Monday, January 3, 2011

एक जानेवारी : एक संकल्प दिन

नव्या वर्षाचे आपण हसतमुखाने स्वागत करू या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. ‘‘आहेत त्या साडया फाटून गेल्याशिवाय नवीन घेणार नाही’’ अशा नमुन्याचा किंवा ‘सिगरेट सोडली’ या चालीवर ‘पावडर सोडली’ ह्या थाटाचा संपूर्ण इहवादी संकल्प एक जानेवारीचा मुहूर्त साधून सोडलेली स्त्री आमच्या पाहण्यात नाही. आलीच तर तिला आम्ही कडकडून भेटायला तयार आहो. (हा केवळ भाषाविलास) पुरुष मंडळींना मात्र असले-म्हणजे साडी फाटेपर्यंत नवीन घेण्याचे नव्हे-सिगरेट सोडण्याचे, स्वखर्चाने दारू न पिण्याचे वगैरे संकल्प सोडल्याशिवाय एक जानेवारी हा दिन साजरा झाल्यासारखे किंवा नव्या वर्षाचे आपण यथायोग्य स्वागत केल्यासारखे वाटत नाही.

एक जानेवारीपासून सिगरेट ओढायची नाही हा मात्र बराच लोकप्रिय संकल्प आहे. मात्र त्याला दोन जानेवारीपासूनच फाटे फुटतात.

पहिला फाटाः पाकीट घ्यायचं नाही. एकेक सुटी सिगरेट घ्यायची.

दुसरा फाटाः अर्धी-अर्धी ओढायची.

तिसरा फाटाः दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची.

चौथा फाटाः रात्री नऊच्या पुढे ओढायची नाही.

पाचवा फाटाः फक्त जेवणानंतर ओढायची.

सहावा फाटाः चहा व जेवणानंतर.

सातवा फाटाः रात्री नऊ ऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही.

आठवा फाटाः इंपोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकीटच्या पाकीट ओढले तरी नो हार्म ईज फॉजड, इत्यादि इत्यादि.


थोडक्यात, सिगरेट सोडण्याचा संकल्प सोडण्याचा आणि मोडण्याचा प्रकार, केवळ विरळवेदनेची हौस भागवायला स्वपत्नीला आग्रहाने आपणच माहेरी पाठवून आठव्या दिवशी तिला परत आणायला जाण्यासारखा आहे. सिगरेट सोडून परत ओढण्याचा आनंद हा विरहानंतरच्या मीलनासारखा आहे. त्या आनंदाची गोडी अधुऱ्या मंडळींना कळणार नाही. (हो, बरं आठवलं, धूम्रपानाची तारीफ करताना शासकीय विधिलिखिताला अनुसरुन ‘‘धूम्रपान आरोग्यास विघातक आहे’’ हेही लिहितो. ते वाक्य न लिहिणे अवैध म्हणजे बेकायदा आहे. आपण बेकायदेशीरपणा म्हणजे अवैधव्य याला फार भिऊन वागतो.) तर काय सांगत होतो ? सिगरेट सोडण्याचा संकल्प मोडण्यातली मजा.

‘सिगरेट सोडणे’ ह्याप्रमाणे एक जानेवारीपासून नित्यनेमाने डायरी लिहिणे, पहाटे उठून मैदानात फिरायला जाणे, गच्चीवर फेऱ्या घालणे-अंगणात फेऱ्या घालणे, घरातल्या घरात फेऱ्या घालणे – योगासने करणे – जागच्या जागी धावणे, हे देखील सुप्रसिद्ध संकल्प आहेत. आम्ही तर ५-६ वर्षांनी आलटूनपालटून हे संकल्प नव्या उमेदीने सोडीत आलो आहो. त्यातला आमचा डायरी लिहिण्याचा संकल्प कृष्ण पक्षातल्या चंद्राप्रमाणे कलेकलेने क्षीण होत गेल्याची साक्ष जुन्या डायऱ्या पाहताना पटते. पण डायरीचे एक आहे की, ती भेट म्हणून मिळवण्यातच खरी मजा असते. हिशेबाची डायरी ही रोजनिशी झाली. भेट म्हणून मिळालेल्या आणि ‘‘…… अहाहा ! आज पहाटे उठताना शेजारच्या रेडियोवरुन दत्त दिगंबर दैवत माझे ऐकल्यावर आज गुरुवार हे ध्यानात आले. उद्याचा दिवस गेला की परवा सेकंड सॅटरडे…’’ अशा प्रकारचा काव्यमय मजकूर असलेल्या डायरीला ‘दैनंदिनी’ म्हणावे.

डायरी की डियरी ?
________________________________

एखाद्या कुमुदिनी (समोरची) शरदिनी (पेंडश्यांची) किंवा तसं पाहिल तर ईव्हन प्रमोदिनी (साहेबांची पी. ए.) यांच्यासारखेच ह्या दैनंदिनीला मानून तिच्याशी हळुवारपणे बोलावे. प्रेयसी ही काय विकत घ्यायची वस्तू आहे ? इंग्लिश लोक देखील असल्या भेट आलेल्या डायरीला ‘डियरी’ म्हणायला कसे विसरले कोण जाणे. अशी सुंदर दैनंदिनी हाती आल्यावर रोज डायरी लिहीण्याच्या संकल्पाला जोर येतो. पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी खोट बोलवत नाही म्हणून सांगतो, हा हुरूपसुद्धा कृष्णेन्दुवत मावळला जातो. पहिल्या भेटीत प्रेयसीशी काय बोलू नि काय नको होऊन तोंडाला खीळ बसावी आणि पुढे चार-पाच दिवस तिचेच बोलणे ऐकत राहावे लागल्यावर ‘हाच का तो आपल्याला आजन्म ऐकावा लागणारा प्रतिभाविलास ?’ ह्या भीतीने बोबडी वळावी तशीच काहीशी ह्या नित्यनेमाने दैनंदिनीला भेटण्याच्या बाबतीतली अवस्था होते.

रोज लिहिण्यासारखे आपल्या आयुष्यात काही घडत नाही आणि जे घडते ते लिहिण्यासारखे नसते याची खेदजनक जाणीव जानेवारीच्या दिनांक चार किंवा पाचपासूनच व्हायला लागते. पहिल्या तारखेला मात्र दैनंदिनीतले पान अपुरे वाटते. मजकूर चांगला चार जानेवारीपर्यंत कागदावर पडलेल्या तेलाच्या थेंबासारखा पसरत जातो. (उपमा पटत नसल्यास सोडून द्यावी.) पण प्रेयसीची भेट हे देखील नित्यकर्म झाले की प्रथमदर्शनी चवळीच्या शेंगेसारखे वाटलेली तिची बोटे बरीचशी तोंडल्याच्या वळणावरची आहेत हे उमजते. तसेच प्रथम सडसडीत वाटणारी दैनंदिनीची पाने नको तितकी एेसपैस वाटायला लागतात. दैनंदिनीची प्रेयस्यावस्था संपते आणि नवलाई संपल्यावर प्रेमाराधनात तरी काय उरते ?

प्रेयसीची भेट म्हणजे काही नित्यनेमाने संघाच्या शाखेवर नमस्ते सदा मातृभूमी करायला जाणे नव्हे. तसं पाहिल तर एकेकाळच्या माझ्या दैनंदिनीतली पहिली सात-आठ पान टेरिफिक काव्यमय आहेत. एका प्राचीन डायरीतला माझा दोन तारखेचा मजकूर तर चांगला पाच तारखेपर्यंत, केळीच्या पानावर वाढलेले आळवाचे फतफते मिठापर्यंत ओघळत जावे तसा वाहत गेला आहे. ‘तू माझी अन् तुझा मीच’ पासून ते ‘काढ सखे गळयातले तुझे चांदण्याचे हात’ पर्यंत मराठी काव्यातल्या ओळीच्या ओळी त्या पानापानांतून धावताहेत.

आठ जानेवारीला ‘डायरीचे हे एवढेसे पान… माझ्या कोसळणाऱ्या भावनांचा धबधबा…ह्या चिमुकल्या डायरीच्या पानाच्या द्रोणात कसा साठवणार ?’ अशीही टिंबओळ आहे आणि नऊ तारखेपासूनची पुढली पाने कोरी आहेत. त्यानंतरच्या डायऱ्यात काव्य आटत गेले आहे. ‘चांदण्याच्या हातांचे’ कणीक तिंबलेल्या पिठाच्या हातात पर्यवसान झाल्यावर काव्यबिंव्य कुठल परवडायला ? नंतरच्या एका वर्षातल्या डायरीतल्या दोन जानेवारीच्या पानावर ‘त्रिफळाचूर्णाचे भाव का वाढावेत कळत नाही. महायुद्धाचा आणि त्रिफळाचूर्णाचा काय संबंध ?’ असाही मजकूर आलेला आहे. थोडक्यात दैनंदिनीची हळूहळू दैन्वंदिनी व्हायला लागली आहे.

ते काही का असेना, एक जानेवारी आली की नवे संकल्प मनात गर्दी करायला लागतात आणि भेटीदाखल येणाऱ्या डायरीची प्रतीक्षा सुरू होते. ह्या नव्या संकल्पात कालमानाप्रमाणे, जुनी पत्रे एकदा नीट पाहून, नको असलेली फाडून टाकून व्यवस्थित लावून ठेवावी, ठिकठिकाणी निर्वासितांसारख्या तळ ठोकून पडलेल्या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या गठ्ठयावरची धूळ झटकून त्यांची विषयवार विभागणी करून, वहीत नोंद करावी असे काही संसारपयोगी संकल्पही असतात. ते पार पडतात की नाही याला महत्त्व नाही.

खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये. आपण अमुक अमुक करण्याचा किंवा न करण्याचा संकल्प सोडलाय हे सांगण्यातच तो जणु काय पार पाडलाय असा ध्वनी असतो. ‘मन मुद्द तुझं गोष्ट हाये प्रिथिवी मोलाची’ हे आपलं सर्वात आवडतं गाणं हे सांगण्यामागे आपण जणु काय आयुष्यातला साऱ्या भानगडी शुद्ध मनानेच केल्या असा सूर असतो. तसच हे संकल्प सोडण्याच आहे. शिवाय सार्वजनिक रीतीने हे जाहीर केलेले संकल्प पार पडले की नाही हे पाहायला जिथे कोणी जात नाही तिथे खाजगी संकल्पाची कोणाला आठवण असणार ?

संकल्प व किस्सा
_______________________________

बरं, आपण सोडलेले संकल्प काय फक्त आपल्या मनाच्या कमकुवतपणामुळे मोडले जातात असं थोडंच आहे ? पहाटे उठून मुंबईतल्या वरळीच्या चौपाटीवर नित्यनेमाने फिरायला जायचा संकल्प मी सोडला होता त्या जानेवारीतली गोष्ट. ठरल्याप्रमाणे एक जानेवारीला फिरून आलो. पण त्याच रात्री आमच्या गल्लीतल्या सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत आमच्या केसरीनाथबुवाच्या भजनी पार्टीची आणि म्हातारपाखाडीतल्या अर्जुनबुवा साटमाच्या श्री कुणकेश्र्वर प्रासादिक मंडळीची जुगलबंदी झाली. ती चालली सकाळच्या दुधाच्या बाटल्यांची लाइन लागेपर्यंत. त्यानंतर केसरीबुवांचे कैवारी दानशूर वर्दमशेठ धुरी यांचे कुठली भजन पार्टी विनमदी आली यावर ‘‘तुझ्या आवशीक…’’ ह्या मातृस्मरणात्मक मंगलाचरणापासून पेटलेले भांडण. दोघांनीही रात्रभर सत्तेनारैणाच्या प्रसादापेक्षा तीर्थप्राशनावरच अधिक भर दिलेला. ह्या गदारोळात आमच्या वाटयाला झोपेचे खोबरे ! रात्रभरच्या त्या जागरणामुळे वर्दमशेट आणि धुरीशेटपेक्षाही माझेच डोळे जास्त तारवटलेले. त्यामुळे एक तारखेला सोडलेला पहाटे फिरायला जाण्याचा माझा संकल्प दोन तारखेलाच मोडून पडला.

संकल्प म्हणजे ‘घड्याळ’
________________________________

संकल्पाचं घडयाळासारखंच आहे. एकदा मोडलं की मोडलं. दुरुस्ती ह्याचा अर्थ निराळ्या कारणाने पुन्हा मोडायची सोय. तात्पर्य, खाजगी संकल्पाची पूर्तता ही कित्येकदा सार्वजनिक परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणून म्हणतो की संकल्प मोडल्याचे दुःख न मानता सोडल्याची मजा घेत राहावे. गेला बाजार वर्षातले पहिले चार-पाच दिवस तरी आनंदात आणि मनाला पवित्र वाटण्यात जातात. कल्पनांचा आनंद प्रत्यक्षाहून अधिक असतो. फार तर सकाळी उठणे, डायरी लिहिणे, सिगरेट न ओढणे, एकदाच जेवणे अशा सदगुणांची ही मानसपूजा आहे असे मानावे. कल्पनेतल्या धूपदीपांनी देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे ?

तेव्हा आजचा दिवस हा असा कृतीची जबाबदारी न घेता सदगुणवर्धक संकल्प सोडण्याचा, तो सोडणार असल्याचे चारचौघात सांगण्याचा आणि फार तर दोन ते सहा-सात जानेवारीपर्यंत टिकवण्याचा. कुणाचा गणपती दीड दीवसाचा, तर कुणाचा दहा दिवसांचा असतो. तीच गोष्ट संकल्पाची. पुष्कळदा वाटतं की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प दिन म्हणून साऱ्या जगाने का साजरा करू नये ? आपल्या देशात वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असले तरी ‘दिन’ पाच-सहाशे असतील. ‘दिना’च्या दिवशी जरी जाहीर संकल्प सोडला तरी तो दुसऱ्या दिवशीसुद्धा पाळायची गरज नसते. हा धडा आपल्या मान्यवर नेत्यांनीच नाही का आपल्याला घालून दिला ?

शिवाय एक जानेवारी हा दिन संकल्प-दिन म्हणून साजरा करण्यावाचून आपल्याला गती नाही. ‘‘यंदाच्या वर्षी कुठलाही संकल्प सोडणार नाही’’ असे म्हणणे हे देखील संकल्प न सोडण्याचा संकल्प सोडण्यासारखेच आहे. तेव्हा आजच्या या शुभदिनी आपण सारेजण ‘सत्य संकल्पाचा राजा भगवान’ असे म्हणू या आणि कुठला तरी संकल्प सोडून नव्या वर्षाचे-एव्हाना दाढदुखी बंद होऊन डोके दुखी सुरू झाली नसेल तर-हसतमुखाने स्वागत करू या.

 – पु.ल.देशपांडे
  कालनिर्णय जानेवारी १९८०

7 प्रतिक्रिया:

Unknown said...

वाचनानंतरही अपूर्ण नाही वाटला. अजून काय होते लेखात ?

Harshad Samant said...

changala upkram ahee.keep it up may itake some articles from vyakti ani valee to my blog http://harshadsamant.wordpress.com

Nilesh said...

i like that sankalp because i have decided to leave cigrate but i cannt follow it.it happand many people and it is real think in the world. i like that

Anonymous said...

vishay fakt cigeratte kinva daruchach nasun sobat anek vait savayicha sudha ahe.. ho na ??

Anonymous said...

Kontya pustakatil ahe? mhanje purn lekh vachta yeil..

Anonymous said...

कुठल्या पुस्तकात आहे हे पण सांगावे

Anonymous said...

छान प्रयत्न आहे...

keep it up

लिखाणासाठी या पोर्टल ला पण भेट दया

www.sahityadarbar.com