Wednesday, January 19, 2022

भिकाऱ्याचे नाव

आमच्या घरासमोर उजव्या हाताच्या वळणावर एक भिकारी बसत असे. लहानपणी लवकर जेवलो नाही तर "हां, जेव लवकर, नाही तर त्या आंधळ्याला सांगते धरून न्यायला -" असे सांगून आमची आजी आम्हांला भेडसावत असे. शाळेत असताना परीक्षेच्या वेळी मारुतीच्या खडीसाखरेच्या नवसाबरोबरच त्या आंधळ्याला दिडकीचा दानधर्म करून देवाच्या हिशेबी आम्ही पोरे पास व्हायला उपयोगी पडण्याचा चांगुलपणा किंवा पुण्यही जमा करीत होतो. मोठेपणी - खोटे कशाला सांगू? ' बरोबरच्या मैत्रिणींबरोबर आपल्या सच्छील वर्तनाची छाप पाडायला उसन्या बेफिकिरीने त्याच्या वाटीत मी आणेल्याही टाकल्या होत्या. वळणावरचा आंधळा ! कितीतरी जुना होता ! दोन्ही डोळ्यांच्या पार खाचा झालेला आंधळा ! "आंधळ्याला दाता दे भगवान !" - किती वर्षे आम्ही त्याचा हा पुकार ऐकत आलो होतो, पण त्याच्याबद्दल कधी मुद्दाम दया उत्पन्न व्हावी असेही वाटले नाही, इतका तो नेहमीच होता.

आणि एकदा दुपारी कुठूनसा घरी परतत होतो. वळणावरचा आंधळ्यासमोर एक भिकारणीने अंगावरच्या चिरगुटांशी स्पर्धा करणारे फाटके कपडे पसरले होते, त्यावर वरणात बरबटलेले भाकरीचे तुकडे होते, आणि हातातला ॲल्युमिनियमचा गडवा उचलीत ती आंधळ्याला सांगत होती, "यवढी भाकर खाऊन घे ! मी कमिटीच्या नळावर पाणी भरुनश्यान आनते - बरं का मुरारी."

मुरारी ? आंधळ्या भिकाऱ्याचे नाव - भिकाऱ्याला नाव असते? - आज वीसपंचवीस वर्षात माझ्या मनात कधी चुकून विचार आला नव्हता की, वळणावरच्या भिकाऱ्याला नाव असेल.

मुरारी ! भिकाऱ्याला नाव असते? छे ! वळणावरचा आंधळा ! चावडीसमोरचा लंगडा ! देवळापुढला महारोगी ! ह्या सर्वांना नावे आहेत? छे ! भिकाऱ्याला नाव असू शकते ? त्याचे कधी बारसे झाले होते? शेजारच्या 'करत्यासवरत्या' आजीने कधी त्याच्या इवल्याश्या कानात कुर्र् करून बारशाला त्याचे नाव सांगितले होते ? आपल्या पोराला मुरारी म्हणून प्रथमच हाक मारताना त्याचा बाप किंचित लाजून मुरारीच्या आईकडे पाहून लाजला होता? छे! भिकाऱ्याला - भिकाऱ्याला नाव नसते, त्याला फक्त विशेषणे असतात -

आंधळा - लंगडा - थोटा - मुका -

- उरलंसुरलं 
पु.ल. देशपांडे

0 प्रतिक्रिया: