Monday, March 14, 2022

ललित आत्मपरिचय कसे लिहावे (एक मार्गदर्शन)

...पूर्वी ' मी व माझे लेखन ' हा लेख साठीच्या आसपास येताना लिहीत. हल्ली ' अ आ इ ई ' एवढे लिहिल्यावरसुद्धा लिहिता येतो. आता उदाहरणार्थ : किशोर कोरे याने ' ग म भ न ' ही निर्मिती केल्यानंतर लिहिलेला आत्मपरिचय पाहा. किशोर कोरे हा अगदी नवसाहित्यिक आहे. कारण गेल्या महिन्यापासूनच तो लिहायला लागला.

" आमचा बाप ग्रेट आहे. आणि आईसुद्धा. आमच्या बापाचं आईवर प्रेम नसावं. कारण बापाला प्रेम काय ते कळतं म्हणून मला शाळेत पोचवायला येतो आणि आमच्या वर्गातल्या बाईशी बोलत बसतो. बाप सिगारेट ओढतो म्हणून आई त्याला बोलते. बापाने सिगारेट ओढली तर माझ्या आजाचं काय जातं ? मला आजे दोन आहेत. एक आईचा बाप आणि एक बापाचा बाप. हेही ग्रेटच.

मी ग म भ न र स पर्यंत लिहिलं. बाईला त आणि ळ येत नसावा. पुढं जातच नाही. 'स'शीच येऊन थांबली आहे. आमची बाई दॅट इज निमाताई. तिला काहीच येत नाही. तिला मोटरचा उच्चार 'कार'असा आहे हे ठाऊक नाही. बालगीतं म्हणजे वैताग. म्हणून वर्गातली बाकीची भुक्कड गर्दी 'शाणी माजी भावली' म्हणताना फक्त मी तेवढा 'बोल राधा बोल' म्हणत असतो.

मी कधी शाळेत जाईन असं मला वाटलं नव्हतं. बाप उचलून घेऊन गेला. शाळा हा साला ताप आहे. आपण शिकणार नाही. कारण शिकण्यासारखं काहीच नाही. होतं ते शिकलो. आता फारतर शिकलेल्या अक्षरांना टोप्या घालायच्या, नाहीतर काने, मात्रा ओढायचे. म्हणजे वैताग. बालगीतासारखा. खरं तर ग ला म कां नाही म्हणत ? सगळी भाषा बदलली पाहिजे. ' मंमं ' म्हणजे जेवण हे कळत असताना जेवण हे कशाला शिकायचं ? भू भू म्हणजे कुत्रा हे कुत्र्यालासुध्दा कळतं मग कु कशाला नि त्रा कशाला शिकायचा ? पण ' जो जो ' म्हणजे झोप तेव्हा ' ज ' शिकला पाहिजे आणि ' कुक् कुक् ' म्हणजे आगगाडी तेव्हा 'कु' शिकलाच पाहिजे. म्हणजे वैताग.
एकंदर सगळा वैताग आहे हे आजवरच्या आयुष्यातल्या अनुभवावरुन सांगतो.

तिस-या वाढदिवसाला बाप काय देतो पाहीन, नाहीतर चक्क बापाला डॅडी न म्हणता बाप म्हणेन. हे बाप लोक आम्हाला जन्माला घालण्यापूर्वी विचारीत कां नाहीत ? आमच्या बापाचं नाव मोरेश्वर म्हणून मी त्याला नामानिराळा ठेवतो आणि माझं नाव फक्त किशोर कोरे एवढंच सांगतो. एक पाव्हणा म्हणाला, ' अरे तुझ्या बापाचं नाव सांग.' मी म्हटलं, ' हा इथे बाप आहे त्यालाच त्याचं नाव विचारा. ' पाव्हणा आडवा. एका कॅडबरीत काय काय म्हणून सांगायचं ? पाव्हण्याच्या बायकोने माझी पापी घेतली. तिला मी माझं नाव 'किशोरकुमार' असं सांगितलं. ती म्हणाली, 'सगळं नाव काय ?' मी म्हटलं, 'दिलीपकुमारचं सगळं नाव विचारुन या.' पाव्हणी करपली. आपण नाही कोणाला भीत. माझी महत्वाकांक्षा गांजा ओढणं ही आहे. "

