'बालगंधर्व'च्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान भूषविणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या निर्मितीत पु. ल. देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती करायचे ठरल्यापासून त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वास्तूचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांना वेळोवेळी पुलंचे मार्गदर्शन लाभले. १९६२मध्ये या वास्तूचे भूमिपूजन झाले आणि १९६८मध्ये ती बांधून तयार झाली. या कालावधीत जातीने वास्तूला भेटी देऊन, रंगमंच, आसनव्यवस्था, नाटकासाठी लागणाऱ्या इतर तांत्रिक बाबींची पाहणी करून, 'पुलं'नी या नाट्यगृहाला पुण्याच्या वैभवात भर घालणारी वास्तू म्हणून उभे केले.
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान भूषविणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या निर्मितीत पु. ल. देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती करायचे ठरल्यापासून त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वास्तूचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांना वेळोवेळी पुलंचे मार्गदर्शन लाभले. १९६२मध्ये या वास्तूचे भूमिपूजन झाले आणि १९६८मध्ये ती बांधून तयार झाली. या कालावधीत जातीने वास्तूला भेटी देऊन, रंगमंच, आसनव्यवस्था, नाटकासाठी लागणाऱ्या इतर तांत्रिक बाबींची पाहणी करून, 'पुलं'नी या नाट्यगृहाला पुण्याच्या वैभवात भर घालणारी वास्तू म्हणून उभे केले.
केवळ बालगंधर्वची वास्तू नाही, तर आजूबाजूचा परिसरही वेगवेगळ्या कलांसाठी समर्पित असावा, अशी 'पुलं'ची भावना होती. तत्कालीन नगरपालिका प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, त्यांनी वास्तूच्या जडणघडणीवर जातीने लक्ष ठेवले होते. एखाद्या कलाकाराचा या वास्तूच्या निर्मितीत सहभाग असायला हवा, असा 'पुलं'चा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी 'बालगंधर्व'ची संकल्पना मांडून, त्याच्या निर्मितीप्रक्रियेत भरीव योगदान दिले. या नाट्यगृहाच्या माध्यमातून पुलंनी पुणेकरांना एका सांस्कृतिक केंद्राची भेट देऊन, पुढील अनेक वर्षे येथील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचे सामाजिक भानही अचंबित करणारे होते. या हाताचे त्या हातालाही कळू न देता त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या. मुस्लिम समाजातील पीडित महिलांना मदत व्हावी, या भावनेतून ८०च्या दशकात त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाला जवळपास ४० हजार रुपयांची मदत दिली. पुलंच्या सहधर्मचारिणी सुनीताबाई यांनी ही रक्कम मंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्या हवाली केली, असे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यद भाई यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पुलं आणि सुनीताबाईंना मंडळाच्या कार्याची चांगलीच माहिती होती. लिमयेंच्या पूनम हॉटेलमध्ये लिमये, हरिभाऊ परांजपे, नंदा नारळकर यांच्यासोबत आमची पुलं, सुनीताबाईंशी भेट व्हायची. त्या वेळी मंडळाच्या कार्याचा तपशील ते जाणून घेत. तो काळ निराळाच होता. पुलंनी सढळ हस्ते मदत केली होती. ८० च्या दशकात सामाजिक सुधारणेसाठी काम करणाऱ्या संस्थेला ४० हजारांची देणगी देणे हेदेखील धाडसच. त्यांच्या कर्तृत्व व दातृत्वाला सलाम!'
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून, व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने डॉ. अनिता व डॉ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची २९ ऑगस्ट १९८६ रोजी येरवडा मनोरुग्णालयातील एका वॉर्डमध्ये स्थापना केली. पुलंनी सुरुवातीला आर्थिक मदत केली आणि 'मुक्तांगण' हे नावही त्यांनीच सुचविले. याविषयी डॉ. अनिल अवचट म्हणाले, 'बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पुलंनी पुढाकार घेतला होता. तेथील वस्ती उठवून लोकांची कसलीही जबाबदारी न स्वीकारता प्रशासनाने काम सुरू केले. या विरोधात मी 'साधना' साप्ताहिकात लेख लिहिला. पुढे पुलंची भेट झाली. ते रागावले नाहीत, तर त्यांनी प्रेमाने जवळ घेतले आणि मी त्यांचा मुलगा झालो. मी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'गर्दचे ग्रहण' ही लेखमाला लिहिली होती. लेख वाचून पुलं अस्वस्थ झाले. त्यांनी आम्हाला बोलवून घेतले. ते दर वर्षी संस्थांना मदत करायचे. व्यसनाधीनतेच्या विरोधात आम्ही काम सुरू केले होते. सुनंदा (अनिता) म्हणाली, 'केंद्र काढू'; पण काहीच तयारी नव्हती. पुलंनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आधी एक लाख रुपये व नंतर अडीच लाख रुपये दिले. 'तुमच्या केंद्राला मी शुभेच्छा कशा देऊ,' असा प्रश्न करून, ते म्हणाले, 'हे काम संपून केंद्र लवकरात लवकर बंद पडावे आणि येथे एक सांस्कृतिक केंद्र उभे राहावे.' पुलं पेशंटचे अनुभव ऐकून गलबलून जायचे. 'यांच्या मुलांनी काय पाप केले आहे रे,' असे ते म्हणायचे. पुलंचा प्रभाव इतका, की त्यांनी मदत केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला.'
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
अंधश्रद्धेच्या विरोधात व्यापक चळवळ उभी करायचे, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ठरवले, तेव्हा त्यांच्यामागे उभे राहिलेले पुलंच होते. ही आठवण दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितली. ते म्हणाले, 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. तेव्हा समितीच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. हा जाहीरनामा म्हणजे समितीची भूमिका, उद्दिष्ट आणि कर्तव्य स्पष्ट करणे होते. या जाहीरनाम्यावर पहिली स्वाक्षरी कुणी केली असेल, तर ती पुलंनी. ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे यांच्याबरोबर पुलंनी पहिली स्वाक्षरी करून महाराष्ट्र अंनिसच्या कामाला पाठबळ दिले. 'का?' या विषयावरील लघुपटात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा याविषयी पुलंनी महत्त्वाची भूमिका मांडली. महाराष्ट्र अंनिसच्या स्थापनेआधी बाबांनी साताऱ्यामध्ये वंचित मुलांच्या शिक्षणासाठी एकता शिक्षण प्रसारक संस्था काढली, तेव्हा पुलंनी आर्थिक मदत केली.' 'साधना' साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ म्हणाले, 'पुलंचे वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांच्याशी मैत्र होते. हे दोघेही 'साधने'चे संपादक! आणीबाणीच्या काळात पुलंचा 'साधने'शी संबंध आला. याच काळात जयप्रकाश नारायण यांनी तुरुंगातील अनुभवावर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद पुलंनी केला, जो साधनेने प्रसिद्ध केला.'
विद्यार्थी सहायक समिती
'तरुण वर्गात वैचारिक देवघेव करणारी वसतिगृह चळवळ महाराष्ट्रात फोफावली पाहिजे,' अशा शब्दांत पु. ल. देशपांडे यांनी विद्यार्थी सहायक समितीच्या कार्याचा गौरव केला होता. पुलंचा विद्यार्थी सहायक समितीशी घनिष्ठ संबंध होता. ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय करण्यासाठी प्रसिद्ध गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी १९५५ मध्ये या समितीची स्थापना केली. 'अच्युतरावांचे हे कार्य पुलंना खूप भावले होते,' अशी आठवण समितीचे विश्वस्त रमाकांत तांबोळी यांनी जागवली. 'दिवेकर नावाच्या गृहस्थांनी दिलेल्या देणगीतून नवीन वसतिगृहात बांधलेल्या विंगचे उद्घाटन रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पुलं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानंतर निर्मलाताई पुरंदरे यांच्या माध्यमातून पुलंनी समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रासाठी सहा हजार रुपये देणगी दिली. त्यांचे नावही या केंद्राला देण्यात आले आहे. पांडुरंगशास्त्री आठवलेंनी वसतिगृहात बुद्धिमंतांचा मेळावा घेतला होता. त्या वेळीही पुल उपस्थित होते. समितीच्या कार्याला पुलंचे नेहमीच पाठबळ असायचे,' असे तांबोळी यांनी आवर्जून नमूद केले.
याही चळवळींना मदत
'लेखक म्हणून मला मिळालेले एक लाख रुपये जुन्या अनमोल ग्रंथांच्या जपणुकीसाठी एशियाटिक सोसायटीला देत आहे,' असे पुलंनी लिहून ठेवले आहे. पुलंनी मिरजच्या खरे मंदिराला मुक्तांगण सभागृह बांधून दिले. राष्ट्र सेवा दलाशी त्यांचा जवळचा संबंध होता. याशिवाय भीमराव गस्ती करत असलेल्या देवदासी स्त्रियांच्या कामाला पुलंनी मदत केली. कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, आनंदवन, लोकमान्य सेवा संघ पार्ले, मिरज विद्यार्थी संघ, मराठवाडा साहित्य परिषद, एनसीपीए, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रामबाल शिक्षा केंद्र, रमाबाई आंबेडकर मुलींची शाळा नाशिक, महाराष्ट्र विज्ञान परिषदेची प्रयोग शिबिरे, अस्मितादर्श नियतकालिक, विटा येथील रघुराज मेटकरी यांची संस्था अशा विविध संस्था व चळवळींना पुलंनी लाखो रुपयांची मदत केली आहे. पानशेत पूरग्रस्तांना व किल्लारी भूकंपग्रस्तांना त्यांनी मदतीचा हात दिला. याशिवाय पुलं व सुनीताबाईंनी अनेक संस्थांना आर्थिक मदत करण्याबरोबरच अनेक पुस्तके भेट दिली.
उद्यम मंडळास देणगी
महिलांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने १९५८ मध्ये 'उद्यम मंडळ' स्थापन केले होते. या उद्यम मंडळातून फाइल बोर्ड, बॉक्स फाइल्स तयार करण्याचे काम सुरू होते. साधारण १९९६ मध्ये पु. ल. देशपांडे यांनी मंडळाला दीड लाख रुपयांची देणगी दिली. त्यातून 'मुक्तांगण तंत्रनिकेतन'चे युनिट उभारण्यात आले. या युनिटच्या माध्यमातून 'इलेक्ट्रॉनिक असेंब्ली'चे काम सुरू करण्यात आले. त्या वेळी इलेक्ट्रॉनिक असेंब्ली फार क्वचित ठिकाणी होती. उद्यम मंडळात ही असेंब्ली असल्याने बहुराष्ट्रीय कंपनीचे काम करण्याची संधी सुमारे १०० मुलींना मिळाली. या मुलींना त्याचा रोजगाराच्या दृष्टीने खूप फायदा झाला. पु. ल. देशपांडे यांनी संस्थेला अधूनमधून जमेल तशी आर्थिक मदत केली आहे, असे संस्थेचे सचिव पी. व्ही. एस. शास्त्री यांनी सांगितले.
'पुलस्त्य' देणगी
पुलं आणि सुनीताबाई आणि जयंत आणि मंगला नारळीकर यांचा अनेक वर्षांचा स्नेह होता. पुण्यात आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राच्या (आयुका) उभारणीनंतर पुलं आणि सुनीताबाईंनी केंद्राला एक- दोनदा भेट देऊन, तेथून चालणाऱ्या विज्ञानप्रसार कार्यक्रमाची प्रशंसा केली होती.
२०००- २००१ च्या सुमारास आयुकाच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमाला सुनीताबाईंनी पुलंच्या संमतीने २५ लाखांची देणगी दिली. त्या निधीतून 'आयुका'च्या विज्ञान प्रसाराची मुक्तांगण विज्ञान शोधिका ही स्वतंत्र इमारत २००४ मध्ये आकाराला आली. आयुकाने त्या इमारतीला सप्तर्षीतील 'पुलस्त्य' या ताऱ्याचे नाव दिले. त्याच्यात पुलंच्याही नावाचा समावेश होतो.
सुनीताबाईंनी स्वतःच्या सगळ्या, तर पुलंच्या काही पुस्तकांची रॉयल्टीही आयुकाच्या नावे केली. या पुस्तकांच्या रॉयल्टीमधूनही मोठी रक्कम जमा होत असते. तो निधी आयुकाचा विज्ञानप्रसार कार्यक्रम चालवण्यासाठी वापरला जातो. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, आजच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ घडावेत, यासाठी पुलं आणि सुनीताबाईंनी आयुकाच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमाच्या रूपाने कायमस्वरूपी तरतूद करून ठेवली. आज आयुकाच्या या कार्यक्रमांतर्गत शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजावून सांगण्यासाठी, त्यांना खगोलशास्त्राकडे आकर्षित करण्यासाठी वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. पुलं आणि सुनीताबाईंविषयी कृतज्ञता म्हणून आयुकाने गेल्या काही वर्षांपासून पुलंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, 'पुलस्त्य महोत्सव' सुरू केला आहे. या महोत्सवातून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ नागरिक आणि विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांना खगोलशास्त्रातील शोधांविषयी मार्गदर्शन करतात.
- महाराष्ट्र टाईम्स
0 प्रतिक्रिया:
Post a Comment