Friday, June 12, 2015

साहित्यातील हृदयस्थ पु.ल. देशपांडे - आरती नाफडे

१२ जून २००० ला, ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची प्राणज्योत मालवली. मराठी साहित्याला अजरामर करणारा एक लेखक अनंताच्या प्रवासाला निघाला. लोकांमध्ये, समाजात कायम रमणारा नाटककार, संगीतकार, कलाकार परलोकात निवासासाठी निघून गेला. पण, तमाम मराठी मनांवर राज्य करणारा हृदयस्थ- हृदयात स्थित असलेला- लोकांच्या मनातील जागा कशी बरं मोकळी करू शकेल? साहित्यातील मंतरलेले आपले जग म्हणजे पु. ल.! त्यांच्या साहित्यिक प्रवासातील प्रवासी म्हणजे त्यांचे अनंत वाचक, चाहते, आप्त-मित्रमंडळी होत.

त्यांच्या साहित्यिक प्रवासात अनेक थांबे आहेत. जसे साहित्यिक पुल, विनोदकार पुल, सिनेमा-नाटकातले पुल, संगीतातले पुल... हे महत्त्वाचे थांबे आहेत. प्रत्येक थांब्याजवळ रेंगाळत राहावं एवढं विस्तीर्ण ज्ञान आहे, अनुभव आहे. जीवनाबद्दलची आस्था, जवळीक, आत्मियता हृदयाला स्पर्श करणारी आहे. म्हणून पुल-साहित्यातील वाचकाचा प्रवास सुखकारक व आल्हाददायक आहे.

आपल्या नातवानं लेखक व्हावं, असं पुलंच्या आजोबांना कायम वाटत असे, तर त्यांनी गायक व्हावं, असं त्यांच्या वडिलांना वाटे. पण, पुल मार्मिकपणे सांगतात- ‘‘मी दोघांनाही खूष केलं किंवा कुणालाच नाखुष केलं नाही.’’

आपल्या शाळेच्या वर्गासाठी, भावंडांसाठी छोटी नाटुकली लिहून देणं, सेवादलाच्या कलापथकासाठी छोटे कार्यक्रम लिहून देणं, येथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. १९४३ साली ‘अण्णा वडगावकर’ हे त्यांचं पहिलं व्यक्तिचित्र अभिरुची या मासिकात प्रसिद्ध झालं. ‘धनुर्धारी’ मासिकात कॉलेजविश्‍वाबद्दलचा एक मिस्कील लेख टोपण नावाने लिहिला असता, तुम्ही ‘विनोदी लेखनाकडे जास्त लक्ष द्या,’ असा सल्ला संपादकांनी पुलंना दिला होता. २६ जानेवारी १९५७ ला ‘तुझे आहे तुजपाशी’ या त्यांच्या सामाजिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्यांच्यातला दमदार लेखक जनमानसात दृढ झाला. पुढे त्याच वर्षी २५ एप्रिलला ‘सारं कसं शांत शांत’, ‘सदू आणि दादू’, ‘मोठे मासे छोटे मासे’ या तीन एकांकिका लोकांची भरघोस दाद घेऊन गेल्या व पु. ल. देशपांडे नावाला मराठी साहित्यात वजन प्राप्त झालं व ते वाढतच गेलं. पुलंच्या साहित्यात भाषेची जादू आहे. ‘‘भाषा हा मानवनिर्मित चमत्कार मला सर्वांत आवडतो,’’ असं ते ‘वंगचित्रे’मध्ये म्हणतात. बोलीभाषेवर पुलंचं फार प्रेम. त्यामुळे त्या भाषेचा सहजपणा, प्रवाहीपणा नैसर्गिकपणे त्यांच्या साहित्यात येतो. पुलंचे अनेक भाषांवर प्रभुत्व व अचाट शब्दसंग्रह त्यांच्या साहित्याचे वैभव वाढवतात. आपण पुलंचे साहित्य वाचायला सुरुवात केल्यावर मन आतल्या आत हसायला लागते. गालातल्या गालात हसत आपण एक एक पान उलटत असतो. मनाची मरगळ गळून पडते. मन हलकंफुलकं होत जातं व एका स्वच्छ, सुंदर प्रसंगाचे आपण साक्षीदार होतो. ‘वाचाल तर वाचाल’ ही साहित्यसंस्कृती प्रचीतीस येते.

पुलंच्या साहित्यातला संचार त्यांच्या विनोदी लेखात, ललित लेखनात, बालनाट्य, एकांकिका, विडंबन, व्यक्तिचित्र, प्रवासवर्णन... अशा अनेक प्रकारांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. पुलंना आवडलेले पाश्‍चात्त्य साहित्य अनुवादित करून त्यांनी मराठी वाचकांना सादर केलेले आहे. पुल मानवी मनाचे जाणकार, तज्ज्ञ, चिकित्सक होते, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांची सर्व व्यक्तिचित्रे आजही लोकप्रियतेच्या उच्चांकावर आहेत.

‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘गुण गाईन आवडी’ ही पुस्तके वास्तवातल्या व्यक्तींवर आधारित; तर ‘व्यक्ती आणि वल्ली’ काल्पनिक व्यक्तिमत्त्वावर आधारित आहेत. पुलंची काल्पनिक व्यक्तिचित्रे समाजजीवनात पार मिसळून गेलेली. म्हणूनच लग्नकार्यातल्या हरकाम्यात आपण ‘नारायण’ शोधतो. पुस्तकातील किड्याला ‘सखाराम गटणे’ म्हणतो. टपरीवर लाल चहाचा कप समोर आला तर ‘अन्तू बर्वा’च्या वेशात चहावाल्यावर खेकसतो. पुलंची अतिशय मार्मिक व्यक्तिचित्रं, त्या व्यक्तीच्या दर्शनीय रंगरूपापासून वर्णन करीत त्याच्या अंतरंगाच्या गाभ्यापर्यंत वाचकाला घेऊन पोहोचायचं, हे असामान्य कर्तृत्व पुलंच्या लेखणीचं.

पुलंच्या साहित्यप्रकारात जीवनदृष्टी देणारी प्रवासवर्णने मार्गदर्शक आहेत. ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ं, ‘जावे त्यांच्या देशा.’ पुलंमुळे खूप दूरचे देश मराठी माणसाशी जवळीक साधून गेले. त्यांच्यातला निरीक्षक वाचकांना अंतर्मुख करत गेला. आपला समाज, देश याकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन त्याला प्राप्त झाला. पुलंचे हे सामाजिक ऋण सहज फिटणारे नाही.

पुलंचे ललित साहित्यलेखन सामान्य ज्ञान आणि निरीक्षण यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचे काही खास लेख ‘माझे खाद्यजीवन’, ‘पाळीव प्राणी’, ‘चाळीशी.’ पाळीव प्राण्यांविषयी, रेल्वे व पोस्टाच्या कारभाराविषयी लिहिताना तपशिलांचे बारकावे. मानवी संबंध व व्यवहार, शाब्दिक कोट्या, उपहास या सर्व विषयांचे संमेलन त्यांच्या साहित्यात वाचायला मिळते. शब्दांची आकर्षक मांडणी हे साहित्याचे मर्म आहे, हे पुल-साहित्य पुन:पुन्हा वाचावयास घेताना वाचकांना जाणवते.

पुलंचं साहित्य रंजकतेकडून वैचारिकतेकडे झुकू लागतं व म्हणूनच मानवी मनात घर करून राहतं. वाचकाच्या मनापर्यंत पोहोचणार सहज, प्रांजळ व प्रभावी वाङ्‌मय त्यांच्या साहित्यक्षेत्रातल्या कौशल्याची यशोगाथा आहे.

त्यांच्या जीवनप्रवासात जे काही उत्कट-भव्य त्यांना दिसलं- जाणवलं, ते सर्व त्यांनी आपल्या मराठी माणसापर्यंत आणून सोडलं. वाचकाच्या मनाच्या कक्षा जाणीवपूर्वक रुंदाव्यात, याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींची व्यक्तिचित्रं समाजासमोर आणली. देशातील कलाकारांना त्यांच्या कलेसोबत लोकांसमोर आणलं. इंग्रजी रंगभूमीवरची उत्तम नाटकं मराठी भाषेमध्ये आणली. मराठी साहित्याला आपल्या वाणीने व लेखणीने समृद्ध केले व मराठी माणसासाठी अजरामर साहित्य निर्माण करून भलंमोठं संचित समाजासाठी मागे ठेवून ते गेले.

मराठी वाचकाला तर वर्षामागून वर्ष पुरेल इतकं साहित्य आणि ते प्रसवणारी प्रतिभा कायम त्याच्या मनात घर करून राहील. त्यांचे हृदयस्थ लेखक हृदयात स्थिर होतील- कधीही न जाण्यासाठी. कारण, प्रत्येक वर्षीची १२ जून तारीख आली की, पुलंचं सर्व उपलब्ध प्रकाशित साहित्य, पुलंचे चित्रपट, भाषणाच्या ध्वनिफिती, त्यांना मिळालेले सन्मान, पुलंच्या प्रतिष्ठानाने दिलेल्या सामाजिक देणग्या- सर्व हृदयस्थ गोष्टी पुन्हा एकदा नव्याने ओठांवर येणार व लेखणीतून बाहेर पडणार...

- आरती नाफडे
तरुण भारत
१२ जून २०१५

0 प्रतिक्रिया: