Leave a message
Showing posts with label अघळ पघळ. Show all posts
Showing posts with label अघळ पघळ. Show all posts

Friday, March 25, 2022

काही साहित्यिक भोग क्रमांक तीन

स्थळ: आमचे घर.
वेळ: रात्रीचे दोन
टेलिफोनची घंटा वाजते. आम्ही दचकून उठतो. छातीवरील प्रा. कादंबिनी किरमिजे यांचा लेख असलेले--सॉरी, छातीवरील 'प्रायोगिक रंगभूमीवरील नवीन समस्या' हा कादंबिनी किरमिजे यांचा लेख असलेले मासिक खाली पडते. निद्रानाशावर त्यांचे लेख हा एक अक्सीर इलाज आहे.

टेलिफोन : ट्रिंग... ट्रिंग...
मी : हलो
टेलिफोन : मी दैनिक 'जनजागरण' मधून बोलतोय.
मी : बोला.
जनजागरण : आपली प्रतिक्रिया हवी आहे.
मी : कोण गेलं हो?
जनजागरण : गेलं नाही कुणी
मी : मग कसली प्रतिक्रिया ? ( एके काळी कुणी आटोपले की 'क्रिया' करण्यात माणसे गुंतायची. आता 'प्रतिक्रिया'ही करावी लागते.
जनजागरण : कापूस एकाधिकार योजनेसंबंधी जे सरकारचे धोरण आहे त्यासंबंधी तुमची एक साहित्यिक म्हणून प्रतिक्रिया हवी.
मी : (अद्यापीही मी त्या लेखरूपी झोपेच्या गोळीच्या अमलाखाली आहे की काय अशी शंका येऊन) कापूस एकाधिकार योजना ?
जनजागरण : यस !
मी: कुणाला फोन करायचा होता आपल्याला ?
जनजागरण : आपल्यालाच ! एक साहित्यिक म्हणून प्रतिक्रिया हवी आहे.
मी : पण कापूसखरेदीतलं मला काय कळतंय ?
जनजागरण : साहित्यिक असून ह्या ज्वलंत प्रश्नाकडे आपलं लक्ष नाही?
मी : कापूस एक ज्वलंत वस्तू आहे एवढं मला ठाऊक आहे.
जनजागरण : विनोद न कराल तर बरं होईल.
मी : कुणाचं? आज कापसावर प्रतिक्रिया विचारलीत, उद्या कोळशावर विचाराल.
जनजागरण : पण एक साहित्यिक म्हणून तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत.
मी : अहो, त्या पुऱ्या करायला आम्ही कागदावर प्रयत्न करतो-कापसावर नव्हे.
जनजागरण : पुन्हा तुम्ही विनोदात शिरताय.. 'जनजागरणा'ला ह्याचा गंभीरपणाने विचार करावा लागेल.
मी : प्लीज .. असं काही करू नका. रातपाळीच्या वेळी गंभीर विचार करायला लागलात तर झोप येईल. काही नोकरीचा विचार करा.
जनजागरण : (दाबात) म्हणजे कापूस एकाधिकार योजनेबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही तर--
मी : अशी प्लीज दमदाटी वगैरे नका करू. तुम्ही सांगा ना तुमची प्रतिक्रिया काय ते.
जनजागरण : आम्हाला जनतेच्या प्रतिक्रिया हव्यात--
मी : तुम्ही जनता नाही वाटतं?
जनजागरण : आम्ही ह्या क्षणी पत्रकाराच्या भूमिकेत आहोत.
मी : आम्हीही यावेळी झोपेतून जागं केलेल्या माणसाच्या भूमिकेत आहोत--थांबा थांबा . ही घ्या प्रतिक्रिया.. कापूस एकाधिकार योजना हे शब्द कानी पडल्याबरोबर मला खडबडून जाग आली. मी म्हणालो, हे काय चाललंय? एवढं पुरे ना?
जनजागरण : जस्ट ए मिनिट.. हो.. सोळा शब्द आहेत. बरोबर बसताहेत..थँक्यू.

(काही साहित्यिक भोग - अघळपघळ )
लेखक - पु. ल. देशपांडे 

Monday, March 14, 2022

ललित आत्मपरिचय कसे लिहावे (एक मार्गदर्शन)

...पूर्वी ' मी व माझे लेखन ' हा लेख साठीच्या आसपास येताना लिहीत. हल्ली ' अ आ इ ई ' एवढे लिहिल्यावरसुद्धा लिहिता येतो. आता उदाहरणार्थ : किशोर कोरे याने ' ग म भ न ' ही निर्मिती केल्यानंतर लिहिलेला आत्मपरिचय पाहा. किशोर कोरे हा अगदी नवसाहित्यिक आहे. कारण गेल्या महिन्यापासूनच तो लिहायला लागला.

" आमचा बाप ग्रेट आहे. आणि आईसुद्धा. आमच्या बापाचं आईवर प्रेम नसावं. कारण बापाला प्रेम काय ते कळतं म्हणून मला शाळेत पोचवायला येतो आणि आमच्या वर्गातल्या बाईशी बोलत बसतो. बाप सिगारेट ओढतो म्हणून आई त्याला बोलते. बापाने सिगारेट ओढली तर माझ्या आजाचं काय जातं ? मला आजे दोन आहेत. एक आईचा बाप आणि एक बापाचा बाप. हेही ग्रेटच.

मी ग म भ न र स पर्यंत लिहिलं. बाईला त आणि ळ येत नसावा. पुढं जातच नाही. 'स'शीच येऊन थांबली आहे. आमची बाई दॅट इज निमाताई. तिला काहीच येत नाही. तिला मोटरचा उच्चार 'कार'असा आहे हे ठाऊक नाही. बालगीतं म्हणजे वैताग. म्हणून वर्गातली बाकीची भुक्कड गर्दी 'शाणी माजी भावली' म्हणताना फक्त मी तेवढा 'बोल राधा बोल' म्हणत असतो.

मी कधी शाळेत जाईन असं मला वाटलं नव्हतं. बाप उचलून घेऊन गेला. शाळा हा साला ताप आहे. आपण शिकणार नाही. कारण शिकण्यासारखं काहीच नाही. होतं ते शिकलो. आता फारतर शिकलेल्या अक्षरांना टोप्या घालायच्या, नाहीतर काने, मात्रा ओढायचे. म्हणजे वैताग. बालगीतासारखा. खरं तर ग ला म कां नाही म्हणत ? सगळी भाषा बदलली पाहिजे. ' मंमं ' म्हणजे जेवण हे कळत असताना जेवण हे कशाला शिकायचं ? भू भू म्हणजे कुत्रा हे कुत्र्यालासुध्दा कळतं मग कु कशाला नि त्रा कशाला शिकायचा ? पण ' जो जो ' म्हणजे झोप तेव्हा ' ज ' शिकला पाहिजे आणि ' कुक् कुक् ' म्हणजे आगगाडी तेव्हा 'कु' शिकलाच पाहिजे. म्हणजे वैताग.
एकंदर सगळा वैताग आहे हे आजवरच्या आयुष्यातल्या अनुभवावरुन सांगतो.

तिस-या वाढदिवसाला बाप काय देतो पाहीन, नाहीतर चक्क बापाला डॅडी न म्हणता बाप म्हणेन. हे बाप लोक आम्हाला जन्माला घालण्यापूर्वी विचारीत कां नाहीत ? आमच्या बापाचं नाव मोरेश्वर म्हणून मी त्याला नामानिराळा ठेवतो आणि माझं नाव फक्त किशोर कोरे एवढंच सांगतो. एक पाव्हणा म्हणाला, ' अरे तुझ्या बापाचं नाव सांग.' मी म्हटलं, ' हा इथे बाप आहे त्यालाच त्याचं नाव विचारा. ' पाव्हणा आडवा. एका कॅडबरीत काय काय म्हणून सांगायचं ? पाव्हण्याच्या बायकोने माझी पापी घेतली. तिला मी माझं नाव 'किशोरकुमार' असं सांगितलं. ती म्हणाली, 'सगळं नाव काय ?' मी म्हटलं, 'दिलीपकुमारचं सगळं नाव विचारुन या.' पाव्हणी करपली. आपण नाही कोणाला भीत. माझी महत्वाकांक्षा गांजा ओढणं ही आहे. "

माझी कादंबरी लिहून होईपर्यंत मी कादंबरीकार होईन असं मला वाटलंच नव्हतं. कारण साहित्याची भंकस आपल्याला पटत नाही. आमच्या फेवरीट हातभट्टीच्या अड्ड्यावर पंडा भोरकरनं बेट घेतली. " लिहून दाखव कादंबरी. " आपण दिली. आठव्या दिवशी तीन बाटल्या शाई आणि पाच रिमं कागद चिताडून काढले शब्दाच्या मुडद्यांनी. झाली कादंबरी. बगलेत मारून अड्ड्याकडे जात होतो. कामू नाक्यावर झाडम्या भेटला. स्कूटरमागं यल्लम्माला घेऊन. त्याला वाटलं , काखेत जिन्नस आहे. मी म्हटलं ' झाडम्या येड्या ही कादंबरी " .झाडम्या म्हणाला " मारो गोली ." आणि स्कूटरला किक मारून यल्लीसकट पसार. मी म्हटलं याची केस केली पाहिजे. आमच्या गॅंगमधला जेम्स बॉण्ड आहे मी. टॅक्सीला दमडा नाही खिशात. म्हणून पॅन्ट विकणार होतो तर नाक्यावरच्या जरीपुराणेवाल्याकडे कवितासंग्रहाचे गठ्ठे विकायला प्रकाशक आला होता. त्याला म्हटलं खाकेत कादंबरी आहे. केवढ्याला घेतोस ? तो म्हणाला केवढ्याला देतोस ? मी म्हटलं घेशील तेवढ्याला. आधी टॅक्सीला पैसे दे. तेवढ्यात रद्दीवाल्याने कवितासंग्रह तागडीत तोलले आणि त्याला बावीस रूपये दिले. आपण खेचले आणि कादंबरी प्रकाशकाला देऊन बगल मोकळी केली. बावीस रूपये ! आपकमाईचे. बापकमाईचे तर दरमहा शंभर रुपये टिकवतो. बाप आपल्याला टरकून. पुढल्या महिन्यात बी.ए. परीक्षेला बसण्याबद्दल बोनस देणार आहे.लेकाचा बाप. तोवर बावीस रूपये ही सही. माझी कादंबरी बगलेत घालून प्रकाशक गेला. मी सरळ टॅक्सी गाठली आणि झाडम्याचा नाद सोडून सीधा गेलो आपल्या गॅंगच्या अड्ड्यावर. तिथे पंडा भोरकर आणि चिमण्या मल्हारी मार्तंड बसले होते चणे खात. बावीस रूपये आपकमाई. पंडा म्हणाला "ही काय भंकस . " चिमण्या म्हणाला "बूटपालिस केलंस काय ?" मी म्हणालो " आवाज बंद. जान निकालेगा. कादंबरीचा अॅडव्हान्स . बावीस रूपये. " पंडा म्हणाला "साली माझी आयडिया घेऊन कादंबरी लिहितोस " मी म्हटलं " तू व्हिक्टर बाॅटलनेकची नाही घेत ? " पंडाची जबान तुटली. चिमण्या म्हणाला "छोडो यार " मग मी छोडलं." पण आधी बीट मारलीस त्याचा पैशे मोज. मेरा पैशे मोज. " पंडा म्हणाला " कसली बीट " मी म्हटलं " कतरू नकोस प्यारे - कादंबरी लिहून दाखवायची बीट ! जबान बदलतोस ? दिला शब्द खरा कर " पंडा म्हणाला " शब्द खरा करायचा म्हणून कोणी सांगितलं ?" पंडाही ग्रेट. मग सहा रूपयांचा नंबरी जिन्नस आणला कालिन्याहून. आणि भेंडी बाजारात उस्मान कादरकडे मुर्गी चावली. दोन रुपये उरले. मी म्हटलं " यार लोक येवढे आपल्याला ठेवा. बापाचा मंथली हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत" पंडा म्हणाला " जहन्नममे जाव " मग मी जहन्नममध्ये गेलो. इकडे प्रकाशकाने कादंबरी छापखान्यात नेली. प्रकाशक ग्रेट. कादंबरीला प्राइझ मिळवून दाखवलं.‌लोकही ग्रेट. त्यांनी विकत घेऊन वाचली. दुसरी लिहिली. तीही प्रकाशक बगलेत मारून गेला. तिलाही प्राइज. गॅन्गमधील यार लोक म्हणतात प्रकाशकाचा बगलबच्चा. मी म्हटलं " पहिल्या प्राइझमध्ये शर्ट घेतले दुस-यात बनियन तिसरं मिळालं तर प्यांटी घेणार ! आपल्याला साहित्य बिहित्य पसंत नाही. आपण औलिया." तेवढ्यात आपलं लग्न झालं. बाप म्हणाला दहा हजार हुंडा मिळतोय. मी म्हटलं बापाला " " फिकीर मत करो बेटा शादी करेगा. तुम्हारे लिये बॅन्क में नौकरी करेगा ! " आपण मॅनेजरला नाही भीत. मग शादी केली. हल्ली बॅंकेत नोकरी करतो. पंडा भोरकर गॅन्गशी बेमान निघाला. आमचा लीडर असून म्युन्सिपाल्टीत खर्डेघाशी करतो. आणि रस्त्यात भेटला तर तोंड चुकवतो. माझ्या कादंब-या खपतात म्हणून खार खातो. आपली आवड : बेकारातील बेकार सिनेमा आणि चरस , गांजा आणि अफू मिसळून हातभट्टी. नावडते लेखक : व्यास आणि वाल्मिकी. आवडते लोक : आपल्याला ग्रेट म्हणणारे.


किशोर कोरे (आगामी आत्मचरित्रातून)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
संग्रह - अघळपघळ (१९९८)
(ललित , दिवाळी १९६५)

Thursday, February 17, 2022

चौताल : काही (बे)ताल चित्रे

चौताल : ह्याच तालातले हे आणखी एक बेताल चित्र
पार्श्वभूमी : देऊळ


पंत म्हणतात " तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म"
"गडबोल्यांच्या सुनेचं कळ्ळं का ?"
" खरंय का हो ते ? "
"अहो खरं म्हणजे ---आमच्याच आळीत दोन घरं पुढं टाकून राहतात गडबोले "
" चांगलं नाक ठेचलंन सासूचं "
" गावाला नावं ठेवत होती मेली "
" गेल्या रामनौमीच्या वेळी आठौतय ना ? ह्या इथंच नव्हती का जुंपली आमची ? "
" हो काहीतरी ऐकलं होतं मी ! काय झालं होतं होतं ? "
" अहो , मी सुंठवडा घेतलान् निघाले "
" सीताकान्तस्मरण "
"जयजयराम तेव्हा "
" पार्वतीपदे हरहर "
" महादेव तशी मला "
" गोपालकृष्ण महाराज की "
"जय म्हणते कशी "
" बोला श्रीपाद श्रीवल्लभनरसिंहसरस्वती श्री गुरुदेव "
"दत्त काही कारण नव्हतं बरं का "
"श्री योगिराज बाळामहाराज कुर्डूवाडकरमहाराज '
"जय ह्या पुराणिकबुवाचे मेल्याचे "
"जयजय रघुवीर"
"समर्थ पूर्वीचे जोशीबुवा बरे होते . गुरूदेव दत्त वर आटपायचे."
" बोला रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीता "
"राम काही कारण नसताना ही गडबोलीण आली बरं का तरातरा ---मेघश्याम आणि मला शीताराम सीताराम म्हणते कशी रघुपतिराघव का हो मुलगा वेगळा जातोय म्हणे तुमचा पतीत पावन सूनबाईनी वर्षभरातच गाजवला की शीताराम पराक्रम ? आणि आता आहो माझी जानकीजीवन सून निदान करूणासिंधू आपल्या नवर्याबरोबर तरी सुंदर माधव मेघश्याम गेली . हिची सून कळलं ना पतीतपावन शीताराम एका नाटकात नाचणार्याबरोबर रघुपती राघव पळाली . हारि विठ्ठल. जय जय राम मी गेल्या रामनवमीला विठेवरी उभा बजावलं होतं हं गडबोलीण बाईंना. पुंडलिकाचे भेटी पुराणाला अश्याच इथे बसल्या होत्या. आषाढी कार्तिकी भक्तजन येती पेप्रातून सुनेचा फोटो दाखवत होती दिंड्या पताका वैष्णव नाचती अहो पायांत चाळ बांधलेला पोट उघडं तोंडाला रंग , अंगभर दागिने खोटे हो पंढरीचा महिमा वर्णावा किती तेव्हांच म्हटलं मी ही जाणार पळून तश्शी गेली रखुमाई वल्लभा राईच्या पर्वता आता गडबोलीण बाईंना म्हणावं तूही नाच चाळ बांधून !"

- काही (बे)ताल चित्रे
अघळपघळ
पु.ल. देशपांडे

Friday, June 28, 2019

आमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ

हा लेख ‘पु.ल. प्रेम’ ब्लॉगसाठी पाठविल्याबद्दल श्री अमोल लोखंडे ह्यांचे मनपुर्वक आभार!!

आमचे म्हणजे माझे आणि सोन्या बागलाणकराचे

“तुझं भाषाविषयक धोरण काय?”

सोन्या बागलाणकराच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने माझ्या हातातली इडलीच्या इडली सांबारमच्या बशीत फतकन पडली. सोन्या बागलाणकर सकाळी घरातून बाहेर पडताना सदैव एक प्रश्न ओठावर घेऊन बाहेर पडतो. माणूस जिज्ञासू. दिवसभर जिज्ञासेचे बळ शोधत हिंडतो. लग्नकर्म झालेले नाही. त्यामुळे हिंडायला मोकळा. त्यातून जिज्ञासेला एक विषय नाही. व्याख्यानानंतर “कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?” असं अध्यक्षांनी पुकारा केल्याबरोबर पटकन ज्यांना प्रश्न सुचतात आणि ते विचारायचे धैर्य ज्यांच्यात असते अशांतला सोन्या बागलाणकर आहे. आता चांगली इडली खात असताना “तुझं भाषाविषयक धोरण काय?” हा प्रश्न विचारण्याचे काही कारण नव्हते. मी बुडालेली इडली वर काढण्यात दंग असल्यासारखे दाखवले. विषय बदलणे हा सोन्या बागलाणकराच्या जिज्ञासेवर एकमेव उपाय आहे. पण तो दर वेळी लागू पडत नाही.

“आज सांबारममध्ये वांगी नाहीत -भेंडी आहे.”

‘‘माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस.” चिवटपणाने सोन्या बागलाणकर.

“कसला प्रश्न?” आपण जणू काय त्याचा प्रश्न ऐकलाच नाही, असे दाखवत मी म्हणालो.

“ऐक. तुझं भाषाविषयक धोरण काय?”

“अर्थात मातृभाषा. शिवप्रभू ज्या भाषेत बोलले ती माझी भाषा.”

“टु द पॉइंट बोल-म्हणजे मराठी.”

“अर्थात.”

“ठीक आहे. मग दोन कॉफी मागवून दाखव.”

“दो कॉफी लाव!”

“मराठीत मागवून दाखव.”

“दोन कॉफी लाव-आण!”

“शिवप्रभू कॉफी म्हणत होते?”

“त्यांच्या वेळी कॉफी होतीच कुठे?धारोष्ण दूध लेका!”

“हे बघ, भाषा हा विनोदाचा विषय नाही. आम्ही ह्या भाषेपायी काय काय गमावून बसलोय ते आमचे आम्हाला माहिती. राष्ट्रीय पातळीवरून नाही बोलत मी; वैयक्तिक पातळीवरून बोलतोय.” शिक्षा देणाऱ्या जज्जाइतक्या किंवा मुरलेल्या हेडक्लार्कइतक्या गंभीर चेहऱ्याने सोन्या बागलाणकर म्हणाला,

“वैयक्तिक पातळी?”

“जाऊ दे ते!”

सोन्या बागलाणकराने टाकलेल्या दीर्घ सुस्काऱ्यावरून वैयक्तिक पातळीपेक्षा पातळाशी ह्याचा संबंध असावा हे मी ताडले, पण मी ती जिज्ञासा आवरली. कारण सोन्या बागलाणकर हा एक चिरंतन प्रेमभग्न आहे.

“मराठीत कॉफी मागव.”

“जमणार नाही.”- मी.

“सोडा मागव.” – सो. बा.

“इडलीबरोबर सोडा?”-‘येडाच आहे!’ हे वाक्य मनातल्या मनात आवरून धरत मी.

“प्रत्यक्ष मागवू नकोस. समज, तुला सोडा मागवायचा आहे. तुझ्या मातृभाषेत. तर कसा मागवशील?”- सो. बा. हातातला चमचा माझ्यापुढे रोखत.

“एक सोडा.” - मी. ‘कटकट साली!’ हे मनात.

“ ‘सोडा’ हा शब्द मराठीत आहे? ‘सोडा’ ह्याचा मराठीत अर्थ काय?” सोन्या बागलाणकराचा सूर उलटतपासणीच्या वकिलाच्या वळणावर चालला होता.

“मराठीत ‘सोडा’ म्हणजे लीव्ह इट.”

“लीव्ह इट हे मराठी?”

“जाऊ दे ना-“

“बरोबर.” - सोन्या बागलाणकर.

“काय बरोबर?” - मी.

“सोडा-म्हणजे ‘जाऊ दे ना’-‘सोडून द्या’ असा अर्थ झाला.”

“प्यायचा सोडा हा शब्द मराठीत नाही.”

“खायचा सोडा आहे. तोही इंग्लिश. वॉशिंग सोडा.”

“वॉशिंग सोडा ह्या सोन्या बागलाणकराने खाल्ला केव्हा होता?” हा प्रश्न मी मनात दाबला.

“पण सोन्या, अस्सल मराठी खायचा सोडा असतो. सुकवलेली कोलंबी. सी. के. पी. वगैरे लोक खातात.”

“सी. के. पी!”- असे दात चावत म्हणून सोन्याने चमच्याखाली इडली चिरडली. सी. के. पी. लोकांनी याचे काय केलेय ते कळले नाही. “पण तुला प्यायचा सोडा हवा असला तर काय मागवशील?”

“सोडा.”

“'मराठीत मागव.”' टेबलावर बुक्की आपटत सोन्या बागलाणकर म्हणाला.

"का म्हणून?'

"तुझं भाषाविषयक धोरण तसं आहे म्हणून. तू मराठीवाला आहेस म्हणून.”

“मी मराठीवाला! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तूच तर ऑफिसला दांडी मारून- ”

“ऑफिस कशाला म्हणतोस? कार्यालय म्हण.”

“कार्यालय? हे बघ सोन्या, कार्यालय म्हटलं की डोळ्यांपुढं लग्न उभं राहतं, आता बहुतेक ऑफिसात लग्नं इतकी जमताहेत की ऑफिसलाही कार्यालय म्हणायला हरकत नाही-"

"ही तुझी विषयांतराची खोड सोडून दे, तुम्हां लग्न झालेल्या लोकांच्या ट्रिका आमच्यावर नको चालवूस.'- हा सोन्या सकाळीच असा कशाने पिसाळला होता, मला कळेना.

"ठीक आहे. मी मराठीवाला, मग तू संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यालयाला दांडी मारून मिरवणुकीत जात होतास तो कशाला?"

माझा हा प्रश्न सोन्या बागलाणकराच्या जिव्हारी लागला असावा. कारण असे काही जिव्हारी लागले की तो खिशातल्या हातरुमालाने खसाखस कपाळावरचा अबीरबुक्का पुसावा तसे कपाळ पुसतो. त्यामुळे जिव्हार हा अवयव सोन्याच्या कपाळाच्या आसपास असावा, असे मला नेहमी वाटत आले आहे. व्यवस्थित कपाळ पुसून झाल्यावर, पडलेला उमेदवार विजयी उमेदवाराचे अभिनंदन करताना जसा क्षीणपणाने हसून 'अभिनंदन’ म्हणतो नेमक्या त्याच स्टाइलने हसून सोन्या बागलाणकर म्हणाला, ''ते तुला ठाऊक आहे."

"सॉरी हं सोन्या - आपलं क्षमस्व, मला तुझी खपली काढायची नव्हती."

त्याचे काय झाले, त्या वेळी सोन्या बागलाणकर हा तारा बेलसरे नामक ग्रहदशेच्या फेऱ्यात सापडला होता. तिच्या नादाने सोन्या कम्युनिस्ट होऊन आरडाओरडा करत होता. पुढे महाराष्ट्राला मुंबई मिळायची ती मिळाली. सोन्याला मात्र तारा मिळाली नाही. गड आला, पण सोन्याच्या बाबतीत काहीतरी भानगड झाली.

ताराने एका आय० ए० एस० ऑफिसरशी लग्न केले. मुंबई सोडून दिल्लीला गेली. सोन्याने कम्युनिस्ट पार्टी सोडून, सूड म्हणून जनसंघात गेला. मला तो प्रसंग आठवला. ह्याच हॉटेलात जगात खरं प्रेम असतं का?'' हा प्रश्न त्याने मला विचारला होता.

"गप्प काय बसलास?" सोन्या बागलाणकराच्या दटावणीने मी भानावर आलो.

"तारा बेलसरे तुला बनवणार हे मी तुला बजावलं होतं, सोन्या बारा पिंपळावरची--"

आणि एकदम माझ्या लक्षात आले की बारा पिंपळावरच्या मुंजासारखी बायकांसाठी मातृभाषेत म्हण नाही. मला हळूहळू मातृभाषेची कीव यायला लागली. साधा सोडा नाही ज्या भाषेत मागवता येत, त्या माझ्या मातृभाषेचे भवितव्य मला कठीण दिसायला लागले.

“मग तुझं काय म्हणणं, सोन्या-इंग्लिश भाषा राहिली पाहिजे-"

"त्याशिवाय गत्यंतर नाही."- तो.

"मग हिंदी राष्ट्रभाषा कां नको?''- मी.

"आणि उद्या तुझी मद्रासला ट्रान्सफर झाली तर?" - तो.

"कशावरून?"

"ब्रँच निघते आहे."- तो.

"आपण नाही जाणार." - मी.

"नाही जाणार तर घरी बसा.''- तो.

"आणि खा काय?"

"मातृभाषा." शेवटली चकती पॉकेटमधे घालणारा कॅरमवाला समोरच्या कॅरमवाल्याकडे बघतो तसे माझ्याकडे पाहत सोन्या म्हणाला.

“ठीक आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे इंग्रजीतून सगळा व्यवहार सुरू झाला."

"समृद्ध भाषा आहे! यू कॅन् एक्सप्रेस व्हॉटएव्हर-'' त्या समृद्ध भाषेतला हवा तो शब्द सोन्याला मिळेना.
“समृद्ध! ठीक आहे. इंग्लिशमधून मावशीला कांद्याचे थालीपीठ करायला सांग! इंग्लिशमधून अळवाची जुडी घेऊन दाखव! इंग्लिशमधून आंघोळीचं पाणी काढलं का असं बोबलून दाखव. इंग्लिशमधून आंबाडीच्या भाजीवर झणझणीत-झणझणीत हं- तेलाची फोडणी घालून दाखव!" - मी सरबत्ती सुरू केली.

सोन्या बागलाणकर अंतर्मुख झाला. शर्टाच्या पहिल्या बटणाच्या काजापाशी हनुवटी खोचल्यानंतर 'अंतर्मुख'च म्हणतात अशी माझी समजूत आहे. नसेल तर थोडक्यात मी सोन्या बागलाणकराच्या इंग्लिशचा पतंग काटला. “सोन्यासाब बागलाणकरजी, अब तुमकू गप बैठनेकू क्या हुवा? जबान उघडो!”
जबान वगैरे हिंदी शब्द मी मवाल्यांच्या भांडणात ऐकलेले आहेत.
“तुझ्या बोलण्यात काही पॉइंट आहे."

सोन्या बागलाणकराने त्यानंतर इडलीचा तुकडा ज्या असहायपणाने तोंडात टाकला ते पाहून मला त्याची दया आली. म्हणून मग मी “सोवळ्यातले पापड कर इंग्लिश... भाजणीच्या चकल्या कर इंग्लिश.... अळिवाचे लाडू, डोक्याला बांधायची टापशी, पंचा, पदर, कासोटा, 'गपूच्या खेपेपासून किनई हे असंच होतंय' -'इश्श'- कर इंग्लिश..." - हे सगळे माझ्या भात्यातले बाण परत भात्यात टाकले. नाहीतर ‘कर ह्याचं इंग्लिश' म्हणून मी सोन्या बागलाणकराचा नि:पात किंवा पब्लिकच्या भाषेत भुसा किवा भुक्ना म्हणतात ते करणार होतो.
"बरं मग माझं राहू दे. तुझं भाषाविषयक धोरण काय?''

सोन्या बागलाणकराने संपूर्ण नांगी टाकली होती. मीदेखील मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे म्हणून त्याला माझे भाषाविषयक धोरण समजावून द्यायला लागलो.

“सुरुवातीचंषशिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे. म्हणजे मराठी मुलांचं मराठीत, गुजराती मुलांचं गुजरातीत, कानडी मुलांचं कानड़ीत, बंगाली मुलांचं बंगालीत, ओरिसातल्य मुलांचं-”

वास्तविक मी कानडी मुलांपर्यंतच थांबायला पाहिजे होते, पण बाजी आपली आहे हा थाटात मी उगीचच ओरिसात शिरलो. त्यांची मातृभाषा कुठली ते मला ठाऊक नव्हते. सोन्या बागलाणकरही विचारात पडला. त्यामुळे रेट्न म्हणालो, ''-ओरिसातल्या मुलांचं ओरिसीत-"

“उरियात.''- सोन्या बागलाणकराने तेवढ्यात एक मार्क मिळवला.

“तेच." -मी.

“पण मग गोव्यातल्या मुलांचं?"

“जरा थांब, वादग्रस्त मुद्यांना मग हात घालू." मी उरलेल्या इडलीला हात घालत त्याला डावलले. ''तव व्यायइक वय्यंत इहण-"

"इडली संपव आधी- आणि स्पष्ट बोल.”

"मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण--" मी थोडासा खजील झालो. खाता खाता बोलायच्या माझ्या खोडीबद्दल असे त्याने मला चापणे रुचले नव्हते.

"हं!" - सो. बा.

“तर ते शिक्षण मराठीत." - मी.

“इंग्लिश अजिबात नाही."

“आहे तर! आठवी ते अकरावी इंग्लिश,"

“समज," सोन्या पुन्हा चमचा रोखीत बोलायला लागला, "समज, 'अ' हा मुलगा मातृभाषा मराठी आणि चार वर्षं इंग्लिश, एवढ्याच भाषा जाणतो. समज, हा 'अ' पंजाबात गेला--" - सो. बा.

“पण 'अ' हा माणूस पंजाबात जाईल कशाला?" - मी.

"समज गेला." - सो. बा.

“बरं, गेला." -मी.

“गेला आणि सरदारजीच्या टॅक्सीत बसला. सरदारजीला मराठी कळणं शक्य नाहीं. इंग्लिशची खात्री नाही. देन व्हाट डझ ही डू?"

"एक सांगायचं विसरलो मी तुला, सोन्या. साइड् बाय् साइड् हिंदी शिकलंच पाहिजे."

“म्हणजे आमच्या पोरांना ताप!"

“तुला कुठं पोरं आहेत?”

“माझ्या औरस पोरांना म्हणत नाही मी."

सोन्याचे हे ऐकून मी दचकलोच. सोन्या बागलाणकराचे हे अंग (वस्त्र?) मला ठाऊक नव्हते.

“औरस?”

“म्हणजे माझ्या स्वत:च्या पोरांविषयी नाही- पण आपल्या एकूण मराठी पोरांना ताप.”

"तो कसा?"

"ऐक. हा 'अ' नावाचा मराठी मुलगा" पाण्याचा ग्लास पुढे ठेवत सोन्या बागलाणकर म्हणाला.
सोन्याला ही 'अ ब क' ची फार सवय आहे. याचं आणि ताराचं बिनसलं याचं कारण अ ब क हेच. ताराच्या बापाचा त्यांच्या लग्नाला विरोध आहे हे कळल्यावर वास्तविक सोन्या बागलाणकरापुढे दोन मार्ग होते. (अ) म्हाताऱ्याची कवळी उतरवून ठेवणे; (ब) त्याला फुकट मालीश करायला जाणे. त्याऐवजी सोन्या ताराला घेऊन हॉटेलात गेला. आणि ताराला ह्या प्रसंगातून पार कसं पडायचं हे या काळ-काम-वेगाच्या भाषेत समजावून दयायला लागला.
"बरं का तारा... हा कप. समज, हा तझा बाप. आणि ही किटली. ही समज तुझी आई."

आपल्या आईला स्वत:चा प्रियकर चक्क किटली म्हणतो हे ऐकून कुठली स्वाभिमानी मुलगी तयार होईल? तिने स्पष्ट सांगितले, "बाबांना कपबिप म्हणायचं कारण नाही. इथं तू त्या कपाचा कान धरला आहेस. पण ते तुझा कान धरून तुला बाहेर फेकून देतील. आणि माझी आई किटली काय?–तुझी आई बादली आणि बाप हौद! गुड बाय!" असे म्हणाली आणि फॅमिली रूमचे दार आपटून गेली. ही कथा स्वतः सोन्या बागलाणकरानेच मला सांगितली होती...("... काय सांगू- गेली ती गेली- इथं बाकी कम्युनिस्ट मुलगी हवीच होती कुणाला म्हणा! दोन स्पेशल चहा एकट्यानं प्यावा लागला मला - वेटर लेकाचा एक ट्रे परत नेईना..." सोन्याचे दु:ख.) तेव्हापासून चहाचा ट्रे आला की सोन्या बागलाणकराची सासुरवाडी आली म्हणतो आम्ही. सोन्याच्या गैरहजेरीत. तर हे एक विषयांतर झाले.

"पण सोन्या, अ ब कशाला?- समज,बंडू नावाचा एक मराठी मुलगा आहे." - मी.

"जरा चांगलं नाव ठेव." - सोन्या बागलाणकर.

"सुभाष म्हण." मी.

“पण हे नाव बंगाली वाटतं."

“मग बंडू हेच नाव ठेवू. शिवाय बंडू हे प्रातिनिधिक नाव आहे."

असला एखादा शब्द वापरला की सो. बा. निपचित पडतो थोडा वेळ.

"ठीक आहे. बंडू हा मराठी मुलगा. त्याला तुझ्या म्हणण्याप्रमाणे मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तीन भाषा शिकाव्या लागणार.. आणि उत्तर-हिंदुस्थानी मुलाला मात्र फक्त हिंदी आणि इंग्रजी म्हणजे दोनच. मग मराठी मुलावर हा अन्याय कां?

"त्याला उपाय आहे.'' मी सर्वांगीण विकासाचा विचार करणारे लोक असतात तसा चेहरा करून सुरुवात केली, "तर त्याला उपाय काय?... दो डोशा लाव.''

सोन्या चमकला. मग त्याच्या लक्षात आले की समोरची इडली संपली होती. आता हा नवा मद्राशी मॅनेजर आल्यापासून एक इडली आणि एक कॉफीवर दोन तास ढकलता येत नव्हते. गेल्याच आठवड्यात भारताच्या सीमारक्षणाविषयीचा आमचा वाद आम्हाला त्याच्या दटावणीमुळे आवरावा लागला होता.
“काऽना पिनिश हवा तो टॅबल काऽऽऽली करो जी-कष्टमर वेऽऽट करता ऐ. तुम शिंपली यक् कप काऽऽऽऽऽफि लेकर दो गंऽऽऽटा कालिपिली भक्भक करकू बटता ऐऽऽ, ये क्या दरमश्याला ऐ क्याऽऽ ?.

यापुढे फक्त मराठी हॉटेलात जायचे, असे ठरवून बाहेर पडलो होतो. दोन दिवसांत निश्चय बदलला. कारण पहिल्याच मराठी हॉटेलात बोर्ड होता : 'हॉटेल ही खाण्याची जागा आहे. वायफळ गप्पा मारत बसण्याची नव्हे. ग्राहकांनी ह्याची नोंद घ्यावी.' आम्ही नोंद घेतली आणि पुन्हा ती पायरी चढलो नाही. म्हणजे पुन्हा हा मद्राशाचे पाय धरणे आले.

"सादा के मसाला-"

“मसाला."

"कडक भाजना हं,'' सोन्याने वेटरला जाता जाता बजावले. बोला."

"तर मी काय म्हणत होतो? आपला बंडू-"

"बंडू?"

"उदाहरणार्थमधला--"

"तर बंडू मराठी असल्यामुळे शिकतोय तीनतीन भाषा--"

"वेट्--"

"चार!"

"चार कशा?"

"कशा काय? मातृभाषा, राष्ट्रभाषा, प्लस इंग्लिश, प्लस सेकंड लँग्वेज. व्हेअर आर यू माय फ्रेंड?" - विजयी सोन्या.

"खरंच, संस्कृत!" --पराजयी मी.


"डोसाको टायम् लगेगा साब.''

"दो उपीटम् लाव... म्हणजे आपल्या मुलांना चार आणि हिंदी मुलांना तीन."

"त्याला उपाय आहे." भाषा ह्या विषयावर माझे विचार इतके परिपक्व झाले असतील अशी मलाही कल्पना नव्हती.

"सांग उपाय."- सोन्या.

“उत्तर हिंदुस्थानातल्या मुलांना एक साउथ इंडियन लँग्वेज कंपल्सरी, कानडी, तेलगु किवा तामीळ."


"शहाणा आहेस! म्हणजे उत्तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक शाळेत तीन मद्राशी नेमावे लागतील. म्हणजे मद्राशांना आणखी जॉब्ज.'' - सोन्या बागलाणकर 'मद्राशी' हा शब्द फारच व्यापक अर्थाने वापरतो. “आणि पोरांना चारचार भाषा शिकायच्या म्हणजे क्रुएल्टी आहे. शिवाय गणित असतं." सोन्याला एखाद्याला बह्मांड आठवावे तसे शालेय जीवनातले गणित आठवते. "शिवाय इतक्या लांब मद्राशी जाईल कशाला?"

'सोन्या, मद्रासी म्हणजे मराठी नव्हे, गिरगावातून दादर ब्रँचला ट्रान्सफर झाल्यावर ठणाणा करणारे! ती धाडसी जात आहे-"

“बरं समज, उत्तर हिंदुस्थानातल्या'अ' गाववा 'ब' हा मुलगा मद्रासी भाषा शिकला." अब ही जित्याची खोड आहे म्हणून मी सोडून दिली. "तर तो ती भाषा बोलणार कोणाकडे? आणि जर बोलला नाही तर मॅट्रिक झाल्यावर विसरणार, आपण संस्कृत शिकून विसरलो नाही का?"

हा सोन्याचा मुद्दा विचारात घेण्यासारखा होता. शाळा सोडल्यानंतर लग्नात एकदा भटजी 'मम म्हणा' म्हणाले त्या वेळी मी चुकून 'मम मे अस्मान् नौ अस्माकम् न:'असे ओरडलो होतो. भटजी भेदरून लाजाहोमात पडत होते. जानव्याला धरून खेचले.

“मला वाटतं सोन्या, संस्कृत ड्रॉप करावं. आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरिन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जाते. इंग्लिश मात्र मस्ट बी कंपल्सरी... उप्पीट थंडा क्यूं लाया?"

"गरम नही साब- " वेटरने संपर्काधिकारी करतात तितक्या अलिप्तपणाने आणि उपीटाइतक्याच थंडपणाने खुलासा केला.

‘‘पण संस्कृत काढून कसं चालेल? आपलं इंडियन कल्चर संस्कृतमधे आहे. सेकड लँग्वेज पाहिजेच."

"त्याला उपाय आहे. स्स्स स्सस्स! (दाढेखाली उप्पीट, सांजा अगर पोहे खाताना खडा सापडला की होणारा आवाज यापेक्षा वेगळ्या रीतीने लिहून काढता येत नाही याबदल दिलगीर आहे. असो.).... ही मद्राशी हॉटेलं आपण पंजाब्यांना कॅप्चर करायला सांगितलं पाहिजे. तंदुरी चिकनमध्ये खडा तरी नसतो."

"सहा रुपये पडतात. इथं तीस पैसे. सहा रुपयांपेक्षा खडा बरा... मरू दे. सेकंड लँग्वेजचं बोल."

‘‘फ्रेंच ठेवावी."

"त्यापेक्षा जर्मन बरी."

"मग रशियन का नको? काय प्रोग्रेस झालाय. उद्या चंद्रावर जातील रशियन्स आपल्याला सालं डोंबिवलीला जायचं तर गर्दीत जीव हैराण! खरं म्हणजे सायन्सवर जोर पाहिजे. आर्टस् कॉलजेस बंद केली पाहिजेत. काय करायचंय संस्कृत, अर्धमागधी, लॉजिकबिजिक" - मी.

"मग मराठी तरी कशाला? सध्याचं एज सायन्सचं आहे."

"पण मातृभाषा पाहिजे." - मी. तेवढ्यात मसाला डोशा आला. मी वेटरला उपीट दाखवीत म्हटले, “इसमें खड़ा है सब.”

“कौन खडा है?" हा वेटर गेल्या जन्मी एस्किमो असावा इतका थंड आहे.

''हमारा काका खडा है!" मी उखडलो.

"उसको कॉफी पिलाव." वेटर निर्लज्जपणाने बशा उचलून घेऊन गेला.

“काय माजले आहेत. नॉनमराठी लोकांना हाकलून दिलं पाहिजे मुंबईतून. मुंबईत मराठीच बोललं पाहिजे." एवढे बोलून मी जीभ चावली. सोडा मराठीत मागवता येत नाही हे आठवले. "तर भाषाविषयक धोरणाचं काय आहे सोन्या, ती एक समस्या आहे.”

"पण ती सोडवायची कशी?"

"सेकंड लँग्वेज रशियन करावी."

"मग अमेरिकेला काय वाटेल? - आपल्या अलिप्ततेच्या धोरणाला बाधा येते. वास्तविक आपण आशियाई."
"कोण?"

"आशियाई- आशियातले. आपल्याला एक तरी आशियाई भाषा यायला नकों?" - सोन्या.

"पण आशियाई भाषा कुठली?''- मी.

"तिबेटी किंवा ब्रह्मी. शिवाय आता आफ्रो-आशिया एक होतोय. म्हणजे अरेबिक किवा पर्शियन् आलं पाहिजे."

“म्हणजे एकूण काय झालं?" - मी.

"तूच सांग" - तो.

"म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी, रशियन-" मी.

"मला वाटतं, संस्कृत हवीच." - तो.

"ठीक आहे. मराठी, इंग्लिश, हिंदी, रशियन, संस्कृत, आफ्रो-आशियाईपैकी एक भाषा"- मी

"मद्राशी राहिली.''- तो.

“हो, मराठी, इंग्लिश, हिंदी, तामीळ, तेलगु किंवा कानडी, रशियन, संस्कृत, अरेबिक किंवा पर्शियन किंवा ब्रह्मी - थोडक्यात म्हणजे फ्रुट सॅलडच्या बाटलीबरोबरच्या कागदावर असतात तेवढ्या भाषा एका मुलाला किंवा मुलीला यायला हव्यात. मला वाटतं सोन्या, ह्यापेक्षा माझं भाषाविषयक धोरण जास्त चांगलं आहे.”

'कुठलं?"

"गप्प बसण्याचं."

"का म्हणून?" सोन्याने टेबलावर मूठ आपटली.

"सांगतो. तू मूठबीठ आपटू नकोस. तो मॅनेजर बघतोय."

"मग इथं काय फुकट घालतोय काय खायला?"

"म्हणजे काय टेबलावर मुठी हापटायच्या?- ते जाऊ दे. हे भाषाविषयक धोरण अंगाशी कसं येतं याचं उदाहरण सांगतो, तुला शांत्या दिघे ठाऊक आहे?"

'हो. सेंट्रल टेलिग्राफमधे त्याची कझिन् होती तोच ना?- लग्न झालं का रे तिचं?"

"झालं."

"कुणाशी?"

"शांत्याशीच."

"पाजी!'' समोरचा डोशा चिरडीत सोन्याने हा शब्द दाताच्या आत उच्चारला.

"कां रे?"

"मी तिच्यासाठी शांत्याला कितीतरी चांगलं स्थळ सुचवलं होतं-"

"कुणाचं?"

"शांत्या दिघ्यात तिनं माझ्यापेक्षा काय जास्त पाहिलं?"

"म्हणजे तू स्वत:चं स्थळ सुचवायचं?"

“कां नाही?'' सोन्याच्या चेहऱ्यावर अपार खिन्नता होती.

''सॉरी!.. तर हा शांत्या दिघे मराठीशिवाय बोलायचं नाही अशी प्रतिज्ञा करून बसला. कां?"

"कुमुदवर इंप्रेशन मारायला."

"कोण कुमुद?"

"तीच ती त्याची कझिन्.'

“असेल. तसं असेल. तिला घेऊन मेट्रोला गेला. आणि तिथल्या तिकिटाच्या खिडकीतल्या माणसाला म्हणाला, 'अडीच रुपये शुल्काच्या दोन प्रवेशपत्रिका द्या.' खिडकीमागल्या माणसानं दहा वेळा इंग्लिशमधून विचारले. ह्याचे आपले एकच- 'अडीच रुपये शुल्काच्या दोन प्रवेशपत्रिका द्या.' मागले लोक ओरडायला लागले. मॅनेजर आला. हा क्यू सोडायला तयार नाही. मॅनेजर म्हणाला, 'एक्सक्यूज मी सर.' शांत्या पेटलेला. तो म्हणाला, 'सर गेला खड्यात!' मॅनेजरनं पोलिसला बोलावलं. हा त्या सबइन्स्पेक्टरला म्हणतो, 'तुम्ही कोण?'

'सबइन्स्पेक्टर ऑफ पोलिस.'
'मराठीत बोला. उपपर्यवेक्षक म्हणता येत नाही तुम्हांला?' तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, ‘पियेला आदमी हैं. लोक हसले. पो. स. इन्स. भडकला. 'दात क्या निकालता है? मग लोकांनी निकाललेले दात लपवले. इकडे शांत्याची कझिन घाबरली. तिने त्या सबइन्स०ला सांगितले की, टू-एट्ची दोन तिकिटं पाहिजे आहेत.' स. इ. मॅनेजरला म्हणाला, 'इसको तिकिट कायकू नय देता?'

'किसको?' - मॅनेजर.

'इसकू- और इसके इसकू-'

'हम किधर नहीं देता? वेल जंटलमन, हॅव आय रिफ्यूज्ड?'

'मराठीत बोल. आता यापुढे इये मराठीचिये नगरी इंग्रजीची ऐट नको. पौरुषासि अटक गमे जेथ दुस्सहा-’

मग त्या सबइन्स्पेक्टरच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणाला, 'साहेब, अस्सल मराठी असून इंग्लिश सिनेमा बघता. मग इंग्लिश सिनेमाचे तिकिट इंग्लिशमधे का नाही मागत? व्हेन इन् रोम, रोम लाइक रोमन्स रोम, अशी म्हण आहे'... शान्त्याला पटलं. तेव्हापासून शांत्या मराठी सिनेमाला मराठीत तिकिट मागतो. हिंदीला हिंदीत. सत्यजित रायचे सिनेमे बघत नाही."

"त्याला बंगालीत तिकिट मागता येत नाही. तेव्हा आपण बोध काय घ्यायचा?''

"शांत्याचं शेवटी कुमुदशीच लग्न झालं. क्क्क्याय?"

-- सोन्याने हा बोध घेतला.

“हा बोध नव्हे सोन्या. बोध असा, की भाषाविषयक धोरण कडक ठेवणे हे आपले काम नव्हे.”

"हे बाकी पटलं. माझीच गोष्ट घे."

"सोन्या, हे आपलं पंचतंत्रातल्या गोष्टीसारखं चाललंय. कोल्हा सिंहाला म्हणाला, दमनकाची गोष्ट ठाऊक आहे का?-- मग दमनकाची गोष्ट. त्याचं तात्पर्य सांगताना दमनक कर्कटकाची सांगतो. मग कर्कोटक उंदराची सांगतो. उंदीर मांजराची-"

“नाही. माझी गोष्ट लहान आहे. नंदिनी चौबळ ठाऊक आहे तुला?”

"नाही."

"खारला आठ बावनच्या लोकलला चढते ती-"

“अरे, आठ बावनच्या लोकलला खारला काय एकच बाई असते?"

"बाई काय म्हणतोस? शी इज स्वीट ट्वेन्टीसेवन!"

"ठीक आहे. तिचं काय?"

"तिचं आणि आमचं गेल्या रविवारी भाषेवरून मोडलं."

"म्हणजे?"

"तेच ऐक. गेल्या रविवारी तिला घेऊन 'तांबे आरोग्यभुवना'त गेलो.

"भट लेको तुम्ही!"

"एक्झाक्टली हेच वाक्य."

''कुणाचं?"

"नंदिनी चौबळचं- ती सी. के. पी. आहे."

"मगाशी सोन्याने सी. के. पी. म्हणून इडली का चिरडली ते आता कळले.

"मग? तिला काय इंग्लिशमधून प्रेमपत्र लिहिलंस की काय?"

"प्रेमपत्र काय लिहिता? तेच तेच लिहून कंटाळा आलाय मला. मी सरळ वधुवरसूचकमंडळातून पत्ता घेऊन भेटलो होतो. जवळजवळ सगळं ठरलं होतं. तिचा बापसुद्धा इंटरकास्ट मॅरेजला तयार होता."

"किती मुली त्याला?"

"सेवन्!"

“मग तो इंटरनॅशनल मॅरेजलासुद्धा तयार असेल."

“ऐक. तिला घेऊन 'तांबे आरोग्यभुवना'त गेलो. म्हटलं, टु नो ईच अदर ऑफ मोअर म्हणजे मोअर ऑफ..."

"समजलं. -अधिक परिचय वाढावा."

"राइट. आमचे हेच होतं. नको त्या ठिकाणी नको ती भाषा येते. तर--"

“नंदिनी चौबळ.”

“हो, तर मी म्हटलं, 'आपण दोन ताटं मागवू या.' तशी ती पिचकन हसली.”

"का?"

“मलाही कळेना. मी विचारलं, 'हसलात का मिस् चौबळ?' तर म्हणते, 'अय्या! ताट काय म्हणता?"

हे वाक्य म्हणताना सोन्या बागलाणकराने तिच्यासारखे म्हणून दाखवण्याचा जो काही अभिनय करून दाखवला आणि चेहराबिहरा फुगवला त्यावरून मिस नंदिनी चौबळ ही बागलाणकरऐवजी महाबळ व्हायला अधिक योग्य असावी, अशी माझी खात्री झाली. सोन्या बिचारा लग्नाला भलताच पिकलाय. ते एक असू दे.

“अरे पण सोन्या, ताट म्हणालास हात चूक काय आहे?”

“तूच पाहा! मी हेच विचारलं. तर मला म्हणाली, 'डिनर म्हणा.' मी म्हटले, 'आल राइट! डिनर.' वास्तविक दुपारची वेळ. म्हणायचंच तर लंच' म्हणायला हवं पण मनात म्हटलं आपली वेळ बरी नाही. मी त्या वेटरला म्हटलं, ‘दोन डिनर'– तर तो वेटर दीडशहाणा निघाला. मला म्हणतो, 'साहेब, सरळ दोन ताट म्हणा ना!' मी तिथल्या तिथं थोतरणार होतो त्याला पण म्हटलं जाऊ दे. सीन नको. वर मला विचारतो, 'साधं ताट की स्पेशल?' मग मी तडकलो. म्हटलं, स्पेशल हा काय मराठी शब्द आहे? साधं की विशेष म्हण... आज गोड काय आहे?'

'श्रीखंड.'

'मला श्रीखंड नको.' नंदिनी चौबळ म्हणाली.

'का? श्रीखंड आवडत नाही?'

'कालच आमच्या ऑफिसची पार्टी झाली होती. त्यात श्रीखंडच केला होता.'

'केला होता?- केलं होतं म्हणायचं.'

'केला होता हेच बरोबर.'

'कसं शक्य आहे? बासुंदी ती, श्रीखंड ते, लाडू तो-'

‘भटांत म्हणत असतील.' नंदिनी म्हणाली.

‘मग परभटांत काय म्हणतात?' कुठल्या मृत पूर्वजाचं रक्त माझ्या अंगात भलत्या वेळी उसळले देव जाणे. वास्तविक माझ्यात कम्यूनल स्पिरिट अजिबात नाही. मी चिकनसुद्धा खातो, 'परभट' म्हटल्यावर ती भडकली.

'आय अॅम सॉरी मिस्टर बागलाणकर, पण आपलं लग्न होणं शक्य नाही. मला संकुचित मनाच्या माणसाशी संसार करता येणार नाही. ज्यालात्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो, माझं मराठीवर प्रेम आहे.'

'अहो, पण माझंही आहे... तू काय इथं करतो आहेस?' मी वेटरला कचकावला. तो पळाला. 'मिस चौबळ माझंही मराठीवर प्रेम आहे.'

‘दिसतंय, मला परभट म्हणून-‘

'तुम्ही मला भट नाही म्हणालात?'

‘मग तुम्ही आहांतच भट!'

‘मग तुम्ही-’

'आम्ही सी. के. पी. आहोत.'

‘आम्हीसुद्धा डी. आर. बी. आहोत.'

'डी. आर. बी. – ही काय जात आहे की मोटारचा नंबर?'

'देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण-'

'आय् ॲम् सॉरी- आपलं जमणार नाही. एखादी ताट वाढणारी काकू शोधा.'

'थांबा मिस चौबळ. निदान जेवून तरी जा. मी दोन डिनर्स मागवली आहेत.'

'तुम्हीच गिळा!'- असं म्हणून गेलीसुद्धा." असे म्हणून सोन्या बागलाणकर स्तब्ध झाला आणि हातरुमालाने कपाळ घासायला लागला.

“मग तू काय केलंस?"

“काय करणार? दोन ताट पुढ्यात घेऊन जेवलो."

सोन्या बागलाणकराचे एक बरे आहे. दर प्रेमभंगाला त्याला दुप्पट जेवायलाखायला मिळते.

“तूच सांग, श्रीखंड तो, ती का ते, याच्यावर कुणाचं लग्न मोडलेलं तू ऐकलं आहेस?"

"प्रश्न श्रीखंडाचा नाही, सोन्या. मराठी माणूस तत्त्वासाठी काय वाटेल ते मोडेल. हा भाषेच्या अभिमानाचा प्रश्न आहे."

"अरे, पण मी काय कानडी आहे?"

“तेही खरंच."

“मग आता सांग, आपल्यासारख्यांनी भाषाविषयक धोरण काय ठेवायचं?"

मला वाटले होते, सोन्या इडली, उपीट आणि डोशा यानंतर मूळ प्रश्न विसरला असेल. पण नाही. भलता चिवट.

"माझं भाषाविषयक धोरण एकच आहे, सोन्या."

“कुठलं?"

“नरमाईचं."

“का म्हणून?"

“आपल्याला दुसरं कसलंही धोरण परवडत नाही म्हणून. हे बघ, आपण एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधी आहो."

“कुठला वर्ग?"

"धक्के खाणारा! सोन्या, हापिसला जाताना आपण लोकलमधे म्हण किंवा बसमधे म्हण, धक्के देणारे की खाणारे?''

“खाणारेच."

“आपण क्यू मोडून घुसणारे का?''

"कंडक्टर 'जगा नही, उतरो' हे नेमकं आपल्यालाच सांगतो की नाही?"

"आपल्यालाच."

"देवळांत चपला कुणाच्या चोरीला जातात?"

"आपल्याच. आणि कुठंही गेलं तरी छत्र्यासुद्धा आपल्याच." - सोन्या.

“सगळ्या चांगल्या पोरी कुणाचे हात धरून पवतात?" - मी.

"दुसऱ्यांचे" - तो.

"आपल्या संडासाच्या टाकीला पाणी असतं?" - मी.

“नाही." - तो.

‘‘शब्दकोडं आपल्याला फुटतं?" - मी.

"नाही.”–तो.

“मराठी शाळेपासून मॅट्रिकपर्यंत पहिले नंबर कोणाचे आले?" - मी.

"दुसऱ्यांचे." - तो.

"आपल्या सख्ख्या, चुलत अगर मातुल घराण्यांतल्या एका तरी माणसाला इंग्लंडला जायची स्कॉलरशिप मिळते?'' मी.

"नाही." - तो.

"पानवालाच घे. दोन गिऱ्हाइकं एकदम आली. त्यांपैकी एक आपण. तर पान प्रथम कोणाला देतो?"- मी.

"दुसऱ्याला." - तो.

"प्रमोशन कुणाला मिळतं?" - मी.

“दुसऱ्याला.”–तो.

"हापिसात दांड्या कोण मारतं?" मी म्हणालो.

"दुसरे." तो उत्तरला.

"म्हणजे हे जग आपलं की दुसऱ्याचं?"

"आपलं काय आहे सालं ह्या जगात?"

"मग भाषाविषयकच काय, कसलंही धोरण ठरवणारे आपण कोण सांग? आपल्या इच्छेला मान देऊन आजवर कुणी वागलंय का?"

"कोणी नाही. अरे, आम्ही रेडिओ लावतो त्या वेळी नेमका कुटुंबनियोजनावर परिसंवाद. लोकांनी लावला की मात्र ‘बोल राधा बोल संगम होगा के नही.' –तात्पर्य, जग लोकांचं."

“मोठ्यानं गाऊ नकोस."

“तर मग कॉफी मागव."

"रंड कप कॉफी." सोन्या ओरडला.

“काऽऽय?"

"मद्राशाच्या भाषेतलं एवढंच येत मला."

सोन्या बागलाणकराने भाषाविषयक धोरण बदलले होते आणि मीही!

---------

पु.ल. देशपांडे
आमचे भाषाविषयक धोरण
पुस्तक -- अघळ पघळ
a