला.

याही वर्षी ‘ हे वर्ष सुखाचं जावो ‘ अशी इच्छा व्यक्त करणारी कार्ड आली. मी मनाशी म्हणालो, ‘ जोपर्यंत रोज उगवणारा सूर्य ‘ काय साहेब, आपल्याला आजचा दिवस कसा जावासा वाटतो ते सांगा म्हणजे त्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट करतो, ‘ असं सांगत येत नाही तोपर्यंत कशाला सुख म्हणावं हे आपणच ठरवायला हवं ‘. ‘ सुख ‘ हे मानण्यावर आहे वगैरे वाक्यं नको तितक्या वेळा आपण ऐकलेली असतात. पण ही सुखाची भानगड नेमकी काय आहे ती मात्र इतकी नवी वर्षं जुनी झाली तरी माझ्या नेमकी ध्यानात आलेली नाही. ज्या कुणाच्या आली असेल त्याचा सदरा आपल्या अंगाला बसतो की काय ते पाहायला हवं. (ताज्या पडवळाच्या भाजीसारखं सुख नाही, म्हणणारा एक माणूस मला माहिती आहे. त्याचा सदरा फुकट मिळाला तरी मी घालणार नाही!) पण ‘ सुख ‘ नावाचं एक काहीतरी आहे आणि ते आपल्याला मिळायला हवं असं मात्र प्रत्येकाला वाटत असतं. मग कोणी ज्योतिषीबुवापुढे हात पसरतो. कोणी शनि-मंगळाच्या भ्रमंत्या तपासायला लागतो-नाना तऱ्हा करतो. आपण सुखी नाही हे त्यानं ठरवलेलं असतं. तसं त्याला वाटावं अशी परिस्थितीही असू शकेल. पण या विचारांची परमावधी म्हणजे आपल्याखेरीज यच्चयावतू प्राणिमात्र सुखात आहे असं वाटणं. अशा माणसाला ‘ नवं वर्ष सुखात जावो ‘ म्हणजे या वर्षात काय काय होवो याची एक यादी करा म्हटलं तर जरा पंचायतच होईल. एखादा सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहू पाहणारा दम्यासारखा हट्टी रोगात पछाडलेला माणूस म्हणेल, ‘ माझा दमा जावो म्हणजे मी सुखी होईन. ‘ पण बिनदम्याचे लक्षावधी लोक या जगात आहेत ते कुठे सुखी आहेत. समजा आमचे परममित्र कुळकर्णी (वाघांना घेऊन आलेले नव्हेत – हे चिक्कोडीचे) दम्यातून बरे झाले तर त्यांच्या किंचित अवघड स्वरूपाच्या कन्यांची घाऊक लग्न एकाच मुहूर्तावर होणार आहेत की, शिवाय दम्याहूनही अधिक हट्टी अशी एक व्याधी त्यांना जडलेली आहे. त्यांच्या कवितांना पुस्तकातून स्थळ देणाऱ्या प्रकाशकांच्या शोधात ते गेली अनेक वर्षं आहेत. आता संक्रांत, भाऊबीज, भारतमातेस नम्र प्रणाम (प्रिय भू माझी भारतमाता । वंदन तिजला करितो आता । । धृ । ।) असला वाण अलीकडे कवितेच्या बाजारात उठत नाही, हे या कुळकर्ण्याला पटवायला कोण उठून चिक्कोडीला जाणार? ” सुदिन अजि उगवला । दिवस हो संक्रान्तिचा पातला ” या ओळीत काय वाईट आहे सांग, हे त्यानं मला प्रस्थापित साहित्यिक गटाचा प्रतिनिधी म्हणून उपेक्षिताच्या वतीनं विचारलं होतं. तेही माझ्या घरी येऊन.

एक माणूस माझ्या घरून जाताना ‘ दुखिया जाहला ‘ हे पाहताना मलाही किंचित गलबलून आलं होतं. आता या कुळकर्णी तथा यशोदा-तनय-रघू कवीचं सारं सुख त्याचा तो तूर्त हस्तलिखितावस्थेत असलेला ‘ सुमे आणि कुसुमे ‘ हा काव्यसंग्रह मुद्रितावस्थेत जाण्यावर अवलंबून आहे. ‘ कु ‘ हे कुपुत्र, कुमाता, कुकर्म अशा रीतीनं कुरूपता दाखवणारं अक्षर सुमाला लावून सुमाचं कुसुम केल्यावर ते सुम कुरूप न होता कसं राहतं हे मला पडलेलं एक कोडं आहे.

गेल्या वर्षीच्या दोन मार्चला दुपारी तीन वाजता फक्त पाचच मिनिटांसाठी भेटायला आलेल्या मंडिलगेकर नावाच्या गृहस्थांचा उल्लेख आहे. पाच मिनिटे माझ्याशी चर्चा करायला या बहुधा दुर्वासगोत्रोत्पन गृहस्थांनी ‘ सामाजिक नीतिमत्ता कशामुळे खालावली आहे असे आपल्याला वाटते ‘ इथपासून ‘ रुपयाचे अवमूल्यन का होते. इथपर्यंत सतरा- अठरा प्रश्न लिहून आणून माझ्याशी चर्चा करायचा घाट घातला होता. या मंडिलगेकर तात्यांना एकूणच खालावणे, अवमूल्यन, घसरगुंडी, अधःपतन असल्या ऊर्ध्याकडून अधराकडे जाणाऱ्या गोष्टींचं भलतंच आकर्षण असावं. दर दोन वाक्यांनंतर त्यांचं ‘ हे माझं दुःख आहे ‘ हे पालूपद. ते स्वत: सुखी असोत वा नसोत, पण असा माणूस घरात सुखाचा वारा शिरतोय म्हटल्यावर दारं-खिडक्या बंद करून घेत असणारच! ‘ हल्लीची तरुणपिढी वडीलपिढीपासून दूर का पळते यासंबंधी एक विचारवंत साहित्यिक या भूमिकेतून आपण मला उत्तर द्याल का?’ हा प्रश्न त्यांनी मला त्यांच्या बाजारहाट करणाऱ्या नोकराकडून मिरच्या- कोथिंबीरीचा हिशेब मागितल्याच्या दाबात विचारला होता. आता हा म्हातारा दिवसभर हे असले खालावण्याच्या आणि अधःपतनाच्या प्रश्नांचे शेणगोळे हातात घेऊन घरात हिंडत असताना त्याच्यापासून त्याच्या घरातली तरुणमंडळीच काय सारी आळी दूर पळत असली तर आश्चर्य कुठलं? तरुणपिढीनं काय केलं म्हणजे हा म्हातारा सुखी होईल ते कसं ओळखावं? त्यांच्या घरातल्या माणसाची सुखाची कल्पना त्यांना चारचौघांत मोठ्यानं सांगता येणं मात्र अशक्य आहे. ‘ म्हातारा एकदा चचेल तर बरं. हे वाक्य मोठ्यांदा कसं म्हणणार? मला तर वाटायला लागलंय की कॅलेंडरवरच्या पानाप्रमाणे सुखाचीही कल्पना रोज बदलत असावी. काल ज्याला आपण सुख समजत होतो ते आज सुख वाटेलच असं नाही, शिवाय दुःखाच्या निर्मितीचा झपाटा सुखापेक्षा फार मोठा आणि ती निर्मितीही अधिक टिकाऊ.

एखाद्या घटनेनं दिलेलं दु: ख जितकं आजकालच्या भाडेकरूंसारखं मनात घर करून घट्ट बसतं तितकं सुख बसत नाही. दिवाळीतल्या भुईनळ्यासारखं सुख क्षणभर उजळून जातं, कित्येकदा दुःख सुखाच्या पाठीमागे अशा चतुराईनं दडून येतं की त्या सुखसेवनाचा पश्चात्तापच व्हावा. प्रेमामागे दडून येणारं लग्नच पाहा ना. काल-परवा जिथे ‘ ही पुनवेची धुंद रात, ‘ ‘ मस्त धुंद चांदण्यात, ‘ ‘ ते गीत पाखरांचे, ‘ ‘ आपण दोघे धुंद गंध हा ‘ ( ‘ धुंद ‘) हा शब्द नसला तर प्रेमगीत नापास करतात काय?) – असल्या संगीतभाषेचा वर्षाव चालला होता तिथे ” वांगी नीट बघून आणा!” ” नारळ वाजवून घ्यायला काय होतं?” ” माझ्या आईच्या हातचं वांग्याचं भरीत काय फळ्यास व्हायचं!” असली भाषा सुरू होते आणि त्या अधोगामी मंडिलगेकरासारखी ( २ मार्च) शब्दांचीदेखील चांदण्यापासून हिंगाकडे, बकुल फुलांपासून रॉकेलच्या डब्याकडे आणि भंगाकडून झुरळाकडे घसरगुंडी सुरू होते. पण तिथेदेखील हिंग अस्सल मिळाला, नव्या औषधाच्या फवाऱ्यानं झुरळं धारातीर्थी पडली, असली माफक सुखं मिळतात. सुखालाही अशी भलत्याच ठिकाणी जाऊन बसायची खोड असते!

गेल्या वर्षीच्या कॅलेंडरच्या पानावर सुखाच्या मोहरांनी भरलेले हंडे गवसल्याची खूण नसली तरी बारीकसारीक सुखाची चिल्लर जमा झाली नाही असंही नाही. एखादी कवितेची सुंदर ओळ आणि अकरा ऑगस्टला भरपूर पाऊस कोसळत असताना लाभलेला गरम चहा आणि गरम भजी (मिक्स) यात तराजूत तोलून उणे- अधिक ठरवणं मला जमत नाही. भज्याच्या दिवशी जठराग्नी प्रज्वलित झालेला असावा आणि कविता वाचून झाल्यावर मनानंही तृप्तीची ढेकर द्यावी. कधी कधी वाटतं सुखाचा चेहरा हळूहळू आपल्याला ओळखता यायला लागला आहे.

सुखाची यादी करणं तितकंसं अवघड नाही. हातात उत्तम पुस्तक असताना टेलिफोनची घंटी वाजून ‘ तिसऱ्या मजल्यावरच्या बांगुर्डेसाहेबांना प्लीज जरा बोलवा ‘ असं कुणी सांगू नये, पुस्तकाचा अखंडित संग लाभावा, रेडिओची कळ सहज म्हणून दाबली जावी आणि त्यातून सहाव्या पंचवार्षिक योजनेत भारताला असलं काही गलथान गद्य ऐकू येण्याऐवजी बेगम अख्तर ‘ सितार के आगे जहाँ और भी है ‘ गात असावी, बाजारात गावरान शेंगा मिळाव्या, हसतमुख रिक्षावाला लाभावा, त्यानं आपल्याला जिथे न्यायचं तिथे भिरकावून नेऊन फेकल्यासारखे नेऊ नये, त्याच्यापाशी पाच पैसे सुखही असावेत, रोजच्या वर्तमानपत्रातून खून-दरोडे, आगगाड्यांची टक्कर, मृतांची संख्या, होडी उलटून पन्नासांना जलसमाधी, गोळीबार, असला मजकूर नसावा, लोकसभेचे अधिवेशन गदारोळाच्या नित्य कार्यक्रमाशिवाय पार पडावं, मुलांची पुढल्या वर्षाची पाठ्यपुस्तकं छापून तयार असावी, बाजारात मुबलक वह्या मिळाव्या, गॅस हवा का? असा गॅसच्या एजंटाचा उलट आपल्याला प्रश्न यावा, तेलाचे आणि साखरेचे भाव उतरावे, हॉस्पिटल रिकामी पडावी, डॉस्टरांनी नाटकांत कामं करावी, नर्सेसनी लोकनृत्य बसवावी, रेलगाड्या वेळेवर सुटाव्या, डाकूंनी शेती करून बकऱ्या पाळाव्या, पुढाऱ्यांनी कसला तरी प्रामाणिक कामधंदा सुरू करावा… थोडक्यात जिथे दुःखाला लवमात्र जागा नाही असा स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो इथेच उतरावा- पण नाही असं झालं तर सुखाचा चेहराच ओळखू येणार नाही.

मला एक प्रसंग आठवतो. एकोणीशेचाळीस-बेचाळीसची गोष्ट. त्या वेळी मी एका व्यावसायिक नाटकमंडळीत होतो. एका आडगावातला मुक्काम आवरून दुसऱ्या आडगावात आमची कंपनी जायला निघाली होती. त्या काळी एस. टी. नव्हती. सर्व्हिस मोटर नामक माणसांना मेंढरं मानणारी वाहन-व्यवस्था होती. आमची बस खचाखच भरली होती.

ड्रायव्हरसाहेब एजंटसाहेबाबरोबर गप्पा मारीत सिगरेट फुकीत उभे होते. ऊन रणरणत होतं. आक्का ष्ट्यांडावर पानाच्या दुकानातल्या पानांखेरीज हिरवा रंग दिसत नव्हता. फोनोच्या कर्ण्यातून ‘ अहो या ष्ट्यांडावरी एजंट मालक झाला ‘ हे वास्तवदर्शी गाणं ऐकू येत होतं. एक काळंकभिन्न नागडं पोर त्या गाण्याच्या तालावर नाचत होतं. तेवढ्यात कमरेला नुसताच एक फाटका कळकट पंचा लावलेला, पोट खपाटीला गेलेला, काहीसा गोरटेला, कमालीचा हाडकुळा, हल्लीच्या हिप्पीसारखी दाढी आणि केस वाढलेला, वयाचा अंदाज करणं अशक्य, असा माणूस मी खिडकीपाशी बसलो होतो तेथे आला. त्याची आणि माझी दृष्टादृष्ट झाली. त्यानं हातानं थांबा अशी मला खूण केली आणि हवेतल्या हवेत टेलिफोनची डायल बोटांनी फिरविल्याचा मुकाभिनय केला. कोणीशी तरी फोनवरून पुटपुटल्यासारखं बोलला, आणि मला म्हणाला, ” मिस्टर पावली द्या. फोर अॅनाज,? ” मी एकदम चमकलो. ज्या काळी बिगरबत्ती सायकलवाल्याला पकडल्यावर हवालदारसुद्धा एक आण्यात खूष व्हायचा. एवढंच नव्हे तर दोन आणे दिले तर टाचा जुळवून ‘सलाम’ ठोकायचा तिथे हा भिकारी हवेतल्या हवेत कुणाला तरी टेलिफोन करायचा अभिनय करून माझ्यापाशी एकदम चार आणे मागत होता. मी म्हटलं, ” कसले चार आणे?” त्यानं शांतपणानं आकाशाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, ” वरून ऑर्डर आली आहे -तुमच्याकडून चार आणे घ्यायची. ” आता मलाही नट असल्याची गुर्मी होतीच. मीही लगेच त्याच्याचसारखा अभिनय केला आणि तसंच पुटपुटलो. तो माणूस माझा टेलिफोनचा मुकाभिनय शांतपणे पाहत होता. माझा अभिनय संपल्यावर मला म्हणाला, ” काय?” मी म्हटलं, ” अहो मीसुद्धा टेलिफोन करून वरच्यांना विचारलं तर ते म्हणतात तुम्हांला दिडकीसुद्धा देऊ नका. ” त्या माणसानं माझ्याकडे रोखून पाहिलं, तीच नजर आकाशाकडे लावली. पुन्हा हवेतल्या हवेत डायल फिरवली आणि भयंकर संतापलेल्या चेहऱ्यानं तोंडातून एकही शब्द स्पष्ट न उच्चारता तो बोलू लागला. काही वेळानं बोलणं थांबवून मला म्हणाला, ” बराय साहेब ‘ ‘ आणि जायला वळला.

मी विचारलं, ” काय झालं हो?”

” काही नाही, त्या वरच्या हरामखोरांची आयमाय उद्धारली. वर बसून अमृत पितात, अप्सरांचे नाच बघतात, साल्यांना सुखाचा कंटाळा येतो, मग आमच्यासारख्यांना खोट्या ऑर्डरी सोडून आमचं दु: ख बघतात. तिथे दु: ख पाहायला मिळत नाही ना त्यांना. मग सुखाची चव काय कळणार?” हे सारं अस्थलितपणे बोलून तरातरा त्या रणरणत्या उन्हातून, पावसाची वाट पाहत पडलेल्या त्या काळ्याभोर शेताच्या ढेकळांतून वाट काढत गेलेला तो माणूस एखाद्या हालत्या निसर्गचित्रासारखा माझ्या डोळ्यासमोर अजून मला दिसतो आहे.

” वेडा आहे, ” माझ्या शेजारचा पाशिंजर म्हणाला.

” कोण?” मी म्हणालो
म्हणून म्हणतो नवं वर्ष हे सुखाचा चेहरा ओळखायला लावणारं ठरो!


--पु.ल.
मुळ स्त्रोत -- कालनिर्णय