Leave a message
Showing posts with label वंगचित्रे. Show all posts
Showing posts with label वंगचित्रे. Show all posts

Tuesday, May 24, 2022

रेल्वे स्टेशन आणि फलाट -- वंगचित्रे

पुल वयाच्या ५०व्या वर्षी बंगली भाषा शिकण्यासाठी पश्चिम बंगालला पोचले शांतिनिकेतनमध्ये राहून त्यांनी या मधाळ भाषेचे धडे गिरवले. त्याचदरम्यान आलेले अनुभव, तेथील आनंदाचा ठेवा त्यांनी वंग-चित्रे मधून शब्दबद्ध केला आहे. हे केवळ प्रवासवर्णन नसून, तेथे त्यांना घडलेल्या 'आमार सोनार बांगला'चे दर्शन यात घडते. खास पुलं टचमुळे वंग प्रांताची ही शब्दसैर रंजक, प्रसन्न झाली आहे. ह्या पुस्तकातील हा छोटासा भाग. पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.

...आणि आम्ही बंगालच्या दिशेने निघालो. अलाहाबादमार्गे बरद्वानला जाणारी गाडीधरायची होती. रिझर्वेशन वगैरे सर्व काही यथासांग होते, तरीही आजवरच्या शिरस्त्याला धरून गाडी सुटायच्या दीड तास आधी येऊन बोरीबंदरला पोहोचलो. फलाटावर त्यावेळी फक्त काही हमाल, पोर्टर, मी, माझी पत्नी आणि आमच्याचबरोबर आलेले आमचे दोन तीन स्नेही यांखेरीज कोणी नव्हते. गाडी फलाटाला लागत होती. त्याअर्थी ड्रायव्हर आला असावा. काही वेळाने स्टेशन आळोखे पिळोखे देऊन उठू लागले. हळूहळू जागे होणारे थिएटर, रेल्वे स्टेशन किंवा मोठे शहर वगैरे पाहायला फार मजा येते. रेल्वे फलाटाचे तर, एरवी गरीब गाईसारख्या दिसणार्‍या बाया अंगात देवीबिवीचा संचार होऊन घुमू लागल्यावर जशा हांहां म्हणता थयथयाट करतात तसे असते. अजगरासारखे शांतपणाने आडवे पडलेले फलाट गाडी सुटायचा मुहूर्त अतिसमीप आला की घुमायला लागतात. निळ्या कपड्यांतले पोर्टर, लाल डगलेवाले हमाल, खाकी कपड्यांतले रेल्वे कर्मचारी, सफेद कपड्यांतले एस्‌.एम्‌., ए.एस्‌.एम्‌. असा हा भगतगण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चकरा मारायला लागतो. डब्याच्या टपावर चढून पाणी भरायला सुरुवात होते. 

डब्यातले पंखे, बत्त्या ह्यांची डागडुजी सुरू होते. प्रवासी मंडळी आणि हमाल यांचा लपंडाव, मग हमालीच्या पैशावरून हुतूतू, असे खेळ सुरू होतात. ऐटबाज पॅसेंजर गावठी पाशिंजराकडे तुच्छतेने पाहू लागतात. आईबापांची बोटे सोडून वांड कारटी आइस्क्रीम-चॉकलेटवाल्यांच्या ढकलगाड्यांमागे धावू लागतात. रिझर्वेशनची यादी बाळगणार्‍या कंडक्टरचा पाठलाग सुरू असतो... गाडी सुटायच्या वेळेला तर ही लय इतकी बेहद्द वाढते की, सुनेच्या जाचाला वैतागून सासूने बोचके बांधून पाय आपटीत घर सोडून काशीयात्रेला जावे तशी ती आगगाडी शिट्ट्यांचा आक्रोश करीत फलाट सोडून धुसफुस धुस्‌ूफुस्‌ करीत निघते. आपल्या देशाची संस्कृती, देशबांधवांचा स्वभाव वगैरे काय दर्जाचा आहे याचे खरे दर्शन भारतीय रेल्वेच्या फलाटावर होते. भारतीय नेत्यांप्रमाणे फलाटावरच्या अनुयायांचा स्थायीभावदेखील “भांबावून हैराण होणे' हाच आहे. जो बघावा तो हैराण. कुणी हमाल हरवला म्हणून, कुणी तिकीट हरवले म्हणून, कुणी पाकीट मारले म्हणून, कुणी आपल्या रिझर्व जागेवर दुसराच माणूस तळ ठोकून बसलाय म्हणून, कुणी कंडक्टर सापडत नाही म्हणून, कुणी गाडी सुटायची वेळ झाली तरी निरोप देणारी माणसे आली पण जाणारी माणसे आली नाहीत म्हणून, कुणी डब्यातला पंखा चालत नाही म्हणून, कुणी संडासाच्या नळाला पाणी नाही म्हणून - नाना कारणांनी हैराण झालेल्या आपल्या देशाचे रेल्वे फलाट हे आदर्श मॉडेल आहे ! 

मला तर गाडी वेळेवर सुटली नाही तर बहुधा गार्डाच्या कार्ट्याने बापाच्या खिशातली शिट्टी पळवल्यामुळे तो देखील हैराण झाला असेल अशी शंका येते. बोरीबंदरच्या फलाटावरचा हा देखावा पाहात होतो, तेवढ्यात सिग्रलाचे तांबारलेले डोळे हिरवे पडले, गार्डाच्या शिट्टीला इंजिनाच्या शिट्टीचा जबाब मिळाला आणि गाडी हलली.

वंगचित्रे
पु. ल. देशपांडे

a