Thursday, April 28, 2022

फैय्याज यांच्याशी पुलंविषयी बातचित - सुधीर गाडगीळ

गाडगीळ : नमस्कार... या ठिकाणी फैय्याजजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आजचा कार्यक्रम होतोय, याचा मला मनापासून आनंद होत आहे. सोलापूरकरांना कदाचित कल्पना नसेल मुळातल्या सोलापूरच्या असलेल्या फैय्याजजी प्रथमच आपला वाढदिवस सोलापुरात साजरा करताहेत, ही आज जास्त आनंदाची गोष्ट आहे. कलावंताचं वय सांगायचं नसतं, पण त्या खूप बिनधास्त आहेत, म्हणून हे कळण्याकरता त्यांचं वय कळावे. ७१ फक्त पूर्ण करतायत. फैय्याजजी, पहिलं नाटक तुम्ही पुलंचं केलं ना? या सगळ्या करिअरला आरंभ होताना ते कुठे आणि कोणतं?

फैय्याज : आता तुम्ही म्हणालात की मी १९६५ साली सोलापूर सोडलं. मुंबईला गेल्यानंतरचा हा सोलापूरचा पहिला वाढदिवस. म्हणजे मला मुंबईला जाऊन ५३ वं वर्ष चालू आहे. त्या काळामध्ये आधी सोलापुरात असताना मी लहानपणी कलापथकानं, मेळ्यातनं काम करत होते. जय हनुमान, जय बजरंग, श्रद्धानंद, मास्तर हसन याचं जे कलापथक होतं. म्हणजे मेळ्यांमध्ये मी गायची, काम करायची, डान्स करायची. नैतुद्दीन नावाचे माझे नातेवाईक होते. राम साठे म्हणून एक अधिकारी रेल्वेत काम करणारे गृहस्थ होते. त्यांनी सांगितलं 'छोटासा रोल आहे ढुल्ले आहे तुजणशी मधलां तो कर.' म्हटलं आधी मी पुस्तक वाचते. मी पुस्तक वाचले. त्याच्यात त्यांनी मला सांगितलं तुला मिसेस नाडकर्णीची भूमिका करायचीय. मिसेस नाडकणींचं “अय्या 555! वंडरफुलचं की ही!' असं त्यामध्ये आहे. विशाल महिला मंडळामध्ये मी त्यावेळेला काम केलं होतं. रेल्वेतली सगळी माणसं खूप आनंदानं काम करणारी. मी खूप कौतुकानं सांगते. निरंजन गोकर्ण, डॉ. रांगणेकर, उत्तम कसबे, जगन्नाथ ड्रायव्हस्चे काम करणारे बाबूराव कसबे, ह्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये मी पहिल्यांदा तुज्ञे आहे तुजपाशी मध्ये काम केलं. त्या नाटकामध्ये नंतर एकदोन प्रयोगात मी मिसेस नाडकर्णी केली आणि नंतर मी गीता म्हणून उभी राहिले, मुख्य भूमिकेत. गीताचा रोल करताना माझ्याबरोबर शामचं काम आजचे सोलापूरचे प्रख्यात, प्रथितयश दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शामचं काम केलं होतं... (टाळ्या)

गाडगीळ : आपण 'विदुषक' आणि पुलंकडे जाणारच आहोत. जब्बारमधून बाहेर काढतो तुम्हाला आणि पुढे विचारतो. पुलंची आणि तुमची पहिली भेट कुठे नि कशी झाली?

फैय्याज : खरे म्हणजे ती माझ्या लहानपणीच झालेली आहे. तेव्हा पुलं सोलापुरात डॉ. दिवाडकरांच्याकडे यायचे.

गाडगीळ : दिवाडकर म्हणजे पहिली सासरवाडी

फैय्याज :- होय. भागवत चित्र मंदिरात ते एकपात्री प्रयोग करायचे. त्यावेळेला सकाळी ९.३० चा प्रयोग असायचा. डॉ. दिवाडकर आमचे फॅमिली डॉक्टर. आम्ही दिवाडकरांकडे जात असू. तिथे मी पहिल्यांदा पुलंना पाहिले व्यक्‍ती म्हणून. एकदिवसमी डॉक्टरांना म्हणाले ''डॉक्टर, मला त्यांचा कार्यक्रम ऐकायचाय.'' डॉ. दिवाडकरांचा मुलगा माझा क्लासमेट. त्यांची मुलगी निशा (आताची निशा पाटील) त्यावेळेला डान्स शिकत होती. डान्सची प्रेरणा मला निशापासून मिळाली. माझ्या शेजारी मीना किरपेकर राहायची. मीना गाणं शिकायची. रोज तिच्या तानपुऱ्याचे स्वर कानी पडायचे. तेव्हा मलाही असं वाटलं आपणही गाणं शिकावे. या सगळ्यांमुळं माझ्या मनामध्ये गाणं, डान्स आदींविषयी आवड निर्माण झाली.

गाडगीळ : दिवाडकरांकडे येत असतानाच पुलंना पाहिलं की पुलंची एखादी कलाकृती पाहिली.

फैय्याज : नाही, मी डॉक्टरांकडे गेळे आणि मग त्यांनी मला पुलंचा प्रयोग पाहायला नेलं.

गाडगीळ : कुठे?

फैय्याज : भागवत चित्रमंदिरात. त्यावेळी बटाट्याची चाळ'चा प्रयोग होता, एवढ्या मोठ्या सभागृहात लोक कान टवकारून, डोळे वटारूनऐकताहेत, पाहताहेत, हे मी त्यावेळेला अनुभवलं त्यावेळेला मी लहान होते. त्यामुळं मला त्यातलं काही कळत नव्हतं. पण हे गृहस्थ म्हणजे एक अजब रसायनच आहेत, हे मला जाणवलं होतं. मी घरी निघून आले. त्याच्यानंतर माझी पुलंशी जी भेट झाली ती थेट मुंबई येथे.

गाडगीळ : बरं... ती कुठे आणि कशी?

फैय्याज : त्यावेळेला पुलं देशपांडे हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. मी त्यावेळी पेंढारकरांच्या 'जय जय गौरीशंकर'मध्ये काम करत होते. शिवाय नाट्य संपदेच्या म्हणजे मोहन वाघांच्या (मोहन वाघ आणि पणशीकर एकत्र होते.) नाटकातही मी काम करत होते. त्यावेळेला असं होतं की आपला एखादा कलावंत दुसरीकडे काम करायला जातो, हेच मुळी आवडायचं नाही. मी पेंढारकरांकडे काम करतेय म्हणजे काय! मोहन वाघ रोज साहित्य संघात पुलंकडे जाऊन पुलंचे डोकं खायचे. “आहो भाई, हे बघा ना, आमचे तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे. ती पेंढारकरांच्या नाटकात काम करते. आमचाही प्रयोग त्याच तारखेला आहे. तेव्हा काय करायचं?' रोज ऐकून, ऐकून भाईंनी एकदा विचारलं, “काय रे मोहन ही कोण फैय्याज? या फैय्याजविषयी तू मला रोज येऊन त्रास देतोस.' असं म्हटल्यानंतर, त्यांनी सांगितलं. “आहे एक मुलगी सोलापूरहून आलीय. गाते, काम करते.' असं झालं. हा विषय तिथच राहिला. नंतर आले ते “कट्यार काळजात घुसली' प्रयोगाला.

गाडगीळ : बरे तुम्ही वसंतरावाबरोबर कट्यार करत असताना.

फैय्याज : वसंतरावांबरोबर मी एकदोन नाही तर ५०० प्रयोग केले. सोळा वर्ष. वसंतराव देशपांडेंचा सहवास आहे मला. म्हणजे मी मँहबोली बेटीच होती त्यांची. बसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे खूप जिवलग मित्र. देशपांडे आडनाव जरी होतं तरी तसे ते जिवश्‍च-कंठश्च मित्र होते. पुलं आमच्या प्रयोगाला- कट्यार पाहायला आले. आमचा “कट्यार काळजात घुसला'चा प्रयोग साडे सहा तास चालला. म्हणून तर अत्र्यांनी लिहिलं ना त्यावेळेला की, “"कट्यावर घड्याळात घुसली.' ही अशी संगीतमय कट्यार हजार वर्षांत क्वचितच काळजात घुसली असं ते म्हणाले. अन्ने साहेबांनी भाषण केलं, या कट्यारीची एक धार आहे कलावंतांची. दुसरी आहे पं. जितेंद्र अभिषेकींची, टोक आहे पुरुषोत्तम दारव्हेकरांचं, मूठ आहे पणशीकरांची, मॅन आहे रसिक प्रेक्षकांची... असं अण्णांनी भाषण केलं. माझ्या अंगावर काटा येतो. इतकं सुंदर भाषण केलंय म्हणून सांगते तुम्हाला. भरभरपूर कौतुक केलं. पण मग पुलं, वसंतराव आणि पणशीकरांनी निर्णय घेतला की, हे नाटक आपण थोडसं एडिट करूया. पण दारव्हेकरांच्या परवानगीने. त्यावेळेला दारव्हेकर नागपूरला ऑल इंडिया रेडिओला नोकरीला होते. आणि आज तुम्ही जी “कट्यार' बघताय ती भाईंनी एडिट केलीय; वसंतराव देशपांडेंनी एडिट केलेली आहे, हे आज मुद्दाम मला प्रेक्षकांना सांगायचं आहे.

गाडगीळ : मात्र हे पुलंनी संपादन केलंय- (हो) हो (म्हणजे साडेसहा तासांवरून साडेचार-पावणे पाच-पाच तासांवर आणावं लागलं हे नाटकं)

गाडगीळ : तुमचं नाटक पाहायला आल्यानंतर त्यावेळेला 'कट्यार'विषयी दाद आणि सूचना पुलंनी कशी केली?

फैय्याज : ते आमच्या प्रयोगाला आले. दुपारी ४ वाजता प्रयोग होता. आधल्या रात्री बेगम अख्तरांचं गाणं होतं. मी खूप भाग्यवान होते. कारण बेगमबाईंच्या बरोबर भाईंनी पेटी वाजवली. तबला वसंतराव देशपांडेंनी वाजवला आणि तानपुर्‍यावर मी होते. अर्थात मी लिंबू-टिंबू. हे सगळ बघतच मी मोठी झाले. केवढी मोठी व्यक्तिमत्त्वे माझ्या शेजारी आहेत! आणि दुसर्‍या दिवशी भाई 'कट्यार...'विषयी बोलले. म्हणाले, 'काल बेगमचे गाण मी ऐकलं त्याची प्रचिती आज फैय्याजचं गाणं ऐकून आली.' (टाळ्या)

गाडगीळ : क्या... बात है...

फैय्याज : मी आणि भाई काम करत गेलो. नंतरच्या काळात कट्यारच्या २०० व्या, ५०० व्या प्रयोगाला आले. त्या खूप आठवणी माझ्याकडे आहेत. प्रचंड म्हणजे प्रचंड आहेत. पण भाईंनी सांगितलं की काल रात्रीच मी बेगमबाईंचं गाण ऐकलं, ही मुलगी होती म्हणे तिथे. आणि आज हिची ठुमरी मी ऐकली. तर तिच्या गाण्याची प्रचिती मला आज आली.

गाडगीळ : त्या गाण्याची प्रचिती आम्हालाही याबी म्हणून... ती ठुमरी इथं... तिचा छोटा मुकडा इथं..

फैय्याज : लागी कलेजवा कट्यार... (ही ठुमरी गायली) बेगम अख्तरांची स्वर लावायची एक पद्धत होती. ते म्हणायचे की बघ त्या बाईंच्या गाण्यामध्ये काही तरी आहे, ती ईश्‍वराकडून घेऊन आली होती.

गाडगीळ : आता फैय्याजजींनी उल्लेख केला. त्याप्रमाणे वसंतराव देशपांडेशी मी अनेकदा गप्पा मारल्या. वसंतराव मला सांगायचे की, पुलं आणि मी एका घरातलेच असल्यासारखेच होतो इतकी आमची घट्ट मैत्री होती. एक दिवससुद्धा आम्हाला एकमेकांशी भेटल्याशिवाय चैन पडत नसे. फक्त मी गेलो की गप्पाष्टकं इतकी रंगतात की पुलंचं लेखन तसंच राहून जात असे. त्यामुळे सुनीताबाई शक्‍यतो, मी आलो की भाई झोपलाय, असे काय काय सांगायच्या. असं वसंतरावांनी त्यावेळी मला सांगितलं होतं. एक गंमत त्यांनी सांगितली होती की वसंतराव म्हणाले की मी त्यावेळेला एका डिफेन्स अकाऊंटस्‌मध्ये कामाला होतो. आणि पिल्याचा फोन यायचा (म्हणजे पुलंचा). वसंता, तुझ्या ऑफिसच्या जबळच शरद तळवलकर, राजा परांजपे वगैरे सगळ्यांचं शुटिंग आहे. सांगतो बरं का पिल्याचा फोन आला की माझा कोट काढून त्या खुर्चीला लावायचो. अशासाठी की ऑफिसमधल्या लोकांना वाटावं इथंच कुठंतरी गेलाय. सायकलवरनं टांग टाकून मी पलीकडच्या गोळीबार मैदानावरच्या मंगल स्टुडिओमध्ये जायचो तिथे हे सगळे मराठीतले अवलिया कलाकार जमलेले असायचे. तिथे एक सिनेमाचं चित्रण चाललं होतं. पिल्यामुळे मी त्याच्यात काम केलं आणि ६ आवाजात ते गाणं गाजलं. 'पेडगावचे शहाणे'मधलं. असो. मला एक सांगा पुलंच्या 'वटवट'मध्ये पहिल्यांदा तुम्ही काम केलंत प्रत्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कसं काय?

फैय्याज : ते साल होतं १९७१. मी 'तो मी नव्हेच!' मध्ये काम करत होते. तेव्हा पण मी चन्नक्का करत होते तेव्हा. एकंदरीतच मी 'तो मी नव्हेच!'चे हजार प्रयोग केले. त्या हजार प्रयोगांमध्ये दोन अडीचशे मी चन्नक्का केली. पुढचे सातशे साडेसातशे सुनदा केली भाईंच्या बटाट्याची चाळ'चा प्रयोग बालगंधर्वला होता. आणि आमचा तो सेट म्हणजे सबंध कोर्ट सीन असायचा. पणशीकर त्या पिंजऱ्यामध्ये जी साक्ष असेल ती इकडच्या पिंजर्‍यामध्ये, मध्ये सगळे बसलेले बकील वगैरे. बर जज बसलेला असायचा. माझी एंट्री झाली. नंतर जेव्हा 'वटवट'मध्ये माझं सिलेक्शन झालं, तेव्हा मला सुनीताबाईंनी सांगितलं. “तुला माहितंय का? भाईंनी तो चन्नाक्काचा सीन पाहिला आणि आम्ही ठरवलं, अरे, ही मुलगी गुणी आहे. हिला आपण आपल्या कुठल्या तरी एका प्रॉडक्शनमध्ये घेऊया आणि तुला घ्यायचं ठरवलं. मध्ये मी तीन-चार गाणी, भाईंबरोबर एक ड्यूएट लावणी. एक नाट्यसंगीत, तीन-चार सीन. ते आकाशवाणीवर्चे डिरेक्टर आणि तो एक परिसंवाद असतो. तर तिथं मी बोलणार आहे. तो कुठला परिसंवाद तर “कुटुंबनियोजन... मी इतकी हसायची की मला हसू आवरता यायचं नाही. माझं पोट दुखायचं. पण भाईंकडून हे शिकले की आपण लोकांना हसवायचं असतं. आपण नाही हसायचं... भाई यत्किंचितही हसायचे नाहीत. पण मला सवय नव्हती ना. विनोदी नाटकात मी कधीच काम केलं नव्हतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी मला भाईंकडून शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये एक वाक्‍य होतं की 'अहो, काय बळीभद्रे मॅडम... तुम्ही म्हणे रोज बोलत म्हणे...अहो रोज कुटुंबनियोजन करून करून मला बाई आता कंटाळा आला.' (हशा) अशा त्या बळीभद्रे बाई. मला ना भयंकर हसायला यायचं. पण त्यांची भीती पण असायची, एवढं मोठं व्यक्तिमत्त्व आपल्या शेजारी काम करतंय...

गाडगीळ : प्रॅक्टीस कुठं व्हायची ती?

फैय्याज : पहिले काही दिवस तालीम झाली ती भुलाभाई देसाई रोडला मुंबईत आणि नंतर जे जुनं रवींद्र होतं तिथे प्रभादेवीला. तिथे आमच्या तालमी झाल्या. बघा, ही माणसं का मोठी होती हे त्यावेळेला कळलं. भाई बासरी-ढोलकी - भाई पेटी वाजवायचे. भाईंचं लिखाण, भाईंचं संगीत-दिग्दर्शन... म्हणजे सबकुछ पुलं म्हणजे पुलं आणि सुनीताबाई. ही मंडळी खूप प्रामाणिक होती. पहिल्या दिवशीच मला कल्पना दिली, 'फैयाज, आम्ही कुठल्याही पात्राचं नाव अँडव्हरटाईजमध्ये देत नाही. फक्त पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानचे कलावंत असं देतो. आम्ही अनाऊंसमेंट करू अंक सुरू व्हायच्या अगोदर, पण पेपरमध्ये वर्तमानपत्रात कुणाचंही नाव नाही. पु. ल. देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित “बटबट वटबट' प्रमुख भूमिका सुद्धा नाही.' मला सांगितलं होतं, तुला दीडशे रुपये नाईट देऊ. इतके प्रामाणिक. मी पणशीकरांना विचारलं, मी काय करू? त्यावेळेला माझे “विच्छा माझी पुरी करा', “अश्रूंची झाली फुले', “तो मी नव्हेच', कट्यार काळजात घुसली' आदी चालू होतं. म्हटल, मी काय करू? पणशीकर म्हणाले, 'सोड ही सगळी नाटकं. एक कट्यार कर आणि भाईंच्या बरोबर काम कर.'

गाडगीळ : वटवट करणं...

फैयाज : आणि मी 'बटवट'मध्ये काम केलं. न भूतो न भविष्यती असा एका वेगळा अनुभव म्हणजे, वसंतरावांबरोबर काम करताना भाईंबरोबर्चा वेगळा त्यांचा असा क्रीम ऑडियन्स असायचा- मध्यमवर्गीय, पांढरपेशा. म्हणजे फारच क्रीम हो.

गाडगीळ : मला एक सांगा, की पुलं नाटक बसवून घेत असताना ते करून दाखवत की फक्त उच्चारण करत आणि तुम्हाला करायला सांगत.

फैय्याज : ते स्वतः करून दाखवायचे. हाच तर त्यांचा दिग्दर्शनाचा भाग होता. ते खूप सुंदर शिकवायचे. माझ्या मनात खूप इच्छा आहे की “वटबट' कुणी तरी करावं किंबा मी स्वतः करावं. पण भाईंची भूमिका करणारा मला कुणीच दिसत नाही. बासरी कोण वाजवणार? ढोलकी कोण वाजवणार? पेटी बाजबायला मिळेल, पण गाणार कोण? पुलंचं काम करणार कोण?

गाडगीळ : आता ज्या “बटवट'मुळे टाळी आली. त्या 'बटवट'मधल्या सात-आठ गाण्यांपैकी एक गाणं तरी पुलंनी कसं शिकवलं? आणि तुम्ही कसं पाठ केलं ते सांगा.

फैय्याज : एक ड्युएट घेऊयात. द्वंद्वगीत जे भाईंबरोबर शिकले.

गाडगीळ : इथे दोन्ही आवाजात तुम्हीच म्हणणार ना.

फैय्याज : हो... हो. द्वंद्वगीत - मी मागीन ते सांगीन ते सांग देणार का?

गाडगीळ : फैयाजताई याच काळामध्ये तुम्ही ऋषीकेश मुखर्जींच्या बरोबर काम करत असल्यामुळे मुखर्जी हे अनेकांना घेऊन प्रयोग पाहायला येत असत ना... त्यांच्यात आणि पुलं-सुनीताबाईंचा संवाद व्हायचा का? पुलं आणि सुनीताबाईंच्या काही अटी असायचा का?

फैय्याज : नाही हो, हे जे दाम्पत्य होतं ना, अतिशय शिस्तीने वागणारं होतं. कधी-कधी असं वाटायचं, काय बाई तरी...पण नाही, आता वाटतं की शिस्त हवीच. प्रत्येक कलावंतामध्ये एक रंगभूमीची म्हणून एक शिस्त असते. ती शिस्त या दोघांमध्ये होती. ते मी बर्‍याचदा अनुभवलंय. “वटवट' बघायला त्यावेळेला सलील चौधरी (संगीतकार), हेमंतकुमारांना आणलं, ऋषीदांनी आणल ही सगळी बंगाली माणसं आपलं आपलं सगळ जपून असतात बर का! फक्त मराठी माणूसच जपत नाही. एकमेकांचे पाय ओढण्यात आपण धन्यता मानतो.

गाडगीळ : मराठी माणसांमध्ये एक गोष्ट कॉमन पक्की आहे. दुसर्‍याच्या निगेटिव्ह गोष्टींवर चर्चा करण्यात आपण पॉझिटिव्ह वेळ खूप घालवतो. (हशा)

फैय्याज : आता बघा ना... पंजाबी लोकसुद्धा त्यांचं कपूर, खन्ना, अमुकतमुक सगळं, आपलं धरून असतात. बंगाली लोकसुद्धा मुखर्जी काय मुख्योपाध्याय काय, कुणाल सेन काय. तुम्हाला सांगते कारण त्यावेळेला सगळ्या बंगाली लोकांना घेऊन यायचे. कौतुक एवढ्यासाठी आहे मला भाईंचं. या काळात ते “बटवट'च्या अगोदर कलकत्त्याला जाऊन तीन महिने राहिले होते. शांतीनिकेतनमध्ये ते बंगाली शिकायला राहिले. कारण रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य आपल्याला समजावं, वाचल्यानंतर कळावं, हा ध्यास त्या वयामध्येसुद्धा पुलंना होता.

गाडगीळ : कमाल! तुमच्याकडे नाटक पाहायला आलेली ही जी कलावंत मंडळी होती, त्यांना पुलंना बंगाली येतं, हे कळलं होतं का?

फैय्याज : माहीत होतं त्यांना. कौतुक होतं त्यांना की भाई कलकत्त्याला जाऊन बंगाली शिकून आले. म्हणून तर एवढ्या लोकांना घेऊन यायचे ऋषिदा.

गाडगीळ : काय प्रतिक्रिया होती सलीलदांची. प्रत्येकाच्या सांगा.

फैय्याज : जया भादुरी आणि अमिताभचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा. ऋषिदा आले आणि त्यांनी सांगितलं की पुलंना... 'आमिताब बच्चन और जया को ये दिखाना चाहता है हम...' चाहती है, चाहता है हा त्यांना स्त्रीलिंगी -पुल्लिंगीचा बंगालींना प्रॉब्लेम असतो बरं का! तर पुलंनी उत्तर द्यायच्या आत सुनीताबाई म्हणाल्या, 'काही हरकत नाही आणायला, पण अमिताभ बच्चनला मोठी गाडी घेऊन येऊ नको म्हणून सांग बाबा. कारण आमच्या शिवाजी मंदिरला पार्किंगला तेवढी जागा नाहीए. पण त्यांनी छोट्या गाडीत यावं. आणि तिसरी बेल व्हायच्या अगोदर स्थानापन्न व्हावं पहिल्या रांगेत. कारण एकदा आमचा पडदा उचलला गेला. भाईंची एंट्री झाली आणि जर का... अमिताभ आणि जया आले तर सगळं लक्ष त्यांच्यावर केंद्रीत होणार आणि भाई डिस्टर्ब होणार.' पण बिचारे अमिताभ बच्चन आणि जया तिसऱ्या बेलच्या अगोदर येऊन बसले हो तिसर्‍या रांगेत! आख्खं नाटक त्यांनी पाहिले. कौतुक केलं. आतमध्ये आले भेटले सगळ्यांना.

गाडगीळ : मला एक सांगा 'वटवट'मध्ये ७,८ पदं आहेत, त्यात एक लावणीदेखील आहे, कुठली?

फैय्याज : मेला म्हातारा' ही लावणी हृषीदांना फार आवडायची. ते म्हणाले की 'ओ आमको पशंद है बो लावनी' त्यांनी मदन-मोहनला आणलं एक दिवस. मदन-मोहनला सांगितलं की तुला शब्द बांधून देईन, पण या लावणीच्या चाळीचे गाण बावर्चीमध्ये घालायचं ठरलं.

फैय्याज : ते स्वतः याच्यात म्हातारा बनून यायचे काठी घेऊन. भाईंचं बोलणं म्हणजे खूप छान. त्याकाळी माणिकबाई दिसायला सुंदर होत्या. पुलं, वसंतराव देशपांडे आदींना माणिकबाईंविषयी जरा जास्त आपुलकी होती. वेगळ्या अर्थानं नाही, पण आपुलकी होती. त्याकाळात वयोमानापरत्वे असेल. जेव्हा अमर वर्मांशी बाईंचे लग्न झाले, त्या दिवशी भाईंनी एक सांगितलं, अमरने बाईशी लग्न केलं आणि आमच्या सगळ्यांच्या वर्मावर म्हणे घाला घातला.

गाडगीळ : मला एक सांगा फैय्याजजी की. तुमच्या गद्य आवाजाबद्लसुद्धा ते काही बोलले होते ना. काय म्हणाले होते?

फैय्याज : खरं म्हणजे मागे एकदा तुम्ही हा प्रश्‍न मला विचारला होता की, तुम्ही सिनेमात बरीच गाणी गायलीत. तर तुम्ही त्यात- प्लेबॅक सिंगींगमध्ये - करिअर का नाही केले? तर त्यावेळेला मी तुम्हाला उत्तर दिलं होतं की, आवाजाच्या काही जाती आहेत. तर माझी जी आवाजाची जात आहे. मला न्यूनगंड होता. त्यामुळे मी गाऊ शकत नाही. सिनेमात हिरॉईनच्या तोंडी माझं गाणं नाही. त्यामुळे लोकप्रिय होत नाही. असा माझ्यामध्ये एक कॉम्प्लेक्स आला होता. वाईट वाटायचं मला. ड्यूएट गातानासुद्धा भाईंना थोडा त्रासच झाला. पण तेच संगीत-दिग्दर्शक असल्याने ते त्यांनी सगळं बरोबर अरेंज केलं. बर्‍याच ठिकाणी मला त्रास व्हायचा गाताना, पट्टी सांगावी लागायची. कधी पांढरी सात, काळी ५ सुद्धा. वसंतराव म्हणाले, “अरे... या पोरीच ना... दीड सप्तकी आवाज आहे. त्यांनी सांगितलं पुलंना.. दीड सप्तकी आवाज आहे. पुलं म्हणाले, “अरे वसंता, जगातले, सगळ्यात बेस्ट क्वॉलिटीचे जे आवाज आहेत ते बेसमधले आहेत. ती क्वॉलिटी आहे. माझी समजूत घातली. दोघांनी समूपदेशन केलं माझं. पण नाही ना. माझा आवाज चढा नाहीए, त्याला मी काय करू? मग वसंतराव म्हणाले, “अग, फैय्याज खाँ साहेबांचे दीड सप्तकी तर आहे.'' पण त्या एक सप्तकामध्ये सुद्धा काय नखरा, काय गाणं होतं. माझी खूप समजूत घातली. म्हणून मी सिनेक्षेत्रात, पार्श्वगायनामध्ये फार गेले नाही. ज्याला एक उत्तम बॅकग्राऊंडचं गाणं लागतं. गाण्याला एक सिच्युएशन अशी असते की, हिरोईन गाणार नाही, पण बॅकग्राऊंडला गाणं वाजतं. मग अशी गाणी माझ्याकडून जयदेवजींनी गाऊन घेतली. आर. डी. बर्मननी माझ्याकडून गाऊन घेतलं. माझ्याकडून वसंत देसाईंनी, सी. रामचंद्र यांनी गाऊन घेतलं.

गाडगीळ : या सगळ्या गाण्यांच्या प्रकारामध्ये तुमचा स्वतःचा व्यक्‍तिगत रस आणि पुलं आणि वसंतरावांनी या तुमच्या निकट असलेल्या, पुलंचाही रस गझल, ठुमरी यामध्ये मुख्यत्वे होता.

फैय्याज: नाही मला, लहानपणापासूनच उत्तर हिंदुस्थानी गायकीमध्ये रस होता.

गाडगीळ : अहो, त्या तिघांबरोबर तुम्हाला काम करता आलं. त्या त्या बिंदूला पुढे केवढं महत्त्व आलं.

फैय्याज : या तिघांच्या सहवासात मला काम करता आलं, खूप काही शिकता आलं, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. वसंतरावांबरोबर १६ वर्षे काम केलं. त्यानंतर बेगम अख्तर यांच्या सहवासात राहिले. बेगम अख्तरांनी मला गंडा बांध म्हणून सांगितलं होतं. हे मी अनेकदा सोलापूरकरांच्या समोर बोलून झालंय, की मला बोलावलं होतं लखनौला. “हमारा गंडा बनवाओ, हमारी बेटी बनके, हमारे साथ लखनौ मे रहो' पण नाही जाणं झालं मला.

गाडगीळ : पुलंना आवडलेली ठुमरी आणि तुमची गझल.

फैय्याज : बोलण्यासारखं सांगण्यासारखं खूप आहे. जेव्हा पुलं आजारी होते, त्याही अवस्थेमध्ये ते शुद्धीवर यायचे तेव्हा बऱ्याचदा असं व्हायचं की थोडं विस्मरणात जायचे थोडं परत बोलायचे. मला म्हणाले की. 'अग. एक बेगमची गझल गाऊन दाखव' आता म्हणायला तर पाहिजे. पण माझी अशी तयारी नव्हती. कारण तब्बेत बरी नाहीये. पण मी म्हटलं ते गाणं. त्यावेळी सुनीताबाई, त्यांचे भाऊ सुभाष ठाकूर तेथे होते. म्हंटल मी.. गाणं- हर है मंझील... राहे मुश्किल. आलाम है. तन्हाई आलम है तन्हाईका... लगेच भाई म्हणाले, “बघ बेगमच्या गाण्यामध्ये सरगम नाही, ताना नाहीत, फार फिरक्या नाहीत. पण तिचं गाण म्हणे हृदयातलं आहे.

गाडगीळ : व्वा...

फैय्याज : जी दर्द आहे, ती भरून आली. आवाज म्हणजे लोणी आहे ग लोणी! हे शब्द आहेत बरं का भाईंचे.

गाडगीळ : फैय्याजजी, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की, मला वाटतं भैरबीसुद्धा तुम्हाला पुलंनी शिकवलेली आहे ना?

फैय्याज : अशोक रानडे काय किंवा पुलं काय हे दोघेही ग्रेटच होते. भाईंनी माझं कौन्सलिंग तर आवाजासाठी केलंच केलं. पण मला अनेकवेळा सल्ला दिला. ते मला म्हणायचे, “फय्याज, आज तुझी परिस्थिती अशी आहे, की तू गाण्यांचा एक मंच उभा कर, नवीन गाणी घे, त्याला चाली लाव आणि नवीन लोकांकडून गाऊन तू एक तुझा ग्रूप फॅर्म कर. तुझ्याकडे बेगम साहेबांचं गाणं आहे २-४ ठुमर्‍या, एक ७-८ गझला असा एक कार्यक्रम तू बसव आणि ते आम्ही सादर करू. आम्ही आमंत्रण देऊ थेटर आमचं असेल आणि पब्लिसिटी आम्ही करू. उर्टूचे सरदार अली जाफरींना आपण बोलवूया, महंमद एहमद खान साब जे होते बेगम साहेबांच्या बरोबर, तसा वाजवणारा पाहिजे. बेगम अख्तर स्वत: वाजवून गायच्या ना. हा त्यांचा प्लस पॉईंट होता. त्या स्वत: बाज्या वाजवायच्या.''

(जन्मशताब्दी पुलोत्सव, सोलापूर, दि. ५ जानेवारी २०१९ रोजी सुधीर गाडगीळ यांनी अभिनेत्री फैय्याज यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा संपादित अंश.)

शब्दांकन : पत्रकार संतोष पवार
असा असामी पुलं 

0 प्रतिक्रिया: