Monday, November 7, 2011

भाई....महाराष्ट्राचे!

१२ जून २०००....लंडनवरून पप्पांचा फोन होता.

"लाल्या, पुलं गेले?"

"हो", मी म्हणालो.

"अरेरे... अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही", पप्पा जड आवाजात म्हणाले.

"हो", मी.

"एक काम कर. आजचे सगळे मराठी पेपर घेऊन ठेव...मला भारतात आल्यावर सगळेच्या सगळे पाहिजेत."

पप्पांच्या सांगण्यानुसार मी बायकोला तिच्या ऑफिसात फोन केला. तिला येताना रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवरुन सगळे मराठी पेपर विकत घ्यायला सांगीतले. मुळची गुजराती असणार्‍या माझ्या बायकोला पुलं जास्त ठाऊक नसल्यामुळे ती जास्त काही बोलली नाही. संध्याकाळी अंधेरी स्टेशनला ती बुकस्टॉलला गेली.

"सगळे मराठी पेपर द्या", तिने तिथल्या माणसाला सांगितले.

डोळ्यांत पाणी आणून तो म्हणाला, "ताई, आपले पुलं गेले हो!"

हा वरचा प्रसंग माझी कल्पनाशक्ती नसून अगदी जे घडलं तेच आहे. माझ्या बायकोने कधीच कुणा पेपर विक्रेत्याला अश्या प्रकारे एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या निधनावर व्यथीत झालेले बघीतले नव्हते. घरी आल्यावर तिने मला झाला प्रकार सांगितला. तिला प्रश्न पडला होता कि एखादी व्यक्ती रस्त्यावरच्या सामान्य माणसाला इतकं प्रभावीत कशी करु शकेल? अंधेरी स्टेशनच्या पेपरबॉय पासून ते थेट लंडन मधल्या तीच्या सासर्‍यांना त्याच भावनेत गुंतवणार्‍या या माणसाबद्दल - पु.ल.देशपांडेंबद्दल तिला उत्सुकता लागली होती. त्या रात्री मी तीला पुलंची ओळख करून दिली....त्यांच्या पुस्तकातून!

त्या रात्री पुलं आम्हाला पुन्हा भेटले... नाथा कामत बनून, नंदा प्रधान बनून, नारायण बनून, सखाराम गटणे बनून, चितळे मास्तर बनून...आणि विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाने डोळे ओले होते, तरीही त्यांचे शब्द ओठांवर हसू आणत होते....

कधी कधी वाटतं, महाराष्ट्राला पु.लं यांनी बहाल केलेली सर्वात मोठी देणगी कोणती? साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट...सगळं काही त्यांना सिद्ध झालं होतं! पण खरं सांगू? पुलंनी आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे संस्कार! पुलंनी महाराष्ट्राला संस्कार दिले! एक प्रगल्भ विचारधारा दिली. शास्त्रीय संगीतात त्यांचा एवढा हातखंडा असून देखील, त्यांनी सामान्य माणसाला अवलोकन होईल अश्या प्रकारे संगीतावर प्रेम करायला शिकवलं.

"रविवारची सकाळ" बघताना, कामत मामा, कडवेकर आणि देसाई मास्तरांच्या मजेशीर शैलीत संगीताची एक अविस्मरणीय अशी मैफल दिली. अगदी सहजपणे! साठीच्या चाळीत श्रमजीवी मध्यमवर्गीय लोकांच्या गप्पा ऐकवत "उगीच का कांता"च्या एक-एक सुंदर जागा दाखवल्या! हसता हसता अचानक एखादी हरकत काळीज छेडून जाते....एखाद्या तानेवर "वा वा" म्हणता म्हणताच पोटात गुदगुल्या करत एखादा संवाद हास्य घेउन येतो!

"असा मी..." मधल्या जोश्यांच्या बेंबट्या बनून चाळीतून "ब्लॉक" मध्ये येणार्‍या सामान्य माणसाची कसरत बघून खरंच कुठेतरी आमच्या पिढीला आपलेच वडिल आठवतात हे खरं! मुंबईसारख्या शहरात १९६० च्या दशकात चाळीत राहणार्‍या प्रत्येक सामान्य मराठी माणसाची ती कथा होती. आजकालच्या मॉल संस्कृतीत वाढणार्‍या पिढीला बहुदा ही भावना कळणार नाही....पण तरीही पुलंचं साहित्य हे ह्याही पिढीला हसणं शिकवेल यात कसलीही शंका नाही.
पुलं आयुष्य भरभरून जगले...आणि त्यांनी सर्वांना भरभरून दिले...आपल्या संगीतातून, लिखाणातून, नाट्यातून.... अख्ख्या जगण्यातूनच! १२ जून २००० साली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली...पण त्यांचं "जगणं" अजून चालूच आहे....पु.लं एक चैतन्य होते....आहेत!

मी आधी म्हणालो तसं....पु.लं नावाचं हे चैतन्य, हा जगण्याचा झरा.... हा अव्याहत चालूच राहणार... नाथा कामत मधून, नंदा प्रधान मधून, चितळे मास्तरांमधून, सखाराम गटणे मधून, नारायण मधून, नामू परीट मधून, पानवाल्यामधून....ही एक कधीही न संपणारी अशी वरात आहे....जमीनीवरची...महाराष्ट्राच्या!

पु.लं....आपले भाई... हे नेहमी आपल्यामध्येच राहणार....संस्कार बनून!

- माधव आजगांवकर
facebook.com/madhav.ajgaonkar

1 प्रतिक्रिया:

Abhishek said...

"२००० साली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली", अगदीच विश्वास बसत नाही... इतके वर्ष झाली ह्या गोष्टीला! खरंच ते अजूनही आपल्यातच आहेत...