Wednesday, May 25, 2022

पुलंनी श्रीकांत मोघे यांच्यावर केलेली कविता

वाऱ्यावरची वरात यात काम करणाऱ्या सगळ्या परिवाराला २५ डिसेंबर १९७० ला भाईकाकांनी (पुलं) त्यांच्या सांताक्रूझ येथील ‘मुक्तांगण’ घरात भोजनाचे आमंत्रण दिले. कारण जानेवारी १९७१ मध्ये भाईकाका पुण्याला प्रस्थान हलवणार होते. जेवायला वाढेपर्यंत सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्याच वेळी भाईकाकांनी वरातीमधील अठरा कलावंतांवर लिहिलेल्या विनोदी कविता सगळ्यांना वाचून दाखवल्या. डॉ. भाईकाकांनी (श्रद्धानंद ठाकूर) त्या रेकॉर्ड केल्या होत्या. त्या पैकी श्रीकांत मोघे यांच्यावर केलेली कविता....

'वाऱ्यावरची वरात' मधील श्रीकांत मोघेंचे ‘दिल देके देखो’ हे गाणे आणि नृत्य दोन्ही गाजले.  त्यावेळी त्यांचे लग्न व्हायचे होते आणि वधूच्या शोधात होते.
हाच तो श्रीकांत मोघे, सतत पहिल्या ओळीत बघे
पहिल्या ओळीत तिसरी खुर्ची, तिच्यात होती लवंग मिर्ची
अटकर बांधा चिकना फेस, भुरुभुरु उडत होते केस
नाटक संपता श्रीकांत मोघे, भरभर मेकप पुसून निघे
गर्दी म्हणते तो बघ तो बघ, श्रीकांत मोघे धावला लगबग
दिसली पुनरपि गुप्त जाहली, मनात त्याच्या ओळ उमटली
गर्दीमध्ये दिसली पोर, ढगातून चंद्राची कोर
युगायुगांचा चातक मोघे, पुनः धावला वेगेवेगे
काय जाहले कुणास न कळे, चटकन भिडले दोन्ही डोळे
आणि उमटला मुखात अय्या, माशाल्ला क्या कहने भैय्या
श्रीकांतही मग अंतर कापित, ठेवणीतले हसू दाबित
जवळ पोहोचला दोन हातांवर, गळ्यातला सावरीत मफलर
माफ करा हं मिस्टर मोघे, अभिनय पाहून आम्ही दोघे
खूश जहालो, फारच सुंदर; आपण म्हणजे दाहावे वंडर
जरा बावरून जाती मोघे, शब्द ऐकता आम्ही दोघे
कोण दुजा हा हलकट साला, श्रीकांत मनी म्हणता झाला
देते तुमची ओळख करूनी, दुःखावरती एक डागणी
बरं का हे प्रिय डॅडी माझे, मेघ्यांच्या मनी सतार वाजे
वावा, वावा मिस्टर मोघे; तुमच्या पुढे फिक्के अवघे
तुमचा घ्यावा टिपून पत्ता; कुठली पेठ, कुठला रस्ता
ही माझी कन्या जयमाला, नुकताच हिचा विवाह ठरला
अवश्य यावे कुटुंब घेऊन, आत्ता देतो तुम्हां निमंत्रण
वर आणखी बसला बुक्का, वहिनींनाही आणा बरं का
प्रपंच झाला होती लेकरे, वाऱ्यावर का उडति पाखरे
फुलांतुनी जर होणे अश्रू, नित्य कशाला करणे स्मश्रू
रोज कशाला तयार होणे, भेटणार जर केवळ मोने
‘श्रीं’ची काही उणीव नसता, कांता नच का मिळे श्रीकांता.


1 प्रतिक्रिया:

माधव said...

हे वाचलं नव्हतं कधी!!
अफलातून!!