Leave a message
Showing posts with label बाळासाहेब ठाकरे. Show all posts
Showing posts with label बाळासाहेब ठाकरे. Show all posts

Saturday, January 29, 2022

पु.ल. आणि बाळासाहेब

आचार्य अत्र्यांनंतर, ज्यांच्यावर त्यांच्या गुणदोषांसकट महाराष्ट्राने मनस्वी प्रेम केलं ते दोन दिग्गज म्हणजे पु.ल. देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे, एक विनोदसम्राट तर दुसरे हिंदुहृदयसम्राट. ही बिरुदंही त्यांच्या नावांमागे जनताजनार्दनानेच आदरापोटी लावली होती. एकाने साहित्यक्षेत्रात शब्दरूपी केशराचे मळे फुलवले तर दुसऱ्याने शड्डू ठोकून, राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतील आणि आपल्या अणकुचीदार कुंचल्याने भल्याभल्यांचं वस्त्रहरण केलं! दोघांची स्मरणशक्ती प्रखर होती. त्यांचा हात नेहमी जनतेच्या नाडीवर अचूकपणे ठेवलेला असायचा. पु.लं.नी आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या जोरावर साहित्याच्या प्रांतात स्वतःकरता एक मानदंड तयार केला, तर बाळासाहेबांनी आपली वाणी-लेखणी आणि कुंचला असा भेदक ‘त्रिशूळ’ वापरून राज्यकर्त्यांची (त्यात स्वकियही आलेच) नींद हराम केली!

पु.ल. हे बाळासाहेबांचे शालेय शिक्षणात शिक्षक होते असा कधीकधी उल्लेख होतो पण तशी वस्तुस्थिती कधीच नव्हती. पु.ल. आणि सुनीताबाई हे दादरच्या ओरिएंट स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना, त्या शाळेत बाळासाहेब, यांच्या ज्येष्ठ भगिनी दि. सुशीलाबाई आणि धाकटे बंधू श्रीकांत हे विद्यार्थी होते. गुणग्राही बाळासाहेबांनी एकलव्याच्या निष्ठेने पु.लंचं बहारदार वक्तृत्व, नाटक-सिनेमांतून पुढे प्रत्ययास आलेलं प्रभावी सादरीकरण, प्रसन्न विनोदशैली हे सर्व गुण एखाद्या टीपकागदाप्रमाणे टिपून घेतले आणि आत्मसातही केले. त्या दोघांत सुमारे १० वर्षांचं अंतर होतं. पण त्यांच्या परस्परांविषयी असलेल्या आपुलकी आणि जिव्हाळा यांमध्ये कधीच अंतराय आला नाही. ज्याप्रमाणे आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर पु.लं.नी साहित्य-नाट्य आणि संगीत या तिन्ही क्षेत्रांत आपल्या नावाचा एक रूळ तयार केला तर बाळासाहेबांनी आपलं संघटनाकौशल्य आणि व्यंगचित्रकार या गुणांमुळे स्वतःचा ठसा उमटवणारा एक रूळ बनवला. हे दोन्ही रूळ, आगगाडीच्या रुळांप्रमाणे नेहमी समांतर अंतरावरून जीवन वाटचाल करत राहिले. क्वचित या रुळांचं घर्षणही झालं, पण ते अळवावरचं पाणी होतं.

दोघांच्याही आयुष्यातली पहिली चार दशकं प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्यातच गेली, पु.लंनी शिक्षण सोडून नाट्य आणि चित्रपट या क्षेत्रांत झेप घेतली. त्यांची आयुष्यातील पहिली आवड ही संगीतच राहिली. त्यांचं पहिलं नाटक ‘तुका म्हणे आता’ हे पहिल्या प्रयोगाच्या तिसर्या अंकातच कोसळलं होतं! ‘गुळाचा गणपती’ हा तर सबकुछ पु.ल. असा चित्रपट होता. लेखन, संगीत, दिग्दर्शन, प्रमुख भूमिका सर्व गोष्टी त्यांनी एकहाती केल्या होत्या. पण चित्रपटसृष्टीइतकी कृतघ्न की पु.लं.ना त्या चित्रपटाच्या प्रीमिअर शोचं आमंत्रणही नव्हतं. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, ‘ही कुणी छेडीली तार’, ‘इंद्रायणी काठी’ अशी अप्रतिम संगीतबद्ध केलेली पु.लं.ची गाणी अजूनही रसिकांच्या कानामध्ये गुंजन करत असतात. सुरुवातीच्या काळात पु.ल. – पुरुषराज अळूरपांडे अशा टोपण नावाने लेखन करत असत.

बाळासाहेब चित्रकलेचं शिक्षण घ्यायला कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये गेले नाहीत. ती त्यांच्या रक्तात ती उपजतच होती. त्याला प्रबोधनकारांनी प्रोत्साहन दिलं. बाबूराव पेंटरांनी उत्तेजन दिलं. व्यंगचित्र काढणं म्हणजे एखाद्याचं व्यंग चितारणं नव्हे याची त्यांना जाण होती. त्यात कोणती तरी कल्पना साकार झाली असली पाहिजे ही जाण लहानपणापासूनच होती. ‘मार्मिक’कार बनल्यावर त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरता नवोदित चित्रकार जायचे. एकाने एक थोटा माणूस दाखवला होता आणि चित्राखाली लिहिलं होतं, I am a shorthand typist! बाळासाहेबांनी चित्रकाराला समजावून सांगितलं – त्या माणसाला हात नाहीत म्हणून तो शॉर्टहॅण्ड होत नाही. हे व्यंगचित्र नाही, तर व्यंगचित्रण आहे! उद्या तू एखाद्या लंगड्या माणसाचं चित्र काढशील आणि म्हणशील, मी एका पायावर उभा आहे. व्यंगचित्र प्रभावी ठरतं, ते त्यामधील आशयामुळे. बाळासाहेब फ्रिप्रेसमध्ये काम करत असताना ‘मावळा’ या टोपणनावाने इतर नियतकालिकांत व्यंगचित्रं काढत असत. म्हणजेच टोपणनाव घेऊन काम करणं हे त्यांनी आणि पु.लंनीही केलं होतं! पु.लंनी भाऊसाहेब हिरेंच्या शब्दाखातर त्यांच्या मालेगावच्या शिक्षणसंस्थेत नोकरी घेतली होती तरी स्वाभिमानाशी तडजोड न करण्याच्या स्वभावामुळे त्या नोकरीवर पाणी सोडलं होतं. बाळासाहेबांच्या कलेवर बंधनं यायला लागल्यावर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता-हे दोघांमधलं आणखी एक साम्य. १९६० साल हे दोघांच्या जीवनाला कलाटणी देणारं ठरलं. देशात नुकत्याच सुरू झालेल्या टीव्हीसाठी प्र्रोगॅ्रम प्रमुख म्हणून पु.लंना दिल्लीस जावं लागलं. आपल्या विनोदी स्वभावामुळे हे ‘पांडेजी’ उत्तर हिंदुस्तानात कमालीचे लोकप्रिय ठरले. पुढे ते इंग्लंडला जाऊन आले. खुसखुशीत शब्दांत प्रवासवर्णन कसं लिहावं याचा आदर्श त्यांच्या ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकांनी मराठी भाषेत निर्माण झाला. त्याच सुमारास त्यांचं ‘वार्यावरची वरात’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने इतिहास घडवला. बाळासाहेब भल्या पहाटे बिर्ला मातोश्री सभागृहात जाऊन रांगेत उभं राहून तिकिटं घेऊन आले होते. त्या प्रयोगावर ते इतके खूश झाले होते की त्यांनी ‘मार्मिक’च्या पुढच्या अंकात संपूर्ण ‘रविवारची जत्रा’ त्या वरातीवर काढली होती. पु.ल. पंख्याच्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या हातामधली संहितेची पानं इतस्ततः उडत आहेत आणि त्या पानांवर ‘वार्यावरची वरात’ हे शब्द उमटवले होते! त्यात पु.लंना सोंड दाखवून ‘द गॉड ऑफ विसडम्’ असं संबोधलं होतं आणि त्या खाली लिहिलं होतं, पु.लंच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि सरस्वती भांडी घासते! एका चित्रात ते पेटी वाजवताना दाखवले होते आणि खाली कॉमेंट होती-अशी लाजवाब पेटी ऐकल्यावर वाटतं, रेडिओवरची पेटी वादनावरची बंदी उठवलीच पाहिजे आणि शेवटी स्वतः साहेब पु.लं.च्या पुढील बाजूने कडेवर चढून, आपल्या हातांनी त्यांना कवेत घेऊ पहात आहेत असं चित्र होतं पण त्यांचे हात पु.लंच्या पाठीमागे जाण्यास तोकडे पडत होते आणि कॉमेंट होती-पु.लंची थोपटावी तेवढी पाठ थोडीच ठरेल-पण काय करणार, हातच पुरे पडत नाहीत.

अत्रे आणि ‘मार्मिक’ हा वाद चिनी आक्रमण काळात कमालीचा चिघळला. ‘मराठा’च्या कम्युनिस्ट धार्जिण्या धोरणावर कोरडे ओढणारा ‘मार्मिक’चा अग्रलेख ‘प्रतिभासंपन्न अत्रे मावळले व उरला गलिच्छ वाणीचा कम्युनिस्ट’ प्रसिद्ध झाल्यावर अत्रे कमालीचे भडकले आणि त्यांनी ‘कमोदनकार ठाकरे व त्यांची कारटी’ असे तीन सणसणीत अग्रलेख लिहिले. लेखणी आणि कुंचला यांच्यातला कलगीतुरा कित्येक महिने रंगत होता! बाळासाहेबांनी अत्र्यांना सतत डुकराच्या रूपात चितारून त्यांची भंबेरी उडवून दिली. ‘मराठा’ने एकेदिवशी बाळासाहेबांचा फोटो छापला आणि त्याखाली लिहिलं- महाराष्ट्राचा भंगी चित्रकार! त्याला ‘मार्मिक’ने पुढच्या अंकात व्यंगचित्राद्वारे उत्तर दिलं. त्यात स्वतः बाळासाहेब हातात झाडू घेऊन कचरा काढताना दाखवले होते. कचर्यात अत्रे मृत डुकराच्या रूपात होते आणि भाष्य होतं-मी भंगीच आहे, कारण अत्र्यांसारखा कचरा मला दर आठवड्याला काढावा लागतो. त्या प्रतिहल्ल्यामुळे पु.ल. खूश झाले आणि त्यांनी फोनवरून आपली दाद दिली.

‘मार्मिक’ साप्ताहिक १३ ऑगस्ट १९६० साली, अत्र्यांच्या जन्मदिनी सुरू झालं. पु.ल. ‘मार्मिक’च्या वाढदिवसाला यावेत अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पण ते जमलं नाही. विनंतीचा स्वीकार करता येत नाही हा खेद व्यक्त करण्याकरता पु.लंनी पत्र पाठवलं. त्यात बाळासाहेब-श्रीकांत या बंधुंच्या व्यंगचित्रकलेची भलावण केली होती, पण त्याचबरोबर ‘मार्मिक’मध्ये येणारा सर्वच मजकूर सामान्य दर्जाचा असतो अशी मल्लिनाथीही होती! त्याचवेळी पु.लंनी एका मुलाखतीत, मराठी रंगभूमीवरील प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अॅम्बॅसेडर गाडी असावी असं मला वाटतं, असे उद्गार काढले होते. त्यांच्या तुफान लोकप्रिय ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री, बहुरूपी प्रयोगाला मात्र प्रत्येक प्रेक्षकाला जास्तीत जास्त चार तिकिटंच मिळतील, पाच वर्षांखालच्या मुलास प्रवेश नाही, अशी बंधनं सुनीताबाई घालत होत्या. तरीही बुकिंग सुरू झाल्यापासून चार तासांत प्लॅन विकला जायचा! पुलंच्या सामान्य दर्जाच्या मजकूर शब्दप्रयोगावर बाळासाहेब चिडले आणि त्यांनी पुढच्याच अंकात पु.लंकडून नटांचा नाटकी कैवार आणि प्रेक्षकांवर छडीमार हा बोचक अग्रलेख लिहिला.

१९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली आणि बाळासाहेब अल्पावधितच मराठी माणसांच्या गळ्यातला ताईत बनले. घणाघाती वक्तृत्व, भेदक कुंचला, मराठी अस्मितेचा जयघोष, नोकर्यांचा रोजीरोटीचा प्रश्न हाती घेतल्याने त्यांची Larger than life! प्रतिमा साकार झाली. त्याचवर्षी ३० ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर भव्य मेळावा भरला तेव्हा, ‘मी लोकशाही मानत नाही. ठोकशाही मानतो. माझा कम्युनिस्टांना कडवा विरोध आहे तसाच दाक्षिणात्य प्रांतीय संकुचिततेलाही. मुंबईत उपर्यांनी येऊन आमच्या नोकर्या बळकावायच्या हे यापुढे चालणार नाही. इथला गुंडसुद्धा मराठीच पाहिजे आणि हातभट्टीवालासुद्धा मराठीच पाहिजे. यंडूगुंडू ही महाराष्ट्राच्या आचळाला लागलेली गोचीड आहे’, असा स्फोटक दारूगोळा भरलेली बाळासाहेबाची भाषणं लाखालाखांची गर्दी खेचत होती आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांच्या रूपाने एका देदीप्यमान तार्याचा उदय झाला होता. इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. वृत्तपत्रांवर कडक बंधनं आली. बाळासाहेबांनी इमर्जन्सीला पाठिंबा दिला. ‘तुरुंगवास वाचवण्याकरता शिवसेनेच्या वाघाने शेपूट पायांत घातले’ अशा शब्दांत पु.लंनी खाजगीत निषेधही केला. ती बातमी साहेबांच्या कानावर गेली तरी नसावी किंवा समजूनही त्यांनी प्रतिभाष्य करण्याचं टाळलं असावं.

शिवसेना काँगे्रसमध्ये विलीन होणार अशा वावड्या उठवणार्या क्षुद्रबुद्धींना बाळासाहेब हा कसा धगधगता अंगार आहे हे समजलंच नव्हतं. इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यासाठी राजकीय किंमत शिवसेनेला मोजावी लागली. १९८० साली तर बाळासाहेबांनी काँग्रेसची तळी उचलून धरली आणि त्याबदल्यात दोन विधानपरिषदेच्या जागा पदरात पाडून घेतल्या. इंदिराजींनी निरोप पाठवला, ‘ठाकरेजी को कहो, मै उनको उंचेसे उंचाँ पद दुंगी.’ ते अशा विलोभनाला भुलणं शक्यच नव्हतं. १९८५ मध्ये मुरली देवराच्या मुंबई काँग्रेसच्या वर्चस्वाला अडसर घालण्याकरता मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलांनी ‘मुंबई केंद्रशासित करणार ही अफवा खोटी आहे’, असं विधानपरिषदेत प्रमोद नवलकरांच्या एका ठरवून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्याचं भांडवल करून ‘मराठी माणसा रात्र वैर्याची आहे. मुंबई तुझ्यापासून तोडण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे’ अशी पोस्टर्स लागली आणि प्रत्येक फलकावर बाळासाहेबांचा फोटो झळकत होता. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कब्जामधून मुंबई नगरपलिका शिवसेनेने हिसकावून घेतली आणि त्यावर वर्चस्व ठेवलं ते आजतागायत.

जुलै १९८७. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या न्यूजर्सीच्या अधिवेशनास पु.ल. अध्यक्षपद भूषवणार असल्याने तोबा गर्दी झाली होती. शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी, मनोहर जोशींनी हजेरी लावली होती. परदेशात मराठी भाषिक हजारोंच्या संख्येने एकत्र जमणार आहेत त्याचं बाळासाहेबांना अप्रूप होतं, म्हणून त्यांनी जोशींच्याकरवी अधिवेशनास संदेश देताना म्हटलं होतं, ‘सर्व जातिंचे मतभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा!’ याचं पु.लंनाही कौतुक वाटलं. हा संदेश शिवसेना स्थापनेपासून बाळासाहेबांनी कृतित उतरवला होता. भिन्न जातिंना मूठमाती देऊन शिवसेना उभारली गेली होती.

१९८९ मध्ये भाजपशी युती केलेल्या शिवसेनेला राज्यातलं विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि पाच वर्षांनंतर युती थेट सत्तेचा सोपान चढली. बाळासाहेबांनी झंझावती दौरा करून, एका महिन्यात ११५ विक्रमी सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. सरकार स्थापन झालं. ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार देण्याचं ठरलं. शिवसेनानेत्यांना तो दस्तुरखुद्द बाळासाहेबांनाच द्यावा, असं प्रकर्षाने वाटत होतं. त्या सूचनेला फटकारताना ते म्हणाले, ‘मी महाराष्ट्रदूषण आहे हे पुरेसे नाही का?’ पुरस्काराचे पहिले मानकरी पु.ल. ठरले. मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात सोहळा होणार होता. पु.ल. कंपवाताने बेजार होते. म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत सुनीताबाईंनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. त्यात पु.लंनी म्हटलं होतं, ‘आयुष्यभर मी लोकशाही मूल्यांचं जतन करत आलो. ती जेव्हा धोक्यात आली तेव्हा माझ्या कुवतीनुसार ती जपण्यासाठी लढ्यातही भाग घेतला. पण आज ठोकशाहीचा उघडउघड पुरस्कार करणारे सरकार राज्यात सत्तारूढ झाले आहे हे पाहून माझ्या मनाला अपार यातना होतात.’ अशी टीका बाळासाहेबांच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. समारंभानंतर पुढच्याच आठवड्यात त्यांच्या हस्ते एका पुलाचं उद्घाटन होणार होतं. तेव्हा भाषणात बाळासाहेब म्हणाले – आता जुने पूल मोडून टाकले पाहिजेत. नवे पूल उभारले पाहिजेत! त्यात पूल हा शब्द Bridge या अर्थीही घेता येत होता आणि पूल म्हणजे ती साक्षात पु.लंवर टीकाही असू शकत होती!

त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे असं चित्र वृत्तपत्रांनी उभं केलं होतं. पु.लंची थोरवी जाणणाऱ्या  बाळासाहेबांनी त्यांच्या पुण्याच्या घरी जाण्याचं ठरवलं. पुण्याची भेट घडली तेव्हा सुधीर गाडगीळ उपस्थित होते. त्यांनी या घटनेचं वर्णन असं केलं… ‘बाळासाहेबांनी घरात प्रवेश केला. सुनीताबाईंनी ‘या बाळासाहेब’, या शब्दात त्यांचं स्वागत केलं. चेहर्यावर नम्र भाव असलेले साहेब उत्तरले, ‘मी बाळासाहेब बाहेरच्यांकरता. या घरात मी बाळच आहे!’ पु.ल. त्यांच्या चाकांच्या खुर्चीत जखडून बसले होते. अंग कंपवातामुळे थरथरत होते. बाळासाहेब त्यांच्या समोर गेले. खाली गुडघ्यावर बसले आणि वाकवून डोकं पु.लंच्या पायांवर ठेवलं. पु.ल. गहिवरले. खोलीत असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. पु.लंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, ‘बाळ, मला तुझा अभिमान वाटतो!’

पल्लेदार, समयोचित वक्तृत्व ही बाळासाहेबांना ईश्वराची देन होती. सुधीर फडक्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्यावेळी मुख्य वक्ते साहेब होते. त्यांनी सांगितलं, ‘बाबूजी व मी दोघेही कडवट हिंदुत्ववादी आहोत. फरक एवढाच की जन्मभर त्याचा संबंध सुरांशी आला व माझा असूरांशी!’ साऊथ बॉम्बे लायन्स क्लबच्या समारंभातखच्चून भरलेल्या हॉलमध्ये नजर फिरवून साहेब म्हणाले, ‘In this room, You are all Lions. I am the only Tiger, here!’

पु.लंच्या आयुष्यातलं शेवटचं दशक आजारपणातच व्यतीत झालं. घर ते प्रयाग हॉस्पिटल एवढाच प्रवास नियमितपणे घडत होता. बाळासाहेबांनाही अनेक व्याधींमुळे घरातच जखडून बसणं भाग पडलं. लीलावती हॉस्पिटलला चेकअपसाठी जाणं एवढंच क्रमप्राप्त होतं. त्यांना आधाराशिवाय चालणं मुश्कील व्हायचं. तरीही त्यांची उल्हसित वृत्ती कायम होती. अनेक संदर्भ त्यांना बिनचूकपणे देता यायचे. दोघेही मेहफिलीचे बादशाह होते. त्यांना आपल्याभोवती माणसांचा गराडा असलेला आवडायचा. पु.लंना एका वार्ताहराने विचारलं, ‘कंपामुळे तुम्हाला स्वतः लिहिणं शक्य होत नाही तर डिक्टेट का करत नाही?’ त्यांनी हजरजबाब दिला – I am not a Dictator!’ १९८५ नंतर बाळासाहेबांनी व्यंगचित्रं काढणं सोडून दिलं, कारण त्यांचा हात थरथरत असे. त्यावरही त्यांचं भाष्य होतं, ज्या हाताने काढलेली व्यंगचित्रं पाहून राज्यकर्ते थरथर कापायचे, तोच हात आता थरथरतो!’ पु.लंना वाचनाचं अफाट वेड. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणार्या डॉ. तात्याराव लहानेंनी त्यांच्या डोळ्यांत शक्तिशाली लेन्स बसवली होती. ‘मला वाचता येणार नसेल तर मला जगायचेच नाही’, असे त्यांचे उद्गार होते. बाळासाहेबांना कथा-कादंबर्या वाचण्यात रस नव्हता. १९६९ साली ते, जोशी आणि साळवी येरवडा तुरुंगात तीन महिने होते तेव्हा अनघाताई जोशींनी त्यांना रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ पुस्तक दिलं. त्यातल्या खाजगी संवादाची बाळासाहेब खिल्लीच उडवायचे. ‘माझ्या वडिलांनी मला बजावले होते, काय वाटेल ते बन, पण कधी विद्वान होऊ नकोस! थोडक्यात गंभीर, सुतकी चेहर्याने वावरू नकोस!’ बाळासाहेब रोज डझनभर वृत्तपत्रं वाचायचे. टिव्ही सहसा पहात नसत. अपवाद-क्रिकेट सामन्यांचा. पु.ल. आणि बाळासाहेब ही व्यक्तिमत्त्वं चुंबकीय होती. त्यांच्याकडे विविध भाषिक, धर्माचे, जातिचे, प्रांताचे लोक आकर्षले जायचे.

न. चि. केळकरांनी म्हटलं होतं, ‘ज्याच्या अंत्ययात्रेला जास्त लोक जमतात, तो मोठा!’ खुद्द केळकरांच्या वेळी लाखांचा समुदाय उपस्थित होता. तसाच पु.लंच्या वेळेसही. बाळासाहेबांसाठी त्याच्या दसपट लोक रस्त्यावर उतरले होते. दोघांनाही सरकारी इतमामाने अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत जन्मलेल्या पु.लंनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला तर पुण्यात जन्म झालेल्या बाळासाहेबांचं देहावसान मुंबईमध्ये झालं! पु.ल. अत्यवस्थ आहेत, हे समजल्यावर बाळासाहेब स्वतःच्या प्रकृतिच्या सर्व तक्रारी बाजूला ठेवून पुण्याकडे धाव घेते झाले. गाडीमध्ये ‘वार्यावरची वरात’ची टेप ऐकत होते. साल २०००, लोणावळा आलं आणि फोनवर पु.ल. गेल्याची बातमी समजली. सुनीताबाईंना सांत्वनपर शब्द सांगितले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, ‘वरात ऐकत आलो, आता त्या वरातीत सामील व्हायला लागत आहे!’ दोघेही अलौकिक, महान किमयागार, अफाट लोकप्रिय. पु.ल. हे शब्दांचे चित्रकार होते तर बाळासाहेब हे रेषांचे व्यंगचित्रकार होते! त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे.

डॉ विजय ढवळे
२९ जून २०१४

कलमनामा
http://kalamnaama.com/pu-l-ani-balasaheb/

Friday, December 13, 2019

मी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट.. - दिग्विजयसिंह ठोंबरे

दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगरवरून एका वकील मित्रासोबत घरी येत होतो. वाटेत ट्रॅफिकमुळे त्यांची व माझी चुकामुक झाली. तेव्हा ते रहात असलेल्या बिल्डिंग जवळ येऊन मी त्यांस रूमवर पोहचला का अशी फोनवर विचारणा केली असता ते "हो" म्हणाले त्यावर "या खाली चहा घेऊ" असा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे ठेवताच ते म्हणाले,

" तुम्हीच या वर मी कपडे काढली आहेत "
माझ्या चहाच्या प्रस्तावाविरोधात त्यांनी मांडलेला प्रतिप्रस्ताव ऐकून मला प्रचंड हसु आल. विनोद हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक असायला हवा. असा विनोद हेरण्याची कला अवगत होण्याचं श्रेय मी पुलं च साहित्य जे माझ्या वाचनात आल त्यास देतो. पुलं चा विनोद कळण्यासाठी एक पर्याप्तता गाठावी लागते तरच पु.ल. समजतात व ती पर्याप्तता आपण गाठली आहे असा गैरसमज मी माझ्या मनात बाळगत असताना आज सकाळी एक वर्तमानपत्र वाचत होतो. त्यात आज पुलं ची पुण्य तिथी आहे असे वाचनात आले. मग काय अश्या या विनोदाच्या बादशाहावर काहीतरी लिहिण्याचा मोह आवरण कठीण झालं. त्यातच एक कल्पना सुचली, आमच्याच सोसायटीमध्ये पुलं चा सहवास लाभलेले "कैलास जीवन" या नामांकित ब्रँडची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री.राम कोल्हटकर काका राहतात त्यांच ऑफिसदेखील सोसायटीच्याच दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यांचीच भेट घेऊन पुलंबद्दल त्यांलाच बोलत करूयात.....

ही सुचलेली कल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी कैलास जीवनच्या ऑफिसचाच भाग असलेले बंधुतुल्य प्रशांत भागवत यांस मी सदरची कल्पना सांगितली.

त्यांनी देखील माझा भेट घेण्याचा उद्देश रामकाकांस कळवून थोड्याच वेळात माझी व राम काकांची भेट घडवून आणली.

यापूर्वी झालं का जेवण? काय चाललय? या व अश्या प्रकारचे प्रश्न विचारण्यापलिकडे अनुभव नसलेला "मी" व माझ्यासमोर बसलेले पुलं चा सहवास लाभलेले "रामकाका" अशी आमच्यात चर्चा सुरू होण्यापूर्वी माझ्या मनावर दडपण आल्यासारखं वाटू लागलं. अश्यातच मी त्यांस प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

पु.ल. नी एवढं अफाट लिखाण केल ते कसं काय?

पु.ल. मनसोक्त गप्पा मारत असत त्यामुळे त्यांचे लिखानाकडे दुर्लक्ष होत असे ही गोष्ट ज्यावेळी सुनीताबाईंच्या लक्षात आली त्यावेळी सुनीताबाई पुलं च्या लिखाणाच्या वेळी कोणासही पुलं ना भेटू देत नसत.अगदीच जवळची व्यक्ती असल्यास सुनीताबाई स्वतः त्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत असायच्या. सुनिताबाई यांनीच खरेतर पुलंला लिहीत केलं.लिखाणास प्रवृत्त केलं.

पहिला प्रश्न व त्यावर काकांनी दिलेल्या उत्तरातील सहजतेने माझ्या मनावरील दडपण अलगदपणे बाजूला झालं. माझ्यातील मुलाखतकार जागा झाल्याचा मला भास होताच मी पुढील प्रश्न विचारला.

पुलं चा एखादा अप्रकाशित किस्सा तुमच्या आठवणीतील कोणता आहे?

८ नोव्हेंबर ला पुलं चा वाढदिवस असतो.येणारा वाढदिवस हा पुलं ची पंच्याहत्तरी असणारा होता.त्यामुळे पुलं च्या घरी भरपूर गर्दी होणार होती.वयोमानामुळे पुलं ना सगळ्यांना भेटणे शक्य नव्हते.त्यावर एक युक्ती काढून पुलं नी मला विचारलं राम तू कुठं राहतो ?

चंद्रमा अपार्टमेंट, प्रभात रोड, गल्ली क्र. ८ असे मी उत्तर देताच पुलं म्हणाले वाढदिवसादिवशी मी तुझ्याकडे रहायला येतो व ही गोष्ट कुणालाही कळता कामानये. स्वतः पुलं आपल्या घरी रहायला येत असल्यामुळे मला देखील आनंद झाला. ठरल्याप्रमाणे पु.ल. व सुनीताबाई आमच्याघरी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ नोव्हेंबर ला राहण्यासाठी आले. दुसऱ्या दिवशी पु.ल. पहाटे ५.३० वाजता उठून आवरून बसले.त्यामुळे आम्ही देखील लवकर उठून आवरताच मी पुलंना विचारले नाष्ट्याला काय करायचे? त्यावर पुलं म्हणाले,

उपीट सोडून दुसरे काहीही करा.

पुलंच व उपीटाच जमत नसल्यामुळे आम्ही पोहे किंवा दुसरा पदार्थ (आता नक्की आठवत नाहीये) नाष्ट्याला केला. नाष्टा व त्या ओघात गप्पा सुरु झाल्या तेवढ्यात आमच्या घरातील फोन वाजला. तो मी उचलताच,

राम सुनीताला फोन दे...!

कोण बोलतंय

फोन दे

आहो माझ्याकडे नाही आल्या सुनीताबाई

अरे तू फोन दे त्यांला

कोण बोलत आहात आपण असे मी त्यांस विचारताच

विजया राजाध्यक्ष अस उत्तर पलीकडून आलं.

सुनीताबाई फोन शेजारीच उभ्या होत्या परंतु नाईलाजाने आम्हास फोन ठेवावा लागला त्यामागील कारण म्हणजे पु.ल. आमच्या घरी आहेत हे कोणासही कळून द्यायचे नव्हते.

पुढे असेच काही फोन आले परंतु मी त्यांस पु.ल. सध्या कुठं आहेत हे मला ठाऊक नसल्याचे कळवले.

दुपारी माझी पत्नी चित्राने मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आम्ही एकत्र जेवण केले व छान गप्पा मारत बसलो. त्या दिवशी रात्री मी व पु.ल. पुलंच्या घराबाहेर नेमकी काय स्थिती आहे हे पाहण्यास गेलो असता आम्हाला दरवाज्यात दोन बुके नजरेस पडले.

त्यातील एकावर लिहिल होत

"आपल्या भेटीसाठी येऊन गेलो,गुच्छ स्वीकारावा"

शरद_पवार.


तर दुसऱ्या बुकेवर लिहिल होत

"आपला आशीर्वाद घेण्यासाठी येऊन गेलो"

बाळ_ठाकरे.


एवढ्या मोठ्या व्यक्ति पुलंबद्दल बाळगत असलेला आदर काकांच्या तोंडून ऐकून पु.ल. हे एक असामान्य व्यक्तिमत्व होत याची प्रचिती मला येत होती.मी विचारलेल्या प्रश्नांची काका मनमोकळेपणाने देत असल्याने आमची चर्चा औपचारिकतेकडून कधी अनौपचारीकतेकडे वळाली हे माझ्या लक्षातच आले नाही. मी त्यांस विचारले

पुलंच्या लोकप्रियतेचा एखादा किस्सा सांगाल काय?

एकदा पुलंच्या घरी मी गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी पु.ल. खूप आठवणी सांगत होते. "चित्रमय स्वगत" हे पुस्तक त्यावेळी ते लिहीत होते.त्यामुळे पुलंकडे असलेले फोटो बघून त्याबद्दलच्या आठवणी सांगताना पु.ल. जुन्या आठवणींमध्ये रमून जात होते. साहित्यावर बरीच चर्चा झाली व गप्पांच्या ओघात कधी रात्रीचे ११ वाजले कळलेच नाही. तेव्हा आम्ही गप्पा आवरत्या घेत मी पुलंच्या घरातून बाहेर पडलो. सोसायटीच्या खाली येताच तिथे उभी असलेली ट्रॅक्स माझ्या नजरेस पडली. साधारण १५ ते २० लोक असावेत त्या ट्रॅक्स मध्ये. त्या लोकांनी मला विचारले अहो इथे पु.ल. देशपांडे कुठे राहतात? एवढ्या रात्री अनोळखी व्यक्तींस पु.ल. याच सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर राहतात हे कसं सांगायचं असा प्रश्न मला पडला त्यावर मी सुरुवातीला त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं परंतु त्या लोकांनी

अहो आम्ही लातूरवरून आलोय

फक्त पुलंला बघायच आहे

त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं आहे

कृपया आमची भेट घडवून देता का?

त्या लोकांची पुलंला भेटण्याची ओढ पाहून मी पुन्हा पुलं च्या घरी गेलो व सुनीताबाईंला सांगितले,खाली काही लोक उभी आहेत,लातूरवरून आली आहेत त्यांला पुलं ला भेटायचं आहे फक्त,खूपच विनवणी करीत आहेत.

खूप उशीर झाला होता तरीही पुलं वर प्रेम करणाऱ्या व्यक्तींला नाराज करायचे नाही म्हणून सुनीताबाईंनी एका अटीवर त्या लोकांला पुलं ला भेटण्याची परवानगी दिली ती म्हणजे,

"पुलं बरोबर कुणीही बोलत बसायचे नाही फक्त भेटायचे"

सुनीताबाईंच्या या अटीची त्या लोकांस मी कल्पना दिली. ती त्यांनी मान्य करताच मी त्यांस पुलं सोबत भेट घडवण्यासाठी घेऊन गेलो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याच दिसत होतं.प्रत्येक व्यक्ती पुलंच्या पाया पडून त्यांला डोळ्यात भरभरून साठवत होती.त्यांची पुलं सोबत भेट घडवल्याचा मला देखील मनस्वी आनंद झाला.

पुलं च्या लोकप्रियतेचे अनेक किस्से आहेत परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मी पुढील प्रश्नाकडे वळलो.

पुलंच्या बाबतीत एखादा भावनिक प्रसंग तुम्हास आठवतो का?

हो, पुलं ला महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला होता त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर प्रमोद नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस बाळासाहेबांनी पुलं च्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासंदर्भात बोलण्याच्या ओघात त्यांच्या शैलीमध्ये एक वक्तव्य केले होते.त्यावेळी खूप वादंग निर्माण झाला होता. बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी छापून आली होती. त्यामुळे पु.ल. व बाळासाहेब यांच्यात दुरावा निर्माण झाला असावा असे लोकांस वाटत होते. या घटनेच्या साधारण वर्षभरानंतर मी ज्यावेळी पुलं च्या घरी गेलो त्यावेळी तिथे राज ठाकरे व नाट्य निर्माते मोहन वाघ आले होते राज ठाकरे पुलं ना म्हणाले,

काकांला आपणास भेटायचे आहे त्यांला आपल्याकडे घेऊन येऊ काय?

त्यावर पु.ल. उत्तरादाखल म्हणाले,

अरे कोण बाळ ना, तो कधीही माझ्याकडे येऊ शकतो. अरे तो माझा विदयार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल,

मुंबईचा.

काही दिवसांनी राज ठाकरेंनी भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलं च्या घरी ४.३० वाजता येणार होते ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा तसेच कार्यकर्त्यांचा लवाजमा अस काही त्यांच्यासोबत असणार नव्हतं. बाळासाहेब व पुलं च्या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी मी पुलं ना विचारणा केली असता त्यांनी देखील दिलखुलासपणे त्यादिवशी उपस्थित राहण्यास मला परवानगी दिली.

आणि तो दिवस उजाडला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांस राज ठाकरे पुलं च्या घरी घेऊन आले पु.ल. वयोमानामुळे व्हील चेअरवर बसले होते.बाळासाहेबांनी पुलं ना पाहताच आपल्या गुरुचे आशीर्वाद घेतले त्यावेळी पुलं बाळासाहेबांला म्हणाले

बैस..


या घटनेचा मी स्वतः साक्षीदार होतो. हा भावनिक प्रसंग माझ्या लक्षात राहीला तो कायमचाच

साधारण तासभर त्यांच्या दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये रंगलेली चर्चा पाहून त्यांच्यात वितुष्ट कधी नव्हतेच याची खात्री पटत होती. बाळासाहेबांचं पुलं च्या घरी येण हे त्यांच्या मनाच्या मोठेपणाची प्रचिती देऊन गेलं.

जशी बाळासाहेब व पुलं यांच्यात चर्चा रंगली होती तशीच रामकाका व माझ्यात रंगलेली चर्चा वेळेची मर्यादा ओळखून मी उरकती घेतली.

रामकाकांनी भेट दिली तसेच विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली त्याबद्दल त्यांस धन्यवाद म्हणून मी ऑफिसमधून बाहेर पडलो.

दिग्विजयसिंह ठोंबरे

Tuesday, March 13, 2012

आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!

दिवंगत लेखक पु. ल. देशपांडे यांचं 'गाठोडं' हे पुस्तक नुकतच 'परचुरे प्रकाशन मंदिर'तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकातील 'मार्मिक'च्या चौथ्या वाढदिवसाला उपस्थित न राहता आल्याबद्दल पुलंनी बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या बंधुंना पाठवलेलं हे 'मार्मिक' पत्र...

१४ ऑगस्ट १९६४
वरळी, मुंबई १८

प्रिय बाळ आणि श्रीकान्त,

तुम्हां दोघांपैकी कुणाच्याही हातात सापडलो असतो, तर आजच्या 'मार्मिक'च्या वाढदिवसाला मोठ्या आनंदाने अध्यक्षीय पगडी घालून बसलो असतो. तो योग हुकल्याचे मला खरोखरीच दु:ख होत आहे. दुसऱ्या एका कार्यक्रमाची सुपारी आधीच घेतल्यामुळे येता येत नाही. म्हणून ह्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी तुम्हांला, 'मार्मिक'ला, श्री. द. पां. खांबेटे आदी करोन तुमच्या समस्त सहकारी मंडळींना 'आयुष्यमान व्हा - यशस्वी व्हा' असा आशीर्वाद देतो.

अध्यक्ष म्हणून जे चार शब्द सांगितले असते, ते पत्रातूनच सांगतो. ह्या शब्दांना थोडा वडिलकीचा सूर लागला असला, तर रागावू नका. तो सूर थोडासा अपरिहार्य आहे. कारण आजही तुम्ही दोघे जण माझ्या डोळ्यांपुढे येता ते आपापली दप्तरे आणि अर्ध्या चड्ड्या सावरीत शाळेत येणारे दोन चुणचुणीत आणि काहीसे खट्याळ विद्यार्थी म्हणूनच. बाळने शाळेची हस्तलिखित मासिके सजवायची आणि श्रीकान्तने व्हायोलिन वाजवून गॅदरिंगमध्ये टाळ्या मिळवायच्या, हे तुमचे पराक्रम तुमच्या चिमुकल्या वयात मी पाहिले आहेत.

कुठल्याही कलेतला का असेना 'झरा मूळचाचि खरा' असावा लागतो, तरच तो टिकतो. उदाहरणच द्यायचे तर मार्मिकमधून येणारे तीर्थस्वरूप दादांचे आत्मचरित्रच पाहा. त्यांनी ऐन जवानीची वेस ओलांडल्याला कित्येक वर्षे लोटली, पण जन्माला येतानाच नसानसांतून वाहणारा त्वेष आजही टिकून राहिला आहे. अन्याय दिसला की तारुण्यातला हा तानाजी वार्धक्यात शेलारमामासारखा उठतो आणि स्वत:ला उदय भानू म्हणवणारे ते चिमटीत चिरडण्याच्या लायकीचे काजवे आहेत हे दाखवून जातो; आणि म्हणूनच वृत्तपत्रव्यवसायातच काय पण सर्वत्रच प्रलोभनकारांचा सुळसुळाट झालेल्या ह्या अव-काळात हा प्रबोधनकार आजही निराळा उठून दिसतो.

हे व्रत खडतर आहे. आपल्या हातून या व्रताचे पालन किती काटेकोरपणाने होत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याचा आजचा हा दिवस आहे. सुदैवाने असले निर्दय आत्मपरीक्षण करायला लागणारी विनोदबुद्धी तुम्हांला उपजत मिळाली आहे. निर्मळ विनोदबुद्धी हे देवाच्या देण्यातले एक ठेवणीचे देणे आहे. मत्सर, पूर्वग्रह, क्षुद्रता, वैयक्तिक हेवेदावे असल्या संकुचित आणि स्वत:लाच दु:खी करणाऱ्या भावनांपासून ह्या देण्यामुळे माणूस दूर राहतो; आणि म्हणूनच निर्मळ विनोदाचा उपयोग जेव्हा शस्त्र म्हणून करायचा, तेव्हा व्यक्तीचा द्वेष न राहता, वृत्तीतला दोष दाखवणे हे मुख्य कर्तव्य राहते. आणि जेव्हा व्यक्तिद्वेष नसतो, तेव्हाच निर्भयता येते. तोंड चुकवून पळावे लागत नाही किंवा स्वत:च्या क्षुद लिखाणाचे त्याहूनही दुबळे असे समर्थन करीत बसण्याची नामुष्की स्वीकारावी लागत नाही. सभ्यतेचा धर्म सोडून वर्म हुडकीत बसणे, हे अत्यंत क्षुद मनाचे लक्षण आहे. इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्रे काढून दोषदिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाराला इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सभ्य सीमारेषा कुठली, त्याचे तारतम्य हवे. घाव असा हवा की, मरणाऱ्याने मरतामरता मारणाऱ्याचा हात अभिनंदनासाठी धरावा. शेतातले काटे काढताना, धान्याची धाटे मोडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. व्यंगचित्रकाराला अव्यंगाचे स्वरूप नीट पारखता आले पाहिजे. व्यंगचित्राने प्रथम हसवले पाहिजे. थट्टेमागे आकस आला, विनोदात कुचाळी आली की ते व्यंगचित्र निर्मळ पाण्यात रंग न कालवता गटारगंगेच्या पाण्याने काढल्याची घाण येते. उत्साहाच्या आणि गंमत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडण्याच्या भरात आपणा सर्वांच्या हातून मर्यादांचे उल्लंघन होते. सुदैवाने तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत. त्यांच्या स्वत:च्या हातून लेखनात मर्यादांचे जे उल्लंघन झाले असेल, ते तुम्हांला खिलाडूपणाने सांगण्याचे धैर्य त्यांना आहे. तुमचे भाग्य म्हणून तुम्हांला साक्षात जन्मदाताच गुरू म्हणून लाभला; पण गुरू जितका समर्थ, तितकी शिष्याची जबाबदारी अधिक.
                                
' मार्मिक'च्या छोट्याशा कारकिदीर्तल्या कार्याचा आढावा घेण्याचा माझा हेतू नाही, परंतु गेल्या वर्षातल्या तुमच्या ठळक कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. दोन-तीन बाबतींत मला तुमचे अभिनंदन करावेसे वाटते. शब्दस्पर्धा क्षेत्रांतली लबाडी तुम्ही उघडकीला आणलीत, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. जुगाराला माझा विरोध नाही, पण तो खेळणाराने आणि खेळवणाराने हा जुगार आहे म्हणून खेळावे व खेळवावे. धर्मराजसुद्धा द्यूत हे द्यूत म्हणूनच खेळले. धर्मयुद्धासारखे ते धर्मद्यूत होते. पण ह्या शब्दकोड्यांच्या जुगारातून साहित्याची गोडी लागते, हे वाचून मात्र मी थंड पडत होतो. असल्या जुगाराला साहित्य प्रचाराचे साधन म्हणून परवानगी देणाऱ्या आपल्या राज्यर्कत्यांच्या निष्पाप मनाचे कौतुक करायला हाती मीठमोहऱ्याच हव्यात.

' मार्मिक'मधले माझे दुसरे आवडते सदर म्हणजे, सिने-प्रिक्षान. वास्तविक सिनेमा हे तर नियतकालिकांचे 'डोंगरे बालामृत' आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या जाहिरातींवर नियतकालिके बाळसे धरतात. त्या भूगंधर्वनगरीतल्या यक्षयक्षिणींना आणि त्यांच्या कुबेरांना प्रसन्न ठेवण्याची अहमहमिका लागलेली दिसते. मराठी भाषेत तर आता नवी विशेषणे निर्माण करण्याची वेळ आली आहे. महान शब्द केव्हाच लहान झाला. कलामहर्षी तर बाबूलनाथाच्या पायरीवरच्या बैराग्यांइतके वाढले आहेत. अभिनयाचे सम्राट आणि सम्राज्ञी वृत्तपत्रीय स्तंभास्तंभांना टेकून उभ्या आहेत. अशा वेळी बोलपटांतले कचकडे उघडे करून दाखवणे हे किती अव्यवहार्य धोरण; पण तुम्ही ते पाळले आहे, याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींशी तुलना केल्यावर उणेपण वाटू नये, असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आहेत. आवश्यक निर्भयता आहे. रेखाटणांत विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी. दोन रेषांत तुम्ही मी-मी म्हणवणाऱ्याला लोळवू शकता. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचे सार्मथ्य मोठे; पण सार्मथ्य जितके मोठे, तितके ते किती बेताने वापरावे, याची जबाबदारीही मोठी.

अत्यंत जिव्हाळ्याने तुम्हांला मी हे पत्र लिहीत आहे. त्यामुळे काही धोक्याच्या सूचना दिल्या, तर रागावू नका. हे पत्र आहे, मानपत्र नव्हे. शिवाय तुमच्या बाबतीत मास्तरकीची माझी जुनी छडी थोडा वेळ पुन्हा हाती धरतो. स्तुतीचा 'वा'देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा. भलत्या ठिकाणी 'वा' दिल्यावर 'नर'देखील 'वानर' होण्याची भीती असते. सिनेप्रिक्षान, ती. स्व. दादांची आत्मकथा किंवा खांबेट्यांचा गुरू-बाजीची करुण कहाणी सांगणारा लेख, असले अपवाद वजा केले, तर लेखी मजकूर तुमच्या व्यंगचित्रांच्या तोडीचा होत नाही. चित्रे इतकी चांगली आणि लेखी मजकूर मात्र सामान्य. विनोदी लेख तर कित्येकदा केविलवाणे असतात. चांगले आणि हुकमी विनोदी लेखन ही दुमिर्ळ गोष्ट आहे. अशा वेळी कै. दत्तू बांदेकरांची आठवण होते. माझ्या मते कै. दत्तू बांदेकर हे मराठी पत्रसृष्टीतील एकमेवाद्वितीय असे विनोदी स्तंभलेखक. विनोदी लिखाणाच्या दृष्टीने अधिक जोरदार खटपट हवी.

दंभस्फोटाच्या वेळी तुमच्या संपादकीय विभागातल्या लेखण्यांना धार चढते; परंतु काही वेळा जिथे चापटीने भागेल, तिथे तुम्ही एकदम दात पाडायला निघू नये. अलीकडेच कॉलेजातल्या टेक्स्ट बुकातील धड्यांसंबंधीचा लेख मला असाच भडकून लिहिल्यासारखा वाटला. तुमचा हेतू प्रामाणिक होता. यौवनाच्या उंबरठ्यावरच्या पोरांना अगदी सिनेमातले हिरो अगर हिरोइन बनवणारे शिक्षण देऊ नये हे खरेच. तसे ते कॉलेजातून दिलेही जात नाही. खरे म्हणजे विद्यार्थ्यांनी काय व्हावे, काय होऊ नये याची चिंता करण्यात आपली प्राध्यापक मंडळी वेळ फुकट घालवीत नाहीत; गाइडे लिहिण्यात त्यांचा किती वेळ जातो, याची तुम्हांला कल्पना नाही. इंटरला शेक्सपिअरचे रोमिओ-ज्युलिएटही असते, संस्कृत नाटकांत शृंगार असतो. 'कातरवेळ' ही मराठीतली एक अतिशय सुंदर कथा आहे. षोडश वर्षे प्राप्त झाल्यावर पुत्रांशी मित्रांसारखे वागा, असे शास्त्रवचन सांगते. पोरांचे 'हिरो' होऊ नयेत, पण त्यांचे 'मोरू'तरी का करावेत? तात्पर्य, तुमच्या व्यंगचित्रांच्या सोयीसाठी नाक ओढताना उगीचच गळा आवळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. उत्साहाच्या भरात तारतम्य सुटू नये. विनोदी लेखक-चित्रकारांचे तर अजिबात सुटू नये. लोक तारतम्य सोडतात, तिथे विनोदी लेखकाचे काम सुरू होते. थोडक्यात म्हणजे गुळगुळीत करावी, पण रक्त न काढता! ज्याची झाली, त्यालादेखील आपण 'स्वच्छ' झालो; असे वाटले पाहिजे.

तुम्हांला उत्तरोत्तर यश मिळो आणि त्या वाढत्या यशाबरोबर 'अहंकाराचा वारा न लागो, पाडसा माझ्या विष्णुदासा, नामदेवा'!

ह्या प्रसंगी श्री. द. पां. खांबेटे यांचे व तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुमच्या यशात तुमच्या मातापित्यांच्या आशीर्वादाइतकाच त्यांच्या सहकार्याचाही वाटा आहे. वडिलांच्या तेजस्वी लेखनाची परंपरा चालू ठेवा आणि व्यंगचित्र साप्ताहिकाचे रामलक्ष्मण होऊन दुष्टांचे निर्दाळण करून सुष्टांच्या सदिच्छांचे मानकरी व्हा, असा आशीर्वाद केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन देतो.

प्रत्यक्ष हजर राहता न आल्याबद्दल राग मानू नका, असे पुन्हा एकदा सांगून आणि मार्मिकच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तुम्हां दोघांच्या हाती लागून, नव्हे हातांचा आधार घेऊन व्यासपीठावर प्रत्यक्ष येऊन भाषण करीन, असे आश्वासन देऊन हे लांबलेले पत्र संपवतो.

तुमचा,
पु. ल. देशपांडे

महाराष्ट्र टाईम्स
११ मार्च २०१२
(हा लेख पु.ल.प्रेम ब्लॉगसाठी सुचवल्याबद्दल श्री धीरज पाटील आणि श्री चंद्रशेखर मोघे ह्या पु.ल.प्रेमींचे मन:पूर्वक आभार)
a