Leave a message
Showing posts with label पु.लं. च्या कविता. Show all posts
Showing posts with label पु.लं. च्या कविता. Show all posts

Tuesday, April 30, 2019

मारवा आजही स्मरणात आहे! - सुनंदा धर्माधिकारी

''रायकरवाडी' या नाटकाच्या प्रयोगावेळी बासरीवादकामुळे प्रयोग खोळंबलेला पाहून 'त्यांनी' बासरीवर वाजवलेला तो मारवा आजही अगदी तसाच माझ्या स्मरणात आहे. मी तो प्रयोग विसरू शकलेले नाही. मी ते स्वर विसरू शकलेले नाही आणि ती व्यक्ती मी विसरू शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पु. ल. देशपांडे. म्हणजे आमचा पीएल!' पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांचा दीर्घ सहवास लाभलेल्या जुन्या पिढीतील अभिनेत्री सुनंदा धर्माधिकारी यांनी भाईंच्या आठवणींना दिलेला उजाळा...
साधारण १९५७ची गोष्ट. नाट्यदिग्दर्शक, लेखक बाबा डी. के. यांच्या 'रायकरवाडी' या नाटकाचा इंदूरमधील प्रयोग. माझी नाटकातली प्रमुख भूमिका. नवखी असल्याने मी प्रचंड गोंधळलेली, घाबरलेली. प्रेक्षक, प्रमुख पाहुणे आसनस्थ झाले. पडद्यामागे गोंधळ आणि पडद्यासमोर प्रचंड गर्दी. नाटक सुरू होण्यास होणारा विलंब; कारण बासरीवादकाचा पत्ता नाही आणि नाटकाची सुरुवातच बासरीच्या स्वरांनी. सारे खोळंबलेले. अशा वेळी एक माणूस पडद्यामागे आला आणि बाबांना विचारू लागला, 'काय झालं?' कारण समजल्यावर म्हणाला, 'एवढंच ना? मला फक्त बासरी आणून दे, मी वाजवतो.' त्यांनी बासरीवर वाजवलेला तो 'मारवा' आजही माझ्या स्मरणात अगदी तसाच आहे. मी तो प्रयोग विसरू शकलेले नाही. मी ते स्वर विसरू शकलेले नाही आणि ती व्यक्ती मी विसरू शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पु. ल. देशपांडे. म्हणजे आमचा पीएल.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मनस्वी कलाकार असलेल्या पु. ल. देशपांडे यांची आणि माझी पहिली भेट ही अशी झाली. माझा जन्म मध्य प्रदेशमधील उज्जैनचा. कलेच्या वातावरणातच मी लहानाची मोठी झाले. गणेशोत्सवात होणाऱ्या नाटकांतून छोट्यामोठ्या भूमिका केल्या. नाटकवेड रक्तात भिनलं. त्या काळी लवकर लग्न होत. माझंही लग्न लवकर झालं आणि मी इंदूरला आले. आपण पुन्हा नाटक करावं अशी ऊर्मी पहिल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर दाटून येऊ लागली. त्याचवेळी माझी भेट सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, लेखक बाबा डी. के. यांच्याशी झाली. त्यांच्यामुळे १९५६मध्ये मी 'नाट्यभारती'शी जोडले गेले. १९५७मध्ये 'लिटिल थिएटर्स' या संस्थेची स्थापना आम्ही केली आणि वर्षाला सहा दर्जेदार नाटकांची निर्मिती करायचं ठरवलं. संस्थेच्या पहिल्याच वर्षी यूजीओनिल या सुप्रसिद्ध इंग्रजी नाटककाराच्या 'बीयाँड द होरायजन' या नाटकाचा मराठीत अनुवाद करून बाबांनी लिहिलेलं 'रायकरवाडी' हे नाटक आम्ही बसवलं. त्याच्या पहिल्याच प्रयोगाला वर सांगितल्याप्रमाणे माझी आणि पीएलची भेट झाली. पुढे ती होत गेली आणि मला माझा नाट्यगुरू मिळाला. अतिशयोक्ती वाटू शकतं; मात्र खरं सांगते, मला माझा देव मिळाला!

आज भाईंना आठवताना किती भेटी स्मरतात. ते अतिशय साधे-सरळ-सहज आणि विनोदी होते. कोणी कामात हयगय केलेली त्यांना अजिबात खपायची नाही. या माणसाचं कलेवर केवळ प्रेम होतं असं नाही, तर त्यांची कलाविष्कारावर निष्ठा होती. जे करायचं ते उत्तमच, असा आग्रह होता. 'लिटिल थिएटर्स'च्या एका कार्यक्रमात बाबांनी भाईंना अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. आम्ही सगळेच नवोदित आणि अव्यवसायी असल्यानं, संवाद पाठांतरात गडबड व्हायची. ते कधीतरी भाईंच्या लक्षात आलं असेल. कार्यक्रमात बाबा म्हणाले, 'मी आता विनंती करतो, की पु. ल. देशपांडे यांनी दोन शब्दांत मार्गदर्शन करावं.' भाई बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, 'दोनच शब्द सांगतो, पाठ करा!' अशा असंख्य आठवणी आहेत.

बाबा डी. के. यांनी लिहिलेलं 'कारकून' नाटक त्या काळी खूप गाजलं होतं. त्या नाटकात माझी खूप छोटी भूमिका होती. माझ्या वाट्याला केवळ बारा वाक्यं होती. पडद्यामागे मी खूप काम करायचे. अगदी पडेल ते. एका प्रयोगाला भाई आले होते. त्यांनी माझी धावपळ पाहिली आणि ते सर्वांना म्हणाले, 'अरे, या पोरीची काय कमाल आहे रे! ही काय काय करते!' त्यांची ही शाबासकीची थाप मला खूप बळ देऊन गेली. आज मागे वळून पाहताना जाणवतं, मी भाईंमुळे केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही समृद्ध झाले. त्यांच्यामुळे माझी वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, मो. ग. रांगणेकर, भीमसेन जोशी, रामूभय्या दाते या दिग्गजांशी ओळख झाली. पुढे या सगळ्यांशी अतूट स्नेह निर्माण झाला. इंदूर, उज्जैन, देवासमध्ये मी यांच्या कितीतरी मैफली ऐकल्या आहेत.

पुढे माझं काम बघून रांगणेकरांनी एकदा विचारलं, 'मी 'नाट्यनिकेतन' ही संस्था सुरू करतोय. तू आमच्याकडे काम करशील का? तुला मुंबईत यावं लागेल.' हा माझ्यापुढे खूप मोठा पेच होता; कारण मुंबईत आमचं कोणीच नव्हतं. माझे यजमान गोविंद धर्माधिकारी इंदूरला रेल्वेत नोकरीला होते. संसाराचा व्याप वाढला होता. मी तीन मुलींची आई झाले होते. अखेर विचाराअंती नम्रपणे नकार दिला. त्यानंतर एकदा घडलेला प्रसंग. शिवाजी मंदिरामध्ये आमचा 'फुलाला सुगंध मातीचा' या नाटकाचा दुपारी प्रयोग होता आणि त्यानंतर लगेचच पुलंचं 'वाऱ्यावरची वरात' होतं. नाट्यगृहाच्या जिन्यात आमची भेट झाली. मला म्हणाले, 'एक लक्षात ठेव. रांगणेकरांकडे एकदा काम केलेला मनुष्य नंतर कधी मागे वळून पाहत नाही. उदाहरणार्थ, पु. ल. देशपांडे, प्रभाकर पणशीकर आणि आता सुमन धर्माधिकारी.' ही माझ्यासाठी खूप मोठी दाद होती.

त्यानंतर खरंच तसं झालं. मी सुमारे पाच-सहा नाट्यसंस्थांसाठी काम करू लागले. 'प्रीती परी तुजवरती'सारखी नाटकं खूप गाजली. अभिनेत्री म्हणून मला नाव मिळू लागलं. या प्रवासात मी भाईंचा वाढदिवस कधीच चुकवला नाही. प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊन नमस्कार करायचे आणि फूल द्यायचे. भाईंचं 'तुज आहे तुजपाशी' हे नाटक मी हिंदीत केलं. त्याचं लेखन राहुल बारपुते यांनी केलं होतं. त्यावरही भाई खूष होते. १९७२मध्ये मी 'घार हिंडते आकाशी' या रंगनाथ कुलकर्णी लिखित नाटकाचे एकपात्री प्रयोग सुरू केले. तेव्हाची एक आठवण आहे. भाईंना फोन केला आणि सांगितलं, 'मी एकपात्री प्रयोग करते आहे. तुमचे आशीर्वाद हवे आहे.' मला म्हणाले, 'आता हे खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यात. तू आताच्या आता माझ्या घरी ये.' तेव्हा ते मुंबईला 'मॉडेल हाउस'मध्ये राहायचे. आम्हीदेखील मुंबईत राहू लागलो होतो. मी तडक त्यांच्या घरी गेले. ते म्हणाले, 'मला पूर्ण नाटक म्हणून दाखव.' मी पूर्ण नाटक म्हणून दाखवलं. त्या नाटकाच्या दुसऱ्या अंकात एक गाणं आहे. तेही मी गुणगुणलं. आजही ते आठवताना भरून येतं, की माझं गाणं ऐकताना भाईंच्या दोन्ही डोळ्यांत अश्रू होते. माझ्या साठ वर्षांच्या नाटकाच्या कारकीर्दीतील हा अमूल्य ठेवा आहे. संपूर्ण नाटक ऐकल्यावर मला विचारलं, 'या गाण्याला चाल कोणी लावली?' 'मीच,' असं सांगितल्यावर तर त्यांना खूप आनंद झाला. पुढे 'घार हिंडते आकाशी'चे हजारो प्रयोग झाले. प्रेक्षकांनी ते नाटक उचलून धरलं.

भाईंकडे मी कधीही हक्काने जाऊ शकत होते. दर वेळी काहीतरी खाद्यपदार्थ करून मी घेऊन जायचे. भाई, सुनीताबाई अगदी आनंदाने त्याचा आस्वाद घ्यायचे. अनेकदा सुनीताबाई गमतीने विचारायच्या, 'मी घेतलं तर चालेल ना?' सुनीताबाईंचा आणि माझा स्नेह शब्दांत सांगता येणार नाही. भाईंच्या शेवटच्या क्षणी मी रुग्णालयात त्यांच्या भेटीला गेले होते. ते आय.सी.यू.मध्ये असल्यानं बाहेरून भेटले. मी म्हणाले, 'माझ्या देवा माझ्याकडे लक्ष ठेवा.' भाई सर्वांना सोडून निघून गेले, त्यानंतर काही दिवसांनी आम्ही 'अंमलदार'चा प्रयोग केला. त्याची रॉयल्टी द्यायला मी भाईंच्या घरी गेले. सुनीताबाईंनी दार उघडलं आणि त्या म्हणाल्या, 'सुमन आज तुझा भाई नाही गं तुझ्या स्वागताला...' यानंतर किती तरी वेळ त्या मला मिठीत घेऊन रडत होत्या. मी त्यांना जे सांगितलं, तेच आजही सांगते, 'भाई तुम्ही कुठे गेला नाहीत. इथेच तर आहात.'

(शब्दांकन : मयूर भावे)
महाराष्ट्र टाइम्स
Feb 10, 2019

Friday, April 5, 2019

पुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं!

तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला, अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला, मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा 'पु. ल.' नावाचा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! अशा या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व (क्रमांक एक ते १० एकटेच असेलेले) आणि अष्टपैलू कलावंत पु. ल. देशपांडे यांचे काल (८ नोव्हेंबर २०१८)पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्तानं ज्येष्ठ विनोदी लेखिका मंगला गोडबोले लिखित 'पु. ल. : चांदणे स्मरणाचे' हे चरित्रपर पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
बंगालची समृद्ध संस्कृती, ललितकलांची दीर्घ पार्श्वभूमी, रवींद्रनाथांचा जनमानसावरचा घट्ट पगडा ह्यांचं आकर्षण होतं. तसंच शांतिनिकेतनची निसर्गस्नेही शिक्षणपद्धतीसुद्धा पुलंना मोह घालत होती. 'गप्प बसा' संस्कृतीचा, पुस्तकी पांडित्याचा पुलंचा तिटकारा ठिकठिकाणी व्यक्त झालेला आहे. त्यामुळे शांतिनिकेतनमधलं मुक्तांगण एकदा बघायचंच होतं. शिवाय नकळत्या वयापासून आजोबांकडून टागोरांची महती कानांवर सतत आलेली होती. आजोबांनीही पन्नाशीनंतर बंगाली भाषा शिकण्याचा घाट घालून तिच्यावर उत्तम प्रभुत्व मिळवलेलं होतं. तेव्हा हा ज्येष्ठांचा धडा गिरवायचा होता. वयाच्या पन्नाशीत विद्यार्थिदशा पत्करणं सोपं नव्हतं. पण रवींद्रनाथांसमोर सदैव लीन झालेले आजोबा पक्के स्मरणात असल्यानं पुलंनी हा प्रयोग करून पाहण्याचं ठरवलं. सुनीताबाईंनीही ह्या कल्पनेचं स्वागत केलं. पुलंनी सतत गर्दीनं वेढलेलं राहू नये, एकांतात राहावं, आत्मसंवाद करावा, तो त्यांच्या प्रतिभेला पोषक ठरेल; असं त्यांना मनोमन वाटत होतंच.

आतापर्यंत खरं तर पुलंना प्रवासांचं काहीच नावीन्य राहिलेलं नव्हतं. 'अपूर्वाई', 'पूर्वरंग'च्या संबंधातले दूरदेशीचे प्रवास झाल्यानंतर त्यांच्या पायांवर जसं काही चक्रच पडलं होतं. देशांतर्गत प्रवास म्हणजे कारणपरत्वे दिल्लीच्या वाऱ्या, बहुरूपी खेळ ज्या ज्या गावी असतील, तिथे जाणं-येणं आणि अध्यक्षपदांसाठी, व्याख्यानांसाठी केलेले दौरे, हे अव्याहत सुरू होतंच. याखेरीज व्यक्तिगत हौसेनं केलेली एकदोन परदेशी पर्यटनंसुद्धा खात्यावर होती. पण हे बहुतेक प्रवास हा ना तो गौरव, सन्मान वगैरेंसाठी असत. आता पुलंना गौरवांची तेवढीशी अपूर्वाई उरली नव्हती. मनात एक विचित्रशी कोंडी, खुंटलेपण आलेलं होतं. पुन्हा एकदा एक सर्वसाधारण माणूस होऊन माणसांमध्ये मिसळण्याची ओढ लागली होती. हे कुंठलेपण त्यांनी व्यक्त केलं होतं, ते पत्रकार स्नेही सलील घोष ह्यांच्याजवळ!

ह्याच्या पुष्कळ नंतर म्हणजे ५ एप्रिल १९९०च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या अंकामध्ये सलील घोष ह्यांनी 'बंगालमध्ये पु.ल.' ह्या नावानं जो लेख लिहिला आहे, त्यात पुलंची १९७०ची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला बंगाली शिकायचंय, तू काही व्यवस्था करू शकतोस का बघ, असं सलीलदांना सांगताना पुल म्हणाले होते, ''सलील, तुला ठाऊक आहे? कलावंताच्या मनात काही वेळा कोंडी निर्माण होते. विचित्र अशी निराशा दाटते. म्हणूनच पाहायचे आहे की, बंगाली भाषेचे, साहित्याचे, लोककलांचे ज्ञान करून घेऊन मला काही स्फूर्ती येते का? काही नवीन, अगदी वेगळी जाणीव निर्माण होते का?''

सलीलदांना ह्यातली बोच अचूक समजली. त्यांनी व त्यांच्या पत्नी शार्लट ह्यांनी पुलंसाठी जानेवारी ते मार्च ह्या कालखंडातली मुख्यत: शांतिनिकेतनची व कलकत्त्याची सफर आखली. हा काळ हा बंगाली समाजातला यात्रा, जत्रा, मेळे, पारंपरिक सांस्कृतिक उत्सव ह्यांच्या धामधुमीचा असतो. सुगीचे दिवस असतात. हवा सुखद असते. एकूण जनमानसात उल्हास असतो. लोकजीवनाशी एकरूप होण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. ह्या दृष्टीनं ह्या जोडप्यानं पुलंची शांतिनिकेतनमध्ये राहण्याची सोय केली. आणि इतक्या प्रौढ वयात, वसतिगृहात राहण्यासारखा अनुभव घ्यायला पुल हौसेनं पुढे सरसावले.

'ह्या सगळ्या झुली उतरवून बंगालीचा स्वाध्याय करायला निघालेला एक बटू म्हणून मला बंगालात जायचे होते. या भूमिकेत मला सर्वांत अडचण होती, ती इतक्या वर्षांच्या संस्कारातून घडलेल्या माझ्याविषयीच्या माझ्या स्वत:च्याच प्रतिमेची. ती मला माझ्या हातांनी फोडायची हेाती.' ('व्यंगचित्रे' : पृष्ठ १५ वरून)

अशा शब्दांमध्ये पुलंनी 'वंगचित्रे'मध्येही आपलं तेव्हाचं हृदगत मांडलं आहे. वास्तविक पुलंचं शांतिनिकेतला जाऊन राहणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. मुलूख परका. भाषा परकी. खाणंपिणं इत्यादी दैनंदिनीच्या गोष्टी परक्या. सत्तरच्या दशकात असल्यानं संपर्कसाधनं, प्रवासाची साधनं संख्येनं कमी आणि जास्त वेळखाऊ. इकडच्या मुंबईपुण्याकडच्या बातम्या कळण्याच्या शक्यता कमी. इथल्या वृत्तपत्रसृष्टीपासून तुटलेपण. ह्यामुळे पुलंना अगदी अप्रिय असणारा एकटेपणा वाट्याला आलेला. शांतिनिकेतनपासून सुमारे मैलभर अंतरावर एक्स्टेन्शन ब्लॉक्स बांधलेले होते. त्यात पुल राहत होते. बोलपूरचा रस्ता जवळ होता. त्यावरून बाजारात, स्टेशनवर जाता येई. पण माणसानं ओढण्याच्या रिक्षा हे एकमेव वाहन सहज मिळे, जे वापरणं पुलंना संकोचाचं वाटे. पुण्या-मुंबईची पत्रं ८-१० दिवस मिळत नसत. सुनीताबाई दरम्यानच्या काळात उरळीकांचनला निसर्गोपचार घ्यायला राहिल्यामुळे त्यांचा संपर्क आणखीच अवघड होई. पुलंचा सगळा दिवस अभ्यासात, वाचनात जाई. पण संध्याकाळी फार एकटेपणा येई. कधी कधी आसपासच्या बंगाली बाबूंचा आळशीपणा, बाबूगिरी बघून चिडचिड होई; तर बंगाली बायकांचं परंपरेखाली पिचलं जाणं त्रासदायक वाटे. बंगालमधली हवा आणि बंगाली माणसांचा स्वभाव 'प्रचंड लहरी' असल्यानं, क्षणाक्षणांत दोघांचे नूर बदलत असल्यानं सुरुवातीला खूपच बिचकायला होई. पावसाची झोंड सुरू झाली, की अनेकदा वीज जाई. त्या अंधाराशी जमवून घेणं अधिकच कष्टप्रद ठरे. तिकडे डास-मच्छर हेही फार असत. वीज गेली की घरातला पंखा बंद, भयंकर उकाडा, डास, बाहेरचा अंधार अशी सार्वत्रिक कोंडी व्हायची. अत्यंत पाणचट दुधाचा मचूळ चहा, आणि मुख्यत्वे भात आणि बटाट्यांचा वापर केलेलं थंडगार जेवण. फळं खाण्याची चाल कमीच. ह्यामुळे तोंडाची चवच गेल्यासारखी वाटे. त्यातल्या त्यात दोन बाबतींमध्ये बंगाल्यांशी गोत्र जुळण्याची शक्यता वाटे. त्यांपैकी पहिली, त्यांचं मत्स्यप्रेम आणि दुसरी, त्यांचा संगीताकडे असणारा कल. अत्यंत रुक्ष वाटणारा बंगाली बाबूही रवींद्रसंगीतानं कसा भारावतो, संवादोत्सुक होतो; हे पाहून पुल मनोमन खूश होतं. तेव्हाच्या शांतिनिकेतन मुक्कामात पुलंचा बऱ्याच बंगाली कुटुंबांशी परिचय झाला. त्यातल्या बहुतेकांना बंगालमधली जात्रागीतं, रवींद्रसंगीत, आधुनिक भावगीतं वगैरे येत असल्याचं पुलंना जाणवलं. काही काळ तिथल्या पारंपरिक ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायला पुल पुरुलिया भागामध्ये तिथल्या आदिवासींची खेडी-पाडे वगैरे बघायला, अनुभवायला गेले होते. तिथल्या सावताळ (इंग्रजीत 'संथाळ') युवतींची अनेक समूहगीतं पुलंना खूप आवडली.

शांतिनिकेतनला गेल्यावर पहिल्या पाच-सहा आठवड्यांमध्ये पुल बंगाली वाचायला शिकले. बंगाली ही पिंडत: संस्कृतप्रचुर भाषा. ६०-७० टक्के तत्सम शब्दांचा भरणा असणारी. बंगालीचं व्याकरण मराठीच्या व्याकरणापेक्षा सोपं. तो-ती-तेचा उपद्रव नसलेलं. त्यामुळेच बंगाली माणूस इंग्रजी बोलतानाही 'ही' आणि 'शी'मध्ये हमखास गोंधळ करणारा. ह्यामुळे आणि पुलंच्या उपजत भाषिक कलामुळे ते सहजपणे बंगाली वाचायला लागले. समोरच्यांचे बंगाली संवाद समजू लागले. रोज सकाळी साडेसहाला उठणं, नंतर ११ वाजेपर्यंत धडे-व्याकरण-गृहपाठ ह्यांच्याशी झटापट करणं आणि नंतर बंगाली साहित्य वाचणं - असा दिनक्रम असे. सुरुवातीला पुलंना एक सर्वसाधारण छापील बंगाली पृष्ठ वाचायला हाताशी शब्दकोश घेऊन १५ ते २० मिनिटं लागत. नंतर हा वेळ कमी कमी होत गेला. बंगाली वर्तमानपत्रं वाचणं दोन महिन्यांमध्ये सर्रास सुरू झालं. त्यामुळे देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या बातम्या कळू लागल्या. पण बंगाली वर्तमानपत्रांमधल्या दंगली, जाळपोळी, लूटमार, मोर्चे ह्या छापाच्या विध्वंसक बातम्या वाचून उद्वेगही यायला लागला. टागोरांची 'घाटेर कथा' म्हणजे नदी घाटाची कथा ही पुलंनी तिथे संपूर्ण वाचलेली पहिली बंगाली कथा. मग मात्र त्यांना अलीबाबाची गुहाच उघडल्यासारखं झालं. गुरुदेवांच्या कथा, कविता, बालसाहित्य वाचण्याचा सपाटाच त्यांनी सुरू केला.

गुरुदेवांच्या साहित्यातून बंगाली समाज-संस्कृती त्यांना परिचयाची झालीच, पण जास्त प्रभाव पडला, तो त्यांनी नोंदवलेल्या निसर्गाच्या नाना लीलांनी. शैशवातल्या कुतूहलानं तरुपल्लवांना खूप बारकाईनं न्याहाळणारे गुरुदेव पुलंना सर्वांत भावले. मराठीतही वृक्षवल्ली अन् वनचरांना सोयरी मानणारा तुकाराम आहेच. पण गुरुदेवांची दृष्टी आणि भक्ती आणखी व्यापक ठरते, जवळजवळ महाकवी कालिदासाच्या तोडीची ठरते, असं पुलंनी पुढे नोंदवलंही आहे.

शांतिनिकेतनच्या ग्रंथालयात जाण्याचा पुलंचा रोजचा रस्ता हा एका आम्रकुंजातून होता. त्यामुळे ऋतुचक्राची रोजची चाल त्यांना सहज बघायला मिळाली. धोधो... झिमझिम-सर-झड अशा सर्व प्रकारचं धारानृत्य जवळून बघता आलं. त्यामुळे ह्या धारानृत्यावरच्या गुरुदेवांच्या अनेक कविता जास्त भिडल्या. वृक्षराजी, तिच्यावर वेगवेगळ्या वेळी येणारी फुलं, आसऱ्याला येणारा पक्षीगण हे बघायला मिळालं. पानगळ, नंतर आलेला आंब्याच्या मोहोराचा घमघमाट, तपोवनातली बदलती रंगसंगती हेही दिसलं.

७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट रवींद्रसप्ताह झाला. त्यात एकदा 'What Ravindranath meant to me?' ह्या विषयावर पुलंनी भाषण दिलं. रवींद्रनाथांची पुण्यतिथी झाली, त्या दिवशी वृक्षारोपण महोत्सव झाला. त्यामध्ये त्यांनी पंचमहाभूतांना केलेलं काव्यमय आवाहन ऐकायला मिळालं. कथांचे पाच खंड, नोटेशनसह तीन हजार गीतं ही गुरुदेवांची अफाट साहित्यनिर्मिती बघून ते खरे 'पुरुषावतार' ठरतात, हे जाणवलं. एवढ्या प्रचंड व्यापातून गुरुदेवांनी आप्तांना आणि छात्रांना हजारो पत्रं लिहावीत, ह्यातून त्यांची संवादोत्सुकता जाणवली. हा सगळा व्यासंग अजून वर्ष-दीडवर्षं जारी राहिला, तर आपण बंगालीमध्ये लिहू शकू, इतपत आत्मविश्वासही आला. पण ते व्यवहारात शक्य नव्हतं, म्हणून चांगला बंगाली वाचक होणं इथवरच पुलंनी उद्दिष्ट ठेवलं आणि गाठलंही

शांतिनिकेतनच्या वास्तव्यात मोकळी हवा, (नाइलाजानं) मित आहार, उत्तम वातावरण आणि परिसरात भरपूर चालणं, यामुळे पुलंची प्रकृती उत्तम राहिली. सलील घोष, त्यांचे बंधू शांतीदा आणि वहिनी ह्यांनी ह्या सर्व काळात पुलंची उत्तम बडदास्त ठेवली. याबद्दल पुल नेहमी कृतज्ञ राहिले.

थोडक्यात सांगायचं तर, कुठेही जाऊ तिथे सामावू, ह्या वृत्तीनुसार पुल शांतीनिकेतनातही रमले, वंगरंगात रंगले. त्या अनुभवांविषयीची एक लेखमाला त्यांनी 'वंगचित्रे' ह्या शीर्षकाखाली १९७१च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रविवार पुरवणीमध्ये लिहिली. पुढे त्या लेखांच्या संकलनाचं 'वंगचित्रे' हे पुस्तक १९७४ मध्ये प्रसिद्ध झालं. आजवर पुलंचं प्रवासवर्णन आणि शि. द. फडणीस ह्यांची व्यंगचित्रं ह्यांची एक सुखद-आनंददायी सांगड मराठी वाचकांच्या खूप परिचयाची झाली होती. तसा केवळ आणि निखळ आनंदाचा प्रत्यय 'वंगचित्रे'नी दिला नाही. समाजचिंतक पुल, अंतर्मुख पुल, भविष्यातल्या उदासीनं घेरलेले पुल अशी त्यांची काहीशी अपरिचित रूपं 'वंगचित्रे'मधून त्यांच्या वाचकांसमोर आली. त्यात त्यांच्या ह्या प्रवासाच्या शेवटीशेवटी बंगालमध्ये राजकीय अस्वस्थता वाढू लागली. नक्षलवाद डोकं वर करू लागला. १९७१च्या पुलंच्या दुसऱ्या बंगालवारीत तर ह्या राजकीय अशांतीमुळे मुक्काम तीन महिन्यांवरून फक्त महिन्यावर आणावा लागला. काहीशा भ्रमनिरासाच्या अवस्थेत पुलंना बंगाल सोडावा लागला. ह्या सगळ्याची कडवट चव थोडीफार डोकावू लागली. हे सगळं जरी खरं असलं, तरी ह्या मुक्कामात पुलंनी बंगाली भाषा चटकन आणि उत्तम प्रकारे आत्मसात केली. उपजत असणारा भाषेकडचा कल आणि नादलयीची समज त्यांना उपयोगी पडली असणार; पण बंगाली बोलणं, वाचणं आणि जरूर तेव्हा बंगाली लिहिणं त्यांना जमू लागलं. पुलंनी बंगाली स्नेह्यांना लिहिलेली बंगाली भाषेमधली पत्रं उपलब्ध आहेत. बंगालीशी अशी हातमिळवणी करताना पुल रवींद्रनाथांच्या अधिकाधिक जवळ जावेत, हे ओघानं आलंच. आजोबा ऋग्वेदींमुळे त्यांच्या मनावर रवींद्रनाथांचा ठसा होता. टागोरांना गीतांजलीबद्दल नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर ऋग्वेदींनी त्याचं 'अभंगगीतांजली' हे प्रासादिक भाषांतर केलं होतं. टागोर एकदा मुंबईला आले असताना ऋग्वेदींनी आपल्या 'अभंगगीतांजली'ची प्रत त्यांच्या पायांवर ठेवून त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घातला होता. त्या वेळी हे दोघे साधारण एकाच वयाचे हेाते! पण वंशपरंपरेनं आलेली ही टागोरभक्ती पुलंच्या बंगालीच्या व्यासंगानं अधिक टोकदार झाली. पुढे पुलंनी १९७७च्या 'महाराष्ट्र टाइम्सच्या वार्षिका'मध्ये रवींद्रनाथांवर दीर्घ लेख लिहिला. विलेपार्ले, पुणं, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर अशा चार ठिकाणी रवींद्रनाथांच्या जीवनकार्यावर व्याख्यानं दिली. काही काळानंतर 'रवींद्रनाथ : तीन व्याख्याने' हे त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालं. पुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं!

मंगला गोडबोले
अक्षरनामा


Monday, April 24, 2017

पु, ल. नावाचं मोरपीस


नेहमीप्रमाणं धावत-पळत "डेक्कन‘ गाठली. हुश्‍शहुश्‍श करत विसावतो तर काय, समोरच्या खिडकीत "पु.ल.‘ चक्क एकटेच बसलेले. यापूर्वी अनेकदा त्यांच्या सहवासाचा, पंक्तीचा योग आला, पण मनसोक्त गप्पा रंगल्याच नव्हत्या. आता त्याची संधी मिळाली अन्‌ चार तास आनंदाचा ठेवा लुटत राहिलो.

नोकरीच्या काळात 1970 ते 90 च्या दरम्यान डेक्कन क्वीनमधून प्रवास सतत व्हायचा. तेव्हाचं डेक्कन क्वीनचं रूप खूपच वेगळं होतं. एअरकंडिशन डबे नसले तरी ऐसपैस जागा असायची. एका ओळीत चार सीट्‌स असल्यानं सध्यासारखं दाटीवाटीनं बसण्याचा प्रश्‍नच नव्हता. तो प्रवास मजेचा असायचा. दिवसभराचं काम ओटापून संध्याकाळी डेक्कन क्वीन गाठायची आणि त्या सिंहासनासारख्या आसनावर दमलाभागला देह लोटून द्यायचा. गाडी सुटता सुटता कॅफेटेरियाचा वेटर आला, की त्याला ऑम्लेट किंवा फ्राइड फिशची ऑर्डर द्यायची आणि ठाण्यापर्यंत समोरची प्लेट संपली, की डोळे मिटून आत्मचिंतन (?) करताना मस्तपैकी झोप लागायची ती कर्जत येईपर्यंत. मग पाय मोकळे करायला खाली उतरायचं आणि त्या प्रसिद्ध वड्याचा आस्वाद घेईपर्यंत, मागचं इंजिन लागल्यावर गाडी प्रस्थान करायची. मग काय, घाट सुरू झाल्यावर कितीही वेळा पाहिलं तरी समाधान न होणारी खंडाळ्याच्या दरीची शोभा पाहण्यात मन गुंगून जायचं.

एकदा गाडीला उशीर झालेला असताना गाडी घाट चढायला लागेस्तोवर रात्र होऊन गेली होती. पौर्णिमेची ती रात्र होती आणि निरभ्र आकाशातल्या धवल शुभ्र चांदण्यानं संपूर्ण दरी भरून गेली होती. देवादिकांना दुर्लभ अशा त्या दृश्‍यानं मी भारावून गेलो होतो. जगाचं रहाटगाडगं जिथल्या तिथं थांबून तो क्षण तिथंच गोठून जावा, असं वाटलं होतं. पावसाळ्यात तर काय, त्या वनश्रीला बहार आलेला असायचा. किती नटू आणि किती नाही, असं त्या दरीला व्हायचं. हिरव्या पाचूंची सगळीकडं उधळण झालेली दिसायची. त्यातून पांढरे शुभ्र धबधबे. कुठं धुक्‍याची शाल आणि ढगांचा संचार! वाटायचं, हा सुखद गारवा सतत अंगाला लपेटून ठेवावा. अशा वेळी गप्पा मारायला समविचारी सहप्रवासी असला, की बघायलाच नको. लोणावळा गेलं, की पुढचा प्रवास मात्र कंटाळवाणा! घाट चढून आल्यावर घरचे वेध लागलेले असायचे. मग कधी एकदा शिवाजीनगर येतंय आणि धावत जाऊन रिक्षा पकडतोय, असं व्हायचं. आता मात्र त्या बंदिस्त एसी डब्यात अंग चोरून बसल्यावर फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं एवढाच कर्मभाव उरतो. काळ्या काचांमुळं बाहेरची शोभाही पाहता येत नाही आणि बुफे कारचा तो भूक प्रज्वलित करणारा संमिश्र वासही दुरावलाय. प्रवासाची मजाच संपली.

असंच एकदा एका पावसाळी संध्याकाळी धावत-पळत डेक्कन क्वीन गाठली. त्या दिवशी माझ्या कुंडलीतले सर्व शुभ ग्रह एकवटले असावेत. गाडीला अगदी तुरळक गर्दी आणि डब्यात आपल्या सर्वांचं आराध्यदैवत, साक्षात पु.ल. खिडकीशी चक्क एकटे बसलेले, त्या वेळी ते एन.सी.पी.ए.मध्ये पदाधिकारी होते. तशी माझी त्यांच्याशी बरीच चांगली ओळख होती. त्यांचे अतिशय जवळचे सहायक मित्र (कै.) मधू गानू आमच्या नात्यातले असल्यानं आमचं पु.ल. आणि सुनीताबाई यांच्याकडे येणं-जाणं होतं. त्यांच्या पंक्तीचा लाभही आम्हाला झाला होता. माझी पत्नी सौ. सुजाताच्या पदन्यास नृत्यसंस्थेच्या "गीत गोपाळ‘ या नृत्यनाट्याच्या कार्यक्रमालासुद्धा ते आवर्जून आले होते आणि नंतर सर्व कलाकारांशी त्यांनी संवाद साधला होता. तरी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचा योग आला नव्हता, असो. तर मी त्यांच्याजवळ जाऊन, नमस्कार करून त्यांना ओळख दिली. दिलखुलास हसून त्यांनी मला शेजारी बसण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतरचा चार तासांचा पुण्यापर्यंतचा विनाव्यत्यय प्रवास म्हणजे स्वर्गलोकीच्या गंधर्वांनी हेवा करावा, असा झाला.

अजूनही त्या सुखद आठवणींचं मोरपीस अंगावरून फिरतं. मी "पु.ल.‘ यांच्या लिखाणाचा भोक्ता असल्यानं अनेक दाखले देत आमच्या गप्पा चालल्या होत्या. मी "पार्ल्यामध्ये गेल्यावर शितू सरमळकरांचं वेलकम स्टोअर शोधण्याचा प्रयत्न केला होता,‘ हे सांगितल्यावर ते मिस्कीलपणे हसले. त्यांच्या "माझे खाद्य जीवन‘ या लेखाबद्दल मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही दिल्लीमधल्या छोले गल्ली आणि पराठा गल्लीबद्दल लिहिलंत, पण चांदणी चौकात अजून पुढे गेल्यावर असलेल्या ""काके दी हट्टी‘‘मध्ये मिळणारा रबडी फालुदा विसरून मला चालणार नाही.‘ हे ऐकल्यावर त्यांनी दिल्लीच्या पुढच्या ट्रीपमध्ये तिथे नक्की जाईन, असं सांगितलं. "व्यक्ती आणि वल्ली‘मधल्या दिनेशची आठवण निघाली. ""आता तो खूपच मोठा झाला असेल. मग तो त्या लेखातल्या (नंगू) फोटोमुळे रागवला नाही का?‘‘ असं विचारल्यावर, ""नाही नाही, आता तो अमेरिकेला असतो. आणि मला तपासणारा नाही, पण दुसऱ्याच विषयात डॉक्‍टर झाला आहे,‘‘ असं म्हणाले. त्यांना कर्जतचा वडा खूप आवडतो, हे माहीत असल्यानं मी तिथं उतरून तो आणल्यावर ते फारच खूष झाले. कर्जतला गाडी थांबली, की शेजारून, घाटात गाडीच्या मागे लागणारं "बॅंकर‘ इंजिन संथपणे जातं. ते बघितल्यावर मी "पु.ल.‘ना, चिं. वि. जोशी यांची त्यासंबंधित एक गोष्ट सांगण्याचं धाडस केलं. ""आलेलं इंजिन धापा टाकत गेलं आणि नवीन इंजिन मात्र संथपणे धूम्रपान करत उभं होतं,‘‘ ही वाफेच्या इंजिनांना त्या गोष्टीत दिलेली उपमा त्यांना फारच आवडली.

मी मूळचा मुंबईकर आणि पु.ल. यांचा पिंडही मुंबईकराचाच. त्यामुळे आमच्या मुंबईबद्दलच्या गप्पासुद्धा मस्त रंगल्या. एके काळी मलबार हिलवरून दिसणारं क्वीन्स नेकलेसचं रूप, दादरचा शांत स्वच्छ समुद्रकिनारा इत्यादी आठवणींना उजाळा मिळाला. त्यांनीही त्यांच्या त्या वेळच्या पार्ल्याच्या आठवणी सांगितल्या. घरी आईकडं ते थालीपिठाचा आग्रह कसा धरत, थालीपिठाला मधे भोक पाहिजे, बरोबर लोण्याचा गोळा पाहिजे, वगैरे आठवणी भूतकाळात रंगून जाऊन सांगत होते. गप्पा रंगत होत्या, हा प्रवास संपूच नये, असं वाटत होतं. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतोच, या उक्तीप्रमाणे शेवटी पुणे स्टेशन आलं. गर्दीतून वाट काढत त्यांना रिक्षामध्ये बसवलं आणि त्यांच्याशी हात मिळवत म्हटलं, ""आय एंजॉइड एव्हरी मोमेंट ऑफ द जर्नी टुडे.‘‘ यावर त्यांचं उत्तर ""सेम हिअर.‘ आणि रिक्षा चालू होताना ती थांबवून (माझ्या कानांवर माझा विश्‍वासच बसला नाही) म्हणाले, "आय मीन इट!‘ त्या महान व्यक्तिमत्त्वाचा तो चार तासांचा सहवास आणि त्यांचं घडलेलं आगळंच दर्शन, हा माझ्या आयुष्यातला न विसरण्याजोगा अनमोल ठेवा आहे.
- सुरेश नातू
मुळ स्रोत -- मुक्तपीठ

Monday, November 9, 2015

प्रिय पु. ल. काका

प्रिय पु. ल. काका ,

लहानपणी मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती.  मग मी हळू हळू मोठी झाले. गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली. पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता. तो होता तुमचा … पुलकीत आवाज. माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले. आयुष्यात असे किती पण अवघड उदास प्रसंग आले आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतेही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे मन प्रसन्न होते आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते. तुमच्या काही काही लिखाणानी माझ्या वर फार सुक्ष्म संस्कार केले आहेत. तुम्हाला गम्मत सांगू, तुमचे चितळे मास्तर मला खरच भेटले होते , ज्यांनी मला शिकवले , आणि माझ्या बाबांनाही , ते पण कोणता हि विषय उत्कृष्ट शिकवू शकायचे , आणि तेव्हा पासून तुमची हि सगळी पात्रे , माणसे अगदी पूर्ण नाही तरी थोडी बहुत तरी सापडायला लागली . तुमच्या मुळे , माणसे वाचायचा छंद जडला . नाटके खरे तर बघायची असतात (तशी मी घरात कधी कधी ती करते सुद्धा ), पण ती वाचायची आवड मला का लागली माहितीये , कारण तुमचे "तुज आहे तुजपाशी " , माझ्या हातात पडले, आणि मी पुन्हा पुन्हा वाचून काढले . मी खूप नाटके पहिली किंवा वाचली त्या नंतर , पण का ठावूक या नाटकाशी माझे वेगळे नाते आहे , तीच पात्रे मला दरवेळी नवे काही तरी देवून जातात . काकाजी , आचार्य, उषा , सतीश , गीता , श्याम जणू माझे कुटुंबातले च आहेत . दर वेळी वाचताना , प्रत्येक मधला एक नवा विचार आणि भूमिका सापडते आणि जगण्याचा अर्थ हि.

तुमचा "नंदा प्रधान ","बबडू " "तो ", "भय्या नागपूरकर "माझ्या मनाला फार चटका लावून गेले . एक मात्र नक्की ह, "ती फुलराणी" मधील "तुला शिकवीन चांगलाच धडा " हे स्वगत , नाटकात काम करायची आवड असलेल्या प्रत्येकाला , लहान पाणी करून पाहावे असे वाटतच , आणि ती फुलराणी मात्र पक्की आपली मराठी वाटते बर का , भाषांतर असून हि . प्रवास वर्णन हे किती रंजक असू शकते ते पण तुम्हीच सांगितले ,त्यामुळे एका नवा साहित्य प्रकार आवडला . बटाट्याचा चाळी मधले चितन , बरच काही विचार करायला लावून गेली . आणि मराठी वांग्मायाचा गाळीव इतिहास , उपहासत्मक विनोद किती सकस असू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे . तुम्ही साहित्याची इतकी दालने खुली करून ठेवली आहेत न , कि कोणताही साहित्य प्रकार निवडावा आणि तुम्ही तो किती मनोरंजक पण काही हि गाजावाजा न करता एक विचार देवून ठेवणारा केला आहे . मी दर वर्षी तुमच्या बद्दल लिहित आलीये , पण शब्द आटले तरी तुमच्या बद्दलचे पेम आणि आदर कधीच कमी होणार नाही . अलौकिक प्रतिभा असूनही , पैश्याचा मागे न लागता , केवळ माणसांवर प्रेम करणारा आणि आपल्या साहित्य तून निरोगी मने तयार करणारा हा कलाकार . अर्थात तुमचा संसार तुमच्या पत्नीने इतका समर्थ पणे सांभाळला , म्हणून तुम्ही आम्हाला इतके भेटत गेलात.

तुमची पुस्तके आणि तुमचा आवाज हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे , इयत्ता चौथी पासून ते आज पर्यंत तुमचे लिखाण माझ्या साठी अजून तितकेच ताजे टवटवीत आहे आणि काही तरी देवून जाणारे आहे .
कारण कदाचित माझ्या वयानुसार त्यातून मला नवीन काही तरी सापडेल असे काही तरी तुम्ही त्यात दडवले आहे . चौथीत असताना मला त्यातले किती कळले असेल ते गुळाचा गणपतीच जाणो . पण माझा "गटण्या " होण्याची सुरवात मात्र झाली हे नक्की बर का . आज काल , समोरच्याला कळणारे आणि भिडणारे असे लेखन बहुधा चांगल्या लेखनात मोडत नाही , सतत काही तरी माहितीपर, तात्विक असे तरी लिहिले जाते किंवा मग ज्याला विनोद म्हणावे कि नाही अश्या प्रकारचे विनोद , कार्यक्रमात आणि लिखाणात दिसतात , म्हणजे अगदीच निराशावादी चित्र नाहीये तसे, तुम्ही कौतिक करावे असे काही चित्रपट आणि नाटके येत आहेत अजून , आमची मराठी अजून तशी जिवंत आहे , पण नवीन पुस्तकांचे म्हणाला तर जर अवघड चित्र आहे . रंगून जावून वाचावे किंवा ज्यामुळे वाचनाचे आवड निर्माण व्हावी असे तुमच्या सारखे लिहायला कधी जमेल का हो आम्हाला ? मान्य आहे कि तुम्ही आणि तुमचे लिखाण हे कालातीत आहे , पण आमचे दुर्दैव कि आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटू नाही शकलो , पत्र व्यवहार करू नाही शकलो , असे कधीच नाही का होणार कि तुम्ही परत भेटाल ? . कसे झालाय माहितीये , पांडुरंग तोच आणि तिथेच असून पण वारकरी दर वर्षी नियमाने जातात कि त्याला भेटायला , तसे किती हि वेळा वाचले तरी तुमच्या लिखाणाची वारी करायची हे आमचे पण व्रत आहे , कारण हि ओढच जबरदस्त आहे .

माझे ना जरा गटण्या सारखे आहे , किती हि लेखक वाचले न तरी " पु ल आणि ____" 
मी ठरवले आहे आता कि आपल्याला मिळालेला हा आनंद , वाटायचा आपण , म्हणूनच , ज्यांना कुणाला पु ल न भेटायचे आहे , त्यांच्या साठी , आमचे दरवाजे नेहमीच खुले आहेत
तुज आहे तुजपाशी असे म्हणताना
तुम्ही आम्हाला काय दिले हे आम्हासच ठावूक
आमच्या पाशी , आजू बाजूला पण हे सगळे होताच
पण कोणत्या नजरेतून पाहायचे ते तुम्ही शिकवलत
गुरु दक्षिणा काय देणार तुम्हाला आम्हाला 'बस इतकाच सांगू कि
तुम्ही माणसांवर , साहित्येवर , कवितेवर , संगीता वर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम केले
तसच जमल तर करू आम्ही पण , तुमच्या इतके नाही जमणार कदाचित
पण १०० पर्सेंट नाही तरी छोटे मासे होऊ कि आम्ही
- तुमची एक वाचक

शीतल जोशी
८ नोव्हेंबर २०१५
मिसळपाव 
मूळ स्त्रोत --> http://www.misalpav.com/node/33618

Tuesday, March 10, 2015

कविता आणि पु.ल. - श्रीकृष्ण राऊत

हे प्रभो,
हे जन्मदात्या,
जलधारांचा वर्षाव करीत ये
आणि
कडकडून भेट आम्हाला़
जलकुंभांनी भरलेल्या रथातून ये,
गडगडत ये,
गर्जत ये,
जीवदान दे.
तुझ्या पाण्यानी भरलेल्या
पखालीची तोंडं
उघडू देत पृथ्वीच्या दिशेनं
सारे खंदक जाऊ देत भरूऩ
उंच सखल सारं सारं
येऊ दे एका पातळीवऱ
भरून जाऊ देत सगळे झरे, सगळे पर्‍हे़
तुडुंब भरून जाऊ दे पृथ्वी आणि स्वर्ग
आणि
गाईगुरांना सतत लाभू दे
मुबलक पाणी


ह्या आहेत काही ओळी पर्जन्यसूक्ताच्या़ वेदकालीन अज्ञात कवींनी रचलेल्या़ हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतातल्या ह्या कविता आपल्यासाठी मराठीत कोणी आणलं ठाऊक आहे? आपल्या लाडक्या पु़ लं नी़. पु़ लं चा हा पैलू आम्हा मराठी वाचकांना कितीसा माहीत आहे?

कॅलेंडरच्या मागे छापलेल्या सखा श्रावण' या छोट्याशा लेखात पु़ लं. नी अनुवाद केला आहे पर्जन्यसूक्ताचा़ जीवनाला सर्वार्थानं आणि सर्वांगांनी परिपूर्ण रसिकतेनं भोगणारा सच्चा कलावंत म्हणजे पु़ ल़ समाजकारण आणि राजकारणातील विचारसरणीच्या बाबतीत पु़ ल़ जसे डावे-उजवे नव्हते, तसेच साहित्याच्या बाबतीत जीवनवादी कला की कलावादी जीवन या वादातही ते पडले नाहीत़ आपल्या रसिकतेला कोणत्याही संकुचित बांधिलकीची कुंपणं त्यांना कधी पडू दिली नाहीत़ ‘म्हणुनी ग्रंथाची आवडी' या लेखात त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्वच्छपणे मांडली आहे़ पु़ ल़ लिहितात, ‘साहित्याचे रोमँटिक, क्लासिकल वगैरे भाग करून त्यांची वजनं-मापं घेण्याची मला हौस नाही़. अजूनही कधीतरी पाल ग्रेव्हची ‘गोल्डन ट्रेझरी' उघडून“ब्रिज ऑफ साईज' सारखी कविता मी वाचतो़ केशवसुत हे माझे नित्याचे सोबती आहेत़ बालकवींची अधून-मधून भेट घेतो आणि मेघदूताबरोबरही हिंडतो़ कधी मर्ढेकरांना भेटावंसं वाटतं तर कधी ‘शीळ' घेऊन बसतो तर कधी ‘ऐसा गा मी ब्रह्म' बालकवींच्या फुलराणी' मला जसं वेड लावलं तशीच नारायण सुर्वेंची मनी ऑर्डर' मनुष्यनिर्मित दुःखानं पोळलेल्या कोण्या अभागी स्रीच्या सार्‍या वेदनांचे काटे माक्या मनात कायमचे रुतवून गेली आहे़. 

संतांच्या कवितेतून येणारा मराठमोळा थेटपणा पु़. लं. ना आपल्या काळजाचा कोपरा वाटतो़ पण देवाच्या आस्तत्वाविषयी साशंकता व्यक्त न करताही संतांना त्यांच्याच शब्दांत ते अचूकपणे पकडतात आणि एकप्रकारे संतांची पंचाईतच करून टाकतात़ पु़ ल़ म्हणतात, तुकोबाचा गाथा हा माझा लाडका ग्रंथ आहे़ पण माझा तुकोबा बडव्यांना दलाली देऊन पांडुरंगाची षोडषोपचारांनी पूजा करणारा नाही़ मला निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणारा आणि कधीतरी अननुभूत आनंदानं भरून येऊन भरल्या शेताचा । देतो मज वाटा । चौधरी गोमटा । पांडुरंग' म्हणणरा, विठ्ठलच विठ्ठल । वदवावी वाणी । नाही ऐसे मनी । ओळखावे' हे गुपित सांगणारा आणि गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' म्हणणारा तुका माझा वाटतो़'' 

ग़ दि़ माडगूळकरांचे गीत-रामायण जसे त्यांना आवडते तशीच त्यांची लावणीही त्यांना भावते़ कवितेच्या नवविध रसांपैकी कुठल्याही एखाद्या रसाला आधक भाव' देण्यापेक्षा प्रत्येक भाव रसिकतेने मानसिक आणि शारीरिक पातळीवर अनुभवणे त्यांना आधक नैसर्गिक वाटते़ म्हणूनच ते लिहितात-
‘चांगली कविता आजही मला मनात तरंग उठल्याचा किंवा आत काहीतरी झंकारल्याचा जवळजवळ शारीरिक म्हणावा तसा संस्कार करून जाते़ कुसुमाग्रजांची एक-एक कविता भेटत गेली ती अशीच कायामनांतून एकसाथ कंपने उठवत़ मग त्यात रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हा भाव असो की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात'हा भाव असो़ पृथ्वीच्या पे्रमगीता' नं दिलेला हादरा हा मानसिकाइतकाच शारीरिक अनुभव होता़'' पु़ लं. ची साहित्यनिर्मिती जशी प्रयोगशील राहिली आहे तशीच त्यांची आभजात रसिकता परिवर्तनशील राहिली आहे़ या बाबतीत ते म्हणतात, मी वषानुवर्षे कुठलीही रेडिमेड मतांची झापडं लावून किंवा एकेकाळी आपलं मत अमुक असं होतं म्हणून त्याला हट्टानं चिकटून बसलो नाही़'' याचा प्रत्यय मर्ढेकरांच्या बाबतीत आला़ १९४६ मध्ये आभरुची' त मर्ढेकरांची पिपात मेले ओल्या उंदिर' ही कविता प्रसिद्ध झाली़ पु़ ल़ हे तेव्हाचे आभरुची' लेखक़ तोपर्यंत वाचलेल्या कवितांच्या पार्श्वभूमीवर मर्ढेकरांच्या या कवितेने त्यांना चांगलाच हादरा दिला़ पु़ ल़ ची टीका करण्याची पद्धत म्हणजे विडंबन करणे़ पु़ लं नी या कवितेचे विडंबन करून आपली टीका नोंदवली़ पुढे ही कविता तिच्यातल्या जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे' या ओळींनी चांगलीच गाजली़ तिच्यातल्या प्रतिमांचं नावीन्य अधोरेखित करणारं बरचंसं लेखनही झालं आणि पु़ लं नी आपल्या परिवर्तनशील रसिकतेने त्या एकट्या कवितेलाच नव्हे तर संपूर्ण मर्ढेकरांनाच मनापासून दाद दिली़ ते नुसती दाद देऊनच थांबले नाहीत तर मर्ढेकरांची कविता आधकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्या कवितांच्या आभवाचनाचे जाहीर कार्यक्रम त्यांनी सुनीताबाईंसोबत केले़. केवळ मर्ढेकरांच्या कवितांचेच नव्हे तर आरती प्रभू आणि बोरकरांच्या कवितांच्या आभवाचनाचे जाहीर कार्यक्रमही त्यांनी महाराष्ट्रभर केलेत़. बोरकरांच्या कवितांच्या आभवाचनाच्या कार्यक्रमाला त्यांनी दिलेलं नावही छान होतं-आनंदयात्रा़' 

या आनंदयात्रेच्या निमित्ताने पु़. ल़. अकोल्यात आले होते़ किशोर मोरे, दिलीप इंगोले अशी आम्ही मित्रमंडळी त्यांना भेटायला गेलो़ मराठी कवितेला गझलने झपाटल्याचा तो काळ होता़ एकच भाव उलगडून दाखवीत असेल तर ती गझल नव्हे तर गझलच्या फॉर्ममधली कविता' असे आग्रही प्रतिपादन सुरेश भट करीत होते़ पु़लं नी सुरेश भटांच्या रंग माझा वेगळा' या संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली़ म्हणून त्यांनाच यातलं खरंखोट काय ते विचारावं म्हणून मी भीतभीतच या संदर्भात त्यांना विचारलं. तर ते दिलखुलासपणे म्हणाले, तसं काही नसतं हो़ एकच भाव उलगडून दाखवणार्‍या शेकडो गझला उर्दूत आहेत़ उर्दूत त्यांना गझल-ए-मुसल्‌सल म्हणतात़ मोमीनची वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के ना याद हो' ही याच प्रकारची गझल आहे़'' 

‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे' हे रंग माझा वेगळा' च्या प्रस्तावनेतील पु़ लं चे विधान अर्धवटपणे उद्धृत करणार्‍यांनी पु़ लं. वर खरे तर एक प्रकारे फार मोठा अन्यायच केला आहे़ कारण या अपुर्‍या विधानातून गझल-वृत्ती' म्हणजे नेमके काय, हे स्पष्ट होत नाही़ एखादे चटकदार वाक्य हातात सापडल्यावर ते दांडपट्टयासारखे आपल्या तोंडपट्टयावर चौफेर फिरवून गुळगुळीत करून टाकावे तसे या विधानाचे झाले आहे़. ‘गझल-वृत्ती' ला स्पष्ट करणार्‍या नंतरच्या ओळींच्या संदर्भातच खरे तर या वाक्याचे महत्व, वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या अध्यात्मिक संकल्पनांना साध्या, सोप्या भाषेत पु़ लंऩी मांडून कवितेच्या जन्माचा क्षण अचूकपणे पकडला आहे तो असा ‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे़ एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे़ स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृत्ती मानीत आलो आहोत़ क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खर्‍या प्रवृत्तीची गोडीच कळत नाही़ जीवनात नुसत्याच उंदीर-उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे़ निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण तया धावपळीच्या अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात़ असा एखादा क्षणच कवितेला जन्म देऊन जातो़'' 

ह्या परिच्छेदात पु़लं नी निवृत्तीला ‘सूक्ष्म' आणि‘सुंदर' ही दोन विशेषणे एकाच वेळी का लावली आहेत हे आपण लक्षात घेतले तर ‘गझल वृत्ती' चे अंतरंग आपल्यासमोर स्वच्छ आरशासारखे उघडे व्हावे़ आजकालच्या कवितांचा जमाना म्हणजे मुक्तछंदाचा आणि मुक्तशैलीचा जमाना आहे़ छंदवृत्तांशी कवितेने जवळ-जवळ फारकत घेतली आहे़ प्रसाद गुणाशीही ती फटकूनच वागते आहे़ दुर्बोधता हा जणु काही तिचा अलंकार होऊ पाहतोय़ गाण्याची तहान लागलेल्या मनाला मुक्त छंदातल्या ह्या कविता रुख्यासुख्या वाळवंटासारख्या वाटतात़. मधूनच छोटीशी हिरवळ डोळ्यात भरली की मन प्रसन्न व्हावे तशी एखादी गेय कविता भेटते़ पण तथाकथित समीक्षेतही तिला गीत म्हणून दुय्यम लेखले असते आणि तिच्या निर्मात्याला गीतकार म्हणून हिणवलेले असते़ ग़ दि़ माडगूळकर आणि ना़ घ़ देशपांडयांनाही हे भोगावे लागले आहे पण यातून किती मोठ्या परिमाणाची वजाबाकी झाली आहे याची तीव्र जाणीव फक्त पु़ लंच देऊ जाणोत कागदावरचे मुद्रण ही सोय आहे़ पण उच्चार हा शब्दांचा मूळधर्म आहे़ कवितेला कागदातच गुंडाळून ठेवणे म्हणजे शब्दांचा गळा आवळणे आहे़ कविता गेय आहे हे कवितेचे दूषण ठरावे हे दुर्दैव आहे़ आता छापखाना नैसर्गिक आणि गाता जिवंत गाळा अनेसर्गिक ठरला आहे़ जातिवृत्तांचे कवितेला ओझे वाटू लागले आहे़ आणि म्हणूनच कविता रसिकांच्या रंध्रारंध्रातून झिरपत न जाता, त्यांच्या मनात कायमची न मुरता कागदोपत्री जमा होत आहे़ पाठांतर हे खिशात खुळखुळणार्‍या रोकडीसारखे आहे़ आपल्या श्वासाइतकेच ते आपले स्वतःचे असते़'' पु़लं सारख्या जातिवंत आणि चोखंदळ रसिकाने दिलेला इशारा आमच्या कवी आणि समीक्षकांना केव्हा कळेल कोण जाणे !

पु़ लं च्या लेखनात कुठेतरी एक वाक्य आहे की, ‘आमच्या काळी बोलण्याची आणि लिहिण्याची भाषा एकच होती़' या वाक्यातील आमच्या काळी' या कालसंबोधनातून ती आज तशी राहिली नाही हे आपसूकच ध्वनित होते़.

कविता ही आज बोलण्याच्या भाषेपासून किती दूर गेली आहे याचे प्रत्यंतर अलीकडच्या कविता वाचल्या की आपल्याला सहज लक्षात येते़ तिचा रसिकांशी संवादच होत नाही़ प्रतिमांच्या नावीन्याच्या हव्यासापायी घडवलेल्या कृत्रिम भाषेत ती बोलते आहे़ 

मर्ढेकरांच्या काव्यशैलीसंबंधी लिहितांना विजया राजाध्यक्ष या मुद्याकडे आपले लक्ष वेधतात-
बोलण्याची भाषा व (औपचारिक) लेखनाची भाषा यातील अंतर कमी करणे हा कवीचा प्रयत्न असतो़''
असा प्रयत्न आज किती कवींच्या कवितांत आपल्याला दिसतो? रसिकांनी कवीच्या पातळीवर यावं असे आवाहन करणार्‍यांचे ओ-रडणे केवळ अरण्यरुदन ठरते ते बोलण्या-लिहिण्यातील भाषेच्या दरीमुळेच़ पु़लंनी विद्रोही कवितेचं मनापासून स्वागत केलं दाद देताना तिला भरभरून झुकतं माप दिलं. यशवंत मनोहरांच्या उत्थान गुंफा' वर महाराष्ट्राच्या दर्जेदार वृत्तपत्रात कालचा पाऊस' शीर्षकाने हातचे काही न राखता लिहिले़ त्यातील शोषणसंबंधाचे वैश्विक चिंतन मुळातूनच वाचण्यासारखे आहे़ पण हे पाहून अनेक कवी असूयेने म्हणायचे की आम्ही दलित असतो तर आमच्यावरही पु़लं नी असेच लिहिले असते़' असे म्हणून पु़लं च्या सच्च्या रसिकतेला जातीयतेच्या मापानं जोखणार्‍या कवींनी आपली बौद्धिक दिवाळखोरीच खरे तर जाहीर केली होती़.

प्र.श्री़ नेरुरकरांना लिहिलेल्या पत्रात पु़ ल़ म्हणतात, नारायण सुर्वे, दया पवार वगैरे मंडळी साहित्यात आल्यानंतर मला जे काही वाटले ती माझी भावना मला टागोरांच्या एका दीर्घ कवितेत सापडली़''

रवींद्रनाथांच्या ह्या कवितेचे नाव ‘ऐकतान वृंदवादन'. पु़ लं. नी केलेल्या त्या कवितेच्या स्वैर अनुवादातील हा एक अंश-

मी जाणतो-
माझी कविता कितीही वेड्यावाकड्या वळणांनी गेली
तरी सर्वगामी नाही झाली़
शेतकर्‍याचे जिणे जगणारे हे बहुजन
श्रमातून आणि शब्दांतून
मिळवत असतात सत्याचे कण़
जो आहे मातीपाशी
त्या कवीच्या वाणीकडे
लावून बसलो आहे काऩ
साहित्याच्या ह्या आनंदभोजनात
मी जे नाही शकलो रांधू
जे नाही शकलो वाढू-
ते काढणार्‍यांच्या आहे मी शोधात,
ते सत्य यावे उजेडात़
उगीचच नसता आव आणणार्‍यांनी
फेकू नये धूळ डोळ्यात,
दाखवू नये खेटा दिमाख-खरे मोल दिल्याशिवाय़
असला आणून आव मिरवणं
ही आहे एक चोरी़.
बरे नाही-बरे नाही-ही आहे नकली-
षौकीन पद्यमजुरी़

ये
अज्ञात जनांच्या
मूक मनांच्या
कविराया-ये़
मर्मातल्या वेदना येऊ देत उफाळून
ह्या प्राणहीन देशात
जिथे चारी दिशा आहेत गानहीन;
अपमानांच्या तापाने
इथली भूमी झाली आहे
आनंदहीन, शुष्क, वैराण़
कविराया,
तू कर ती रसपूर्ण,
अंतरीची उर्मी
आता उरली आहे तुक्यातच़
तूच दे तिला प्राणवायू आणि पाणी़
साहित्याच्या ह्या वृंदावन-संगीत-सभेत
ज्यांच्या हाती एकतारी
त्यांचा आता व्हावा गौरव़
सुखे-दुःखे ज्यांची मुकी,
जगापुढे जे सतत उभे
खाली घालून माना-
ऐकव-अरे ऐकव,
जवळ असूनही जे दूर होते
आता त्यांच्या ऐकव ताना़

तुझी आणि त्यांची एक आहे जात,
तुक्या ख्यातीमुळेच ते होतील विख्यात़
-मी वारंवार
तुलाच नमस्कार करीऩ''


ना़ धों. महानोरांची तुलना करायला पु़लं ना रवींद्रनाथांशिवाय दुसरा कोणी का सापडत नाही याचे उत्तरही आपल्याला मिळते ते या कवितेतच़.
(अकोला आकाशवाणीच्या सौजन्याने)


-- श्रीकृष्ण राऊत

Tuesday, January 2, 2007

काही (च्या काही) कविता



च्यालेंज
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचीली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलवीला रेडा । रेघ बी. ए. ची ओलाडां!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी-गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भितं चालवून दावा झणी
एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्विकारा

उपमा
एकदा तुम्ही मला
छान दिसतेस
म्हणालांत पण
'समोरच्या सरोजबाईसारखी'
ते शब्द जोडून....


फोटोतली तरुणी
माझ्या खोलीतल्या
फोटोतली तरूणी परवा
मला म्हणाली
'मला चागंलेसे स्थळ
शोधून द्या ना-इथे
माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय'

सुटका
बहात्तर कादबं-या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या दम्याने
पंच्याहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा 'सुटली'
म्हणायच्या
ऎवजी तुम्ही 'सुटलो' म्हणालात....

घुंघुंर
....आणि मध्यरात्री.....
जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या
एकच सारेमय दूरवर भुंकत होता
नाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होता
त्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.
अधांराच्या दालनातून
तुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले...
पण मी नाही दचकलो...
मी काय रातकिडा आहे?

हल्ली
हल्ली पुर्वीसारखे माझा
चेहरा टवटवीत दाखवणारे
आरसे मिळेनासे झाले आहेत.



लक्षण
मी केलेला केक
पण 'बकुळाबाईंनी पाठवला'
म्हटल्यावर, 'बेकार आहे' म्हणत
अख्खा मटकवलात
तेव्हाच मी तुमचं लक्षण
ओळखलं.

थँक्यू
निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा
एका अपुर-या चित्राला मदत करायला
काळ्या ढगाच्या दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याल्या 'थ्यंक्यु' म्हणालो.

पक्षनिष्ठा
पंचवीस मार्क कमी पडून नापास
झालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,
'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.'

वटसावित्री : १
'वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला
'ह्यां' च्या समोरच्या बि-हाडातल्या
बाईच्या जन्माला घाल....'

वटसावित्री : २
'वटेश्वरा, हे
आज तुझ्या बुध्यांला गुंडळलेलं
सुत उद्या पहाटे मी
उलंटं फिरवून घरी परत नेणार आहे.
तेव्हा आजचं सुत हे एक नुसतचं
बंडल आहे हे ध्यानात ठेव.'

प्रश्न
आताशा बुडणा-या सुर्याला
'बराय उद्या भेटू'
असे म्हणाला की तो मला म्हणतो,
'कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
'सुर्य आता म्हातारा झालाय.'

मी राहतो पुण्यात
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.




कवीता फाडण्याच्या मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याच्या
दुसरे दिवशी वाण्याच्या
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!
एक होती ठम्माबाई
एक होती ठम्माबाई
तिला सोशल वर्कची घाई
रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्कच कुठे उरले नाही

वर्क थोडे बाया फार
प्रत्येकीच्या घरची कार
नोकर - शोफर - बेरा - कुक
घरात आंबून चालले सुख

घराबाहेर दुःख फार
करीन म्हणते हलका भार
कार घेऊन निघते रोज
हरेक दुःखावरती डोज -

पाजीन म्हणतेः पिणार कोण ?
सगळ्या जणींना करते फोन
'' मला कराल का हो मेंबर ?''
'' अय्या , सॉरी , राँग नंबर !''

'' सगळ्या मेल्या मारतात बंडल ''
म्हणून स्वतःच काढते ' मंडळ '!

(-ऊरलंसुरलं मधुन)
a