Friday, June 13, 2008

दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी?

चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश.

आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातची बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली. ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली.

बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे 'धम्म' . 'धम्म' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव 'धम्म' असं आहे. 

बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती. 

दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.

दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.

पु. ल. देशपांडे 
महाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८

...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही

३ जुलै १९८७ ला अमेरिकेत न्यू जर्सीला झालेल्या बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात पुलंनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील अंश...

एका दूरच्या देशात आपण सगळेजण मराठी माणसं म्हणून एकत्र जमलोय. तसं पाहिलं तर या समुदायामध्ये ज्ञानविज्ञानाच्या शाखेमध्ये फार मोठी मान्यता मिळविलेले, तज्ज्ञता मिळवलेले डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कारखानदार आहेत, विद्वान आहेत, विदुषी आहेत, तंत्रज्ञ आहेत, तंत्रज्ञा आहेत; पण आपल्या निराळेपणाची आणि श्रेष्ठतेची ही सगळी महावस्त्रं बाजूला ठेवून ‘मराठी एवढ्या एकाच भावनेने आपण इथे एकत्र आलेले आहोत. आपण मराठी भाषिक आहोत एवढा एकच धागा आपल्याला एकत्र यायला पुरेसा आहे, याची आपल्याला खात्री आहे. अमेरिकेसारखा हा महाप्रचंड, महाबलाढ्य, महाश्रीमंत देश. ज्या भारतीय वातावरणात लहानपणापासून आपण वाढलो त्याच्यापेक्षा अगदी निराळे वातावरण असलेला हा देश. … पण आपण कुठल्यातरी समान धाग्याने एकमेकांशी बांधले गेलेले आहोत, या आनंद देणाऱ्या अनुभूतीची माणसाला जी निसर्गदत्त ओढ असते ती या असल्या संमेलनाच्या मुळाशी असते. … अहो, तुकारामासारख्या संतानंसुद्धा म्हटलंय की, ' माझिया जातीचा मज मिळो कोणी ' . इथे ' जातीचा ' याचा अर्थ माझ्यासारखी ज्याला विठ्ठलाची ओढ आहे, देवाची ओढ आहे. अशा प्रकारचा कोणीतरी मला मिळो. तुकारामाच्याच उक्तीप्रमाणे बोलायचं तर ' माझिया भाषेचा मज मिळो कोणी ' या भावनेनं आपण इथे एकत्र आलेले आहोत. आणि इतक्या संख्येनं इथे एकत्र जमलेले आहोत की , मला तर असं वाटतं, कोणीतरी तिथून ' न्यू जर्सीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ', असं म्हणेल की काय!

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, साँग हॅज द लाँगेस्ट लाइफ. गाणं हे चिरंतन असतं. या मराठी मुलांच्या ओठांवर, मनामध्ये तुम्ही मराठी गाणी दिलंय. अशी पाचपन्नास गाणी दिलीत, तर मराठी संस्कृतीची चिंता करण्याचं तुम्हाला काहीही कारण उरणार नाही. हे गाणं या बालकांबरोबर त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या-नव्वदाव्या वर्षापर्यंत जाईल, कदाचित शंभराव्या वर्षापर्यंतसुद्धा जाईल. जोपर्यंत एक मराठी गाणं तुमच्या ओठांवर आहे, तोपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहा, नाहीतर टिंबक्टूत राहा, कुठंही राहा, तुम्ही मराठीच आहात. त्यात काही चिंता बाळगण्याचं कारण नाही.

परदेशात आपल्या भाषेचा शब्द कानांवर पडणं मुश्कील. म्हणूनच तर तो ' परदेश ' होतो ना ! मला खात्री आहे की, इथे अगदी अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना कानांवर बालकवींची कविता वगैरे जाऊ दे, पण ' च्यायला ' अशी शिवी जरी ऐकू आली, तर ती ओवीसारखी वाटेल आपल्याला त्यावेळी.

हे जीवन सुंदर व्हावं, आनंददायक व्हावं, हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो. गुलाबाचं फूल आणि मोग-याचं फूल ही फुलं भिन्न आहेत, म्हणजे त्या फुलांचं वैर आहे असं नव्हे. त्यातलं फूलपण एकच आहे. ' ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ' असं चोखोबांनी म्हटलंय. ऊस वाकडा पण रस वाकडा नसतो. गाय काळी म्हणून दूध काळं नसतं. तसं हे फुलातलं फूलपण खरं. तिथे पुष्पसृष्टीचेच कायदे लागू पडतात. प्रत्येक माणसाला, तो कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात. दाढ ठणकायला लागली की, कानडी मनुष्य ' अय्यय्यो ' म्हणून कानडीत ठणाणा करील. तो कानडीतून असला, इंग्लिशमधून असला किंवा जपानीतून असला, तरी दाढ ठणकण्याची वेदना तीच आहे. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. एकात्मतेत विविधता आणि विविधतेत एकात्मता - ' युनिटी इन डायव्हर्सिटी ' म्हणतात ती हीच. एकात्मता हे जसं सत्य आहे, त्याचप्रमाणे विविधता हेही सत्य आहे.

कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ' नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणु तारकादळे नगरात, परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातील मंद दिव्याची वात. ' आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणा-या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणा-या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तोय मन एव मनुष्यः अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

'पुंडलिक वरदा ' म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, ' हारी विठ्ठल ' तोंडातून येणारच तुमच्या. तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो. अशा नेणिवांतून, आपोआप उमटणा-या प्रतिक्रियांतूनच समाजमानस तयार होत असतं. ' छत्रपती शिवाजी महाराज की ' म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपोआप ' जय ' येत नाही, तो मराठी माणूस आहे असं आपल्याला वाटतच नाही.

खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेलाच जास्त मान आहे. इंग्रजाच्या अमदानीमध्ये तिला राजभाषा म्हणून मान मिळत होता. इंग्रजी शिकायची सक्ती होती, आता तशी सक्तीही नाही. पण इंग्रजी भाषेची किल्ली हातात असली की, अभ्युदयाची अनेक दारं उघडली जातात, हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे. किंबहुना, पुण्याहून मुंबईला जाताना नव्यानेच कारखानदारीत शिरलेले जोशी-कुलकर्णीसुद्धा एकमेकांशी इंग्रजीत बोलत असतात. आता त्यांचं इंग्रजी ऐकल्यावर इंग्रज हा देश सोडून का गेला, हे आपल्याला कळतं.

अमेरिकेमध्ये आल्यानंतर केवळ डॉलर्सचा संचय हे एकमेव उद्दिष्ट राहू नये, तर नवी निर्मिती करण्याचे जे जे काही प्रकार इथे चाललेले आहेत, चांगले आहेत, सुंदर आहेत, त्याच्यामागे आपली मुलं कशी लागतील, त्याची त्यांना आवड उत्पन्न कशी होईल, याची तळमळ हवी. आजच्या काळामध्ये मी एकच विनंती करणार आहे, इथं तुम्ही जमलेले आहात, फार मोठे तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ आहात, तुम्हाला महाराष्ट्राची सेवाच करायची असेल, तर तुमचा जो विषय आहे, त्याच्यावरचे लेख मराठीत लिहून ते महाराष्ट्रात पाठवा. ही मराठी भाषेची सगळ्यात मोठी सेवा होईल. तळमळ खरीखुरी असेल तर अशक्य काहीही नाही.

मराठी हा आपल्याला प्रेमानं एकत्र जोडणारा धागा आहे, ह्या भावनेनं इतक्या दूर देशात मराठी भाषा ऐकण्या-बोलण्यासाठी इतक्या लोकांनी एकत्र जमावं, ही घटनाच मला आनंददायक वाटते. आपल्या भाषेच्या प्रेमानं एकमेकांच्या जवळ येऊ, एकत्र जेवू, एकत्र गप्पागोष्टी करू, मनाशी दाटून येणाऱ्या कडूगोड आठवणी एकमेकांना सांगू, आपल्या दूर देशातल्या घरच्या आठवणी जागविणारी गाणी गाऊ किंवा ऐकू, या भावनेनं एकत्र जमणारा हा मेळावा पाहिला म्हणजे निराशेने वठत जाणाऱ्या या मनाला आशेची पालवी फुटते.

मित्रहो, हा मेळावा भरवल्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. इतर कोठलाही नसला, तरी वयाच्या वडीलकीच्या अधिकारानं म्हणतो की, असेच एकत्र या. चार मराठी गाणी म्हणा, नाटक करा. कविता वाचा, कथाकथन करा, तात्त्विक मतभेदही असू देत. अस्सल कोल्हापुरी रस्सा करा किंवा चंद्रपुरी वडाभात करा. बहुतेकांच्या घरी मी बार्बेक्यूची शेगडी पाहिलेली आहे. तिच्यावर अमेरिकन गव्हाच्या लोंब्या भाजून का होईना, हुरडा पार्टी करा. असली छोटी छोटी संमेलनं होत राहू दे. अमेरिकेतल्या कुठल्याही गावात तुम्ही असलात तरी त्या वेळेला ते गाव महाराष्ट्रात आलेलं असेल. मनाला अधून मधून खिन्न करणारी तुमची दूरत्वाची भावना त्यातून नाहिशी होईल. मनामध्ये आपलेपण असलं की, सगळीकडे आपली माणसं भेटतात. तेच आपलेपण घेऊन तुम्ही आलात आणि मी सुद्धा आलेलो आहे. तुम्हाला असलं आपलेपण उदंड लाभो, अशा प्रकारची प्रार्थना करतो.”

पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स
१२ जुन २००८

पुलं तुमच्या मुलांसाठी

शाळेतली मुलं जेव्हा ' आम्ही कुठली पुस्तकं वाचावी ?' असं मला विचारतात , तेव्हा मी त्यांना सांगतो , ' तुम्हांला जी वाचावीशी वाटतील , ती वाचा. ' काही मुलं थोडासा अपराध्यासारखा चेहरा करुन सांगतात , ' आम्हांला रहस्यकथा आवडतात ' मग मी म्हणतो , ' मग रहस्यकथा वाचा. ' माझ्या शाळकरी वयात मी डिटेक्टिव्ह रामाराव , भालेराव यांच्या गुप्त-पोलिशी चातुर्याच्या कादंबऱ्यांचा फडशा पाडत असे.

माझ्या आयुष्यात ' पुस्तक ' ही गरज व्हायला ह्मा करमणूक करणाऱ्या पुस्तकांनी खूप मदत केली. हळूहळू त्याहूनही अधिक चांगलं वाचायची ओढ लागते. ज्या घरात आणि समाजात आपण वाढत असतो , त्याचे आपल्या मनावर संस्कार होत असतात. त्यांतून आवडीनिवडी ठरायला लागतात. शाळेत शिकताना एखादा विषय आपल्याला विशेष आवडायला लागतो. एखादा खेळ अधिक आवडतो. आपल्या आवडीचा जो विषय असेल , त्यावरचं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं. त्या विषयावर वाचलेलं अधिक लक्षातही राहतं. क्रिकेट आवडत असलं , तर दहा वर्षांपूर्वीचा एखादा टेस्ट- मॅचचा स्कोअर तपशीलवार आठवत असतो. कुठल्या खेळाडूचा त्रिफळा उडाला , कोणी कोणाच्या गोलंदाजीला कुठं झेल घेतला , कोण धावचीत झाला- कोण पायचीत झाला , सगळं काही आठवत असतं. पण न आवडणाऱ्या भूमितीतलं प्रमेय पन्नास वेळा वाचूनही आठवत नाही. शेवटी हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे पण केवळ वैयिक्तक आवडिनिवडीचा प्रश्न आहे , म्हणून सोडून देता येत नाही. वाचनाची आवड जोपासावी कशी , याचाही विचार करायला हवा. पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात.

शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइसक्रिम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली , तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या ह्मा पदार्थांचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यार्थांच्या मनात पुस्तका- संबंधी खरा प्रश्न उभा राहतो , तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पा‌ठ्यपुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही ; नाही वाचलं तर नापास होऊ , ह्मा भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे ; तो म्हणजे ते पुस्तक ' पाठ्यपुस्तक आहे ' अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पाठ्यपुस्तक ही त्या पुस्तकावर सोपवलेली एक निराळी कामगिरी आहे. चांगल्या ग्रंथकारांनी जे ग्रंथ लिहिले , ते मुलांना परिक्षेत मार्क मिळवून द्यायची सोय करावी म्हणून लिहिले नाहीत. समजा , तुमचं इतिहासाचं पुस्तक असलं , तर ते आपले वीरपुरुष कोण होते , परकीयांची आक्रमणं कां झाली ? ती आपण कशी परतवली कमी पडलो तर कां कमी पडलो ?- हे सारं सांगत आलेलं असतं. ते वाचत असताना तुमच्या मनात प्रश्न उभे राहतील. त्याची उत्तरं शोधायला ते पुस्तक पुरेसं उपयोगी पडलं नाही तर तुम्ही दुसरं इतिहासाचं पुस्तक पहाल , गुरुजींना विचाराल. तुम्हांला इतिहासाचं ते पुस्तक परीक्षेसाठी लावलेलं पाठ्यपुस्तक न वाटता इतिहासाबद्दल तुमच्याशी बोलणाऱ्या मित्रासारखं वाटेल.

पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात , की आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का ? ही योजना करणंदेखील पुष्कळसं तुमच्या आवडिनिवडीवर राहील. पण साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात , तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा. नुसतीच करमणुकीची पुस्तकं वाचणं हे नुसत्याच शेवचिवड्यावर राहण्यासारखं आहे. पुस्तकांनासुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात. म्हणूनच म्हटलंय , की काही पुस्तकं चघळायची असतात , काही खूप चावून चावून पचवावी लागतात , काही एकदम गिळता येतात. पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं. पण पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही , हे मात्र चूक आहे. प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं , हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे. कधी कल्पनेच्या प्रदेशात , कधी विचारांच्या जगात , कधी विज्ञानाच्या राज्यात , कधी वनस्पतींच्या दुनियेत- कुठल्या पानावर मनाला किल्हाद देणारं , आधार देणारं किंवा अंतर्मुख व्हायला लावणारं काय मिळेल ते सांगता येणं कठीण आहे. एखादाच विचार मिळतो आणि आपलं जीवन उजळून जातो. गांधीजींच्या हातात रिस्कनचं अन्टु द लास्ट- अंत्योदय हे पुस्तक आलं आणि त्यांना त्यांच्या जिवितकार्याला विचारांची बैठक मिळाली. पुस्तकच कशाला , एखादी कवितेची ओळखसुद्धा आयुष्यभर सोबत करत राहील! पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही. खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.

पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स
१२ जुन २००८

नवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई

आज पुलंही नाहीत आणि प्रमोद नवलकरही... पण नवलकर नावाच्या भटक्याने त्यांच्या ' झपाटलेल्या लेखणी ' ने केलेले हे ' पुल ' वर्णन.. 

मराठी माणसाच्या मनात पु.ल. देशपांडेंच्या एवढ्या आठवणी आहेत की त्या कदापि पुसल्या जाणार नाहीत. पु.लं.नी माणसाच्या सर्व अंगांना केवळ स्पर्श केला नाही तर ते उराशी बाळगून त्याला आंजारलं , गोंजारलं. म्हणून महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना बंधुप्रेम देणारे ' भाई ' लाभले. जो त्यांच्या सहवासात आला तो त्यांच्या सावलीत सुखावला. ज्यांना त्यांचा सहवास लाभला नाही त्यांनी केवळ त्यांची आठवण काढून भरभरून आनंद घेतला असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे उद्या संशोधकांची डोकेदुखी ठरणार आहे. हा माणूस कोणत्या रसायनाने घडवला गेला होता याचा शोध घेणं वैज्ञानिकांना अवघड जाणार आहे. माझ्याही मनात भाईंच्याविषयी मोजक्याच पण हृदयाला भिडणा-या आठवणी खोलवर रुजून बसल्या आहेत.

भाईंना गेल्याला वर्षं उलटली तरी त्या काल-परवाच्या वाटतात आणि भाई गेले यावर विश्वास बसत नाही. त्या सा-या आठवणी माझा पाठलाग करत आहेत. प्रयत्न करूनही पिच्छा सोडायला तयार नाहीत. जेव्हा प्रभादेवीच्या रवींद थिएटरच्या परिसरात महाराष्ट्र कला अकादमी उभी करण्याचं ठरलं तेव्हा मी सांस्कृतिक मंत्री होतो. माझ्याच कारकीर्दीत अकादमीचा पाया घातला गेला. माझी खात्री होती की एकदा सुरुवात झाल्यावर ते थांबणार नाही. कुठूनही पैसे येतील आणि दिल्लीच्या अल्काझी अकादमीप्रमाणे महाराष्ट्राची भव्य वैभववास्तू उभी राहील. आणि खरोखरच तसं घडलं. त्या वेळी त्या अकादमीला नाव देण्याचा विचारच कोणाच्या डोक्यात नव्हता. कारण तिला शोभून दिसेल अशा हिमालयीन उंचीची व्यक्तीच डोळ्यासमोर नव्हती. त्यानंतर कधीही पुण्याला गेल्यावर भाई अकादमीच्या प्रगतीची चौकशी करत. मी त्यांना म्हणायचो , ' भाई , काळजी करू नका. या अकादमीत छबिलदासपासून कालिदासपर्यंत आणि पिला हाऊसपासून ऑपेरा हाऊसपर्यंत सर्व अंतर्भूत असेल. ' मनात एकदा असा अस्पष्ट विचार आला की अकादमी झाल्यावर त्यांची तब्येत चांगली नसतानाही त्याच अवस्थेत त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं. मनोहरना मी तसं बोलूनही ठेवलं होतं. काळाच्या घड्या कलानिकेतनमधल्या साडीसारख्या उलटत गेल्या. युतीची सत्ता गेली. सहा महिन्यांनंतर निवडणूक झाली आणि आघाडीची सत्ता आली. केवळ अकादमीचे काम अपुरे राहिले म्हणून खंत वाटली. पण निराश झालो नाही. महाराष्ट्रात कोणाचीही सत्ता आली तरी मराठी माणसाचीच असणार हा आत्मविश्वास निदान आजपर्यंत तरी ' च्यवनप्राश ' न घेता मला वाटत आहे. त्यामुळे अकादमीचं काम थांबलं नाही. माझ्याजागी आलेले सांस्कृतिक मंत्री रामकृष्ण मोरे , शशी प्रभू आणि अवसेर्करांनी ते जिद्दीने पुरं केलं. पूर्वी येता-जाता मी अकादमीत जाऊन तिथल्या प्रगतीचा आढावा घेत होतो. त्यानंतर मात्र त्या रस्त्यावर गाडी उभी करून मोठ्या अभिमानाने पूर्णत्वाला जाणाऱ्या अकादमीकडे पाहत आलो. 

आठ नोव्हेंबर रोजी भाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. त्याची छायाचित्रं आणि वृत्तान्त सर्व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. ते सर्व पाहिल्यावर मनात प्रचंड कालवाकालव झाली. त्या छायाचित्रात भाईंच्या पुतळ्यासमोर सांस्कृतिक मंत्री मोरे आणि नगरपाल किरण शांताराम ' हसतमुखा'ने उभे आहेत. भाईंनी सर्वांना जरी आयुष्यभर हसवलं तरी त्या पुतळ्याकडे पाहून मात्र चटकन गहिवरून आलं. शिल्पकार राजन यावलकर यांनी एक शिल्प म्हणून तो पुतळा बराच हुबेहूब बनवला आहे. तरीही भाई म्हटले की ' या बसा ' म्हणणार , चहा-चिवडा देणार , भावाप्रमाणे क्षेमकुशल विचारणार , एखादी कोटी करणार , हसणार , हसवणार , त्यांच्या डोळ्यांतून , मुखातून , शब्दांचे झरे वाहणार , ते भाई आज एखाद्या दगडासारखे कोणतीही हालचाल न करता निश्चल उभे राहिलेले पाहणे कोणत्याही सुहृदय माणसाला पाणावलेल्या डोळ्याशिवाय पाहण शक्य नाही. पण तरीही यावलकर म्हणाले , ' तो पुतळा घडवताना मला एवढा अत्यानंद झाला की तसा आनंद आयुष्यात कधी झाला नव्हता. '

त्यांनी कदाचित भाईंच्या स्वभावाच्या रंगाची पेटी पाहिली नसेल. त्यांचा अखेरचा काळ शारीरिक दुर्बलतेत गेला. पण त्या व्याधीची जाणीव त्यांनी कधी भेटणाऱ्यालाच नव्हे तर त्या व्हील चेअरलाही जाणवू दिली नाही. स्वभावाशी तडजोड केली नाही. विनोदाशी फारकत घेतली नाही आणि मायेची शाल कधी खांद्यावरून ढासळू दिली नाही. याच अवस्थेत मी त्यांना ' महाराष्ट्र भूषण ' स्वीकारण्याची विनंती केली तेव्हा त्यांना गहिवरून आलं. त्या प्रकृतीत समारंभाला जाणं शक्य नसल्याने सुनितावहिनी राजी नव्हत्या. पण भाईंचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी होकार दिला. त्यातून थोडा वाद निर्माण झाला तरी त्यानंतर भाईंच्याकडे गेल्यावर त्या वादाची कधीही सावली दिसली नाही. 

एकदा तर माझा हट्ट पुरवण्यासाठी भाई व्हील चेअरवरून तळमजल्यावर आले आणि एका समारंभाचं उद्घाटन केलं. त्या वेळी धर्मेंदच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. भाईंच्या पायाला मिठी मारून त्याने फोटो काढून घेतला होता. भाईंना कोणाला नकार देणं जमलं नाही. महिनाभर ते परदेश दौ-यावर होते. तिथेच पत्र पाठवून मी त्यांना माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. दौ-यावरून परतल्यावर त्यांनी काही तासांतच जी प्रस्तावना लिहून काढली तो माझ्या जीवनातला फार मोठा ठेवा आहे. भाईंची एकच इच्छा अपुरी राहिली. त्यांना वेशांतर करून माझ्याबरोबर मध्यरात्री मुंबई पाहायची होती. आजारपण आलं आणि ते राहून गेलं. भाई पुन्हापुन्हा ती आठवण द्यायचे. असे आमच्या श्वासाशी एकरूप झालेले भाई निर्जीव पुतळ्याच्या रूपात पाहवत नाहीत. कारण आठवणी ताज्या आहेत. मृत्यूनंतर किमान शंभर वर्षं तरी थोरामोठ्यांचे पुतळे उभे करू नयेत. ज्या हातांच्या बोटांतून पेटीतले स्वर उमटायचे आणि दानपत्रांची उधळपट्टी व्हायची ते हात आज निश्चेष्ट होऊन पुतळ्याच्या मागे लपलेले पाहून डोळ्यांच्या कडा पाणावतात. भाई गेले , सबनीस गेले , शांताबाई गेल्या , दुर्गाबाई गेल्या , त्यांच्याबरोबर विसाव्या शतकाचे डोळेही मिटले. आता फक्त दिसतील त्यांचे पुतळे आणि रांगोळ्या.

महाराष्ट्र टाईम्स 
१२ जुन २००८ 

एक पत्र भाईसाठी - सुनीता देशपांडे

पुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी... ' महाराष्ट्र टाइम्स ' च्या १२ नोव्हेंबर २००० च्या अंकातून पुनर्प्रकाशित

प्रिय भाई,

परवाच्या १२ जूनला तू गेलास. गेलास म्हणजे कुठे गेलास? दृष्टीआड गेलास म्हणावं, तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास. कधी पलीकडल्या खोलीत, तर कधी पलीकडल्या गावात किंवा पलीकडल्या देशातही. परवा गेलास तो पलीकडल्या जगात, एवढाच छोटासा फरक. एरवी तू तर या क्षणीही माझ्या डोळ्यांसमोरच आहेस. ऐकतो आहेस ना, मी काय सांगतेय ते?

आपण एकमेकांना पाहिलं, एकमेकांत गुंतत गेलो आणि दीड-दोन वर्षांनंतर, तुझ्या हट्टाखातर मी कायदेशीर लग्नबंधन स्वीकारलं. योगायोग म्हणावा अशी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? आपण लग्न रजिस्टर केलं, तो दिवसही नेमका १२ जूनच होता. परवा कुणी तरी म्हणालं, 'भाईंचा जीव त्या १२ जून या तारखेसाठी घुटमळत होता.' लोक काहीही बोलतात. त्या दिवशी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी तुझी प्राणज्योत अखेर मालवली, कुडीचा श्वासोच्छवास थांबला, हे झालं वेळापत्रक. पण खग्रास ग्रहणाचे वेध काही काळ आधीच लागले होते. तू अगदी केविलवाणा झाला होतास. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. प्रयत्न फक्त चालू ठेवले होते. आजूबाजूची हवा खूप काही सुचवत होती; पण काहीच स्पष्ट सांगत नव्हती.

तुला ठाऊक आहे, आपल्या डॉक्टर दिवट्यांसारखाच हा आपला डॉक्टर प्रयागही एक देवमाणूस आहे. विज्ञाननिष्ठ, पण विज्ञानाच्याही चालू घडीच्या मर्यादा जाणणारा आणि म्हणूनच असेल, चमत्कारांवरही अविश्वास न दाखवणारं. त्यांचं सगळं हॉस्पिटलच तुझ्या एका प्राणासाठी धडपडताना पाहून मी म्हटलं, “डॉक्टर, पुरे आता.'' त्यांनी घाईघाईने उत्तर दिलं, “तुम्ही लक्ष घालू नका. Miracles can happen. आपण प्रयत्न करू."

Miracles! चमत्कार! होय, आजचे चमत्कार हे उद्याचं वास्तव ठरू शकतात.

आठवणी...आठवणी...आठवणी! भोगलेल्या रंगीबेरंगी सुखदुःखांच्या-हळुवार, फक्त आपल्या कानातच गुंजन घालणार्‍या, घरगुतीही आणि काही काळ वाजतगाजत राहणाऱ्या-रंगणाऱ्या, सार्वजनिकही, काही काSळ? छे छे! अनादी अनंत काळाच्या संदर्भात क्षणार्धाच्याही नव्हेत. कालप्रवाहात पाSर वाहून जाणाऱ्या. पण या क्षणी त्या जिवंत आहेत. याच घरात माझ्या सोबतीने वावरताहेत. घरातल्या माणसांप्रमाणेच त्या त्या घराच्या भितींनाही तिथे वास्तव्य करणारे रंग, गंध, स्पर्श आपले वाटत असणार. त्यांनाही ह्या साऱ्यांच्या आठवणी येतच असतील, तिथे रेंगाळणाऱ्या.

तुला आठवतंय? एके काळी मी संपूर्ण महाभारत वाचून काढलं होतं. 'व्यासोचिष्ट जगत्‌ सर्वम्‌' म्हणजे नेमकं काय, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अल्पमतीच्या प्रमाणात त्या काळाशी क्षणभर एकजीव झालेही. हो, क्षणभरच म्हणायचं आज त्यातलं त्या आठवणींत कितीसं उरलंय? तपशील वाहून जातो, तत्त्वाचा अशा आपल्या अस्तित्वातच मुरतो. तो कितपत मुरलाय याचा अंदाज घ्यायचं म्हटलं, तरी त्यासाठीच्या वादविवादाला, सहमतीला किंवा विचारांच्या तफावती दाखवायलाही दुसरं कुणी तरी लागतंच ना?

समोर तू, प्रत्यक्षात अबोल असतास तरी तो अंदाज माझा मला घेता आलाही असता कारण तुला मुळी वादविवादात कधी रसच नसायचा. रस होता तो संगीतात, अभिनयात, मुख्यत: संभाषणात. या तिन्ही शेतमळ्यांतला सुगंध, ओलावा, तुझ्यात सहज मुरायचा. शेत पिकायला उपजत बी-बियाणं लागतं हे खरंच; पण असलं खतपाणीही लागतं. या दोन्ही गोष्टी तुझ्यात जन्मजातच होत्या. म्हणून तर तू आनंदाच्या बागा फुलवू शकलास, पण शेताला मशागतही लागते, पीक जोमदार यायला शेतमजुरांचा घामही तिथे गाळावा लागतो. हे तुला कळत का नव्हतं? पण श्रेय द्यायला तू कधीच राजी नसायचास.

अधूनमधून मी वादही घालत असे; पण उपयोग नसायचा. मी दु:खी व्हायचे, अनेकदा तुझा रागही यायचा. मीही अपरिपक्वच होते ना?

मग लक्षात यायला लागल, याची सगळी निर्मिती ही, उत्तुंग इमारती, मनोरे, कळस दोन्ही तीर साधणारे पूल यांचीच आहे. हसतखेळत केलेली. डोंगरकपारीत सुंदर लेणीही याला सहज कोरता येतात. त्यासाठी मातीच्या, दगड-धोंड्यांच्या स्पर्शाचा ध्यास असावा लागत नाही. त्यांचं अस्तित्व गृहीतच धरलं जातं.

पण मला ही अक्कल यायला तुझा जीवच पणाला लागायला हवा होता? शहाणपणा येण्यासाठी ही किंमत द्यावी लागणार, याची कल्पना असती तर आजन्म वेडीच राहायला तयार होते रे मी! गेल्या चोपन्न वर्षांत मी किती वाद घातले! आपण एकमेकांच्या सहनशीलतेचा अंतच पाहिला जणू! मी ऐकवत राहून; तू न बोलता. क्वचित एखादा शब्द बोलायचास, तोही अगदी चपखल बसणारा. तुझ्या अफाट शब्दसंपदेने मला प्रथमपासूनच मोहून टाकलंय, ती मोहिनी अखेरपर्यंत माझा ताबा सोडणार नाही, एवढी जबरदस्त आहे साधी 'उपदेशपांडे'सारखी मला दिलेली पदवीदेखील (खरं तर टोमणाच) मी डोक्यावर घेऊन मिरवलीच ना!

लहान मुलांशी खेळांवं, तसा शब्दांशी तू मजेत खेळायचास. ३०-३५ वर्षांपूर्वी “हसवणूक' हा संग्रह प्रकाशित झाला, त्या वेळी या नव्या संग्रहाचं नाव काय ठेवायचं? 'हसवणूक' की 'फसवणूक'?-हा प्रश्न पडला. दोन्ही नावं तूच सुचवलेली; पण मला निर्णय घेता येईना. तू पटकन 'हसवणूक' असं लिहून दिलंस आणि आनंदाने माझे डोळे पाणावले. या क्षणीही तो प्रसंग आठवताच पुन्हा मनाची तीच गत झाली आहे. 'जे आनंदेही रडते, दु:खात कसे ते होई?' हे कवी अमरच असतात बघ! मी उगाच सांगत नाही. हेही गोविदाग्रजच नाही का म्हणून गेले?

"फ आणि ह. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली को, त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?' हे तूच लिहून ठेवलंयस. तुला ते जमलं, सर्वांनाच कसं जमणार?

फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो, तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. "आनंदाचे डोही आनंद तरंग." म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुलादेखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्याभोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्थाशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधूनमधून तरी एकान्ताची मागणी करत.

एकान्त म्हणजे पोकळी नव्हे. एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की, पोकळी निर्माण होते,पण खंबीर असलो, तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्‍य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की, हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो आणि त्या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते.

तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक 'मी'ची ताकद ज्याने त्याने अजमावायला हवी हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे, याचा प्रत्यय मला सतत येत राही, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही.

अशा अनेक बाबतींत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण'. सदैव माणसांत रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी-वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.

तूही जर इतर चारचौघांसारखाच 'एखादा कुणी' असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते, हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा 'मूल'पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानांत, लिखाणात, तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात, त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?

तू लिहीत वगैरे नसायचास तेव्हाचा तुझा वेळ तू फुकट घालवतो आहेस, असं मला चुकूनही कधी वाटत नसे. Gained=Lost म्हणजेच Lost=Gained हे फिजिक्समधलं गणित मलाही माहीत आहे. पण तरीही काहीही फुकट जाऊ नये यासाठी मी सदैव जागरूक मात्र असते. नातवंडं दूध पितानादेखील थोडं इकडे तिकडे सांडतात, आणि मी “अरे असं सांडू नवे रे, नीट प्यावं, '” असं म्हटलं की, “जाऊ दे ग" म्हणून हसून सोडून देतात. हा संवाद वरचेवर घडतो, पण त्यातून दोऱ्ही पक्ष धडा घेत नाहीत. विचार येतो, हेच ठीक आहे. सगळेच काटेकोर वागले, तर जगणं किती एकसुरी बेचव होईल!

बोरकरांची ओळ आहे, 'चंदन होओनि अग्नी भोगावा” जिवंत असताना, मृतावस्थेतही, कितीही उगाळलं तरी आणि डोवटी जळून जातानादेखील, त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल, त्याला अग्नीदेखीळ भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुडीची एकरूपता. तो चिरंजीवच. नायं हन्ति न हन्यते.

तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, "वहिनी, भाई गेले, तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." हा खरचं त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.

तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला, त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतत्रं जीवनात प्रवेश केला. Robert Graves ची एक कविता आहे, मूळ शब्द आज निटसे आठवत नाहीत. पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा -मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय़ गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते. आणि आतला तेजस्वी जिंवत अंगार धगधगायला लागतो... आणि हेही तितकंच खरं की ते निखारे पुन्हा फुलायला लागतात, त्या वेळी त्यांच्यावरची आपण उडवून लावलेली राख आपल्याभोवती जमून दुसऱ्या कुणाच्या तरी फुंकरीची वाट पाहत आपल्याला लपेटून गुपचुप पडून असते. अहिल्येच्या शिळेसारखी.

एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आणिक जातो.’ येताना कधी कळ्या घेऊन आला, तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य, हे त्याला तरी कुठे माहीत असतं? त्या क्षणी जे भाळी असेल, ते स्विकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य! ऍब्स्ट्रॅक्ट, कॉंक्रिट काहीही नाही-"

अस्तित्वाला जाग येते, त्या क्षणीच श्वास सुरू होतो. आईच्या गर्भात फार तर तिच्या श्वासावर जगता येईल. पण पुढे प्रत्येक श्वास आपला आपल्यालाच घ्यावा लागतो. तेवढाच आपला अधिकार. तो टिकवण्यासाठी किती धडपडायचं ते मात्र आपल्या हाती असतं.

पण मुळात कसलीही धडपड तुझ्या स्वभावातच नव्हती. देवळातल्या देवासारखा तू पुढ्यात येईल त्याचा स्वीकार करत गेलास. मग ते पंचामृत असो, नाहीतर साधं तुळशीपत्र. त्याबद्दल तक्रारीचा चुकून एखादा शब्ददेखील कधी तुझ्या तोंडून बाहेर पडत नसे. याचा अर्थ, तुला निवड करता येत नव्हती, किंवा “सुखदु:खे समे कृत्वा' असा काही तुझा स्वभावविशेष होता, असं नव्हे. कुठे सभा-समारंभाला जाताना मी कपाटातून काढून देईन तो पोशाख तू सहजगत्या चढवत असस. पण कधी गडबडीत मी ते काम तुझ्यावरच सोपवलं, तर तुझ्या कपाटात घडी घालून रचून ठेवलेल्या ८-० बुदाशर्टांतला हवा तो मधलाच कुठला तरी छानसा-बहुधा तुला अधिक आवडणारा बुदाशर्ट तू ओढून काढून अंगावर चढवत असस आणि विस्कटलेला बाकोचा ढिगारा पुन्हा रचून ठेवण्याचं काम खुदाल माझ्यावर टाकण्यात तुला काहीही चूक वाटत नसे. अज्ञा प्रकारची तुझी कोणतीही कृती जाणीवपूर्वक नसायची. केवळ अंगवळणी पडलेली, पुरुषप्रधान संस्कृतीतून परंपरागत चालत आल्याने सहज स्वीकारलेली अश्ली ती तुझी सवय होती. परावलंबनाच्या तुझ्या आवडीचाही तो भाग असू हकेल. बहुधा दोन्ही.

असा तू देवमाणूसही; आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानाने ते नावही स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच 'खेळिया' होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही.

तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान- भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीने नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंतीही 'तुला' लाभली होती. येताना कंठात आणि बोटांत सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास, तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे.

तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना ?

असा तू वेगळा आणि मीही वेगळी. मग हा इतका प्रदीर्घ प्रवास आपण एकत्र केलाच कसा. हा प्रश्न इतर कुणाला पडला, तरी आपणां दोघांना पडायचं कारणच नव्हतं. कसा विरोधाभास आहे पहा! एकत्र प्रवास, पण आपापल्या मार्गाने. वास्तव्य एकाच घरात, पण जगणं स्वतंत्र. असा वावर चालतो, तेव्हा स्वाभाविकच अधूनमधून एकमेकांचे एकमेकांना धक्के बसतात; पण सहजपणे सॉरी' म्हणून क्षणात आपण आपल्या दिडोने पुढे जातो, आपापल्या कामांत मग्न राहतो.

तसं खरं सांगायचं तर माझ्यातही कर्तृत्वशाक्ती अगदीच काही कमी नव्हती. मी अथक परिश्रम करू शकते-खूप सोसू शकते-सतत धावपळ करू शकते-अनेक गोष्टी निभावून नेऊ शकते, हा आत्मविश्वास माझ्यात खूप होता आणि काही चुकलंच तर स्वतःहून ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणाही होता. माणसाला आणखी काव हवं असतं? या साऱ्यासकट आपलं उद्दिष्ट ठरवणं इतकंच ना? क्षीण म्हणा किंवा प्रभावी म्हणा. स्रोत तोच. फक्त त्याची दिशा ठरवायचा क्षण येतो, तेव्हा कोणतं वळण घ्यायचं, याचा निर्णय घेण्याचा प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न मी पटकन सोडवून टाकला आणि हातमिळवणी केली. म्हणजे माझा हात तुझ्या हातात दिला की, तुझा हात माझ्या हातांत पकडला? असले प्रश्न सोडवत बसायला कधी वेळच मिळाला नाही म्हणा किंवा ते महत्त्वाचे वाटावे, असे प्रसंगच आले नाहीत म्हणा; कारण कोणतंही असेल, पण त्यावाचून काही अडलं नाही हे मात्र खरं.

वय वाढत जातं, त्याच्या जोडीने उरला दिवस अल्प, घोडे थकुनी चूर' ही जाणीवही वाढत जाते. उन्हं उतरत जातात, तशी आपली शक्ती कमी होत जाते; पण त्याचबरोबर अनुभवांचं माप भरून ओसंडायला लागतं. व्यक्तिमत्त्व प्रगल्भ-एका अर्थी ऐश्वर्यसंपन्न होत चालल्याचा साक्षात्कार होण्याचाही संभव असतो.

आशा-निराशेच्या पालखीतून असा डोलत डोलत प्रवास चालू राहतो. या वाटेवर, “कुणासाठी? कश्यासाठी? कुठे? आणि कुठवर?' असले प्रश्नही अधूनमधून भेटत असतात आणि त्यांच्या सोबतीनेच शेवटी दिगंबरात विलीन व्हायचं असतं. या क्षणी खानोलकर मदतीला आला, तशीच अगदी व्यासांपासून ते अद्ययावत कवींपर्यंत कुणालाही-आठवातल्या अगदी कुणालाही-साद घालावी, तो आनंदाने हजर होतो. त्यालाही भविष्यात वाचकाच्या मनात जगण्याची ओढ असतेच ना?

कवी ग्रेसच्या ओळी आहेत ,

' क्षितीज जसे दिसते ,
तशी म्हणावी गाणी।
देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥
गाय जशी हंबरते ,
तसेच व्याकुळ व्हावे ।
बुडता बुडता सांजप्रवाही ,
अलगद भरुनी यावे ' .


तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस. ती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी ? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते ? हक्काची बायकोच ना तुझी !

लग्नाच्या नोंदणी-अर्जावर सही करताना मीच नव्हता का सामाजिक बांधिलकी वगैरेला राजीनामा दिला? लग्नाची काय आणि समाजाची काय, बांधिलकी एकदा मानली की, पर्याय दोनच. एक तर फारकत घेऊन मोकळं व्हायचं, किंवा स्वतःला विसरून जबाबदारी स्वीकारायची. मी हा दुसरा पर्याय निवडला. स्वखुषीने, आनंदाने स्वीकारला.

मला एका योगायोगाचं नवल वाटतं : तुला शारीरिक दु:ख अजिबात सहन होत नसायचं आणि परावलंबन खूप आवडायचं; आणि तुला हा जो होवटला आजार आला, तोही शारीरिक दु:ख, वेदना, असलं काहीही न आणता फकत परावलंबन घेऊनच आला. ते परावलंबनही सतत वाढत जाणारं. त्याने माझी जबाबदारीही वाढवत नेली. मनावरचा ताण वाढत गेला आणि आतून खूप थकत गेले रे मी! याची जाणीव तुलाही होत असावी, अज्ञी अधूनमधून मला शंका येत राही. तू असा केविलवाणा व्हायचास तेव्हा न चुकता ते जुनं गाणं मनात जागं व्हायचं: बघु नको5 मजकडे केविलवाणा, राजसबाळा.' तुझा तो राजसबाळपणा अखेरपर्यंत तुझ्यात येऊन वस्तीला राहिला होता. त्याचं ओझं माझ्या मनावर येऊन पडत राहिलं तेही तुझ्या अखेरपर्यं, आणि आता अजया आठवणींतून माझ्याही अखेरपर्यंतच.

तुझा आजार संथ गतीने पण वाढतच चालला होता, पण शेवटी शेवटी तू अगदीच दीनवाणा झालास, तेव्हा मात्र माझा धीरच सुटला. नाही नाही ते विचार मनात यायला लागले. तुझी आई ९५ वर्षांची होऊन गेली. वाटलं, यालाही असंच दीर्घायुष्य लाभणार्‌ असेल, तर या अवस्थेत माझ्यानंतर याचं कसं होणार? आजवरचं तुझं आयुष्य हेवा करण्याजोगं होतं, म्हणूनच कसं भर्रकन गेल्यासारखं वाटलं. थोडंथोडकं नव्हे, ऐंशी वर्ष असं सुंदर, संपन्न जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच असावा. रेंगाळू नये, तुला त्याने आणखी केविलवाणा करू नये, असं तीव्रतेने वाटत होतं आणि योगायोगाने म्हणा किंवा तुझ्यावर खऱ्या अर्थाने जीव टाकणाऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर म्हणा, घडलंही तसंच.

तू गेलास आणि सगळेच किती हळहळले! लहानांपासून थोरापर्यंत, सगळेच. जणू आपल्या घरातलंच कुणी वडीलधारं माणूस आपल्याला सोडून गेलं, असं आतड्याचं दु:ख सर्वत्र व्यक्‍त झालं. सुन्नाट, धीरगंभीर, घरंदाज. वाटलं, स्वत:चं हे वैभव पाहायला क्षणभर तरी तू जवळपास हवा होतास. मिरवणूक, भाषणं, अंत्यविधी असलं काही काही नको म्हटलं आणि ते मानलं गेलं.

लोकप्रिय माणूस हा सार्वजनिक होतो. त्याच्या मृत्यूलाही लोक शांतता लाभू देत नाहीत. पण तू सर्वार्थाने भाग्यवान ठरलास. प्रत्येकाने वैयक्तिक रीत्या मूक अश्रूंनी तुला निरोप दिला. सर्वांच्या वतीने मिनिट-दीड मिनिटाची सरकारी मानवंदना. बस्स!

बारा जूनला तू गेलास, त्याला आता बराच काळ लोटला. तुझ्या अखेरच्या आजारपणापासून आजच्या या घडीपर्यंत तुझ्या संदर्भात जे जे काही घडलं, ते कुणीही हेवा करावा असंच. आणि प्रत्येक वेळी मलाही तेच तेच वाटत राहिलं, हे पाहायला इथे तू हवा होतास-तू हवा होतास.

या आठवणीदेखील किती लहरी असतात! कधी मैत्रिणी होऊन येतात, तर कधी वैरिणी! कधी यावं, किती काळ थांबावं, कधी नाहीसं व्हावं, सगळे निर्णय त्याच घेतात, आपल्या संमतीची त्यांना पर्वाच नसते. पुन्हा पुन्हा भेटीला येतात, जा जा म्हटलं तरी रेंगाळत राहतात, कधी कधी प्रदीर्घ मुक्कामच ठोकतात. आपण कशालाही डरत नाही, या अहंकाराचा धुव्वा उडवण्यासाठीच जणू यांचा जन्म!

आठवणी अनावर होतात, डोकं जड होतं, ही गर्दी, हा भार सहन तरी कसा करायचा? आज माझ्या उघड्या डोळ्यांना तू समोर दिसत नाहीस. मिटले की लगेच समोर येऊन ठाकतोस. चक्र सुरू होतं. अज्ञा या आठवणी, सुख-दु:खांच्या. माझ्या बाबतीत आज दुःखांच्याच अधिक. कुणी दुसऱ्याने दिलेल्या दु:खाच्या नव्हे, माझ्या स्वत:च्याच स्वभावदोषातून माझ्या हातून वेळोवेळी घडलेल्या अगणित चुकांच्या आणि त्याबद्दल आता होत राहिलेल्या पश्चात्तापाच्या.

थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.

मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय ? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे ? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे ? या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं ?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालावं इतकंच.


सुनीता देशपांडे
महाराष्ट टाईम्स
१२ नोव्हेंबर २०००