एखादी व्यक्ती आपल्या वक्तृत्वाने, लिखाणाने, शुद्ध सात्विक आचरणाने अनेक उत्तमोत्तम पिढ्या घडवू शकते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "पु.ल." ! सबकुछ पु.ल., पुलकित, पुलोत्सव, पुलमय, पु.ल. डे.... आणि बरचसं असच जे काही अप्रतिम ते सर्व फक्त "फुल्ल देशपांडे" च म्हणावं लागेल ! सर्व स्तरातील मित्रांशी लीलया मैत्री करून आपलं स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्याची खासियत शिकवणारा... साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रांतात आपली "भाईगिरी" निर्माण करणारा एक "बाप माणूस" !
खरं तर "भाई" हा शब्द आजच्या काळात समाजात वेगळ्या अर्थानं रूढ झालाय पण सगळ्याच प्रांतात कोणीतरी एक "भाई" असतोच ! तसंच साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रांतातही "पु.ल." नावाच्या "भाईनं" आपलं प्रेमळ साम्राज्य स्थापन केलय व ते अजूनही कित्येक शतकं टिकणारय यात काही शंकाच नाही. हा "भाई" अदृश्य रूपाने अनेकांची साथसंगत करतोय, कुणाला आपल्या साहित्यातून शहाणं करतोय, कुणाला समजावतोय तर कुणाला धीर देतोय व आपल्या "भाईगिरी"ची उपाधी सार्थ ठरवतोय हे मान्यच करावे लागेल. मला तर या "भाईने" बोटाला धरून शिकवल्याचा कधी कधी भास होतो. त्यांनी रंगवलेली व्यक्तिचित्र कोणत्या ना कोणत्या रूपाने सतत आपल्या अवतीभवती फिरल्याचा आभास होणं म्हणजेच ही "भाईगिरी" ...पण .... ती प्रेमाची, आपुलकीची !
ज्या व्यासपीठावर जातील तिथं "आपला माणूस" हा विश्वास निर्माण करणारे व "आपला माणूस" म्हणून Heart मध्येच रुतून बसणारे "पु.ल." म्हणजे साहित्यातील "तेजस्वीनावधीतमस्तु | मा विद्विषावहै। " या वेदातील शेवटच्या प्रार्थनेप्रमाणे आहेत. बालपणापासून गेली 30-35 वर्षे झाली मी पुलंच्या सर्व व्यक्तिरेखा आधी कॅसेट्स, मग सीडी व आता usb च्या माध्यमातून ऐकतोय पण प्रत्येकवेळी मला आजच ऐकतोय हा भास होतो. त्यामुळं त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा अजूनही माझ्या मनात त्याच वयाची व जिवंत झऱ्याप्रमाणे वाहतेय. उदाहरणच द्यायचं तर त्यांनी रंगवलेला "सखाराम गटणे" चा आज सहस्त्रचन्द्रदर्शन सोहळा झाला असेल किंवा "चितळे मास्तर" आज दीडशे वर्षाचे झाले असतील पण ही माणसं अजूनही हजारो लोकांच्या मनात ताजीतवानी आहेत ती केवळ पुलं च्या शब्द सामर्थ्यानेच ! पुलं नी आम्हा सर्व पिढ्याना माणसं वाचायला, ऐकायला, मिळवायला व जोडायला शिकवलं... त्यांच्या ऐकलेल्या व्यक्तिरेखेच्या जोरावर कोणत्याही गप्पांच्या मैफिलीत पहिल्या रांगेत बसण्याचं धाडस त्यांच्या साहित्यानं कित्येकांच्या अंगात निर्माण केलं अस म्हणणंच एकदम रास्त ठरेल !
प्रवासाला जाताना एस. टी. स्टँडवर पोट खपाटीला गेलेला एखादा वृद्ध कुठंतरी "अंतुबर्व्याची" आठवण करून जातो, शाळा सुटल्यावर रस्त्याच्या कडेने दोरी धरून सरळ जाणारा चपचपीत तेल लावून भांग पडलेला एखादा विद्यार्थी "सखाराम गटणे" सारखा दिसतो, कष्टाचे काम झाल्यावर तपकीर ओढत बसलेला एखादा चिवट म्हातारा उगीच "पेस्तनकाका" सारखा डोळे मिचकावून जातो, अंगात कोट व रस्त्याने चपल्या झिजवत आपल्याच स्वानंदात जाणारे एखादे आजोबा "चितळे मास्तर" सारखे भासून जातात. आपल्या नावीन्यपूर्ण कलेतून रसनिष्पत्ती करणारा जणू छोटेखानी विद्यापीठच चालविणारा "पट्टीचा पानवाला" हा "थुंकसांप्रदायिक" लोकांना जाता-जाता काही-काही फुटांवर 'भाईंची' आठवण करून देतो. "हरितात्या" इतिहासाच्या पानापानात जाऊन जगले पण कित्येक जण 'भाईंच्या' या पात्रांसोबत जगतायत ! एखाद्या संगीत मैफिलीला गेल्यावर आपली उगीच अवघडलेली मान सैल करण्यासाठी मानेला दिलेला हिसडा जेव्हा समोरच्या गाणाऱ्याला उत्तम दाद वाटते तेव्हा उगीच आपण "रावसाहेब" झाल्याचा फील देऊन जातो, तर एखाद्या मित्रमंडळींच्या कार्यात जीव तोडून event management प्रमाणे सिस्टीमॅटिक केलेले कष्ट सुद्धा "नारायणा" ची अचूकता साधायला थोडे कमीच पडतात आणि ओशाळल्यासारखी भावना निर्माण होते..यासारखी अनेक 'पुराव्यानी शाबित' होणारी 'हंड्रेड परसेंट रियल' विसंवादी पात्रं "भाई" आमच्या सोबतीला सोडून गेले आहेत.
निवांत वेळेत काम करताना, कुटुंबासोबत किंवा एकटे लांबच्या प्रवासात, ड्राईविंग करताना, रात्रीच्या वेळी कंटाळा आल्यावर दिवसातील कोणत्याही वेळी ही "भाई" ची माणसं तात्काळ हजर आहेत त्यामुळं एकटेपणा वाटायची काय बिशाद आहे ?
आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या "भाईच्या ओसरीवर" वेळ मिळेल तसं खोडकर पणानं थोडंफार दंगा करून जावं म्हणजे तेवढंच ताजतवानं होईल म्हणून हा लेखप्रपंच..!
कारण त्यांच्या कोणत्याही व्यक्तिचित्राला वयाचं बंधन नाही. मी लहान असतानाही "रावसाहेबांच्या" अड्ड्याचा मेंबर होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार व त्यांच्या दर तीन शब्दांनंतर येणाऱ्या "आलं तेच्या आयला...." सारख्या "झकासपैकी छप्पर उडवून देणाऱ्या" कचकावून दिलेल्या शिवीचा मनसोक्त आस्वाद घेणार !
अनेक व्यक्तीचित्र जीवंत ठेवलेल्या व्यक्तीवर चार ओळी लिहिणं म्हणजे सुध्दा त्यांच्याच भाषेत " पं. कुमारजींच्या मैफिलीत श्लोक म्हणून दाखवल्यासारखं" आहे... पण हे लिहिण्याचं धाडसही त्यांच्याच ऐकलेल्या, वाचलेल्या साहित्यामुळंच आहे हे मात्र 100% खरं ! कित्येकांचं साहित्य वाचताना "अनुवंशिकता" ही वाचलेल्या, ऐकलेल्या साहित्यातूनही निर्माण होऊ शकते हा विश्वास निर्माण झाला व कधीही भेट नसताना "पोटीचा जिव्हाळा" उत्पन्न झाला ! इतिहासात "बाजीप्रभू व मुरारबाजी देशपांडेंच्या" वीररसामुळे अनेक 'मावळ्यांना' लढण्याची उमेद निर्माण झाली तर आजच्या काळात "पुलं देशपांडेंच्या" साहित्यरसामुळे लिहित्या 'हातोळयाना' प्रेरणा मिळत गेली म्हणणेच योग्य होईल ! ह्या "ब्रिज देशपांडे (पुलं)" खालून माझ्यासारख्या सर्वसामान्यासारखे अनेक जण वहाते होत गेलेत व छान पैकी तरून जाताहेत ! तरुन जाताना या "ब्रिज" चा नक्कीच आधारासाठी उपयोग होतोय.... हा "ब्रिज देशपांडे" आम्हांला नेहमीच वाहते आणि लिहिते होण्यासाठी म्हणा किंवा मनं जोडण्यासाठी म्हणा "दीपस्तंभा" प्रमाणे अंतापर्यंत मार्गदर्शन करत राहणार ...!
"भाईंची"ही "भाईगिरी"..'बिगरी ते मॅट्रीक' च नाही तर 'बिगरी ते डिग्री' व त्याहीपुढे 'डिग्री ते तिरडी' पर्यंत आमच्यावर "राज्य" करणार हे नक्कीच !
मंदार मार्तंड केसकर, पंढरपूर
मोबा. 9422380146
mandar.keskar77@gmail.com
3 प्रतिक्रिया:
Very nice
👍👍👍
👍👍👍
Post a Comment