Monday, August 2, 2010

बायकोबरोबरची खरेदी

बायकोबरोबर खरेदीला निघालेल्या नवर्‍याचा आणि वधस्तंभाकडे नेलेल्या वसंतसेनाघातकी चारुदत्तचा अभिनय सारखाच असतो. तीच हतबलता, तीच चिंता काही फरक नाही. बायकांना ज्या काही गोष्टी फक्त स्वता:लाच उत्तम जमतात असं वाटतं त्यातली खरेदी ही महत्वाची बाब आहे. दोन पैशाचा अळू असो, नाहीतर दोनशे रुपयांचा शालू असो, दक्षता तीच, जिकर तीच, हुज्जत तीच किंबहुना दुकानदाराशी हुज्जत घालायची पराकाष्ठेची तयारी हा तर खरेदीशास्त्राचा पाया आहे. तुम्हाला जर बायकोबरोबर खरेदीला जायचं असेल देव करो आणि असले प्रसंग फारसे तुमच्यावर न येवोत. तर एक गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे. "लवकर आटपा" हे वाक्य चुकूनसुद्धा उच्चारता कामा नये. राग, लोभ, क्रोध वगैरे जिंकायची योगसाधना संसारात राहून देखील करायची असेल तर बायकोबरोबर खरेदीला जावं.

सुरुवातीच्या हौसेच्या काळात माळ्याचा दुकानात वेणी विकत घेऊन देण्यापासून ह्या खरेदीला सुरुवात होते. फुलं निष्पाप असतात पण वेण्या ही गोष्ट भयंकर आहे. खरेदी नावाच्या गोष्टीतला खरी झळ तिथं बसायला लागते. आपण आपले मोहून जातो- त्या नाना प्रकारच्या वेण्या, वेण्यांची ती वेण्यांहुनही मोहक गिर्‍हाइकं वगैरे पाहून...हो.. आपल्या आपल्यात खोट कशाला बोला? पण पहिले चटके इथेच बसतात. मला तर टोपलीतली प्रत्येक वेणी चांगलीच दिसते. सुरवातीला मीदेखील हिच्यापुढे जातीच्या सुंदरीना काहीही शोभतं वगैरे विनोद करत असे. पण पुढे पुढे ह्या सुंदरीनं जात दाखवायला सुरुवात केली. नुसती चार सहा आण्यांची वेणी तास तास खायला लागली. पुरुषांना आवडलेल्या वेणीचं सौंदर्य बायकांच्या डोक्यात शिरत नाही. आपल्याला शेवंतीची वेणी आवडली तर बायको अबोलीसाठी डोकं धरुन बसते. एका अबोलीच्या वेणीसाठी हिच्याबरोबर मी ठाकूरद्वारपासुन बेनाम हॉल लेनपर्यंत तीन चकरा मारल्या आहेत. वाटेतल्या कुलकर्ण्याच्या हॉटेलातली भजी हाक मारून बोलवत असतात पण काही नाही- अबोली! शेवटी एकदाची दोन देऊळाजवळ अबोली सापडली. मी हुश्श करणार इतक्यात ही म्हणाली "त्यापेक्षा ठाकूरद्वारच्या दुकातली चमेलीच ताजी होती. मी बसते दोन देवळांत घटकाभर. लक्षात आलं ना कुठली ती?" लगेच घूम जाव करुन ठाकूरद्वार गाठावं लागलं.


पण ह्या सगळ्या प्रकरणांत सर्वात गंभीर मामला म्हणजे कापडखरेदी! बाप रे! आमची बायको एके दिवशी म्हसकरांच्या दुकानतल्या लोकांसमोर चक्क मला चिकन घ्यायचयं म्हणाली. चिकन? पोबृंप्याच्या मारूतीच्या देवळातल्या उपाध्यांच्या घरात बटाटाच्या सुक्या भाजीला पक्वान माणणार्‍या कुटुंबात वाढलेली बगंभटाची ही अन्नपुर्णा ’चिकन’ मागायला लागल्यावर मी आधी सोडा मागवला. घरात अजून अंड्याचा पत्ता नव्हता आणि चिकन? कडमड्याच्या पोष्ट्या जोश्याची सुन आणि बेबंट्याची बायको चिकन खाते हे कळल्यावर सारा रत्नागिरी जिल्हा हादरला असता. मी जोरात ओरडलो "चिकन?" म्हसकरांच्या दुकानाला मटणप्लेट हाऊस समजलीस की काय ही? मला वाटलं आता म्हसकर कापडवाले मृच्छित पडणार. पण घटकाभरात चिकन हे कापडाचं नाव आहे हे कळलं. म्हसकरांच्या दुकानात त्या दिवशी एक इसम थंड सोडा पितांना पाहिला का कुणी? मीच तो! तशीच एकदा मटणकट म्हणाली. मटणकट ही एके काळी पोलक्याची फॅशन होती. हळूहळू मी ही निर्ढावत चाललोय. उद्या हिने दुकानात जाऊन ’बोकड’ मागितला तरी मी बोलणार नाही. आता चिकन हे पोलक्याच्या कापडाचं नाव असल्यावर बोकड हे शर्टिंगच नाव असायला काय हरकत आहे? एकदा आमच्या शंकर्‍याला लग्नमुंजीला जातांना घालायला चांगलासा शर्ट शिवायचा म्हणून अठवले शहाड्यांकडे कापड घ्यायला गेलो. तिथल्या एका पोक्त माणसाला हिने विचारलं "डब्बल घोडा आहे का हो?"

"अग शंकर्‍याच्या मुंजीचा अजून पत्ता नाही आणि वरातीच्या घोड्याची कसली चौकशी करतेस? असं म्हणून मी त्या पोक्त गृहस्थांना म्हणालो "माफ करा बरं का अठवले!" त्यांनी पाहिलच नाही, ते शहाडे असतील म्हणुन मी गप्प बसलो. पण ते मात्र म्हणाले "गोवींदा, डबल घोडा घे"

मग तो गोंवीदा रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला. "अस्सल डबल घोडा आहे" ते म्हणाले. त्यांनी किंमत सांगितल्यावर मात्र त्यापेक्षा खर्‍या घोड्याची जोडी स्वस्तात मिळेल असं मला वाटलं. मी त्यांना म्हणालो "अहो शहाडे, लहान मुलाच्या शर्टाला हवयं कापड, त्याला करायचाय काय डबल घोडा? चांगलासा मांजरपाट काढा!"
"तुम्ही गप्प बसा बघू! डबल घोडाच फाडा हो दोन बार त्यांच काय ऎकता तुम्ही कुलकर्णी?"
हात्तिच्या, म्हणजे ते अठवले पण नव्हते, शहाडे पण नव्हते. आणि मंडळीपैकी होते, त्यांनी रीतसर डबल घोडा फाडायला सुरुवात केली आणि मी तिसरीकडेच पाहायला लागलो.

ह्या कापडखरेदीत लुगड्याचा पोत, काठ, पदर, रंग वगैरे बाबतीत जो आपला सल्ला घेण्यात येतो, तो स्विकारण्यासाठी नसतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. एकदा मी असाच हिच्या बरोबर कापडखरेदीला गेलो होतो. हिनं नेहमीप्रमाणे ते हे काढा हो, ते ते काढा हो, चाललं होतं. मी थोडासा इतर गिर्‍हाइकांकडे पाहण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात ही म्हणाली, "कसं आहे हो अंग?"
"गोरं?" असं म्हणून ही एवढ्यांदा ओरडली की ज्या गोर्‍या अंगाकडे पहात होतो ते देखील दचकलं. लुगडं हे अंग झाकण्यासाठी असतं अशी माझी समजूत. आता लुगड्य़ालाही अंग असतं हे मला काय ठाऊक.

नागपूर, महेश्वर, इरकाल, इचलकरंजी, कांजीवरम, बनारस ही गावं पुरुषांचा सुड घेण्यासाठी स्थापन झालेली आहेत. एकदा मला ही अशीच म्हणाली होती "हा पडवळी रस्ता बरा आहे की वैंगणीच घेऊ?" मला आधी हा रास्ता कोण हे एक ठाऊक नव्हतं पण पडवळ ही गोष्ट नावडती असल्यामुळं "हा वैंगणीच बरा दिसतोय" म्हणून मी एका लुगड्यावर हात ठेवला.
"इश्श, अहो हाच तर पडवळी आहे!"
लगेच मी चलाखी करुन म्हटलं, "अग, तो नको म्हणून मी त्याच्यावर हात ठेवला. तो वैंगणी हे तर मोरपंखी आहे. त्यांच्या कडची वैंगणी संपली आहेत."
निमूटपणं मी तिच्या मागे वैंगणीच्या शोधात निघालो.
असले हेलपाटे खाल्ल्यापासून मी कापडखरेदीला गेल्यावर कुठल्याही पातळाबाबत तिनं आपलं मत विचारलं की उगीचच विचारात पडल्यासारखा दाखवतो. कपाळाला काही आठया घालता आल्या तर घालतो. अधूनमधून नाक खाजवतो. उगीचच "हं ~~~" असा सुस्कारा सोडतो. याचा अर्ध पसंत किंवा नापसंत काहीही होऊ शकतो. कोणतीही सुचना स्पष्टपणे करायची नाही.

कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात अशी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. "शी! कसले हो हे भडक रंग!" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा! समोरची बाई म्हणत असते "कसला हा भरभरी पोत" हा शांत. गिर्‍हाईक नऊवारी काकू असोत नाहीतर पाचवारी शकू असो ह्याच्या चेहर्‍यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. समोर शेपन्नास सांड्याचा ढिग पडलेला असतो पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाशीस अश्या किमती हा गृहस्थ, "अथोक्षजाय नम: अच्युअताय नम: उपद्राय नम: नरसिंहाय नम: ह्या चालीवर सांगत असतो. सगळा ढिग पाहुन झाला तरी प्रश्न येतोच "ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?" एक वेळ तेराला तिनानं पूर्ण भाग जाईल पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच आपली स्वता:ची बायको असूनसुद्धा तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात "नारायण, इचलकरंजी लेमन घे." माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कापड्याच्या दुकानात नोकरी करावी.

हल्ली मला सवयीनं पुष्कळ गोष्टी कळायला लागल्या आहेत. हिला एखादं पातळ पसंद पडलं की नाही हे मी पातळापेक्षा हिच्या चेहर्‍याकडे बघुन सांगू शकतो. हवा तसा रंग, पदर, किनार हे त्रिकोणाचे तीन बिंदु कधीही जमत नाही. तो त्रिकोण जमला तर मॅचींग खण नसतो. एकतर अमूक एक रंगाचंच लुगडं घ्यायचं असा निर्धार करुन निघालेली बाई तेच लुगड घेऊन दुकातून बाहेर पडली हे दृष्य मला अजून दिसायचं आहे. आमची हीच काय पण "कोइमतुरीमध्ये काही आहे का हो?" असा पुकारा करत येणारी बाई हटकून कोइमतुरी सोडून दुसरचं घेऊन जात असते. पण त्यातल्या त्यात आमच्या हिला काही पडलंच पसंत तर तिच्या चेहर्‍यावर एक प्रकारची लकाकी येते. एखाद्या आवंढाबिवंढा गिळाल्यासारखं करते आणि हल्ली त्या वार्‍याबरोबर नाचणार्‍या बाव्हल्या मिळतात त्या, तशी एक दोनदा मान हलवून "हे लुगड जरा बाजूला ठेवून द्या बरं का" म्हणते. तेवढ्यात तिसरीच बाई दुसर्‍या योगीराजांना हैराण करत असते. कुटुंब त्या गठ्यात लक्ष घालतं आणि नेमकी त्या बाईने पसंत केलेलं लुगडं म्हणा, पातळ म्हणा, दंडीया म्हणा, काय असेल ते हिला पसंत पडतं. दंडीया हा जंबियासारखा सुर्‍याचा प्रकार आहे अशी माझी समजूत होती. पण तो ही लुगड्याचाच प्रकार आहे हे मला लग्नानंतर कळलं.

थोडक्यात म्हणजे बायकोबरोबर खरेदीला जातांना आपण लोकांच्या मुलांच्या वाढदिवसामुळं अगदी मनापासून आनंद झालेल इसम मला अजून भेटायचा आहे. तरीही आपण जातो कर्तव्य म्हणून. तीच गत पत्नीबरोबरच्या खरेदीची. इथं आनंद होण्यापेक्षा झाला आहे हे भासवण्याला अधिक किंमत आहे. मात्र एका गोष्टीला अजिबात भिऊ नये. पुष्कळदा आपल्याला वाटतं, कुटुंबाच्या चिकित्सक स्वभावामुळं दुकानदार चिडेल, भांडणतंटा होईल, पण दुकानदार चिडत नाही. कारण तोही बिचारा नवरा अस्तो. त्याची बायको देखील खरेदीला गेली त्याची हीच अवस्था करते. आणि नवर्‍याच्या दुकानातुन ती कधीही साड्या नेत नाही. तुम्ही कधी कापडवाल्याची बायको त्याच्या दुकानात खरेदीला आलेली पाहिली आहे? मी नाही पाहिली. आणि खरोखरच अमुक तमुक मंडळींची मंडळी आपल्या यजमानांच्या दुकानात आलीच खरेदीला, तर "तुमच्यापेक्षा लोकमान्यात कितीतरी व्हरायटी आहे" असं नवर्‍याचा तोंडावर सांगून लुगड़्यांच्या ढिगा खाली त्याला गाडून निघून जाईल. स्त्रिस्वभाव स्त्रिस्वभाव म्हणतात तो हाच, तो समजावून घेण्यात निम्मं आयुष्य निघून जातं.

- असा मी असामी

8 प्रतिक्रिया:

ravi said...

asa mi asami purvi wachli hoti punha wachun maja ali

Satish said...

ha ha ha .... kiti vela vachav ..kiva aikav.... punha naveenach vatat?
mastach....

Unknown said...

KHOP CHA CHAN AHA

Unknown said...

khop cha chan aha

अनिकेत अ. चिनके,बारामती said...

Majaa ali vachtana.....Khaskarun Navrobache Adaanipan ani tyala Lugadyanchya prakarachi naave mahiti nasanyavarun udalela gondhal.....Lay bhari....

Unknown said...

khup chan

Anonymous said...

खुपच छान..

Anonymous said...

नविन जाहिरातींमुळे हे पेज मोबाईलवर वाचणे अशक्य होत आहे. नुसता लेख पेजवर दिसेल व वाचता येईल असा पेज फॅार्मॅट बनवल्यास काही प्रमाणात ही अडचण दुर होईल.