Leave a message
Showing posts with label पुलंचे भाषण. Show all posts
Showing posts with label पुलंचे भाषण. Show all posts

Friday, April 26, 2024

अभिनय साधना

सोलापूर येथील अभिनय साधना मंदिरातर्फे आयोजित पार्श्वनाथ आळतेकर स्मृतिदिनानिमित्त नोव्हेंबर १९६४ मध्ये पु.ल. देशपांडे यांनी केलेले भाषण.

रसिकहो,

अभिनयसाधना मंदिराने महाराष्ट्रातील एक निष्ठावंत नट पार्श्वनाथ आळतेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण करायला मला येथे बोलावून आळतेकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याची संधी दिली याबद्दल मी मंदिराच्या कार्यकारी मंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. आळतेकरांचा आणि माझा अतिशय निकटचा परिचय होता. मराठी रंगभूमीवर मी ज्या काळात नाट्यकलेचे प्राथमिक धडे घेत होतो, त्या काळात मराठी रंगभूमीवर काही नवीन सुधारणा घडवून आणावी म्हणून जी मंडळी धडपडत होती अक्षरशः तनमन आणि धन – स्वतः चे – खर्च करीत होती त्यांत आळतेकरांचं स्थान हे अतिशय मोठं होतं. त्या माणसाच्या रंगभूमीविषयक निष्ठा अलौकिक होत्या. व्यावहारिक अर्थाने हा एक वेडा माणूस होता. नाटक हे त्यांचं वेड होतं. वास्तविक ते स्वतः उत्तम नट होते मोठ्या तोलाचे दिग्दर्शक होते त्यांना – मानमान्यता होती, चित्रपटांतून अमाप पैसा मिळवण्याची संधी होती. परंतु हे सर्व बाजूला सारुन त्यांनी आजन्म नाट्यकलेच्या विद्यार्थ्याची भूमिका पत्करली. आध्यात्मिक भाषा वापरायची तर नाट्यसाधना करणारे ते एक साधक होते. साधकाचा मार्ग हा नेहमीच कष्टाचा असतो. अल्पसंतोषाचे आणि साधनेचे जमत नाही. उपासना ही नेहमी दृढ चालवावी लागते. स्वतःचे आयुष्य ही एक प्रयोगशाळा करावी लागते. ह्या नाट्यकलेच्या संशोधकाने हे व्रत आजन्म पाळले. तुच्छता-निंदा पराजय- उपहास ही दूषण भूषणासारखी अंगाखांद्यावर वागवली. असल्या ह्या थोर मनाच्या कलासाधकाच्या स्मृतीला अत्यंत नम्र अभिवादन करुन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो –

माझ्या भाषणाचा विषय “अभिनयसाधना” असा आहे. डॉ. दिवाडकरांनी मला विषय विचारला आणि मी ‘अभिनयसाधना’ हा विषय सांगितला. पण ज्या क्षणी सांगितला त्या क्षणापासून आतापर्यंत मी विलक्षण अस्वस्थ झालो आहे. जेव्हा मी त्यांना म्हणलं की मी ‘अभिनयसाधना’ ह्या विषयासंबंधी बोलेन, त्यावेळी मी काय भयंकर आपत्ती स्वतःवर ओढवून घेतली आहे याची मला कल्पना नव्हती. अभिनय कसा करावा हे शिकवणं – अभिनय करण्यापेक्षा सहस्रपट कठीण आहे याची मला कल्पना नव्हती. यापूर्वी कधीही मी हे गुह्यतम शास्त्र समजावून सांगण्याचा आव आणला नव्हता. एका गाफील क्षणाला कबूल करुन गेलो आणि आता जंगलात वाट चुकलेल्या मुशाफिरासारखा त्यातून हिंडतो आहे. आजही आपणापुढे तसाच हिंडणार आहे. नाट्यकलेच्या ह्या जंगलात निरनिराळी कातडी पांघरुन मी गेली वीस-पंचवीस वर्षं हिंडतो आहे. त्यामुळे त्यातली चार ओळखीची स्थळ मी आपल्याला दाखवीन यापरते जास्त काही माझ्या हातून होईल असे मला वाटत नाही. हा सगळा कलेचा मामलाच मुळी शोध घेण्याचा आहे.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामबुवांनी आध्यात्मिक अर्थानं म्हटलं. कलात्मक जीवनातदेखील असंख्य आघाड्यांवर हे युद्ध चालू आहे. इथे स्वस्थतेला वाव नाही. त्यातून एखादा गुरु फारतर बोटाला धरुन ह्या जंगलातल्या दोन-चार वाटा दाखविल. पुढला सारा रस्ता आपला आपण शोधून काढायचा आहे. उस्तादजी आपल्या शिष्याला सांगेल, बेटा, हा त्रिताल आहे. ही यमन रागातील ‘येरी आली पियाबिन’ ही चीज आहे. हे ह्या रागाचं स्वरुप आहे. हा त्रितालाचा स्वभाव आहे. ही सम आणि हा काल. थोडी आलापी थोडी तान दाखवेल तिथून पुढे मात्र तो त्रिताल – आणि बोलतान तो यमन – ती येरी आली पियाबिन आणि त्या जाणत्या अजाणत्या श्रोत्यांपुढे बसलेले तुम्ही ! इंग्रजीत एक म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत तुम्ही नेऊ शकता, पण प्यायला लावू शकत नाही. अभिनयकलेचे तेच आहे नव्हे, कुठल्याही कलेचे तेच आहे. माझ्या ड्रॉइंग मास्तरांनी माझ्यापुढे हात टेकले पण मला कधी एक सरळ ओळ काढता आली नाही. पण पेटीवर मात्र बोटं पडली ती प्रेमात पडल्यासारखीच पडली. रंगांच्या पेटीवर प्रेम जमलं नाही- सुरांच्या पेटीवर जमलं ! आता वर्षावर्षात हात लागत नाही तरी रुसली नाही ती माझ्यावर. आमचा संगीत संसार दृष्ट लागण्यासारखा नसेल झाला, पण धरली संगत सुटली नाही !

कुठलीही कला यायला आधी तिच्या प्रेमात पडावं लागत आणि प्रेमात जस पुस्तक वाचून पडता येत नाही क्रमांक सहा, पोटकलम दोन बरहुकूम काही गालावरचे बदलते भाव आणि डोळ्यांतली सूक्ष्म हालचाल होत नाही त्याचप्रमाणे कलेचे प्रेमदेखील जडणे हा माझ्या दृष्टीने तरी योगायोगाचा भाग आहे. माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही – पण माणूस शिकून फारतर वकील किंवा दिवाडकरांची हरकत नसेल तर मी म्हणेन डॉक्टर होईल. पण मुळातच योग असल्याशिवाय तो खरा कलावंत होणार नाही. अर्थात उपजत ह्याचा अर्थ बालपणीच ते देणे घेऊन येईल असेही नाही. कदाचित राजापूरच्या गंगेसारखा तो झरा एकदम प्रकट होईल. पण तो कुठेतरी गुप्त असावाच लागतो. तेव्हा अभिनयसाधना कधी करावी ह्याचा काही गुरुमंत्र मी सांगणार आहे अशी आधी कृपा करुन कल्पना करुन घेऊ नका. कलेवर मुख्य म्हणजे उपजत प्रेम असावे लागते. (आणि मी ‘प्रेम’ हा शब्द प्रेमाच्या सर्वांत उदात्त अर्थाने वापरतो. खऱ्या प्रेमाविषयी बोलताना खाडिलकरांनी म्हटलं आहे की ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनीं!’ असं हे लोभरहित निर्मळ – नितांत प्रेम हवं ! प्रेयसीला भेटायचा संकेत ठरला म्हणजे प्रियकर कसा मोहरुन आलेला असतो तशी नाटकाची तारीख ठरली म्हणजे लग्नाची तिथी ठरल्यासारखे जे तहानभूक विसरु शकतात आपली सामाजिक – प्रतिष्ठा, इतर कामधंदा, उशिरा येण्याबद्दल लग्नाच्या बायकोचं बोलणं कानावर घेत नाहीत, अंगात ताप असताना तालमींना उभे राहतात ज्यांना तालमींना आणण्यासाठी दिवाडकरांसारख्या नाट्यवेड्यांना गाड्या घेऊन जावं लागत नाही आज नाही आलो किंवा आले तर चालणार नाही का असला आचरट प्रश्न जे विचारीत नाहीत त्यांनीच ह्या नाटकाच्या क्षेत्रात यावे. हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे ! तुम्हाला अभिनयाची साधना करायची आहे ना ? मग ती समस्तांची लज्जा त्यजुनि केलेल्या भगवच्चिंतनासारखी करता येणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि ह्या फंदात पडा ! नाट्यकलेवर आपण प्रेम करतो आहो का उगीच एखाद्या उनाड माणसासारखी तिच्याशी लगट करतो आहो हा प्रश्न स्वतः च्या मनाला विचारा आणि मग तोंडाला रंग लावा. नारायणराव बालगंधर्वांचा एकुलता एक मुलगा वारला त्या दिवशीदेखील त्यांनी नाटक बंद ठेवलं नाही. कलावंताला केवळ आपला विचार करुन नाही भागत. ही आमची वैयक्तिक दुःखं कलावंत म्हणून आमची जी सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्या आड येऊन नाही चालणार ! इंग्रजीत म्हण आहे – The show must go on !!

नाटकापासून आपल्याला परावृत्त करावं म्हणून नाही मी हे सांगत. नाट्यकलेची कलावंताकडून मागणी किती मोठी आहे हे कळावं म्हणून सांगतो. प्रियकराला भेटायला जाणारी प्रेयसी जशी रात्र असो की दिवस असो की पर्जन्याची वृष्टी असो, की “भीति तयाची मजला नाही प्रियासी रमवाया जाऊ म्हणणारी उत्कंठित प्रेयसी आणि तिसऱ्या घंटेची उत्सुकतेने वाट पाहणारा नट किंवा नटी सारखीच! हे प्रेम केवळ व्यावसायिक नटालाच हवे नि अव्यावसायिक नटाला असण्याची जरुरी नाही हा भ्रम मात्र खोटा आहे. (प्रत्येक नट हा amateur च असावा लागतो. amateur याचा मूळ अर्थ Lover – प्रेमिक – असा आहे. कला ही त्याची प्रेयसी आहे. व्यावसायिक नटाचा संसार ती उभा करीत असेल ही तिच्यावरची स्वतंत्र जोखीम आहे.

नाट्यकलेविषयीचे अव्यभिचारी प्रेम ही नट होण्याला असलेली पहिली अट आहे. ते प्रेम त्या कलेवर हवे स्वतः वर – नव्हे ! एम्. ए. असूनदेखील नाटकात काम करतात किंवा रेडिओवर गातात ह्या वाक्याला कलेच्या क्षेत्रात काही अर्थ नाही ! ‘त्या दृष्टीने बघा म्हणजे झालं’ ही तडजोड कलेला मान्य नाही. कलेक्टरची बायको आहे किंवा मिनिस्टरचा मुलगा आहे म्हणून त्याच्यासाठी त्रितालाच्या मात्रा सोळाऐवजी सतरा-अठरा चालतील हा हिशोब कलेच्या क्षेत्रात मंजूर नाही. कलेक्टरची बायको असो की कमिशनरची सून असो, तालाला चुकली म्हणजे चुकली ! कलावंत म्हणून तिची किंमत शून्य ! अभिनयाच्या क्षेत्रात तेच आहे. थोडक्यात म्हणजे Stanislavesky ने सांगितल्याप्रमाणे Love the art in yourself and not yourself in art For this leads to success in our work!

(भुमिकेशी तादात्म्य वगैरे फार पुढल्या गोष्टी आहेत. प्रथम नाटक करण्याची जी जबाबदारी आपण अंगावर घेतली आहे त्या जबाबदारीशी आपण एकरुप होणार आहोत की नाही ह्याचा विचार आधी करावा आणि मग नाटकात काम करायला उभे राहावे. कलेवरच्या प्रेमापेक्षा हे स्वतःवरचं प्रेम इतकं जबरदस्त असतं की आपलं सौंदर्य बिघडता कामा नये म्हणून दळायला बसलेली सिंधूदेखील मी चांगली जॉर्जेटची साडी नेसून पोज घेऊन दळताना पाहिली आहे आपल्या संगीतविषयक ज्ञानाच्या चुकीच्या कल्पनांनी गाण्याची टाळी घ्यावी म्हणून गाण्यातली भावना न घेता गळ्याची गिरकी फिरवणारे नट मी पाहिले आहेत. आश्विनशेटजीचं काम करायला उभे राहिलेले एक बुवा रेवतीचा हात हातात घ्यायला बिचकले आणि ‘कर हा करी’ हे गाणं तिच्या बोटाच्या नखांना स्पर्श करुन टुणकन् दूर उभे राहून म्हणाले. स्वतःचं चारित्र्य धुतलेल्या तांदळासारखं आहे हे त्यांना त्यावेळी आठवलं !

नाटकाच्या कलेत हा ताप मोठा आहे. अभिनयकला म्हणजे परकाया प्रवेशाची कला. स्वतःचं कलात्मक व्यक्तिमत्त्व नाटककाराने कागदावर उतरवलेल्या पात्रात विसर्जित करायचं आणि लोकांची त्याबद्दल तंतोतंत खात्री पटवून द्यायची हे त्याचं काम आहे. आणि हे विसर्जन करीत असताना स्वतःची शुद्ध मात्र शाबूत ठेवायची ! भूमिकेशी तन्मय होणे याचा अर्थ तन्मय झालो आहोत असे प्रेक्षकांना भासवणे. हुकमी रडणे – हुकमी हसणे हुकमी चिडणे – हुकमी रुसणे आणि ह्या क्रिया चालू असताना ते हुकूम कसे सुटताहेत याची प्रेक्षकाला लवमात्र शंका न येऊ देणे हे ‘ते’ काम आहे. त्यासाठी आवाजाची किंवा एकूणच शरीराची तयारी लागते. पण त्याहूनही मनाची लागते.]

गवई मनसोक्त गाऊ शकतो. त्याचा तो मालक असतो. लय-रागाची बंधने पाळली की पुढे तो स्वतःचा बादशहा, नट मात्र दिल्या रिंगणातच चालला पाहिजे. इथे दुसऱ्या एका व्यक्तिमत्त्वाशी तल्लीन व्हावे लागते – आणि ते होताना केवळ स्वतः तल्लीन होऊन चालत नाही, जोडीचे इतर कलावंतही तल्लीन हवेत. नाटक हे एक वृंदवादन आहे. एक वाद्य बेसूर झाले तरी सगळा ऑर्केस्टा बिघडला. ही तल्लीनता साऱ्या संचाची आहे. माझी वाक्ये म्हणून झाली की आता मी सुखाने मरतो म्हणणाऱ्या बाजीप्रभु देशपांड्यासारखे त्या देखाव्यातून निवृत्त होऊन चालत नाही. तालमीत आणि प्रयोगात हजारदा ऐकलेली वाक्ये त्याच उत्सुकतेने ऐकावी लागतात. सिंधूचे काम करताना बालगंधर्वांनी गणपतराव बोडसांकडून हजारदा ऐकलं असेल की “सिंधू, आजपासून मी दारू सोडली. – ह्या वाक्यावर त्या सिंधूलाही कालच्या प्रयोगात सांगितलं होतंत मला हे, हे दर्शवणारी एवढीशी सुरकुतीसुद्धा चालणार नाही. रोज नव्या उमाळ्याने – “खरं का, अस झाल असेल तर देवच पावला, अमृतेश्वराला लक्ष वाती लावीन.” ही सारी वाक्ये म्हणावी लागतात. आपला तो अनपेक्षित आनंद प्रेक्षकांकडे त्याच उत्कटतेने पोहोचवावा लागतो. प्रेक्षकांच्या अस्तित्वाची उघड दखल न घेता प्रेक्षकांपर्यंत शब्दांच्या हालचालीच्या नव्हे, पुष्कळदा निश्चलपणाने निःस्तब्धपणाने त्या भावना कलात्मक रीतीने संक्रांत करण्याची क्रिया म्हणजे अभिनय । एरवी आपण आयुष्यात अभिनय करतोच की ! तो काही शिकायला जात नाही. पण अभिनय जेव्हा कलात्मक आनंदासाठी करायचा असतो त्यावेळी तो आनंद प्रेक्षकांच्या अंतःकरणात निर्माण करण्याची कला आणि शास्त्र शिकावे लागते. आता मी भाषणासाठी त्या दारातून इथे नुसता आलो. पण स्टेजवर मी ज्यावेळी येतो त्यावेळी entry घ्यावी लागते. मी आलो आहे हे सगळ्यांना कळावं लागतं. माझं पाहणं चालणं – येऊन बसणं आणि बोलणं ह्याला त्या नाटकातले काही संदर्भ असतात. काही नवे संदर्भ तयार होत असतात. भावबंधनातली लतिका ज्यावेळी तो परमेश्वर मला कुठल्या स्वरुपात दर्शन देणार आहे म्हणते त्यानंतर घनश्याम येतो. त्या येण्यामागे एक अखंड साखळी आहे.” राज्यकर्ते ते राज्यकर्ते आणि दास ते दास म्हणणारा कीचक येतो. तो एक उन्मत्त परंपरा सोबत घेऊन येतो. हे नाटकातले येणे आणि जाणेच काय, पण तिथले पडदा वर जाऊन खाली पडेपर्यंत नुसते असणे ह्यालादेखील काही साधना करावी लागते. काही विचार करावा लागतो. रंगभूमीवर निरर्थक असे काही करण्याला वावच नाही. रंगमंचावरची ही पोकळी म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे. प्रत्येक पात्र मग ते लहान असो वा मोठे – ते डिस्टर्ब करून नवी नवी आकर्षणे निर्माण करीत असते. ही आकर्षणे जितकी कलात्मक तितका प्रेक्षक अधिक खेचला जातो. ह्याचा अर्थ रंगभूमीवरच्या प्रत्येक पात्राने सारखे काहीतरी करीतच राहिले पाहिजे असे नव्हे. किंबहुना कित्येकदा काही न करण्यातून फार मोठा अर्थ व्यक्त होतो. नाहीतर काही माणसे अकारण अॅक्टिंग करतात हे आपण पाहिले असेल. वृंदवादनात प्रत्येक वाद्य वाजलेच पाहिजे असे नाही. पण आपली पाळी केव्हा येईल याविषयी सावधान पाहिजे. सगळ्या पात्रांना रंगभूमीवर असे जिवंत ठेवायचे ही तर नाटककाराची फार मोठी किमया आहे. दुसऱ्या पात्रांची आपण योग्य रीतीने दखल घेऊन आणि त्यांना दखल द्यायची तिथे देऊन नाटक फुलवणे हे तर प्रत्येक नटाचे कर्तव्य आहे. संगीत नाटकातदेखील नाटक थांबवून तानांची भेंडोळी सोडणाऱ्या नटाला कोणी मानले नाही. तिथेही संयम हवाच ! दहा-दहा आणि बारा- बारा वन्समोअर घेणे हे काही फारसे शहाणपणाचे लक्षण नाही. प्रेक्षकांना आवडले म्हणून आप्पलपोटेपणाने आपण स्वतःच नाटक खाऊन जाणे हे चांगल्या कलावंताचे लक्षण नव्हे. गाताना दुसरे पात्र समोर असले तर त्याच्या अस्तित्वाची दखल घेऊन नाटकातले गाणे नटवणारे नट हे फार मोठे अभिनयपटूही होते. नारायणरावांची जी गाणी फक्त ते एकटे असताना म्हणायची असत ती ते तज्येतीने गात. एरवी आवश्यक तेवढेच आणि सार्धं गात असत ! म्हणजेच नाटककाराला काय म्हणायचे आहे ते म्हणून दाखवणे एवढेच नटाचे कार्य आहे असा मात्र गैरसमज करुन घेऊ नका. नाटकात काम करण्याच्या तीन महत्त्वाच्या पद्धती सांगितल्या आहेत.

एक: नाटककाराचे म्हणणे सरळ प्रेक्षकाला समजावून सांगणे.

दुसरे आपली वाक्ये झाली की संपले. आपण गाऊन 8 घेतले की झाले. बाकी नाटकात इतर पात्रे आहेत याची दखल न घेणे. एका महान नटाला मी भाऊबंदकीत राघोबादादाचं काम करताना पाहिलयं. रामशास्त्र्यांनी देहान्त प्रायश्चित्त सांगितले त्यावेळी हे नटवर्य आपल्या धोतराची किनार पाहत होते. हे म्हणजे Loving oneself in art पैकी.

तिसरे म्हणजे स्वतः आणि इतर सर्व नट यांनी मिळून उभी करायची ही कला आहे याची जाणीव ठेवून अभिनय करणारे नट !

ह्यांतला पहिला प्रकार आपली भाषणे चोख म्हणून नाटककाराचा मतलब सांगणाऱ्या नटांचा ! आपण असली नाटकं पाहिली असतील. सगळे नट चांगले असे फूटलाइटसमोर येऊन नाटक रांगेत उभे राहून करतात. विशेषतः कव्हरवरच्या scene मध्ये बोलणारे आश्विनशेट, वैशाखशेट वगैरे. आश्विनशेटही सरळ समोर बघतो, वैशाखशेटही बघतो. ते दोघे एकमेकांशी बोलताहेत हे आपण समजायचे ! लोकांना नाटक मास्तरांनी शुद्धलेखन घालावं तसं समजावून देतात. स्पष्ट वाणी ! ढोबळ अभिनय ! अधिक स्पष्ट करताना गोंधळ, स्वगत भाषणदेखील सरळ प्रेक्षकांना उद्देशून बोलायचं नसतं ! वृंदावन जेव्हा म्हणतो की हिच्याकडे पाहिलं म्हणजे पूर्वजन्मावर विश्वास ठेवावासा वाटू लागतो. तो काही तुम्हाला निरोप पोहोचवीत नसतो. ते एक प्रकट चिंतन आहे. ‘स्वगत’ ही एक अभिनयाचा अत्यंत कलात्मक आविष्कार करण्याची संधी असते. ती काही एका माणसाने थिएटरात पिटलेली दवंडी नव्हे ! ‘सृष्टीची उलथापालथ तर झाली नाही ना ? मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना ?’ हे काय ‘नाही संभाजी महाराज, सृष्टीचं ठीक आहे. मुंग्या मेरु पर्वतापर्यंत नाही पोहोचल्या’ असं उत्तर तुमच्याकडून यावं म्हणून विचारलेले प्रश्न नाहीत. विचारांच्या गुहेत तुम्हाला नेलेलं असतं. तुम्ही तिथे आला आहात ह्याची दखल त्या गुहेच्या मालकानं घ्यायची नसते. तुम्ही त्याला उघडपणे द्यायची नसते ! स्वगत भाषण म्हणजे वसंत व्याख्यानमालेतलं व्याख्यान नव्हे ! उत्तम स्वगतं ही तर ख्यालासारखी असतात. शेक्सपिअरसारख्या नाटककारांनी स्वगतांतून चमत्कार करुन दाखवले आहेत. गडकऱ्यांची शिवांगी, ‘राया राजसा हट्ट हट्ट तरी किती करायचा !’ ही soliloquy म्हणायला लागली की गद्यातली ठुमरी चालली आहे, असं वाटलं पाहिजे. एखाद्या नर्तिकेसारखी अदाकारी करण्याचं तिथे सामर्थ्य लागतं ! स्वगत हे नाटकाला काव्याच्या जवळ घेऊन जातं ! मध्यंतरी स्वगतं कृत्रिम असतात वगैरे चुकीचे विचार येऊन गेले. कारण पुष्कळ नटांनी स्वगत व्याख्यानासारखी म्हटली. स्वगत म्हणणाराची दृष्टी ही समोरचे दिसून न दिसणाराची असावी लागते. बोलत आहे ते अंतर्मन याची जाणीव करुन द्यावी लागते. त्याला फार मोठं अभिनयाचं सामर्थ्य लागतं ! केवळ स्वगतातच काय पण सगळ्या नाटकातच वाक्यं पिटापर्यंत फेकणारे नट ही चूक करतात. संवाद सगळ्यांना ऐकू गेले पाहिजेत हे खरं. म्हणजे काय रंगभूमीवरुन संवादाचे हाके घालायचे की काय ? समर्थ नट प्रेक्षकांचे कान आपल्यापर्यंत ओढतो त्यांच्या कानठळ्या नाही बसवीत ! पण असे डायरेक्ट – मेथडवाले काही नट असतात.

दुसरा प्रकार आहे तो मात्र रंगभूमीवरच्या गुन्हेगारांचा ! फक्त आपल्यासाठी लोक तिकीट काढून आले आहेत असं समजणाऱ्या नटवर्यांचा ! रंगभूमीवरची मधली जागा अडवून धरणारांचा. ह्यांना प्रिय असते ती एकच गोष्ट म्हणजे ते स्वतः ! दुसऱ्यांचे संवाद ऐकण्याची देखील हे नट तसदी घेत नाहीत. मी ज्यावेळी नट म्हणतो त्यावेळी नटीही अभिप्रेत आहे हे ध्यानात ठेवा. मी मराठी रंगभूमीवर चांगलं नाव मिळवलेले नट पाहिले आहेत. त्यांना देखील नाटक हा एक सांघिक कार्यक्रम आहे याची जाणीवच नसते. प्रेक्षकांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करुन घेण्याकडे त्यांचा ओढा असतो. ह्या प्रकारात गाणारे नट फार आहेत.. आपल्या क्रिकेटच्या टीममध्ये जसं बोलर म्हणजे वाईट बॅटस्मन असला पाहिजे किंवा चांगला बॅटस्मन असला तर फील्डिंगची जबाबदारी त्याची नाही अशी एक समजूत आहे. त्याचप्रमाणे ह्या गाणाऱ्या नटांची अवस्था असते. बालगंधर्वांसारखे सन्माननीय अपवाद सोडा पण बाकीच्या गाणाऱ्या नटांपैकी पुष्कळांनी अभिनय ह्या गोष्टीशी आपला संबंध न ठेवण्यातच भूषण मानले आणि आजही मानताना दिसतात. ज्याला अभिनयाचं अंग नाही तो कधीही उत्तम नाट्यसंगीत गाऊ शकणार नाही ! नाट्यसंगीत ही काही केवळ गळ्याची करामत दाखवण्याची कला नव्हे ! नारायणराव बालगंधर्वांना तर सगळीच देणगी होती पण बापूराव पेंढारकरांसारखा नट आवाजाची त्या अर्थाने देणगी नसूनही अभिनयामुळे आपले गाणे परिणामकारक करीत असे. मी आजकालचे उदाहरण देतो. चित्रपटसंगीत हा नाट्यमय संगीताचाच प्रकार आहे. लता किंवा आशाच्या फिल्मी गाण्यांत त्या ज्यांना प्लेबॅक देतात त्या नटींपेक्षा जास्त सुरेख वाचिक अभिनय असतो. ह्या मुली नुसत्याच सुरेल नाहीत, तर नाट्याला आवश्यक असलेला अभिनय सुरेल शब्दांतून दाखवण्याचं सामर्थ्य त्यांच्या गळ्यात नव्हे, त्यांच्या अंतःकरणात आहे. मी अंतः करण हा शब्द मुद्दाम वापरतो कारण अभिनयाचा डोक्याइतकाच नव्हे, काहीसा अधिक संबंध अंतःकरणाशी आहे. नाटकातले संवाद भावनेने जाणवून घ्यायचे असतात. तरच त्या संवादांना ओलावा येतो. एखाद्या कोरड्या मनाच्या माणसाचे काम करताना देखील भावनेने ते कोरडेपण दाखवता यावे लागते ! आणि शेवटी नाटक हे प्रेक्षकांसाठी असले तरी प्रेक्षकांच्या अस्तित्वाची दखल घेतल्याचे न दिसता करावे लागते. तिथे दखल घ्यायची असते ती जोडीच्या पात्रांची । कारण नाटक हा त्यातल्या पात्रांच्या सुखदुःखाच्या भावनांचा गोफ विणण्याचा खेळ आहे. म्हणून नाटक हे निवेदन नसून संवादांतून फुललेले एक ‘स्नेहसंमेलन’ आहे ! मूलतः ते निरनिराळ्या पात्रांनी एकत्र येऊन करण्यासाठीच लिहिलेले असते. ते कथन नव्हे तर कथेचे माणसांकरवी केलेले प्रकटन आहे ! इतरांचे अस्तित्व विसरुन सारे काही स्वतःकडेच केंद्रित करुन काम करणारा नट हा माझ्या दृष्टीने नटच नव्हे ! हा रंगभूमीवर शिरलेला दरोडेखोर आहे. तो दुसऱ्यांची सामुदायिक मालकी न मानणारा गुन्हेगार आहे.

तिसरा आणि खरा अभिनयप्रकार म्हणजे नाटक ही संघकला आहे हे मानणारांचा. इथे मला नाटक हा वाङ्मयप्रकार अभिप्रेत आहे. कथाकथन किंवा मी करतो तसला बहुरुपी खेळ हा अभिनयाचा एक निराळा आविष्कार आहे. त्याविषयी मी आता बोलत नाही. पण एकाहून अधिक पात्रे ज्या नाटकात असतात तिथे करायचा अभिनय हा कसा करायचा ?

नाटक हे संवादांतून फुलतं. मला एकदा एका चांगल्या अनुभवी नटाचं पत्र आलं की तुमच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ ह्या नाटकात मला आचार्याची भूमिका करायची आहे, तरी मला ती समजावून द्यावी ! मी त्याला लिहिलं, तुम्ही माझं नाटक एकदा नीट वाचा. दोनदा वाचा. तीनदा वाचा. एक-दोनदा मोठ्याने वाचा. एवढं करुनही जर आचार्य म्हणजे काय कळत नसेल तर भूमिका करु नका ! एखाद्या नवख्या माणसानं हा प्रश्न विचारला असता तर मी समजू शकलो असतो. माणसं साक्षर असतात म्हणजे चांगलं वाचू शकतात असं नाही. हिरवे हिरवे गार गालिचे

हेही वाचन झालं आणि त्यातला नाद ओळखून वाचणं हेही वाचन झालं. पण एकाने अक्षरं वाचली, दुसऱ्याने अर्थ वाचला. तेव्हा मुख्य म्हणजे नाटकात काम करणाऱ्या माणसाला केवळ आपली वाक्यंच नव्हे तर सगळं नाटक अंतर्बाह्य ठाऊक असावं लागतं ] राघोबा काय आहे हे कळल्याशिवाय रामशास्त्र्यांच काम काय करणार ? मग जे डायरेक्टर नटांना वह्यांवर नाटकातली वाक्यं चिकटवून देतात. त्यांची अगदी धन्य वाटते ! मी एका गावात गेलो होतो. ओळख करुन दिली. एका गृहस्थांशी. ते त्या गावातले डायरेक्टर. ते म्हणाले, ‘वा वा, पु. ल. देशपांडे का ? वा ! गेल्या वर्षी आम्ही याचचं नाटक फाडलं होतं !’ नाटक फाडलं ? नाटक पाडलं हे मला कळू शकतं; पण फाडलं ? तर त्यांच्या गावात जत्रेला गावजेवण आणि नाटक घालतात आणि मग मुहूर्ताच्या कॉप्या फाडतात आणि डिंकानं वहीवर चिकटवतात, म्हणजे प्रत्येकाने आपापली वही पाठ करताना टचिंगचा शब्द म्हणायचा ! आता ‘कोठे जाणार’ म्हणण्याऐवजी ‘जाणार कोठे’ म्हटलं की थांबले. कारण वहीत टचिंग ‘जाणार’ हे दिलेलं !
म्हणजे ‘जाणार’ हा परवलीचा शब्द येईपर्यंत हे स्वस्थ ! सगळ्या होतकरू दिग्दर्शकांना माझी हात जोडून विनंती आहे की, नाटकांची पुस्तकं विकत घेण्यात काटकसर नका करू | एकदा नव्हे, चांगलं चार-पाच वेळा सगळ्या नटनटींपुढे ते संपूर्ण नाटक वाचा ! म्हणजे आपण काय करायला निघालो आहोत ते सर्वांना कळेल. संवाद म्हणजे त्यातले केवळ शब्द नव्हेत तर त्यातली विरामचिन्हे देखील ! नाटकातील शब्दांइतकीच स्थब्धता बोलकी असते आणि नटाचं पहिलं काम म्हणजे शब्दांवरची हुकमत आणि त्या शब्दांच्या मांडणीत सम, ताल, काल कुठे आहे ह्याची समजदारी ! अश्वारुढ बहाद्दरासारखं ज्याला शब्दारुढ होता येत नाही, स्वाराचं घोड्यावर असतं तसं शब्दांवर ज्याचं प्रेम नाही त्याने रंगभूमीच्या दिशेने नट म्हणूनच नाही तर प्रेक्षक म्हणूनसुद्धा येऊ नये ! कुस्त्या बघायला जावं !

‘शब्द’ हे नटाचं मुख्य भांडवल होय भांडवल, त्याचा सगळा धंदा त्या भांडवलावर चालतो म्हणूनच हे भांडवल फार जपून, काळजीपूर्वक, त्यातून अर्थाची योग्य प्राप्ती होईल अशा बेतानं वापरावं लागतं ! संवादलेखन हे काव्यलेखनाइतकंच बिकट आहे. एखाद्या पात्राची भाषा खरी आहे की कागदी आहे हे पाच वाक्यांत जोखता येतं आणि कालच्या काय, आजच्या काय आणि उद्याच्या काय, कुठल्याही काळातल्या रंगभूमीवर नट म्हणून वावरायचं असेल तर ज्या भाषेतले आपण नट आहोत त्या भाषेवर मुख्य म्हणजे नितांत प्रेम हवं. भाषेची शुद्धचं काय पण अशुद्ध रूपदेखील पूर्ण परिचयाची हवीत. रंगभूमीवर अशुद्ध बोलायलादेखील वाणी तयार असावी लागते. जिभेवरुन फुटाण्यासारखे शब्द उडावे लागतात – सतारीची मींड घेताना जशी बोटाची हुकमत लागते तशी शब्दांची हुकमत हवी. संवाद सहजतेने आले पाहिजेत हे तर खरंच ! कलेचा श्रेष्ठपणा हा सहजतेतून तर सिद्ध होतोच, पण ही सहजता विलक्षण परिश्रमापोटी येते. अभिनयाचे वाचिक, आंगिक, कायिक वगैरे भेद करतात. मी ह्याच्याशी अजिबात सहमत नाही. आता बोलण्यातला अभिनय करा मग चालण्यातला करा मग पाहण्यातला करा ही शिकवण एकजात चूक आहे. इब्सेनने म्हटले आहे की माझ्या संवादांतला एक शब्द काढा – My drama will bleed. माझं नाटक रक्तबंबाळ होईल. अभिनय असा – निराळा नाही काढता येत. रंगभूमीवर उमटणारा शब्द हा साऱ्या अंगातून इष्ट सहचारी भाव घेऊनच उमटावा लागतो. जे बोलायचे ते नुसतेच बेंबीच्या देठापासून बोलायचे नसते, अंतःकरणापासून बोलायचे असते. वाणीचा शारीरिक दोष सुधारता येईल पण नाटकातले संवाद म्हणायचे म्हणजे काय निर्जीव पोपटपंची करायची आहे ? नाटक घडाघड पाठ हवं पण का ? तर ते शब्द हवे तेव्हा हव्या त्या स्वरांत बुचकळून काढायला हाताशी सज्ज हवेत म्हणून ! संवादाचा कार्यकारणभाव आधी उमगला पाहिजे. मग व्हॉइस कल्चर ! संवादाचा प्राण सापडला पाहिजे. ही पहिली अट.
मागाहून त्याची फेक. त्या वाक्याची चाल, डायरेक्टरनी सांगितलं तसं आम्ही केलं हे कदाचित शिस्तप्रियतेचं सर्टिफिकेट देऊन जाईल, पण कलेच्या प्रांतात नेऊन सोडणार नाही. मी एक वाक्य सांगतो. खाडिलकरांची द्रौपदी म्हणते : जा दुःशासनाला म्हणावं, द्रौपदी स्वतंत्र आहे ! द्रौपदी कुणाची दासी नाही. आता ह्या वाक्यातला प्राण कशात आहे हे ओळखायला- ‘व्हॉइस कल्चर’च्या जोडीला महाभारतात उभं केलेलं इंडियन कल्चर ठाऊक हवं! ही तेजस्विनी ते वाक्य कसं म्हणाली असेल त्याचं चित्र डोळ्यापुढे हवं. भूमिकेशी तादात्म्य म्हणतात ते ह्याला. मग त्यातून ते वाक्य नीट न्याहाळलं पाहिजे ! ह्या इथे जाणवून घेतलं पाहिजे. द्रौपदीचा त्वेष, तिचा अहंकार अत्यंत परिणामकारक रीतीने कसा प्रकट होईल ते शोधलं पाहिजे. म्हणजेच नाटकातले संवाद म्हणणारी व्यक्ती अंतर्बाह्य ओळखण्याचं जे साधन – संवाद – ते संवाद पाठ होऊन नाही उपयोगाचे. ते नटाच्या रक्तात भिनले पाहिजेत. त्यातल्या अर्थाचा प्राण आणि कानामात्रांनी नटलेलं अक्षरांच शरीर पचलं पाहिजे. म्हणजे मग ते वाक्य आवश्यक तोलामोलानं जातं. आता ह्या शब्दांच्या उच्चाराला लागणारी स्वरयंत्राची साधना, शारीरिक आरोग्य वगैरे उत्तम हवं. पण माझ्या दृष्टीने भाषेतल्या शब्दांच्या आत्म्याची आणि शरीराची उत्तम ओळख ही महत्त्वाची.

अभिनयसाधना ही केवळ शारीरिक कसरत नव्हे. नुसते संस्कृत श्लोक स्पष्ट म्हणून वाणी शुद्ध होत असेल, पण शुद्ध, स्पष्ट वगैरे शब्द फसवे आहेत. अभिनय ही काही यांत्रिक क्रिया नाही. ती कला आहे. नुसते स्पष्ट बोलणारे लोक काय कमी आहेत है खणखणीत आवाजाची माणसंही असतात. एखाद्या कल्हईवाल्याचा आवाज खूप खणखणीत असतो म्हणजे काय त्याला वृंदावनाची काम द्यायचं ? त्याउलट आवाजात दोष असून अभिनयातल्या तेजस्वी सत्त्वामुळे केशवराव दात्यांनी रंगभूमीवर अपूर्व करामत केली. बालगंधर्वांची स्त्रीवेषातली ‘नाऽऽय” ही आर्त हाक शेकडो डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. मिलिट्रीत गेल्यामुळे शिस्त येते. पण ती माणसाचे यंत्र करणारी शिस्त असते. कलेला असल्या यांत्रिक शिक्षणाचं वावडं आहे ! आवाज कशाला ? एखाद्या माणसाची बोटदेखील त्याच्या गळ्यापेक्षा अधिक बोलकी असतात. सारी भरतनाट्यम्ची भाषा नुसत्या बोटांनी बोलते ! [नटाने प्रकृती उत्तम ठेवावी. श्लोकबीक म्हणावे. त्याने काही विवडत नाही. पण नटालाच काय, कुठल्याही कलावंताला मुख्य म्हणजे ह्या जगाकडे नीट पाहता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे आणि जीवनावर उदंड प्रेम करता यायला पाहिजे आणि हे सारं कलेत आणता – आलं पाहिजे. Stanislavesky चं वाक्य आहे “Leam – to see and hear and love life. Learn to bring it into art !

Learn to see and hear ! पाहायला आणि ऐकायला शिका हा साऱ्या कलावंतांना लागू पडणारा उपदेश आहे. नुसते डोळे असले म्हणून दिसत नाही. नुसते कान असले म्हणून ऐकता येत नाही. पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या मागे काही प्रेरणा लागतात. आपण सगळेच गाणं ऐकायला जातो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ध्वनी उमटून कानाच्या पडद्यावर आदळला की सगळ्यांनाच ऐकू येतो. पण जे ऐकायला शिकले आहेत त्यांना मात्र तो निराळा ऐकू येतो. चांगले गवई जेव्हा तंबोरे लावायला लागतात तेव्हा जलशाला जाणं हा एक केवळ उच्च अभिरुचीच्या घाऊक प्रदर्शनाचा भाग म्हणून गर्दी करणारी माणसं असतात ती कुजबुजायला लागतात. कुरकुरायलासुद्धा लागतात. वास्तविक गवई तंबोरा जमवीत असताना गप्पा मारणं हा गाणं चालू असताना गप्पा मारण्याइतका मोठा प्रमाद आहे. ज्यांना तंबोऱ्याच्या किंवा सतारीच्या तारा जुळणं म्हणजे काय आनंद आहे हे कळलंय ते त्या तारा जुळत असताना ऐकतात. अहो, तंबोऱ्याची जोड जुळवणं हे तर प्रणयाराधनासारखं आहे. पहिल्या प्रीतीचे, भीतीचे, काहीसे गमतीचे जे बोल सांगितले आहेत ना तशीच अवस्था असते. स्वर कसे हळूहळू जवळ येत असतात मग दूर जातात – पुन्हा येतात. आले असं वाटतं पण तो भास असतो – आणि असे जवळ येत – दूर जात – लाजत – रुसत शेवटी षड्जाला षड्ज किंवा जोडीला पंचम जेव्हा मिळतो. त्यावेळी स्वरांच्या अलीबाबाची गुहा असते, तिची दारं उघडल्याचा आनंद मिळतो. पण तो कुणाला ? जो ‘ऐकायला’ शिकलाय त्याला ! ज्याला नट व्हायचं आहे त्यानं हे संगीताचंच नव्हे तर गद्यातल्यासुद्धा स्वरांचं सामर्थ्य काय आहे हे ऐकायला शिकलं पाहिजे. शब्द हे भांडवल तसं मोठं स्फोटक आहे ! जरा इकडला स्वर तिकडे झाला की गोंधळ होतो. मी एकदा भावबंधन बघायला गेलो होतो. त्यातली लतिका जराशी लडिकाच होती. कामण्णाचं काम करणाराही जरा चावट होता. कामण्णाचं एक वाक्य आहे ‘ही आली लतिका, आता – डोळे बंद !” त्या पट्ट्याने ‘ही’ शब्द जरा ताणला आणि ‘हीs आली लतिका’ म्हटलं ! तिथून पुढे ती लतिका आली की ‘ही आली’ असंच वाटायला लागलं ! म्हणून शब्दांवर पकड हवी. जी भाषा किंवा बोली आपण वापरणार आहोत ती पक्की ठाऊक पाहिजे. म्हणजेच नाटकात आपल्याला जी भूमिका असेल तिच्या तोंडून ती भाषा कशी उमटेल याचा आपल्याला अंदाज येतो. कित्येक वेळेला नाटककाराने विशेष शैलीदार भाषा वापरलेली असते. जुन्या ऐतिहासिक नाटकांतून अशी भाषा आढळते. असल्या भाषेची आवश्यकता आहे की नाही हा निराळा मुद्दा आहे. परंतु एकदा आपण ते नाटक करायला घेतल्यावर त्या भाषेचा रंग काय आहे तो आपण पारखून घ्यायला हवा. कित्येकदा नाटककार मुद्दाम प्रासयुक्त भाषा वापरून काही परिणाम साधत असतो. उदाहरणार्थ ‘राजसंन्यास’ नाटक घ्या. त्यात असे गद्य आणि काव्य यांच्या सीमारेषेवरचे पुष्कळ संवाद आहेत. रायाजीचं एक वाक्य आहे – आणि बाबांचा पवाडा गाणारा तुळशीदास … आता हे वाक्य मुळातच एखाद्या कवितेसारखं रचलेलं आहे. ती अंतर्गत रचना ओळखूनच ते म्हणायला हवं. इंग्रजीत असल्या संवादांना आणि अभिनयाला ‘स्टायलाइज्ड’ म्हणतात. नक्षीदार वाक्यं नक्षीदार रीतीने मांडताना ती नक्षी कितपत करायची ह्याची खात्री हवी. नक्षीदार वाक्यापेक्षाही अभिनयाला अवघड वाक्यं म्हणजे साधी! संवाद ह्याविषयी आपल्याकडे फार चमत्कारिक समज आहे. टाळीची तान असते तशी काही टाळीची वाक्यं असतात. आणि तसलं वाक्य म्हणताना टाळीसाठी धडपड सुरू होते. लोकांना काही पटलं, रूचलं की लोक टाळी देतात हे खरं आहे. म्हणून ती टाळी लोकांकडून थकलेली बाकी वसूल करणाऱ्या पठाणासारखी वसूल करायची नसते. ते वाक्य काही नाटकातल्या प्रवाहाला सोडून बाजूला नेऊन लोकांवर मुद्दाम टाकायचं नसतं. असली वाक्यं म्हणणारे नट ‘नाटकी’ वाटतात. ज्यावेळी अंगातून संचारून अभिनय येत नाही त्याचवेळी त्याला आपण खोटा ह्या अर्थाने नाटकी म्हणतो. नाटकातलं पात्र असं खोटं असून नाही चालत. जलतरंगातल्या एखाद्या पात्रातलं पाणी कमीजास्त झालं की जसा सूर बिघडतो तशीच ही नेमकेपणा नसणारी पात्रे नाटक बिघडवतात. नेमकेपणा ही एक अभिनयातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रंगभूमीवर जे बोलायचं, जसं बोलायचं, जिथून बोलायचं – नव्हे जिथे उभं राहायचं नि जिथे बसायचं, उठायचं, चालायचं हे तालमीत निश्चित करावं लागतं. तालमीत ते मी आयत्यावेळी करीन, आयत्यावेळी अमकी action घेईन वगैरे बोलणारी माणसं असतात. मी नेहमीच सांगतो, रंगभूमीवर आयत्यावेळी होणारी एकच गोष्ट म्हणजे फजिती !

आणि म्हणूनच नाटकात बोलण्याची वाक्यंच नव्हे तर रंगभूमीवरची प्रत्येक हालचाल ही विचारपूर्वक ठरवावी लागते. रंगभूमीवर जो देखावा उभा करायचा, ज्या वस्तू मांडायच्या, जे कपडे चढवायचे त्याचीदेखील अत्यंत शिस्तबध्द योजना हवी. अर्थात आजच्या व्याख्यानात मी नाटक कसे बसवावे याचा ‘लेसन’ घेणार नाही आहे. एकतर आपण काही होतकरू नट म्हणून ह्या व्याख्यानाला आला नाहीत. आपण बहुसंख्य श्रोते नाटकाचे प्रेक्षक आहात. त्याच दृष्टीने मी हे विचार सांगतो आहे. तर ही नाटकात बोलण्याची तयारी करायची म्हणजे काय

करायचं ? मी आपल्याला सांगितलं की, केवळ स्वतःचे संवादच नव्हे तर ते नाटक आत्मसात केलं पाहिजे. त्यातून प्रत्येक नाटक ही काही संपूर्णपणे निर्दोष कलाकृती नसते. नाटककाराचे म्हणून काही दोष असतात. ते फार उघड न करता नाटक उभं करायचं आहे. ज्या कारणांसाठी आपण ते नाटक करायला सिध्द झालो ती कलात्मक कारणं आपल्याला पक्की कळली पाहिजेत. म्हणजे काय करायचं ह्याहूनही काय करता कामा नये हे तरी कळेल. एकच प्याला नाटक करायचं आहे असं समजा, मग सिंधूची वेशभूषा- केशभूषा, तिची बोलण्यावागण्यातली मर्यादा हे सारे समजावून घेतलं पाहिजे. ती कशी वागेल, कशी बोलेल, तिच्या हालचाली कशा असतील ह्याचं चित्र मनाच्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. तरच ते प्रेक्षकांना दाखवता येईल. ‘मी दारू सोडली’ हे सुधाकराचं वाक्य ऐकल्यावर ती आनंदाने उड्या मारील की आनंदाने गुदमरून जाईल हे कळलं पाहिजे. अशा वेळी सिंधू ज्या कुटुंबातली आहे त्या कुटुंबातली सिंधूच्या स्वभावाची बाई कसे वागेल याचे स्पष्ट चित्र अंतःकरणात उमटले नाही तर सिंधूचा अभिनय करणे अशक्य होईल. भूमिकेशी तद्रूपता म्हणतात ती ही ! पुष्कळ वेळा धाय मोकलून रडण्यापेक्षा डोळे नुसते डबडबले तर अधिक परिणाम साधला जातो. अवलोकन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्या काळी पुरुष स्त्रियांच्या भूमिका करीत. त्यामुळे आपला पुरुषीपणा पार लिंपून टाकण्यासाठी त्यांना वाजवीपेक्षा जास्त परिश्रम करावे लागत. बालगंधर्वांसारखा अभिनय एखाद्या स्त्रीने करायची आवश्यकता नाही. परंतु बालगंधर्वांची तन्मयता मात्र काम करणारा पुरुष असो वा स्त्री दोघांनाही तितकीच आवश्यक आहे नाटकातले बोलणे छापील वाक्ये पाठ केल्यासारखे नसावे- सहज वाटावे. पण ह्या सहजते-सहजतेतदेखील खूप फरक असतो. कुणाची सहजता ? कुत्रंही सहज चालतं आणि वाघही सहज चालतो. पण वाघाच्या चालीत एक सहज डौल असतो. एखाद्या फडतूस माणसाची भूमिका करायची असली तर चालीत तो फडतूसपणा आला पाहिजे. बोलण्यात आला पाहिजे, तेच समजा संभाजीमहाराजांचे बेबंदशाहीतले काम असले तर त्या चालण्यात वाघाचा डौल हवा. पण तो डौल कृत्रिम रीतीने आलेला नसावा. कृत्रिम रीतीने वाजवीपेक्षा छाती फुगवून चालले की ते नाटकी वाटते. पण तो डौल अंगात बाणून आल्यासारखा वाटला तर तो कृत्रिम वाटत नाही. उगीच सहज बोलायच म्हणून सृष्टीची उलथापालथ तर झाली नाही ना हे वाक्य ‘ओ’ रूटची बस गेली नाही ना अशा सहजतेने म्हणून चालणार नाही, औरंगजेबाएवढ्या बलाढ्य सम्राटापुढे न वाकणारा संभाजी आपल्याला उभा करायचा आहे याची दखल त्या नाटकातल्या पहिल्या एंट्रीपासून घ्यावी लागते.

थोडक्यात अभिनयसाधना ही एक नित्य चिंतनाची गोष्ट आहे. जगताना डोळे नीट उघडे ठेवण्याची बाब आहे. हा निदिध्यास हवा. उत्सवापुरते नाटक करणारांच्या बाबतीत मला काहीच म्हणायचे नाही. हा केवळ हौसेचा मामला नाही. नाटकाची हौस म्हणजे उगीच मिरवण्याची हौस नव्हे. पाच-सातशे माणसांच्या अमूल्य वेळेशी हा खेळ आहे] मी तिकिटासाठी त्यांनी खर्च केलेल्या पैशाबाबत बोलतच नाही. तो भाग आहेच. परंतु एखाद्या नाटकात एखाद्या नटाची बेजबाबदारी त्या लोकांचा वेळ नासून जाते. इतर सहकाऱ्यांच्या परिश्रमांचा चुथडा करून जाते.

अभिनयात शब्दांच्या म्हणजे मुख्यतः त्यातल्या अर्थाच्या, वाक्याच्या लयीच्या हुकमतीवर माझा सर्वात अधिक कटाक्ष आहे.

पाठांतर म्हणजे पन्नास टक्के यश आहे. हे पाठांतर जाणीवपूर्वक झाले की ऐंशी टक्के यश । उरलेले वीस टक्के आपण इतर गोष्टींना वाटून देऊ. प्रॉम्प्टिंगवर नाटक मारून नेणारे नट हे नाट्यकलेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. एकतर हे लोक एकजात अप्रामाणिक आहेत. स्वत: खड्ड्यात पडतात आणि दुसऱ्यांनाही खड्यात टाकतात. समोरच्या पात्राकडे ह्यांचं कधीही लक्ष नसतं. डब्यात विदाउट तिकीट शिरलेल्या माणसासारखा चेहरा घेऊन हे स्टेजवर घोळ घालतात. मी अशी नाटकं पाहिली आहेत की जिथे स्टेजवरच्या प्रत्येक खुर्चीच्या किंवा कोचाच्या मागे चोरासारखे प्रॉम्प्टर लपलेले असतात. कव्हरचा पडदा पडला की आला मागे प्रॉम्प्टर ! ही फसवणूक का करायची ? कसेही करून नाटक केलेच पाहिजे हा धोंडा कुणी दिलाय तुमच्या माथी ! असल्या नालायक लोकांनी नाट्यकलेची सेवा करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे नाटकात कधीही काम न करणे !

वाक्य मनात एकदा रुजलं की ते उमटवण्याची क्रिया हा अभिनयाचा प्रेक्षकांना दिसणारा भाग. पण हे वाक्य हा नट समजून म्हणतो आहे की नाही याची कल्पना सामान्य प्रेक्षकालासुध्दा येते. आपण जे काही रंगभूमीवर करीत असतो ते दुहेरी हेतूने करीत असतो. म्हणजे एका पात्रानं दुसऱ्याशी बोलायचं आणि आपण त्याच्याशी काय आणि कसं बोलतो आहोत ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत सर्वांच्या ध्यानात आणून द्यायचं आणि हे आपण किती कलात्मक रीतीने कराल त्यावर आपला अभिनयाचा दर्जा ठरेल | पिटातल्या प्रेक्षकाला ऐकू तर गेलं पाहिजे आणि आरडाओरडा तर करता कामा नये अशी ही तारेवरची कसरत आहे. ती करायला मुख्यतः नट संपूर्णपणे Relaxed मनाने अगदी हलक्या फुलासारखा झाला पाहिजे. शरीरातले स्नायून स्नायू सैल हवेत, त्यांच्यावर कसलाही मानसिक ताण नको. मनाला धास्तीचा स्पर्श झाला की आटोपलाच कारभार. ही धास्ती किंवा ज्याला मंचभय म्हणतात ते पूर्वतयारी उत्तम असली की कोणत्याच कार्यात येत नाही. भीतीने पांढराफटफटीत पडलेला चेहरा हा कितीही मेकप थापला तरी लपत नाही. चेहरा लपला तरी ‘सीदन्ति मम गात्राणि’ झालेले असते पण नाटकाच्या तालमी उत्तम झालेल्या असल्या, भाषणं – हालचाली ह्या निश्चित असल्या प्रॉम्प्टर नावाच्या माणसाच्या हातात आपली सूत्रं नसली की असल्या भिण्याचे कारण नसते. नाटकाच्या तालमींत सूत्रधार लागतो. पण एकदा पडदा वर गेला की सारी सूत्रे त्या-त्या नटाच्या हाती येतात. त्या पाण्यात एकदा उडी टाकली की कमरेचा दोर सुटला. मग संथपणाने, शांतपणाने पोहावं पाण्यात जाणूनबुजून खळबळ माजवायची असली तर तशी माजवावी – काठावरच्या लोकांना आपण बुडालो-बुडालो असं दाखवून घाबरवून सोडावं आणि ते भरपूर भ्याले की हळूच डोकं वर काढून त्यांना मजा दाखवावी हा जसा पट्टीच्या पोहणाराचा खेळ असतो तसला खेळ नटाला करायचा असला तर पाण्यात उडी मारणाऱ्या अवगाहनपटूसारखीच अभिनयपटूची तयारी लागते. तेव्हा ‘निश्चळ मन’ ही अभिनयाला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मांजर जसं स्वस्थ पडलेले असते दिसला उंदीर की सारी शक्ती एकवटून टुणकन उडी मारतं तसंच अभिनय भ्याल्याचा असो वा शौर्याचा असो, एकप्रकारची सावधानता हवी! मला तर नाटकाची तिसरी घंटा वाजली की त्या जोडीला लग्नासारखं ‘सुमुहूर्त सावधान” म्हणावंसं वाटतं. आता ती मंगलघटका आली, ‘नाट्यकला कविकृष्णा घाला घाली’; अस खाडिलकरांनी म्हटलंय. बोहल्यावर नवऱ्यामुलाचे पाय लटलटायला लागतील म्हणून भटजी म्हणतात ‘सावधान’! तसं रंगमंचावरदेखील पाय लटलटू नयेत अशी इच्छा असली तर मनात म्हणावं सावधान ! आता इतक्या लोकांपुढे आपल्याला नाटक करायचं आहे कसं होतं, काय होतं कोण जाणे ही भीती सगळ्यांनाच असते. ह्याचा विचार जुन्या नाट्यकलाविशारदांनी केला होता. म्हणून ‘नांदी’ आली. नांदीगायन सुरू झालं की समोरचे प्रेक्षक प्रेक्षागारात येईपर्यंत झालेला ताप विसरतात, ते स्वर त्यांची मनं निर्मळ करतात. मग नाटककाराने आणि नटांनी मिळून जो रंग त्यांच्या मनात ओतावा तो तिथे निर्माण होतो. प्रेक्षकांप्रमाणे धूप-पूजा-प्रार्थना-नादी इत्यादी गोष्टी भयशमन करणाऱ्या आहेत, आधुनिक वैद्यकाच्या भाषेत सांगायच्या म्हणजे Tranquilisers आहेत. हे बाह्य उपाय झाले. पण नटाचं मनदेखील शांत हवं ! त्याच्यावर ताण नको. असा ताण असल्यावर मन मोकळं नसतं. मन मोकळं नाही म्हणजे हालचाली मोकळ्या नाहीत, आवाज मोकळा नाही. प्रॉम्प्टरच्या मदतीने काम करणाऱ्या सगळ्या नटांच्या चेहऱ्यावर पाहा कसा एक अपराधीपणाचा सूक्ष्म भाव असतो. कोडग्या मंडळीविषयी मी बोलत नाही. त्यांचं काय सांगावं ! असल्या अवलादी रंगभूमीची विटंबना करतात. सर्व क्षेत्रांत त्या क्षेत्राच्या लौकिकाला बट्टा लावणारी मंडळी आहेतच. पण ज्याला कलावंत म्हणून स्वत:चा दर्जा वाढवायचा आहे, कलेच्या क्षेत्रात आपलंही काही दान अर्पण करायच आहे त्यांच्याविषयीच विचार करायचा ! तर हे असं relaxation हे कष्टसाध्य आहे. ते कष्ट प्रयोग लागण्यापूर्वी झाले पाहिजेत. आणि कलावंत म्हणून जगायच असेल तर सतत पाहिजेत.

आता त्या अभिनयाची बोलण्याचा अभिनय, अंगविक्षेपाचा अभिनय अशी काही वर्गीकरणं केली आहेत. मला स्वतःला ती एका मर्यादित अर्थानेच मान्य आहेत. अभिनयाची अशी ठोकळेबाज विल्हेवारी करता येत नाही. इथे ‘अवलोकन’ हे महत्त्वाचे ! भारतीय नृत्यात अभिनय म्हणजे काही ठराविक संकेताने दाखवण्याच्या खुणा नव्हेत. एकेकाळी नाटकात पात्रनिर्मितीदेखील ठराविक संकेतानेच होत होती. व्हिलन म्हटला की त्याने भुवई उंचावून बोलायचं ! असला अभिनय करणं हे दुय्यम बुध्दिमत्तेचं लक्षण आहे. हा अभिनय नव्हे. हा आपला पूर्वी कोणीतरी करून ठेवलेला मुखवटा वापरण्यापैकी आहे. काही विशिष्ट भावनांचे प्रकटीकरण आपण सामान्यतः एका विशिष्ट तऱ्हेनेच करतो. दु:ख झालं की डोळ्यात अश्रू येतात. तिरस्कार वाटला की नकळत चेहऱ्यावरचं आठ्यांचं जाळं वाढतं. पण हा प्रकार ठोकळेबाज झाला. म्हातारा म्हटला की त्यानं खोकतच यायचं नोकर म्हटला की त्यानं कोचावर फडकं मारीतच यायचं, हे एकान कुणीतरी केलं होतं त्याचं दुय्यम दर्जाच्या लोकांनी फारसा विचार न करता केलेलं अनुकरण आहे. चांगला नट आणि चांगला दिग्दर्शक लेखकाची वाक्यं कशी टाकावी याचा स्वतः विचार करील. रंगभूमीवरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. तिथे निरर्थक हालचालीला अर्थ नाही. कुणीसं म्हटलं आहे, तुमच्या सेटवरच्या भिंतीवर जर पहिल्या अंकात बंदूक ठेवलेली असली तर ती शेवटच्या अंकापर्यंत एकदा तरी ठोदिशी गोळी झाडणार असेल तर ठेवा ! याचा अर्थच असा की मंचावरची सजीव आणि निर्जीव वस्तू प्रेक्षकाला काहीतरी सांगून जाऊ द्या । शोभेच्या वस्तूदेखील सार्थ शोभा आणू द्यात ! डॉक्टरचं पात्र गळ्यात स्टेथास्कोप घालून आणतात. आणा. पण मग त्या स्टेथास्कोपने कुणाची छाती त्याला तपासू द्या ! हातात काठी घेऊन आलात तर त्या काठीचा एखादा असा सहज चाळा होऊ द्या की त्या काठीला अर्थ आला पाहिजे. व्यक्तिमत्त्वाचा रुबाब वाढायला काठी असली तर ती काठी अशी बाळगा की लोकांनी ‘वा !’ म्हणावं । काठीच काय, पण अंगातला पोशाखसुध्दा साऱ्या वागण्याशी जमला पाहिजे.

माणसाच्या हालचाली ह्या पोशाखानुरूप चालतात. एखाद्या क्रांतिकारक कटाची तयारी करणारा माणूस खांद्यावर सोगाबिगा सोडून बोलायचा नाही. कटाचं टेन्शन त्याच्या वाक्यांत नव्हे तर त्याच्या पोशाखातून दिसलं पाहिजे. हे सारं सूक्ष्म अवलोकनातून येतं. माणसांचे हे लक्षावधी नमुने जाणिवेनं पाहणं हा अभिनयाचा फार मोठा अभ्यास आहे. आणि माझ्या मते अभिनयाचं हे दर्शन त्या नाटककारालाच व्हावं लागतं ! तरच त्याची वाक्यं सोळा आणे खरी वाटतात. बोलण्याचा एकच कायदा तुम्ही काय बोलता आहात ते कळलं पाहिजे. त्या बोलण्याचा साचा तुमच्या निरनिराळ्या भूमिकांत बदलला पाहिजे. तुमच्या लहानसहान हालचालींतून त्या भूमिकेचे सारे संस्कार तंबोऱ्याच्या तारांतून जव्हार येते तसे आले तर त्या भूमिकेला गोलाई येते. नाटकातलं बोलणं म्हणजे व्हॉइस कल्चरचं प्रदर्शन नव्हे ! आवाजाची देणगी नसलेले केशवराव दाते हे आपल्या अभिनयाच्या सर्वांगीण दर्शनातून नटश्रेष्ठ झाले. नाहीतर ठणकावून शुध्दलेखन घालणारे अनेक शाळामास्तर नट झाले असते.

आपण काय परकायाप्रवेश केला आहे हे उत्तम कळलं की अभिनय निराळा राहत नाही. संभाजीमहाराजांचा संताप आणि संभू गड्याचा संताप व्यक्त करण्याच्या पध्दतीत फरक पडेल. बायकांचं लाजणं हे मूलतः एकाच भावनेतून आलं तरी त्याची अभिव्यक्ती असंख्य पदर घेऊन येते. तरी सगळं नीट पाहण्याचं काम आहे. ते कसं करावं याचे धडे तुम्हाला कोणीही देऊ शकणार नाही. ते आतून यावं लागतं. ते आपल्यात आहे की नाही हे ज्याचं त्यानं सारा अहंकार गुंडाळून ठरवावं. आहे असं वाटलं तर नाटकात काम करावं आणि रसिकांना आपण समाधान देऊ शकलो आहोत की नाही याचा स्वतःच्याच मनाशी पडताळा घ्यावा.

असल्या साधकाच्या भूमिकेतून जर आपण ही साधना करीत राहिलो तर ह्या कलेचा आनंद स्वतःला घेता येईल आणि इतरानाही देता येईल. अभिनय करण्याचा आनंद आधी स्वतःला मिळायला हवा. त्या धुंदीची मजा काय आहे ते कळायला हवं. नक्कल पाठ नसेल समोरची पात्रं बेजबाबदार असतील काय करणार, पोटासाठी करावं लागतं वगैरे सबबी असतील तर हा आनंद मिळणारच नाही. आणि स्वतःला मिळाला नाही तर दुसऱ्याला देता येणार नाही.

नाटकाच्या तालमीच्या पहिल्या दिवसापासून त्याच्या पहिल्या प्रयोगापर्यंत त्या नाटकाचा आपल्याला ध्यास लागणार आहे का? ते नाटक आपल्याला मनापासून आवडलं आहे का ? संचात खरे नाट्यप्रेमी लोक आहेत का ? हे आधी नीट स्वत: ला विचारून घ्या आणि मगच ह्या फंदात पडा ! तो तुमचा पोटापाण्याचा धंदा आहे की नाही, नोकरी संभाळून किंवा स्वैपाकपाणी संभाळून तुम्ही नाटकात आला आहात यासारखे मुद्दे कलेच्या क्षेत्रात अप्रस्तुत आहेत. कलेवर प्रेम करायचं हे अवघड काम आहे. ही प्रेयसी मोठी जीवघेणी आहे. कठोर आहे. तिची आराधना आपल्या जीवनाचं सर्वस्व देऊन करावी लागते. जगात जे श्रेष्ठ कलावंत झाले त्यांना सदैव काय टाळ्याच

मिळाल्या ? नाही. निंदा, जनीं त्रास अपमान उपहास सहन करावे लागले तरी त्यांनी आपला व्यवसाय सोडला नाही. चार्ली चॅप्लिनचा Limelight नावाचा एक बोलपट आहे. रंगभूमीवर आयुष्यभर नाचून प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरूचीमुळे आणि वयोमानामुळे दृष्टीआड झालेल्या नटाची ही कथा आहे. आता त्याला कोणी विचारीत नाही तरी रंगभूमीवर जायची त्याची इच्छा मावळली नाही. त्याच्यावर माया करणारी त्याची एक मैत्रीण त्याला विचारते बाबारे, दुसरा व्यवसाय कर. तिथे तुला नाही विचारीत कोणी तर जातोच कशाला मरायला तिथे चॅप्लिननं तिथं उत्तरादाखल – सुंदर वाक्य लिहिलं आहे. I hate the sight of blood, but it is in my veins ! मला रक्ताची घृणा आहे, पण माझ्या नसानसांत रक्तच आहे त्याला काय करू ? नाट्यकलेची आवड तुमच्या रक्तात आहे की नाही ते तुम्हीच तपासून पाहा आणि आता तुटो हे मस्तक फुटो हे शरीर म्हणून मारा उडी ! उडी मारण्याचे नियम डोळे उघडून आत्मसात केले असतील तर डोकं फुटणार नाही – त्या डोक्यावर लोकप्रियतेचा मुकुट चढेल. कदाचित लोकांना नाही तुमचं उडी मारणं पटलं तर काटेरी मुकुट चढेल. दोन्हीही त्याच आनंदानं चढवायची तयारी हवी ! आळतेकरांचं मोठेपण ह्या तयारीत होतं. त्यांनी मागलापुढला विचार न करता ह्या लहरी प्रेयसीच्या, जीवनाचं दान मागणाऱ्या देवतेच्या चरणी आपलं सर्वस्व वाहिलं म्हणून तर आपल्यासारखे कलाप्रेमी त्यांचं कृतज्ञतेनं स्मरण करतात ! (समाज कृतघ्न नसतो क्वचित अनवधानानं अज्ञानानं त्याला मोठेपण – लवकर उमगत नाही पण उमगलं की तो कृतज्ञतेची दोन फुलं असल्या लोकांच्या चरणी आपण होऊन वाहतो. निष्ठेचा सुगंध उशिरा का होईना, पण दरवळल्याशिवाय राहत नाही. कलावंतांना ज्यांनी मनोमन दाद दिलेली असते अशा लोकांची संख्या फार मोठी असते. त्यांच्या आशीर्वादाच्या धीरावरच तो पुढे जातो. आपण निष्ठेने ही साधना केलीत तर एकवेळ कलेचा संपूर्ण वरदहस्त नाही मिळणार, पण निष्ठावंत माणूस म्हणून कलाप्रिय समाज आपलं ऋण निश्चित मान्य करील. कलावंतानं एवढेही यश रग्गड आहे असं मानलं पाहिजे.

पुन्हा एकदा आळतेकरांच्या स्मृतीला मी अत्यंत विनम्र अभिवादन करतो आणि अभिनयसाधना मंदिराचे मनःपूर्वक आभार मानून माझं भाषण संपवतो.

-पु. ल. देशपांडे
मूळ स्रोत - https://rangabhasha.com/?p=3599

Sunday, September 17, 2023

लोकशाहीत विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत

महाराष्ट्र शासनातर्फे पु.लं.ना 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार देण्यात आला. दिनांक २० फेब्रुवारी १९९८ रोजी ह्या पुरस्काराच्या वितरण समारंभाला पु.ल. उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांचे भाषण सौ. सुनीताबाईंनी वाचून दाखवले.
 
'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरण समारंभाला आलेल्या आणि माझ्याविषयी आपुलकी बाळगणाऱ्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या प्रसंगी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे माझे 'चार शब्द' स्वतः बोलण्याची माझी इच्छा होती, पण प्रकृतीच्या कारणाने माझ्याऐवजी सुनीता ते तुम्हांला वाचून दाखवील.

माझ्या अगणित मराठी बांधवांकडून लाभलेला हा पुरस्कार त्यांच्या मनातल्या माझ्यावरच्या प्रेमाचं एक विराट दर्शन मला घडवतो. इतक्या प्रचंड संख्येनी समाजानी मला आपला माणूस आहे म्हणणं, हा शब्दातीत गौव आहे. हा गौरव लेखन-वाचन-संगीत-नाट्य इत्यादी कलांद्वारे या उदार मनाच्या रसिकांशी माझा जो संवाद साधला गेला त्याकरता आहे, असं मी मानतो. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला माझ्यापाशी शब्द नाहीत.

गोविंदाग्रजांनी या महाराष्ट्राचं वर्णन,

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा


अशा यथार्थ शब्दांत केलं आहे. माझ्या सुदैवाने या महाराष्ट्रानी स्वतःच्या 'नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, ' या वर्णनाला साजेल असं दर्शन मला घडवलं आहे. माझ्या वाट्याला अधिक करून ही जी फुलंच येत गेली, स्वाबद्दल मी कृतज्ञ आहे.

माझ्या आयुष्याचं हे अखेरचं पर्व आहे. अशा वेळी मन काहीस निवृत्त होत जातं. जीवनग्रंथाच्या या अखेरच्या पर्वात अनुभवाला येणारी निवृत्ती ही सत्प्रवृत्तीइतकीच लोभस असते. आमचे कवी बा. भ. बोरकर यांनी आपल्या एका कवितेत म्हटलं आहे :
 
विझवून दीप सारे, मी चाललो निजाया
इथल्या अशाश्वताची, आता मला न माया


इथल्या अशाश्वताची माया बाळगू नये हे खरं, पण इथेही या अशाश्वताच्या आत दडलेल्या शाश्वताची जाणीव असली की जीवन हा आनंदोत्सव होतो. अगणित लोकांनी एकत्र येऊन केलेला माझा हा सन्मान हाही आनंदोत्सवच आहे.

या समारंभाचं आयोजन महाराष्ट्र राज्य शासनानं केलेलं आहे. अलीकडे राज्य-राजकारण-राज्यशासन-राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार-गुंडगिरी- खुनाखुनी-जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. 'बहुजन हिताय ! बहुजन सुखाय!' हे आपल्या देशाचं बोधवचन, पण प्रत्यक्षात मात्र फार विपरीत असं पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतं. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. 'निराशेचा गाव आंदण आम्हांसी' ही संत तुकोबाची ओळ पुनःपुन्हा आठवायला लागते. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याच, बोलण्याचं स्वातंत्र्य ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. आपण सतत लोकशाही, जनमानस, जनतेचा कौल वगैरेबद्दल बोलत असतो. या सगळ्याच्या मुळाशी विचार, उच्चार आणि आचार या गोष्टींचं स्वातंत्र्य या कल्पना आहेत. लोकशाहीच्या राज्यात तर लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलंच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला एखादा विचार सत्ताबळाने दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात.

वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो' वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते.

(अपूर्ण )
पुस्तक - पाचामुखी

हे भाषण पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Saturday, June 4, 2022

इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य सम्मेलनात केलेले अध्यक्षीय भाषण

पुलंनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातला काही भाग, पूर्ण भाषण 'मित्रहो' पुस्तकात वाचता येईल .

साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ह्या सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी मला आपण अध्यक्षाच्या जागी आणून बसवल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. मराठी साहित्याच्या प्रांतात गेली तीस-एक वर्षे मी जी काही 'चावटी” केली,त्याबद्दल अतिशय प्रेमाने मला हा मान दिलात याची मला कृतज्ञ जाणीव आहे. तसा मी भाग्यवान माणूस आहे. लेखक म्हणून माझ्या उत्साहाचा भंग व्हावा असं माझ्याबाबतीत वाचकांनी काही केलेलं नाही. समीक्षकांनीदेखील, लिहितोय बिचारा तर लिहू दे, म्हणून सोडून दिलं आहे. बरं, मी तसा बंडखोर लेखक वगैरे नाही. बंड वगैरे मला जमणाऱ्या गोष्टी नाहीत. महात्मा गांधींच्या चळवळीतदेखील, पोलिसांचा लाठीहल्ला सुरू झाला की, माझं धावण्याच्या शर्यतीतलं कसब पाहून माझं मलाच आश्चर्य वाटायचं! मी त्या कलेचा अभ्यास वाढवला नाही, त्यामुळे भारत एका मराठी मिल्खासिंगला मुकला असं माझं नम्र मत आहे.

मी एक ज्याला मध्यमवर्गीय म्हणतात असा माणूस आहे. तरीही जीवनाच्या वाळवंटातला 'प्रवासी कमनशिबी मी” असं म्हणण्यासारखे क्षण माझ्या वाट्याला फार कमी आले. जे आले ते मी माझ्या लिखाणातून सांगितले आणि वाचकांनी 'ते वाचून आम्ही पोट धरधरून हसलो.' हे आम्हाला ऐकविले! आयुष्यातले काही संकल्प सिद्धीला गेले नाहीत याचं मला दुःख आहे. उदाहरणार्थ, गीतारहस्य, ज्ञानेश्वरी, दास कापितालचे मराठी भाषांतर, आणि भारतीय दंडविधान असले ग्रंथ संपूर्ण वाचायचे संकल्प अजूनही सिद्धीला गेलेले नाहीत! मला काहीही पाहण्याचा कंटाळा नाही. वाचण्याचा तर मुळीच नाही. गप्पा मारण्यात माझ्या आयुष्याचा सर्वांत अधिक काळ गेला आहे. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी हे बोलणं वरं दिसणार नाही, पण मला तसा बराचसा लिहिण्याचाच आळस आहे! अलीकडे तर मी प्रस्तावनालेखक म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहे! माझी लेखक म्हणून भूमिका अगदी साधी आहे. आयुष्यात मला चांगल्या साहित्यातून, जीवनातून जे जे चटका लावून गेलं - ज्या आनंदाचे क्षण मी भोगले, जी सुसंगती किंवा विसंगती जाणवली, ते मी माझ्या स्वभावधर्माला स्मरून सांगितलं! कथा, कादंबरी, कविता ह्या मातबर साहित्यप्रकारांत माझ्या खात्यावर एकाही महान निर्मितीची नोंद नाही. 'नाटक? हा मी विशुद्ध साहित्यप्रकार मानत नाही. मी जी काही नाटकं लिहिली, ती रंगमंचावरून करण्यासाठी लिहिली. नुसतं कथा-कादंबरी-कविता यासारखं एकांतात वाचण्यासाठी नाटक ही कल्पना मला रुचत नाही. नाटकाचं पुस्तक वाचायचा मला कंटाळा आहे. नाटकाच्या यशात नट-नटींचा आणि इतर अनेकांचा वाटा असतो. अपयशाचा स्वामी फक्त नाटककार! यामुळे फार तर चार विनोदी पुस्तके, काही प्रवासवर्णने, काही व्यक्तिचित्रे, एवढीच माझी साहित्यनिर्मिती ! माझ्यापासून कुठला कालखंड सुरू झाला नाही की संपला नाही!

माझ्या आधीच्या अध्यक्षांची नावे वाचून माझी छातीच दडपली. शेवटी मी हे अध्यक्षपद स्वीकारताना मनात मर्ढेकरांचा मंत्र म्हटला की, 'विदूषका वाली हास्यरस!' पूर्वीच्या महान अध्यक्षांनी दिलेले संदेश मी वाचले. सावरकरांनी तर आपल्या तरुण पिढीने आता लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी, साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक -- असा संदेश दिला होता! आता मला हे थोडंसं एखाद्याच्या लग्नाला जाऊन बोहल्यावर त्याला “आधी विमा उतरवा आणि मग मुंडावळ्या बांधा”. हे सांगितल्यासारखं वाटलं हा माझा दोष असेल! कुणी साहित्यातून लोकजागृती घडवायला सांगितलं, तर कुणी राष्ट्रभक्त व्हा असा संदेश दिला. तसा त्यांना अधिकार होता. पण हेदेखील थोडंसं ललित साहित्याकडे एक विशुद्ध आनंद देणारी, जगताना जीवनातील जाणिवा तजेलदार करायला लावणारी कला आहे असे न पाहता, साहित्य म्हणजे कथा-कवितेची शर्करावगुंठित औषधाची गोळी किंवा फावल्या वेळी घालायची 'शीळ' आहे असे मानण्यामुळे झाले आहे असे माझे नम्र मत आहे. हे सारं सांगणं त्या अध्यक्षांना शोभून दिसलं. पण. आपण माझं साहित्य वाचल्यानंतरही मला अध्यक्ष केलंत, ते मोरोपंतांच्या शब्दांत, कधीतरी 'रखिवडिचा स्वाद का न चाखावा' अशाच उद्देशानं असावं! त्यातून विनोदी लेखक हा रेवड्या उडविणारा अशीही एक कल्पना आहे. पण ती बरोबर नाही. तो रेवड्या करणारा असेल. रेवडीत तीळ आणि गूळ असतो. तैलबुद्धी आणि गोडवा यांचा साक्षात्कार जर विनोदातून झाला नाही, तर ते हास्यं पौराणिक नाटकातल्या राक्षस पार्ट्यांसारखे विकट हास्य होईल. असो! तर संस्कृत नाटकातल्या 'धीरोद्धतां नमयतीव गतिर्धरित्रीम॑', अशा ह्या मोठमोठ्या नायकांचा प्रवेश संपल्यावर ह्या मंचावरचा माझा प्रवेश हा 'तत:प्रविशति विदूषक:' यासारखा आहे! हे माझं मलाच वाटायला लागलं आहे.

इचलकरंजीच्या लोकांनी ह्या संमेलनाच्या कार्याचा भार उचलला, त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांचं गाव म्हणूनही ह्या गावाशी मला माझा ऋणानुबंध वाटतो. काशीची गंगा रामेश्वरी न्यावी, तसं बुवांनी ग्वाल्हेरचं हिंदुस्थानी अभिजात संगीत ह्या महाराष्ट्राला आणून देऊन आमच्यावर अनंत उपकार केळे आहेत. आज महाराष्ट्रात अभिजात संगीताविषयी जे एवढं प्रेम आढळतं, त्या संगीताची जी इमारत इथे फळा आली, त्याचा बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांनी रचिला पाया असेच म्हणायला हवे. तेव्हा मी इचलकरंजीला येताना बाळकृष्णबुवांच्या गावाला येतो आहे हीही भावना मनात आहे.

हे पन्नासावं साहित्य संमेलन आहे. पण माझं भाषण हे कृपा करून गेल्या एकोणपन्नास संमेलनांच्या काळातल्या मराठी साहित्याचं समालोचन आहे असं आपण मानू नये. ज्या मराठी ललित साहित्याच्या प्रदेशात मी हिंडलो, जिथे मीही चार रोपटी लावायचा प्रयत्न केला, त्या प्रदेशाचं हे एक प्रवासवर्णन आहे असं आपण फार तर समजा. अगदी लहान वय सोडलं तरी लिहिता वाचता यायला लागल्यापासून गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं, मी ह्या पुस्तकांच्या दुनियेत हिंडतो आहे. साहित्य-संगीत आणि नाटक ह्या तीन गोष्टींनी माझं जीवन कृतार्थ झालं आहे. मी लिहिलेल्या साहित्यामुळे किंवा मी रचलेल्या संगीतामुळे किंवा नाटकामुळे नव्हे, तर मला ह्या तिन्ही कलांतून जो अनुभव मिळाला -- जी जीवनदृष्टी मिळाली - मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण, माझा ह्या कलांशी जडलेला संग! आणि जे मला लाभलं ते इतरांनाही लाभावं ह्या एका हेतूने मी ही निर्मिती करायला लागलो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणतात तसं जे मला तिळ तिळ लाभत गेलं ते मी वाटलं! तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा-आम्रचा जो स्नेह जडला, ती माझी कमाई! आणि ही केवळ माझीच्‌ कमाई नाही, ह्या जगात कलांच्या रूपाने आनंद देणारे आणि आनंद घेणारे जे जे कोणी आहेत, त्या साऱ्यांची खरी कमाई ही एवढीच आहे.

(अपूर्ण)
पु.ल. देशपांडे
(२६-१२-१९७४)

Saturday, August 14, 2021

फिल्म इन्स्टिट्यूट दीक्षांत समारंभातील भाषण 1979 (kartavysadhana.in)

6 ऑगस्ट 2021 रोजी, पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूटमधील टीव्ही स्टुडिओचे नामकरण पु.ल. देशपांडे टीव्ही स्टुडिओ असे होत आहे. भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. हे निमित्त साधून पु.ल. देशपांडे यांनी केलेले एक भाषण येथे प्रसिद्ध करीत आहोत. फिल्म इन्स्टिट्यूटच्या 16 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी 2 नोव्हेंबर 1979 रोजी पुण्यात त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केले होते, त्याचा हा अनुवाद आहे. हे भाषण झाले तेव्हा प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते (ते त्यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होते) सुनीताबाई देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर यांनी हे भाषण मिळवून दिले आणि नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी त्याचा अनुवाद केला आहे. मूळ इंग्रजी भाषण kartavysadhana.in वर उपलब्ध आहे. 33 वर्षांपूर्वीचे ते भाषण प्रथमच इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होत आहे. - संपादक

मित्रहो,

तुमच्या संचालकांनी अतिशय प्रसन्न अशा या कार्यक्रमासाठी मला आमंत्रण देण्यापूर्वी मी आपला निवांतपणे बसून होतो, की चित्रपट उद्योगाशी असलेला माझा पूर्वीचा संबंध लोक खूप अगोदर विसरून गेले असतील. या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून माझी निवड करण्यात त्यांनी योग्य कास्टिंग केली आहे की नाही हे मला माहीत नाही. मी फिल्म उद्योगातून स्वखुशीने बाहेर पडल्याला आता जवळपास पंचवीस वर्षे लोटली आहेत. ज्या वेळी मराठी चित्रपट उद्योगात माझे तसे बरे चालले होते तेव्हा मी तो व्यवसाय सोडला. सर्वसाधारणपणे त्या वेळच्या कॉलेजमधल्या शिक्षकापेक्षा माझी थोडी जास्त कमाई होत होती आणि कोपऱ्यावरच्या माझ्या आवडत्या पानवाल्यापेक्षा किंचित कमी! मी जे काही लिहीत होतो त्याला तेव्हा पटकथा म्हणतात असे मला वाटायचे. मी अभिनय करायचो, संगीत द्यायचो आणि असे करता करता मी एक मराठी चित्रपटही दिग्दर्शित केला. एखाद्या कलावंताला त्या काळी जे जे करावयाला लागायचे ते ते सर्व मी केले. एकदा दिवसातल्या ठरवलेल्या वेळेपेक्षा दोन तास जास्तीचे शूटिंग करायचे होते म्हणून हिरोईनच्या खऱ्याखुऱ्या मातेला दोन तासांसाठी रंजवण्याची कामगिरी विनोदी कलाकार म्हणून मला करायला लागली होती ती एक दुखरी आठवण आहे. माझ्या चित्रपट क्षेत्रातील करिअरकडे मागे वळून पाहताना तिथे राहिलो त्यापेक्षा ती इंडस्ट्री सोडल्याचाच जास्त अभिमान वाटतो. तिथे असण्यापेक्षा नसण्यामुळे या क्षेत्राचा फायदाच झाला, अशा काही मोजक्या धोरणी व्यक्तींपैकी मी आहे असे मी विनयाने म्हणेन. मी काही इथे नम्रतेचे सोंग घेण्याचा प्रयत्न करत नाही. खरं म्हणजे उलटं आहे. फिल्म उद्योगातील एक पूर्वीचा कलाकार आणि अधून मधून चित्रपट पाहणारा सध्याचा प्रेक्षक म्हणून माझे बोलणे कदाचित तुम्हांला एक जुना शाळामास्तर धडा शिकवत असल्यासारखे वाटेल. तुमच्यासाठी या परिसरातील कदाचित हा असा शेवटचाच प्रसंग असेल. माझे विनोदावर किती प्रभुत्व आहे हे दाखवण्यासाठी तर मी मुळीच इथे आलेलो नाही. आपल्या देशातलाच नव्हे तर आधुनिक जगातला एक सर्वोत्तम असा कलावंत इथे माझ्या शेजारी बसला असताना तर नाहीच नाही. उलट मघापासून त्यांच्या शेजारी व्यासपीठावर बसल्यावर मला अगोदरच दडपल्यासारखे झाले आहे. फिल्म इन्स्टिट्यूटच्या सोसायटीचे अध्यक्ष श्री. आर. के. लक्ष्मण यांची निश्चल कार्टून्स माझ्या मते रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या हालचालींपेक्षा जास्त परिणामकारक असतात आणि सत्य आणि सौंदर्य यांचा निकटचा परिचय प्रेक्षकांना घडवतात.

होय, सत्य आणि सौंदर्य. या दोन गोष्टींपासून मी लांब राहावे अशी त्या काळी ज्या चित्रपट निर्मात्यांशी माझा संबंध आला- त्यांची इच्छा होती. माझे स्वत्व बाजूला सारून त्यांच्या भाषेत ज्याला लोकेच्छा किंवा लोकांची मागणी असे समजतात ते त्यांना माझ्याकडून हवे होते. ही लोकेच्छा काय असते ते मला अजूनपर्यंत समजलेले नाही. हे निर्माते डबल रोल खेळत आहेत हे मला लवकरच उमगून आले. लेखक किंवा कलावंत म्हणून माझ्याकडून त्यांची ही अपेक्षा होती की जेणेकरून त्यांचा गल्ला काठोकाठ भरेल. या बॉक्स ऑफिसची उंची अजूनपर्यंत कोणीही मोजू शकले नाही. दुसऱ्या बाजूला त्यांच्या भाषणांत आणि मुलाखतींमध्ये हे लोक खऱ्या कलाकृती बनवू शकत नसल्याबद्दल नक्राश्रू ढाळत होते. कारण पुन्हा तीच घाणेरडी सबब, लोकांची मागणी वेगळी असते. खरे म्हणजे चित्रपट हा त्यांच्यासाठी बाजारपेठेतील एक वेगळा व्यवसाय आहे. पूर्वी वितरक असलेल्या आणि नंतर निर्माता झालेल्या एका स्टुडिओ मालकाबद्दल त्या काळच्या एका खूप वरिष्ठ अभिनेत्याने म्हटले होते, ‘‘या माणसाला जर कळाले की चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा चितेची लाकडे विकण्यात जास्त पैसा आहे तर तो आपला स्टुडिओ जळाऊ लाकडांनी भरून टाकेल आणि आपल्याला लाथ मारून हाकलून लावेल.’’

खूप कठोर शब्द आहेत माझ्या मित्रांनो, पण अजिबात खोटे नाहीत. मी तर एका निर्मात्याला हे बोलताना ऐकले आहे की त्याने एका अभिनेत्रीवर खूप सारे पैसे लावले होते जेणेकरून ती हमखास जिंकेल. जिथे अतिशय वेगळ्या प्रकारची कलात्मक स्वप्ने पाहिली जातात त्या जागी घोड्याच्या शर्यतीचे आणि जुगार अड्‌ड्याचे परवलीचे शब्द रूढ होऊ लागले होते. वाजंत्रीवाल्याला वऱ्हाडी जे सांगेल तेच गाणे वाजवण्याशिवाय पर्याय नसतो हे मला माहीत आहे. अधून मधून एखाद्या रविवारच्या संध्याकाळी टीव्ही पाहताना या जगरहाटीचा जास्तच विपर्यास झाल्याची त्रासदायक भावना माझ्या मनात येत असते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे घडते. कारण आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यामध्येसुद्धा हाच नियम लागू होतो. आण्विक शस्त्रांपासून ते अगदी टूथ पेस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू बनवणाऱ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या क्लृप्त्या वापरून व्यक्ती आणि देशांना केवळ ग्राहक बनवून टाकले आहे हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. तुमची क्रयशक्ती किती आहे यावरून समाजातील तुमचे स्थान ठरवले जाते.

जसे प्रेमामध्ये आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते तसे व्यापारामध्येही असते, ही धारणा आपण सर्वांनी स्वीकारली आहे असे मला वाटते. जगाच्या संहाराला कारणीभूत अशी हिंसक शस्त्रे बनवणाऱ्याला जशी मानवी आयुष्याची काहीही चिंता पडलेली नसते किंवा माणसाच्या जगण्याच्या अधिकाराबद्दल काही देणे घेणे नसते त्याप्रमाणे पैशांच्या थैल्या घेऊन सिनेमाच्या बाजारात उतरलेल्या सट्टेबाजांना मानवी मूल्यांच्या नाशाची अजिबात काळजी नसते. दुसऱ्या व्यवसायाप्रमाणे चित्रपटधंद्यात पण जितका जास्तीतजास्त पैसा मिळेल तितका चांगला. अडाणी आणि भोळसर मनांवर सिनेमा माध्यमाच्या होणाऱ्या परिणामाची त्यांना काही एक पडलेली नसते. सांप्रत काळी मी एखाद्या मित्राच्या घरात जातो तेव्हा मला काय दिसते? त्याचा चार वर्षांचा मुलगा खेळण्यातली बंदूक माझ्यावर रोखतो आणि ओरडतो ‘‘हॅन्ड्‌स अप.’’ हा कोणत्या हिरोची नक्कल करतोय हे माझ्या मित्राची बायको किंवा मुलगी मला विचारते. अर्थातच मी या मुलाखतीत नापास होतो.

आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘विकणे’ हाच एकमेव परवलीचा शब्द आहे असे वाटते. या देशात जोपर्यंत अंधश्रद्धा टिकून आहेत तोपर्यंत त्यावर धंदा चालवायचा. नवीन देव निर्माण करायचे, किंवा जास्त खात्रीसाठी नवीन देवता तयार करायच्या, त्यांना सर्व प्रकारच्या शक्ती बहाल करायच्या, नवनवीन चमत्कार त्यांच्या नावाशी जोडायचे आणि मग सहजपणे भुलून जाणारा (फ्लॅटपासून ते झोपडपट्टीत राहणारा) एक मोठा समुदाय सिनेमा हॉलबाहेर ब्लॅकमध्ये तिकिटे खरेदी करायला तयार होतो. एका फिल्म मॅगझिनमध्ये पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या प्राध्यापकाची मुलाखत वाचून मला धक्काच बसला. एका यशस्वी विनोदी नट आणि निर्मात्याबरोबर केवळ बरोबरी दाखवण्यासाठी त्याने द्विअर्थी गलिच्छ संवाद लिहिले होते. म्हणजे अश्लीलता विकायची, सुंदर अशा लैंगिक भावनेला जितके कुरूप बनवता येईल तितके बनवायचे, हिंसाचार विकायचा, सामान्य जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या काबाडकष्टांना विसरायला लावणारा पलायनवाद विकायचा आणि ही दुःखे मानवनिर्मितच आहेत हेसुद्धा कळायला नको अशी दृश्ये दाखवायची. थोडक्यात, भरपूर पैसा मिळवण्यासाठी जे काही शक्य आहे ते विकायचे. भरपूर रक्त सांडून झाल्यावर आणि बऱ्यापैकी हाणामारी, गोळीबार दाखवल्यानंतर शेवटच्या रिळामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला हिरोच्या पातळीवर चढवायचे. मग त्याच्या खूप पूर्वी हरवलेल्या मातेच्या मांडीवर त्याला प्राण सोडू द्यायचा किंवा काही वेळा बदल हवा म्हणून आईला ह्या हिरोच्या मांडीवर अंतिम श्वास घेऊ द्यायचा, दांभिक तत्त्वज्ञान किंवा काव्यात्म संवाद बोलून मृत्युपंथावर असलेल्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांतला शेवटचा अश्रूही खेचून घ्यायचा आणि मग अशी ही रक्तरंजित हाणामारी पाहण्यासाठी प्रेक्षक पुनःपुन्हा येतील या खात्रीने निश्चिंत व्हायचं. हिरो आणि हिरोईनने एकदुसऱ्यांच्या मागे धावण्याची मुबलक दृश्ये दाखवायची. तीही काश्मीरच्या खोऱ्यातली असली तर जास्त चांगलं आणि जोडीला लता मंगेशकर आणि रफीच्या गाण्याची उठावदार साथ द्यायची. खऱ्या आयुष्यात एवढ्या जोरात पळून गाणी म्हणणारा किंवा गवतात लोळून गाणारी एकही व्यक्ती अजूनपर्यंत मला भेटलेली नाही. एका जागी स्वस्थ बसून हे लोक ही कामं का आटपत नाहीत हे मला खरेच समजत नाही. हा संगीतमय लपंडाव एक प्रकारे कर्मकांड झालेलं आहे. इतकेच नाही तर संवादातही तोचतोचपणा आहे. फिल्मी भजन आणि कॅबेरे नृत्याचीही तीच गत झाली आहे. अगदी शेवटच्या रिळातला पाठलागाचा सीनही जुनापुराना झाला आहे. आणि आपल्या लोकांना याची इतकी आवड निर्माण झाली आहे की, चित्रपटांमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश नसला तर तो खरा ‘शिनेमा’ नव्हे असे आपल्याला वाटते. आपल्या चित्रपट निर्मात्यांसोबत नट, नट्या, पटकथाकार, गीतकार आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या अथक अशा प्रयत्नांमुळे सध्याच्या भारतीय चित्रपटाची जी अवस्था आहे ती अशी आहे... मी हे जे बोलतो आहे ते काही माझा नैतिक निषेध नोंदवण्यासाठी वगैरे नाही. खरं म्हणजे उलटे आहे. ही अनैतिकता कॅबेरे डान्सरच्या अंगप्रत्यंगांच्या प्रदर्शनामध्ये दडलेली नाही, तर मूळ सट्टेबाजीच्या प्रवृत्तीमध्ये आहे. सध्याच्या चित्रपट म्हणवल्या जाणाऱ्या निर्मितीमागचे हे खरे कारण आहे. तुम्ही जाणता त्याप्रमाणे सध्याच्या आपल्या चित्रपटांची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही ज्या वाटेवर चालण्यास तयार आहात त्यापासून घाबरवून तुम्हाला दूर लोटण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. तुम्ही इथे जे काही शिकलेला आहात आणि चॅप्लिन, फेलिनी, डेसिका आणि आपल्या येथील सत्यजित राय, रित्विक घटक, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड, बी.व्ही. कारंथ अशा महान कलाकारांनी बनवलेल्या कलाकृती पाहिल्यानंतर ज्या पद्धतीचे चित्रपट इथे बनवले जातात त्याविषयी तुमच्या मनात संदेह निर्माण झाला असणार. असे असूनसुद्धा विशेष गोष्ट ही आहे की या व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत माझे मित्र हृषिकेश मुखर्जी यांच्यासारखे काही दिग्दर्शक असे आहेत की ज्यांनी पातळी न सोडता चांगले यश कमावले आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी सवंग होण्याची गरज नाही. जुन्या काळच्या प्रभात आणि न्यू थिएटर्सचे चित्रपट खूप लोकप्रिय होते. पण त्यांना कोणी कमी दर्जाचे किंवा अश्लील म्हणणार नाही. या प्रसंगी मला हेही आवर्जून सांगायचे आहे की भूतकाळातील महान चित्रपट कलावंतांबद्दल सतत गहिवर काढणाऱ्यांपैकी मी नाही. त्यांना सादर दंडवत घाला आणि विसरून जा. सध्याचे जग आता त्यांच्यासाठी नाही. आपण भारतीय लोक कायम भूतकाळ उकरत बसतो आणि वर्तमान विसरतो. काही कलाकृती या सार्वकालीन महान आहेत असे आपण नक्कीच म्हणू शकतो. तुम्ही यातील काही अप्रतिम सिनेमे पाहिलेही असतील. कलेमध्ये अशी काही अज्ञात अनुभूती असते जी काळ आणि अवकाश यांच्या सीमारेषा ओलांडून जाते. आपण त्यांना अभिजात कलाकृती म्हणतो. परंतु हेही लक्षात ठेवायला पाहिजे की या अभिजात कलाकृती त्या त्या काळात आधुनिक मानल्या गेल्या. कलेच्या पारंपरिक तत्त्वज्ञानाला चिकटून बसलेल्या लोकांकडून जवळपास सर्वच महान कलावंतांना त्रासच सहन करावा लागला आहे. बहुतेकांसाठी परंपरा म्हणजे फक्त पुनरावृत्ती. (भारतीय संस्कृती, भारत की सुंदरियां, पतिदेव, खानदान की इज्जत इ.) कलावंत म्हणून ज्याला आपले स्वत्व जपायचे आहे आणि आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहायचे आहे त्याला जे लोक नवीन बदलांना तयार नाहीत आणि जुन्या गोष्टींना चिकटून राहायला आवडते अशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. ज्या जगात सौंदर्याऐवजी झगमगाटाला, विनोदाऐवजी चाळ्यांना, भावनेऐवजी अतिभावुकतेला, सांस्कृतिक परंपरेऐवजी कालबाह्य प्रथांना आणि मर्दुमकीऐवजी हाणामारीला जास्त महत्त्व दिले जाते तेथे तुमचे काम सोपे असणार नाही. फिल्म इंडस्ट्री म्हणजे जणू काही स्वर्ग आहे अशी सर्वसामान्य भारतीयाच्या मनात भावना असते. चमकदार आणि आकर्षक अशी मोहमयी दुनिया. झटपट पैसा मिळणारे विश्व. जणू काही पंचतारांकित आयुष्य, अशा चुकीच्या समजुतींचे खुसखुशीत चित्रण गुरु दत्त आणि हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांच्या ‘कागज के फूल’ आणि ‘गुड्डी’ चित्रपटांमध्ये केले आहे. लोकांची मागणी या शब्दासारखाच ग्लॅमर शब्दाचा खरा अर्थ मला अजूनपर्यंत समजलेला नाही. ग्लॅमर शब्दाचा खरा संबंध आपल्या सुपरस्टार नट-नट्यांच्या शारीरिक आकर्षणात किंवा त्यांच्या मोहक अदांशी नाही, तर ते कमवत असलेल्या अकल्पनीय संपत्तीशी जादा आहे असा माझा धूर्त संशय आहे. फिल्म मॅगझिनमध्ये चकचकीत पानांवर छापून येणाऱ्या या तारकांचे विलासी आयुष्य पाहून हे नट जणू काही राजपुत्र-राजकन्याच आहेत अशी प्रतिमा आपल्या देशातल्या गरीब जनतेच्या मनात तयार झाली आहे. हिट झालेले जवळपास सर्व चित्रपट हे नशीबाचे धनी असतात याची तरुण मंडळींना पूर्ण कल्पना असते. अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून नंतर गडगडत खाली कोसळणाऱ्या काही नट आणि नट्यांकडे पाहून आपल्या तरुण मंडळींची अशी समजूत झालेली असते की या देशात यश मिळण्यामध्ये गुणवत्तेपेक्षा शंभर पटींनी जास्त नशिबाचा वाटा असतो. अशा विचारातूनच ग्लॅमरच्या संकल्पनेला जास्त खतपाणी मिळते. तसे म्हटले तर उत्तम अभिनयाशी ग्लॅमरचा काडीचाही संबंध नसतो. हेलन हेस ही जगातील सर्वोत्तम संवेदनशील अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तिच्याजवळ काय ग्लॅमर होते? कलेच्या अन्य प्रांतात असलेल्या कवी, कादंबरीकार, गायक, नर्तक आणि नाटककार यांच्याकडे कसल्याही प्रकारचे ग्लॅमर नसते. हे कलावंत आपल्याला आनंद देत नाहीत काय? ते करमणूक करतात ना? चार्ली चॅप्लिनपेक्षा थोर कलावंत झालाय का? कसदार मनोरंजन आणि कोणत्या प्रकारची लोकप्रियता यालासुद्धा महत्त्व असते.

ज्या चित्रपट कलावंतांना या माध्यमाची क्षमता माहीत आहे त्यांच्यासमोर करमणुकीच्या मूळ कल्पनेमध्येच बदल घडवून आणण्याचे आव्हान आहे. हे आव्हान आहे दिखाऊ सौंदर्याच्या आणि ग्लॅमरच्या तसेच ढोंगी पुरोगामित्वाच्या दुनियेत बदल घडवण्याचे आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या नावाखाली जी काही लबाडी दाखवली जाते त्यापासून सत्य, सौंदर्य आणि आनंदाच्या जगाकडे नेण्याचे. उत्तम विनोदाच्या माध्यमातून उच्चपदस्थांच्या वागणुकीतील अंतर्विरोध दाखवणे किंवा अश्रूंचा भरमार नसलेल्या शोकांतिकेमधून लोकांना जीवनातील वास्तवतेची जाणीव करून देण्याचे हे आव्हान आहे. विनोदाला शहाणपणाची जोड हवी आणि प्रेमाचे प्रकटीकरण अदबीने व्हायला हवे.

तुम्हाला खरोखर तुमच्यातल्या कलावंताशी निष्ठा राखायची असेल तर प्रसिद्धी, मान्यता, ऑस्कर इ.ची चिंता करणे सोडून द्या. अगत्यशीलतेसारखी प्रसिद्धीसुद्धा तुम्हाला नको असते तेव्हा तुमच्या मागोमाग येते. पॅरिसमधील लेखक आणि नाटककारांच्या सोसायटीचे अध्यक्ष श्री.रॉजर फर्डिनांड यांनी चार्ली चॅप्लिनला लिहिलेल्या पत्रातील एक उतारा इथे दिल्याशिवाय मला राहवत नाही. फ्रान्स सरकारने चार्ली चॅप्लिन यांना ‘ऑफिसर ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित केले होते तेव्हाचे हे पत्र आहे. चॅप्लिनच्या लोकप्रियतेबद्दल फर्डिनांड लिहितात की, ‘खरं म्हणजे लोकप्रियता ही बळकावली जाऊ शकत नाही. जर ही प्रसिद्धी चांगल्या कार्यासाठी वापरली गेली तरच तिला काही अर्थ, किंमत असते आणि ती टिकून राहते. तुमच्या स्वतःच्या दुःखातून, आनंदातून, आशा आणि निराशेतून स्फुरलेली मानवाबद्दल जी तुमची कळवळ आहे त्याला कोणत्याही बंधनांची आडकाठी नाही. तुमचे यश हा त्याचा आविष्कार आहे. ज्यांनी अपरिमित दुःख सोसले आहे, ज्यांना करुणा हवी आहे आणि आपल्या हालअपेष्टांना क्षणभर विसरून जाऊन आधाराची आकांक्षा आहे अशा लोकांना तुमचे हास्य हे दुःख मिटवण्यासाठी नाही, तर सांत्वनासाठी आहे याची जाणीव आहे.

शेवटी तुमचे खरे प्रेम कशावर आहे त्यावर हे सर्व अवलंबून आहे असे मला वाटते. इथल्या लोकांवर तुमचा लोभ असेल, त्यांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यात थोडीफार आशेची किरणे तुम्ही दिलीत, जसे आत्ताचे राजकारणी करतात तशा मर्कटचेष्टा करून लोकांना मूर्ख बनवून पैसा मिळवण्यात तुम्हांला लाज वाटत असेल तर लोकांच्या आंधळ्या श्रद्धा, त्यांचे अज्ञान, त्यांचा प्रारब्धवादी दृष्टिकोन आणि त्यांची मानसिक आणि शारीरिक उपासमार यांच्या जिवावर पैसा कमावण्याचा मार्ग तुम्ही सोडून द्याल. रुपेरी पडद्यावर जे काही दाखवले जाते ते कालातीत सत्य आहे असा विश्वास ठेवण्यास भाग पाडून आपल्या भोळ्या अशिक्षित जनतेची फसवणूक केली जाते. आपण जे काही करतो आहोत ते त्यांच्या भल्यासाठीच आहे असे भासवून कित्येक राजकारणी जनतेला भुलवत आहेत. मग प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी दाढी भादरून काढायची किंवा जयप्रकाश नारायण यांसारख्या विद्वत्तापूर्ण थोर माणसाला आधी तुरुंगात टाकायचे आणि नंतर त्यांच्या चितेवर चंदनाची लाकडे ठेवायची. आपल्या धूर्त फिल्मवाल्यांनी काही अज्ञात देवतांना उजेडात आणून त्यांना नवीन जन्म दिला आहे. अशा देवीदेवतांना मिळालेल्या ग्लॅमरचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची मंदिरे उभारून झटपट पैसे मिळवण्यासाठी केला आहे.

अशा वेळी, जर खरोखर सरकारला सध्याच्या भारतीय चित्रपट उद्योगामध्ये सुधारणा करायची असेल तर चांगल्या सर्जनशील कलावंतांना ज्या सुविधांची गरज आहे त्या पुरवल्या पाहिजेत. सेन्सॉर बोर्डाचे नियम अधिक कडक करावेत असे मी इथे म्हणत नाही. इंडियन पीनल कोड आल्यामुळे गुन्हे घडायचे काही थांबले नाहीत. जी मूळ मनोवृत्ती आहे ती बदलायला हवी. लोकांच्या मनातली सिनेमाबद्दलची जी गैरधारणा आहे ती कौशल्यपूर्वक प्रयत्न करून बदलवायला हवी. अस्सल नाण्यांची किंमत लोकांना तेव्हाच कळेल जेव्हा खोटी नाणी बाद ठरतील. जे उत्कृष्ट चित्रपट आहेत ते महान साहित्यिकांच्या कथेवर आधारित आहेत हे तुम्हांला उमगलेच असेल. न्यू थिएटर्सच्या यशामध्ये शरदबाबूंचा (शरत्‌चंद्र चॅटर्जी ) मोठा वाटा होता हे विसरून चालणार नाही. सत्यजित रायपासून ते बी. व्ही. कारंथपर्यंत आधुनिक दिग्दर्शकांचे बहुतेक सर्व चित्रपट प्रख्यात लेखकांनी लिहिलेल्या दर्जेदार कथा आणि कादंबरींवर आधारित होते. सर्वच्या सर्व साहित्यकृतींवर काही चित्रपट बनू शकत नाही. परंतु जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये उत्तम दर्जाच्या कथा लिहिल्या गेल्या आहेत, ज्यावर चित्रपट बनू शकतात. मराठी भाषेतल्याच अशा शंभरांहून अधिक कथा मी सांगू शकतो. आपल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांचे आतापर्यंत अपरिचित अशा आशा आणि आकांक्षा, सुख आणि दुःख कलात्मकरीत्या मांडणारे नवीन लेखक भारतीय भाषांमध्ये पुढे आले आहेत. अशा कथांवर 16 मिली मीटरवर 60 ते 90 मिनिटांचे भाग बनवण्यासाठी तरुण कलाकार आणि दिग्दर्शकांना का बरे उत्तेजन देऊ नये? केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्याबरोबरच जागोजागी छोटी थिएटर्स बांधावीत. जेणेकरून हे चित्रपट तेथे दाखवले जातील. असे चित्रपट दूरदर्शनवरही दाखवण्यास भरपूर वाव आहे. करमणूक आणि प्रबोधन अशा दोन्ही दृष्टींनी या माध्यमाचे महत्त्व लोकांना कळू द्या. आपल्या संस्कृतीमधल्या अनेक मोहक लोककथा पडद्यावर आल्या पाहिजेत. बुद्धी आणि चातुर्याचा मोठा खजिना तेथे आहे. आपल्या बहुतांश चित्रपट कथांसारख्या त्या कृत्रिम नाहीत, तर इथल्या मातीतल्या या सजीव गोष्टी आहेत.

या आकर्षक कथांना रंग, रूप आणि आकार द्या. जेणेकरून जीवनातील खऱ्या सुखदुःखांची अनेकानेक अंगांनी प्रेक्षकांना अनुभूती मिळेल. सरळ आणि सोप्या प्रकारे त्यांना सादर करा. कला आणि प्रयोगाच्या नावाखाली संदिग्ध आणि अस्पष्ट राहू नका. तुमच्या चित्रपटांतून घटना आणि भावना सोप्या आणि थेट प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडा. मला कन्नड भाषेतला एकसुद्धा शब्द समजत नाही. पण तरीसुद्धा गिरीश कार्नाड यांच्या ‘काडू’ किंवा शिवराम कारंथ यांच्या ‘चोमाना दोडी’ या चित्रपटांतील दर्शवलेल्या खोलवर दुःखाने मी हलून गेलो. सिम्फनी ऑर्केस्ट्रामधल्या प्रत्येक वादकासारखे जेव्हा लेखक, दिग्दर्शक, छायालेखक, अभिनेता आणि अभिनेत्री एका लयीमध्ये काम करतात तेव्हाच एक चांगला चित्रपट बनतो. म्हणूनच भावी चित्रपट कलावंताना प्रशिक्षण आणि फिल्म बनवण्याच्या विविध अंगांचा परिचय करून देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की काळ बदलला आहे. काळ आपणहून बदलत नसतो. कलावंत, तत्त्ववेत्ता, शास्त्रज्ञ, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, जुन्या जमान्यातले राजे आणि सध्याच्या काळातील राजकारणी स्वतंत्र आणि सामूहिकरीत्या लोकांच्या आयुष्यात हा बदल घडवत असतात. बदलत्या काळाची जाणीव कलावंताला असावी लागते आणि त्या बदलावर कायम सावध दृष्टी रोखून आपल्या कलेमध्ये त्याचा योग्य तो आविष्कार करायचा असतो. प्रशिक्षणाचा हा कालावधी कधी संपत नसतो. हे खरे आहे की कलावंत जन्मजात असतात आणि घडवले जाऊ शकत नाहीत. परंतु केवळ जन्मजात कौशल्ये ही पुरेशी नसतात. ज्यांनी आपल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे अशा सर्व जन्मजात कलावंतांनी रियाजाचा रिवाज कायम ठेवला आहे. एखादी कला आवडते याचा अर्थ असा नाही की तुम्हांला निर्मितीचे वरदान मिळाले आहे. ती एक हेतुपुरस्सर प्रक्रिया असते. जे कौशल्य आहे त्यामध्ये प्रावीण्य मिळवावे लागते. बाल कलाकार म्हणून लवकर प्रसिद्धी मिळाल्यामुळे पुढे जाऊन बहुतेकदा अपयश मिळालेले दिसते. कारण पुरेशी तालीमच मिळालेली नसते. कलाक्षेत्रातील आपण सर्व जण नार्सिसिस कॉम्प्लेक्सने बाधित असतो. अशा वेळी ज्यांचा तुम्ही आदर करता, असे कान उपटणारे लोक जवळ पाहिजेत. जे तुम्हांला तुमची योग्य जागा दाखवून देतील. चांगले समीक्षक हे काम करू शकतील. पण हीसुद्धा एक दुर्मीळ जमात आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर इथल्या शिक्षकांनासुद्धा वेळोवेळी रिफ्रेशर कोर्सची गरज आहे. आपल्या शिकवणुकीच्या पद्धतींचा कायम आढावा घेतला पाहिजे.

या संस्थेची एक विशेष जबाबदारी आहे. समाजात चांगला बदल घडवण्याची जबरदस्त शक्ती असलेल्या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना इथे दिले जाते. ही संस्था चालवण्यासाठी सरकारने बऱ्यापैकी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि पुढील विकासासाठी अजूनही जास्त देण्याची गरज आहे. इथल्या शिक्षकांना पुरेसे स्वातंत्र्य आणि सुविधा दिल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचे शिष्य पूर्ण आत्मविश्वासासहित बाहेरच्या जगास तोंड देण्यास सज्ज असतील. इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा दूरदर्शनने पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. मला खात्री आहे की अशा संधी मिळाल्यानंतर आपले तरुण दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, लेखक आणि तंत्रज्ञ सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीच्या नावाखाली चाललेल्या सट्टाबाजाराचा खोटा चकचकीत मुखवटा भिरकावून टाकतील आणि आपल्या नैसर्गिक कलात्मक चित्रपटांतून या उद्योगास गौरवाप्रत नेतील.

मित्रहो, मला माहीत आहे की ही संस्था सोडताना तुमच्या मनांत संमिश्र भावना असतील. जीवनातील विरहाचे सर्व क्षण दुःखाचे असतात. तुम्ही जी शिदोरी सोबत घेऊन चालला आहात ती भारताचे भावी चित्रपट कलावंत म्हणून तुमच्या करिअरमध्ये नक्कीच उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे. माझी तुम्हांला विनंती आहे की आपल्या हृदयामध्ये तुमच्या प्रेक्षकांविषयी नितांत प्रेम आणि आदर बाळगून तुमच्या कलाकृतीतून त्यांना एक समृद्ध अनुभव देण्याची लालसा ठेवा. तुमच्या कामातून प्रेक्षकांशी सरळ भिडा. मला खात्री आहे की तुम्ही त्यांची मने नक्की जिंकाल, जे बाकी कोणत्याही गोष्टींपेक्षा मोलाचे आहे. तुमच्या या नवीन रोमांचक प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा!

या कार्यक्रमासाठी मला तुमच्या संचालकांनी खूप आपुलकीने आमंत्रण दिले. मी तुम्हांला ‘शुभास्ते पंथानः’ एवढेच म्हणू शकतो. एका अप्रतिम चित्रपट संग्रहालयाचे घनिष्ट सान्निध्य तुम्हांला लाभले आहे. चित्रपट व्यवसायात पूर्वी कधी असलेल्या आणि माझ्यासारखी ज्यांची काही किंमत राहिलेली नाही अशा लोकांची यादी श्री. नायर यांनी ठेवली आहे हे मला माहीत नव्हते. या संस्थेचे अध्यक्ष आणि कर्मचारी यांना आणि आपणां सर्वांना माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी धन्यवाद देतो.

अनुवाद : प्रकाश मगदूम, पुणे
prakashmagdum@gmail.com
(अनुवादक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक आहेत.)


मूळ स्रोत --> https://www.weeklysadhana.in/view_article/ftii-convocation-speech-by-p-l-deshpande-marathi

मूळ इंग्रजी भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पु.ल.प्रेम: An unpublished speech of P. L. Deshpande (cooldeepak.blogspot.com)

Wednesday, August 4, 2021

वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार! - पु.ल.

आणीबाणीच्या वेळची ‘पुलं’ची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी आठवण सांगत आहेत रत्नागिरीचे ऍड. धनंजय भावे
...............
सन १९७७. आणीबाणी समाप्तीची घोषणा झाली. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आणि ऐतिहासिक ‘जनता’ पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशभर प्रचाराची धूम उठली होती. मोहन धारियांसारखे तरुण तुर्क इंदिराजींना सोडून जनता पक्षाच्या प्रचारात उतरले होते. विशिष्ट ध्येयवाद मानणारे पु. ल. देशपांडे यात मागे कसे राहतील? महाराष्ट्राचा एवढा मोठा लाडका साहित्यिकही आणीबाणीच्या विरोधात उभा राहून प्रचारात उतरला होता.

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून बापूसाहेब परुळेकर जनता पक्षाचे उमेदवार होते आणि ‘अहो भाग्यम्!’ ‘पुलं’ची एक प्रचारसभा चक्क रत्नागिरीला मिळाली होती! कदाचित जावई म्हणून हा मान आम्हा रत्नागिरीकरांना मिळाला असावा. सभा संध्याकाळी पाच वाजता होती. सभेच्या आणि प्रचाराच्या व्यवस्थेमधील भाग म्हणून मी आणि अॅड. बाबासाहेब परुळेकर ‘पुलं’च्या सासुरवाडीला म्हणजे स्व. ठाकूर वकिलांच्या बंगल्यावर भेटायला गेलो होतो. मनात एक वेगळीच भावना होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटणार, त्यांच्याशी बोलायचे तरी कसे! पण ठाकूर वकील वडिलांच्या परिचयाचे म्हणून ‘पुलं’शी संभाषण कधी सुरू झाले ते कळलेच नाही. त्यात मी रत्नागिरीच्या मधल्या आळीतला. मग काय विचारूच नका; पण आणीबाणीविषयी आणि त्या अनुषंगाने दुर्गाबाई भागवतांचे त्या काळातील गाजलेले साहित्य संमेलन अशा अनेक गोष्टी ‘पुलं’कडून ऐकायचे भाग्य लाभले. मधूनच माजी सरकार कसे होते, याविषयी ‘पुलं’चे त्यांच्या खास शैलीतून उद्गार - ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार!’ (संध्याकाळच्या सभेची टॅगलाइन बहुधा तीच असावी, असे त्या वेळी वाटले.)

राजकारणात न रमलेले ‘पुलं’... पण आंदोलन करताना कशाचे भान ठेवावे याबाबतीत त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला भावली. ते म्हणाले, आणीबाणी आता केव्हा आणि कशी संपणार, या निराशेच्या गर्तेत असलेले काही विद्यार्थी प्रतिनिधी त्यांना भेटायला आले होते. सत्याग्रह करून झाला, आणखी किती सत्याग्रहांमध्ये अटक करून घ्यायची, अशी त्यांची निराशाजनक तक्रार होती. ‘पुलं’नी त्यांना मोलाचा सल्ला देताना महात्मा गांधींचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले, की गांधीजींच्या सत्याग्रहांचा अभ्यास करा. त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यामध्ये काही काळ लढा स्थगित केला होता. त्यांचे म्हणणे असे होते, की विरोधकांना तुमच्या ‘काही हालचाल न करण्याची’सुद्धा भीती वाटत राहिली पाहिजे. तुमच्या पुढील योजना काय चालल्यात, याच्या शोधात विरोधक राहिले तर तो एक प्रकारच दबावच असतो. संभाषणाच्या ओघात महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातील यशाचे यापूर्वी न उलगडलेले एक मोठे सूत्र ऐकायला मिळाले आणि तेही ‘पुलं’सारख्या एका अ-राजकीय थोर साहित्यिकाकडून, हे भाग्यच म्हणायचे.

गोगटे कॉलेजच्या मैदानावर मंडणगड ते रत्नागिरी आणि जवळच्या लांजा, राजापूर विभागातून आलेल्या सुमारे २५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘पुलं’ स्टेडियमवर उभे राहिले आणि त्यांनी सभा पहिल्या १० मिनिटांतच जिंकली. ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार!’ हीच टॅगलाइन ठरली! त्यापूर्वी अशी सभा मी तरी पाहिलीच नव्हती. ‘पुलं’ची जन्मशताब्दी सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने ‘पुलं’ची समाजाप्रति सजगता दाखविणारी ही एक आगळीवेगळी ओळख!

संपर्क : ऍडव्होकेट. धनंजय जगन्नाथ भावे – ९४२२० ५२३३०


Monday, June 28, 2021

नव वर्ष कुणाचं - पु. ल. देशपांडे

हा लेख मराठीत टंकून आपल्या ब्लॉगसाठी पाठविल्याबद्दल श्री सतीश बेलवलकर ह्यांचे मनापासून अनेक धन्यवाद.

हेम्लेटला प्रश्न पडला होता जगावं की मरावं? मला वाटत, खरा प्रश्न जगावं की मरावं नसून जीवन नावाचा पदार्थ शिळा न घेऊ देता त्यालता ताजेपणा टिकवून कसा जगावे हा आहे. प्रश्न आहे तो जगण्यातला उत्साह टिकवण्याचा. तसा आमच्या चाळीतल्या गुत्तींकर काकांनाही आहे. पण तो दुसऱ्याचा उत्साह नाहीसा करावयाचा. गुत्तीकर म्हणजे चालते बोलते विरजण आहे पण हा उत्साह नाशकांचा वंशज जुना असावा. माझा अंदाज आहे की कवी मोरोपंतांना बारामतीत असेच कुणीतरी गुत्तीकर भेटले असतील. पंतानी सहज त्यांना नवीन घर बांधायचा विचारात आहे. सांगितले असेल लगेच विरजनपटु ।। कशाला घर नी बिरं बांधताय पंत।। उगीचचं घुशींची धन असं म्हणून मोरोपंताचा मोरु केला असेल पंत भराभरा घरी आले असतील आणि दौतीत लेखणी बुडवून त्यांनी “का न सदन बांधावे" की पुढे त्यात बिळे करतील घुसं?" हा सवाल कागदावर उतरुन आर्येल बंदिस्त करुन टाकला असेल.
गुत्तीकरांन सारखे हे उत्साह नाशक उपदेशक गुरु खड्या सारखे वगळावे. त्यासाठी गुरुला प्रसन्न करणाऱ्या खड्याऐवजी गुरुची पीज टाळणारा खडा मिळाल्यास पहावा सतत इतरांच्या उत्साहावर विरजण टाकणाऱ्या अशा मंडळींना टाळणे हे डासांना टाळण्याहून अवघड. पण असल्या अनिष्ट गुरुला आडवे करणारे गुरु महाराज अचानक मला आमच्या चाळीतच भेटले. समोरचे एम. एस. कुलकर्णी, कुठल्याही चाळीत आढळतात तसे चार कुळकर्णा यातील हे कुळकर्णी असे मी मानीत होतो. गादीवाले गोरे आणि मंडळीत गोऱ्याचे हिशोब ठेवण्याची कारकुनी करतात गोऱ्यांच्या इंग्रजीतल्या प्रभुत्वामुळे एम.एम. हा त्याच्या नावातल्या अद्य अक्षरांचा यं. यं. झाला आहे. चाळीतील सगळी माणस त्यांना यं यं. च म्हणतात. मुलंही यं. यं. काकाच म्हणतात ते स्वतः टेलीफोन वरुन पण यं. यं. असाच उल्लेख करतात सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही पहा चेहऱ्यावर “महाराष्ट्र राज्य लॉटरीचा कलका फल आजच" मिळाल्याचा आनन्द ओसंडत असतो. एकदा असेच खुशीत दिसले. मी काहीतरी बोलायच म्हणून म्हटलं "काय यं यं खुशीत दिसतात?" ।

- वेट म्हणत त्यांनी एखाद्या सराफाने मखमली पेटीतला दागिणा उचलून धरावा अशा ऐटीत पिशवीतून तट्ट भरलेली मटारची शेंग काढली आणि म्हणाले “लुक ऍट हर - व्हाट ऐं शेंग/कशी आहे?" शेंगेला मराठी प्रमाणे इंग्रजीतही स्त्रीलिंगी करुन यं यं नी मला खुशीचे कारण दाखवले जग जिंकायला निघालयाचा उत्साहात यं यं बाजारात भाजी आणायला जातात. बसच्या क्यमुध्ये देखील सदैव सैनिकापुढे पुढेच जायचे म्हणायला उभे राहिल्याच्या ऐटीत उभे असतात. हे कुटूंब सगळे सण उत्साहात साजरे करतात आमच्या चाळीतच कशाला ऐकूण सगळीकडेच सण साजरे करणे हे आता मागसले पणा लक्षण मानल जायला लागलंय पण कुळकर्णीच्या खिडकीत पाडव्याला न चुकता गुडी उभी राहते - दिवाळीला आकाश कंदील लटकतोच पण नाताळात देखील ताऱ्यांच्या आकाराचा आकाश कंदील "हॅपी न्यु ईअर" करत झळकत असतो रमजान ईदच्या दिवशी पण कुळकर्णीबाई खीर

आणि (भोपळ्याचा) कोर्मा करीत असतील. गणपती बाप्पातर हवेतच. यं यं अति उत्साहाने ती मूर्ति लाल पाटावरुन आणताता. एखाद दोन बाळ कुलकर्णी पुढे झांजा ही वाजवत असतात. वाढत्या किंमतीमुळे मुर्ती आकाराने आखडत गेली. तरी उत्साहाला

आहोटी नाहीच यंयंची कौटुंबिक बांधिलकी भलती भक्कम आहे.

आपल्या गणपती मागून प्रचंड जन समुदाय येतोच अश्या थाटात मुर्ति आणतात आणि मनात आणील तर आपला गणपती मंडईच्या महाकाय गणपतीला सोंडेवर घेईल अश्या ऐटीत लकडीपुलाचा घनदाट गर्दीतून स्वतःच्या आणि आळीतल्या इतर शिशुप्रजेसह वाट काढीत विसर्जनाला नेतात यांच्याशी बोलतांना आजवर मी कुठलीही वस्तू महाग झाल्याची तक्रार ऐकली नाही. सगळ्या हौशी मासिक बजेटात कसे बसवतात देव जाणे, गादीवाले गोरे आणि मंडळीत त्यांना अवांतर प्राप्ती आहे असेही नाही. फारतर अंथरुण पाहू. पाय पसरण्याचा धडा त्यांना त्या गाद्यानी दिला असावा. आजूबाजूची दुकाने सनमायका, ट्युबलाईट, आरसे, पंखे वगैरे अलंकरांनी सजीली तरी गादीवाल्या गोऱ्यांचे दुकान आद्य संस्थापक दे. भ नारोपंत गोरे त्यांनी त्रेतायुगात. जेव्हा केव्हा थाटले होते तसेच त्यांचा मागून गादीवर आलेल्या त्यांच्या वारसांनी ठेवले आहे. त्या लखलखत्या आधुनिक बाजार पेठेत, तुरुंगाच्या गजाआड पालथी मांडी घालून चरख्यावर सूत काढणाराचा महात्मा मोहनदास करमचंद गांधींचा शिळाप्रेसवर छापलेल्या रंगीत फोटो असलेले हे एकमेव कळाणहीन दुकान - शेजारच्या दुकानात डिम्पल, टीना मुनीम, शैरान अशी बुचकळ्यात टाकणारी नावे धारण करण्याऱ्या (आणि त्या खेरिज इतर फारसे काही धारण न करणाऱ्या) सौदर्यवतींची रंगबिरंगी चित्र लटकली आहेत आणि गादीवाल्या दुकानांच्या भिंतीवर मात्र ते एक मो. क. गांधी आणि बाकी फक्त पोपडे आहेत. असल्या वातावरणात राहून ही यं यं चा उत्साह गादीतून कापूस उसवावा तसा उसवत असतो. त्या उत्साहाला विरजण लावणे गुत्तीकरालाही जमले नाही. गेल्या गणेश चतुर्थीची गोष्ट यं यं गणपतीची मूर्ती आणतांना मांजर आडवे यावे तसे गुत्तीकर आडवे आले मी वरच्या बालकनीत आलों खाली पाहातो तर यं यं आणि गुत्तीकर ह्यांचे जोरदार सवाल जबाब चाललेले सवयीप्रमाणे गुत्तीकरांनी आपल्या उत्साह नाशक शब्दाचे विरजण यं यं वर फेकले असणार पण यं यं आपल्या वाणीने प्रती पक्षाला कापूस पींजल्यासारखा पिंजू शकतो हे मला त्या दिवशी कळले.

तेथे गुत्तीकरांना फैलावर घ्यायच्या थाटात म्हणत होता “ गणपती कशाला आणायचा हा काय प्रश्न आहे" कमाल आहे गणपती नाही आणायचा तर आरत्या कुणापुढे म्हणायच्या?

“कशाला म्हणायला हव्या आहे आरत्या" गुत्तीकर बोलले “मग रचणाऱ्यांनी त्या रचल्या कशाला गादीखाली ठेवायला (मला वाटल गादीखालीच म्हणाले) ।

“अहो पण आरत्या ओरडून आणि झांजा बडवून आळीत गलका माजवण्यात काय अर्थ आहे" भलें आरतीला गलका म्हणतात. मनुष्य आहे तिथे आरडा ओरड आहेच. चोवीस तास शांतता तर घर काय आणि स्मशान काय सेम टू सेम

“पण मि कुळकर्णी हा सगळा पैशाचा अपव्यय आहे गुत्तीकर" गणपती आणणे पाडव्याची गुढी उभारणे, दिवाळीला पणत्या लावणे दसऱ्याला आपट्याची पाने आणणे हा जर पैश्याचा

अपव्यय असेल तर चांगला व्यय कुठला? डॉक्टरांची बिल भरण्याकरता पैसा साठवणे हा?

“नाही-नाही मूर्त्या विकत घेण्यात पैशे साठवा. त्या दीड दिवसानंतर पाण्यात बुडवा. पुढल्या वर्षी नवी मूर्ती नवा खर्च. पुन्हा पैशे पाण्यात. मला वाटले इथे यं यं तडकणार, पण अगदी अलट तो म्हणाला “आय ऐम सॉरी फॉर यू" ह्या इंग्लीश वाक्याचा अजून परिणाम व्हावा म्हणून यं यं नी त्याला अनुष्टुभाची चाल लावली असावी.

“गुत्तीकर साहेब पैसा ही वस्तू पाण्यात कधी जात नाही फक्त खिसेपालट होतो. आपल्या हातातली साधी दोन रूपयाची नोट आपल्या खिशात येण्याआधी किती खिशातून हिंडून आली असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अहो, लक्ष चौऱ्यांशी फेरा माणसा सारखा नाण्याला सुद्धा असतो. मनात आश्चर्य युक्त आदर किंवा आदरयुक्त आश्चर्य यातलं काहीतरी दाटायला लागल होतं. हे म्हणजे आपल्या दारी पहाटे रोजच वर्तमान पत्र टाकणाऱ्या इसमाने "आजचा

अग्रलेख मी लिहिलाय जरा वाचून तूमचे मत सांगा - म्हटले तर आपले जो होईल तस माझं झालं होतं.

अहो पैशाचा कसला हिशोब करता? नुसती गणपतीची मूर्ति आणायला आपला बाप निघालाय म्हणतांना पोरांचे चेहरे किती फुलतात, ते कधी पाहलय तूम्ही? हातात नवा आकाश कंदील घेतलेले पोर आनंदानी कसे उजळून येतं पाहिलय तूम्ही? एवढच कशाला यतेचे नवीन पुस्तक, नवी छत्री पोरांना मिळाल्यावर ते पोरं कश्या उड्या मारतात ते तुम्ही पाहिलय. नव्या पस्तकाचा वास तूम्ही घेतलाय का? अहो नवे ह्या शब्दातच जादू आहे. आमच्या दुकानात जूनी गादी फाडून त्यातला कापूस पिंजून आम्ही नवी गादी बनवून गि-हाईकाला देतो त्यावेळेला नव्या गादीचा नवा गब्दुलपणा आम्हाला गि-हाईकांच्या चेहऱ्यावर दिसतो.

प्राण प्रतिष्ठा, आरत्या, देवे वगैरेह षोडशोपचार होण्या आधीच हातातल्या विधादात्या गणपतीची एवढी पॉवर यं यं मधे शिरलेली पाहून मी थक्कच झालो. त्यांचे बोलणे काही तर्काला धरून होते असे नाही. पण त्या मागच्या तळमळी मुळे तर्क वगैरे दुय्यम होते. शेवटी समारोपाच्या सुरात यंयं म्हणाले “ ते जाऊ दे गुत्तीकर संध्याकाळी आरतीला या? यंदा उकडीचा मोदकाचा प्रसाद सर्वांना वाटणार आहे, आम्ही. कशाला म्हणून नाही विचारलत? गुत्तीकरांच्या डोक्यात इतके सारे उकडीचे मोदक किती पैशे निष्कारण वाया गेले. पहिल्यांदा आले असणार.

मग यंयं म्हणाला आमच्या लग्नाला यंदा १५ वर्षे पूर्ण झाली कशी गेली कळली नाही. अहो काल बोहोल्यावरून उतरंल्यासारखो वाटतय. इथं पोर खांद्यापर्यत उंच झाली तरी.

इथे मात्र कालच्या सारखा आज वाटणार खुद्द यंयं मला नवाच वाटायला लागला तोच-तोच वाटणारा कुळकर्णी रोज पाहत होतो, नव्हें, पाहुनही त्याला काय पाहायचे म्हणून पाहतही नव्हतो आता लक्षात आलं कि नवं पाहाव नवं शोधाव हा उत्साह नाहीसा करणारे अनेक अदृश्य गुत्तीकर आपल्या मनात नकळत मुक्कामाला आलेले असतात. एखाद्या यंयंला मात्र रोजचा दिवस नवा करून जगायचं रहस्य सापडलेला असतं ते नवं त्यांच्या गादीवाल्या गोरांच्या गिराहीकात दिसत, मटारीच्या शेंगेत दिसत, इतकच काय पण १५ वर्षापूर्वी जिच्याशी लग्न लागलं ती बायकों सुद्धा बोहोल्यावरून उतरतांना जशी दिसली होती तशीच दिसते. यंयंची धडपड "शेवटला दिस गोड व्हावा" ही नाही तर रोजचा दिवस नवा व्हावा ही आहे असा रोजचा दिवस नवा करुन जगायचा मंत्र सापडलेला 'गुरू' वर्षानवर्ष आमच्या गल्लीत घरा समोर राहातो. याचा मला पता नव्हता. रोजचा दिवस नवा करत जगायची विद्या ज्यांना साधली आहे त्यांच्या पंचागाची तिथी पाडव्याचीच म्हणायला हवी. नवे वर्ष हे त्यांचे “मागी पानावरून पुढे चालू' करीत जगणाऱ्यांची नव्हें. असा रोजचा दिवस नवा करून जगणाऱ्याच्या दारापुढे वर्षभर एक अदृश्य गुढी उभारलेली असते. यंयंच्या दारातली ती गुढी आता मला दिसायला लागली आहे. थैक्यू यं यं

(जराजिर्ण कागदावरून पुनर्लेखन सौ. शैला बेलवलकर, नागपूर)
(कालनिर्णय जानेवारी १९८८)

Thursday, December 31, 2020

एक कलाकर एक संध्याकाळ - पु. ल. देशपांडे (चतुरंग प्रतिष्ठान)

"चतुरंग प्रतिष्ठान" या नामांकित संस्थेने पुलंच्या मुलाखतीचे दोन वेळा कार्यक्रम केले. "एक कलाकर एक संध्याकाळ"च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्यावेळी रवींद्र नाट्यमंदिर येथे जानेवारी १९८७ मधे रंगलेल्या मुलाखतीतला हा काही भाग. हे रेकॉर्डिंग बरेच जुने आहे त्यामुळे थोडे लक्षपूर्वक ऐकावे लागते. ही मुलाखत "चतुरंग प्रतिष्ठान"चे आणि श्री आशुतोष ठाकूर ह्यांचे आभार मानून, चतुरंगचे श्री. निमकर यांच्या परवानगीने रसिकांसाठी उपलब्ध करत आहोत.



अश्या पुलंच्या अनेक अप्रतिम व्हिडियोज साठी आपल्या युट्युब चॅनल सबस्क्राईब करा. - > https://www.youtube.com/channel/UCpUM2b3QjXXWgmgt-Dqa-dQ


Friday, April 17, 2020

आनंदयात्री पु. ल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कॅनव्हासवर चमकत राहणारं एक महत्वपूर्ण नाव

पु. ल. देशपांडे...

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे...आपणा सर्वांचे लाडके भाई.

साहित्य, संगित , नाट्य क्षेत्रात केवळ स्वत:च्या आनंदासाठी स्वैर संचार करणारं व्यक्तिमत्व..

पु.ल सांगतात,उत्तम साहित्याचं वाचन, सुस्राव्य गायनाचं श्रवण आणि उत्तम नाट्याचं दर्शन या गोष्टी त्यांना चोरून कराव्या लागल्या नाहीत. त्या त्यांना सहजपणे प्राप्त झाल्या. केवळ स्वानंदासाठी ते त्यात रममाण झाले.मातुल घराणं दुभाषींच. आई, आजी , आजोबा सर्वच गायन वादन कलाप्रेमी. बालपणीच ग्रंथालयात जाऊन भाईंनी अनेक पुस्तके वाचली. ग.दि. माडगुळकर ,सुधिर फडके ( बाबुजी), यांच्या सोबत महाराष्ट्राच्या पवित्र भुमीत परमेश्वारानं आणखी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्माला घातलं. संतांच्या या भुमीला पावन केलं. तो दिवस होता ८ नोव्हेंबर १९१९. मराठी महिना कार्तिक. वेळ दुपारी अडीच. पु.लं.च्या आई सांगतात ,जन्मल्यावर काही सेकंद ते रडलेच नाहीत. सुईणीनं त्यांच्या हातावर , कपाळावर टोचलं. मग ते मोठ्यांदा रडले. ..जगाला हसविण्यासाठी जन्माला आलेलं मूल रडणार कसं?..वैद्यक शास्त्राच्या समाधानासाठी नवजात अर्भकाला रडवावं लागलं. रडलंही ते. आता हा जो निष्कर्ष मी काढला त्याची पु.लं नी हयात असते तर खिल्ली उडवली असती. मला थेट ‘ सखाराम गटणेच्या ‘ पंगतीत बसवलंअसतं. आपण काही ‘साहित्य साधना ‘ केल्याचं पु. ल. ना मंजूर नव्हतं. जे काही घडलं ती आनंदातातून आनंदासाठी आपोआप घडलेली क्रिया. पु.लं. चं म्हणणं, ब्रम्हदेवानं, आनंद निर्मितीसाठी मला पृथ्वीवर पाठवलं. स्वर्गारोहण झालंच आणि ब्रम्हदेवांनी विचारलं “ तू काय केलंस पृथ्वीवर ? आहे काही पुरावा?”..
तर सांगेन “ मी अनेकांना खळखळून हसवलं. ते आनंददायी हास्य हाच त्यासाठींचा पुरावा”. अशा या अद्वितीय व्यक्तीच्या जन्मशताब्धीचं हे वर्ष. नोव्हेंबर १९७९ ला पु. लं. ना साठ वर्षे पुरी झाली.त्यावेळी प्रसारीत झालेल्या ध्वनीफितीत ही माहिती उपलब्ध आहे.

केवळ हास्य आणि आनंद निर्मितीसाठी भाईंनी विविध कलांच्या क्षेत्रात मुशाफिरी केली. दिग्गजांनी त्यांच्या गुणांना हेरलं. त्यांचं स्वागत केलं. मी तर म्हणेन हा ईश्वर निर्मित योगायोग. तरूण वयात सुरांचे गंधर्व, बालगंधर्व, यांचे शेजारी बसून पेटी वाजविण्याचं भाग्य भाईंना लाभलं. बालगंधर्वांनी मान डोलवून पेटी वादनाला उत्स्फुर्त दाद दिली.आचार्य अत्रे हे पुलंचे आवडते वक्ते. श्रोत्यांशी भाषणातून संवाद साधण्याचं आचार्य अत्र्यांचं तंत्र आपल्याला भावल, असं पु.ल.नी आवर्जून नमूद केलंय. कवितांना चाली लावण्यातला चिरतरूण मनाचे कवी बा. भ. बोरकर यांचा काव्यअविष्कार भाईंना अतिशय आवडला. खुद्द बोरकरांच्या तोंडून कवितांना लावलेल्या चाली ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. चार्ली चापलीन आणि रविंद्रनाथ टागोर यांना पु.ल. आदर्श स्थानी मानीत. महाराष्ट्राच्या या प्रतिभासंपन्न साहित्यिकाच्या साहित्याची ओळख करून घेताना त्या मागची मानसिकता नीट लक्षात यावी या साठी वरील गोष्टी नमूद केल्या आहेत.


पु.ल. देशपांडेचं साहित्य काल होतं, आजही तितकंच टवटवीत आहे. येथून पुढेही ते तसंच, त्याच दिमाखात पुढच्या पिढीसाठी कायम टिकून राहणार . अशा साहित्याला ‘ ‘वांग.मय ‘ म्हणतात. सुप्रसिद्ध प्रवचनकार , विद्या वाचस्पती, शंकर अभ्यंकर यांनी या संदर्भात उदबोधक खुलासा केला आहे. साहित्य निर्माण होतं. काही काळ टिकतं. कालौघात विराम पावतं. नष्ट होतं. जे साहित्य भूत, वर्तमान आणि भविष्य काळातही टिकून राहतं, त्यालाच वाग.मय संज्ञा दिली जाते.

असो आता पु. लं. च्या साहित्यातील सौंदर्य स्थळ शोधण्याचा हा एक स्वल्प प्रयत्न....
सखाराम गटणे, चितळे मास्तर , हरी तात्या, नामू परीट ही सारी व्यक्तिचित्र पु. ल.नी वाचकांसमोर उत्तम प्रकारे सादर केली .मी तर म्हणेन त्या व्यक्तिचित्रात्मक कथाच आहेत. एक प्रमूख व्यक्ती आणि तिच्या सहवासात प्रसंगोपात येत रहणारी इतर माणसं या सर्वांना एका सुत्रात गुफंत प्रमूख व्यक्तीचं चित्र खुलवणं हाच प्रधान हेतू. वाचकांची पराकोटीची समरसता त्या पात्राला अजरामर करते. आजही पु.ल. म्हटलं की अंतू बर्वा , चितळे मास्तर इत्यादींची पटकन आठवण येते.

पु.ल. चं भाषा सौष्टव अप्रतिम.

ज्या प्रांतातील, प्रदेशातील कथानायक असेल तेथे बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा अगदी परिणामकारक वापर त्या पात्राच्या मुखातून ऐकताना वेगळीच अनुभुती येते. कथेतून विनोदाची मुद्दाम निर्मिती केल्यासारखी वाटत नाही. मात्र विसंगती अवतरते तेंव्हा ती प्रभावीप्रमाणे श्रोत्यांपर्यंत/ वाचकांपर्यंत पोहचल्याने ते खळखळून हसतात. पु.ल.नी रेखाटलेला कोणताही नायक मला विदुषकी थाटाचा वाटत नाही. मग सखाराम गटणे असो, हरीतात्या असो वा चितळे मास्तर असो. कुणीही आचरटपणा वा विदुषकी चाळे करून उगाचच हसविण्याचा लटका प्रयत्न करत नाही. विसंगती हेरून ती दाखविण्याचं पु.लं. च कसब फारच छान. त्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ दर्शन घडविण्यासाठी त्याची अंगीभूत विकृती दाखवली जाईल. ती हसण्यासाठी नसते तर वाचकाच्या / श्रोत्याच्या मनात ती कारूण्य भावच निर्माण करील. पु.ल. म्हणूनच तुम्ही ग्रेट आणि वेगळे वाटता. वर बऱ्याचदा मी ‘ वाचक/ श्रोता ‘ असा शब्द वापरलाय. मी पु.ल.चं साहित्य वाचलं. ते मला आनंद , समाधान देऊन गेलं. अगदी मनापासून सागतो माझा आनंद शेकडो प्रतीनं वृदिंगत झाला, जेंव्हा याच कथा त्यांच्या आवाजात कथाकथनातून ऐकल्या.पु.ल. तुम्ही उत्तम कथाकथनकार आहात..प्रत्येक कथाकथन हा एकपात्री प्रयोग.तुमच्या कथाकथानाच्या कॅसेट/सीडीज दिव्याऔषधीच .आलेला थकवा निघून जातो. गालातल्या गालात हसताना मन आनंदाने डोलू लागते.

हे सारं का घडतं?....कारण स्पष्ट आहे. लेखक तर तुम्ही आहातच. पण त्याचबरोबर तुम्ही उत्तम नट आहात. आवाजातील चढउतार, सुयोग्य फेरफार यांच्या द्वारे कथा समर्थपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवता.‘ हरातात्या ‘ कथा ही याचे उत्तम उदाहरण.मुलांच्या डोक्यावर विकायच्या छत्र्यांचे ओझे. त्यांना घेऊन निघालेले गोष्टी वेल्हाळ हरीतात्या . रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर ही संतमंडळी. तसेच शिवाजी, संभाजी, इत्यादी इतिहासातील मंडळी.यासर्वांचं व्यक्ती दर्शन घडवताना हरीतात्यांच्या मुखातून पु. ल. जे बोलले ते वर्णन करून सांगणं मलाही अवघड वाटतंय.
तुम्ही ती सीडी ऐकाच. एका नटश्रेष्टाचं तुम्हाला दर्शन घडेल. पु. लं.ची गाजलेली ‘ म्हैस ‘ कथा.

या कथेत पु.लं. नी निर्माण केलेली वातावरण निर्मिती इतकीप्रत्ययकारी आहे की असं वाटावं की जणू काही आपण रस्त्यावर उभे आहोत आणि मधोमध आडव्या पडलेल्या बहुचर्चित म्हशीला पहात आहोत. असे आपले सर्वांचे लाडके पु. ल. साहित्य रुपात आपल्यात आहेत...चिरकाल रहातील. खरं सांगू का. पु. ल.नी ब्रम्हदेवाला आता काही पुरावा देण्याची गरज नाही. प्रत्येक साहित्य रसिक स्वर्गात पोहोचला तर भाटासारखा सांगत सुटेल.. पु.लं. नी आम्हाला हास,हास,हसवलंय. पुरावा गोळा करण्यासाठी तूच आम्हाला पृथ्वीवर घेऊन चल.....


पु.लं. च्या स्मृतींना शतश: वंदन
--सुरेश त्र्यंबक पाठक

Thursday, April 16, 2020

निवडक अ-पुलं - कुमार जावडेकर

पु, लं. चा विनोद आपल्याला पुनः पुन्हा हसवत असतो.
त्यांची आठवण, त्यांची पात्रं आणि त्यांच्यासारखी शैली पुनश्च वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न! 'पु. ल. - अखेरचा अध्याय', 'बटाट्याची चाळ - बाजीराव आणि मस्तानी', इत्यादी कथांमधून.
आणि त्याचबरोबर थोडंसं अ-पुलंही! -
काळानुसार बदललेल्या अनेक नवीन व्यक्ती आणि वल्लींतून.
अन् प्रसिद्ध घटनांच्या आणि व्यक्तिमत्त्वांच्या उडवलेल्या खिल्लीतून!



'पु. ल. - अखेरचा अध्याय' हा लेख कथाकथनाच्या स्वरूपात सादर केला त्याचा 'यू ट्यूब'चा दुवा.




a