Leave a message
Showing posts with label व्यक्ती आणि वल्ली. Show all posts
Showing posts with label व्यक्ती आणि वल्ली. Show all posts

Wednesday, July 26, 2023

नारायण

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.
मुळ स्त्रोत - विकिपीडिया

नारायण
"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?"
"नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर ---"
"नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? -- काय हे?"
"नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली ---"
"नारूकाका चड्डीची नाडी बांद ना ऽऽ ---"
"नारूभावजी, ही नथ ठेवून द्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून ---"
"नाऱ्या लेका, वर चहा नाही आला अजून ---व्य़ाही पेटलाय !"
"नारबा पटकन तीन टांगे सांगा ---"
पन्नास ठिकाणाहून पन्नास तऱ्हेचे हुकूम येतात आणि लग्नाच्या मांडवात हा नारायण हे हल्ले अत्यंत शिताफीने परत करीत उभा राहतॊ.
'नारायण' हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतॊ. कुठल्याही समारंभाला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून-ना-कुठून-तरी नातें लागणारा नातलग घरातं कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतॊ .
---ज्या दिवशी मुलगी पाह्यला म्हणून मंडळी येतात --- मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप, दूरचे काका (हे काका दूरचे असून नेमके या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात हे एक न सुटलेले कौटुंबिक कोडें आहे.),

नवरा मुलगा आणि मुलाचा मित्र. ह्या मंडळीत आठनऊ वर्षाची एखादी जादा चुणचुणीत मुलगीहि असते. आणि मग तिच्या हुषारीचं मुलीकडील मंडळी बरंच कौतुकहि करतात. मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा गप्पच असतो. नवऱ्यामुलाकरून चा मित्र समोरच्या बिऱ्हाडातून जरासा पडदा बाजूला करून पहाणाऱ्या चेहऱ्यावर नजर ठेऊन असतो. आंतल्या भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकींवर ठसवत असतात. मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! -- कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ?

भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. नवरी मुलगी नम्रतेची पराकाष्ठा करीत बसलेली असते. तिच्या कपाळावरचे धर्मबिंदु टिपण्यांत तिच्या बहिणी वा मैत्रिणी दंग असतात. आणि ती आठनऊ वर्षाची 'कल्पना', 'अर्पिता' किंवा कपर्दिका असल्या चालू फ़ेशनच्या नांवाची मुलगी कपाट उघडून त्यातल्या पुस्तकात डोके खुपसून, 'अगबाई ! वाचायची इतकी का आवड आहे ?' हे कौतुक ऎकत बसलेली असते. ती चहा नको म्हणते -- बिस्कीटाला हात लावत नाही -- लाडू 'मला नाही आवडत' म्हणते; एकूण स्वत:च बरंचसं 'कौतिक' करून घेते. ' कार्टीच्या एक ठेवून द्यावी' असा एक विचार मुलीच्या आईच्या डोक्यात येतो आणि 'भारीच लाडोबा करून ठेवलेला दिसतोय' हा विचार नवऱ्यामुलीलाही शिवून जातो.

एकूण ही सर्व मंडळी निरनिराळ्या विंचारात दंग असतां एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विषेश लक्श जात नाही. सुरवातीला मुलाच्या बापाने 'हा आमचा नारायण' एवढीच माफक ओळख करून दिलेली असते. आणि 'नारायण' संस्था ह्याहून अधिक योग्यतेची असते असेही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहील्याशिवाय कळू शकत नाही.हे सर्व नारायण लोक खाकी सदरा दोन खिशांचा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. मागल्या बाजूने मुलाण्याच्या कोंबड्या ठेवायच्या पेटाऱ्यासारखा ह्यांच्या धोतराचा सायकलच्या सीट मधे अडकून-निसटून बोंगा झालेला असतो. धोतराची कमालमर्यादा गुडघ्याखाली चारपाच बोटें गेलेली असते. डोक्याला ब्राउन टोपी असते. खाकी, ब्राउन वगैरे मळखाऊ रंग 'नारायण-लोकांना' फार आवडतात. वहाण घेताना कशी होती हें सांगणे मुष्किल असते. कारण तीचा अंगठा, वादी, पट्टा, हील, सगळे काही बदलत बदलत कायापालट होत आलेला असतो. परंतु उजव्या पायाचा आंगठा उडलेला असला म्हणजे नारायणला विषेश शोभा येते. आमचा नारायण सहसा कोट घालत नाही. एकदा स्वत:च्या लग्नात, एकदा दुसऱ्यासाठी मुलगी पहायला जाताना आणि एकदा मुन्सिपाल्टीत चिकटवून घेतलेल्या सदूभाऊंना कचेरींत भेटायला गेला त्यावेळी त्याने कोट घातलेला होता. घरोघरचे नारायण, कोट असा सणासुदीलाच घालतात. कोटाच्या कॉलरला मात्र ते न चुकता सेफ्टीपिन लावतात. ही दात कोरायला अगर वेळप्रसंगी कोणाच्या पायात काटा रूतला तर काढायला उपयोगी पडते. खाकी सदऱ्याच्या मात्र दोन्ही खिशात डायऱ्या, रेल्वेचे टाईमटेबल, प्रसंगी छोटेसे पंचांग देखील असते. मुलगी पसंत झाली, हुंडा, करणी, मानपानाचें बसल्या बैठकीला जमले की मुहुर्ताची बोलणी सुरू होतात आणि गाडे पंचांगावर अडते. आणि इथे नारायण पुढे सरसावतो.
"हे पंचांग ---" नारायण कोटाच्या खिशांतून पंचांग काढीत पुढे येतो.वा !! कृतज्ञ चेहऱ्याने वधूपीता नारायणाकडे पहातो.

इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते. आंतल्या बायकाही प्रसंगावधानी नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात. नारायणाचे कुठेच लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही ! आता चारी दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत "नारायणाला घ्या हो बरोबर" असा आग्रह होत असतो."मी सांगतो तुम्हाला, शालू भड्सावळ्यांच्या दुकानाइतके स्वस्त दुसरे कुठे मिळणार नाहीत." सुमारे आठनऊ निरनिराळ्या वयाच्या (आणि आकाराच्या) बायकांसह नारायण खरेदीला निघतो. सातआठ पिशव्या त्याच्याच हातात असतात. एका बाई बरोबर कापड खरेदी करणें म्हणजे मन:शांतीची कसोटी असते; पण नारायण आठ बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्याची चढउतर अत्यंत उत्साहाने करू शकतो. त्यातून त्यांना बस मध्ये आपण क्यूच्या शेवटी राहून चढवणे-उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते. पण नारायणाला त्याची पर्वा नाही. आता त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे. कचेरींत त्याचें लक्ष नाही. (तिथे क्वचितच लक्ष असतें परंतु ती उणीव हेडक्लार्कच्या घरी चक्का पुरवणें, मटार वाहून नेणे इत्यादी कामांनी भरून निघते.) एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगांत लग्न चढतें."काकू तुम्ही माझ ऎका, महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक द्रौपदी वस्त्रभांडारात आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा." मालकाच्या तोंडासमोर ही वाक्ये बोलायचे त्याला धैर्य आहे. बोहोरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कोठे काय मिळते याची नारायण ही खाकी शर्ट, धोतर, ब्राउन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे."बरं बाबा ---" काकू शरणचिठ्ठी देतात."
मामी ----- काकूंना खण पाहू दे, तोंपर्यंत नरहरशेटच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून येऊ---""हो आंगठीच ही माप आणलय जावईबुवांच्या ---"
"आंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे आंगठी टाकूं. मी काल बोललोय त्याला. आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी आंगठी --- सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय (ते ही त्याला ठाऊक आहे.) आज सोन्याची खरेदी होऊं द्या --- चला." निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायणामागून निघतात. गल्ली-बोळातून वाट काढीत त्यांना नरहरशेटजींच्या दुकानी नारायण नेतो."आंगठीचंही इथंच .... म्हणत होते" ----- अशी कुजबुज करण्याचा मामी प्रयत्न करतात. पण नारायण ऎकायला तयार नाही."मी सांगतो ऎका --- हं नरहरशेट, मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ ---""चारपाच दिवसात या --""हें असं अर्धवट नको -- नक्की तारीख सांगा -- मला सतरा हेलपाटे मारायला सवड नाही ---" नारायण सोनारदादांना सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील 'हाड' म्हणायची ताकद नसते. पण इथे अपील नाही. आता लग्न उभे राहिले आहे. आणि ते यथास्थित पार पाडणे हें त्याचे कर्तव्य आहे -- त्याच्यावर जबाबदारी आहे. गेल्या चार दिवसात त्याला दाढीला सवड नाही त्याला --- चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो हल्ली. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यानंतर मोर्चा परत कापडदुकानी येतो. तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाहीत --- नारायण डगमगत नाही."
काकू -- मी सांगतो --- हं हे घ्या पंचवीस -- ह्यांतले निवडा आठ -- हे चार जरीचे -- हा मुलीच्या सासूला होईल ---"
"पण गर्भरेशमी असता तर --"
"काय करायचाय म्हातारीला गर्भरेशमी ?--"
सर्व बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऎकून मनसोक्त हसतात.
"झालं --- हे साधे घेऊन ठेवा -- एक बारा --"
"बारा काय करायचे आहेत ?" काकू शंका काढतात."लागतात -- लग्न आहे सोमवारी.
त्या दिवशी बाजार बंद --- आयत्या वेळी खण काय, सुतळी मिळायची नाही वीतभर --
" नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचें कौतुक होतें."हे बरीक खरं हो ! ---" कापडाचोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यांतली एक आत्या उद्गारते. "आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीणबाई आयत्या वेळी अडून बसल्या नवऱ्या मुलाला हातरूमाल हवेत म्हणून -- सगळा बाजार बंद, मग नारायणानंच आणले बाई कुठूनसे," नारायण फुलतो."
क्यांपापर्यंत सायकल हाणत गेलो आणि डझनाचं बाक्स आणून आदळलं मी वारूच्या नवऱ्यापुढे --- पूस म्हटलं लेका किती नाक पुसतोस ह्या हातरूमालांनी तें ! हां ! तसा डरत नाही -- पण मी म्हणतो, आधीपासून तयारी हवी --- काय गुजामावशी ? "
"गुजामावशी आपलंही मत्त आगदी नारायणासारखंच आहे असं सांगतात आणि बारा खणांची आयत्या वेंळी असूं द्या म्हणून खरेदी होते ---"खरंच बाई पंचे घ्यायला हवे होते---"
"पंचांचं मी बघतो---तुम्ही ही बायकांची खरेदी पाहा----हां ! खण झाले, शालू झाले, आता अहेराची लुगडी---चला पळसुले आणि मंडळीत---"
"पळसुल्याकडे का जायचं ? मी म्हणत होतें जातांजातां सरमळकरांच्या दुकानी जाऊं----सरलच्या लग्नांत तिथनंच घेतलीं होतीं लुगडीं---"
"त्यावेळीं थोरले सरमळकर जीवंत होते मामी----चार वर्षांपूर्वी वारले ते---चिरंजीवांनी धंद्याचा चुथडा केला---आता आहे काय त्यांच्या दुकानात ? पोलक्याचीं छिटंदेखील नाहीत धड--"एकूण नारायणाला फक्त दुकानांची माहिती आहे असं नाही. त्याला दुकानदारांची आर्थिक-कौटुंबिक परिस्थितीहि ठाऊक असते."बरं अत्तरदाणी----आणि चांदीचं ताट अन वाटी---"मामींना ह्यापुढले वाक्य पुरेंहि न करू देतां नारायण ऒरडतो,"चांदीचा माल शेवटीं पाहूं---आधी कापडाचोपडाचं बघा. नमस्कार---"नमस्कार 'पळसुले आणि मंडळी, कापडाचे व्यापारी, आमचे दुकानी इंदुरी, महेश्वरी इ. इ.' यांना उद्देशून केलेला असतो."नमस्कार, या नारायणराव----"

"हं काकू, मामी, पटापट पाहून घ्या लुगडीं---"
" नारायण कंपनी कमांडरच्या थाटांत हुकूम सोडतो."अरे ह्यांना लुगडी दाखवा--"
"आमच्या मामेबहिणीचं लग्न आहे !"
"हो का ?" पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. "तुमचे मामा म्हणजे .."
"भाऊसाहेब पेंडसे----रिटायर्ड सबडिविजनल ऑफिसर---"
"बरं बरं बरं ! त्यांच्या का मुलीचं लग्न ?---" वास्तविक पळसुले आणि मंडळींच्या लक्षात कोण भाऊसाहेब काय भाऊसाहेब कांहीही आलेलें नाही, पण
"अरे माधव, त्यांना तो परवा नवा नागपुरी स्टॉक आलायं तो दाखव, " असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. बायका 'ह्या नारायणाची जाईल तिथे ओळख' ह्या कौतुकित चेहेऱ्यानीं नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले आणि मंडळींकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर तपकीर कोंबून आपली सलगी सिद्ध करतो."हं शालूबिलूची झाली का खरेदी ?"
"होतेय" ----नारायण पलीकडल्या दुकानात शालू खरेदी केल्याची दाद लागून देत नाही.तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रणपत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अथवा तीनही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरतं असते.

"इंग्रजी कशाला ?" नारायणाचा देशाभिमान जागृत होतो. शिवाय इंग्रजापेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे. ह्या इंग्रजीच्या पेपरानेच मॅट्रिकच्या परीक्षेंत त्याला सारखे धक्के दिले होते ! वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही---खाली 'आपले नम्र' ह्यांत कोणाकोणाची नावे घालायची--- छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई कुठली, सारें सारें काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूट्पणे ऎकतात."उद्या संध्याकाळी प्रुफें येतील ! नीट तपासा नाहीतर त्या अण्णूच्या लग्नांत झाली तशी भानगड नको व्हायला---"
"कसली भानगड ?" स्त्रीवर्गाकडून पृच्छा होते. धोतराने टोपींतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नांत सांगितलेली विनोदी गोष्ट पुन्हा सांगतो."अहो काय सांगू काकू---" ( ह्या काकू म्हणजे कापडखरेदीला गेलेल्या काकू नव्हेत----त्या येवल्याच्या काकू---- ह्या अंतूच्या काकू !) काकू कौतुकाने कानावरचा पदर कानामागे टाकून ऎंकू लागतात. "अहो अण्णू आपला----"" म्हणजे भीमीचा भाचा ना----ठाऊक आहे कीं---धांद्रटच आहे मेलं तें एक---" काकू कारण नसताना अण्णूला धांद्रट ठरवतात."तेच ते ! अहो त्याचं तिगस्त सालीं लग्न झालं---"
"अरे जानोरीकरांची मेहुणी दिलीय त्याला---" कुणीतरी एखाद्या प्रभाताई उद्गारतात."हें तूं सांगतेस मला ? ----- मी स्वत: ठरवलं लग्न ! मुलगी काळी आहे म्हणून नको म्हणत होता अण्णू कानाला धरला आणि उभा केला बोहल्यावर ! --- तर मजा काय सांगत होतो---त्याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका त्यांनी छापून घेतल्या गोणेश्वर प्रेसमध्ये--- मी म्हणत होतों आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयांत घ्या--- पण नाही ऎकलं माझं--- मी म्हटलं मरा---"
"अय्या !" 'अय्या'च्या वयाची कोणी तरी मुलगी 'मरा' ह्या शब्दानं दचकून ओरडली."अय्या काय ?----भितो काय मी ?" नारायणाला अवसान येते. मी त्याला वार्न केलं होतं की, गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटकसिनेमाचीं तिकिटं आणि तमाशाची हँडबिल छापणारा----तो निमंत्रणपत्रिका छापणार काय डोंबल? पण नाही---आणि तुला सांगलो काकू, पत्रिका छापून आल्या नि जोड्यानं मारल्यासारखी बसली मंडळी---""म्हणजे ?""सांगतो ! " नीरगाठं-उकलीच्या तंत्राने नारायण कथा सांगतो."---पत्रिका आल्या बरं का----पोष्टांत पडल्या----मी आपली सहज पत्रिका उघडून पहातों तर पत्रिकेच्या खाली 'वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणेचे करावें' असं असतं की नाही ? तिथं 'तिकीटविक्री चालू आहे' ही ओळ छापलेली---"सर्व बायका मनमुराद हसतात----"जळ्ळं मेल्याचं लक्षण ! अरे लग्न म्हणजे काय शिनिमा वाटला की काय तुझ्या गोणेश्वराला---"
"सारांश काय ? पत्रिका उद्या येतील त्या नीट तपासा----नाहीतर एक म्हणतां एक व्हायचं चला मी निघतो."

(अपूर्ण)
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Friday, December 23, 2022

नंदा प्रधान

शनिवारी दुपारी ऑफिस सुटले. फोर्टमधून हिंडत निघालो. एका घड्याळाच्या दुकानाची दर्शनी खिडकीपुढे उभा राहून काचेमागे मांडलेली घड्याळे मी पाहत होतो. इंग्रजीत ह्याला 'विंडो शॉपिंग' म्हणतात. मोठमोठ्या दुकानांतून अतिशय आकर्षक रितीने विक्रीच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. बहुधा किंमतीच्या चिठ्या उलटून ठेवतात. तिथली अत्यंत आवडलेली वस्तू सगळ्यांत महाग असते! मागे एकदा एका दुकानाच्या काचेआड ठेवलेला टाय मी पाहिला होता. मला फार आवडला होता. कदाचित तो तितका सुंदर नसेलही, कारण तो त्या काचेआड बरेच दिवस होता. एके दिवशी मी हिय्या करून त्या दुकानात शिरलो आणि त्या टायची किंमत ऎकून बाहेर पडलो. टायची किंमत तिस रुपये असू शकते हे ऎकून माझा कंठ दाटला होता! आता ती घड्याळे पाहताना देखील माझ्या मनगटाला कुठले शोभेल याचा विचार करीत होतो. उगीचच! वास्तविक मनगटाला शोभण्याऎवजी खिशाला पेलण्याचा मुद्दा महत्वाचा होता. तरीसुद्धा मनातल्या मनात मी माझ्या मनगटावर त्या काचेतली सगळी घड्याळे चढवून पाहिली. तसे मी सूटही चढवले आहेत; फर्निचरच्या दुकानातल्या त्या त-हेत-हेच्या फर्निचरवर बसलो आहे; मनातल्या मनात तिथल्या गुबगुबीत पलंगावर झोपलोही आहे. एक दोनशे रुपयांचा रेडिओ घ्यायला पंचवार्षिक योजना आखावी लागते आम्हाला! डोंबिवली ते बोरीबंदर प्रवास फक्त एकदा फर्स्टक्लासमधून करायची इच्छा अजून काही पुरी करता आली नाही मला!


मी काचेतुन तसाच घड्याळे पाहत उभा होतो. नाही म्हटले तरी मनात खिन्न होत होतो. तेवढ्याच माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला, आणि आवाज आला, "हलो!"


मी एकदम चमकून मागे पाहिले. "नंदा! हो, नंदा....नंदाच तू---" 

"विसरला नाहीस!" 

नंदाला एकदा ओझरते पाहणारा माणूसदेखील विसरणार नाही. इथे मी तर चार वर्षे कॉलेजमध्ये बरोबर काढली होती. मीच काय, पण आमच्या कॉलेजमध्ये त्या काळात शिकत किंवा शिकवीत असलेले कोणीच विसरू शकणार नाही. पण आज जवळजवळ वीस वर्षांनी भेटलो आम्ही. मुली तर त्याच्यावर खूष होत्याच, पण कॉलेजमधली यच्चयावत मुलेही खूष! नंदा प्रधान हे नाव आम्ही गॅरी कूपर,फ्रेडरिक मार्च, डिक पॉवेल, रोमन नव्हॅरो यांच्या नामावळीत घेत होतो. दिवाळीच्या आणि नाताळाच्या सुटीतदेखील होस्टेलमधल्या आपल्या खोलीत राहणारा नंदा प्रधान! कॉलेजच्या इंग्लिश नाटकांतून पारशी आणि खिश्र्चन मुलामुलींच्या गटांतून काम करणारा नंदा! 

मी बी०ए० ला होतो, त्या वर्षी नंदाने हॅम्लेटचे काम केले होते.त्यांनतर मी ब्रिटिश रंगभूमीवरचे हॅम्लेटदेखील सिनेमात पाहिले, पण डोक्यात नंदाचा हॅम्लेट पक्का बसला आहे. इतका गोड हॅम्लेट! फ्रेनी सकलातवाला ओफीलिया होती. नंदा फ्रेनीशी लग्न करणार, अशी त्या वेळी अफवादेखील होती. पण नंदाच्या बाबतीत दर दोन महिन्यांनी अशा अफवा उठत. मला वाटते, कॉलेजातल्या सगळ्यांत सुंदर मुलीशी नंदाचे लग्न व्हावे अशी संर्वाचीच मनोमन इच्छा असावी. ह्या बाबतीत कॉलेजमधल्या इतर इच्छुकांनी नंदाला अत्यंत खिलाडूपणाने वॉक ओव्हर दिला होता! जवळजवळ पावणेसहा फूट उंच, सडपातळ, निळ्या डोंळ्याचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरळ्या केसांचा नंदा हा प्रथमदर्शनी हिंदू मुलगा वाटतच नसे. त्यातून तो नेहमी असायचादेखील इंग्लिश बोलणा-या कॉस्मॉपॉलिटन गटात! 

वास्तविक त्याची आणी माझी कॉलेजमधली मैत्री कशी जुळली हे देखील मला ह्या क्षणापर्यंत कोडे आहे. इंग्लिश ऑनर्सच्या तासाला आम्ही साताआठच मुले-मुली होतो. त्यांत संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची मुलगी होती. अर्धमागधीला जायची ही मुलगी इंग्रजीच्या वर्गात केवळ फॉर्म भरण्यात गफलत झाल्यामुळे बसत असावी, अशी माझी समजूत होती! नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधावे एवढे लठ्ठ घड्याळ, हातावर भाराभर पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीचे जाग्रण करुन आल्यासारखी दिसणारी ही वेंधळी मुलगी जेव्हा इंग्लिशच्या परिक्षेत विश्र्वविद्यालयातली सगळी बक्षीसे घेऊन गेली, त्या वेळी आम्ही भान हरपून तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला गेलो होतो! वास्तवीक एखाद्या मुलीच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचे मला धैर्य नव्हते; पण नंदा माझ्या खोलीवर आला होता. त्या वेळी मी भिकारदास मारूतीजवळ एका चाळीत खोली घेऊन राहत होतो. त्या काळच्या पुण्यात चार रुपये भाड्यात ज्या सुखसोयींसह खोली मिळे, त्या खोलीत मी आणि अरगडे नावाचा माझा एक पार्टनर राहत होतो. तो रात्रंदिवस फ्लूट वाजवायचा. मग त्याचे आणि मालकाचे भांडण होई. माझ्या त्या खोलीवर नंदा आला की, मला ओशाळल्यासारखे होई. तारेवर माझा घरी धुतलेला लेंगा आणि फाटका बनियन, शर्ट वगैरे वाळत पडलेला असे. अरगड्याने एक जुने चहाचे खोके मिळवून त्याच्यावर बैठक केली होती. त्याच्यावर बसून तो फ्लूटचा रियाज करीत असे. चांगली वाजवायचा,पण पुढे त्याला फ्लूरसी झाली. 

"आपल्याला जायंच आहे." नंदा म्हणाला. 

"कुठे?" 

"इंदू वेलणकरकडे. चल." 

त्याची अशी चमत्कारिक तुटक बोलण्याची पद्धत होती. आवाजदेखील असा खजीतला, पण कठोर नाही, असा काहीतरी होता. त्याला ज्याप्रमाणे काहीही शोभून दिसे तसा तो आवाजही शोभे. नंदा एकदा माझ्याबरोबर एका गाण्याला लेंगा आणि नेहरू शर्ट घालून आला होता. त्या वेशातही तो असा उमदा दिसला की,बुंवानी काही कारण नसताना गाता गाता त्याला नमस्कार केला होता. त्या दिवशी तो खोलीवर आला तेव्हा मी अक्षरश: भांबावलो होतो. काही माणसे जन्मतःच असे काहीतरी तेज घेऊन येतात की, त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.काही स्रियांचे सौंदर्य असेच आपल्याला नामोहरम करून टाकते. त्यांच्यापुढे आपण एखाद्या फाटक्या चिरगुटासारखे आहोत असे वाटायला लागते. नंदामध्ये ही जादू होती. मला आठवतेय, आमचे प्रिन्सिपॉल साहेबदेखील जिमखाना कमिटीच्या सभेत नंदाची सूचना कमालीच्या गंभीरपणाने ऎकत असत. तिथेदेखील नंदा असा तोटकीच वाक्ये बोलायचा; पण इंग्लिशमध्ये! तीनचार शब्दांहून अधिक मोठे वाक्य नसायचे.त्या दिवशीसुद्धा "आपल्याला जायचंय" हे एवढेच म्हणाला होता. मी "कुठे?"म्हटल्यावर "इंदू वेलणकर" म्हणाला.

"इंदू वेलणकर?" 

"अभिनंदन करायला." 

"तिच्या घरी? अरे. तिचा म्हातारा भयंकर चमत्कारिक आहे म्हणे!" 

"असू दे! मीसुद्धा आहे. चल." 

"बरं, तू जरा गॅलरीत उभा राहा. मी कपडे बदलतो." आमच्या महालातल्या अडचणी अनेक होत्या. 

"मग मी बाहेर कशाला?" 

मी शक्य तितके त्या आठ-बाय-सहाच्या खुराड्यात कोप-यात तोंड घालून माझी एकुलती एक विजार चढवली. शर्ट कोंबला आणि आम्ही निघालो. इंदू वेलणकरचा राहता वाडा तिच्या इंग्लिशखेरीज इतर सर्व गोष्टींना साजेसा होता. बोळाच्या तोंडाशी"कल्हईवाले पेंडसे आत राहतात" असा एक तर्जनी दाखवणारा हात काढलेला बोर्ड होता. खाली कुठल्या तरी पुणेरी बोळ संप्रदायात वाढलेल्या इब्लिस कार्ट्याने खडूने "पण कल्हई रस्त्यात बसून काढतात" असे लिहीले होते. काही काही माणसे कुठे राहतात ते उगीचच आपल्याला ठाऊक असते. इंदू वेलणकर हा त्यांतलाच नमुना. एकदा कोणीतरी मला कल्हईवाल्या पेंडशांच्या बोळात राहते हे सांगितले होते. त्या बोळातून मी आणि नंदा जाताना ओसरीवर आणि पाय-यांवर बसलेल्या बायका आणि पोरे नंदाकडे माना वळवून वळवून पाहत होती. इतक्या देखण्या पुरूषाचे पाय त्या बोळाला यापुर्वी कधी लागले नसतील! जनस्थानातून प्रभू रामचंद्राला जाताना दंडकारण्यातल्या त्या शबर स्रियांनी ह्याच द्र्ष्टीने पाहिले असेल. बोळ संपता संपता 'ज०गो० वेलणकर, रि०ए० इन्स्पेक्टर' अशी पाटी दिसली.आम्ही आत गेलो. दाराबाहेर एक दोरी लोंबकळत होती. तिच्या खाली "ही ओढा" अशी सूचना होती. त्याप्रमाणे 'ती' ओढली. मग आत कुठेतरी काहीतरी खणखणले आणि कडी उघडली. एका अत्यंत खत्रूड चेह-याच्या पेन्शनराने कपाळावर चष्मा ठेवून आठ्या वाढवीत विचारले, "काय हवॅंय?" 

"इंदूताई वेलणकर इथंच राहतात ना?" मी चटकन 'इंदू' ला 'ताई' जोडून आमचे शुद्ध हेतू जाहीर केले. 

"राहतात. आपण?" हाही थेरडा नंदासारखा तुटक बोलत होता. 

"आम्ही त्यांचे वर्गबंधू आहोत." तेवढ्याच स्वतः इंदूच डोकावली. नंदाला पाहून ती कमालीची थक्क झाली होती आणि तिला पाहून मी थक्क झालो होतो. कॉलेजात काकूसारखी नऊवारी लुगडे नेसून भलामोठा अंबाडा घालणारी इंदू घरात पाचवारी पातळ नेसली होती. तिची वेणी गुडघ्यापर्यंत आली होती. केसांत फूल होते. 

"या या--- तात्या, हेही माझ्याबरोबर ओनर्सला होते." 

"मग मिळाले का?" "हो, आम्ही दोघांनाही मिळाले." मी चटकन सांगून टाकले, नाहीतर म्हातारा "बाहेर व्हा" म्हणायचा. 

"बसा-- बसाना आपण." इंदू नंदाकडे पाहत मला सांगत होती. इतकी बावचळली होती, घाबरली होती, आणि त्यामुळेच की काय कोण जाणे, क्षणाक्षणाला अधिकच सूंदर दिसत होती. नंदा मात्र शांतपणे बसला. 

"हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन!" 

नंदा ह्या माणसाला देवाने काय काय दिले होते! त्या बुद्रक म्हाता-याच्या दिवाणखाण्यात एका व्हिक्टोरिअन काळातल्या खुर्चीवर नंदा अशा ऎटीत बसून हे बोलला की, मला वाटले, तो थेरडा तिथे नसता तर तेवढ्या बोलण्याने इंदू त्याच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने रडली असती. 

"थॅं...क्य़ू..." सुकलेल्या थरथरत्या ओठांनी ती म्हणाली. 

"आज रात्री जेवायला याल का?" नंदा विचारीत होता. 

"कोण मी?" इंदूचा आवाज इतका मऊ होता की, मला उगीचच गालावर पीस फिरवल्यासारखे वाटले. 

"मी डिनर ऍरेंज केलंय." 

"डिनर?" म्हातारा तेल न घातलेल्या झोपाळ्याच्या कड्या किरकिरतात तसा किरकिरला. 

"यस सर! टू सेलेब्रेट युअर डॉटर्स सक्सेस." 

"कुठं डिनर केलंय ऍरेंज?" 

"मोरेटोरमध्ये!" 

"हॉटेलात कां? घर नाही का तुम्हाला?" स्वतःच्या डोक्यावरचे एरंडाचे पान जोरात थापीत म्हातारा रेकला. 

"नाही!" 

नंदाचे ते 'नाही' माझे काळीज चिरत गेले. नंदाला घर नाही ही गोष्ट कॉलेजात फार फार थोड्या लोकांना ठाऊक होती. इंदूच्या चेह-याकडे मला पाहवेना. रात्री मी आणि नंदा मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. नंदा दारातच माझी वाट पाहत उभा होता. मोरेटोरला माझी चरणकमळे अधूनमधून नंदाच्या आग्रहाने लागायची. मला संकोच वाटे. एका दरिद्री मराठी दैनिकात तारांची भाषांतरे करण्याची उपसंपादकी, अधूनमधून हिटलर-चर्चिल वगैरे मंडळींना, संपादकांना अगदीच आळस आला तर, चार समजुतीच्या गोष्टी सांगणारे अग्रलेख लिहीणे, ह्या कार्याबद्दल मिळणा-या अखंड तीस रुपयांत मला त्याला 'लकी'त नेण्याची देखील ऎपत नसे. पण नंदा "आज आठ वाजता मोरेटोरमध्ये" असा लष्करी हूकूम दिल्यासारखा आमंत्रण देई आणि मी हिन्पोटाइज्ड माणसासारखा तिथे जात असे....

(अपूर्ण)
नंदा प्रधान - व्यक्ती आणि वल्ली 
पु.ल. देशपांडे 

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवू शकता.

Saturday, September 17, 2022

बापू काणे

पहिल्या भेटीत स्वतःबद्दल अत्यंत वाईट मत व्हावे असे वागण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याला कुठल्या मास्तराने मराठी शिकवले देव जाणे! मराठी भाषेत चांगले शिष्टाचार दाखवणारे शब्द आहेत हे त्याच्या गावीच नाही. स्टेशनावर उतरलेल्या पाव्हण्यांना हा काय बोलेल हे सांगणे अवघड आहे. चुकून पाव्हण्यांनी हमाली दिली कि हा लगेच "तुम्ही देऊ नका" हे सांगण्याऐवजी "किती दिलीत?" म्हणून विचारतो. "एकदा पुण्याचे ते पळसुले की कोण लेखक आले हातात नुसती पिशवी घेऊन आणि जाताना दीड रुपया हमाली दिली म्हणून मागून घेऊन गेले. त्याची पिशवी दीड रुपयाला विकत नसती घेतली कुणी !" आता ही हकीकत पहिल्या भेटीत सांगायच्या का लायकीची आहे? पाव्हण्यांना घरी नेतो, जेवू घालतो, चांगली शिक्रणबिक्रण करतो. पाहुणे संकोच करू लागले की म्हणतो,

"घ्या, घ्या शिक्रण - "

"नको, नको !" पाहुणे संकोचाने म्हणतात.

"का ? मधुमेह वगैरे आहे का?"

"छे हो - "

"मग खा की." ही आग्रहाची तऱ्हा !

बापू बाळपणापासून एकूण आगाऊच. गाणाऱ्या बाईला घ्यायला त्याला सहसा पाठवीत नाही. एक बाई अशाच तयारी करीत होत्या, तर बापू बाहेर कोणाला तरी ओरडून सांगत होता, "अरे, तिला म्हणावं, तुला गायला न्यायला आलोय, दाखवायला नव्हे !"

पण हाच बापू आभाराची भाषणे उत्तम करतो. गाण्यातला एकही सूर अगर व्याख्यानातला एकही शब्द न ऐकता पाचदहा मिनिटे बोलतो. क्वचित जातीवर जातो, नाही असे नाही. एकदा, "बाई स्थूल असल्या तरी आवाज मधुर आहे" म्हणाला होता. त्या बाईंनी पुन्हा आमच्या गावाला पाय लावला नाही! एकदा एका खांसाहेबांची अभक्ष खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी बापूवर आली. बापू स्वतःच्या हाताने तो डबा घेऊन त्यांच्या खोलीवर गेला आणि "घ्या - तुमची कोंबडी, कुत्री सगळी आणली आहेत. अकरा रुपये टिचवले आहेत. लवकर चेपा आणि चला." ह्या शब्दात खांसाहेबांची संभावना केली. सुदैवाने खांसाहेबांना मराठी येत नव्हते. रात्री गाणे झाल्यावर बापूला "त्या कोंबडीचं चीज झालं का रे?" हा प्रश्न खांसाहेबांचा टांगा हलण्यापूर्वी विचारण्याचे कारण नव्हते!

(अपूर्ण)
बापू काणे
व्यक्ती आणि वल्ली



Monday, September 5, 2022

चितळे मास्तर

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.
मुळ स्त्रोत - विकिपीडिया


एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईंपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत.

"कार्टे चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे, ते त्यांच्या हाती सुखरूप आहे." अशी ठाम समजूत असे.

"एके काळी असे" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव.

वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डावरदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन्सिपॉल व्हावे लागले होते, पण पंधरा दिवसांतच मास्तर त्या खुर्चीला वैतागून पुन्हा आपले 'चितळे मास्तर' झाले. त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान असलेले काळे मास्तर हे प्रिन्सिपॉल झाले आणि अजूनही आहेत. डाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य-नैऋत्य दाखवणारी काळी टोपीबाहेर टकलाच्या आसपास टिकून राहीलेले केस आले आहेत, नाक आणि मिश्यांनी ठेवण राम गणेश गडकऱ्यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला. त्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले, आणी आता माझ्या पुतण्यांना शिकवताहेत. आमच्या गावातल्या शंकराच्या देवळातला धर्मलिंग गुरव आणि चितळे मास्तर यांना एकच वर्णन लागू-- नैनं छिन्दन्ति शस्रणि नैनं दहति पावकः! त्यांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे पाहिले आणि आता कदाचित तिसरेही पाहतील.

अजूनही गावी गेलो तर मी शंकराच्या देवळात जातो आणि तिथला धर्मलिंग गुरव "पुर्ष्या, शिंच्या राहणार आहेस चार दिवस की परत पळायची घाई?" असेच माझे स्वागत करतो. मला "पुर्ष्या" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर! धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. "पुर्ष्या शिंच्या" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, "पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात? फुगलायस काय!" धर्मलिंगाच्या या सलगीने गावातली नवी पिढी जरा बिचकली होती. आणि चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले होते,
"पुर्ष्या, नाव राखलंस हो शाळेचं! वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे? वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना? अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस...?" "मॅजेस्टी!" मी शाळेतल्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो. "मॅजेस्टी~~! बरोबर!"

चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती. ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांकडुन वदवीत. मला त्यांचा ईंग्रजीचा वर्ग आठवला. "...टेक हर अप टेंडर्ली, लिफ्ट हर विथ केअर --- फॅशनड सो स्लेंडर्ली यंग ऍंड सो....?" "फेअर!" सगळी मुले कोरसात ओरडायची.

इंग्रजी पहिलीत आल्यापासून मॅट्रिकपर्यंत सात वर्षे चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकवले. त्यांच्या मुख्य विषय इंग्रजी. पण ड्रॉइंग आणि ड्रिल सोडुन ते कुठलाही विषय शिकवीत. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक ह्या दोन गोष्टींशी त्यांचे कधीच जमले नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन त्या काळात आमच्या हायस्कूलला परवडण्यासारखी नव्हती. आठदहा शिक्षक सारी शाळा सांभाळायचे. आता शाळा पावसात नदी फुगते तशी फुगले आहे. भली मोठी इमारत, एकेका वर्गाच्या आठ आठ तुकड्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, दोन दोन हजार मुले वगैरे प्रकार माझ्या लहानपणी नव्हते.

हल्ली मुलांना मास्तरांची नावे ठाऊक नसतात. माझ्या मास्तरांना शाळेतल्या सगळ्या मुलांची संपुर्ण नावे पाठ! पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे! एरवी मॅट्रिकपर्यंत पोंरानी आणि चितळे मास्तरांसारख्या मास्तरांनी देखील शाळेचा रस्ता अनवाणीच तुडवला. शाळेतल्या अधिक हुषार आणि अधिक 'ढ' मुलांना मास्तर घरी बोलावून फुकट शिकवायचे. "कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवीत नाही, त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल." असल्या चिठ्या पालकांना येत नसत. पोर नापास होणे हा मास्तरांच्या 'माथ्या आळ लागे' अशी शिक्षकांची भावना होती. 'छ्डी' ही शाळेत फळा आणि खडू यांच्याइतकीच आवश्यक वस्तू होती. चितळे मास्तरांनी मात्र आपल्या तीस-बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत छ्डी कधीच वापरली नसावी. त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की, तो मार पुष्कळ होई. फार रागावले की आंगठ्याने पोरांचे खांदे दाबत. संध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार पाहण्यासारखा असे. फळ्यावरच्या खडूची धूळ उडून उडून पिठाच्या गिरणीत नोकरीला असल्यासारखे दिसत. तरीही शिक्षणकार्य संपलेले नसे. संध्याकाळी त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'मागासलेल्या जमातीचे' वर्ग चालायचे.

चितळे मास्तरांचा वर्गात वापरण्याचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा म्हणून आम्ही नेल्सनसाहेबाचे अगर तर्खडकरांचे पुस्तक उघडून तयारीत राहावे तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारख्या खांद्यावर घेऊन शिरत. मग वर्गात खसखस पिके. मास्तर "अभ्यंकर, आपटॆ, बागवे, चित्रे" करीत हजेरी घेऊ लागायचे. तेवढ्यात शाळेच्या घंटेइतकाच जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावर ठेवी. चितळे मास्तर त्याला तो सगळी पृथ्वी हातावर उचलतो म्हणून 'हर्क्यूलस' म्हणत. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारीत, "हं बृहस्पती, गेल्या तासाला कुठं आलो होतो?" "सर. इंग्लिशचा तास आहे." "ऍ? मग भूगोलाचा तास केव्हा आहे?" "तिसरा." "मग तिसऱ्या तासाला तर्खडकराचं श्राद्ध करू या. भूगोलाची पुस्तकं काढा!" ही पुस्तके तासाला काढण्यात काही अर्थ नसे. कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीच काही शिकवले नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, "कसला तास आहे?" ह्या प्रश्र्नाला "चितळे मास्तरांचा!" हेच उत्तर योग्य होते. सर्वानुमते एखाद्या विषय ठरायचा आणी मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयूष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना अजिबात कधी जमल्या नाहीत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचा नकाशा. पाचदहा मिनीटे फळ्यावर खडू इकडून तिकडून ओढल्यानंतर अगदी ओढगस्तीला लागलेला हिंदुस्थानचा नकाशा तयार व्हायचा! "हिदुस्तान देश जरासा दक्षिण अमेरिकेसारखा आलाय का रे बुवा?" आपणच मिष्किलपणे विचारायचे. खांद्यावरून आणलेली नकाशाची गुंडाळी क्वचितच सोडीत असत. "हां, पांडू, जरा निट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा--" मग आमच्या वर्गात ड्रॉइंगमध्ये पटाईत असलेला पांडू घरत चितळे मास्तरांनी काढलेली मातृभूमी पुसून झकास नकाशा काढायचा. "देव बाकी कुणाच्या बोटांत काय ठेवतो पाहा हं. पांडुअण्णा, सांगा आता. मान्सून वारे कुठून येतात?"

एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते. "हं, गोदाक्का, सांगा आता वारा कुठल्या दिशेला वाहतोय?" वर्गातल्या मुलींना मिस जोशी, मिस साठे म्हणणारे मास्तर तोपर्यंत शाळेत आले नव्हते. टाय बांधून, मिस जोशीबाशी म्हणणारे देशमुख मास्तर प्रथम शाळेत आले तेव्हा हे साहेबाचे पिल्लू शाळेत कुणी आणून सोडले असे आम्हाला वाटले होते. पायांत पांढरे टेनिसचे शूज घालणारे पिसे काढलेल्या कोंबडीएवढ्या रुंद गळ्याचे देशमुख मास्तर आमच्या शाळेतल्या अपटुडेटपणाची कमाल मर्यादा होते. एरवी बाकीचे सगळे धोतरछाप मास्तर मुलांना बंड्या, बाळ्या, येश्या, पुर्ष्या ह्या नावाने किंवा मुलींना कुस्मे, छबे, शांते, कमळे अशाच नावाने हाका मारीत चितळे मास्तर मात्र 'ढ' मुलांना अत्यंत आदराने पुकारीत.

गोदी गुळवणी ही साक्षात 'ढ' होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथीपाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. तिच्या लग्नात चितळे मास्तरांनी नव-या मुलाला "माझी विद्यार्थिनीआहे हो! संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का?" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. "काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा?" चितळे मास्तर गळ्यात दाटलेला आवंढा दडवीत म्हणाले होते. गोदी पडावात चढली तशी त्यांनी हळूच डोळे टिपलेले मी आणि बाळू परांजप्याने पाहिले होते. "मास्तर रडतायत बघ!" बाळू अजागळपणे म्हणाला होता. "चिमण्यांसारखा नाचतात दहाबारा वर्षे ओसरीवर आणि भुर्र्किनी उडून जातात हो--" चितळे मास्तर गोदीच्या वडलांना सांगत होते. ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून चितळे मास्तरांनी वर्गात इतकी चेष्टा केली होती की, आजच्या जमान्यात पालकांची प्रिन्सिपॉलसाहेबांना चिठ्ठी आली असती. चिठ्ठी तर सोडाच, पण आमचे पालक तर शाळेत मास्तरांनी आपल्या कुलदिपकाला बदडले हे ऎकल्यावर घरी पुन्हा एकदा उत्तरपुजा बांधीत.

"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय?" "गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?" गोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. "कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी!" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची. "हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प. "गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या? राम्या तु सांग." मग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा की--" "का रे राम्या?" मास्तर दटावायचे. "मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?" "तिचा पदर कशाला दिसायला हवा?" "मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं?" "भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स?" मग सगळ्या वर्गाकडुन "दिवसा वाहतात ते--" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग "गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचा संबंध.....?" "ना~~~~ही!" पोरे ओरडायची. "

तरी आज आपण आलाय हे ठाऊक आहे त्यांना म्हणून कमी आहे. एरवी शाळेचं छप्पर डोक्यावर घेतात__" चितळे मास्तर शांतपणे त्यांना सांगत होते. "पण जरा शिस्त लावायला हवी!" हसतखेळत संप्रदायाचा पुरस्कार करणाऱ्या इन्सपेक्टरांनी त्यांना गंभीरपणाने बजावले. चितळे मास्तरांनी आपल्या साऱ्या आयूष्यात कुणालाही शिस्त नावाची गोष्ट लावायचा प्रयत्न केला नाही. स्वतःला लावली नाही. त्यांनी त्यांच्यापुढे आलेल्या सर्वोच्यावर फक्त प्रेम केले. प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. वर्गात एखाद्या मुलाने उत्तम निबंध लिहीला की दहापैकी आठ मार्क द्यायचे. मुलगा कुरकुरला की विचारायचे, "का रे बोवा?" "सर, पण दोन मार्क का कापले?" "तीन कापायचं जिवावर आलं माझ्या!" इंग्लिश भाषेवर मात्र चितळे मास्तरांचे फार प्रेम होते. उच्चार अत्यंत देशी! शिकवण्याची पद्धत अगदी संस्कृत पाठशाळेसारखी. पहिली-दुसरीच्या वर्गाबाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे 'ज्ञानेश्वरी'तल्या ओव्या म्हणाताहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती 'आय?' 'गो!' 'यू?' 'गो!', 'वुई?' 'गो!', 'ही' 'गो~ज!' ची चाल आठवते. इंग्रजी साभिनय शिकवायचे. "आय ऍम?" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे "ईटिंग" म्हणायची. मग तुरूतुरू चालत "आय ऍम....?" की पोरे "वॉकिंग" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, "आय ऍम...?" "स्लीपिंग" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, "गाढवांनो, माझी झोप मोडलीत!" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, "आय ऍम...?" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात "स्ली~पिंग" म्हणायची. "आय ऍम स्लीपिंग" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की "मुगूट पडला का आमचा?" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भान हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. "आय ऍम क्रॉलिंग" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा! त्यांच्या तासाला तास कधी वाजला ते कळत नसे. दुसऱ्या तासाचे मास्तर दारात येऊन ताटकळत उभे असायचे. शाळेतल्या सर्व मास्तरांना चितळे मास्तरांची खोड ठाऊक होती. त्यामुळे एक वर्ग संपवून दुसऱ्या वर्गाची पुस्तके किंवा वह्या गोळा करायला चितळे मास्तर कॉमनरुममध्ये जाऊन पोहचेपर्यंत त्या वर्गाची लाइन क्लियर झाली नाही हे ते ओळखीत.

चितळे मास्तर अत्यंत विसराळू होते. वर्गात वहाणा विसरून जाणे हा नित्याचा कार्यक्रम. मग विद्यार्थ्यापैकी कोणीतरी त्या पुढल्या वर्गात पोहचवायच्या. "अरे, भरतानं चौदा वर्षे सांभाळल्या! तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत?" जोडीचे शिक्षक त्यांची खूप थट्टा करीत असावे. सहलीच्या वेळी हे लक्षात येई. चितळे मास्तरांना सहलीचा विलक्षण उत्साह. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले आम्ही त्यांच्याबरोबर पाहिले. पहिलीत गावाबाहेरच्या आमराईपासून सुरवात होई. चितळे मास्तर आमचे स्काउटमास्तरही होते. स्काउटमास्तरांच्या पोषाखात त्यांना जर वेडन पॉवेलने पाहिले असते तर सारी स्काउटची चळवळ आवरती घेतली असती. त्या वेळी स्कॉउटमास्तर हिरवा फेटा बांधायचे. चितळे मास्तरांच्या डोक्यावर तो फेटा दादासाहेब खापड्यांच्या फेट्यासारखा गाठोडे ठेवल्यासारखा दिसे. गावातल्या य्च्चयावत पोरांना त्यांनी पोहायला शिकवले. पोहायला शिकवायची मात्र त्यांची डायरेक्ट मेथड होती. मेहंदळे सावकाराच्या प्रचंड विहिरीत शनिवारी दुपारी ते पोरे पोहायला काढीत. आणि नवशिक्या पोराला चक्क काठावरून ढकलून देत. मागून धोतराचा काचा पकडून आपण उडी मारीत. कधी कधी खांद्यावर पोरगे बसवून उडी घेत. जो नियम मुलांना तोच मुलींना! माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे! साताआठ वेळा नाकातोंडात पाणी गेले की पोरे बॆडकासारखी पोहत. पोहून संपल्यावर डोकी ओली राहीली की ते स्वतः पंच्याने पुसत.

आमच्या गावातले सगळे आईबाप, देवाला बोकड सोडतात तशी चितळे मास्तरांना पोरे सोडून निर्धास्त असत. शाळेतच काय पण रस्त्यात किंवा देवळातदेखील पोराचा कान धरायची त्यांना परमिशन होती. मॅट्रिकच्या वर्गात पोहचल्यावर निवडक पोरांना वर नंबर काढण्यासाठी चितळे मास्तरांच्या घरी पहाटे पाचला जावे लागे. मास्तर आंघोळबिबोंळ करून खळ्यात मोठ्यामोठ्याने कसले तरी स्तोत्र म्हणत उभे! एका जुनाट बंगलीवजा घरात त्यांचे बिऱ्हाड होते. मास्तरीणबाईंना आम्ही मुलेच काय पण स्वतः चितळे मास्तरदेखील 'काकू' म्हणत. "काकू~~ वांदरं आली गो. खर्वस देणार होतीस ना?" असे म्हणत अधून-मधून खाऊ घालीत. आणि मग शिकवणी सुरू व्हायची. ही शिकवणी फुकट असे. आणि शिकवण्याची पद्धतदेखील वर्गापेक्षा निराळी. त्या वेळी आमच्या गावात वीज नव्हती आली. मास्तरांच्या घरातल्या डिटमारचा दिवा आणि आम्ही घरातून नेलेले दोनचार कंदील ह्या प्रकाशात अभ्यास सुरू होई. चितळे मास्तर एक आडवा पंचा लावून उघडेबंब असे भिंतीजवळच्या पेटीवर बसत. ही भेलीमोठी पेटी हे त्यांचे आवडते आसन होते. त्या पेटीत खच्चून पुस्तके भरली होती.

मास्तरंचा गोपू माझ्या वर्गात होता. वेणू माझ्यापेक्षा मोठी आणि चिंतामणी धाकटा. ही तिन्ही मुले गुणी निघाली. गोपू मॅट्रीकला दहावा आला होता. हल्ली तो दिल्लीला बड्या हुद्यावर आहे. वेणूदेखील बी०ए० झाली. चिंतामणीने मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले. त्याला मास्तरांनी चिपळूणला सायकलचे दुकान काढुन दिले. त्याला मास्तर एडिसन म्हणत. हे कारटे लहानपणापासून काहीतरी मोडतोड करीत असे. गोपू आमच्याबरोबर शिकायला बसे. एरवी तो मास्तरंना आप्पा म्हणे. शिकायला बसला की आमच्याबरोबर 'सर' म्हणत असे. आम्ही चितळे मास्तरांनी नक्कल करायचे तसा तोदेखील करत असे. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा, पण मास्तरांनी पार्शलिटी केली असे चुकुनदेखील आम्हाला वाटले नाही. कारण वर्गात इतर मुलांप्रमाणे त्यालादेखील ते "गोपाळराव चितळे, उठा. द्या उत्तर ." असे म्हणायचे . कान धरून उभे करायचे. चारचौघांसारखाच तोही!

पहाटचे त्या अधुंक प्रकाशीत चितळे मास्तरांच्या ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात चाललेला तो स्पेशल क्लास अजूनही माझ्या स्वप्नात येतो. तिथे मी 'रघुवंश' शिकलो, टेनिसन, वर्डस्वर्थ ह्यांच्या कविता वाचल्या. वर्गात शिकवताना त्यांच्या आवाज चमत्कारीक वाटे. पण पहाटे घरी ते 'रघुवशं' म्हणायला लागले की गुंगी यायची.

आमच्या आधी ह्या वर्गात शिकलेल्या तीनचार मुलांनी 'जगन्नाथ शंकरशेट' मिळवली होती. आमच्यात कुणी तसा निघाला नाही. जरा ओशाळेच होऊन आम्ही त्यांना पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो होतो. "काकू, कुरुक्षेत्रातले विजयी वीर आले. ओल्या नारळाच्या करंज्या ना केल्या होत्यास? एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे! तुझ्या बापसाला बोललोय मी! उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन! बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात?" "एलफिन्स्टन!" "स्पेलिंग सांग." मग काकू करंज्या पुढे ठेवता ठेवता म्हणाल्या होत्या, "आहो, मिस्त्रुडं फुटली त्यांना आता! स्पेलिंग कसली घालता? मुंबईस जायचास की पुण्यास?" "बघू, बाबा धाडतील तिथं जायचं___"

चितळे मास्तरांच्या आणि असंख्य मुलांच्या वाटा इथून अशाच तऱ्हेने वेगळ्या झाल्या आहेत...

(अपूर्ण)
पुस्तक - व्यक्ती आणि वल्ली 

संपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक मिळवा.

Monday, August 8, 2022

अशा या वीस व्यक्ती आणि वल्ली!

१९४३ साली 'अभिरुची'च्या एका अंकात पुरुषोत्तम दैशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे 'अण्णा वडगावकर, हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात 'हा कोण संप्रति नवा पुरुषावतार?' अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं० वि० जोशी यांच्यासारख्या मानकऱ्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनता जनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले.

ते कसब तेथेच न थबकता, पुढे अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले. एकेकसुद्धा भान हरवील असा; 'किमु यत्र समुच्चयम्‌' ? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा - आणि 'जन- साधारण' भारून जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की 'पु.ल.' म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाहीं! अशी आपुलकी. ललाटी असणारा कलावंत एखादाच !

देशपांड्यानी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्‍हातऱ्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मन॒ष्य-स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात. चांगल्यावाइटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात. आत कोठेतरी 'वल्ली' दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ती आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्‍यावांइटाचे अंतर्नाट्य देशपांड्यांनी सराइतपणे पकडले आहे, कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्याआमच्यांत आहे आणि लेखकातही !

अशा या वीस व्यक्ती आणि वल्ली!

पुस्तक खालील चित्रावर क्लिक करून मागवू शकता.


Thursday, August 26, 2021

व्यक्ती आणि वल्ली -- पु. ल . देशपांडे

आयुष्यात आपण बऱ्याच लोकांना भेटतो.काही व्यक्ती काळानुसार विस्मरणात जातात तर काही लोक मात्र त्यांच्या स्वभावामुळे 'चांगलेच' लक्षात राहतात."व्यक्ती तितक्या प्रकृती" नुसार व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो.परंतु तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरून त्याला विनोदाची खुशखुशीत फोडणी देऊन,साऱ्या महाराष्ट्राला खळखळून हसवण्याची कसब फक्त एकाच व्यक्तीने साधली ती म्हणजे पु ल देशपांडे नी! १९४३ साली अभिरुची मासिकाच्या एका अंकामध्ये 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले आणि ते मराठी वाचकांच्या प्रचंड पसंतीस आले. नंतर १९६३ पर्यंत प्रसिद्ध झालेली एकूण २० व्यक्तिचित्रे 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाच्या माध्यमातून संग्रहित झाली.आज कित्येक दशके उलटूनही हा संग्रह मराठी वाचकांचे मनोरंजन करत आहे आणि करत राहील ह्यात दुमत नाही.व्यक्ती आणि वल्ली वाचताना प्रत्येक पात्राचे पुलं नी केलेले चोखंदळ वर्णन वाचल्यावर ही व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली आहे किंवा आपल्यातीलच एक आहे अशी भावना आल्याखेरीज राहत नाही.आणि मग प्रत्येकामध्ये एक 'वल्ली' लपलेला असतो तो फक्त टिपता आला पाहिजे हे पुलं च वाक्य शंभर टक्के पटते. अश्याच वीस वल्लींपैकी मला आवडलेली काही पात्रे :
नारायण- नारायण हा एक असा नमुना आहे की,प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलग.कुठल्याही मंगलकार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला. घरात कार्य निघाले की जो वेळेवर टपकतो (कधी-कधी आगंतुक) तो म्हणजे नारायण.लग्नाचीच गोष्ट घेतली तर मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासूनच नारायण हजर असायचा,ते मुलगीची वरात मांडवातून निघूपर्यंत त्याची धावपळ चालूच असायची.त्यामुळे प्रत्येक कामामध्ये नारायण हवाच, असा घरच्या प्रत्येकाचा आग्रह असायचा. महिलावर्गाची साडी खरेदी हा पुरुषांचा सर्वात नावडता भाग परंतु, नारायण मात्र त्यात सुद्धा हिरीरीने सहभाग घ्यायचा. अशाप्रकारे एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये निस्वार्थपणे राबणारा नारायण आत्ताच्या 'दार-बंद ' आणि 'narrow minded' संस्कृतीमध्ये मिळणे अशक्य आहे.

हरितात्या
- हरितात्या जगण्यासाठी नेमका काय उद्योग करायचे हे कोणालाच माहित नव्हते. त्यांनी एक व्यवसाय कधी धड केला नाही. इतिहासातील प्रसंगांचे वर्णन हरितात्या असे काही करायचे की, शिवाजीमहाराज,रामदास किंवा तुकाराम हे त्यांचे बालमित्रच असावे. प्रत्येक प्रसंगामध्ये ते कुठे ना कुठे तरी स्वतःला गोवायचेच. मग, भले ती पावनखिंडाची लढाई असो किंवा रामदासांच्या बालपणीची एखादी गोष्ट. 'पुराव्याने शाबीत करीन' ही त्यांची ठरलेली catch phrase. इतिहासासारखा क्लीष्ट विषय हरितात्या इतका जिवंत करून सांगायचे की, ऐकणाऱ्याला तो आवडायला लागे. हरितात्यानी लहानपणी कधीच लेखकांना एक पैशाचा खाऊ दिला नाही, पण आपल्या इतिहासावरचा सार्थ अभिमान दिला.वार्धक्याने हरीतात्या गेले आणि त्यांच्यासोबतच 'पुराव्याने शाबीत करेन' हे वाक्यसुद्धा इतिहासजमा झाले.
 
सखाराम गटणे -काही लोक असतात जे कमालीचं शुद्ध आणि छापील बोलतात. ते बोलतात तेव्हा असे वाटते की बालभारती मधला एखादा धडाच वाचून दाखवत आहेत. सखाराम गटणे हा या category चा संस्थापक असावा. लेखकांची आणि गटणे ची ओळख एका व्याख्यानानंतर सही घेण्याच्या निमित्ताने झाली. आणि गटणेच्या अति शुद्ध बोली मुळे स्वतः साहित्यिक असूनही लेखक थक्क झाले.'अनुज्ञा', 'मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असल्या छापील शब्दांची अडगळ गटण्याच्या तोंडात नेहमी साठलेली असे. पेंटर बापाच्या घरी गटणे सारखी 'व्यासंगी' औलाद कशी काय उपजली हे लेखकांसाठी एक कोडेच होते. साहित्याशी एकनिष्ठ राहण्याचा विडा सख्याने उचलला होता आणि म्हणून तो लग्नाला तयार नव्हता. शेवटी तो लग्नाला तयार झाला, तेव्हा लेखकांनी त्याला पुस्तके भेट दिली. आणि त्यावर 'साहित्याशी एकनिष्ठ रहा आणि जीवनाशीही' असा संदेश लिहिला. गटणे आयुष्यात मार्गाला लागला आणि त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा निघाला. पाणी वाहते झाले!
 
चितळे मास्तर - चितळे मास्तर हे तीस वर्ष गावच्या शाळेत पहिली ते मॅट्रिक पर्यंत शिकवायचे. इतक्या वर्षाच्या प्रामाणिक नोकरीत त्यांनी गावच्या अनेक मुलांची मॅट्रिक पास करवून घेतली म्हणूनच शाळेला गावातील सर्वजण 'चितळे मास्तरांची शाळा' म्हणायचे. मास्तरांनी छडी कधीही वापरली नाही. त्यांच्या जिभेचेच वळण इतके तिरके होते की, तो मारच पुष्कळ असायचा. ते ११-५ शाळा करायचे आणि शाळा सुटल्यावर कच्या मुलांचे वर्ग घ्यायचे. घोकंपट्टी ,पाठांतर ह्या विषयांवर चितळे मास्तरांचा भक्कम विश्वास. पण ते पाठांतर मात्र मजेत व्हायचे. वर्गामध्ये त्यांनी कोणाची चेष्टा केली तर कोणत्या मुलाने अगर मुलीने ती मनावर घेतली नाही. ना कधी कोणत्या पालकांची चिट्ठी आली. मास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. मॅट्रिकच्या वर्गातील हुशार मुलांसाठी चितळेमास्तर सकाळी पाच वाजता स्वतःच्या घरी शिकवणी घ्यायचे. ते पण फुकट! त्यांनी आयुष्यभर एकच व्रत केले, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला घासून पुसून जगात पाठवून देणे. आणि हे काम करण्यात त्यांनी आपल्या चपलांच्या टाचा झिजवल्या.

अण्णा वडगावकर - अण्णा खरेतर पेशाने संस्कृतचे प्राध्यापक होते. पण त्यांचे वर्गातील शिकवणे मात्र एकापेक्षा अधिक भाषांमध्ये चालायचे. संस्कृत सारख्या विषयाच्या तासाला वर्गात हशा चाललेला असे आणि कधीकधी तर विद्यार्थ्यांच्या हसून हसून मुरकुंड्या वळायच्या.प्रत्येक तीन-चार शब्दांनंतर 'माय गुड फेलोज' हे संबोधन ठरलेलं. पण वडगावकर प्रोफेसरांनी फक्त संस्कृत कधीच शिकवले नाही तर त्यांनी वर्गात व्यवहार शिकवला. त्यांनी मुलांना 'लाईफ' शिकवली. म्हणूनच सगळया विद्याथ्यांचे ते आवडीचे प्रोफेसर होते.

अंतू बर्वा - रत्नागिरीच्या 'त्या' मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहायचे आणि अंतू बर्वा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. अंतूशेट आणि त्याच्या सांगाती यांचे जीवनाविषयी एक अचाट तत्वज्ञान होते. आणि 'अण्णू गोगट्या होणे' म्हणजे पडणे, 'अजगर होणे' म्हणजे झोपणे अशी विशिष्ट परिभाषा असे, जी नवख्या माणसाला उमगणे केवळ अशक्य. ह्या अड्ड्यातील विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयार होईल! अंतूशेट आणि 'त्या' आळीतले सारेच नमुने एकाच आडवळणाचे. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही, वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकार ही नाही. खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू!आयुष्याची गाडी कधी वेगाने धावली नाही पण कधी थांबली ही नाही. राजकारण हा ह्या अड्ड्याचा लाडका विषय. तो निघाला की अंतूशेटच्या जिभेवर सरस्वती नाचे. जीवनातल्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क त्याने प्यायला होता देव जाणे! दारिद्याच्या गडद काळोख्यात अंतू बर्व्याने आयुष्य एकाकी, आपल्या मताच्या पिंका टाकीत पण शिष्टतेने काढले. रत्नागिरीच्या फणसासारखा अंतू देखील वरून कठीण आणि आतून गोड व रसाळ होता. आणि हा गोडवा सुध्दा खूप पिकल्यावरच आला होता!

वरील पात्रांशिवाय पेस्तन काका,नंदा प्रधान,गजा खोत ह्यासारखी एकूण २० पात्रे पुस्तकात आहेत. ही पात्रे आपल्याला खळखळून हसवतात तर काही पात्रे अंतर्मुख ही करतात. पुल म्हणाले होते की, ही माणसे जर जिवंत होऊन कधी भेटली, तर मी त्यांना कडकडून भेटेन. पुस्तक संपल्यावर प्रत्येक वाचकाची काहीशी अशीच अवस्था होते! आणि ह्यालाच 'प्रतिभावंत' लेखन म्हणतात!

Book-O-Mania

Friday, July 16, 2021

माझी आवडती व्यक्तिरेखा - लखू रिसबूड

पुलंचे लेखन वाचण्याच्या, आवडण्याच्या आणि उमजण्याच्या बर्‍याच पायर्‍या असतात असं मला कायम वाटतं. अगदी सुरुवातीला शालेय वयात पुलं म्हणजे नुसती धमाल, जागच्याजागी उड्या मारायला लावेल असा विनोद आणि शुद्ध, निखळ मनोरंजन यापेक्षा जास्त काही जाणवलं नव्हतं. पण हे जे काही होतं तेच इतकं भरुन आणि भारुन टाकणारं होतं की त्याची झिंग अजूनही थोडी आहेच. मित्रांशी वाद रंगलेला असतो आणि मधेच एकदम कोणीतरी म्हणतो; 'बाबारे तुझं जग निराळं आणि माझं निराळं', आणि कसलाही संदर्भ देण्याची गरज न लागता ठसका लागेपर्यंत हसू मात्र येते, हे पुलंचा हँगओव्हर न उतरल्याचेच लक्षण! मुळात असा संदर्भ झटक्यात समजणारा तो मित्र अशीही व्याख्या करायला हरकत नाही.

विनोदाच्या या धुंदीत शाळकरी वयात तरी व्यक्ती आणि वल्लीमधल्या काही व्यक्तिरेखा समजल्याच नव्हत्या. आपल्या आजूबाजूला वावरणारे 'दोन उस्ताद' दिसले नव्हते की जनार्दन नारो शिंगणापूरकरचे दु:खही टोचले नव्हते. आज हे लेखन किंवा अगदी नारायण, हरितात्यासारखे 'व्यवच्छेदक' पुलं पुन्हा वाचताना आधी न कळलेला एखादा नवाच पैलू दिसतो. पण त्या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा मात्र मी तेंव्हा 'यात काय मजा नाही' म्हणून एका पानातच सोडली ती म्हणजे 'लखू रिसबूड'. आज मात्र पुलंनी रंगवलेल्या सगळ्या गोतावळ्यातील सर्वात अस्सल माणूस हाच आहे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. अगदी नंदा प्रधानपेक्षाही हा माणूस जास्त खरा आहे आणि म्हणूनच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त करुणही.

लखू ही एक सार्वकालिक व्यक्ति आहे. तो आदिम, पुरातन आहे. लखू खरेतर एक व्यक्ती नाहीच ती एक प्रवृत्ती आहे, एक अ‍ॅटीट्यूड, एक सिस्टीम. जगातील सर्व शारिर सुखांची हाव असलेला माणूस. कशालाच सर्व शक्तीनिशी भिडायला घाबरणारा. सतत न्यूनगंडाने पछाडलेला आणि त्यावर मात करण्यासाठी भाडोत्री विचारांची फौज गोळा करणारा. त्याला काहीच पूर्ण कळतं नाही, आवडत नाही, पचत नाही. कुठल्याच विचारसरणीचा त्याच्यावर प्रभाव नाही. त्याला कसलाही सखोल अभ्यास नको आहे. स्वतंत्र, मूलभूत आणि निखळ विचार त्याला जमू शकतो पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट त्याला नको आहेत. प्रत्येक ग्रेटनेसवर थुंकण्याची त्याला आवड आहे. त्याचे भोगही लाचार, त्याचे वैराग्यही ढोंगी.

पुलंनी ही व्यक्तिरेखा कधी आणि कोणाच्या संदर्भाने लिहिली ते माहिती नाही पण 'मिडीऑकर' या शब्दालाच जिवंत रुप देणारा हा माणूस त्यांच्या इतर अनेक लेखनातूनही डोकावतो. ज्याला टागोर 'पटत नाही' असा सुरेश बोचके, 'गोदूची वाट' साऱखे प्रयोग, अगदी धोंडो भिकाजी जोशीही याचेच एक स्वरुप आहे. असा'मी' मधला मी म्हणजे पुलं स्वतःच अशी समजूत करुन घेतलेल्या त्यांच्या अनेक चाहत्यांनी खर्‍या पुलंच्या मनातली अशा प्रवृत्तींविषयीची आत्यंतिक चीड सोयिस्करपणे दुर्लक्षली, त्यात मी ही एक होतो.

याच भ्रमात आयुष्य गेलेही असते, काय सांगावे सुखाचेही झाले असते, पण सुदैवाने तसे झाले नाही. पदवीच्या दुसर्‍या वर्षाला असेन, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे मतं उगवण्याचा काळ होता. एका वेगळ्याच नशेत, जगात घडणार्‍या प्रत्येक घटनेवर, सिनेमा, साहित्य, संगीत, खेळ कशावरही बेफाम टिप्पणी करीत चाललो होतो. आधी बर्‍यापैकी असलेले वाचनही बंद पडत चाललेले किंवा उगाच चर्चेत नावं भिरकावण्यापुरते. अशावेळी पहिल्यांदा, ते एक राहिलेय जरा वाचायचे अशा तोर्‍यात 'लखू रिसबूड' वाचला आणि कोणीतरी सणसणीत थोबाडीत मारल्यासारखे झाले. पार हेलपाटूनच गेलो. माझे सगळे आयुष्यच त्या झटक्याने बदलले. मी कोणत्या दिशेने चाललो आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे स्पष्ट, स्वच्छ, लख्ख कळून आले. या रिअ‍ॅलिटी चेकसाठी मी पुलंचा कायम ऋणी असेन.पाच पैशाचेही काम न करता आलेला फुकटचा सिनिक आव गळून पडला. आपल्याला खरचं काय कळतं? काय समजतं? काय आवडतं? या आणि अशा अनेक प्रश्नांनी कठोर आत्मपरिक्षणाला सुरुवात झाली जे अजूनही चालू आहे. ही दिशाहीनतेची जाणिव झाली नसती तर आपली वाट शोधण्याचा प्रयत्नही झाला नसता.

आज आयुष्यात फार काही भरीव केले आहे किंवा फार काही ज्ञान झाले आहे असे म्हणण्याचा फालतूपणा करणार नाही पण निदान उथळपणाला बांध बसला हे खरेच. समोरच्यामधला भंपकपणा पटकन जाणवायला लागला पण एका पातळीपर्यंत तो सहन करण्याची वृत्तीही आली. सर्वात महत्त्वाचे त्त्वा, आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही हे मान्य करण्याचा प्रांजळपणा आणि असे केवळ मान्य करण्याने फार काही ग्रेट साध्य झालेले नसते ही अक्कल नक्कीच आली आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट, शाम मनोहरांच्या 'कळ' मधला 'अंधारात बसलेला मठ्ठ काळा बैल' वाचत होतो. प्रचंड आवडले ते. आसपासची अशी अनेक माणसे आठवली. आपणही असेच पोकळ झालो असतो, पण पुलंनी वाचवलं हे मनात आलं आणि त्यांच्या लखू रिसबूडला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिले.

- आगाऊ
मूळ स्त्रोत -- > http://www.maayboli.com/node/41308

Friday, July 2, 2021

हरितात्या

......."पुराव्यानं शाबीत करून देईन. आत्ता चल माझ्याबरोबर मावळात कृष्णा घोडीच्या टापा उमटलेल्या दाखवून देईन..."

आणि खरोखरच हरितात्यांना त्या दिसत होत्या! "अरे, असे आम्ही दरबारात उभे! अशी आली कल्याणच्या सुभेदाराची सून - काय सुंदर म्हणून सांगू- ह्या यमीपेक्षा कमीत कमी सहा पट गोरी! हां, उगीच नाही सांगत- पुरावा आहे ..." आमच्या लहानपणी यमी हे सगळ्यांचे गोरेपणाचे माप होते. आमच्या आळीतले गोखल्यांचे एकमेव कोकणस्थ कुटूंब उजळ होते. बाकी समस्त देशपांडे-कुलकर्णी मंडळी अव्वल वर्णाची. हरितात्यांचा वर्ण तर मलखांबा सारखा होता. आम्ही, यमीपेक्षा सहापट म्हणजे काय गोरी असेल याच्या विचारात पडायचे! हरितात्यांचे काही शब्द निसटून जायचे : ".... आम्ही सगळे चित्रासारखे होऊन पाहतोय - महाराज पाहताहेत-"

"महाराज कोण?" आमच्या शाळूसोबत्यांत बाबू फडणीस म्हणून मुलगा होता. इतका ढ मुलगा पुन्हा पाहिला नाही!"

"महाराज कोण?" हरितात्या कडाडले. "पुर्ष्या, त्याच्या कानफटीत मार!" मग रितसर मी बाबूच्या कानफटीत मारली. बाबू अशा वेळी हनुवटीला खांदा लावून हसायचा. येडंच ते! पण हरितात्या खवळलेले असायचे.

"महाराज कोण?" या प्रश्नाचे उत्तर आम्हाला पाठ होते- "गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज!" आम्ही मुले दरबारातले भालदार चोपदार ओरडल्यासारखे ओरडलो. आम्ही हा गजर चालवलेला असताना हरितात्या आमच्याकडे छत्रपतींच्या ऐटीने पाहायचे!

"शाबास! तर काय सांगत होतो -"
"यमीपेक्षा सहा पट गोरी-" कुणाच्या तरी दातात एवढीच माहिती अडकली होती. त्याने यमीकडे पाहात नाक उडवले.
"नाक काय उडवतोस?" यमीपेक्षा सहा पट गोरी कोण होती?
"कल्याणच्या सुभेदाराची बायको-"
"बायको? गाढवा, बायको कशी येणार? तिथे कल्याणला सुभेदाराचा मुडदा पडलेला 'या अल्ला, या अल्ला' करीत - अंगणातल्या बाकावर अक्षरशः आडवे पडून हरितात्यांनी आक्रोश सुरू केला!
"सुभेदार खल्लास! त्याची बायको तिथेच. आणि इथे महाराजांच्या पुढे आणली ती सून! गोरीपान!"
"यमीपेक्षा सहा पट"
"हो. आम्ही पाहातोय, महाराज पाहताहेत- गरूडासारखे डोळे, गरूडासारखं नाक, डौलदार दाढी, गालांवर कल्ले ..."
"डोक्याला मंदिल, कमरेला भवानी, छातीवर मोत्यांची माळ, कपाळाला गंध..." आम्ही मुलांनी कोरस सुरू केला. महाराजांची गोष्ट आली की हे वर्णन एकदा तरी यायचेच. आम्हाला ते पाठ होते आणि हरितात्यांनी डौलदार दाढी पर्यंत वर्णन आणले की पुढले सगळे आम्ही म्हणत होतो आणि हरितात्या त्या त्या ठिकाणी आपला हात नेत.

"महाराज म्हणाले, बेटा पडदा निकालो. डरनेकी कोई बात नही ..." कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ही कथा आम्ही हरितात्यांकडून लक्ष वेळा ऐकली. पण हा संवाद नेहमी हिंदीत असे. "मग त्या सुनेने पडदा वर उचलला. महाराज म्हणाले, "वाहवा! भवानी मातेने तुला काय अप्रतिम सुंदर बनवलं आहे!" बायकांना सुंदर बनवण्याचं काम भवानी माता करते हे लहानपणी इतके मनावर ठसले होते की, कित्येक वर्षे सुंदर स्त्री पाहिली की तिचा हा मेकअप भवानीमातेने केलाय असे मनापासून वाटे. "आमच्या आईसाहेब सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो. अरे पुरषोत्तम काय सांगू तुला, त्या सुभेदाराच्या सुनेच्या डोळ्यातून टपटप टपटप टपटप अश्रू गळले. मग महाराजांनी तिला साडीचोळी दिली आणि परत कल्याणला पाठवलं..."

(..अपूर्ण)

हरितात्या
व्यक्ती आणि वल्ली
पु. ल. देशपांडे

Wednesday, June 16, 2021

आनंदयात्री ! - समीर जावळे

'एखाद्या माणसाची आणि आपली व्हेवलेंथ का जमावी? आणि एखाद्या माणसाची का जमू नये? याला काही उत्तर नाही..' 'पंधरा पंधरा- वीस वीस वर्षांचा परिचय असतो.. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापुढे आपलं नातं जात नाही. काही माणसं क्षणभरात जन्मजन्मांतरीचा दुवा साधून जातात.' बरोबर ही वाक्य लिहिली आहेत ती पु. ल. देशपांडे नावाच्या अवलियानेच. कारण ते होतेच तसे. रावसाहेब या म्हणजेच बेळगावच्या कृष्णराव हरिहर यांची कथा सांगत असताना पु.लंनी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. व्यक्ती चित्रण ही तर त्यांची खासियत. हे सगळं आज आठवण्याचं कारणही तसंच खास आहे. आज आपल्या लाडक्या पु.लंना आपला निरोप घेऊन 21 वर्षे झाली. आज त्यांचा एकविसावा स्मृतीदिन.
फोटो

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, कोट्यधीश पु.लं, ही आणि अशी अनेक विशेषणं लागलेला माणूस आपल्याला त्याच्या नावापुढे लागलेलं एक विशेषण नकोसं वाटणाराच राहिला आहे. ते विशेषण म्हणजे कैलासवासी पु.ल. त्यांच्या निधनाची बातमी आली आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. ज्या माणसाने निखळ हसायला शिकवलं तो माणूस आपल्या डोळ्यात आसवं ठेवून आजपासून एकवीस वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात आसवं ठेवून निघून गेला. अगदी काल घडल्यासारखाच हा प्रसंग आहे असंच वाटतं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरात आपल्या घरातला एखादा माणूस गेला अशी जी भावना निर्माण होते ती निर्माण होणं म्हणजे पु.ल. देशपांडे.

हरितात्या या त्यांच्या कथेत ते सांगतात की हरितात्यांनी आम्हाला कधी पैशांचा खाऊ दिला नाही. पण वेळप्रसंगी मुठी वळतील तो आत्मविश्वास, ते धैर्य हे त्यांनी न मागता आम्हाला दिलं. अगदी तसंच आहे पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्रातल्या मागच्या पिढ्या विसरलेल्या नाहीतच. तशा पुढच्या कैक पिढ्या विसरणार नाहीत. याचं कारण आहे ते म्हणजे त्यांची खास शैली आणि अफलातून विनोद बुद्धी. 'स्टँड अप कॉमेडी' हा प्रकार काय असतो? ते ठाऊक नसतानाही कथाकथन करून तो इतक्या वर्षांपूर्वी म्हणजेच 60 च्या दशकात करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. नुसतं धाडस दाखवलं नाही तर तो प्रकार रूजवला आहे. एक मोठा पोडियम, त्यावर लावलेला माईक, शेजारी भरून ठेवलेलं पाणी आणि हातात पुस्तक घेऊन पुलं त्यांची कथा फक्त वाचून दाखवत नसत तर ती जिवंत करत.

व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुझपाशी, खोगीरभरती, अंमलदार, ती फुलराणी, तुका म्हणे आता, गुण गाईन आवडी, खिल्ली, चार शब्द, गणगोत, पुरचुंडी, बटाट्याची चाळ, हसवणूक अशा कितीतरी पुस्तकांची नावं घेता येतील जी त्यांनी लिहिली आहेत आणि ती आजही लोकांच्या स्मरणात आहेत. असं म्हणतात की प्रत्येक लेखकाचा एक काळ असतो.. तो काळ सरला की त्या लेखकाला लोक विसरतात. पुलंच्या बाबतीत मात्र ते झालेलं नाही. त्यांच्या पुस्तकांमधून, कथांमधून, सीडीजमधून ते आपल्या मनामनातून जिवंत आहेतच.

मी वयाच्या दहाव्या वर्षापासून पु.ल. देशपांडे ऐकतोय, वाचतो आहे. मला व्यवस्थित आठवतंय की मी पहिली ऐकलेली कथा म्हैस ही होती. एका म्हशीचा बसखाली येऊन अपघात होतो आणि त्यानंतर पु.ल. फक्त आपल्या शब्दांमधून आणि अफाट निरीक्षण शक्तीतून आपल्या पुढे अख्खी बस आणि अख्खं गाव उभं करतात. एस.टी.तला कंडक्टर, ड्रायव्हर, मास्तर, सुबक ठेंगणी, मधु मालुष्टे, उस्मानशेठ, झंप्या दामले, बबूनाना, मास्तर अशी कितीतरी पात्र त्यांनी आपल्या लेखनातून उभी केली त्यांना आवाज देऊन जिवंत केली. एवढंच नाही तर म्हशीचा मालक धर्मा मांडवकर, ऑर्डरली, पुढारी बाबासाहेब मोरे, इन्सपेक्टर अशी सगळी पात्रंही त्यांनी जिवंत करून दाखवली आणि आपल्याला खळाळून हसवलं आहे. 'अरे अर्जूनाना कशाला धाडलंस? कंडम माणूस.. तो फोलिसासंगती कवड्या खेलत बसल..' 'बरा त बरा हे आडली साहेब होते यांनाच घेऊन आलो..' ए डायवर कोन ए.. ? 'हं हं.. मी बाबासाहेब मोरे' हे आणि असे सगळे संवाद तोंडपाठ आहेत.
फोटो
जी गोष्ट म्हैस या कथेची तीच तुम्हाला कोण व्हायचं आहे? पुणेकर, नागपूरकर? का मुंबईकर ? या कथेची. 'तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्यापुढे कर जोडावेत अशी ही तीनच खास स्थळं नागपूर, पुणे आणि मुंबई या पहिल्या वाक्यातूनच ते आपल्याला खिशात टाकतात.' 'तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे का? जरूर व्हा तूर्त सल्ला एकच पुन्हा विचार करा..' पुण्यात दुपारी खणखणारा टेलिफोन आणि त्याबद्दल केलेलं वर्णनही आपल्या खो-खो हसवतं. 'हॅलो, हॅलो असं फोन आल्यावर म्हणायचं हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण टेलिफोन करण्याप्रमाणे ऐकण्यालाही जर पैसे लागले असते तर आणि दुपारच्या झोपेतून उठवल्यावर आवाजात जो काही नैसर्गिक तुसडेपणा आणून कोण ए असं वस् कन ओरडायचं' हे वाक्य ऐकलं की आपल्याला जे काही हसू येतं त्याला तोड नाही..

सखाराम गटणे, नामू परिट, हरितात्या, पेस्तनकाका, दामले मास्तर ही सगळी पात्रं अक्षरशः ते जगले आहेत असंच आपल्याला त्यांच्या कथा ऐकताना वाटत राहतं. जसं ते हरितात्यांच्या कथेत म्हणतात 'कुठलाही ऐतिहासिक प्रसंग घडला की हरितात्या नेमके तिथे कसे हजर होते? हा प्रश्न आम्हाला पडायचा आणि मग पुढे जाऊन लक्षात आलं की इतिहास नावाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे हरितात्या. शाळेतला इतिहास आम्हाला कधीच आवडला नाही कारण त्यात सन होते. हरितात्यांनी सांगितलेल्या गोष्टी आवडल्या कारण ते आपली शिवाजी महाराज, बाजीप्रभू यांची भेट घडवून आणायचे' अगदी असंच पुलंच्या लेखणीचं स्वरूप होतं. त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांची ते आपल्या लिखाणातून आणि बोलण्यातून भेट घडवून आणायचे. त्यामुळेच ती पात्रं आपल्या डोळ्यासमोर उभी रहायची.
फोटो
असं म्हणतात की एखाद्याला रडवणं खूप सोपं असतं.. भावनिक प्रसंग, हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग लिहिले की रडू येतं. कारण वाचन केल्यानंतर माणूस त्यात गुंतत जातो त्या भावनेशी एकरूप होतो आणि त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहतात. पण खरं कसब पणाला लागतं ते हसवण्यात. एखाद्या माणसाला हसवणं ही किमयाच आहे. ती पुलंनी साधली होती. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि सूक्ष्म निरीक्षणातून.

पुलं फक्त कथा, कादंबऱ्या, नाटकं या निवडक साहित्यकृतींमध्येच अडकून राहिले नाहीत. त्यांनी वाऱ्यावरची वरात सारखं लोकनाट्य लिहिलं. 'ती फुलराणी आणि त्यातला तो संवाद आठवा.. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा.' भक्ती बर्वे, अमृता सुभाष, हेमांगी कवी इथवर अनेक अभिनेत्रींनी ती फुलराणी साकारली. त्यांना ती हवी हवीशी वाटली म्हणूनच.

नवरा बायको, गोकुळचा राजा, घरधनी, देवबाप्पा, संदेश, अंमलदार या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा, कथा, संवाद लिहिले, तसंच जवळपास वीस-बावीस सिनेमांसाठीही काम केलं. गुळाचा गणपती हा त्यांचा सिनेमा म्हणजे सबकुछ पु.ल. असाच होता.

गणगोत हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे त्यांच्या आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींवर होतं. रावसाहेब ही कथा याच पुस्तकातली आहे. रावसाहेबांचं वर्णन करतानाही पु.लंनी रावसाहेबांची शिव्या देण्याची शैली, दणकट माणुसकी, पु.लंनी बेळगाव सोडलं तेव्हा हळवे झालेले रावसाहेब हे सगळं ज्या पद्धतीने उभं केलंय त्याला खरोखर तोड नाही. कृष्णराव हरिह कोण होते? हे आपल्याला माहितही नसतं पण पुलं त्यांची भेट घडवून आणतात. एखादा माणूस वरून जरी कठोर वाटत असला तरीही आतून किती मृदू असतो अशा वेगळ्या प्रकारचं व्यक्तीचित्रण लक्षात राहण्यासारखं.

जी बाब खऱ्याखुऱ्या व्यक्तीरेखांची तीच बाब व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांमधल्या पात्रांचीही. अंतू बर्वा आठवा.. 'कुठे बोलू नका हो दारचा हापूस ही गेली तेव्हापासून मोहरला नाही हो..' काय अंतूशेठ रत्नागिरी झकपक झाली हो तुमची.. तुमच्या घरी आली की नाही वीज? छे हो काळोख आहे तो बरा आहे. गळकी कौलं आणि पोपडे उडालेल्या भिंती हे पाहायला वीज कशाला हवी?' हे सांगणाऱ्या अंतूची आर्तता. त्याच अंतूची अंतूशेठ म्हणून नक्कल करणारे मित्र हे सगळं त्यांनी ताकदीने उभं केलंय. एका लेखणीच्या जोरावर इतक्या पात्रांना जन्म द्यायचा आणि शिवाय ती सगळी आपल्या वर्णनातून जिवंत करायची हे काम नक्कीच खायचं काम नाही. ही किमया फक्त पुलंच साधू शकतात.
फोटो
बरं गंमत म्हणजे व्यक्तीचित्रणं आणि प्रवासवर्णनं तर त्यांनी केलीच.. पण प्राण्यांची निरीक्षणं? तीपण कसली अफलातून केली आहेत. पाळीव प्राणी ऐकताना.. आपण दंग होऊन जातो. 'पारव्यांचं घुमणं हे मला बऱ्याचदा मुंबईतल्या पारशी लोकांशी मिळतंजुळतं वाटतं आणि काही बाबतीत वागणं सुद्धा'. 'डांबिस हा शब्द मी जेव्हा पहिल्यांदा ऐकला तेव्हा इंग्रजीत बोक्याला डांबिस म्हणत असावेत असं वाटलं पण असा काही शब्द नाही बोक्यालाही कॅटच म्हणतात हे कळल्यावर मला त्या भाषेची किव आली.' 'एक मोठी लोणच्याची बरणी आणि चार कप-बशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला असं म्हणताच पटकन कावळा शिवला पिंडाला.' 'कावळा शिवत नाही यावर त्याची चूक नाही हो एकेकाची वेळ असते.' 'एका माणसाने माकडही पाळलं होतं पण दोघांचा आचरटपणा इतका वाढला की कुणा-कुणाला पाळलं आहे तेच शेवटपर्यंत कळलं नाही.' ही आणि अशी वाक्य ऐकून आपण पोट धरून हसतोच शिवाय त्यांनी केलेलं प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं वर्णनही आपल्याला पटतं.

पुलंनी महाराष्ट्राला काय दिलं असं जर कुणी विचारलं तर निखळ हसू हे उत्तर अगदी समर्पक ठरेल यात कुणाच्याही मनात शंका नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की मी आनंदयात्री आहे. जगण्यातला आनंद त्यांनी कायम शोधला. फक्त शोधलाच नाही तर तो आपल्या लिखाणातून, नाटकांमधून, कलेतून, गाण्यांमधून, संगीतातून वाटलाही. खळाळून निखळ हसवणारा हा माणूस अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. मात्र या अवलियाने आपल्या विचारांचा, लेखनाचा, कथांचा अमूल्य असा ठेवा आपल्या सगळ्यांसाठी ठेवला आहे. त्यामुळे आनंदयात्री जातानाही मागे आनंद ठेवून गेला आहे..अनंतकाळासाठी!

समीर जावळे
मुंबई तक
१२ जून २०२१

Tuesday, November 10, 2020

पुलंचा विनोद : आता होणे नाही?

पु. ल. देशपांडे उर्फ पुलं : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं कुठल्याही मराठी माणसानं अभिमानानं सांगावं असा लेखक व गुणग्राही कलावंत!   भाईंना जाऊन आतापावेतो दोन दशके झाली असली तरी त्यांच्या लिखाणातून ते घराघरात सामावलेले आहेत. गतवर्षी  त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली.  त्यांच्या नाटकांचे, व्यक्ती-वल्लींचे आणि इतर लिखाणाचे अनेक कार्यक्रम जगभर झाले.  खऱ्या अर्थाने 'झाले बहु होतील बहु पर या सम हा' असं हे बहुविध आणि बहुपेडी व्यक्तिमत्व होतं.  पुलंसारखं असं नानाविध क्षेत्रात लीलया वावरणारं आणि आनंदाची लयलूट करणारं व्यक्तिमत्व परत होणं अशक्य आहे. पण त्यांच्या विनोदाचं काय? त्यांच्या पूर्वीही अनेक विनोदी लेखक होऊन गेले आणि पुलंच्या पश्चातही अनेकजण चांगलं विनोदी लिखाण करत आहेत.  पण मला वाटत पुलंच्या विनोदाची सर कुठल्याच लेखनाला आलेली नाही, किंबहुना ती येणं शक्य नाही.  म्हणूनच पुलंसारखाच  त्यांचा विनोदही एकमेकाद्वितीय आहे.


इतकी वर्ष झाली तरी पुलंचा विनोद आपल्याला अजूनही हसवतो, रिझवतो, हसता हसता डोळ्यात पाणी आणतो!  त्यांनी लिहिलेली पात्र खरीखुरी, जिवंत वाटतात.  पुराव्याने शाबित करिन म्हणणाऱ्या हरितात्यांचा भास कुणाच्यात होतो, कुणाच्या तरी छापील वागण्यातून / बोलण्यातून एखादा सखाराम गटणे डोकावतो.  “समस्त रत्नाग्रीच्या गाई तूर्तास गाभण का रे झम्प्या?” असं म्हणत टोमणे मारणारा पण फणसासारखा आतून गोड असणारा कोकणातला अंतु बरवा सारखा कोणी भेटतो आणि पुलंनी वापरलेली प्रतीकं, उपमा किती चपखल आहेत हे पदोपदी जाणवत राहत.  त्यांच्या प्रत्येक विनोदाला एक करूण, हळवी किनार आहे.  ती डोळ्याचे काठ नक्की ओले करते,  ह्रदयात एक प्रकारची "फील गुड" भावना निर्माण करते.  कदाचित यामुळंच पुलंचा विनोद अजूनही हवाहवासा वाटतो. 


त्यांच्या विनोदाची शैली मिश्किल आहे, कुणालाही न दुखावणारी आहे. तो विनोद खऱ्या अर्थाने निर्मळ आहे. पुलंनी कधीच कुणाला दुखावणारा किंवा कमरेखालचा विनोद केला नाही - त्याची त्यांना गरजच पडली नाही. सहकुटुंब सहपरिवार दिलखुलास हसता येईल आणि हसता हसता अंतर्मुख करून जाईल असा विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य. अर्थात त्यांच्या विषयाला काही मर्यादा आल्या हे निश्चित.  काही झालं तरी तो मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजाशी निगडीत राहिला. त्यांनी पाहिलेलं, जगलेलं चाळीतले आयुष्य, आणि काळाच्या ओघात झालेले बदल न रुचल्यानं एक प्रकारचं स्मरणरंजन करणारा झाला. त्यामुळं पुलंच्या विनोदावर/लिखाणावर तो स्मरणरंजनात रमणारा विनोद आहे असा एक आरोप होतो.  काही प्रमाणात तो खरा असेलही.  पण मला वाटतं तो फक्त तेवढ्यापुरता सीमित राहिलेला नाही. त्यांच्या विनोदाची वीण ही पक्की आहे. कधीकधी विनोद सांगताना त्यातून अचानक एखाद वैश्विक सत्य अलगदपणे सामोरं येतं.  उदा. शेवटी काय घड्याळाचे पट्टे नी तबकड्या बदलतात.. सुखाने टळलेली दुपार पहायला तबकडी आणि पट्ट्या कुठल्या का असेना” किंवा “शेवटी तुम्ही आम्ही काय, पत्रातल्या पत्त्याचे धनी.. मजकूराचा मालक मात्र निराळाच असतो!!”


तो विनोद पूर्णपणे कालसापेक्ष नाही, स्थळसापेक्ष नाही हे खरंय.  आता चाळी नामशेष झाल्या, ओनरशिपचे ब्लॉक्स आले, माणसामाणसातला आपुलकीचा ओलावा काही प्रमाणात कमी झाला, जीवन अधिक वेगवान झाले.  त्यामुळे असो किंवा विनोदाचे काही संदर्भ जुने झाल्यानं (उदा. लुगडी नेसून शाळेत जाणारी गोदाक्का आता नाही!) असो, पुलंचे काही विनोद आता फारसे समजत वा रुचत नाहीत. असं जरी असलं तरी त्या विनोदाचा दर्जा मात्र नक्कीच उच्च प्रतीचा आहे आणि तो मात्र अजिबात बदललेला नाही.  या उलट आजकाल करमणुकीच्या क्षेत्रात पाहिलं तर विनोदाचा दर्जा फारच ढासळलेला दिसतो. अनेकदा ज्याला 'स्लॅपस्टिक कॉमेडी' म्हणतात तिकडेच तो झुकताना आढळतो. त्या पार्श्वभूमीवर पुल लिखित 'ती फुलराणी', 'असा मी असामी' ह्यातील विनोद अजूनही ताजातवाना वाटतो.  "तुम्हाला पुणेकर, मुंबईकर का नागपूरकर व्हायचंय?" हा लेख असो किंवा पुलंचं 'माझा शत्रुपक्ष' असो हे विनोद कधीच जुना झालाय असं वाटत नाही. त्यांनी सूक्ष्म निरीक्षणशक्तीतून निवडलेली माणसांची वैशिष्ट्य अजूनही काही बाबतीत तंतोतंत खरी असल्याचं जाणवतं! त्यांचं पौष्टिक खाद्यजीवन वाचताना अजूनही जिभेला पाणी सुटत नाही असा रसिक न सापडणं विरळच !  एवढंच कशाला, आता परदेश प्रवासाची नवलाई कमी झाली असली तरीही त्यांची अपूर्वाई/पूर्वरंग वाचताना विनोदाची झालर लोभस आणि सुखदायी वाटते.


शाब्दिक कोट्यात तर पुलंचा हात धरणारा कोणी नाही! त्यांच्या अनेक कोट्या अजूनही वापरल्या जातात!  अगदी पुलंची सुनीताबाईंना उद्देशून केलेली "मी देशपांडे व ही उपदेशपांडे" ही कोटी असो वा उपहासाने म्हणलेले "आपल्या मदरटँग मध्ये आपले थॉट्स जेवढे क्लिअरली एक्सप्रेस करता येतात ना तेवढे दुसऱ्या भाषेत येत नाहीत" वाक्य असो, आपल्याला हमखास हसवतेच!  उगाच नाही  त्यांना कोट्याधीश पुलं म्हणत ! 


त्यांच्या पूर्वीच्या लेखकांच्या  लेखनात ज्यांच्यावर विनोद व्हायचा/केला जायचा त्यांना कुठंतरी शालजोडीतले मारता मारता त्यांची कुठंतरी खलनायक/खलनायिका अशी प्रतिमा तयार होत असे, पण पुलंच्या विनोदाचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्या विनोदात खलनायकच नाही. त्यामुळे त्यांचा विनोद अजिबात बुळबुळीत होत नाही.  उलट तो कितीही टोकदार झाला तरीही तो दुखावत नाही. साध्या शब्दातून हसवत, कोटी करत, उणिवांकडे बोट दाखवत आपल्याही नकळत, हळूच डोळ्यातून पाणी काढण्याचं कसब फक्त पुलंच्याच विनोदात आहे.


दुःखी असताना पु.ल. वाचले तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि आनंदात वाचले तर तो आनंद दुप्पट होतो असा माझाच अनुभव आहे. आणखी किती लेखकांच्या लेखनाबद्दल असं खात्रीनं म्हणता येईल?  पुलंची भाषा अलंकारिक नाही पण त्यांचा विनोद कळायला, त्याचा आस्वाद घ्यायला मराठी भाषेची बलस्थान माहिती हवीत हे मात्र नक्की. पुलांसारखा विनोद परत होणार नाही असं जेंव्हा मी म्हणतो त्यामागे हे पण एक कारण आहे. मराठी भाषा झपाट्याने बदलत चालली आहे. भाषेविषयी आपुलकी, आत्मीयता हळूहळू कमी होते आहे. साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यापेक्षा चित्रपटातील झगमगीकडे समाजाचे, विशेषतः युवापिढीचे लक्ष आहे. त्या आकर्षणापोटी चांगल्या, दर्जेदार विनोदी साहित्याच्या निर्मितीची गती कमी झाली आहे. या पूर्वी म्हटल्याप्रमाणे ते वेगळे दृश्य माध्यम असल्याने तेथील विनोदही शारीरिक व प्रासंगिकतेकडे झुकणारे आहेत. असले विनोद काही वेळा क्षणभर हसवतातही,  पण पुलंच्या कुठल्याच विनोदासारखे लक्षात राहात नाहीत असा माझा अनुभव आहे. म्हणूनच तसा विनोद परत होणार नाही असं मला वाटतं.  


मंगेश पाडगांवकरांनी पुलंबद्दल लिहिलंय ते परत एकदा उद्धृत करावंसं वाटतं : 


पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,

नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,

निराशेतून माणसे मुक्त झाली,

जगू लागली, हास्यगंगेत न्हाली


अशी आनंदयात्रा, हास्यगंगा तयार करणारा, निराशेतून बाहेर काढणारा  विनोद परत होणार नाही असं म्हणणं खरं तर एका अर्थानं त्यांच्या लिखाणाचं, विनोदाचं कौतुक करणारं, अभिमानास्पद  आहे आणि त्याच वेळी असे दर्जेदार विनोदी लिखाण करणारे आणखी मराठी लेखक अजून मिळाले हे शल्य असणारही आहे. पण ज्यांच्या नावातच दुसऱ्याला "पुलकित" करण्याचं सामर्थ्य आहे असे लेखक नेहमी जन्माला येतात थोडेच?


~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

लेखक:    सागर साबडे
“मला काय वाटतं....” लेखन स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त लेख.

Wednesday, October 31, 2018

पु.ल. एक आनंदयात्री

दिवाळी अंकासाठी पु.लंवर लेख लिहायला जमेल का? विचारणाऱ्याचा प्रश्न ही बिलंदर होता. लिहिणार का पेक्षा जमेल का लिहायला हा खरा प्रश्न. वास्तविक पुलंचं लेखन मला खूप आवडतं असं म्हणणं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिणं या दोन वाक्यातली तफावत गेल्या दहा दिवसात मला चांगलीच जाणवली. पण अखेर अवसान गोळा करून लिहिण्यास सुरुवात केलीच. त्यांच्या पुस्तकातून पुलंची ओळख होत गेली ती अशी, पु.ल. म्हणजे अनेक गुणांचं, कलांचं, बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व, पु.लं. म्हणजे बुद्धीविभव, सर्जनशील वक्ता, पु.लं. म्हणजे संगीताभिनयाचा जाणकार, पु.लं. म्हणजे गरुडाची निरीक्षणशक्ती असणारा डोळस लेखक, पु.लं. म्हणजे निखळ, निरागस, निर्हेतुक आनंदोत्सव घडविणारा कवी, जिंदादिल आस्वादक, रसिक जीवनयात्री, पु.लं. म्हणजे मराठी मनाचा आरसा प्रामाणिक, सचेतन, सहृदय. हे सारं लिहिलं खरं पण कानात रावसाहेब खेकसले, ‘हे कसलं हो असलं मिळमिळीत?’ मग हा रूळ ताबडतोब बदलून टाकला. म्हटलं, पु.लं. म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा, पु.लं. म्हणजे मराठी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेते, पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पुरस्कारांचे मानकरी,साहित्य समेलन आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष;तेवढ्यात शंकऱ्या किणकिणला, ‘आमचे बाबा कीनई नारूच्या बाबांपेक्षा चिक्कार शक्तीवान आहेत, पोट पुढे असलं म्हणून काय झालं?’ लेखाला सुरुवात केली खरी न् पण असामी ची ओळख काय म्हणून झाली नक्की, हा प्रश्न काही सुटेना. मग मात्र ठरवून टाकलं की, या विदुषकाचा मुखवटा धारण केलेल्या विनोदकार, नाटककार, कवी, गायक, वादक, वक्ता आणि बैठ्या मैफिलींच्या अनभिषिक्त सम्राट असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा द्यायचा हे आपल्या लेखाचं निमित्त.

पुलंनी त्यांच्या लेखनातून आनंद दिला आणि आपण रसिकांनी तो पुरेपूर लुटला. ‘विनोद’ हा पुलंच्या लेखनाचा मूलाधार होता पण त्यांना हशा मिळविण्यासाठी कधी विनोद करावा लागला नाही. खरं तर सुमार आणि सपक विनोद हे विनोदाचे शत्रू पुलंच्या विनोदात कधी दिसलेच नाहीत. असामी असामी मधला बेमट्या उर्फ धोंडो भिकाजी जोशी चे डी बी अंकल हा प्रवास अनुभवताना आपण त्यांच्याबरोबर एका कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाचा प्रवास अनुभवला. सर्वसामान्य माणसाच्या आशा, अपेक्षा, आवडी असणारा तो, त्याच्या त्या केविलवाण्या आयुष्याला हसत असताना आपण त्याचे कधी होऊन गेलो ते कळलंच नाही; ते वाचताना वा ऐकताना आपण स्वत:लाच हसत होतो याचंही भान आपल्याला उरलं नाही. उलट चार्ली चाप्लीनला पुलं ‘तू माझा सांगाती’ असं का बरं म्हणत असतील हे आपल्याला मनोमन पटलं.

पुलंनी जसा हा माणूस उभा केला तशीच बटाट्याच्या चाळीचीही निर्मिती केली. तिच्यातून नुसती चाळच नाही तर मुंबईसुद्धा भेटली. अगदी तिचा कधीही अनुभव न घेतलेल्यालाही ती जवळची वाटली. त्यांनी या चाळीला एक स्वतंत्र, संवेदनक्षम आणि बोलकं व्यक्तिमत्त्व दिलं. त्या चाळीबरोबरच सुतकी आवाजात ‘पंत, तुम्ही उपास सुरु केलाय?’ असं म्हणणारे कुशाभाऊ, ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे?’ हे विचारणारा फर्ताडो, पट्टीच्या न सापडणाऱ्या सुरात गाणाऱ्या वरदाबाई, ‘कुठल्याशा किल्ल्याला चिखल किती लागला ते पन्हाळगडच्या पावनखिंडीची लांबी रुंदी काय होती’ असली कागदोपत्री प्रवासाची इत्थंभूत माहिती असणारे बाबुकाका खरे ही सगळी मंडळीही आपल्याला तिथेच भेटली किंबहुना ती रूपं बदलून आजन्म भेटत राहतील. पुलंचं लेखन नुसतंच व्यंग किंवा विसंगती दाखवणारं नव्हतं तर त्यावर ते एक मार्मिक भाष्य करीत, कधी त्यात खोचक चिमटेही घेत असत पण त्या विनोदाचा दर्जा कायमच निखळ अन् निकोप असे.

पुलंचं लेखन खरंतर आपण वाचत नाहीच ते ऐकत असतो. बहुतेक त्यांना लिहिण्यापेक्षा बोलायला अधिक आवडत असणार म्हणून असेल. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘गोळाबेरीज’ आणि ‘मैत्र’ यासारख्या पुस्तकातून त्यांने लिहिलेल्या व्यक्ती आपल्याला खरोखर भेटतात. ‘सर, हे पेढे.’ म्हणत सुरातील अजिजी दाखवणारा सखाराम गटणे, ‘इथे सगळेच पंचेवाले, अन त्याच्यापेक्षा उघडे.’ असं बिनधास्तपणे सांगणारा अंतू बर्वा, ‘आम्ही पाहतोय, महाराज पाहताहेत..’ म्हणत शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं करणारे हरितात्या, सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी, ‘हं, ‘नाना फडणवीस’ अशी सही केली’ म्हणणारे बघुनाना, ते ‘आयुष्यात व्रत एकच केलं, पोरगं सापडलं तावडीत की त्यास घासून पुसून लख्खं करून जगात पाठवून देणे!’ असं म्हणणारे चितळे मास्तर अशी जर या वल्लींची यादी करावयास सुरुवात केली तर ती संपणारच नाही. पुलंच्या समृद्ध भाषेमुळे, संवेदनशीलतेमुळे, लोकसंग्रहामुळे, आणि अनुभवसंपन्नतेमुळे त्यांचे विनोद केवळ हासण्यापुरते मर्यादित न राहता त्या मागची कारुण्याची लकेरही आपल्या नजरेस येते.

बरं, पुलंच्या लेखनाच्या वैविध्याबरोबर विषयांचंही वैविध्य होतं; त्यांना कुठल्याही विषयाचंही वावडं नव्हतं. प्रत्येक विषयावर त्याचं प्रभुत्व, त्याचा अभ्यास त्यांनी वापरलेल्या परिभाषेतून दिसून येई. त्यांची प्रवासवर्णनंही अशीच वैशिष्ट्यपूर्ण मग ते ‘जावे त्याचा देशा’ असो किंवा ‘अपूर्वाई’. त्यांची आठवणी लिहिण्याची हातोटी विलक्षण होती. अपूर्वाई तील एक आठवण, प्रवासात हॉटेलमधल्या फ्रेंच वेटरशी संवाद करण्याचा प्रसंग गुदरला, तेव्हा पु.लं म्हणतात, ’दूध हवं, हे सांगण्यासाठी कागदावर एक गाय काढली - काढली कसली, गोहत्याच ती!’ आता यापुढे आपण पामराने त्यांच्या विनोदबुद्धीवर काय बोलावं? आपल्याला मराठी कळतं त्यामुळे आपण हे वाचून आनंद घेऊ शकतो, अनुवाद वगैरे ऐकण्या-वाचण्याची वेळ आपल्यावर येत नाही याबद्दल कृतज्ञ राहावं इतकंच.
असं असलं तरीही, पुलं विरोधी गटही काही कमी नाही, नुसतेच विनोदी, उथळ, वरवरचे, फक्त जे लोकांना ऐकायला आणि वाचायलाच आवडेल असे लिहिले असे आरोपही होत या लेखनावर आले. पण त्यांनी त्यांच्या लेखनातून विषमता, अन्याय, दंभ, मत्सर ही समाजाची कुरूपता मुद्दाम कधी दाखवली नाहीत. स्वत:च्या दु:खाचे मनोरे रचून आपल्याला रडवले नाही; उलट रडू येईपर्यंत हसवले. आणि विरोधकांना त्यांच्या विरुद्ध मतासह आपले मानले. आताचा काळ तर असा आहे की, पुलंचे कित्येक विनोद, किस्से, कोट्या या स्वत:च्या नावाने दडपून लोक ते व्हॉटस् अॅपताना, फेसबुकताना किंवा त्याची पुणेरी पाटी बनतानाही दिसून येते. कदाचित हेच त्या लेखकाचं यश असेल, की त्याचा विनोद हा सर्व सामान्य माणसाला इतका जवळचा वाटतो. पुलंचं लेखन आपण जितके वेळा वाचतो तितके वेळा ते आनंदच देतं, त्याचं कंटाळा येत नाही. आता उदाहरणच द्यायचं तर, पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि पौर्वात्य संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती, ‘संगीत संशयकल्लोळ’ मधील संगीत नसते, तर बरे झाले असते, असे म्हणण्याइतके मधुर आहे, किंवा एकदा मर्ढेकरांच्या कविता सादर करायला जाण्यापूर्वी भरपेट जेवण झाल्यावर ‘इतके जेवण झाल्यावर मर्ढेकर कुठला? नुसता ढेकर.’ हे आणि असं खुमासदार लेखन न आवडेल तरच आश्चर्य. त्यातून पुलंनी त्यांच्या खास गोष्टीवेल्हाळ शैलीत ते ऐकवलं तर आणखी लज्जतदार. अक्षरांशी थोडाफार संबंध आलेला असा एकही माणूस नसेल ज्याने पुलंचं नाव ऐकताच त्याच्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला हात घातला जाणार नाही वा उत्साहाची लहर उठणार नाही.
त्यांच्यातला लेखक एक उत्तम अभिनेता म्हणून भेटतो तो ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री प्रयोगात आणि तितकाच परिणामकारक दिग्दर्शक भेटतो ‘वाऱ्यावरची वरात’ किंवा ‘वटवट’ सारख्या सामुहिक नाट्यप्रयोगांचे मोट वळताना. त्यांना एक कसबी लेखक, गायक, वादक, अभिनेता म्हणून ओळखू लागतो तोवर ‘शिकवीन चांगलाच धडा’ म्हणत ‘ती फुलराणी’ समोर उभी राहते,त्यांच्या भाषा आणि बोलींच्या अभ्यासाची आपल्यावर मोहिनी घातली जाते,आणि त्यांच्यातला नाटककार खुणावून जातो. ‘सुंदर मी होणार’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ सारखी नाटकं, रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण नाटकं म्हणून आजही आठवली जातात.

पुलंच्या लेखनातून जसे ते अगदी मनापासून भिडतात तसेच ते त्यांच्या अभिनयातून आणि अभिवाचनातून आपल्याला मनोमन भावतात. गुळाचा गणपती, किंवा बटाट्याची चाळ मधील त्यांच्या लयबद्ध हालचाली असोत किंवा म्हैस मधील कित्येक आवाजांचे प्रकार असोत, हा सगळा खटाटोप ते लीलया साधून जातात. म्हणूनच की काय, आपण त्यांनी संगीत दिलेली ‘नाच रे मोरा’, ‘कौसल्येचा राम’, ‘माझे जीवनगाणे’, ‘शब्दावाचून कळले सारे’, किंवा ‘हसले मनी चांदणे’ यासारखी गोड गाणी कधी विसरूच शकणार नाही. एरवी मिश्कील असणारे पु.लं इतर कवींच्या कविता मात्र अतिशय गांभीर्याने ऐकवत असत. ‘आनंदयात्रा कवितेची’ हा बा. भ. बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करताना उत्तम आस्वादक असलेल्या पुलंकडून त्याचं कवितांवर असलेलं प्रेम वाक्यावाक्यातून जाणवत राहतं. सरीवर सरी आल्या गं, किंवा समुद्रबिलोरी ऐना यासारख्या कविता म्हणतानाचा त्यांचा सुरेल आवाज ऐकत रहावासा वाटतो. या बहुरूपी अवलियाचं रुपडं आपण जितकं म्हणून शोधू, पाहू तितकं रंगीबेरंगी दिसू लागतं.

या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू तरी किती असावेत, एकाविषयी आश्चर्य, कौतुक वाटावं तोवर दुसरा समोर यावा. त्यांची अशीच एक विलक्षण गोष्ट वाटली ती म्हणजे ते वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर मुद्दाम शांतीनिकेतन मध्ये जाऊन बंगाली भाषा शिकले, त्या भाषेचा, परिसराचा अभ्यासही केला. जर कुठलीही भाषा शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटते तिथे जाऊन, तिची नाना स्वरूपे अनुभवून व भोगून शिकायची ही त्यांची धारणा. हे त्याचे केवळ तत्व म्हणून मानले नाही तर त्यांनी तसे अनुभव घेऊन ते ‘वंगचित्रे’ मधून त्यांच्या शब्दातही मांडलेदेखील.

पुलंच्या ठायी हे सारे गुण तर होतेच होते पण त्याहीपेक्षा अफाट माया आणि प्रेम होते ते ‘माणूस’ या गोष्टीविषयी. त्यामुळे त्यांनी असंख्य माणसांना आपलेसे करून घेतले आणि सत्पात्री दानही केले. या त्यांच्या सव्यापसव्याचे शिस्तबद्ध दिग्दर्शन केले ते त्यांच्या पत्नीने ‘सुनीताबाई’ यांनी. रसिकांनी जसे त्यांच्यावर प्रेम केले तितकेच प्रेम पुलंनी समाजावर, मुक्तहस्ताने आणि आजन्म केले. त्यांच्यासाठी बोरकरांनी लिहिलेल्या या कवितेच्या ओळी खरंच किती समर्पक आहेत बघा,..

जराशप्त या येथल्या जीवनाला | कलायौवने तूच उ:शापिले |
व्यथातप्त जीवी स्मिते पेरुनी तू | निराशेत आशेस शृंगारिले |
मिलाफुन कल्याणकारुण्य हास्यी | तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली |


तुझ्यासारखा तूच आनंदयात्री | तुवां फेडिली गाठ प्राणातली |

युवोन्मेष दिवाळी अंक २०१८
नंदिता गाडगीळ

a