Wednesday, March 5, 2025

सुखाची जागा

स्वातंत्र्य आणि साहित्य हे नेहमी आत्मतेजोबलाने उभं राहत असतं. टेकू देऊन उभे राहतात ते राजकारणातले तकलादू पुढारी. हे महाराष्टाचे अमके अन् तमके! सीटवरून खाली आले की मग कोण? साहित्यात असं होत नाही. शेकडो वर्षांपूर्वी झालेला तुकाराम आजही आपल्या मदतीला येतो. कालिदास आजही आपल्याला आनंद देऊन जातो. भवभूती, शेक्सपिअर, टॉलस्टॉय, आमचे ज्ञानेश्वर आजही आपल्या मनाला शांती आणि आनंद देऊन जात असतात.

प्रतिकूल परिस्थिती सर्वांनाच असते. श्रीमंत लोकांकडे तुम्ही गेलात तर त्यांच्याकडे अपचनाचं दुःख असतं आणि गरिबांकडे गेलात तर उपाशीपणाचं दुःख असतं. पोटाचीच दोन्ही दुःखं. उलट एखादा मनुष्य म्हणतो - मी मजेत आहे. तो तेव्हाच मजेत असेल जेव्हा अवघ्या जगाचं सुखदुःख हे त्याला आपलं आहे असं वाटत असेल! साहित्यिकाची हीच भूमिका आहे. अशा या भाषेतून फुलोरा फुलवणं हे तुमचं काम आहे. तो निरनिराळ्या तन्हेनं फुलवा. कुठलीही सक्ती लादून घेऊन नका. साहित्य अनेक तऱ्हेने फुलते.

एक गोष्ट आहे - एका हॉस्पिटलमध्ये एका खोलीत दोन पेशंट होते. एकाला खिडकीजवळची जागा होती अन् दुसऱ्याला आतल्या बाजूची. दोघेही सीरियसच होते. खिडकीजवळची जागा ज्याला होती तो त्यातल्या त्यात बरा होता. तो खिडकीच्या बाहेर बघायचा अन् या पेशंटला सांगायचा; 'बरं का, काय सुंदर फुलबाग आहे इथं. बाहेर काय सुरेख फुललं आहे. सुंदर प्रकाश आहे, मुलं खेळताहेत, फुलं काय सुरेख आली आहेत.' असं तो वर्णन करून सांगायचा. दुसऱ्याला सारखं वाटायचं, ही जागा मला मिळायला पाहिजे होती. कधीतरी ती कॉट मला मिळावी. हा बरा तरी होऊ दे नाहीतर मरू दे तरी।

आणि एके दिवशी सकाळी काय झालं. तो जो नेहमी वागेचं वर्णन करून सांगणारा होता तो मनुष्य मेला लगेच दुसऱ्याने उत्साहाने डॉक्टरला सांगितले की, 'चला, मला त्या कॉटवर न्या.' डॉक्टर म्हणाले, 'नको. तिथं कशाला !' तरी तो म्हणाला, 'तिथेच मला जागा द्या' डॉक्टरनी नाइलाजानं त्याला तिथं झोपवलं. उत्साहाने त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. तर तिथं बाग नव्हती. काही नव्हतं. तिथे एक कबरस्तान होतं. तो याला बरं वाटावं म्हणून बागेचं वर्णन करून सांगायचा.

साहित्यिकाचं हेच काम आहे. जीवनात अनेक दुःखं असतात आणि, 'वाबारे, इतकी दुःखं असली तरी जीवन इतकं वाईट नाही. जीवनामध्ये अजूनही चांगलं होणार आहे. हे सांगणं साहित्यिकाचं काम आहे. जीवनावर माणसाचे अतोनात प्रेम आहे. टॉलस्टॉयची एक गोष्ट आहे - एक माणूस असतो. त्याच्यामागे वाघ लागतो. हा धावत धावत जातो. कोठे तरी झाडावर चढायला बघतो. जे झाड दिसतं ते काटेरी असतं. तरी तो कसा तरी वर चढतो. वर चढायला लागल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की, वाघ यायला लागला आहे आणि आपणाला खायला एक अजगर आणखी वर त्या झाडावर चढतोय. आता काय करावं? कळत नाही. तो आणखी वरती जाण्याचा प्रयत्न करतो पण तिथे मधाचे पोळे असते. त्या मधाच्या पोळ्याला धक्का लागतो आणि मधाचा एक थेंब त्याच्या खांद्यावर पडतो. या सगळ्या गडबडीत तो ते चाटून घेतो. जीवनात इतक्या संकटांमध्ये मधाचा एक थेंब आपण चाटून घेत असतो. कोठेतरी एक एवढीशी सुखाची जागा आपण ठेवलेली असते. ही सुखाची जागा मला एकट्याला न मिळता सगळ्या समाजाला मिळावी असे जेव्हा वाटायला लागते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो.

पु. ल. देशपांडे
साहित्य सेवा मंडळ, विटा, यांनी आयोजित केलेल्या ग्रामीण साहित्य सम्मेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही अंश.. (२४-१-१९८२)
पुस्तक – मित्रहो

0 प्रतिक्रिया: