आमचे घराणे सनातनी! पण लग्नानंतर, बाँब तयार करायचे सामान आणावे त्याप्रमाणे चोरून मी हिच्यासाठी पावडर आणि स्नोची बाटली आणली. वाटत होतं, ही म्हणेल, "इतका का इकडचा स्वभाव हौशी आहे?" पण बापहो, कुठले काय? एकदम, "माझ्या काळेपणाला इतकं काही हिणवायला नको! गोरीच पाहिजे होती तर आणायची मड्डम!!" आता मी बापडा काय बोलणार? हिला काळी म्हणायला माझे का डोळे फुटले आहेत? कोळसे, डांबर, शाई वगैरे मंडळींचा रोष मी सुखासुखी कशाला पत्करीन? वास्तविक ह्या साऱ्यांना हेवा वाटावा असा हिचा वर्ण! त्याच्यावर पावडर लावली, स्नो चोपडला की, भेगा पडलेल्या पंपशूसारखा हिचा चेहरा दिसणार आहे, हे मला कळत का नव्हते? पण नाही, तिने तो पावडरचा डबा सरळ बाहेर भिरकावला आणि पेन्शन घेऊन परतणाऱ्या तिर्थरूपांच्या डोक्यावर तो रिकामा झाला. आणि आमचे तीर्थरूप दोन दिवस पिठाच्या गिरणीच्या मालकासारखे चाळभर वावरून आमचे कौतुक चाळीला पुराव्यानिशी सांगत हिंडत होते.
केवळ काळेपणाने त्या निर्गुणनिराकार विधात्याचे समाधान झाले नाही. त्यामुळे आधुनिक छायाचित्रकाराच्या कौशल्याने, पुढे आलेल्या पांढऱ्या दातांचा त्याने पार्श्वभूमी म्हणून आधार घेऊन, आसुरी आनंदाचा अनुभव घेत, मागला चेहरा घडवला. विधात्याच्या सौंदर्याच्या रसायन शाळेतील प्राध्यापक रजेवर जाऊन तिथल्या नोकरांनी काही गोंधळ केला की काय कोण जाणे! गजगतीची आणि सिंहकटीची जरा उगीच गफलत झाली आणि गजकटी आणि सिंहगती असा प्रकार इथे झाला आहे. केसांना भुंग्यांचा वर्ण हा फाॅर्म्युला ठरला असताना तो भुंगा अनेक बाबतीत केवळ नवऱ्याच्या मागे लावण्यासाठी राखून ठेवला गेला आणि तिथे हल्ली विद्यमान असलेल्या केसांइतकाच परमेश्वराने आपला हात आखडता घेतला! डोळ्यातील सामर्थ्य जिभेवर ठेवले. नवरा आणि मुले यांच्यावर जणू एकाच वेळी स्वतंत्र नजर ठेवता यावी अशी नेत्ररचना केली. त्यामुळे माझ्यावर तिचा डोळा आहे म्हणावे तरी पंचाईत! नाही म्हणावे तरी पंचाईत! ओठांचा उपयोग केवळ आपल्या नवऱ्यावर दात खाण्यासाठीच करावयाचा असतो, या पलिकडे नवऱ्याचा त्याच्याशी संबंध नाही, अशी तिची कायमची भावना आहे! नेत्रचुंबनाबद्दल मागे एकदा खूप चर्चा झाली होती; परंतु दंतचुंबन नावाचाही शृंगारात एक भाग असू शकेल यावर अधिकाराने बोलू शकणारा एकच पामर आहे, असे मी नम्रपणे सांगू इच्छितो.
- खोगीर भरती
- पु. ल. देशपांडे
- खोगीर भरती
- पु. ल. देशपांडे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment