Friday, November 28, 2014

बारा जूनचे लग्न - सर्वोत्तम ठाकूर

माझी मोठी बहीण माईनं, म्हणजे त्या वेळची सुनीता ठाकूर हिनं, स्वत:चं लग्न स्वत:च ठरवलं. आज यात काही विशेष वाटणार नाही. पण 1945-46च्या त्या स्वातंत्र्यपूर्व काळात ही बंडखोरी मानली जाई. मात्र, माईची ती बंडखोरी नव्हती. कारण बंड कोणाच्या तरी कडव्या विरोधात असतं. माईचे पुरोगामी विचार आम्हाला पटोत वा न पटोत, ती जे पाऊल टाकेल ते विचारानेच टाकेल, आततायीपणा करणार नाही, ही घरच्या सर्वांची भावना असल्यामुळे नापसंतीची शक्यता होती, पण कडव्या विरोधाचा प्रश्नच नव्हता.

आपल्या लग्नाला घरची पसंती आहे, ही बातमी माईने मुंबईला जाऊन भाईंना सांगितली. त्या वेळी रत्नागिरीत एकही टेलिफोन नव्हता. आणि असता, तरी मुंबईला भाईंच्या घरी फोन कुठला असायला? रत्नागिरीला आमच्या घरी नोंदणी पद्धतीने लग्न करायचं ठरलं. नोंदणी पद्धतीने करायच्या या लग्नात अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळायचा, असं भाई आणि माई या दोघांचंही मत असल्यामुळे त्या वेळी प्रचलित असलेल्या बर्‍याच गोष्टी केल्याच नाहीत. आपल्या लाडक्या मुलीकरिता अप्पा हवा तेवढा खर्च करायला तयार होते; पण वधू-वरांनाच तो नको होता. म्हणून घरोघर जाऊन प्रतिष्ठितांना आमंत्रणं दिली नाहीत की लग्नपत्रिका छापल्या नाहीत. पण या आमंत्रणपत्रिका न छापण्याचा मात्र एक निश्चित फायदा झाला. कारण शेवटी ठरलेल्या दिवशी लग्न झालंच नाही. तेरा जून ही लग्नाची तारीख ठरली होती.

मला वाटतं तो गुरुवार होता. मुहूर्त पाहावयाचा नसल्यामुळे अप्पांच्या कोर्टातील कामाच्या दृष्टीने तो सोयीस्कर दिवस असावा. नुकताच कॉलेजात गेलेला मी, त्या वेळी विद्यार्थी परिषद की कसला तरी जिल्हा कार्यवाह होतो आणि एका बैठकीकरिता मालवण-वेंगुर्ला भागात जाणं मला आवश्यक होतं. आता तीन तासांत होणार्‍या त्या प्रवासाला तेव्हा एक दिवस लागत असे. माईचं लग्न तेरा जूनला आहे, म्हणून बारा जूनला परत यायचं ठरवून मी दोन दिवसांकरिता गेलो आणि ठरल्याप्रमाणे बारा जूनला संध्याकाळी रत्नागिरीला परतलो.

उद्याच्या लग्नाच्या वेळी काय काय मदत लागेल याचा विचार करत घरी आलो, तर माझे मेहुणे पु. ल. देशपांडे गप्पा मारत बसले होते.

लग्न दुपारीच होऊन गेलं होतं. लग्न झाल्याचा आनंद होता, पण प्रत्यक्ष लग्न चुकल्याचं थोडं वाईट वाटलं. मग समजलं, की दुपारी कोर्टाचं काम लवकर संपलं, तेव्हा आप्पांनी त्यांच्या साक्षीदार म्हणून येणार्‍या दोन मित्रांना उद्या येण्याची आठवण करून दिली. पाहुण्यांची आप्पांनी भार्इंशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांना समजलं, की या तिघांपैकी एक लग्ननोंदणी करायला आलेले रजिस्ट्रार आहेत आणि दुसरे दोघे लग्नाला साक्षीदार म्हणून सही करायला आलेले आप्पांचे वकील मित्र आहेत. आपलं लग्न उद्या नसून आजच, आताच आहे, याची भाईंना तेव्हा जाणीव झाली. माईलासुद्धा.

शेवटी नवरी मुलगी पांढर्‍या खादीच्या साडी-पोलक्यात, नवरा मुलगा पायजमा-शर्टमध्ये आणि घरातच असल्यामुळे चपला वगैरे पादत्राणं न घालता अनवाणीच, असे दोघे मेड फॉर इच अदर पोशाखात लग्नाला उभे राहिले होते, म्हणजेच सह्या करायला रजिस्ट्रारसमोर बसले होते.

तेरा जूनच्या ऐवजी बारा जून 1946लाच सुनीता ठाकूर व पु. ल. देशपांडे यांचं लग्न झालं. भाईंना मी प्रथम भेटलो, आमची गट्टी जमली ती त्यांचं लग्न झालं त्याच दिवशी संध्याकाळी. त्यांचा मेहुणा म्हणूनच.

लग्नात आप्पांनी भाईंना एक अंगठी दिली. आप्पांवरच्या प्रेमाने भाईंनी ती आनंदाने स्वीकारली. ‘एवढा चांगला तुझ्या मनासारखा नवरा मिळाला, तेव्हा त्यांच्याकरिता तरी आता त्या कपाळावर कुंकू लाव’ आईच्या तिच्या नेहमीच्या पद्धतीने माईला फर्मावलं अणि माई परत कुंकू लावू लागली.

माई कुठलाच दागिना घालत नसे, पण आईने तिच्याकरिता एक मंगळसूत्र केलं होतं. त्या नोंदणी पद्धतीच्या लग्नात, सुनीता ठाकूर आता कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून सुनीता देशपांडे झाली.

आईने मंगळसूत्र दिल्याचं पाहिल्यावर भाईंना तेव्हाच आठवण झाली, की त्यांनी तो विषय जाणूनबुजून काढला नव्हता, माहीत नाही, पण ते म्हणाले, त्यांच्या आईने पण सुनीताला (माईला भाई नेहमीच सुनीता म्हणत) एक मंगळसूत्र दिलं आहे अणि मुंबईहून आणलेल्या त्यांच्या सामानातून त्यांच्या आईने सुनेला दिलेलं मंगळसूत्र काढून आणून त्यांनी माईला दिलं.

एक अंगठी, दोन मंगळसूत्रं आणि तीन साड्यांच्या साक्षीने असं हे लग्न पार पडलं. आधी ठरवलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे खास लग्नाचा असा झालेला सर्व खर्च वधूपक्षानेच केला. वधूपक्षाने न म्हणता वधूने स्वत:च केला म्हणणं अधिक बरोबर होईल. वधू-वर, रजिस्ट्रार आणि दोन साक्षीदारांची सही करावयाचा तो सरकारी कागद - ‘‘नोंदणी पद्धतीने लग्न झाले’’ याच्या पुराव्याचा कागद माईने स्वत: आठ आणे म्हणजे अर्धा रुपया देऊन विकत आणला होता. या आठ आणे खर्चात लग्न पार पडलं होतं. माईने - वधूने - स्वत: केलेल्या खर्चात.

लग्नानंतर दोन-तीन दिवस भाई रत्नागिरीला राहिले. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 13 जूनला आप्पांनी मित्रमंडळींना चहाला बोलावलं आणि जावयांची ओळख करून दिली. हा चहाचा कार्यक्रम आमच्या रत्नागिरीच्या घरात (सदानंद निवास) हॉलमध्ये दुपारी झाला. त्याला वकील, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक वगैरे आप्पांचे वीस-पंचवीस मित्र आले होते. लग्न झाल्यानंतर कार्यक्रम ठरवला की तेरा तारखेला लग्न होणार होतं म्हणून त्याप्रमाणे आधीच ठरवला होता, हे मात्र मला माहीत नाही. जावई गातात आणि त्यांच्या दोन ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्यात, हे आता सर्वांना माहीत झालं. रत्नागिरीसारख्या छोट्या गावात ही एक अभिमानाने सांगण्याची गोष्ट होती. दुसर्‍या दिवशी रात्री आमच्या घरातल्या त्याच हॉलमध्ये भाईंचं गाणं झालं. मग सकाळच्या बसने भाई-माई हे देशपांडे कुटुंब रत्नागिरीहून मुंबईला गेलं. आमच्या घरी त्या वेळी एक ग्रामोफोन होता. ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीम खान, के. एल. सैगल यांच्या गाण्यांच्या दहा-बारा रेकॉडर्स होत्या. हा ग्रामोफोन आणि त्या रेकॉडस भाईंना मुंबईला जाताना आम्ही दिल्या होत्या. लग्नाचा तो आहेर असावा. भाईंनी खूप आवडीने तो स्वीकारला होता. आठ आण्यांच्या खर्चात पार पडलेल्या त्या लग्नात एक अंगठी, दोन मंगळसूत्रं, तीन साड्यांत ही एक विलायती चीज वाढली होती. 12 जून 2000 रोजी भाईंचं निधन झालं. लग्नानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी.

(‘ग्रंथाली’च्या 13 जून रोजी 2014 रोजी प्रकाशित झालेल्या सर्वोत्तम ठाकूर लिखित ‘रत्नागिरी ते आइनस्टाइन’ या पुस्तकातून साभार.)

-- सर्वोत्तम ठाकूर
८ जून २०१४
दिव्य मराठी

Wednesday, November 19, 2014

बबडू

पाऊस भुरभुरत होता. हातातली पिशवी, धोतर, क्षणोक्षणी चिखलाशी चपक चपक करून हितगुज करणाऱ्या चपला आणि वरच्या दांडीजवळच्या तारेच्या घोड्यातून दर तीन मिनिटाला फटक करून मिटणारी छत्री सावरीत मी वाट काढीत होतो. अंगावरून जाणाऱ्या मोटारी धोतरावर चपलेने काढलेल्या चिखलाच्या नक्षीवर स्प्रे-पेंटिंग करीत होत्या. घर तब्बल तीन फर्लांगांवर राहिले होते. तीन मिनिटे झाली असावी, कारण तारेच्या घोड्यातून निसटून छत्री पुन्हा एकदा ‘जैसे थे’ झाली आणि संकटांनी सोबत घेऊन यावे ह्या नियमाला अनुसरून त्या वळणावर एक भली मोठी मोटारगाडीही आली. मोटारवाल्याने डोके बाहेर काढले. त्याने गाडी थांबवली दार उघडून तो बाहेरच आला. माझ्याकडे रोखून पाहू लागला. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर एक स्मिताची रेषा उमटली. ओठावरच्या कोरलेल्या मिशीची एक बाजू वर गेली. त्याने डोळ्याचा काळा चष्मा काढला आणि त्याचे ते तरतरीत डोळे पाहिल्याबरोबर एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

"बबडू!"

"हॅस्साला--" माझ्या खांद्यावर जोरात हात ठेवीत बबडू म्हणाला. "मला वाटलं की स्कालर लोक आठवण विसरून गेले."

"वा! विसरायला काय झालं--" झोपेत जाबडल्यासारखे मी बोललो.

"पण मला मात्र साला जरा टायम लागला हां तुझी वळक पटायला. पण तू म्हणालास ‘जाऊ दे, जाऊ दे--’ तेव्हा वाटलं की आवाजाची ष्टाइल माह्यतीची आहे. म्हटलं, बगू स्कालर लोकांना वळक लागते की नाय."

"म्हणजे बबडूच हा!" मी धुंडिराजासारखे हळूच स्वगत म्हणून टाकले.

"गाडी झकास आहे रे! कुणाची?"

"आपलीच." त्या गाडीकडे ऐटीत पाहत बबडू म्हणाला.

"म्हणजे तुझी स्वत:ची?"

"हा! दोन हायत. एक जुनं माडेल आहे--फार्टीएट्‌ची फोर्ड आहे! डबडा; पण साली लकी गाडी आहे! ठेवून दिली तशीच. ही प्याकाड आहे."

"वा! पॅकार्ड म्हणजे काय प्रश्नच नाही."

मला फक्त उच्चारच बरोबर येत होता. बबडू तसा वर्गात अतिशय लोकप्रिय! वर्गातल्या शेवटल्या बाकावर बसून गाढ झोपायचा. मास्तरही त्याच्या वाट्याला फारसे जात नसत!

बबडूच्या केसांची बट शाळेत येत होती तशीच होती. दात मात्र घाणेरडे दिसत होते. त्यांतला एक सोन्याने मढविलेलाही होता.

"चल बस ना--" गाडीचा दरवाजा उघडत बबडू म्हणाला.

"अरे नको! कशाला? इथेच तर जायचं आहे."

"अरे ठाऊक आहे मला. तुझं घर सालं विसरलो नाय मी. तुझ्या आईनं एकदा बेसनलाडू दिला होता--मदर आहे का रे तुझी?"

"आहे!"

पाच वर्षांच्या तुरूंगवासात त्याची भाषा बदलली असावी.

"ये." मी बबडूचे सागत केले.

"आई, ओळखलंस का याला?"

"पाह्यलासारखा वाटतो--"

"अग, हा बबडू-- माझ्या वर्गात होता तो." हे म्हटल्यावर आईला इतके दचकायचे कारण नव्हते. आईचे दचकणे बबडूच्या लक्षात आले नसावे. आईने हातकड्यांची खूण करून तुरूंगात गेला होता तोच ना हा, असे विचारले. मी चटकन "हो" म्हटले.

----------

माझ्या पुस्तकांनी भरलेल्या कपाटाकडे एक अत्यंत आदरयुक्त नजर फेकून बबडू बोलायला लागला. "तुला माह्यत हाय--सालं आपलं न्‌ बुकांचं कधी जमलंच नाय! घोसाळकर मास्तर आहे का डाइड झाला रे?"

"गेल्या वर्षी वारले!"

"च्‌! साला फस्क्लास मास्तर होता. इंग्लिश काय फायन्‌ बोलायचा. साला एक अक्षर कळत नव्हतं मला, पण साला मी आपला ऐकत बसायचा. बस, इंग्लिश त्याच्यासारखा बोलणारा नाय पाह्यला. इंग्लंडमधे असता साला तर डोक्यावर घेऊन नाचले असते."

घोसाळकर मास्तरांच्या मरणाने त्यांच्या शिष्यांपैकी एकही माणूस इतका हळहळला नसेल. मास्तर चांगले होते, अतिशय सात्विक आणि प्रेमळ होते. पण इतके हळहळण्यासारखे होते असे मला वाटले नाही.

"तुझ्या मनाला घोसाळकर मास्तर मेल्याचं फारच लागलेलं दिसतयं--"

"काय सांगू तुला--" आणि बबडूचे डोळे चटकन पाण्याने भरले. कोणी असे रडाबिडायला लागले की माझे अवसानच जाते.

"पाच वर्षे तुरुंगात राह्यलो. साले डाकू लोक होते त्यांना पण भेटायला त्यांचे भाऊबंद यायचे, पण साला पाच वर्षात--त्यातली चार महिने चांगल्या वागणुकीबद्दल कमी झाली माझी शिक्षा; पण चार वर्षे आणि चार महिने..."

"म्हणजे चार वर्षे आठ महिने.." मी शाळेतदेखील त्याला अशीच उत्तरे सांगत असे.

"तुरूंगात काढले, पण बस्‌ एक माणूस भेटायला आला नाय! ना बाप, ना दोस्त, ना कोण! कोण आल असेल भेटायला? साला मी तर एकदम चकरभेंड होऊन गेलो. वार्डरनी बाहेर नेलं-तर घोसाळकर मास्तर! मी म्हटलं, ‘मास्तर तुम्ही?’"

"पण घोसाळकर मास्तर तुला भेटायला आले?"

"अरे, ती पण एक ष्टोरी आहे. साली फिल्ममधे पण असली ष्टोरी नाय मिळत."

"पण त्यानंतर इतक्या वर्षात इतका पैसा कसा मिळवलास?"

"बस बाबांची कृपा आहे!" डोळ्याला आंगठी लावली.

जाताना त्याने वाकून आईच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला.

"औक्षवंत हो. अशीच चांगली घरं बांध. आम्हांला चांगली जागा दे त्यात. हे घर आता अपुरं पडतं आम्हांला. सुना आल्या, नातवंडं आली..." बबडूच्या नमस्काराला आईने तोंड भरून आशीर्वाद दिला.

बबडूने मोटारीत बसता बसता सिगारेटकेस उघडली. आतून सिगारेट काढून मला दिली.

"अरे नको!"

"अरे, संडासात जाऊन ओढ! आईसाह्यबांचा मान ठेवतोस, चांगलं आहे." एक सिगरेट स्वत: पेटवली आणि गाडी पुढे चालवली.

मी त्याच्या पाठमोऱ्या गाडीकडे पाहत उभा राहिलो. हातातली सिगारेट चटकन खिशात दडपली. टेबलावर शंभराच्या नोटा तशाच पडल्या होत्या. ‘एक हितचिंतक’ ह्या नावाने घोसाळकर गुरूजींच्या पवित्र स्मरणार्थ त्या मला राजवाडे मास्तरांना पोहोचवायच्या होत्या.

सुन्न होऊन मी बाहेर पाहिले. पाऊस पळाला होता. घरात पुन्हा उकाडा सुरू झाला होता. आतून आईचा आवाज आला, "साखर भिजली की रे सगळी ! पाकच करून घालते कशात तरी."

(अपूर्ण) 
- व्यक्ती आणि वल्ली

Friday, November 14, 2014

चिरंजीव

काही माणसं "गेली" असं म्हणवत नाही. मुळात ती गेली आहेत ह्यावरच विश्वास बसत नाही. कारण ती रोज आपल्या बरोबर असतात. ती कुठल्या क्षणी कुठल्या कारणासाठी आपल्या आसपास प्रकट होतील सांगता येत नाही. भाई, तुम्ही "जाऊन" १४ वर्ष झाली असं म्हणायला अजूनही जीभ रेटत नाही ... यापुढेही रेटणार नाही. जोवर तुमच्या चाहत्यांच्या संग्रहात - व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, गणगोत, पूर्वरंग, अपूर्वाई आणि अशी अजून ढीगभर पुस्तकं किंवा निदान यातलं एक पुस्तक जरी असेल तोवर तुमचं चिरंजीवीत्व अबाधित आहे.

खरं सांगायचं तर दु:ख एकाच गोष्टिचं आहे, समोरा समोर तुम्हांला कधी ऐकायला, बघायला, भेटायला नाही मिळालं. २००० साली तुम्ही "गेलात" असं लोकं जे म्हणतात .... तर ... त्यावेळी नुकतेच पुलं वाचायला लागलो होतो. म्याट्रिक मध्ये आम्हांला तुमचा "अंतु बर्वा" होता, अर्थात शालेय पुस्तकातील जागा, त्या वयातली मुलांची विनोद समजण्याची कुवत हे सगळं बघुन परीक्षेच्या हिशोबाने ५-७ मार्कांपुरता ठेवुन बरीच काटछाट करुन तो आम्हांला दिला होता. तिथुन पुलं वाचायला सुरुवात झाली होती. मी आजही तुम्ही लिहिलेलं एक आणि एक अक्षर वाचलंय, साने गुरुजी आणि तुम्ही माझे आदर्श आहात वगैरे गटणे स्टाइलने काही बोलणार नाहीये, कारण ते तसंच आहे. मी अजून पोरवय, वंगचित्रे, जावे त्यांच्या देशा, गांधीजी वगैरे पुस्तकं अजिबात वाचली नाहीयेत. मला तुम्ही अनुवादित केलेलं "एका कोळियाने" आवडलं नव्हतं( .... किंवा मी ते वाचलं तेव्हा समजुन घेण्याचं माझं वय नव्हतं अस देखिल म्हणता येईल.). आणि हे तुम्हांला मी हक्काने सांगु शकतो.

लोकं तुम्हांना "विनोदि" लेखक म्हणून ओळखतात हा तुमच्यावर लादलेला आरोप आहे. तुम्ही लिहिलेली रवींद्रनाथ : तीन व्याख्याने, किंवा रेडिओवरती तुम्ही केलेली भाषणे जी पुढे पुस्तकांच्या रुपाने २ भागात प्रसिद्ध झाली ती वाचून  केवळ विनोदि लेखक म्हणणे हा सरळ सरळ आरोप होईल. "हसवणूक"च्या मुखपृष्ठावरचा त्या लालचुटूक नाकाच्या विदूषकाचा तुम्ही धरलेला मुखवटा लोकांनी तुमच्या चेहर्‍यावर फिक्स करुन टाकला. पण विनोद हे तुमचे केवळ माध्यम होते. खर्‍या अथवा काल्पनिक व्यक्तीचित्रांतील विनोदामागची विसंगतीने भरलेली ठसठसती जखम फार नाजूकपणे उघडी केलीत. कधी कधी तर व्यक्तिचित्रणातले चटका लावून जाणारे शेवटचे वाक्य लिहिण्याकरता आधीचं अख्खं व्यक्तीचित्रण लिहीलत असं वाटून जातं. तशीच वेगवेगळ्या प्रसंगात अनेक व्यासपिठांवरुन तुम्ही केलेली भाषणे ऐकून तुम्हांला किती लहान लहान बाबतीत समाजाचं सजग भान आहे हे समजतं. तुमच्या विनोदाने कधी कोणाच्या मनावरती ओरखाडा काढला नाही. मात्र आणिबाणीच्या काळात त्याच विनोदाला धारदारपणा आणायला तुम्ही बिचकला नाहीत. माझ्या सारख्या लाखो टवाळांना खर्‍या अर्थाने विनोद आवडायला लावलेत. त्यांनाही "कोट्याधिश" बनवलंत.

हे सगळं लिहीण्याचा प्रपंच इतक्यासाठीच की माझ्यात जे काही थोडंफार शहाणपण, सामाजिक भान आहे, "माणूस" म्हणून समोरच्याला समजुन घ्यायची इच्छा आहे त्यात माझ्या आजी-आजोबा, आई-वडील, अत्यंत जवळचे नातेवाईक यांच्या शिवाय तुमचाही वाटा आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचतय यावरही माझा विश्वास आहे. कारण तुम्ही कुठल्याही क्षणी आसपास प्रकट होऊ शकता हे मला माहीत आहे, अगदी कधीही .... आत्ता यशोधनला पुण्यात फोन लावला तर "हॅलो" ऐवजी दुपारची झोपमोड झाल्याने आवाजाला जो नैसर्गिक तुसडेपणा येतो त्याच तुसड्या आवाजात "काय आहे???" विचारेल तेव्हा .....  किंवा यमी पेक्षा सहापट गोरा असलेला माझा मित्र भेटल्यावर ...... ट्रेकला गेल्यावर चिखल - मातीत उठबस करुन आमची चड्डी शंकर्‍याच्या चड्डीहुनही अधिक मळखाऊ होईल तेव्हा ..... कुणी नव्याने बांधायला घेतलेले घर दाखवायला नेईल तेव्हा ....... किंवा अगदी पानवाल्याच्या गादिसमोर उभे असू तेव्हा देखिल तुम्ही आसपासच असाल. कारण आधीच म्हणालो तसे तुम्ही "चिरंजीव" आहात.

 - सौरभ वैशंपायन