Leave a message

Monday, June 27, 2016

पु.लं.च्या सहवासात - आरती नाफडे

सह म्हणजे बरोबर व वास म्हणजे असणे वा राहणे. पु. ल. या शब्दाची वा नावाची जादूच अशी आहे की, सर्वार्थाने आपण त्यांंच्या सतत सहवासात आहोत. पुलंना जाऊन बराच काळ लोटला म्हणजे अख्खी पंधरा वर्षे. पण, त्यांचा वास आपल्यातच म्हणजे मनात व जनात कायम आहे. पुलंचा सहवास म्हणजे अर्थात त्यांचे साहित्य. त्यांच्या साहित्य-सहवासातूनच मिळणारा आनंद आम जनतेच्या हक्काचा.

मधू गानू यांच्या ‘जवळून पाहिलेले पु. ल.’ या लेखातील वाक्य फार मार्मिक आहे. ते म्हणतात- पुलंच्या सहवासात त्यांना जवळून पाहिले की, त्यांचे ‘भाई’ होतात. या भाई नावाची जादू तर खासच आहे. अशा भाईंना साहित्याच्या माध्यमातून जवळून बघितले की त्यांचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मार्गदर्शन सगळं काही प्राप्त होतं.
पुलंविषयी खूप व खूपदा लिहून झालं असलं, तरी त्यांच्या साहित्य-सहवासात एखादा नवीन विचार जुनाच, पण नव्याने जाणवत असलेला पुन्हा गवसतो व नवीन काहीतरी स्फूर्ती देऊन जातो.

भाईंचा सहवास त्यांच्या पत्रातून अनुभवणे, हाही एक वेगळाच आनंद आहे. आता लुप्त होत जाणारी पत्रलेखनाची कला. त्यातील कलात्मकता व भावविश्‍व नाहीसे होत असताना पुलंची पत्रं गार हवेच्या झुळुकीसारखी मनाला आनंदित करतात.

पुलंच्या पत्रांचा सहवास म्हणजे समाजप्रबोधन आहे. त्यांच्या पत्रातील विषय सर्वस्पर्शी आहेत. शिवाय त्यांची पत्रं अतिशय बोलकी असल्याने एक नवउत्साह व नवदृष्टी वाचकाला अनुभवायला येते.

पुलंच्या मनातील विचार प्रत्यक्ष साहित्यकृतीत येतात, तेव्हा प्रथम त्यांच्या पत्रांचा सहवास येतो मग साहित्याचा. त्यांच्या, परदेशातील अनेक पत्रांतून त्यांनी भेटी दिलेल्या स्थळांची सुंदर वर्णने आहेत. त्यांच्या तिन्ही प्रवासवर्णनांच्या पुस्तकातून- ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’ यातून ती आपल्याला वाचायला मिळतात.
लेखकाच्या मनातील विचार प्रकर्षाने अनुभवनिष्ठ व डोक्यात सतत स्थिर असतात. पुढे ते साहित्याचं वलय घेऊन जेव्हा पुढ्यात येतात, व्यक्त होतात तेव्हा त्यांचे संदर्भ लागतात. १९५२-५३ साली पुलं बेगम अख्तर यांना भेटायला रामूभय्या दाते यांच्याबरोबर गेले होते. त्या वेळी त्यांनी लिहिलेल्या पत्रात शिवपुरीच्या जंगलाचे सुंदर वर्णन आहे. पुढे ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटक आले आणि त्यात काकाजीच्या रूपाने रामूभय्या दिसले आणि काकाजींच्या तोंडी जंगलाचे वर्णन.

जगाला भरभरून आनंद देणारा चॅप्लिन हे पुलंचं आवडतं व्यक्तिमत्त्व होतं. १४-९-७२ त्या पत्रात ते लिहितात, व्हेनिसला चित्रपट महोत्सव होता. तिथे ‘सेंट मार्कस्’ नावाचा भव्य व सुंदर चौक होता. तिथे आम जनतेला महोत्सवातील चित्रपट मोफत दाखवत. पुलं तिथे गेले. त्या रात्री त्यांना चॅप्लिनचा ‘लळींू श्रळसहींी’ चित्रपट दाखवणार होते आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्या रात्री स्वतः चॅप्लिन मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते! पुलंची चॅप्लिनला पाहण्याची इच्छा अशी पूर्ण झाली. पुलंना आनंदयात्री म्हणून आपण सगळे ओळखतो. त्यांना चॅप्लिनच्या दर्शनाने झालेला आनंद वाचकांसाठी लाखमोलाचा आहे. जो पत्रातून प्रत्ययास आला.
पुलंचा पत्ररूपी सहवास लाभलेले मित्र व मित्रांचा गोतावळा ज्या गावी ते जात तिथे जमत असे. यावरून पत्रसहवासाने दोन व्यक्तींमधला स्नेहभाव वाढतो. आपुलकीची भावना निर्माण होेते. मात्र, त्यासाठी सहवासातील सारे आनंदाचे क्षण न विसरता जपावे लागतात. २९ सप्टेंबर १९७५ च्या भुवनेश्‍वरहून लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या मित्रपरिवाराची व्याप्ती लक्षात येते. पुलंच्या मनातील निसर्गप्रेम त्यांच्या पत्रातील सहवासातून मनाला भावते. निसर्गाच्या विपुलतेचं मनोहारी वर्णन ते करतात. त्याच निसर्गाचं रौद्ररूप धारण केलेले वर्णन मनाला स्पर्शून जातं. शांतिनिकेतनच्या तपोवनात त्यांच्यातील सुप्त निसर्गप्रेम प्रकट झाले. वृक्षराजी आणि पुष्पसृष्टी त्यांना खर्‍या बंधुप्रत भासली.

शांतिनिकेतनातून लिहिलेल्या पत्रात वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी बंगाली शिकायचे ठरवले. त्यासाठी शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिले. ते पत्रात लिहितात, बंगाली वाचता येऊ लागल्याने अलिबाबाच्या शिळेची गुहा उघडायचा मंत्र सापडल्यासारखे झाले आहे. नवीन भाषा शिकायला वयाची अट नाही, फक्त नवीन काहीही शिकायची इच्छा मात्र पाहिजे.

मधू गानू हे पुलंच्या घरच्या मंडळींसारखे. त्यांनी पुलंबरोबर प्रवासपण केलेला. ते म्हणतात, भाईबरोबरच्या प्रवासातील आनंदासारखाच प्रवासातल्या भाईंच्या पत्रातून मिळणारा आनंद वेगळा असतो. त्यांना पुलंची मोजकीच पत्रे आलेली. मधू गानू आपल्या लेखात पुलंच्या दोन पत्रांविषयी विशेषत्वाने उल्लेख करतात. ज्यात त्यांना पुलंचे प्रेम व काळजी दोन्ही भावना प्रतीत झाल्या. जीवनाबद्दलची एक वेगळी दृष्टी भाईंनी मला दिली, असा उल्लेख पत्रात आहे.

पत्राचा संदर्भ असा- मधू गानू यांना १९७४ साली त्यांच्या कंपनीतर्फे दुबईला जाऊन राहण्याची संधी आली होती. पण, जीवनात योग्य काय व अयोग्य काय, हे सांगणारी व्यक्ती लाभणं हे फार मोलाचं आहे. भाईंनी तेव्हा पत्रात त्यांना लिहिलं की, तुझी बदली लंडन किंवा पॅरिसला झाली असती तर काही सांगण्याचा प्रश्‍नच नव्हता. पण ज्या शहरात पैसा हे एकमेव लक्ष्य आहे व तो वैध आणि अवैध मार्गाने मिळवला जातो अशा एका केवळ ‘वासनाखंडात’ तुला बदली निमित्ताने जावे लागत आहे, हे मनाला पटत नाही व योग्यपण वाटत नाही. पैसा या गोष्टीची आवश्यकता असली तरी तुला त्याचा मोह नाही हे मी जाणतो. त्यामुळे विचारपूर्वक निर्णयाचे अवलोकन कर व दुबईला जाण्याचा मार्ग धरू नको.

मधू गानू यांनी भाईंचा उपदेश प्रमाण मानला व ते गेले नाहीत. ते पुढे म्हणतात, भाईंच्या पत्रातून वेगळी जीवनदृष्टी प्राप्त झाली.

दुसर्‍या पत्रात मधू गानू चिडून सुनीतावहिनींना पत्र लिहितात. त्यावर पु.लं.नी त्यांना लिहिलेल पत्र, हे जरी त्यांना उद्देशून होते तरी त्यातला उपदेश प्रत्येक रागीट व शीघ्रकोपी माणसाने मनन व चिंतन करून ठेवण्यासारखा आहे.

पु.ल. पत्रात लिहितात- जीवनात आपल्याला जे हवे ते सर्व मिळतेच असे नाही. शीघ्रकोपी माणसांचे बाबतीत समजुतीच्या घोटाळ्याने अतिरेक होतो व त्यांचेच बाबतीत नेमके घोटाळे होतात. माणसातला अनावरपणा एकूणच चांगला नाही. माणसाला आवरते घेता आले पाहिजे व महत्त्वाचे म्हणजे आपल्या माणसांना समजून घेता आले पाहिजे.

आपल्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला, तर प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. मग माणसातील सहानुभूती, समजूतदारपणा, विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. आपल्या जीवनात परिचित किंवा मित्र, आप्त वगैरे खूप असतात. पण, स्नेहबंधने फार नसतात. दुर्मिळ नाती कुठल्यातरी पूर्व योगाने जमली असतात. ती धरून राहायचं असेल, तर राग, क्रोध यावर ताबा हवाच व मुख्य, आततायी वृत्ती सोडायला हवी.
त्या पत्रातील पु.लं.चं एक वाक्य मनाला चिकटणारं आहे. ते म्हणतात- हसूनखेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्यं रागाने मलिन करीत असतो. मुलं रागावली की आपलं खेळणंच मोडून टाकतात. त्यासारखे आपले स्नेहबंध मोडून टाकून चालत नसतं. त्यातून जीवनातला आनंद घेण्याचा खिलाडू वृत्तीचाच लोप होतो. ती वृत्ती गेली की सारेच गेले.

पु.लं.नी जीवनभर जपला तो आनंद कसा टिकवून ठेवता येईल, याची गुरुकिल्लीच या पत्रांद्वारे आपल्या हातात दिली. आपण ही जिवापाड जपायचा प्रयत्न करू या...

आरती नाफडे
२६ जून २०१६
a