मला ह्या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी देता येईल असं वाटत नाही. फार तर मी एकच म्हणेन की, जिथं जिथं मला आनंदनिधानं सापडली तिथं तिथं मी गेलो. मला वाटतं, मीच नव्हे तर कलेच्या क्षेत्रातली बहुतेक माणसं तिथं त्यांना आनंदाचा ठेवा लाभतो म्हणूनच जातात. पुढं त्यात यश, कोर्ती, धनलाभ इत्यादी गोष्टी येतात. पण त्या दिशेची पहिली धाव ही आनंदाच्या प्राप्तीसाठी असते.
कुणीसं म्हणे हिमालयाची शिखरं चढणाऱ्या एका गिर्यारोहकाला विचारलं होतं की, “तुम्ही डोंगर कशासाठी चढता?” त्यानं उत्तर दिलं, ''कारण ते तिथं असतात म्हणून." डोंगर हे चढण्यासाठीच असतात ह्यावर त्याची नितान्त श्रद्धा होती. नाटक हे लोकांपुढं करून दाखवण्यासाठीच असतं अशा श्रद्धेशिवाय नाटकात जाईलच कोण? आणि नाटक पाहण्याची क्रिया आपल्याला आनंद देते असं वाटल्याशिवाय नाटक पाहायला जाईलच कोण? महाराष्ट्र नाटकवेडा आहे वगैरे आपण म्हणतो. पण ह्या महाराष्ट्रातच अत्यंत सुसंपन्न अशी लक्षावधी माणसं अशीही असतील की त्यांना नाटक पाहावं असं चुकूनही वाटलं नसेल. मागं एकदा एका विद्यापीठाच्या कुलगुरूनं क्रिकेट मॅच पाहण्यात लोक आपला वेळ फुकट दवडतात असं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर रिटायर्ड लोकांना “रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला लावलं पाहिजे.' असंही त्यांचं मत होतं. माझ्या हातात सत्ता असती तर ह्या कुलगुरूला मी रस्ते दुरुस्त करतच ठेवलं असतं. ज्यांना जीवनातली “वेडं' कळत नाहीत, त्यांच्या तोंडून जे जे निघतं ते किती मूर्खपणाचं असतं ह्याचं हे आणखी एक उदाहरण आहे.
वाऱ्यावरची वरात ह्या नाटकात पु.ल. आणि सुनीताबाई |
आम्हां काही निकटच्या मित्रमंडळींत 'रक्तदोष' असा एक परवलीचा शब्द आहे. रात्र रात्र जागून आपण गाणी कां ऐकली? याचं उत्तर 'रक्तदोष.' नाटकांच्या तालमीपासून ते उभं करण्यापर्यंतची, घरचं खाऊन धडपड कां केली-रक्तदोष. थोडक्यात म्हणजे नाटक-तमाशे-गाणी असलं काही केल्याशिवाय तन आणि मन ह्या दोघांनाही राहवत नाही हेच खरं. सामान्यांच्या भाषेत ह्याला 'खाज' म्हणतात. नाटकात पैसा मिळतो म्हणून कोणीही इथं प्रवेश करत नाही. अगदी नाटकांचा काँट्रॅक्टरसुद्धा. त्या काँट्रॅकटरला नाटकं लावूनच फायदा करायची आणि फटका खायचीच हौस असते. इतकंच कशाला? तिकीटविक्रीवरची माणसंसुद्धा एका विशिष्ट हौसेनं तिथं बसलेली असतात. केवळ तिकीटविक्रीचं काम केल्याचे पैसे मिळतात म्हणून नव्हे.
“नाटक' म्हटल्यावर माझ्या डोळ्यांपुढं थिएटरातल्या तिकीटविक्रीवरची माणसं, डोअरकीपर, स्टेज सजवणारी माणसं, रंगपटातली, कपडेपटातली माणसं, नट-नटी, डायरेक्टर, लेखक असं सगळं कुटुंबच्या कुटुंब उभं राहतं. ह्यांतला प्रत्येक जण या ना त्या प्रकारचं नाटकाचं वेड घेऊनच आलेला असतो. केवळ नट होण्याचंच वेड नव्हे तर डोअरकीपर होण्याचंसुद्धा.
अपूर्ण..
(सुरुवातीचे दिवस - पुरचुंडी)
पु.ल. देशपांडे
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवा.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment