Leave a message
Showing posts with label शरद पवार. Show all posts
Showing posts with label शरद पवार. Show all posts

Thursday, October 21, 2021

पु.ल. आणि गदिमांची एक आठवण -- शरद पवार

बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असे. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्य, कला, संगीत, नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असे. त्या काळी सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये ‘सानेगुरुजी कथामाला’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा होई. आमच्या बारामतीच्या ‘सानेगुरुजी कथामाले’च्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ख्यातनाम कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर आणि सिद्धहस्त साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना एकत्रितपणे आमंत्रित केलं होतं. ठरल्याप्रमाणे कथामालेचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीनं पार पडला. या मोठ्या पाहुण्यांसाठी माझ्या घरीच दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्याप्रमाणे कार्यक्रम संपवून आम्ही घरी आलो.

भोजनाची सर्व तयारी झालेली होती. पानंसुद्धा घेतलेली होती. तर्कतीर्थांच्या पानाभोवती सुरेख रांगोळी घातलेली होती आणि पानात सर्व शाकाहारी पदार्थ वाढलेले होते. बाकी आम्हा सगळ्यांच्या ताटांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती. जेवण सुरू करण्यापूर्वी तर्कतीर्थांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं - ‘‘हा ‘पंक्तिप्रपंच’ कशासाठी? तसं बघितलं तर, तुमच्या पानात जे वाढलेलं आहे, तेही चालतं आम्हाला आणि जमलंच तर आम्ही घेतोसुद्धा!’’ हे ऐकून तर्कतीर्थांचं ताट बदलण्यात आलं. तर्कतीर्थ स्वत-च्या वाहनानं बारामतीला आलेले होते. त्यामुळं त्यांची परतीची सोय झालेली होती; परंतु गदिमा ऊर्फ अण्णा आणि पुलं यांना पुण्याला पोचवायचं होतं. त्या वेळी माझ्याकडं स्वत-ची जीपगाडी होती; परंतु एवढ्या थोरा-मोठ्यांना जीपनं प्रवास घडवावा, याबद्दल मला थोडा संकोच वाटत होता. गावातले माझे एक सहकारी भगवानराव काकडे बऱ्यापैकी सधन होते आणि त्यांच्याजवळ एक चांगली मोटारगाडीही होती. मी त्यांना विनंती केली - ‘‘आपण तुमच्या गाडीनं पाहुण्यांना पुण्यापर्यंत सोडू या.’’ माझे पाहुणे म्हटल्यानंतर साहजिकच काकडे यांची कल्पना अशी झाली, की कुणीतरी फार मोठी माणसं असली पाहिजेत. काकडे लगेच तयार झाले आणि आम्ही गदिमा व पुलं यांना घेऊन पुण्याकडं निघालो. काकडे स्वत-च गाडी चालवत होते आणि मी पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो होतो. प्रवास सुरू झाला तशी काकडे यांनी पाहुण्यांची विचारपूस करायला सुरवात केली. त्यांनी पहिलाच प्रश्न टाकला - ‘‘कोणच्या गावाकडचं म्हणायचं?’’‘‘आम्ही पुण्यालाच असतो,’’ असं उत्तर दोघांनीही दिलं. त्यांचा पुढचा प्रश्‍न - ‘‘काय काम करता?’’ आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल, याबाबत मी थोडासा धास्तावलोच होतो; तर अण्णांनी म्हणजे गदिमांनी उत्तर दिलं - ‘‘आम्ही लिव्हतो.’’

त्यांचा परत प्रश्न आलाच - ‘‘कुठं पोस्टाबाहेर बसता की मामलेदार कचरीसमोर?’’ आता संभाषणाची सूत्रं पुलंनी स्वत-कडं घेतली आणि सांगितलं - ‘‘मी पोस्टात बसतो आणि हे (गदिमा) मामलेदारांच्या कचेरीबाहेर बसतात.’’ काकडे यांचं समाधान अर्थातचं झालेलं नव्हतं.

त्यांनी पुन्हा विचारलं - ‘‘काय, घरदार चालंल इतकं पैसं मिळतात का ?’’

पुलंनी लगेच उत्तर दिलं - ‘‘लोक आम्हाला लिहिल्याचे बऱ्यापैकी पैसे देतात.’’ काकडे यांच्या शंका अद्यापही संपलेल्या नव्हत्या. त्यांनी पुढं विचारलं - ‘‘तुम्ही या एवढुशा कामाचे लोकांकडून फार पैसं घेत असला पाहिजे. आवं, जरा विचार करा...काय एक-दोन-चार तर कागद लिव्हायचे आन्‌ किती पैसं घ्यायचे? बरं, तुम्ही पडला शिकली-सवरलेली माणसं आणि तुमच्याकडं कागद लिव्हायला येणारा अडाणी, गरीब. हे काय बरोबर नाही. तुमचं सगळं शिक्षण तर सरकारच्या पैशातच व्हतं ना; मग थोडं माणुसकीनं वागा की राव. कशाला गरिबांचे तळतळाट घ्यायचे?’’ हे सगळं ऐकून महाराष्ट्राचे ते दोन मोठे साहित्यिक, अर्थातच गदिमा आणि पुलं, एकमेकांकडं बघून हसत होते. मीही या संभाषणात माफक सहभाग दाखवून शांतपणे बसलो होतो.

- शरद पवार
१५ फेब्रुवारी २०१५
सकाळ
a