Tuesday, September 20, 2011

पुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे

पुलंच्या एका सत्कार समारंभानंतर अत्र्यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनीकात पु.लंवर हा लेख लिहिला होता

मराठीतील ख्यातनाम विनोदी लेखक, महान संगीतकार, उत्तम दिग्दर्शक, कुशल नट आणि आमचे परममित्र श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची ४७ व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड झाली, म्हणून परवा विलेपार्ले येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबईतील अनेक सत्कारसमारंभ आम्ही पाहिले आहेत आणि स्वत: आम्हालाही अनेक वेळा या सत्कारांना ’तोंड’ द्यावे लागले आहे, परंतु काल ’पु.ल.’ यांचा आम्ही जो सत्कार पाहिला तो अक्षरश: अविस्मरणीय होता. त्याची भव्यता, त्याची गोडी दीर्घकाळ मनात रेंगाळत राहणारी! जनतेचे पु.ल. यांच्यावर किती अमाप प्रेम आहे. नि मराठी माणसाला राजकारणाप्रमाणेच नाट्याविषयीही किती ’रस’ आहे त्याची ’पोचपावती’ काल पु.ल. यांच्या सत्काराला दहा हजारांच्यावर प्रचंड संख्येने गर्दी करुन जनतेने दिली आहे. हा सत्कार जर ’शिवतीर्था’वर झाला असता तर सारे ’शिवतीर्थ’ वाहून गेले असते! आम्ही स्वत: पु.ल. यांच्या विनोदावर, पु.लं.च्या नाट्यकृतीवर नि विशेषत: संगीतावर बेहद्द खूष आहोत! महाराष्ट्रात एवढा बहुगुणी आणि निर्मळ वृत्तीचा माणूस आज तरी आम्हाला दिसत नही! परवा हा जो पु.ल. यांचा भव्य सत्कार झाला त्या सोहळ्याला अध्यक्षस्थानी आम्ही स्वत: होतो. आम्ही अध्यक्ष होतो म्हणून पां. वा. गाडगिळांनी पाठविलेल्या संदेशात मोठ्या आपुललीने पु.ल. यांच्याबरोबर आमचाही गौरव केला. परंतु पु.ल. यांच्या सत्काराला आम्ही अध्यक्ष होतो ह्याचा पु.ल. पेक्षा आम्हालाच खरोखरी आनंद वाटला.
महाराष्ट्रात मराठी भाषेची, मराठी कलेची, मराठी नाट्याची ज्यांनी ज्यांनी मान उंचावली त्या प्रत्येकाचा मुक्तकंठाने गोरव करण्यात आम्ही धन्यता मानली आहे आणि पु,ल. चा आणि आमचा संबंध तर कितीतरी वर्षापूर्वीचा आहे. आमच्या एका किर्तनाला पु.लं. नी मागे टाळांची साथ देऊन तुकोबांचा एक अभंग रसाळपणे म्हटल्याचे आम्हांला आठवते. तेथपासून आम्ही पु.लं.च्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करीत आलो आहोत. ही व्यक्ती एवढी बहुरंगी आहे की, त्यांना काय येत नाही हाच मोठा प्रश्न आहे. त्यांच्या विनोदाचा वारसा त्यांना आजीकडून मिळाला असल्याचे ते सांगतात. ती गोष्टही मोठी गंमतशीर आहे. त्यांच्या आजीकडे त्यांचे मामा काही मंडळी घेऊन येत. ती बहुधा पेहेलवान असत. एकदा त्यांचे मामा आजीला म्हणाले की, ’आजी ही माणसे पेहेलवान आहेत बरं का.’ तेव्हा आजी म्हणाली, "असं का, बरं झालं, मघापासून कोळशाचं पोतं घरात आणायला मी माणूस पाहातच होते!" पु.ल.. यांचा आजचा विनोद , आजची व्याख्याने आणि सर्व लेखन वरवर पाहिले . तरीही त्यांच्या आजीच्या या धर्तीच्या उपजत विनोदावरच ते सारे पोसले आहे हे अगदी खरे आहे. ’तुझे आहे तुझपाशी’ हे नाटक तसेच खोगीरभरती. नस्ती उठाठेच, गोळाबेरीज हे कथासंग्रह. अपूर्वाई, पूर्वरंग ही प्रवासवर्णने आणि ’पुढारी पाहिजे’ या लोकनाट्यातील उपहासगर्भ विनोद यामागेही हीच वृत्ती आहे.

पु.ल. यांचा विनोद अत्यंत निर्मळ आहे. आयुष्यात त्यांनी वावगे काही लिहिले नाही. विनोदी लेखकांविषयी समाजात पुष्कळ गैरसमज असतात. विनोद ही अत्यंत अवघड गोष्ट आहे हे आम्ही अनुभवावरुन सांगतो. विनोद करणारा माणूस समाजातील ज्या व्यंगावर विनोद करतो त्याचा त्याने सूक्ष्मपणे अभ्यास केलेला असावा लागतो. जीवनातील विसंगती हुडकताना त्याला सुसंगतीचा साक्षात्कार झालेला असतो. सर्कशीतील विदूषक वरुन जरी बावळट दिसला , तरी सर्व ’क्रिडापटूंची’ कला त्याला अवगत अस्ते, ह्याची कितीकांना कल्पना असते? विनोदकरांचे असेच आहे. पु.लं.चा विनोद हा विनोदाचा एक स्वतंत्र प्रकार आहे आणि नाट्यातील त्यांचा विनोद तर खरोखरीच अतिशय आल्हादकारक आहे. ’तुझे आहे तुजपाशी’ मधे ’सुत’ कातणार्‍या श्यामला काकाजी म्हणतो, ’ज्या वयात सुत जमवायचे त्या वयात सुत काय काततोस?’ हा विबोद किती श्रेष्ठ दर्जाचा आहे! या विनोदात केवळ शाब्दिक कोटी नाही. जीवनातले एक तत्वज्ञान त्यात सामवलेले आहे. नाट्य आणि राजकारण ह्यांचे बाळकडू मराठी माणसाला मिळाले आहे. म्हणून मराठी माणसाच्या जीवनात संघर्ष व नाट्य आहे. हे नाट्य आणि जीवनातील संघर्ष पु.लं.नी बरोबर ओळखला आहे. म्हणूनच पु.ल. यशस्वी नाटककार झाले आहेत.

एक गोष्ट सांगतो, पु.लं.च्या नाटकातील तंत्राविषयी आनचा थोडा मतभेद आहे. पु.लं.च्या नाटकात काही वेळा हास्य व अश्रू यांची गल्लत होण्याचा संभव वाटतो. पु.ल. यांचा प्रयत्न नि:संशय मोठा आहे. एकाच वेळी हसू ओठावरून रुंदावत असताना क्षणात डोळ्यांतुन पाणी काढणे हे असामान्य सामर्थ्य आहे नी:संशय. पु.ल. तसाच प्रयत्न करीत आहेत. अर्थात अवघड प्रयत्न आहे हा. आणखी एक गोष्ट सांगतो. पु.लं.च्या विनोदामध्ये पुषकळ वेळा ते पटकन आत्मलक्षी बनतात. ह्याचे कारण त्यांची मूळची वृत्ती भावुक असेल हे खरे, परंतु यामुळे विषयाचा रसभंग होण्याची शक्यता असते. पण हे आमचे किरकोळ मतभेद आहेत. पु.ल. यांच्या गौरवाला, श्रेष्ठपणाला आणि समर्थ लेखणीला त्यामुळे जराही उणेपणा येत नाही. कारण पु.ल. चे लेखन मग ते नाट्य असो, कथा असो की प्रवासवर्णने असोत-- इतकं सिद्धहस्त आहे की, एक दोन मतभेदांतून त्याला कधीही कमीपणा येणार नाही.

पु.ल. यांच्या नाट्याचे आणि साहित्याचे समीक्षण करण्याची ही जागा नाही नि वेळही नाही. पु.लं.चे फक्त कौतुक करायची वेळ आहे. ते सिद्धहस्त आहेत. नाट्य-कलेबाबत बोलावयाचं तर फक्त आम्ही एवढंच म्हणू की, ’तुझे आहे तुजपाशी’ हे एकच नाटक पु.लं.नी जरी लिहिले असते तरी आम्ही त्यांना ’नाटककार’ गौरवैले असते. ह्या एकाच नाटकाने ते अमर झाले आहेत. आमच्या परवांच्या भाषणात पु.लं.च्या गौरवासंबंधी बोलताना आम्ही एक मुद्दा मांडला. आजपर्यंत अनेक वेळा आम्ही तो मुद्दा आहे. स्वत: आम्ही, पु.ल., विजय तेंडुलकर, बाल कोल्हटकर, वसंत कानेटकर इत्यादी नाटककार मराठी रंगभूमीवर तेजस्वी कामगिरी बजावत असताना नटश्रेष्ठ केशवराव दारे ’मराठी रंगभुमी १९३० नंतर संपली’ असे म्हणतात. याचे आम्हाला परमदु:ख होते. केशवरांनी या नाटकरांना, नविन नटांना आणि नटींना उत्तेजन द्यावयास हवे, आशीर्वाद द्यावयास हवा! आजची प्रगतीशील मराठी रंगभूमी नटवर्य दाते यांजकडून आशीर्वादाची अपेक्षा करीत आहे. प्रोत्साहनाच्या दोन शब्दांची अपेक्षा करीत आहे! आणि एवढेही सांगून केशवरांवाना मराठी रंगभूमीचे आजचे तेजस्वी रुप दिसले नाही तरी तिच्या यशाची पावती लक्षावधी जनतेकडून आज मिळत आहे. हे अमाप यश रंगभूमी मेल्याचे लक्षण आहे काय? परवा भाषणात पु.ल. देशपांडे म्हणाले की. नाट्याच्या प्रेमाने प्रेरीत होऊन मुंबईहुन ऑफीस सुटताच डेक्कन क्विनने पुण्याला जाऊन तीन वाजेपर्यंत तालमी उरकुन नि पहाटेच्या पॅसेंजरने परत मुंबईत कामावर येऊन मी हजर होतो. रंगभुमीचे उज्वल दिवस टिकवण्यासाठी धडपडणारी नवी नवी मंडळी काय ’मराठी रंगभूमी संपली’ म्हणून ही आटापिट करताहेत? पु.ल. यांच्या सत्काराच्या निमित्ताने आज पुन्हा ओघाने हे लिहिले .

मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पु.ल. यांच्या गळ्यात आज पडली आहे, ते काही फारसे गौरवाचे नाही. यापूर्वीच त्यांना तो मान मिळण्यास हवा होता. आणखी एकदोन वर्षात ते साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होतील आणि मराठी भाषेतील हा विद्वान पंडीत मराठीचा झेंडा आपल्या असामान्य , कोटीबाज विनोदाने नि खुसखुशीत शैलीने फडकत ठेवील यात काय शंका? आम्ही स्वत: गडकरी, कोल्हटकर, ठोमरे यांच्या पिढीत वाढलो आहोत आणि परवा आम्ही म्हटल्याप्रमाणे त्या प्रतिभासंपन्न आणि थोर लोकांच्या परंपरेतील एक प्रतिनीधी म्हणून आम्ही पु.ल. यांच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवीत आहोत! यापेक्षा आज ह्या क्षणी आम्ही अधिक लिहू शकत नाही. पु.लं.च्या असामान्य कर्तुत्वाने भारवलेल्या अवस्थेतच आम्ही पु.लं.च्या नव्या निवडीबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करुन सांगतो. पुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो!

आचार्य अत्रे
मराठा
११-१-१९६५

मुळ स्त्रोत -- http://anandghare.wordpress.com

4 प्रतिक्रिया:

Unknown said...

sundar, eka thor vyaktine titkyat takdichya ani pratebhechya dusrya vayaktibaddal kadhalele he udgar kharach manapasun ahet.

vachun anand zhala :)

साधक said...

’मराठी रंगभुमी १९३० नंतर संपली च्या ऐवजी आम्ही ती पुलं नंतर संपली असं म्हणू.

पु.ल. देशपांडे या माणसाने एवढे काही लिहून ठेवले आहे एवढ्या काही उपमा देऊन ठेवल्य आहेत. त्या चुकवून नवीन काही लिहिणे अवघड होवून बसते.

मराठी जालावर प्रतिक्रियांमध्ये/लेखांमध्ये ह्या माणसाचे लेखन डोकावते. पु.ल. द ग्रेट एवढंच म्हणेन.

kdchitnis said...

आचार्य अत्रे कौतुकाचे बोल लिहिताना कधी थकत नाहीत इतका त्यांचा मनमोकळा स्वभाव आहे आणि इथे त्यांनी पु लंचे कौतुक करताना काय, किती व कशा कशाचे कौतुक करावे या संभ्रमात पडून "हात" टेकले आहेत हे अत्र्यांच्या दिलदारपणाचे जसे लेणे आहे तसेच पु लंच्या चतुरसर पणाचेही! शूराचा पोवाडा शूरानेच गावा!

Anonymous said...

गुणी गाणं वृत्ती न निर्गुण:....
जीवनातल कटु सत्य केवळ घशाखाली उतरवण्यासाठी नव्हे तर ते पचवून ते सुसह्य कसे होईल हे पाहणे हा लोक कल्याणाचा मूलमंत्र असणारे हे सारस्वत.... त्यांनी जीवनाची खर्या अर्थाने उपासना केली व लोकांनाही त्यासाठी प्रेरणा दिली...