Thursday, May 3, 2007

पुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले "पु. ल.' - वैभव वझे

"पुलंच्या घरी गेल्यावर त्यांनीच दार उघडलं आणि चक्क मला ओळखलं. त्यामुळे मी पैज जिंकलो...' 

विलेपार्ले येथे राहणारे रत्नाकर खरे ही गोष्ट सांगू लागले आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून "पु. ल." पुन्हा भेटले! 

'पु. लं.'च्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस पार्ल्यात गेले. या दिवसांत पुलंच्या बरोबर वावरलेल्या काही जवळच्या कुटुंबांपैकी एक खरे कुटुंबीय. त्यापैकी रत्नाकर खरे यांना "पु. लं.' विषयी विचारले असता त्यांनी सांगितले,  

"पु. ल. आम्हाला बऱ्याच वर्षांनंतर ओळखतील का, याविषयी पैज लागली. पुलंनी जर ओळखले नाही, तर मी सर्वांना आइस्क्रीम द्यायचे असे ठरले होते. पुलंनी माझ्या वडिलांसमवेत (माधव खरे) आम्हाला पाहिले होते. पुण्याला पुलंच्या घरी गेलो. सुदैवाने त्यांनीच दार उघडले आणि एकदम आम्हाला जवळ घेऊन, आमची नावानिशी चौकशी केली. आम्हाला त्याचे फारच अप्रुप वाटले. आम्हाला सर्वांना पुलंनी आत घेतले व माझ्याकडे गाणे म्हणण्याची फर्माईशही केली!'' पुलंचे संगीतप्रेम तर जगजाहीर आहे. त्याबद्दल रत्नाकर खरे म्हणाले, " "त्या वेळी आमच्याकडे ग्रामोफोन होता. पुलंना नवी रेकॉर्ड दिसली की ते आमच्याकडे ती घेऊन येत. मग ग्रामोफोनवर ती ऐकण्याच कार्यक्रम असे. बेगम अख्तर यांची एक तबकडी आमच्याकडे बसून पुलंनी इतक्‍या वेळेला ऐकली, की तेच गमतीने म्हणायचे, "आता मला भीती वाटायला लागलीय, की या तबकडीच्या पाठीमागचेही आपल्याला ऐकू येईल की काय!' ;

पुलंच्या "असा मी असामी'मध्ये सरोज खरे ही व्यक्तिरेखा आहे. हे नाव ज्यांच्यावरून घेतले त्या सरोज रानडे या योगायोगाने पार्ल्यातच भेटल्या. त्यांच्याशी बोलताना खरेच असे जाणवले, की पुलंनी वर्णन केलेल्या सरोज खरे यांच्याशी सरोजताईंचे खूप साम्य आहे. सरोज रानड्यांच्या मते सरोज हे नाव भाईंनी माझ्या नावावरून घेतले व खरे हे आडनाव माधव खरे यांच्यावरून घेतले. सरोजताई व त्यांचे पती शरद रानडे हे ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. पुलंविषयीच्या आठवणी घेऊन सांताक्रूझच्या स्वाती महाजन विवाहानंतर स्वाती लिमये होऊन हैदराबादला गेल्या. स्वातीताई पुलंविषयी सांगू लागल्या, "

"१९८७ मध्ये मी दहावीसाठी त्यागराज क्‍लासेसमध्ये पार्ल्याला जात होते. क्‍लास संपल्यावर आम्ही मुली टंगळमंगळ करत असू. हा क्‍लास नेमका पुलंच्या बगल्यामागेच होता. एकदा माझ्या मैत्रिणीचे लांबसडक केस पुलंच्या बंगल्याच्या कुंपणात अडकले. ती म्हणाली, आता त्या आजोबांच्या शिव्या खाव्या लागणार. पुलंनी बाहेर येऊन पाहिले आणि ते तिला म्हणाले, मुली निसर्गाची देणगी अशी निष्काळजीपणे नाही वापरायची. अशी देणगी फार थोड्या जणींना मिळते. त्यामुळे ती निगुतीने सांभाळायची असते.'' पु.ल. या दोन अक्षरांमध्ये सामावलेल्या एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाविषयीच्या या काही मनात रेंगाळणाऱ्या आठवणी. अशा आठवणींच्या माध्यमातून पु.ल. आज पुन्हा भेटले; काहीसे अप्रकाशित... पण तरीही खास "पुलकित'च! 

वैभव वझे - 
सकाळ वृत्तसेवा मुंबई

0 प्रतिक्रिया: