Monday, November 22, 2021

चिमणी - (पाळीव प्राणी - हसवणूक)

कावळ्या मागोमाग येणारा पक्षी म्हणजे चिमणी. वास्तविक या दोघात काहीच साम्य नाही .केवळ काऊशी यमक जुळावे म्हणून चिऊ येते .मात्र काऊ आणि चिऊ ह्या निदान मुंबईच्या पक्षीजमातीतला अनुक्रमे बहूजन समाज आणि कनिष्ठ मध्यम वर्ग आहे. संखेने विपुल ,कष्टाने जगणारा .सुबक पिंजऱ्यात बसून डाळींबाचे दाणे खाणारा ऐदी नव्हे .काऊ चिऊ बिचारे आपली स्वताची बोली बोलतात त्याना नागरांची शिकाऊ पोपटपंची जमत नाही . खाण्यापिण्यातला चोखंदळपणा परवडत नाही .खाऊ तर पेरू नाहीतर मरू ! हे गाणे पोपटाला ठीक आहे. किंबहुना आधी पेरू खाऊनच ती असली गाणी म्हणत असतात. चिमणा-चिमणीची आर्थिक परिस्थिती कावळ्यापेक्षा जरा बरी असते. नाही म्हटले तरी त्या सभ्य घराच्या वळचणीचा आसरा घेतात. काही माफक प्रणयक़ीडा करतात. फिरत्या वाचनालयातील मासिकातल्या कथा वाचून कारकूनाची पोर -पोरी जितपत प़ेम करतात तितक्याच. कावळे मात्र अगदी मजुर वर्गातले. शहरात पहाटे उठून कामावर जायचे नशीबात असेल ते शिळेपाके खाऊन दाटीवाटीनी राहायचे. चिमणा-चिमणी त्या मानाने लोअर डिव्हीजन क्लार्कच्या दर्जाने राहतात. सुट्टीत देशावर जाऊन पिकाच्या तूरयावर बसून येतात. 'हे' कामावर गेल्यावर चार घरट्यातल्या चिमण्या जमून मंडळे चालवतात थोडा चिवचिवाट करतात. एका खोलीच्या घरट्यात का होईना पण स्वतंत्र संसार थाटतात. कावळ्यांची घरे मजुराच्या खुराड्यासारखी दृष्टी आड सृष्टीत मोठ्या मोठ्या लोकांच्या पंख्यावर दिव्याच्या टोपणात, दिवाणखान्याच्या तुळईजवळ पोट भाडेकरू म्हणून राहण्याची धिटाई चिमण्याना जमते तशी कावळ्याला जमत नाही.

ह्या पक्ष्याला विलक्षण न्यूनगंड आहे. तो चिमण्या सारखा किंवा पारव्यासारखा एकदम कधीही घरात शिरत नाही. चिमण्याचिमणीपैकी चिमणी हा स्त्री समाज बराच पुढारलेला असल्याने तीही संसाराला हातभार लावते कावळी चारचौघात मोकळेपणाने वावरताना दिसतच नाही. मी तर तशी कावळी काळी की गोरी पाहिलीच नाही. गोरी नसावी कारण इतक्या कावळ्यापैकी एक तरी आईच्या वळणावर गेला असता. काक समाजात काकूना फारसे पुढे येऊ देत नसावेत म्हणूनच काॅलेजमधल्या मागासलेल्या मुलीना "काकू म्हणत असावेत .की काय ? कावळी मी पाहीली नाही तरी दामले मास्तर मुलीना "ए कावळे" म्हणत हे ऐकले आहे. त्याना गोविंदा ,अंतू ,हरी ,वेणू प़भी इत्यादी नावे समोर दिसत असूनही आठवत नसत. आमच्या काळी अमिताभ हर्षवर्धन,आशुतोष ,अर्चना सस्मिता इत्यादी मास्तरांची कवळी उडवणारी नावे नव्हती. पण आमची नावे सोपी असूनही दामले मास्तर बैलोबा ,गाढवा ,कावळे याच नावाने हाक मारत असत. हजेरी देखील ,देशपांड्या ,फडक्या ,साठ्या अशा लाडीक नावाने घेत असत .इतक्या गद्य वातावरणात बालपण गेल्यावर कुठली फुले व कुठले पक्षी ? खिडकीपाशी आपण होऊन येणारे कावळे चिमण्या आणि तळमजल्यावरच्या वाण्याकडले वळचणीला घुमणारे पारवे सोडले तर आमच्या बालजीवनातून पक्षी केव्हाच उडले होते आमच्या लहानपणी पक्षी उडत नव्हते असे नाही .पण चाळीच्या खिडकीतून जिथे आकाशच दिसायची पंचायत तिथे पक्षी कुठले दिसायला ?

पु.ल. देशपांडे 
(पाळीव प्राणी  - हसवणूक)

1 प्रतिक्रिया:

Unknown said...

Wahh.... Khupach sundar.... Pratek wakya wachatana hasu awaratach nahi.... Dhanyawad bhai.... Tumachya likhanala salam.... 🙌🙌🙏🤗