Leave a message
Showing posts with label hamid dalwai. Show all posts
Showing posts with label hamid dalwai. Show all posts

Tuesday, May 3, 2022

हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार

पुलंच्या ‘मैत्र’ ह्या ‘मौज’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातल्या मूळ लेखाचा अगदीच थोडासा भाग संदर्भापुरता इथे दिला आहे, बाकी पुस्तक बाजारात मिळतं.

आगरकरांना ‘देव न मानणारा देवमाणूस’ म्हटले जाते. हमीद दलवाई हा ह्या महाराष्ट्रातला असाच देव न मानणारा देवमाणूस, पण ‘देव न मानणे’ हे हमीदला मात्र आगरकरांहून अधिक धोक्याचे होते. तो ज्या मुसलमान धर्मात जन्माला आला होता, त्यात हिंदूंसारखी उदारमतवादी परंपरा नाही. आगरकरांना सनातन्यांचा विरोधा झाला, तरी त्यांच्या मताना पाठिंबा देणारेही हिंदू होते. हमीदचा लढा हा मुसलमानी समाजात अभूतपूर्व होता. आजदेखील बॅरिस्टर छगलांसारखी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी सर्वार्थाने इहवादी आणि उदारमतवादी माणसे वगळली, तर हमीदच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे तो बहुसंख्य मुसलमानांच्या हिशेबी ‘काफिर’ होता. त्याला काफिर मानत नव्हत्या फक्त धार्मिक रूढींच्या जाचाखाली रगडल्या जाणाऱ्या त्या दुर्दैवी मुसलमान भगिनी. ‘तलाक’ पद्धतीमुळे ज्यांच्या आयुष्याचा पालापाचोळा होत होता अशा भगिनींना त्यांची दुःखे जाणणारा एक भाऊ लाभला होता. त्या जाचातून मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करणारा भ्राता उभा राहिला होता. माणुसकीचे प्राथमिक अधिकार ज्यांना घरातही नाहीत आणि घराबाहेरही नाहीत, अशा अवस्थेत जगण्याचे भोग ह्या देशातल्या मुसलमानच नव्हे, तर असंख्य स्त्रियांच्या नशिबाला लागलेले आहेत. खुद्द दलित समाजातील पुरुषदेखील त्यांच्या स्त्रियांना प्रतिष्ठेने वागवत असतात असे नाही. ह्या देशातल्या बहुतांश स्त्रियांचे जगणे म्हणजे नाना प्रकारच्या खस्ता काढीत पिचत पिचत एके दिवशी मरून जाणे एवढेच आहे. ते मरण तिला जितके लवकर येईल, ती स्त्री भाग्यवान. मृत्यूनेही उशीर लावला, तर त्या दुर्भाग्याला सीमा नाही.
                 
‘धर्म’, ‘मजहब’ या नावाखाली अनेक अदृश्य लटकत्या तलवारी असंख्य अभागी जिवांच्या मस्तकांवर ते जीव केवळ स्त्रीदेहाने ह्या जगात आले म्हणून शतकानुशतके टांगलेल्या आहेत. दुर्भाग्याची प्रत निराळी, पण त्यातून कुठल्याही धर्मातली स्त्री सुटलेली नाही. हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दुःख जाणवले होते असे नाही. फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दुःखांना कुठे वाचाच फुटत नव्हती, ती फोडायला कुणी धजावत नाही ह्याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती. हिंदू स्त्रीला निदान निसर्गाने बहाल केलेली मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश तरी नाकारला जात नव्हता. मुसलमान स्त्रीला तोही नाकारलेला. अपवाद फक्त नियम सिद्ध करण्यापुरते. आणि ह्या साऱ्या रूढी पुरुषांची सोय व्हावी म्हणून.

... हमीदशी माझा स्नेह होता हे म्हणतानादेखील त्या म्हणण्यातून आत्मप्रौढीचा ध्वनी उमटेल की काय, अशी मनाला शंका यावी इतका तो मोठा होत गेलेला होता. ज्या जिद्दीने तो ह्या साऱ्या अन्यायांविरुद्ध लढत होता ते पाहिल्यावर त्याची भेट ही एखाद्या वीरपुरुषाच्या दर्शनासारखी वाटत होती, असे म्हणण्यात मला यत्किंचितही अतिशयोक्ती वाटत नाही. हमीदचा आणि माझा गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासूनचा परिचय. ‘कफनचोर’सारखी विलक्षण परिणामकारक कथा लिहिणारा हमीद, ‘इंधन’सारखी सरळसूत शैलीतली पण प्रभावी कादंबरी लिहिणारा हमीद. मी रेडियोत नोकरी करत होतो त्यावेळी कोकणातल्या मुसलमान कुटुंबाच्या जीवनावर श्रुतिकांची एक मालिका मी त्याच्याकडून लिहून घेतली होती. सदैव हसतमुख, बोलताना गमतीने आपले ते घाऱ्या रंगाचे डोळे मिचकावण्याची सवय असलेला हमीद, हसताना लालबुंद होणारा, खट्याळ पोरासारखी जीभ काढणारा, बोलताना बऱ्याच कोकणी माणसांना सवय असते तशी, ‘आयकलं का?’ म्हणून वाक्याची सुरुवात करणारा – मराठी साहित्याच्या क्षेत्रात सरसर वर चाललेला हमीद. अशा ह्या उमद्या, खेळाडू आणि मैफिलीत हव्याहव्याशा वाटणाऱ्या तरुणाच्या अंतःकरणात एक ज्वाला पेटते आहे आणि पाहता पाहता ती एका बंडाची मशाल होणार आहे, याची त्या काळात फार थोड्या लोकांना कल्पना असेल, पण एक दिव्य क्षण त्याच्या जीवनात आला आणि ललित साहित्य, त्याचा आवडता समाजवादी पक्ष या सर्वांशी असलेले संबंध बाजूला करून त्याने एका भयंकर बिकट वाटेचा प्रवास सुरू केला. आणि पाहता पाहता एका अपूर्व अशा नव्या प्रबोधनाचा उद्गाता होऊन तो निराळ्याच तेजाने तळपायला लागला.

...यशापयशाची चिंता न करता आपल्या कार्यात रमून गेल्यासारखी त्याची वागण्याची वृत्ती पाहिल्यावर डोळ्यांपुढे दिसणारा हमीद कलावंतांच्या हातातल्या वाद्यासारखा वाटायचा. सतारीतून करूण स्वर निघावे आणि त्या कारुण्याचा सतारीवर परिणाम न दिसता ती आपल्या घडणीतल्या त्या पितळी ब्रिजेस, हस्तिदंती कलाकुसर, चमकदार भोपळे यांच्यामुळे ते देखणेपण जसेच्या तसे ठेवून असावी तसे काहीसे त्याचे ते आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि बोलण्यातून जाणवणारी रूढिग्रस्तांची करूण कहाणी ह्यांच्यातल्या पृथकपणाने प्रत्ययाला यायचे.

एखाद्या कार्याशी संपूर्णपणाने लिप्त असूनही त्या लिप्ततेचे प्रदर्शन न करणारी अलिप्तता सत्यशोधक हमीदला त्याच्यातल्या कलावंत हमीदने दिली असावी. मनाला हादरून टाकणाऱ्या त्याच्या ‘इंधन’ ह्या कादंबरीचे निवेदनदेखील असल्या कलापूर्ण अलिप्ततेचाच प्रत्यय घडवते. इतके करूण प्रसंग आहेत पण कुठे भळभळ नाही. आपल्या न्याय्य हक्कांसाठी झगडू पाहणाऱ्या मुसलमान स्त्रियांचा मोर्चा ही एक अभूतपूर्व घटना होती. त्याची कथाही त्याने जणू त्यात आपण कोणीच नव्हतो अशा विलक्षण अलिप्ततेने सांगितली होती. त्या मोर्चातली महिला पुढे दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला गेली. तिला भेट नाकारण्यात आली. हे सर्व सांगून त्याबद्दलची चीड व्यक्त न करता हमीद आपले डोळे मिचकावीत म्हणाला, ‘‘... आणि आयकलं का, ही भेट नाकारताना पंतप्रधान इंदिरा गांधी आपणही बाई आहोत हे विसरल्या.’’

…आपल्या मित्रांपैकी एक अशा सहजभावनेने हमीद भेटत होता. बोलत होता. थट्टामस्करी करीत होता. त्यामुळे एका व्यापक प्रबोधनाचा उद्गाता ह्या दृष्टीने त्याची असामान्य उंची जाणवत नव्हती. ती तो जाणवूही देत नव्हता. आता तो कायमचा चर्मचक्षूंच्या आड गेला. खूप दूर गेला. आणि दूर गेलेल्या पर्वतासारखी त्याची ती उंची आता जाणवायला लागली. त्याच्या त्या समर्पित जीवनाकडे पाहिल्यावर आता मात्र ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे दीन-दलित, स्त्री-पुरुषांच्या उद्धाराच्या चळवळीचा प्रवाह आणून जोडणारा त्या मालिकेतला एक श्रेष्ठ प्रबोधनकार ह्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे, हे समजले. महाराष्ट्रातल्या समाजप्रबोधनाच्या इतिहासकाराला महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि हमीद दलवाई ही नावे अत्यंत आदराने उच्चारूनच ह्या प्रबोधनाचा विचार करावा लागेल. किंबहुना, महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या समाजप्रबोधनाच्या संपूर्ण इहवादी आणि ‘माणुसकी हाच धर्म मानायला हवा’ ह्या विचारवृक्षाला आलेले ‘हमीद दलवाई’ हे खरे रसरशीत फळ होते.

धर्म, रूढी, वंशवर्चस्व, राजकीय आणि आर्थिक सत्तालोभ यांची असहायांच्या शोषणासाठी राक्षसी चढाओढ चालत असलेल्या ह्या जगात शोषितांच्या अश्रुधारांना खंड नसतो. उणीव असते ती असले असहाय अश्रू पुसून तिथे हास्य फुलवायला निघालेल्या निर्भय आणि निःस्वार्थी हातांची.

हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मिळ हात गेले.

- पु. ल. देशपांडे
a