Wednesday, October 26, 2016

वन डॉटर शो - अर्थात एकपुत्री नाटक (नसती उठाठेव)

श्री. दामोदर सहस्रबुद्धे ह्यांनी पुलंचे अफलातून नाटक टाईप करुन पु.ल. प्रेम ब्लॉगसाठी पाठवले. त्यांचे शतश: आभार. !


पु. ल. देशपांडे यांच्या नस्ती उठाठेव पुस्तकातून -

वन डॉटर शो - अर्थात एकपुत्री नाटक.
(संपूर्ण पुरुष पात्र विलागीत आवाज नाट्य )
निवेदक: 
प्रस्तुत नाट्यातील प्रमुख पात्र बेबी हे आहे. हे पात्र हळूहळू एखाद्या नदीच्या  पात्रासारखे वाढत जाते, हे कळेलच. दुसरे पात्र म्हणजे बेबी ची आई - तथा 'ममी'. ह्या 'आवाज नाट्यात' हे सर्वात जास्त आवाज करणारे पात्र आहे. ह्या नाटकातील अत्यंत गौण पात्र म्हणजे बेबीचा बाप उर्फ ड्याडी. हे पात्र सदैव आतल्या आवाजात बोलते.
ह्याखेरीज नाटकात अनेक पात्रे येतात व बहुदा हाय खाऊनच जातात.

खोताच्या वाडीत जर न चुकता हिंडू शकलात, डॉक्टर फान्सेस्का यांच्या म्याटरनिटी होम मधल्या एका स्पेशल रूममध्ये ममी मच्छरदाणीच्या पडद्या आड झोपल्या आहेत. - गाढ झोपल्या आहेत. ममीच्या  व्यक्तिरेखेचा (त्यांना प्रत्यक्ष पाहिलेली मानसं व्याक्तीपट्टा म्हणतील)  फक्त स्थूल मानानेच अभ्यास करता येईल. हल्ली नाटकात काम करणारी मानसं अभ्यास करतात. पूर्वी अभ्यास न करणारी नाटकात पळून जात. काळ बदलला.

[घड्याळाचे ठोके, घड्याळाच्या काट्याने जागा बदलली, तशी ममी ने कुशी बदलली.]
पाळण्यात बेबी रडत होती.
बेबी: ट्यंआहां ..ट्यंआहां 
निवेदक: बेबीच्या वन डॉटर शो ला इथून प्रारंभ झाला. ती एकटी रडत होती. दुसऱ्या कोणाची मदत न घेता. ममी गाढ झोपली होती. - आणि इथे तिचे ड्याडी बेबीला उगी करावे कि म्मो ला जागी करावे या विचारात फेऱ्या घालीत होते. ड्याडी आणि ममी यांचे भौगोलिक प्रमाण लोटयास घागर असल्याने  फान्सेस्का डॉक्टर च्या सूतिकागृहात ह्या क्षणी अत्यंत गर्भगळीत अवस्थेत जर कुणी असतील तर तिचे ड्याडी. त्यांना काय करावे ते सुचत नाही.  हेम्लेट चे नव्हते का झाले - कि त्याची काकू कि जी त्याची आई - तसेच ड्याडी चे आहे. ते बेबीचे ड्याडी, पण ममी चे गडी ! - मनुष्य अस्वस्थ असला कि तो फेऱ्या घालतो. फेऱ्या घालता घालता ते थांबले आणि हेम्लेट सारखे मनात म्हणू लागले -

ड्याडी: एकच प्रश्न !
उगी करू कि जागी करू?
आणि समजा जर हिला -
म्हणजे
मच्छरदाणीत सांडलेल्या 
बेबीच्या ममीला 
माझ्या लाग्नजात वैरीणीला 
केले जागे 
आणि ती जर भरली रागे 
पाळण्यातल्या नवजात बेबिदेखत 
आपल्या सुपुत्रीचा 
एकापुत्री खेळ थांबवाल्याबद्दल 
मध्येच -
तर??
आणि तशात यावी ती दाई 
ती परीसारखी शुभ्रवसना परिचारिका -
जिच्याकडे सहज गेला होता माझा डोळा 
ममीचा डोळा लागला आहे 
अशा गैरसमजानी  
अगे अगे दाई 
केवढी हि घाई 
केली होतीस येण्याची 
बेबीची आई निद्रेच्या घोर अरण्यात 
शिरण्यापूर्वी 
हे बरे नाही -
मनातल्या मनात रडलो होतो.
दाई दाई ...

बेबी: ट्यंआहां ..ट्यंआहां 

ड्याडी: ह्या कार्टीने -
आई ग 
जीभ चावली माझी मीच -
दाताना सवय झाली आहे 
जीभ चावण्याची 
भलतसलत तोंडातून जाण्यापूर्वीच -
त्या वाग्दत्त वधूच्या -
हो -- तिने मला वाक् खेरीच 
काहीच दिले नव्हते -
तिचे तोंड बंद करण्याचे 
सर्व नाजूक प्रयत्न 
विफल झाले होते -
ओठाबाहेराचे ते पहारेकरी दात ......
जाऊ दे -
तर सांगत होतो काय 
तुझ्या ममीच्या डरकाळ्यांची 
झाली होती इतकी सवय 
कानांच्या कमावलेल्या पडद्यांना -
कि गर्जत असताना 
चहू बाजूनी सावधान, सावधान -
त्या गर्जना, ते  ताशे, तो ब्यांड 
इतरेजनांचा कलकलाट 
सारा गोंगाट वाटला
जरासा डास  कानाशी गुजागुजाल्यासारखा 
मग दूर झाला अंतरपाट -
समोर उभी होती 
जी आता तिथे आडवी पडली आहे 
तुझी ममी -
वाजत होती अवती भवती रणवाद्ये 
आणि ती वरमाला ...
ह्या ममीच्या वळणावर गेलेल्या सुपुत्रीने तर 
डोक्यावर घेतली ही  खोली 
ट्यंआहां ..ट्यंआहां करून -

परमेश्वरा !!!
ही देखील जाणार की काय
तिच्या आईच्याच आडवळणावर ?
अर्थात शंकाच कशाला ?
जाड वळणावर? आणि -
गा गा गाणार की काय ?
ना ना नाचणार की काय?
बो बो बोलणार की काय ?
छ छ छळणार की  काय ?
माझ्या भावी जावयाला ?
कुठे बर वाढत असेल तो जीव ?
माझ्याच कुंडलीची कापी काढून जन्मास आलेला !!!

बेबी: (पट्टी वाढवून ) ट्यंआहां ..ट्यंआहां ट्यंआहां ..ट्यंआहां 

ड्याडी: परमेश्वरा - ह्या वयात आवाजाची ही तयारी ?

[करूण वाद्यसंगीत..]
आठवतो तो दिवस 
ज्या दिवशी गाफिलपणाने मला कोंडीत गाठून 
मच्छरदाणीच्या आत पसरलेली ही  गासडी 
शिकवणी हून 
महिना ५ रुपयात माझ्या लग्नपूर्व शिष्याला -
आणि लग्नोत्तर धाकट्या मेव्हण्याला -
गणित, संस्कृत आणि भूगोल पढवून 
रात्री ९ वाजता 
परतता परतता 
जिन्यात अडवून म्हणाली होती -
भेंडे मास्तर माझ प्रेम जडलय तुमच्यावर -

बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..

ड्याडी: होय बाळे होय ! [पाळणा हलवीत गाऊ लागतात]
रात्रीच्या वेळी ।
जी बसली । कायमची दातखिळी ।
मनी तेव्हा बाणे ।
जे गाणे । स्फोटक भेसुरावाणे ।
गाणे भेदक ते ।
भणभणते । तुझिया नरड्याभवते ।
घणघणले आधी ।
संवादी । तुझीया जन्माआधी ।
बाले ते बोल ।
नच बोल । सर्वांगी खोल ।
रुतले झणझणले ।
टणटणले  । विना ऐकता घुसले ।
कानाच्या पाळ्या ।
तै झाल्या । तापुनी हिरव्या पिवळ्या । 

बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..

ड्याडी: (पाळण्याची दोरी चटका बसल्यासारखी सोडून )
हीच अवाजाची जात !
'भेंडे मास्तर माझ प्रेम जडलय तुमच्यावर -'
त्या जिन्यात या पूर्वी हे वाक्य 
ह्या आवाजात कुणी म्हणाले नसेल.
कुणीही कुणालाही 
आणि असलेच म्हटले तर?
म्हटले असेल एखाद्या घुशीनी 
एखाद्या वाट चुकलेल्या झुरळाला -
उतरली असेल त्याची मिशी !
एका झटक्यात घुसाल्यासारखी 
गोळी डाम्बाराची !
जशी माझी उतरली कायमची -
त्या स्वप्नातील स्वरांच्या वेगाने 
आणि धसक्याने 
घरंगळला तो जीवघेणा  'हो !'
त्यानंतर वाजले ताशे लग्नाचे -
कड कड कड कड
तडम तडम तडतडतड
वाजवला एक पिटली ब्यांड 
कंत्राटी मनापमानामधल्या 
धेइर्यधरासारख्या दिसणाऱ्या 
चाळीस एक ब्यांड वाल्यांनी -
पण पाळण्यातले बाळे,
तोपर्यंत ममीपदास न पोहोचलेल्या 
तिला वरमाला  का म्हणतात ,
ते तेव्हा कळल मला -
तुझी ममी इतकी उंच आणि धिप्पाड -
इतक्या वर हात उंचावून 
तिच्या गर्दानी मध्ये टांगावी लागली होती ती वरमाला -
कि मंगलाष्टके म्हणणारा भटजी 
(हिंगाष्टक खाउन ढेकरा दिल्यासारखा ओरडणारा )
त्याने चटकन देवकाचा चौरंग हळूच सरकवला पायाखाली 
तेव्हाच गेली ती वरमाला वधूच्या गळ्यात
आणि माझा मात्र गुंतला गळा कायमचा -

बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..
ड्याडी: थांक्यु -
कळली का तुला तुझ्या पित्याची व्यथा ?
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..
ड्याडी: (मनाचा धडा करून पालीच्या तावडीमध्ये सापडलेला किटाणू ज्या पट्टी मध्ये बोलू शकेल त्या आवाजात ) बेबी रडत्येय 
ममी: (मच्छरदाणीचा पडदा हलवून  )
तेच ऐइकत पडलीय मी.!
सगळ्या हस्पिटलातून या हिंडून -
आणि माज्या बेबी इतक सुंदर कोणी 
रडताय का ते या पाहून !
एइकलि आहेत मी रडणी 
काल रात्री तर नर्स कौतुकानं सांगत होती
सबंध रात्र सबंध होस्पिटलात 
फक्त एकटी बेबी रडत होती.
बाकीच्यांच्या बेब्या नुसत्या ऐकत होत्या 
माझी बेबी काय कोरस मध्ये गाणारी नाही !
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..म्या भ्या 
ममी: इतकी व्हरायटी सापडते का कुणाच्या रडण्यात ?
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..म्या भ्या 
ममी: ऐका जर नीट 
किती ओरिगिनल रडणं आहे माझ्या बेबीच 
दुसर् या कोणाचा ऐकून रडत नाही ती.
सगळ तिच स्वतः च आहे.
शेजारच्या खोलीतली पोरे देखील 
हीचे ऐकून हिच्या सारखी रडायला लागली आहेत 
मेली रडतील रडतील आणि पडतील गप्प
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..म्या भ्या 

निवेदक: 
बेबीच्या वन डॉटर शो च्या पहिला प्रयोग ती जन्माला आली त्याच दिवसापासून सुरु झाला.
दिवसांवर दिवस चालले होते. बेबी चा पहिला वाढदिवस आला. तिच्यात आणि तिच्या ममीत स्थूलमानानेच फरक पडत होता. ड्याडी मात्र गरम पाण्याचा पिश्विनाडले पाणी हळूहळू ओतले म्हणजे जी अवस्था होते तसे दिसू लागले होते. वाढदिवस हा बेबी आणि ममीने त्यातल्या 'वाढ' ह्या शब्दाला धरून सार्थ केला होता. जमलेली मंडळी बेबीचा नवा वन  डॉटर शो पाहत होती. - करतील काय बिचारी.

ममी: अहो (पहिला वाढदिवस आहे हे विसरून) अश्शी बोलते  - डाले काय उडवते नाचते , गाते  - तरी अजून वर्ष पुरं झाला नाही तिला. 
ड्याडी: (चूक लक्षात आणून द्यायला खाकरतात) 
ममी: खोकला झालाय तुम्हाला. मफलर घट्ट बांधून घ्या गळ्याभोवती. 
ड्याडी: (मफलर घट्ट आवळून - आवळलेल्या आवाजात )
या गळयापट्ट्याचा गळफास करून घट्ट 
आवळून टाकू का गळा? ...माझा!
पहिल्या दिवशीच्या त्या ट्यंआहां पासून 
माझ्या सुपुत्रीचा सुरु झाला आहे 
एकपुत्री खेळ 
आणि सुमता वाजवतेच आहे 
ढोलके तोंडाचे - बडा बडा बडा बडा करीत -
गेले वर्ष -
हाय आठवतो आहे प्रत्येक दिवस 
जेवा आपटला पहिला पाय 
माझ्या या अद्वितीय कन्येने -
(अजून भावंड नाही तिच्या पाठी )
तेवा हि तिची माता 
झोपेतून उठून म्हणाली होती मला -
आहो उठा, घोरता काय?
(देवा काय हा घोर अन्याय !!!
मी कधी घोरतो का रे ?
तुलाच कान आहेत बाबा -)
(एक पूर्वस्मृती व्यक्त करणारे संगीत. - म्हणजे कोणत्याही तंतू वाद्या ची तुण तुण )
ममी: बघा बेबी करतेय भरतनाट्यम 
फक्त एका पायाने, पाळण्यातल्या पाळण्यात.
आता गोपुरांच्या देशात नुपूर बांधणाऱ्या 
सगळ्या ए तो झेड शिष्टर्स न म्हणव 
डान्सिंग सोडा अन टायपिंग शिका. 
कल कल बेबया कर तिल्लाणा 
ता थिंगा -तक थुंगा 
ता आआ थुंगा  
तक्क थुंगा  -
अहो डुलक्या घेऊ नका -
जर झांज वाजवा 
त्या यम यल यन  कुम्भकोणमं शिष्टर्सचा नवरा वाजवतो तशी -
ता थुंगा -तक तक  थुंगा 
अहो वाजवा झांज  - किती छान करतीय तिल्लाणा -
ड्याडी: (स्वगत) बेबीचा तिल्लाणा, ममी चा धिंगाणा 
ह्यात झांज वाजवायची तरी कोणाच्या तालावर ?
बेबी: ट्यंआहां
ममी: अय्यो बेबी बघा पदम म्हणतीय - म्हण म्हण बेबी 
यंटु पुट्टुंगा चन्नम 
यळ्ळाकु तळ्ळाकु सुब्र्हमण्या
रीगरी सारी सरिसा 

[घाबऱ्या घाबऱ्या शेजारी धावत येतात]   

पहिला: काय झाला हो?
दुसरा: डॉक्टर न बोलावू या का ?
ममी: यंटु पुट्टुंगा चन्नम 
यळ्ळाकु तळ्ळाकु सुब्र्हमण्या
ता धिक्का - ताक्का धिक्का 
गुडगुम, गुडगुम 
तिसरी: अशी वेळी हळकुंड जाळून धूर द्यावा म्हणतात.  लगेच भूत उतरतं.
चौथी: औसे पुनवेला वाढतं म्हणतात 
ममी: अहो वाजवा ना झांज -
तिकडे काय बघत आहात - ग्यालरीत?
अगं बाई या या या -
बेबी पहिलीत का
अजून सहा महिन्यांची झाली नाही 
तोच तिल्लाणा करतीय 
तुम्ही यायच्या आधी पदम म्हणत होती.
म्हणत बेबे 
ता पुंगा तिक्का पुंगा 
इडली पुंगा 
च्यवन येटीगोळी पवन चेट्टीयली 
आय्यान्गारू बिडू चन्न बसप्पा 
पाचवी शेजारीण: मद्राशी मुंजा होता म्हणतात त्या कढीलिंबाच्या झाडावर -
मधून मधून केळीच्या पानावर बसायचा म्हणे -
ममी: (तारस्वरात) पुंगरू टींगरु कुंभकोनम 
शेजारी: (एकसाथ) पळा पळा

ड्याडी: आठवतो प्रसंग आणखी एक -
लिहित होतो चटई वर बसून ,
बाबांना पत्र.
बिचारे तीर्थरूप,
कोकणात करतात भिक्षूकी 
आणि उरल्या वेळा हरी हरी 
तशी त्यांना माझी माया आहे 
पण ह्या महामायेचा 
अवतार एकदाच पाहून 
विजयदुर्ग लाइनिचि बोट गाठून 
देवळात बसले जेठा मारून 
उर्ध्वयै दिशे ब्रह्मणे नमः म्हणत !
आणि मी?
इथे त्या माझ्या स्वमिनीच्या 
अधरयै दिशे पाहण्याची हिम्मत न झालेला -
पती कि पतित? 
एकच होते समाधान 
बाबांना पत्र लिहून 
मनाची व्यथा उघडी करण्याचे 
पण तेवढ्यात या सुकन्येने 
उपडी केली दौत
 सांडली शाई 
तीर्थरूप चरणी वाहिलेल्या 
शिरसाष्टांग नमस्कारावर 
वाहिली निळी काळी शाई 
उगारीत होतो हात, ,तेवढ्यात 
तिची ममी कार्डावर सांडलेली शी पाहत म्हणाली 
अय्या वंडरफुल !
आपली बेबी होणार मॉडर्न आर्टीस्ट !
पाठवूया बेबीचं  हे पहिलं चित्र ,
वय महिने सहा च्या गटात 
जगातली पहिली इन्फटार्टीस म्हणून 
व्यंकट्स विकली ला 
आणि हर हर !!
त्या व्यंकटाने बेबीला दिले पहिले बक्षीस 
ते व्यंकटाची खळी सांडो ....
[एकदम लहान मुले पाळण्यात झोपेत अंग काढतात तसे दचकून ]
बाप रे ! झाला - पुन्हा सुरु झाला -
हिचा आडदांड तोंडपट्टा !
ममी: अहो एकदा सांगितला कि पाठ !
बेबुल्या ती , लाजाची गोट्ट थांग 
एक शेजारीण: (व्याकूळ होऊन) 
हिच्या एवढी जेव्हा होती 
माझी बेबी अशीच छोटी 
सांगत होती अशाच गोष्टी 
नुकती झाली बी ए बी टी 
ममी: (उसळून) असेल सांगत हिचेच ऐकून -
बेबी तुमची अशाच गोष्टी -
गोट्ट थांग - लाजाची 
एक होता ?
बेबी: क्यां 
ममी: क्यां म्हणजे राजा बरका!
हं पुन्हा सांग, एक होता ?
बेबी: च्यां !
ममी: च्यां म्हणजे देखील राजाच बरका!
हं, आणि एक होती  ?
बेबी: क्यां 
ममी: इथे क्यां म्हणजे राणी बरका, मग काय झालं ?
बेबी: क्यां 
[समोरच्या शेजारणीचे चेहरे सरबत समजून लाल रंगाचे रिकामे ग्लास पीत बसावे असे होतात.]
ममी: बलोबल ! म्हणजे शिकारीला गेली दोघजणं बरका ! मग तिथे आला 
बेबी: [फुर् कन लाळ  उडवते ]
[प्रेक्षक 'लाळ म्हणजे काय?' हा प्रश्न चेहऱ्यावर घेऊन ममी कडे पाहतात]
ममी: हं  तिकडून आला वाघ ! बरोबर मग राजाने काय केले ?
बेबी: क्यां -
ममी: बलोबल , शिकार! आणि गोष्ट आमची ?
[प्रेक्षकांच्या ओठावर भिकार असे येते. तेवढ्यात ड्याडीनी  आतून कॉफी चा ट्रे भरून आणल्यामुळे स्वताला आवरतात]
बेबी: च्यां !
ममी: शाबास ! गोष्ट आमची झकास !
[प्रेक्षक 'शिकार' शी 'झकास' चा यमक पुन्हा जुळवून बघतात. जुळत नाही. तरीदेखील गोष्ट संपली म्हणून टाळ्या वाजवतात ]

ड्याडी: (मनात) हे स्वर्गस्थ देवतानो,
का दिली बुद्धी यांनी तल्या वाजवण्याची ?
मी तर बोलून चालून नवरा!
बोलून चालून कसला?  न बोलून नवरा !
रोज मुक्याने ताटातले आंबोण 
ताटाखालच्या मांजरासारखा 
घशाखाली उतरवणारा -
घरजावई !
पण ह्या पाहुण्यात नाही का एखादा समर्थ 
कि जो हिला समजावून देईल,
नव्या मुर्खांची लक्षणे -
आल्या गेल्या पाहुण्यांना कवडी मोल ठरवून 
त्यांच्या पुढे सदैव आपले एकपुत्री खेळ दाखवणारी 
नाच रे मोरा नि गोरीगोरी पान 
बा बा ब्ल्याक शिप नि ज्याक and जिल 
लहान माझी भावली 
आणि नवकवींची नाकी नाव आणणारी पोरगीते -
कि जी पोरानाही वाटतात पोरकट !!
ती ऐकून टाळ्या देता ?
कि ज्यांना पोरेही नाही लावत तोंड !
बोगा आता आपल्या कर्माची फळं !
ममी: आता गानं म्हणायचं हं बेबी -
प्रेक्षक: (एकसाथ )चला निघूया 
चालला उशीर झाला 
मग बस करते उभी तासान तास 
ममी: अहो बस कशाला ?
बसा ! हे सोडतील गाडीतन 
- अहो - ऐकला का ?
ड्याडी:  (मनात ) का हे वाक्य बोलून पुन्हा पुन्हा विटम्बना करतेस त्या वाक्याची ?
अहो - ऐकला का ?हो - ऐकला का ?
ऐकण्याशिवाय काय केलय मी?
गेल्या इतक्या वर्षात 
एकदा तरी ऐकण्या ऐवजी 
ऐकवण्याचा यत्न केलेले आठवतंय का तुला?
 ऐकला का ? ऐकला का ?
हो. ऐकल?
ऐकत आलोय आणि किती ऐकायचा राहिलंय ते तोच जाणे !
ममी: ऐकला का ? 
बेबी म्हनातीय गाणं कानडी 
तोवर तुम्ही काढा गाडी 
पाव्हाण्याना सोडायला ग्यारेज मधून 
ड्याडी:  (मनात ) वा  पाव्हाण्याना सोडा
मेव्हण्याना मरीन ड्राइव वर फिरवून आणा 
सासुबाईना महलक्ष्मि ला नेउन आणा 
सासऱ्याना हिंडवा 
हर हर !! चांडाळणी 
लग्नात मला वरलस ते वर म्हणून कि ड्रायवर म्हणून ?
ममी: अहो बघताय काय ? आणि दात कशाला चावताय?
ड्याडी: अरे बाप रे. मनातली शिवी कानात गेली काय हिच्या  ?
- (प्रकट ), हो काढतो गाडी 
ममी: पुसून घ्या आधी -
हं बेब्या म्हण गाणं 
नि तुमची सिनेमातली हाही कहो म्हणत 
'भूषण सौसारा ...

निवेदक: 
ह्या प्रसंगाला ३ -४ वर्षे झाली. यापुढील प्रसंगात बेबी हाजीर नसूनही वजीर आहे. हा प्रसंग मम्मीच रंगवतात. ह्यांच्या हाती 'पणती', 'दिवली', 'बलखजूर', 'अनसूया', 'भागीरथी' वगैरे स्त्रिया व मुले या समबुद्धीच्या  वाचकां साठी निघणारी मासिके आहेत. समोर त्यांच्या जाळ्यात फसलेली एक म(व)शी आहे.
ममी: ऐका हं, जस्स बेबी बोल्ली  तस्स लिहिलय 
आणि माझ्या बेबी चे चिमखडे बोल 
आपल्या बेबीचे म्हणून अनसूया मासिकात दुसर्याच बाईने गेल्या वर्षी छापले 
चोरट्या मेल्या !!
ऐका हं आमच्या बेबीचा ओरिजिनल बोल -
एकदा आमच्या घरी कारंजा केल्या होत्या. आमची चिमखडी बेबी (वय वर्षे पावणे चार) सैपाकीण बाई  ना करंज्या तळताना पाहून म्हणाली -
'अय्या काळ्या काळ्या होड्या'
करंज्या करपल्या होत्या. त्या दिवशी आम्ही सैपाकीण बाईना कामावरून काढून टाकले. 
त्यामुळे सर्वांची हसून हसून मुरकुंडी वळली. त्यांना बेबीचे चिमखडे बोल सांगितल्यावर कोट टोपी जागेवर ठेवून, लांड्रीतून आणलेली माझी पतातले आणि बेबीचे फ्राक कपाटात ठेवून ते देखील मुरकुंडी वळवीत हसले व म्हणाले 'सैपाकणीला काढलस ते बरं केलस'. अशी आहे आमची बेबी उर्फ कामिनी उर्फ द्रौपदी. द्रौपदी हे तिच्या पणजीच नाव  ठेवलं आहे! कित्ती चं आहे नाही भगिनींनो तिचा चिमखडा बोल? आवडला का तुम्हाला? 
मावशी: मग हल्ली स्वयंपाक कोण करतं ?
ममी: हल्ली हे रजेवर आहेत म्हैनाभर !!

आता दुसरा बोल आइका.
एकदा बेबीचे ड्याडी मोरीत धोतर धूत होते. आमची बेबी तिथे लुटूलुटू गेली आणि ड्याडीला म्हणाली :
'ए ड्याडी, ए ड्याडी,
तू ड्याडी, कि गडी?'
मग आम्ही पोट धरधरून हसलो. धोतर वळत घातल्यावर बेबीचे ड्याडीपण पोट धरधरून हसले.
ड्याडी: (कोचामागे पडल्या पडल्या) मी आणि पोट धरून ?
धरायला पोट आहे का मला? 
खपाटीला गेलेला पोट धरता आलं असतं तर काय पाहिजे होतं ?

निवेदक: वर्षामागून वर्ष गेली आणि बेबी सहा वर्षांची झाली, शेजार्यांवर दुसर्याच्या मुलांच्या वाढदिवसाचा भीषण प्रसंग गुदरला ! 
ड्याडी  दिवसेंदिवस जुन्या टूथब्रश सारखे झाडत होते आणि ममी प्रत्येक दिवस वाढदिवस असल्यासारखी वाढत होती. शरीर चारही दिशांनी उसवत होते. 
वाढदिवासात सापडलेले पाहून हवालदिल होऊन बेबीच्या नव्या 'वन डॉटर शो' ला मन देण्यासाठी सिद्ध झाले होते.
ममी: वास्तविक शाळेच्या ग्यादरिंग मध्ये करून दाखवणार होती बेबी हे नाटक, पण तिच्या त्या मास्तरांनी ने दुसर्याच मुलीला घेतले ! मी त्यांना लगेच पाठवलं शाळेत आणि बेबीचं नाव काढलं. रेडिओ वाले देखील असाच करतात.आम्ही आता हिला सिलोन रेडिओत घालणार आहोत. बनाक्का गीत्मालेत. हं करून दाखव बेबी झाशीची राणी - हं  म्हणा -
बेबी: झाशीची राणी -
ममी: हं.. झाशीची राणी म्हणताना अंगविक्षेप कसे करायचे ? झाशीची राणी शूर होती - मुठी वळवून हात वर. ती घोड्यावर बसून दौड करीत असे. [ममी जगाच्या जागी ढुप्प ढुप्प उड्या मारते]
खालच्या मजल्यावरून आवाज: धावा धावा, धरण फुटले.!!
ममी: हं..म्हणा -
बेबी: करीत असे. (उड्या मारते)
ममी: तिच्या पुढे गोडार्ड साहेब उभा राहिला - हं..म्हण-
बेबी: पण ड्याडी कुठे पुढे उभे राहिले?
ममी: अहो राहा कि उभे. अशी यंट्री विसरता कशी ?
त्याशिवाय बेबी 
मै मेरी झाशी तुमको नाही देऊंगा 
मरेंग तरी नाही देन्गा - कसा म्हणणार ?
बेबी: अलकाचे ड्याडी तिच्या डान्सला गळ्यात धोलकं बांधतात 
ममी: ऐका ! नाहीतर तुम्ही ! मेली हौसच नाही. 
बेबी: ममी आपण अल्काचे ड्याडी आपल्या घरी ठेवूयात. ह्या ड्याडीला काढून टाक. रामाला काढला तसा. 
ममी: शानी माझी बेबी. काढूया हं -
[ड्याडी मुकाट्याने खांद्यावर बंदुकीसारखी छत्री धरून गोडार्ड साहेब उभे राहतात व मनात म्हणतात -]
ड्याडी: जग ही रंगभूमी आहे !
म्हणून गेला आहे तो शेक्सपीयर नावाचा शहाणा इंग्रज 
पण वेड्या विल्यमा ठाऊक होता का तुला 
एकाच माणसाला करायला लागणारी सोंगं ?
फुटक्या नाटक कंपनीच्या आचाऱ्याला  व्हावं लागत होतं 
खुदबक्ष, चौथा मनुष्य आणि पडद्याची शिटी वाजवणारा !
मी बाप? कसला बाप? 
नावाचा ड्याडी एरवी घरगडी 
ड्रायवर आणि धोबी 
आणि कुटुंबाचा आचारी 
घरजावयाची लाचारी  
पत्करून तुकडे गीळणारा 
सासऱ्याचा  हुजरा, सासूचा शोफर 
मेव्हणीच्या नाटकाची तिकिटे विकत हिंडणारा फेरीवाला -
आणि आता या अडीच फुटी झाशीच्या राणी पुढे 
आणि तिच्या अडीचशे घनफूट ममी पुढे -
बेबीच्या आगगाडीच्या गाण्यातला गार्ड 
आणि नाटकातला गोडार्ड होऊन -
बेबी: ममी, ड्याडी खांद्यावर बंदूक नित नाय धरत.
ममी: अहो, लक्ष कुठे तुमचं?
खांद्यावर धरा छत्री 
आणि नजर का भित्री? 
छाती काढा ताठ !
ड्याडी: (मनात) माझी छाती ताठ? तुझ्यापुढे ?
खाटकापुढे बकऱ्याची ?
हे म्हणजे सशाने सिंव्हीणीला डोळा मारण्या इतके बिकट !
अथवा उंदराने मांजरीची जीवघेणी नखे 
क्युटेक्सने रंगवण्याचे स्वप्न पाहण्यैतके असंभव !
किंवा प्राथमिक शाळा मास्तर ने 
लोकल बोर्डाच्या प्रेसिडेंट पुढे शीळ घालण्या इतके अलौकिक !
छाती कसली काढू?
होती मलाही छाती, कोणे एके काळी.
जेव्हा थानाकावीत होतो हॉटेलातल्या पोऱ्याला इराण्याच्या देखील !
माझ्या ब्रह्मचारी खोलीच्या ग्यालरीतून -
चाय ठंडा क्योन लाया ?
दुसरा कप लवकर लाव बेवकूफ !

आणि आज गोडार्ड साहेबाचे ते नाटकी वाक्य -
टुम टुमारी झाशी सोडेगा ? -
सुटत नाही ओठातून 
एवढ्याशा झाशीच्या बाल राणी पुढे 
- आता उरलीय ती छाती जी फक्त धडधडते -
बाकीचे आवाज बंद झाले तरी तेवढा आवाज चालू आहे !
बेबी: म्हणा न ड्याडी 
टुम टुमारी झाशी...
ममी: बघा तिला सगळा नाटक पाठ.
अहो पुस्तकाच्या पुस्तक म्हणते घडाघड
आणि ह्यांना एक ओळ येत नाही 
ड्याडी: (मनात) काय म्हणू ? कसे म्हणू ? 
उद्या सुसरीच्या तोंडात गेलेल्या वासराला 
मारता मारता सांगशील म्हणायला इना मीना डिका 
बेबी: ममी ड्याडीनी  बघ बंदूक काखेत धरली -
ममी: आणा ती छत्री. मीच होते गोडार्ड -
ड्याडी: (मनात) सुटलो -
झाशीच्या राणी पुढे उभा राहिलेला 
तो खराखुरा गोडार्ड 
असता जर खरोखरी हिच्या मापाचा 
तर काय टाप होती 
राणीच्या घोड्याची एक खूर पुढे टाकण्याची -
ममी(गगन भेदी आवाजात ) 
टुम टुमारी झाशी देएंगा? 
बेबी: मै मेरी झाशी नय देएंगा-नय देएंगा-नय देएंगा
ममीपाहिलातं खऱ्या राणीत तरी एवढा फोर्स आहे का? 
आता बेबी ते इंग्लिश गाणं म्हण -
बेबी: मी नाय जा!
प्रेक्षक: राहू दे, दमली असेल ती (दाबल्या आवाजात) आणि आम्हीही !
बेबी: नाय - मी इंग्लिश नाय मद्राशी म्हणणार- आणि मग बंगाली -
ममीअहो सगळा टागोरनाथ पाठ आहे तिला. 
ड्याडी: गुरुदेव क्षमा करा !
यंदाच भरली म्हणतात तुमची शंभर वर्ष -
परवा भो वाणीत कुणीसं  पिळत होतं 
तुमचा बंगाली गाणं  कानडी करून. 
मेलेल्यांना मारू नये हे काळात नाही गुरुदेव लोकांना -
बेबी: मम्मी, ड्याडी बाग अजून गप्प! मी मद्राशी गण म्हणणार म्हटलं  तरी -
ड्याडी: अरेच्या विसरलो !
(मनात) हिच्या त्या तमिळ गाण्याला सादरा काढून बसायचं 
उघडा बंब- 
गुंडाळून लुंगी आणि उघड्या पोटी 
घेऊन घटम नावाचा मडकं !
बेबी: तिरुपती वेन्कटरमण पोंगळू  
ममीपेरीनायाकाम पाळयम कोइमतुरम माटुंगम -
[ड्याडी घटम वाजवतात आणि आणि ममी स्वताच्याच मांडीवर (सुदैवाने) उलाट्यासुलाट्या थापट्या मारून गातात - ममीच्या  थापट्या पुढे घटम ऐकू येत नाही. ]

निवेदक: 
वर्षावर वर्ष लोटली. पुन्हा आपण जेथून निघालो तेथेच आलो आहोत.  डॉक्टर फान्सेस्काचे म्याटरनिटी होम !
बेबी गेली ५-७ वर्षे २० वर्षाची आहे. मध्यंतरीच्या काळात तिचे संगीत, नाट्य, नृत्य, चित्रकला, ,भरतकाम, आगीतून चालणे, तोंडातून आग फेकणे, (इतरांवर) जळत राहणे, चीनी कुस्त्या, जपानी-कबुली-पठाणी नृत्य, बलुची  सुऱ्याचा नाच, मारवाडी नितंबनृत्य अशा अनेक विद्यात अफाट प्रगती केली आहे. मच्छरदाणीत डोकावल्यास ममीचाच भास होईल. पण ती बेबी आहे. आणि बेबीच्या बेबीचा आता पाळण्यात वन डॉटर शो सुरु आहे. 
[बेबीच्या बेबीचे ड्याडी अस्वस्थ फेऱ्या घालीत आहेत. ]
बेबीच्या बेबीचे ड्याडी: एकच प्रश्न ! उगी करू कि जागी करू?
बेबीची बेबी:ट्यंआहां ..ट्यंआहां 
निवेदक: आणि जगाच्या रंगभूमी वर आणखी एक वन डॉटर शो सुरु झाला.

पु.ल. 
नसती उठाठेव