माझी कादंबरी लिहून होईपर्यंत मी कादंबरीकार होईन असं मला वाटलंच नव्हतं. कारण साहित्याची भंकस आपल्याला पटत नाही. आमच्या फेवरीट हातभट्टीच्या अड्ड्यावर पंडा भोरकरनं बेट घेतली. " लिहून दाखव कादंबरी. " आपण दिली. आठव्या दिवशी तीन बाटल्या शाई आणि पाच रिमं कागद चिताडून काढले शब्दाच्या मुडद्यांनी. झाली कादंबरी. बगलेत मारून अड्ड्याकडे जात होतो. कामू नाक्यावर झाडम्या भेटला. स्कूटरमागं यल्लम्माला घेऊन. त्याला वाटलं , काखेत जिन्नस आहे. मी म्हटलं ' झाडम्या येड्या ही कादंबरी " .झाडम्या म्हणाला " मारो गोली ." आणि स्कूटरला किक मारून यल्लीसकट पसार. मी म्हटलं याची केस केली पाहिजे. आमच्या गॅंगमधला जेम्स बॉण्ड आहे मी. टॅक्सीला दमडा नाही खिशात. म्हणून पॅन्ट विकणार होतो तर नाक्यावरच्या जरीपुराणेवाल्याकडे कवितासंग्रहाचे गठ्ठे विकायला प्रकाशक आला होता. त्याला म्हटलं खाकेत कादंबरी आहे. केवढ्याला घेतोस ? तो म्हणाला केवढ्याला देतोस ? मी म्हटलं घेशील तेवढ्याला. आधी टॅक्सीला पैसे दे. तेवढ्यात रद्दीवाल्याने कवितासंग्रह तागडीत तोलले आणि त्याला बावीस रूपये दिले. आपण खेचले आणि कादंबरी प्रकाशकाला देऊन बगल मोकळी केली. बावीस रूपये ! आपकमाईचे. बापकमाईचे तर दरमहा शंभर रुपये टिकवतो. बाप आपल्याला टरकून. पुढल्या महिन्यात बी.ए. परीक्षेला बसण्याबद्दल बोनस देणार आहे.लेकाचा बाप. तोवर बावीस रूपये ही सही. माझी कादंबरी बगलेत घालून प्रकाशक गेला. मी सरळ टॅक्सी गाठली आणि झाडम्याचा नाद सोडून सीधा गेलो आपल्या गॅंगच्या अड्ड्यावर. तिथे पंडा भोरकर आणि चिमण्या मल्हारी मार्तंड बसले होते चणे खात. बावीस रूपये आपकमाई. पंडा म्हणाला "ही काय भंकस . " चिमण्या म्हणाला "बूटपालिस केलंस काय ?" मी म्हणालो " आवाज बंद. जान निकालेगा. कादंबरीचा अॅडव्हान्स . बावीस रूपये. " पंडा म्हणाला "साली माझी आयडिया घेऊन कादंबरी लिहितोस " मी म्हटलं " तू व्हिक्टर बाॅटलनेकची नाही घेत ? " पंडाची जबान तुटली. चिमण्या म्हणाला "छोडो यार " मग मी छोडलं." पण आधी बीट मारलीस त्याचा पैशे मोज. मेरा पैशे मोज. " पंडा म्हणाला " कसली बीट " मी म्हटलं " कतरू नकोस प्यारे - कादंबरी लिहून दाखवायची बीट ! जबान बदलतोस ? दिला शब्द खरा कर " पंडा म्हणाला " शब्द खरा करायचा म्हणून कोणी सांगितलं ?" पंडाही ग्रेट. मग सहा रूपयांचा नंबरी जिन्नस आणला कालिन्याहून. आणि भेंडी बाजारात उस्मान कादरकडे मुर्गी चावली. दोन रुपये उरले. मी म्हटलं " यार लोक येवढे आपल्याला ठेवा. बापाचा मंथली हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत" पंडा म्हणाला " जहन्नममे जाव " मग मी जहन्नममध्ये गेलो. इकडे प्रकाशकाने कादंबरी छापखान्यात नेली. प्रकाशक ग्रेट. कादंबरीला प्राइझ मिळवून दाखवलं.‌लोकही ग्रेट. त्यांनी विकत घेऊन वाचली. दुसरी लिहिली. तीही प्रकाशक बगलेत मारून गेला. तिलाही प्राइज. गॅन्गमधील यार लोक म्हणतात प्रकाशकाचा बगलबच्चा. मी म्हटलं " पहिल्या प्राइझमध्ये शर्ट घेतले दुस-यात बनियन तिसरं मिळालं तर प्यांटी घेणार ! आपल्याला साहित्य बिहित्य पसंत नाही. आपण औलिया." तेवढ्यात आपलं लग्न झालं. बाप म्हणाला दहा हजार हुंडा मिळतोय. मी म्हटलं बापाला " " फिकीर मत करो बेटा शादी करेगा. तुम्हारे लिये बॅन्क में नौकरी करेगा ! " आपण मॅनेजरला नाही भीत. मग शादी केली. हल्ली बॅंकेत नोकरी करतो. पंडा भोरकर गॅन्गशी बेमान निघाला. आमचा लीडर असून म्युन्सिपाल्टीत खर्डेघाशी करतो. आणि रस्त्यात भेटला तर तोंड चुकवतो. माझ्या कादंब-या खपतात म्हणून खार खातो. आपली आवड : बेकारातील बेकार सिनेमा आणि चरस , गांजा आणि अफू मिसळून हातभट्टी. नावडते लेखक : व्यास आणि वाल्मिकी. आवडते लोक : आपल्याला ग्रेट म्हणणारे.


किशोर कोरे (आगामी आत्मचरित्रातून)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
संग्रह - अघळपघळ (१९९८)
(ललित , दिवाळी १९६५)

0 प्रतिक्रिया: