"पुलंच्या नावाचा सन्मान शिवशाहिरांच्या हस्ते मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. आज माझ्या जीवनातला फार मोठा दिवस आहे,'' असेही त्या म्हणाल्या.
"आशय सांस्कृतिक' आणि "परांजपे स्कीम्स' आयोजित पाचव्या "पुलोत्सवा'चे उद्घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पु. ल. स्मृती सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते लतादीदींना देण्यात आला. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी चंद्रकांत कुडाळ, प्रदीप खिरे, सारंग लागू, विजय वर्मा, श्रीकांत आणि शशांक परांजपे, महोत्सवाचे निमंत्रक डॉ. नरेंद्र जाधव, "सकाळ'चे संचालक-संपादक आनंद आगाशे, सरिता वाकलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
दीदी पुढे म्हणाल्या, ""प्रत्यक्षात पीएल आणि मी फारच कमी वेळा भेटलो. आमची पहिली भेट माझ्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीला झाली. तेव्हा धोतर, पांढरा शर्ट आणि ब्राऊन कोट घातलेले पुल न सांगता आमच्याकडे आले आणि त्यांनी माझ्या गाण्याचे कौतुक केले. मला "यशस्वी होशील', असा आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आणि दोन गाणी त्यांनी मला शिकवली. "करवंदीमागे उभी एकटी पोर' असे त्यातल्या एका गीताचे शब्द होते. त्यानंतर मी मुंबईत आले आणि दीर्घकाळ आमची गाठ पडली नाही. त्यांच्या अखेरच्या आजारात मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हाही त्यांच्यातील मिस्कील विनोदी वृत्ती कायम होती. पायाला सूज आलेली आणि व्हीलचेअरवर बसलेले पुल मला म्हणाले, ""लता, पूर्वी "पाव'ला "डबलपाव' का म्हणत असावेत, हे मला आज समजतेय. आज साठ वर्षांनी त्यांच्या नावाचा सन्मान मिळणे म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे, अशी माझी भावना आहे. आताही ते कुठे तरी आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत, असे वाटते आहे.''
पुरंदरे म्हणाले, ""लतादीदींसाठी आता स्तुतिपर विशेषणे सापडत नाहीत, अशी अवस्था आहे. परमेश्वराने महाराष्ट्रात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही भावंडे जन्माला घातली आणि त्यानंतर पाच मंगेशकर भावंडे जन्माला घातली. हवेची लाट जर पकडता आली तर त्यातूनही दीदींचे सूर, मध पाझरावा तसे पाझरताना दिसतील. दीदींना हा सन्मान मिळालेला पाहून पुलंचा आत्माही आनंदला असेल.''
प्रा. हातकणंगलेकर यांनी पुलंच्या काही आठवणींना उजाळा दिला. ""बहुआयामी, विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे पुल हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. या महोत्सवाच्या रूपाने पुलंचे स्मरण इतक्या मोठ्या प्रमाणावर केले जात आहे, ही आनंदाची बाब आहे. पुलंच्या "अंमलदार' नाटकाच्या पहिल्या अंकाचा पहिला श्रोता मी आहे. सांगलीला ते विलिंग्डन कॉलेजमध्ये पेटीवादनासाठी आले होते. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी आले होते,'' असे सांगून जुना स्नेहबंध त्यांनी उलगडला.
""पुलोत्सव हे सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. जीवन समृद्ध करणाऱ्या या सांस्कृतिक प्रयत्नांची पाठराखण करणे हे कर्तव्य समजून "सकाळ'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारले आहे,'' असे आगाशे यांनी सांगितले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. सतीश जकातदार यांनी स्वागत केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात लतादीदींच्या हीरकमहोत्सवी गान कारकिर्दीचा मागोवा घेणारा "स्वरलता' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
(हा पुरस्कार जानेवारी २००८ मद्धे देण्यात आला.)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment