Tuesday, August 27, 2019

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती - निखिल रत्नपारखी

पु.ल.… कधीतरी तुमच्याशी खूप बोलायचं आहे. नाटक, सिनेमा सोडून चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलू या. तुम्ही सगळ्यांना हसवलंत. तुम्हाला कुणीतरी हसवायला नको का? म्हणून तरी भेटू या कधीतरी…
                                                       
मध्यंतरी एका व्यक्तीची आणि माझी भेट झाली. गप्पांच्या ओघात बोलता-बोलता तो म्हणाला, ‘पुलंचं लिखाण आता आऊटडेटेड वाटायला लागलंय नाही’? खरकन् माझा चेहरा उतरला. कानशीलं गरम झाली. तो पुढे काय म्हणतोय मला ऐकू येईनासं झालं. काहीतरी चमत्कार व्हावा ही धरणी दुभंगावी आणि या इसमाला धरणीमातेने आपल्या पोटात घ्यावं, असं मला वाटायला लागलं. त्याला म्हणावसं वाटलं. मित्रा जागीच तुझ्या अंगावर रॉकेल टाकून तुला जाळून टाकायला हवं. सरणावर जाळायची पद्धतही आता आऊटडेटेड झाली आहे. ही नवीन पद्धत तुला कशी वाटतीये सांग. पण पुलंचं एक वाक्य आठवलं. ‘काही लोकांची वागण्याची तऱ्हाच अशी असते की ज्यांच्या हातात मद्याचा पेला देखील खुलतो, पण काही लोकं दूध देखील ताडी पिल्यासारखं पितात’. थोड्याच वेळात माझा संताप शांत झाला. मी विचार केला की असं कुणाच्याही विचारस्वातंत्र्यावर घाला घालणारे आपण कोण. ही लोकशाही आहे. इथे विचारस्वातंत्र्य एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं काम करतं. दुनियाभर कुठंही लाळ गाळत हिंडायचं, कुणालाही चावायचं, वेळ बघायची नाही काळ बघायचा नाही, कुणावरही कधीही भुंकायचं. असा विचार मनात आला आणि असं एखादं कुत्रं रस्त्यात दिसल्यावर सर्वसाधारण माणूस जशी प्रतिक्रिया देईल तीच मी दिली. आणि मी अजिबात चकार शब्दही न बोलता तिथून निघून गेलो. माझ्या डोक्यात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. इतकी की डोक्याचा म्हणजे लोकलचा डबा झाला होता. त्या बेधुंद अवस्थेत मी कधी बोरीवली स्टेशन गाठलं ते कळलंच नाही. लोकलमध्ये बसलो. नशिबाने खिडकीजवळची जागा मिळाली. लोकल सुरू झाली. बिल्डिंगा, रूळ मागे पडायला लागले आणि परत एकदा त्याच विचारांनी माझ्या डोक्यात उसळी मारली.

मी आश्चर्यचकीत झालो होतो. का मला वाईट वाटत होतं, का परत परत मला चीडच येत होती… या सर्व मिश्र कोलाहलातून मी मार्ग काढत होतो. असं कुठलं लिखाण या माणसाच्या वाचनात आलं असेल की याला पु. ल. देशपांड्यांसारख्या प्रतिभावंत झऱ्याचं खळाळणारं निर्मळ पाणी डबकं वाटायला लागलंय. मुळात कुठलीही संजीवनी आऊटडेटेड कशी होईल? ही संजीवनी ज्यांना-ज्यांना मिळाली त्या माझ्यासारख्या कितीतरी लोकांचं जीवन समृद्ध झालं आहे. अशा लोकांची संख्या जवळजवळ असंख्यच आहे. पुलंनी माझ्यासारख्या अनेकांच्या दुःखी मनाला आनंदाचे, समाधानाचे पंख लावून हास्याच्या आकाशात उंचच्या उंच भराऱ्या मारायला लावल्या आहेत. एकटेपणाला सोबत असायची ती त्यांच्या एखाद्या पुस्तकाची किंवा कथाकथनाच्या सीडीची. माझ्या गाडीत नेहमी पुलंच्या कथाकथनाची सीडी असते. त्यामुळे सहा तासांचा प्रवास सहा मिनिटांतच संपल्यासारखा वाटतो. पुलं हे नाटककार, लेखक, नट, दिग्दर्शक, संगीतकार तर होतेच, पण त्यांच्यात एक खट्याळ आणि बघितल्या बघितल्या सगळ्यांना आवडणारं गुटगुटीत बाळ असावं असं मला नेहमी वाटतं (अशी बाळं कॅलेंडरवर असतात). काही दिवसांपूर्वी ‘बटाट्याची चाळ’ ह्या त्यांच्या एकपात्री प्रयोगाची जुनी चित्रफीत माझ्या बघण्यात आली. त्यातली सर्व पात्रं आपलीशी वाटत होती. पुलंच्या ह्या ‘बटाट्याच्या चाळी’त आपल्याला राहायला मिळालं तर! आणि ह्या सर्व पात्रांशी आपली ओळख झाली तर काय मज्जा येईल! अण्णा पावशे, एच. मंगेशराव, राघुनाना, काशीनाथ नाडकर्णी, सोकाजीनाना त्रिलोकेकर, नाट्यभैरव कुशाभाऊ वगैरे मंडळींबरोबर गट्टी जमली तर! आहाहा! आपण तर एका पायावर टू बिएचके फ्लॅट बिनशर्त सोडायला तयार आहे. ही सगळी पात्रं पु.ल. एकटेच रंगमंचावर रंगवतात. पण यातला प्रत्येकजण स्वतंत्रपणे जिवंत होऊन आपल्याला भेटतो. याचं कारण लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता या पुलंमधल्या तिघांनी स्वतःशी प्रामाणिक राहून सूक्ष्मपणे केलेलं निरीक्षण असावं. मी पुलंच्या खूप नंतरच्या पिढीतला. पण आजही त्या गमती मला ताज्यातवान्या करतात. माझ्यातल्या नट, लेखक आणि दिग्दर्शकामध्ये एक नवीन उमेद, चैतन्य निर्माण करतात. ही गोष्ट फक्त ‘बटाट्याच्या चाळी’चीच नाही तर त्यांच्या प्रत्येक कथेतलं एखादं पात्र मी असावं असं मला वाटतं. त्यांच्या ‘म्हैस’ नावाच्या कथेत, मला पण त्या एसटीने प्रवास करावासा वाटतो. रावसाहेबांच्या अड्ड्यात मलाही सामील व्हावसं वाटतं. मलाही हरितात्यांच्या तोंडून शिवाजीमहाराजांच्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. पुलंबरोबर बिगरी ते मॅट्रिकपर्यंत त्यांच्याबरोबर त्यांच्या वर्गात जाऊन बसावसं वाटतं. मलाही दामले मास्तरांची एखादी छडी खावीशी वाटते. केशर मडगावकर ज्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट आहे, मलाही त्या ऑफिसमध्ये काम करावसं वाटतं. ही सगळी पात्रं जवळचे मित्र वाटायचं कारण म्हणजे पुलंमध्ये ती पात्र निर्माण करण्याचं असलेलं दैवी कसब. एवढं छान सुचतंच कसं? प्रत्येक गोष्टींकडे अजब दृष्टिकोनातून बघण्याचं हे एकमेवाद्वितीय सामर्थ्य आणि दृष्टी त्यांच्यामध्ये आली कुठून? त्यांनी काय केलं. कसं केलं? कुणी घडवलं असेल हे पु. ल. देशपांडे नावाचं अजब विश्व? ज्या विश्वात तुम्ही गेलात, तर कधी तुमची समाधी लागेल सांगता येत नाही. असली समाधी भंग करणं मेनकेलाही जरा जडच जाईल.

लोकल जोगेश्वरी स्टेशनवरून जात होती. मला आठवलं पुलंचं बालपणही जोगेश्वरीतल्या ‘सरस्वतीबाग’ नावाच्या त्यांच्या आजोबांनीच स्थापन केलेल्या वसाहतीत गेलं. कसे असतील लहानपणी पुलं. मला नेहमी वाटतं, खोड्या काढून पळून जाणारी मुलं असतात ना तसे ते असावेत. खोड्या म्हणजे कुणाला टपली मारून किंवा कुणाची फजिती करून नव्हे, तर गुदगुल्या करून. हाच गुदगुल्या करण्याचा गुण त्यांच्या लेखनातही आला आहे. आणि याच गुदगुल्यांनी त्यांनी अनेक हास्यांच्या बागाच नाही, तर मोठमोठी घनदाट जंगलंही फुलवली आहेत.

मला त्यांचा कधीही सहवास लाभला नाही. त्यांच्या कहाण्या ऐकून कल्पनेनेचं मनाचं समाधान करून घ्यावं लागलं. अर्थात कडाक्याच्या थंडीत उबदार दुलईची कल्पना करण्यासारखंच हे समाधान आहे. मी नेहमी कल्पना करतो. कसे असतील ‘ती फुलराणी’च्या रिहर्सलचे दिवस. ज्याचं लेखन आणि दिग्दर्शन पुलंनी केलं. भक्ती बर्वे, सतीश दुभाषी, पु.ल. यांच्यामध्ये काय चर्चा घडत असतील. मध्यंतरी भक्ती बर्वेंचं एक पुस्तक वाचनात आलं. त्यांनी फुलराणीच्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे. त्या म्हणतात- ‘तालमीमध्येच ‘ती फुलराणी’ दिवसागणिक बहरत होती. तमाम मराठी रसिकांनी प्रयोगात अक्षरशः डोक्यावर घेतलेला ‘तुला शिकविन चांगलाच धडा’चा प्रसंग पुलंच्या लेखनाच्या ताकदीची साक्ष पटवणारा होता. परंतु तालमीतच पु.ल. मला म्हणाले. ह्या प्रसंगाला वन्स मोअर मिळतो की नाही बघ. मी अचंबित झालो. एखाद्या गाण्याला किंवा वाद्य वादनाला अशी दाद मिळणं स्वाभाविक आहे. पण नाटकातल्या काव्यमय स्वगताला अशी दाद मिळणं शक्यच नाही. पण अखेर पुलंचा. आपल्या शब्दांवरचा विश्वासच सार्थ ठरला. वन्स मोअर आला आणि एकदा नाही, अनेकदा.’ अर्थात भक्ती बर्वेंसारख्या कसलेल्या अभिनेत्रीचाही त्यात वाटा आहेच. पण दिग्दर्शक म्हणून आपल्या कलाकारांबद्दल वाटणारा हा अढळ विश्वास, हे दिग्दर्शक म्हणून त्यांचं कौशल्यही आहेच. पुढे त्या म्हणतात- ‘पुलंच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सर्वात मोठी संधी मला मिळाली. तालमीच्या ठिकाणी पुलंचं असणं, वागणं, बोलणं, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची नाट्यतंत्रावरची हुकूमत, त्यांच्या प्रगल्भ जाणिवा आणि त्यांच्याच लेखणीतून उतरलेली भूमिका समजून घेणं, हा सगळाच माझ्या आगळ्या-वेगळ्या आनंदाचा जतन करून ठेवावासा वाटणारा ठेवा होता. कविता कशी आविष्कृत करायची, शब्दांचं महत्त्व आणि आशयाची अभिव्यक्ती म्हणजे काय, हे मला पुलंच्या मार्गदर्शनामुळे चांगलंच ठाऊक झालं. मूळ हे नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉचं ‘पिग्मॅलीयन’ हे आहे. पण पुलंनी मराठीत ते साकारताना त्याचं रूपडं पालटून टाकलं. मराठी भाषेची सौंदर्यस्थळं, रांगडेपण, कोमलता, म्हणी आणि वाक्प्रचार असा सगळ्यांचा हे नाटक प्रत्यय देतं.’

पुलंनी निर्माण केलेली कुठलीही कलाकृती अनुभवताना. परिपूर्ण भोजनाचा आस्वाद घेतल्याचं समाधान मिळतं. सर्वात चविष्ट पदार्थ विनोद असतो. थोडसं वास्तवाचं तिखट असतं. कुणाचंतरी आंबट व्यक्तिचित्रण असतं. कुठल्यातरी प्रसंगाचा गोडवा असतो. एकूण अनुभव भयंकर समाधानकारक आणि परिपूर्ण असतो. ते सर्वोत्तम संगीतकारही होते. स्वर्गीय आनंद देणारी पेटी ते वाजवायचे. ते, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी हे सगळे रात्र-रात्र गाण्याच्या मैफिली जमवत. बापरे! काय असेल तो स्वर्गीय अनुभव. अंगावर सरसरून काटाच आला. ज्या ज्या लोकांनी माझं नाटक आ‍वर्जून पाहायला हवं होतं असं मला वाटतं, त्यात पु.ल. हे अग्रगण्य आहेत. मग मी स्वतःच पुलंना माझ्या कल्पनेत माझ्यासमोर उभं करतो आणि त्यांच्याशी बोलतो. त्यांना प्रयोगाला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देतो- ‘बरं का पु.ल. पुढच्या आठवड्यात पार्ल्यात शो आहे, माझ्या नाटकाचा. तुम्ही यायला हवं. ते म्हणतात. अरे बाबा माझे गुडघे दुखतात हल्ली. शक्य होईल असं वाटत नाही. मग मी म्हणतो. एवढंच ना. तुम्ही कशाला काळजी करता. मी आहे ना. मी स्वतः गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला येईन. मराठी कलाकार असलो, तरी माझ्याकडे आज कार आहे. माझ्या खांद्याचा आधार घेऊन तुम्ही चाला. पण तुम्ही यायलाच हवं. प्रयोगानंतर पाठीवर तुमच्या शाबासकीची थाप मला पाहिजे आहे. तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता असे पायच नाही राहिले ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं. तेवढ्यासाठी तरी तुम्ही यायलाच हवं. आणखी एक, कधीतरी तुमच्याशी खूप बोलायचं आहे. नाटक, सिनेमा सोडून चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलू या. तुम्ही सगळ्यांना हासवलंत. तुम्हाला कुणीतरी हासवायला नको का? म्हणून तरी भेटू या कधीतरी.’ पण अचानक सत्य परिस्थितीची जाणीव होते आणि रावसाहेबांसारखं म्हणावसं वाटतं. हे देवसुद्धा हरामखोरच की हो. ज्याला नको त्याच्यात नेऊन घालतंय बघा आलो असतो काही वर्षं मी आधी जन्माला तर काय बिघडलं असतं.

दादर स्टेशन आलं. मी लोकलमधून खाली उतरलो. घराच्या दिशेने चालू लागलो. वाटेत एका दिग्दर्शकाचा फोन आला. ‘अरे पुलंवर एक सिनेमा बनवतोय. तू पुलंचं काम करावं अशी इच्छा आहे.’ स्थळ, काळ, वेळ मी कशाचीही पर्वा न करता मोठ्याने ओरडलो- ‘काय?’

निखिल रत्नपारखी
महाराष्ट्र टाईम्स
१९ एप्रील २०१५

Friday, August 9, 2019

पुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई

पु. ल. देशपांडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचं हे जन्मशताब्दी वर्ष अवघ्या महाराष्ट्रात विविध पद्धतींनी मनवलं जात आहे. पुलंवर ‘भाई’ हा दोन भागांमध्ये चित्रपटदेखील निघाला. पुल ऊर्फ भाई उत्तम गायक, वक्ते, कथाकथनकार, लेखक-कवी होते, नाटककार- विनोदकार, नट, कथाकार, पटकथाकार होते, दिग्दर्शक- संगीत दिग्दर्शक, वादक होते. एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी... अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा लीलया वावर होता. या त्यांच्या सर्वत्र वावराचा मराठी मनांना परिचय आहे.                               
                             
हा असा व्हर्सटाईल, अष्टपैलू हिरा ज्या कोंदणात बांधला गेला होता, ते चहुबाजूंनी या हिर्‍याला बांधून असलेलं कोंदणही तेवढंच विलक्षण ताकदीचं होतं. ते भरभक्कम कोंदण म्हणजे सुनीताबाई देशपांडे! सुनीताबाई पुलंच्या आयुष्यात आल्या नसत्या, तर पुल महाराष्ट्राचं इतकं लाडकं व्यक्तिमत्त्व झाले असते का? पुलंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचं बॅकस्टेज भक्कमपणे सांभाळणार्‍या पुलंच्या सहचारिणी विदुषीच्या- सुनीताबाईंच्या- व्यक्तित्वाचा धांडोळा घेणं, त्याल उजाळा देणं गरजेचं आहे.

माणसं जन्माला येतात, जगरहाटीनुसार सारेच सोपस्कार पार पडतात. शैशव, बालपण, मग तारुण्य. चांदोबात वाचलेल्या गोष्टींसारखी विवाहयोग्य वयात आल्यानंतर ही माणसं मग विवाह करतात. ती तिचं कर्तव्य पार पाडते, तो त्याची जबाबदारी पार पाडतो. या जोडप्यांचा संसार सुखनैव सुरू असतो. सर्वसामान्य जोडप्यांचे संसार असे सुरळीतपणे सुरू असतात. पिढ्यानुपिढ्या हे चक्र अव्याहत सुरू असतं.

पण, काही ठिकाणची कथा निराळी असते. त्यातले ती आणि तो त्यांच्यातल्या समान पातळीवरील आवडीनिवडीवरून, अभिरुचीवरून, वैचारिकतेतून आवडीच्या माणसांकडे चुंबकासारखी खेचली जातात. एक समान धागा त्यांना खुणावत असतो. ती दोघंही आपापल्या परीने तोडीची असतात. समान बुद्धिमत्तेची किंवा काही ठिकाणी तर तिची बुद्धिमत्ता त्याच्याहून जास्त प्रखर असते, अशी व्यक्तिमत्त्वे एकत्र आली की खरी कसोटी असते आणि बहुतांश वेळा असं पाहायला मिळतं की, कालांतराने ती स्वतःला थोडंसं बाजूला सारत त्याचा मार्ग सुकर करून देते. ‘आनंदी गोपाळ’सारखे काही अपवाद वगळता ही परिस्थिती तशी सवयीची.

पुल ऊर्फ भाई आणि सुनीताबाईंच्या सहजीवनाबद्दल बोलायचं झालं तर कसं होतं या दोघंचं सहजीवन? अगदीच भिंग लावून बघायचं म्हटलं, तर तिथे त्यांच्या सहजीवनातदेखील व्यावहारिक पातळीवर एकमेकांसोबत वावरताना ज्या कुरबुरी असतात त्या असू शकतात. (आहे मनोहर तरी... याचं बोलकं उदाहरण आहे.) सुनीताबाई एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. त्या शिस्तप्रिय होत्या, त्या तत्त्वनिष्ठ होत्या. त्यांना स्वतःची मतं होती, ती पटवून देण्याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती. वेळप्रसंगी कडक भूमिका घेण्याची धार त्यांच्या रक्तात होती. एक टोकाचं संवेदनशील मन लाभल्याने अवतीभोवतीच्या माणसांना वाचायची, त्यांना परखायची कसोटी त्यांना अवगत होती. त्यामुळे त्यांच्या तारुण्यापासूनच त्या अत्यंत प्रगल्भ होत्या. एक संतुलित बाज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होता. कोकणातल्या निसर्गात त्यांचं बालपण व्यतीत झालं होतं. एक मनस्वीपण लेवूनच त्या मोठ्या झाल्या. ठाकुरांसारख्या एका सुसंस्कृत घराण्यातल्या असल्याने, वकील वडिलांची मुलगी असल्याने आयुष्यातल्या घटना-प्रसंगांकडे मुळातच डोळसपणे पाहण्याची हातोटी त्यांना ज्ञात होती आणि त्यांचं पुलंवर अपार प्रेम होतं आणि म्हणूनच सुनीताबाई-पुलंचा अर्धशतकी संसार अत्यंत व्यवस्थितपणे पार पडला.

भाई आणि सुनीताबाईंचं कवितांवर विलक्षण प्रेम. या एका धाग्याने त्यांना जवळ आणलं. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, केशवसुत अशा अनेक कवितांच्या अभिवाचनाचे अनेक जाहीर कार्यक्रम या दोघांनी केले. पुल स्वतः कवी होते, पण सुनीताबाईं स्वतः कवयित्री नसल्या तरीही त्यांनी इतरांच्या, मराठीसोबतच इंग्रजी, हिंदी, बंगाली कवितांवर भरभरून प्रेम केलं. असं कवितांनी या दोघांना एकत्र आणल्यावर सुनीताबाईंशी लग्न करण्याचा प्रस्ताव पुलंकडून समोर आला, तेव्हा त्या विवाहसंस्थेच्या बाबतीत बर्‍याचशा उसादीन होत्या. दोन जिवांमध्ये प्रेम असणं पुरेसं नाही का? त्याला विवाहबंधनाची गरज काय? हा तर एक सामाजिक सोपस्कार आहे, अशी सुनीताबाईंची त्या काळातली अतिशय परखड आणि तितकीच पारदर्शी मतं होती. सुनीताबाई नास्तिक होत्या. पण. त्यांचा चांगल्या कर्मावर विश्वास होता. तसंच चांगल्या माणसांवर नितांत श्रद्धा होती. त्या अर्थाने त्या आधुनिक महाराष्ट्रातलं विज्ञानाची कास धरणारं चर्चित असं व्यक्तिमत्त्व होतं.

तल्लख बुद्धिमत्तेच्या सुनीताबाई कणखर होत्या. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या काळात भूमिगत राहून बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं. त्यांना स्वतःची अशी मतं होती. बुद्धिनिष्ठ सुनीताबाईंनी तत्त्वांना कधीच मुरड घातली नाही. स्पष्ट भूमिका घेतानादेखील कुठली भीडमुर्वत ठेवली नाही. एकीकडे स्वभावात हे असे पैलू असताना दुसरीकडे त्या विलक्षण प्रेमळ होत्या. टोकाच्या संवेदनशील होत्या. प्रेम करायचं तर ते झोकून देऊनच. तिथे मग फायद्या-तोट्याचा काही विचार नाही.

कलासक्त माणसं व्यावहारिक जगापासून दूर असतात. त्यांचं आपलं स्वतःचं असं एक जग असतं. त्यात ही अशी माणसं जास्त रमतात. काहीशा फकिरी वृत्तीच्या या माणसांचा ताळेबंद रखरखीत दैनंदिन व्यवहारांशी जुळत नाही. त्यांच्या अशा असण्यातून त्यांचं वेगळेपण अधोरेखित होत असतं. पण, अशा माणसांच्या सहवासातल्या, त्यांच्या भोवतीच्या माणसांना अशा माणसांना या वैचित्र्या आणि वैशिष्ट्यांसह सांभाळून घेत व्यावहारिक मापदंडदेखील पाळावे लागतात. त्याचा दुहेरी भार येतो. त्यात दमछाक होती. जी सुनीताबाईंचीही झाली. याच कारणाने सुनीताबाईंना पुलंसाठी वेळप्रसंगी कठोर व्हावं लागायचं. गरजेपासून व्यसनापर्यंत सगळे लाड सुनीताबाई बिनदिक्कत पुरवायच्या. भाईला सिगारेट लागायची. कुठे जाताना विसरभोळ्या स्वभावामुळे भाई स्वतःहून ती सोबत घेणार नाहीत. मग उगाच इतरांना त्रास नको म्हणून सुनीताबाई पुलंसाठी स्वतःच्या पर्समध्ये सिगारेट बाळगत, पुलंना लागली तेव्हा काढून द्यायला.

पुलं तसे भिडस्त असल्याने कुणाचं मन न दुखवण्याकडे त्यांचा कल. लोकसंग्रहाचं वेड. अव्यवहारी. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात फसवणुकीचेही प्रसंग आले. मग नाटक-चित्रपटांसदर्भातले व्यवहार, सारे पत्रव्यवहार, कोर्टकचेर्‍या, प्रयोग लावणे, पुलंच्या पुस्तकाची प्रूफं तपासणे, प्रकाशकांशी संपर्क ठेवणे, रॉयल्टी हे सारं सुनीताबाईंनी स्वतःकडे घेतलं. सोबत पुलंसोबत चित्रपटात अभिनयसुद्धा केला. हे सांभाळत असतानाच घरी येणार्‍या पै-पाहुण्यांशीही त्या तितक्याच आत्मीयतेने वागत. अतिशय सुगरण असलेल्या सुनीताबाई, प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवत त्यांना ते ते पदार्थ स्वतः बनवून अगदी आवर्जून खायला घालत. पुलंचं घर सदैव भरलेलं. कधी स्नेह्यांच्या तर कधी चाहत्यांच्या भेटी, कधी गाण्याच्या मैफिली, कधीकधी काही पाहुण्यांचा मुक्काम महिना महिना. पोस्टमन, फोनची बेल, दाराची बेल यासाठी सुनीताबाईंना अगणित वेळा उठावं लागायचं. एकदा सुनीताबाईंची भावजय त्यांना म्हणाली, ‘‘आज मीच हे सगळं करते आणि बघते बरं, खरंच कितीदा हे असं तुम्हाला उठावं लागतं ते?’’ आणि त्यांच्या भावजयीला त्या दिवशी या कामांसाठी तब्बल 27 वेळा उठावं लागलं!

उगाच भाईला लेखनातून किंवा त्याच्या चिंतनात व्यत्यय नको म्हणून सुनीताबाई हे सगळं आनंदाने स्वतःवर ओढवून घेत करायच्या. या आणि अशा कितीतरी बाबींवर सुनीताबाईंची केवढी ऊर्जा खर्च होत असावी. त्यामुळेच की काय, पण सुनीताबाई एकान्तप्रिय बनल्या. त्यांनी स्वतःशीच मैत्री केली. अत्यंत देखण्या, एका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची धनी असलेल्या या स्त्रीने पुलंभोवती स्वतःचा असा भक्कम परकोट उभा केला. दिवस-रात्र डोळ्यांमध्ये तेल घालून एक दक्ष पहारेकरी बनल्या. ठरवून मूल होऊ न देता, पुलंमधल्या मुलाला त्या जोजवत राहिल्या आणि पुलंना चोहोबाजूंनी फुलू दिलं. पुलंचीदेखील सुनीताबाईंना कशासाठीच ना नव्हती. पण, त्यांचा व्यापच असा की, सुनीता देशपांडे नावाच्या या गुणी स्त्रीने स्वतःचा असा वेगळा विचारच कधी केला नाही किंवा त्यांना तशी उसंतही मिळाली नसावी.

मुळातच प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या सुनीताबाईंनी पुलंची सहचारिणी म्हणून पुलंचं मोठेपण त्यांनी कधीच मिरवलं नाही. पुलंसोबत त्या कधी व्यासपीठांवर जाऊन बसल्या नाहीत. पुरस्कारांच्या वेळी असो, की संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वेळी असो, सुनीताबाई नेहमी आपल्या प्रेक्षागारात समोर बसलेल्या. इतक्या नीरक्षीरबुद्धीने वागण्याचा विवेक त्यांच्यात ठायीठायी भरलेला होता. सगळं सर्वस्वानिशी बहाल करूनदेखील नामानिराळं राहात, फळाची अपेक्षा न बाळगता एक उपजत शहाणपण घेऊन त्या जगल्या. स्वतःला सतत बाजूला ठेवण्याच्या वृत्तीमुळे प्रचंड वाचन केलं. त्याला चिंतनाची जोडदेखील होती. पण, प्रतिभा असूनही त्यांनी म्हणावं तेवढं लेखन केलं नाही, त्या तसं करत्या तर जगासमोर दुर्गाबाई भागवत, शांताबाई शेळके यांच्या रांगेतल्या वेगळ्या सुनीताबाई दिसल्या असत्या.

सुनीताबाई त्या काळात टेक्नोसॅव्ही होत्या. घरातली यंत्रतंत्र त्या दुरुस्त करायच्या. पुलंना ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसवून स्वतः ड्रायव्हिंग करायच्या. असे लांब पल्ल्याचे कितीतरी प्रवास त्यांनी मिळून केले आहेत. पुलंवर विलक्षण प्रेम करणार्‍या सुनीताबाई, त्यांच्या बारीकसारीक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून असायच्या. पुलंच्या एकपात्री प्रयोगांमध्ये थोडासाही पॉज घेतला, की त्यांना एक घोट पाणी प्यायला मिळावं म्हणून ही बाई विंगेत पाण्याने भरलेलं लोटी-भांडं घेऊन घंटोंशी उभी असायची.

पुलं-सुनीताबाई नि:स्पृह होते. गरजेपुरतं बाळगायचं आणि बाकी वाटून टाकायचं, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे पुलंची आवक वाढली तसं या उभयतांनी आवश्यक रक्कम बाळगून बाकी पैसा अनेक गरजू संस्थांना सतत देणगी स्वरूपात देऊ केला. ट्रस्ट उभारला. (पुल गेल्यानंतरसुद्धा शेवटच्या काळात घरातल्या अनेक वस्तू अगदी नि:स्पृह मनाने जिव्हाळ्याच्या व्यक्तींना भेट स्वरूपात देऊन टाकल्या आणि सगळीच व्यवस्थित विल्हेवाट लागली. कशातच मन ठेवलं नाही.)

जीएंचा ‘पिंगळावेळ’ हा कथासंग्रह पुलंना अत्यंत आवडला. तो वाचून ते खूप प्रभावित झाले. त्यांनी जीएंना पत्र पाठवलं. जीएंचंदेखील पुलंना उलटटपाली पत्र आलं. पण, तेव्हा पुल शांतिनिकेतनला बंगाली शिकायला गेले होते. त्यामुळे जीएंच्या या पत्राचं उत्तर सुनीताबाईंनी पाठवलं आणि तेव्हापासून जीए आणि सुनीताबाईंमधल्या पत्रमैत्रीला सुरुवात झाली. ती नंतर अनेक वर्षे अव्याहत आणि अखंड चालली. जीए-सुनीताबाईंचं मैत्र म्हणजे स्त्री-पुरुषातील एका प्रौढ आणि प्रगल्भ मैत्रीचा अनोखा, अनमोल नमुना आहे. सुनीताबाईंचं वाचन अफाट असल्याने त्यांच्यातील पत्रव्यवहारातून जीए आणि सुनीताबाईंमध्ये विविध विषयांवर, इंग्रजी लेखकांवर, सामाजिक प्रश्नांवर, साहित्यावर अशा अगणित चर्चा व्हायच्या. काही दीर्घ तर काही अतिदीर्घ अशी ती सारी पत्रं जीएंनी जपून ठेवली होती. (जीएंनाही पत्रलेखनाचा छंद होता. कवी ग्रेसांपासून त्यांनी अनेकांना पत्रं लिहिली. पुढे त्यातल्या निवडक पत्रांचा ‘जीएंची पत्रवेळा’ असे चार खंड प्रकाशित झाले. त्यातला पहिला खंड सुनीताबाईंच्या पत्रांचा आहे.) या पत्रमैत्रीतून जीएंना सुनीताबाईंमधली विलक्षण प्रतिभा आणि विचारांमधली बहुश्रुतता जाणवली. त्यामुळे जीएंनी त्यांना लेखनासाठी प्रोत्साहितदेखील केलं. शेवटी या बाई आपलं ऐकत नाही असं वाटून त्यांनी मग श्री. पु. भागवतांना, सुनीताबाईंकडे विलक्षण प्रतिभा आहे त्यांना लिहितं करा, ही कळकळ व्यक्त केली. जीएंसारख्या विलक्षण एकारलेपण पांघरलेल्या माणसाने सुनीताबाईंच्या लेखनाची दखल घेत अशी आग्रही भूमिका घ्यावी, यातूनच सुनीताबाईंच्या प्रतिभेची जाणीव व्हावी.

एकदा सुनीताबाई-पुलंना अमेरिकेतल्या सऍटेलमधल्या त्यांच्या एका स्नेह्याने फिलिस रोझ यांचं ‘पॅरलल लाईव्हज’ हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं. वैवाहिक जीवनावर आधारित ते पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकाची आपण मराठी वाचकांना ओळख करून द्यावी, असं सुनीताबाईंना मनापासून वाटलं. पण, मुळात पुस्तक खूप मोठं असल्याने त्यांनी त्यातल्या निवडक अशा जेन वेल्श आणि थॉमस कार्लाईल, जॉन रस्किन आणि एफी ग्रे, हॅरियट टेलर आणि जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी अशा सहा जोडप्यांच्या वैवाहिक जीवनावरच्या मजकुराचं भाषांतर केलं. त्या सहा लेखांकांचं मिळून ‘समांतर जीवन’ हे सुनीताबाईंचं पुस्तक प्रसिद्ध आहे.

नंतर विविध वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये त्यांनी अगदी साठीनंतर लेखन केलं. त्या लेखांचे संग्रह आणि इतर लेख असे सुनीताबाईंचे सोयरे सकळ, मण्यांची माळ, मनातलं अवकाश, प्रिय जीए ही पुस्तकंही अत्यंत वाचनीय आहेत. आहे मनोहर तरी... या त्यांच्या आत्मकथनाने तर प्रसिद्धीचा कळस गाठला. त्याची विविध भाषांमध्ये भाषांतरं झाली. अनेक आवृत्त्या निघाल्या. या आत्मकथेने त्यांना रसिकांनी जितकं डोक्यावर घेतलं तितकंच पुलप्रेमींच्या टीकेची झोडही त्यांना सहन करावी लागली. परंतु, या आत्मकथनाने दोघांच्याही एकत्रित आयुष्यावर कुठली बाधा आली नाही. एकदा तर आहे मनोहर तरी... ची रॉयल्टी आली, त्यावर सुनीताबाई भाईंना म्हणाल्या, भाई, माझी रॉयल्टी आली, तुझ्यासाठी, तुझ्या आवडीचं काय आणू?

जी. ए. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला प्रिय जी. ए. पुरस्कार सुनीताबाईंना मिळाला.

प्रत्येक जण आधी स्वतःला काहीतरी देणं लागतो. त्यात वेगळेपण लाभलेल्या व्यक्तींची ही भूक जरा अधिक मोठी असते. मी ला असमाधानी ठेवलं की ती सल कुठेतरी ठसठसत असते. कालांतराने कधीतरी वेगळ्या रूपाने ती बाहेरही निघते. चतुरस्र व्यक्तित्वाच्या सुनीता देशपांडेंनी त्यांच्यातल्या मी वर आणि सोबतच त्यांच्या लेखनाला मुकलेल्या त्यांच्या रसिकांवरदेखील एका अर्थाने अन्याय केला. आपल्या जोडीदारावर नितान्त प्रेम असल्याशिवाय स्वतःत खूप काही असताना अशी सर्वस्वाची आहुती देणं तितकंसं सोपं नाही. म्हणूनच पुलंच्या अख्ख्या आयुष्याचंच पेटंट घेतलेल्या या बाईची, आहे मनोहर तरी... मध्ये एक व्यक्ती म्हणून ही घुसमट निघाली असेल, तरी त्यांचं पुलंप्रतीचं समर्पण, प्रेम, जिव्हाळा पाहू जाता, तितक्याच मोठ्या मनाने आणि आत्मीयतेने समजून घेता यायला हवी. कारण, ही व्यक्तिमत्त्वं आपल्यासाठी प्रेरकही ठरतात...

भाग्यश्री पेठकर
९ ऑगष्ट २०१९
तरुण भारत

Wednesday, August 7, 2019

समृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा - देवेंद्र जाधव

पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला लाभलेलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होय. त्यांचं लिखाण आणि त्यांनी उभी केलेली व्यक्तिचित्रं आजही वाचकांच्या मनावर गारुड करून आहेत. हसता हसता वाचकांना अंतर्मुख करण्याची किमया पु.लं.नी त्यांच्या लिखाणातून साधली. 2018 हे पु.लं.चं जन्मशताब्दी वर्ष आहे. याचंच औचित्य साधून अप्पा परचुरे यांच्या संकल्पनेतून ‘परचुरे’ प्रकाशनाने ‘कसा मी असा मी’ हे पुस्तक वाचकांसमोर आणले आहे. पु.लं.नी लिखाणासोबत विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. मग ते संगीत असो वा अभिवाचन. त्यामुळेच संपादकांनी पु.लं.चे विविध विषयांवरचे काहीसे दुर्मिळ लेख, त्यांनी केलेली भाषणं तसेच मुलाखती आदी गोष्टी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

पु.लं.च्या वाचनप्रेमापासून पुस्तकाची सुरुवात होते. ग्रंथालय आणि पुस्तकांशी जडलेलं अनोखं नातं पु.लं.नी ‘ग्रंथालय ः एक आनंद निधान’ या लेखातून सांगितलं आहे. गाण्यातील ‘गर्दी’ आणि ‘दर्दी’ यातील फरक ‘संगीत’ या लेखात पु.लं.नी समजावून सांगितला आहे. ‘भाषांतरे आणि रूपांतरे’ या लेखात पु.लं.नी एक प्रकारे स्वतः केलेल्या कामाची चिकित्सा केली आहे. पाश्चात्त्य नाटकांच्या संहितेचं मराठी रंगभूमीवर रूपांतर करताना त्यात कोणते बदल करावे लागले याचा एक प्रकारे शोध पु.लं.नी घेतला आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शिवाजी महाराजांवरील मूळ बंगाली कवितेचा पु.लं.नी केलेला अनुवाद हा एक वस्तूपाठच म्हणावा लागेल. त्यांनी अनुवाद करताना वापरलेले अस्खलित मराठी शब्द आपल्याला काहीसे नवीन असले तरीही त्यातून आपल्या शब्दसंपदेमध्ये भर पडते हे निश्चित.

पु.लं.चा संगीतविषयक असलेला अभ्यास या पुस्तकातील बहुतेक लेखांमधून दिसून येतो. स्वर आणि आलाप यांविषयी तसेच पाश्चात्त्य संगीताविषयी त्यांना असलेली जाण प्रत्ययास येते. पु.लं.चं बंगाली भाषेवर आणि संगीतावर विशेष प्रेम होतं. तसेच दूरदर्शनच्या प्रारंभीच्या काळात पु.ल. सक्रिय होते. त्या वेळेस कार्यक्रमाचे नियोजन करताना पु.लं.च्या ठायी असलेला हजरजबाबीपणा तसेच मुलाखत रंगतदार होण्यासाठी त्यांनी वापरलेली हुशारी आदी गुणांचं दर्शनसुद्धा आपल्याला होतं.

या पुस्तकातील एक महत्त्वाचा लेख म्हणजे ‘भगवान श्री सखाराम बाईंडर’. विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाचं पु.लं.नी केलेलं विडंबन सुसंस्कृत आणि सभ्यपणाचा बुरखा घालून वावरणाऱया समाजाला चिमटे काढतं. सखाराम बाईंडर नाटकावरून मोठा गदारोळ माजलेला, परंतु प्रेक्षकांनी हे नाटक उचलून धरलं. पु.लं.नीसुद्धा हाच मुद्दा पकडून हा विडंबनपर लेख लिहिला आहे. ‘आचार्य अत्रे’ आणि ‘बालगंधर्व’ या दोन महान व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्याचा गौरव पु.लं.नी लालित्यपूर्ण शैलीत केला आहे.

या पुस्तकात पु.लं.चे असे अनेक लेख वाचायला मिळतात. यातील प्रत्येक लेखातून पु.ल. देशपांडे हा ‘अवलिया’ आपल्याला भेटत राहतो. पुस्तकाच्या अखेरीस पु.ल. गेल्यानंतर सुनीताबाईंनी पु.लं.ना लिहिलेलं पत्र वाचता येतं. पु.ल आणि सुनीताबाई यांच्या सहजीवनाचं आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं हे पत्र आहे. नवरा-बायकोचं मैत्रीचं आणि खेळीमेळीचं नातं या पत्रातून पाहायला मिळतं.

प्रत्येक लेखाच्या शेवटी पु.लं.नी केलेली मिश्किल विधाने चौकटीत दिली आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेलं पु.लं.चं व्यंगचित्र मुखपृष्ठाच्या स्वरूपात वापरण्यात आलं आहे. पु.लं.च्या साहित्याचं सखोल चिंतन करणारी डॉ. अरुणा ढेरे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. डॉ. नागेश कांबळे यांनी या लेखांचं संकलन केलं आहे. पु.ल. त्यांचं आयुष्य अखेरपर्यंत मनमुराद जगले. यातील प्रत्येक लेखातून पु.लं.चं जीवनातील प्रत्येक घटकाबद्दल असलेला आशावाद प्रकट होतो. पु.लं.वर प्रेम करणाऱया प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून संग्रही ठेवावं, असंच आहे.

कसा मी असा मी
मूळ लेख पु. ल. देशपांडे
संकल्पना आणि मांडणी अप्पा परचुरे
संकलक डॉ. नागेश कांबळे
पृष्ठs १८४, मूल्य २०० रुपये

--देवेंद्र जाधव
सामना
२१ ओक्टोबर २०१८

Thursday, August 1, 2019

| परी या सम हा |

परमेश्वर एखादया व्यक्तीला काय काय आणि किती देऊ शकतो ? उत्तम लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गायक, नाटककार. विश्वास बसू नये, येवढे गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ़ रसिकांचे लाडके पु.ल. आणि माझे "पुलदैवत". 
माझा आणि पु.ल. यांचा परिचय झाला व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाच्या माध्यमातून , जे मला बक्षिस म्हणून मिळाले होते. जसं जसं मी ते वाचत गेलो, तसा तसा त्यांच्या जबरदस्त अवलोकनशक्तीचा अचंबा वाटू लागला. नारायण, अंतू बर्वा, चितळे मास्तर, हरितात्या, नंदा प्रधान, नाथा कामत, बबडू व इतर हे माझे नातेवाईक असावेत असं वाटू लागलं. हा चमत्कार या जादूगाराच्या लेखणीचा होता. मग मात्र पु. ल. यांना प्रत्यक्ष पहाण्याचे दैवी योग आले.

१९६४ साल असेल. आम्हा एन.सी.सी.च्या मुलांची त्यांच्याबरोबर भेट होण्याचा योग आला. पार्ला कॉलेजचे प्रिन्सिपॉल माननीय श्री. सी.बी. जोशी यांच्या ख़ास आमंत्रणावरून पु. ल. देशपांडे, आम्हाला कविवर्य ग.दि. माडगूळकर यांचे “जिंकू किंवा मरू” हे समरगीत शिकवण्यासाठी आले होते. त्या काळी मराठीच्या नांवाने कंठ दाटून न बोलतासुद्धा किंवा तोड-फोड़ आंदोलने न करतासुद्धा, मराठीवर मनापासून प्रेम करणारे लाखो लोक मुंबईत होते. रोझ डे, पिझ्झा डे, रिस्ट बँण्ड डे, फॅशन डे यांची लागण कॉलेजांना झाली नव्हती. स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंण्ट मिडियम शाळेमध्ये घालून, भर सभेत मराठी संस्कृती, मराठी भाषा/परंपरा याविषयी मुठी आवळून व शिरा ताणून बोलणारी नेते मंडळी अजून जन्माला आलेली नव्हती. मुंबईत मराठी बोलतांना कोणालाही लाज वाटत नसे (हल्लीच्या ‘शोभाडे’ परिभाषेत डाउनमार्केट). उलट अभिमानाने लोक मराठी बोलत. भाजीवाले वसईचे असत. त्यांच्या व्यवसायाशी ईमान राखत. दूधवाले स्वत:ला गवळी म्हणवत. हिंदी भाषा ही हिंदी चित्रपटांपुरतीच मर्यादित होती.

तर सांगत काय होतो, तेव्हां पु.ल. देशपांडे यांनी आम्हाला ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ हे समरगीत आमचे दिव्य आवाज सहन करीत आम्हाला शिकवलेच पण त्यानंतर ‘वंदे मातरम्’ हे बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय यांचे स्फूर्तिदायक गीतही आमच्याकडून म्हणवून घेतलं.

त्यानंतर बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, हंसवण्याचा माझा धंदा यामधून रंगभूमीवरचे पु. ल. भेटतच राहिले. आणि नस्ती उठाठेव, खोगीरभरती, असा मी असा मी, बटाट्याची चाळ, हंसवणूक, पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा, तुझं आहे तुजपाशी, पु. ल. एक साठवण, गणगोत या पुस्तकांतून आमच्याशी संवाद साधत राहिले.

पु.ल. यांच्या साहित्याचं एक वैशिष्टय आहे. त्यांची वाक्यं आपल्याला मुद्दाम लक्षांत ठेवावी लागत नाहीत. ती वाचता वाचता आपल्या शरीरांत भिनून जातात. आपली होऊन जातात. मग ते चितळे मास्तरांचे “अरे पुरुषोत्तम, या मास्तराच्या बायकोच्या गळ्यात नाही पण डोळ्यांत मात्र मोती पडले हो !” हे वाक्य असो किंवा “कशाला हवी ती वीज ? हे दळीद्रच बघायला ना ? या पोपडे उडालेल्या भिंती, ही गळणारी कौलं बघायला वीज हो कशाला ?” हे अंतू बर्व्याचं वाक्य असो. ते थेट अंत:करणाला भिडतं. “मुळांत मला तो मुद्दलातला घोडाच दिसत नव्हता, तर त्यावर चढ़लेलं हे व्याज कुठून दिसणार ?”......“सांगा बघू हा फोटो कुणाचा...तीन चान्स” अहो म्हणाले. वास्तविक त्या फोटोतली व्यक्ती चांगल्या तीन हनुवट्याचा भार घेउन, माझ्या समोर बसली होती. “ही देविकाराणी किंवा दुर्गा खोटे कां हो ?” माझ्या या वाक्यावर ‘अहो’ तुडूंब खूष झाले. “परवा तो गजानन तुला काय समजला ग ?” “ईश्श वहिदा रेहमान.” जमेल तेवढं लाजत सौ म्हणाल्या. माझ्या आधी त्या घरांत गजानन नांवाचा चतुर पुरुष येउन गेला होता हे मी ताडले. ” असे शब्दनिष्ठ विनोद किंवा प्रसंगनिष्ठ विनोद ही जरी पु.ल. यांच्या विनोदाची खासियत असली, तरीही त्यांच्या कथेचा शेवट बऱ्याच वेळा कारुण्याकड़े झुकतो. मग तो नारायण या व्यक्तिचित्राचा शेवट असो किंवा हरितात्या असो किंवा बटाट्याची चाळीचं स्वगत असो. वाचकाच्या डोळ्यांत हंसता हंसता पाणी आणण्याची ताकद त्यांच्या शब्दांत आहे.

पण पु. ल. यांचं पुस्तक घरातच वाचावं. अहो बसमध्ये वाचत असतांना अचानक "आणि हा आमचा संडास"... “अरे वा !!इथे पण ऑटोमेटिक होतं की कुंथावं लागतं ?(मी आणि माझा शत्रुपक्ष)” असं वाक्य आलं आणि हंसू अनावर झालं तर इतर लोकं, हा येडा एकटाच कां हंसतो आहे ? असा चेहरा करून बघतील.

पु. ल. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा पार्ल्याला टिळक मंदिराच्या प्रांगणात त्यांची सत्कार सभा झाली. आचार्य अत्रे, दाजी भाटवडेकर, श्रीकांत मोघे, रामुभय्या दाते अशी बड़ी बड़ी मंडळी (आत्ताच्या भाषेत सेलिब्रेटी) व्यासपीठावर होती. आचार्य अत्रे यांनी आपल्या भाषणात सांगीतलं “आम्ही फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. होऊन बाहेर पडलो आणि पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म झाला.” या अत्यंत बादरायण संबंध असलेल्या वाक्याला, केवळ अत्रे बोलले म्हणून श्रोते हंसले. त्यानंतर पु. ल. बोलायला उभे राहिले तेव्हां अत्रे यांच्या त्या वाक्याचा संदर्भ घेत पु. ल. म्हणाले “आचार्य अत्रे बी.ए. झाल्यावर माझा जन्म झाला, असे म्हणण्याऐवजी, राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.” आणि टाळ्याच्या कडकडाटाने तो परिसर दणाणुन गेला.


साहित्य अकॅडमीचं पारितोषिक पु. ल. यांना मिळालं,त्या पारितोषिक वितरणसोहाळ्याप्रसंगी दिल्ली येथे इंग्लिशमधून भाषण करतानाही त्यांनी नर्म विनोदाची पखरण केली. उदाहरणच द्यायचं तर : “I had written about Barbers in one of my articles and there was a full throated protest from Barber community. They sent me a Legal Notice, which said that “I have hurt their professional Pride”. However there was a printing error. Instead of Professional Pride, it said Professional Bride. And now even my wife is watching me with suspicion” या वाक्यावर ते सभागृह हास्यस्फोटात बुडून गेलं.


ज्ञानपीठ पारितोषिकावरून आठवलं. कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहिर झालं होतं. पार्ले टिळक शाळेच्या मैदानावर त्यांचा सत्कार समारंभ होता. व्यासपीठावर स्वत: कुसुमाग्रज, ना. ग. गोरे, शंकर वैद्य, डॉ. सरोजिनी वैद्य, पु.ल. देशपांडे असे मान्यवर होते. शंकर वैद्य सरांनी कुसुमाग्रजांच्या काव्य प्रतिभेचे रसग्रहण करतांना “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, दिवसाच्या वेशीवर उभे प्रकाशाचे दूत” या कवितेतील हळवा प्रणय अशा ओघवत्या भाषेत उलगडला की श्रोते काव्यानंदांत धुंद झाले. वैद्य सरांनंतर पु. ल. बोलायला उभे राहिले. पु. ल. म्हणाले कुसुमाग्रजांच्या कवितांनी आमचं तरुणपण रोमँण्टिक केलं. पण आत्ता शंकर वैद्य ती कविता अनुभवताना इतके रंगले होते, की पाठीमागून सरोजिनी बाई “अहो पुरे...अहो पुरे” म्हणताहेत, याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. पु. ल. यांच्या या अवखळ टिप्पणीवर कुसुमाग्रजांनी जोरांत हंसून ना. ग. गोरे यांना टाळी दिली आणि समस्त श्रोत्यांनी जोरदार हास्याने सलामी दिली. पु. ल. मात्र ‘आपण त्यांतले नव्हेच’ असा मिष्किल चेहरा करून बघत होते.

हजरजबाबीपणात पु.ल. यांचा कोणी हात धरू शकणार नाही. एकदा एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं, ओरिएंट हायस्कूल मध्ये तुम्ही शिक्षक म्हणून असतांना ‘सत्तेचे गुलाम’ या मामा वरेरकर यांच्या नाटकांत तुम्ही व सुनिता ठाकुर यांनी एकत्र काम केलं होतं. त्याचं पुढे काय झालं ? एक क्षणही न दवड़ता पु. ल. म्हणाले ‘ काय होणार. तिच्याकडे सत्ता गेली. मी गुलाम झालो’ आणि मुलाखतकर्त्यालाही हंसू आवरेना.

एकदा एका समारंभात पु. ल. दामूअण्णा मालवणकर व आणखी एक त्यांचे स्नेही बसले होते. तेवढ्यात भारती मालवणकर तिथे आल्या व दामूअण्णांशी बोलून गेल्या. स्नेह्यांनी पु. ल. यांना विचारले “या कोण ?” त्यावर पु.ल. यांनी त्या दामूअण्णांच्या कन्या” असे उत्तर दिले. ‘वाटत नाहीत’ अशी त्या स्नेह्यांची प्रतिक्रया आल्याबरोबर पु.ल. म्हणाले “त्यांचा ‘डोळा’ चुकवून जन्माला आली आहे.”

एकदा सुधीर गाडगीळ माणिक वर्मा यांची मुलाखत घेत होते. माणिक ताई आणि त्यांचे पती यांची भेट कशी झाली. कोण कुणाला काय बोलले ? प्रेमाची प्रथम कबूली कोणी दिली ? असे प्रश्न गाडगीळ खोदून खोदून विचारत होते. व माणिकताई संकोचाने उत्तर द्यायचे टाळत होत्या. तेवढ्यात समोर बसलेले पु.ल. मोठयाने म्हणाले “ अरे सुधीर, त्यांच्या वर्मावर बोट ठेवू नको रे ” आणि सभागृहांत एकच हास्य कल्लोळ झाला.

"आम्ही जातो आमुच्या गांवा" या चित्रपटांत नायिकेला पहायला एक फॅमिली येते. तो मुलगा नायिकेला पसंत नसतो. त्याला पिटाळून लावण्यासाठी तीन चोर त्यांच्या जेवणांत जमालगोटा मिसळतात व मग त्या फॅमिलीची टॉयलेटच्या दिशेने पळापळ होते, असा तो विनोदी सीन होता. या चित्रपटाबद्दल पु.ल. देशपांडे यांना त्यांची प्रतिक्रिया एका समिक्षकाने विचारली. यावर चेहरा गंभीर ठेवून पु.ल. म्हणाले " चित्रपटाला 'मोशन पिक्चर' असं कां म्हणतात ते मला आज कळलं".

पण रसिकांना सतत हंसत ठेवणाऱ्या या देवदूताचं आगळवेगळं रूप लोकांनी पाहिलं ते “१९७६च्या आणिबाणी पर्वांत”. त्यावेळी पु.ल.च्या शब्दांना खड्गाची धार चढली होती. अवघा महाराष्ट्र त्यांनी आपल्या लेखणी आणि वाणीने ढवळून काढला. सत्तधाऱ्यांना कांपरे भरले. त्यांनी सारासार विचारबुद्धी बाजूला ठेवून पु.ल. यांच्यावर गर्हनीय टीकास्त्र सोडलं. पण हा पु.ल. यांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्याच्या पवित्र्याचा विजय होता. ज्यांनी पु.ल.विरुद्ध ते उदगार काढले, त्यांनी त्या पर्वानंतर स्वत:च्या मूर्खपणाबद्दल खेद व्यक्त केला. अर्थांत पु.ल. ना कशाचीच गरज नव्हती. सरकारच्या मेहरबानीवर ते जगत नव्हते. उलट त्यांनी आपल्या साहित्यातून, नाटकातून जो पैसा कमावला त्याचा विनियोग समाजातील दुर्बळ घटकांना बळ देण्यासाठी केला. कित्येक लाख रुपयांचा दानधर्म त्यांनी सेवाभावी संस्थांना मदत म्हणून केला. पण हे करतांना कॅमेरा, मिडिया, प्रसिद्धि या सर्व प्रलोभनापासून ते दूर राहिले. “इदंम् न मम” हे त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. आणि या सर्व प्रवासांत त्यांना सांवलीसारखी साथ केली ती त्यांच्या सहचारिणी सुनिताबाई यांनी. पु.ल. यांच्या साहित्यिक व कलेच्या जीवनाला त्यांनी शिस्त लावली. आर्थिक मदत कोणत्या संस्थेला करायची ते त्या ठरवत. आणि त्यांचे निर्णय योग्य असत. पु.ल. यांच्यासाठी त्यांनी प्रसंगी वाईटपणाही घेतला. पण त्या खंबीर राहिल्या म्हणून पु.ल. त्यांची रंगभूमी व साहित्याची सेवा प्रभावीपणे करू शकले, हे सत्य आहे.

पु,ल. देशपांडे या व्यक्तिमत्वाशी आपण प्रत्यक्ष भेट घेऊन बोलावं , असं माझ्यातल्या ‘सखाराम गटणेला’ खूप वेळा वाटे. पण ते शक्य झालं नाही. वास्तविक पु.ल. यांची सख्खी बहिण (भास्करभाई पंडित यांची आई) ही माझ्या सासऱ्यांच्या सख्ख्या धाकट्या बहिणीची सासू. भाऊबीजेच्या निमित्ताने पु.ल. देशपांडे आपल्या बहिणीकड़े मालाड येथे जात. व माझे सासरेपण त्यावेळी तिथे असत. दोघांचा चांगला स्नेह होता. भास्करभाईना सांगून मला पु.ल. यांना भेटता आलं असतं. पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे ते प्रत्यक्षांत येऊ शकले नाही. जयाकाकांना (सुप्रसिद्ध साहित्यिक/नाटककार श्री.जयवंत दळवी) मी सांगितले असते, तरी त्यांनी मला निश्चित पु.ल. यांना भेटवलं असतं. पण असो ! गतम् न शोच्यम् | हेच तात्पर्य.

पु. ल. यांच्या विनोदातील बारकावे समजायला मराठी भाषा मात्र व्यवस्थित यायला हवी. “मराठी लँग्वेज स्पिकायला ज़रा प्रॉब्लेम होतो” या वर्गातल्या मंडळीना पी.एल.देशपांडे यांच्या लिटरेचरमध्ये कसला एवढा ह्यूमर कंटेंट आहे ?असाच प्रश्न पडेल. .

पु. ल. नांवाचा हा महासागर माझ्या या चार ओळीच्या छोटया ओंजळीत मावणं अवघड आहे. तस्मात ‘आणखी पु. ल.’ नंतर सावकाशीने.

@ © अनिल रेगे.
१२ जून २०१९.
मोबाईल : 9969610585