Monday, January 22, 2007

मुबंईने व्यापक दॄष्टी दिली -- पु.ल.

मुबंईने व्यापक दॄष्टी दिली माझा जन्म मुंबईत गावदेवीतल्या एका चाळीत झालेला असला तरी मी वाढलो पार्ल्यासारख्या मुंबईच्या उपनगरात. ह्या उपनगरी मुंबईने मला खुप काही दिले. मुख्यतः चाळीत दुर्लक्ष असलेली मोकळी हवा दिली. खेळायला मोकळी शेते दिली. पावसाळ्यात तिथे काकड्या पडवळ दोडक्यांचे मळे फुलायचे. गिरगावातच राहिलो असतो तर बैलांनी ओढलेले नांगर, बैलगाडी वर लादलेल्या काकड्यांच्या राशी पहायला मिळाल्या नसत्या. ट्रॅमवाली मुंबई आणि आमची उपनगरी मुंबई यात खुप फरक होता. आमच्या मुंबईवर ग्रामीण शिक्का होता. पावसाळ्यात पार्ल्यातल्या विहिरी तुडुंब भरायच्या आणि पारध्यांच्या, चित्र्यांच्या विहिरीवर पोहणाऱ्या पोरांचा दंगा सुरु व्हायचा. मुटका मारुन पाणी उडवून काठावरच्या पोरांना भिजविणे हा अत्यंत आवडता खेळ होता. हे सुख मुंबईच्या मुलांना नव्हतं. त्यांना चौपाटी होती, पण आम्हाला जुहूचा लांबलचक किनारा होता. स्टंपा, ब्याटी वगैरे गोष्टी परवडण्या सारख्या नव्हत्या. त्यामुळे खो खो, हुतुतू (याची त्याकाळी कबड्डी झाली नव्हती), आट्यापाट्या, विटीदांडू अशा बिनपैशाच्या खेळावर भर होता. हे देशी संस्कार घेऊन वाढत गेलेल्या मुलांपैकी आम्ही होतो. हाफपँट, बाहेर लोंबकळणारा शर्ट ही आम्हा सगळ्यांची वेशभूषा होती. इस्त्रीचे कपडे ही अनावश्यक गोष्ट वाटत होती. त्या मानाने मुंबईची पोरे फ्याशनेबल कोटबीट घालायची. त्यांच्या पोशाखाचा हेवा वाटत नव्हता असे नाही. पण स्वदेशीपणाचा अभिमान होता.

 महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या चळवळीचे विलेपार्ले हे मुख्य केंद्र होते. तिथे सत्याग्रहांची छावणी होती. आज त्याच जागेवर बिस्किट फॅक्टरी आहे.माझ्या विद्यार्थिदशेतला बहुतेक काळ हा मुंबईतच गेला. त्यावेळी सार्वजनिक क्षेत्रातल्या दिग्गजांची भाषणे ऐकण्याचे भाग्य लाभले. माझे जीवन समृद्ध करणाऱ्या त्या मुंबईचे आताचे रुप पाहतांना मनाला यातना होतात. ज्या मुंबईत जगन्नाथ शंकरशेट, फिरोज शहा मेहता, डॉ. भाउ दाजी लाड यांच्या सारख्या लोकाग्राणींनी जनजीवन सुखी व्हावं म्हणून आपलं आयुष्य वेचलं, त्या जुन्या मुंबईचा ताबा आता अफाट गर्दीने आणि सर्वच क्षेत्रांतल्या गुंडांनी घ्यावा हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.

अपूर्ण 
- महाराष्ट्र टाइम्स, 
रविवार २३ जुलै १९९३

1 प्रतिक्रिया:

Shaggy said...

Mast lekh aahe. Best of luck to you for blogging.