Thursday, September 8, 2022

पुन्हा कधीच आयुष्यात कुणाचा ‘ऑटोग्राफ’ घेतला नाही - धनंजय देशपांडे

लहानपणी अनेकांना असतो तसा मलाही मोठ्या लोकांच्या सह्या घेण्याचा व त्याचा संग्रह करण्याचा छंद होता. लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये गॅदरिंगला मंगेश पाडगावकर, क्रिकेटपटू एकनाथ सोलकर, जितेंद्र अभिषेकी अशी माणसे यायची. त्यांच्या सह्या घेतलेल्या. मिळेल त्या कागदावर सही घेऊन नंतर ती एका विशेष अशा रजिस्टरटाइप वहीत चिकटवून ठेवायचो.

... पण एक घटना अशी घडली की त्यानंतर मी आयुष्यात कधीच कुणाची सही घेतली नाही.

ते साल होते १९८४, ऑगस्टचा महिना. लातूरहून पुण्यातील अभिनव चित्रकला महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी आलेलो. होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी शिवाजीनगरला विद्यार्थी सहायक समितीचे वसतिगृह होते. तिथं प्रवेश मिळालेला. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे मिळावेत म्हणून तिथं ‘कमवा व शिका’ योजना असायची. अभ्यास सांभाळून रोज दोन तास बाहेर कुठे तरी काम करायचे अन् त्याचे जे १०० रुपये मिळायचे ते वसतिगृहात राहणे-जेवणे शुल्क म्हणून जमा व्हायचे. बाकी शिक्षणखर्चासाठी चित्रकार असलेला मोठा भाऊ मनिऑर्डर करायचा.

...तर त्या काळात टिळक रोडवरील ता. रा. देसाई यांच्या गॅस सिलिंडर वितरण कंपनींत मी कामाला असायचो. पावत्या फाडणे, सिलिंडर नोंदणी करणे वगैरे!! तर असेच एक दिवस ते काम उरकून सहा वाजता पायीपायी लकडी पुलावरून हॉस्टेलकडे निघालो होतो. अन् अचानक त्या पुलावरील फुटपाथवरून साक्षात पु. ल. देशपांडे अगदी सावकाश असे एकटेच चालत चालत जाताना दिसले. मी एकदम आनंदित झालो. मला अजून आठवतंय, की त्या दिवशी कामावरून निघताना तिथले ज्योती गॅस कंपनीचे एक ब्रोशर माझ्या हातात होते. त्याच्या पहिल्या पानावर बरीच पांढरी जागा होती. तर क्षणभर वाकून ‘पुलं’ना नमस्कार केला. त्यांनी एकदम दचकून माझ्याकडे पाहिले. (कदाचित त्यांना सखाराम गटणे पुन्हा समोर आला की काय असं वाटलं असावं) मग मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगून त्या गॅस कंपनीच्या ब्रोशरच्या पानावर त्यांना ‘ऑटोग्राफ प्लीज’ म्हणालो. त्यांनीही हसत हसत त्यावर सही केली; पण गडबड काय झाली की ते ब्रोशर गुळगुळीत कागदाचे असल्याने त्यावर बॉलपेन नीट उमटेना. मग ‘पुलं’नीच जरा जोरात पुन्हा सही गिरवली अन् हातात दिली.

आणि म्हणाले, ‘सही गोळा करणं मी समजू शकतो; पण त्यापेक्षा ज्यांची सही घेतोस त्यांचे वाचत पण जा आणि नुसते वाचू नको तर त्यातलं चांगलं काही असेल तर जगण्यात ते आणत जा. तर या तुझ्या छंदाला अर्थ आहे.’ असं म्हणून पाठीवर हलकेसे थोपटून ते पुढे गेले.
              
त्यानंतर असेच काही महिने गेले असतील. लेखिका, कवयित्री गायिका अशी चौमुखी प्रतिभा लाभलेल्या माधुरीताई पुरंदरे आमच्या हॉस्टेलला अभिनय शिकवायला यायच्या. तर त्या वर्षी गॅदरिंगसाठी म्हणून त्यांनी ‘पुलं’चेच एक नाटक बसवले होते. बऱ्यापैकी ते बसलेही होते. तर त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून ‘पुलं’ना बोलवावे असे ठरले. आमच्या त्या हॉस्टेलचे ‘पुलं’ देणगीदार देखील होते. लक्षावधी रुपये त्यांनी तिथं दिलेले. तर त्यांना निमंत्रण देण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी व संस्थेचे श्री. क्षीरसागर सर ‘पुलं’च्या घरी गेलेलो. रीतसर निमंत्रण दिले अन् निघताना मी सहज त्यांना म्हणालो, ‘सर, मी तोच सह्या घेण्याचा छंद असलेला, लकडी पुलावर तुमची सही घेणारा.’ (अर्थात त्यांना ते आठवण शक्यच नव्हतं; मात्र नुसतं हसून त्यांनी ते ऐकलं. अन् म्हणाले, ‘नंतर अजून कुणाकुणाच्या घेतल्यास रे बाबा?’

मी म्हणालो, ‘नाही सर, नंतर कुणाचीही सही घेतली नाही. मी सह्या घेणं बंद केलं आहे; मात्र त्या सर्वांची पुस्तकं वाचणं सुरू आहे,’ असं म्हणून व. पु. काळे यांना मी लिहिलेली पत्रं व त्याचे त्यांनी दिलेले उत्तर ‘पुलं’ना दाखवले. मग मात्र ते मनापासून हसले. कदाचित त्यांनी मागे कधी तरी पेरलेलं आज त्यांना उगवून येताना दिसलं असेल.

डीडी क्लास : जेव्हा सहीचा ‘ऑटोग्राफ’ होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी झालेला असता, असं म्हटलं जातं. कदाचित ते खरेही असेल; पण जसे ‘पुलं’नंतर मी कुणाचीच सही घेतली नाही, तशीच नंतर माझी काही पुस्तकं प्रकाशित झाली, काही स्टेजशो झाले, व्याख्यानमाला सुरू झाली; मात्र आजवर मी कधीच कुणाला कुणीही मागितली तरी सही दिली नाही. याचे कारण एकच. पुलं जे म्हणाले तेच, की सहीपेक्षा त्या माणसाचे विचार पाहा. त्यावर विचार करा. हेच मला पटलं. लोकांना आनंद देत राहा हा त्यांच्या जगण्यातून त्यांनी दिलेला संदेश पॉइंट झिरो झिरो वन पर्सेंट का होईना, नंतरच्या जीवनात अंमलात आणता आला, हे समाधान नक्कीच मला आहे!

पण ही मोठी माणसं मोठी का असतात? तर अशाच अनेक छोट्या छोट्या संदेशातून ते अनेकांचे जीवन उजळून टाकतात. माझ्या मित्र परिवारातील अनेक जण आज खऱ्या अर्थाने सेलेब्रिटी झालेत. अनेक नामवंत झालेत. ते पाहताना समाधान होतं; पण त्याच वेळी त्यांच्यापैकी एकदोन अपवाद वगळता कुणीही ऑटोग्राफ देण्याच्या व्यसनात अडकले नाहीत. कष्ट करावेत. मोठं व्हावं, नाव कमवावं, हे सगळं नक्कीच; पण त्याच वेळी जमिनीला धरून राहावं. ते जास्त प्रभावी.

नाही का?

- धनंजय देशपांडे
मूळ स्रोत -> https://www.bytesofindia.com/P/MZPRCG


0 प्रतिक्रिया: