Wednesday, March 1, 2023

आठवणीतील पु.ल. - मंगेश पाठक

पुलंच्या निधनानंतर साहित्य किंवा चित्रपटसृष्टी- प्रमाणेच आणखी एक मैफल सुनी झाली. ती साहित्यिक गप्पांशी किंवा वाङमयीन वैशिष्ट्यांशी संबंधित नाही, पुलंच्या धमाल विनोदी नाटकांशीही संबंधित नाही. ही मैफल आहे कायमस्वरुपी स्मरणात राहणाऱ्या पुलंच्या फिरक्यांची ! वेळोवेळी संधी मिळेल तिथे पुलं हास्याची कारंजी फुलवायचे. त्यांच्या धमाल विनोदांमुळे आणि कोट्यांमुळे छोट्या वाटणाऱ्या अनेक गाठीभेटीही अविस्मरणीय झाल्या. प्र. के. अत्रे एकदा एका अंत्ययात्रेला गेले तेव्हा तिथले गंभीर वातावरणही बदलले. तशा वेळी अवघड परिस्थितीतही हास्यतुषार उडू लागले अशी आठवण सांगतात. पुलंबाबत असं घडल्याचं ऐकीवात नसलं तरी त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतरही त्यांचे सुहृद अशा किस्स्यांबाबत आवर्जून बोलले. दुःखावेग आवरत त्यांनी अशा किस्स्यांना वाट मोकळी करुन दिली. कारण हे केवळ किस्से नव्हते तर त्यात अस्खलित विनोदबुध्दी आणि उच्च श्रेणीचा हजरजबाबीपणा यांचा मिलाफ होता. कदाचित म्हणूनच एका डोळ्यातून आसवं वाहताना दुसरा डोळा ठराविक प्रसंग समोर उभा करून विनोदात रमताना दिसत होता.

पुलंबाबत एक आठवण सांगितली जाते. आयुष्यातलं पहिलंच भाषण करताना बाल्यावस्थेतील पुलं नेमक्या क्षणी अडखळून बसले. त्यांचं भाषण पुढे सरेना. परिणामी बोबडी बंद झाली. पण वेळ मारुन न्यायचे आणि हजरजबाबीपणाचे बाळकडू त्यापूर्वीच त्यांना मिळाले असावे. म्हणून तर 'आता माझी दूध घ्यायची वेळ झाली' असा बहाणा करत पुलं तिथून निघून गेले. पुलंच्या व्यक्तिमत्वापासून तसूभरही दूर न करता येण्याजोग्या अशा किस्स्यांची कमतरता त्यांच्या साहित्यिक मित्रांना कधीच जाणवणार नाही. ज्येष्ठ समीक्षक बापू वाटवे यांनी असाच किस्सा कथन केला होता. बापूंचा पुलंशी जवळचा परिचय होता. त्यांना पुलंच्या घरी जाण्यासाठी कधीच परवानगी लागायची नाही. एकदा बापू असेच गणांगण रंगवण्यासाठी पुलंच्या घरी पोहोचले. पुलं झोपले असतील किंवा विश्रांती घेत असतील असा त्यांचा अंदाज होता. कारण त्या सुमारास त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चाही सुरु होती. बापूंनी दबकतच त्यांच्या घरी पाऊल ठेवलं आणि पाहतात तो काय, पुलं एका हातात पेटीचा भाता ओढत गायन- वादनात रमले होते. हे दृश्य पाहून बापूही चक्रावले. विनाविलंब पुलंच्या मैफलीत सहभागी होत त्यांनी कौतुक सुरू केलं. शेजारीच भरपूर उकडलेल्या शेंगा होत्या. त्या रसरशीत शेंगांची चव चाखत बापूंनी संगीताला दाद द्यायला सुरूवात केली. बराच वेळ ती मैफल रमली. मैफल संपताच बापू म्हणाले, 'वा भाई, छानच पेटी वाजवली. या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर लोकांना पैसे मोजावे लागतात. मी तर फुकटातच आनंद घेतला'. बापूंचं बोलणं ऐकून शांत बसतील ते पुलं कसले ? एक क्षणही न गमवता त्यांनी विचारलं, 'फार वाईट वाटतंय का ? तसं असेल तर पाच-पंचवीस रुपये देऊन टाक!' पुलंच्या या मल्लिनाथीनंतर उपस्थित हास्यसागरात बुडून गेले.

असाच आणखी एक किस्सा बापूंनी रंगवला होता. पुलंच्या आजाराविषयी सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. जवळचे मित्र अनेक डॉक्टरांची आणि उपचारपध्दतींची माहिती देऊ लागले. पण दूरदूरचे काही हितचिंतकही पुलंकडे गर्दी करु लागले. त्यांना नव्या आणि वेगळया उपचारपध्दतींविषयी माहिती देऊ लागले. अशाच एक बाई पुलंना भेटायला आल्या. त्या सुमारास 'रेकी'ची बरीच चर्चा होती. या उपचारपध्दतीचा पुलंना फायदा होईल असं वाटल्याने ती "बिचारी बाई लांबून आली होती. पुलंकडे बराच वेळ थांबून त्या बाईने रेकीची माहिती सांगितली. बराच वेळ ती बाई या उपचारपध्दतीचा फायदा पुलंनी घ्यावा असं सुचवत होती. पुलंच्या लेखी तिचं समजावणं आणि मागे लागणं थोडसं अतीच होत होतं. पण ते काही बोलले नाहीत. थोडया वेळाने त्या बाई निघून गेल्या. बापू त्यावेळी तिथेच होते. त्या बाई निघून जाताच पुलंनी दार लावून घ्यायला सांगितलं. दार लावून घेताच बारीक नजरेने तिथे पहात ते बापूंना म्हणाले, 'काय रे ती 'अति-रेकी' गेली का ?' पुलंनी केलेली ही कोटी त्यावेळी चांगलीच दाद मिळवून गेली. बघता बघता दोघेही जोरजोरात हसू लागले.

पुलंना ज्या प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथल्या मंडळींनाही पुलंनी सोडलं नाही. डॉ. शिरीष प्रयाग यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह जुळला होता. १९८६ मध्ये डॉ. प्रयाग यांच्या रुग्णालयाचं उद्घाटन पुलंनीच केलं होतं. या उद्घाटनप्रसंगी पुलंनी डॉ. प्रयाग यांची फिरकी घेतली. त्यांनी भाषणाला सुरूवात केली आणि संपूर्ण रुग्णालयावर एक नजर टाकली. आजूबाजूला डोकावून पाहिल्यानंतर ते उत्तरले, 'शिरीषकडे येणारे रुग्ण अत्यवस्थ असू शकतात. शक्यतो लोकांना त्याच्याकडे यायची गरज पडू नये. पण अशी गरज पडलीच तर हे रुग्णालय सर्व बाबतीत सुसज्ज आहे'.पुलंचं हे म्हणणं ऐकून उपस्थित मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकली होती.

एखाद वेळी स्वत: एखाद्या कामासाठी जवळच्या स्नेह्याला फोन केला तरी पुलंची विनोदबुध्दी जागृत असायची. आपलं काम आहे म्हणून ते समोरच्याची फिरकी टाळायचे नाहीत. त्यांच्यासंदर्भातला असाच एक किस्सा इथे सांगण्याजोगा. एकदा पुलंना 'धर्मात्मा'चं बुकलेट हवं होतं. त्या बुकलेटवरील बालगंधर्वांचा फोटो ते शोधत होते. एका मित्राला त्यांनी फोन केला आणि म्हणाले, 'काय रे, तुझ्याकडे 'धर्मात्मा'चं बुकलेट आहे का ? मला ते हवं आहे.' पलिकडून मित्र म्हणाला, 'हो, माझ्याकडे ते बुकलेट आहे.' यावर पुलंनी विचारलं, 'काय रे, तुझ्याकडे हे बुकलेट कुठून आलं? तू तर 'धर्मात्मा'मध्ये कामही केलं नव्हतस.' मित्र उत्तरला, 'अरे मी काम केलं असतं तर तो चित्रपट चालला असता ना !' मित्राच्या या विधानावर पुलंची प्रतिक्रिया आली नाही. हे लक्षात येताच त्याने पुन्हा विचारलं, 'काय पीएल, दुसऱ्याच्या विनोदांना हसायचा रिवाज तुमच्याकडे नाही का? का आम्हीच तुमच्या विनोदांना दाद द्यायची?'

मित्राच्या या प्रश्नावर पुलं शांतपणे उत्तरले, 'अरे मित्रा, विनोदाला दाद देण्याचा रिवाज आमच्याकडे अवश्य आहे. पण त्यासाठी मुळात विनोद घडायला हवा ना.' पुलंचा हा शेरास सव्वाशेर प्रतिसाद ऐकल्यानंतर मात्र मित्राची आणखी काही प्रश्न विचारायची हिम्मत झाली नाही. पुलंनी परिचित, स्नेही, मित्रमंडळी सर्वांनाच आपल्या फिरकीचं लक्ष्य बनवलं. मात्र, स्वत: वरील विनोदही नाकारले नाहीत. प्रयाग हॉस्पिटलबाहेर चित्रपट निर्माते राम गबाले, जब्बार पटेल, दिलीप माजगावकर आणि इतर अनेकजण पुलंबद्दल भरभरुन बोलत होते. त्याच वेळी आणखी एक आठवण पुढे आली. शेवटी पुलंना पायावर जोर देऊन उभं राहता यायचं नाही. ते व्हिलचेअरवरच असायचे. अशाही परिस्थितीत मित्रमंडळींना बोलावणं, त्यांच्याशी गप्पा मारणं कमी केलं नव्हतं. मित्रमंडळीही चलाख. पुलंबरोबर गप्पा मारायची संधी मिळाली की त्यांची थोडीशी टर खेचायची संधी तेही सोडायचे नाहीत. पुलं व्हिलचेअरवर बसून गप्पा मारताना त्यांना पाय टेकवून उभं राहता येत नाही हे एका मित्राच्या लक्षात आलं. त्याने लगेच मल्लिनाथी केली, 'आता पीएलचे पाय जमिनीला लागत नाहीत पहा.' त्याचं हे विधान ऐकून एक समयोचित सुंदर विनोद घडल्याचं पाहून सारे जण हसू लागले. पुलंनीही समरसून त्यांना दाद दिली. पुलंच्या अशा असंख्य आठवर्णीना अजूनही उजाळा दिला जातो. त्यांच्या शाब्दिक कोट्या, प्रसंगनिष्ठ विनोद आणि हजरजबाबीपणा यावर आवर्जून बोलले, लिहिले जाते. खंत एकच आहे, ती म्हणजे आता अशा कोट्या फारशा ऐकायला मिळत नाहीत आणि प्रसंगनिष्ठ विनोदातली ती नजाकत दुर्मिळ झाली आहे.

मंगेश पाठक
दैनिक महानगर

0 प्रतिक्रिया: