Tuesday, April 24, 2007

उपास -- (बटाटयाची चाळ)

बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च. मंगेशराव हे चाळीतले संगीतज्ञ; परंतु त्यांना कुठल्या चिजांचे अंतरे येत नाहीत हे एरवी 'गाणे संपले' एवढेच गाण्यतले कळणा-या राघूनांनादेखील ठाऊक. बाबलीबाईंच्या पाटल्या गहाण पडल्याची गोष्ट गहाणखतावरची शाई वाळण्यापूर्वी सर्वांच्या तोंडी झाली. आणि रतन समेळ (न्यू गजकर्ण फार्मसीच्या समेळकाकांची मुलगी) हिने द्वारकानाथ गुप्तांच्या मधूला लिहीलेले प्रेमपत्र मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलाने गॅलरीत उभे राहून परवचा म्हणतात तसे खाडखाड म्हणून दाखवले! सगळे बहीर्जीचे वंशज नाना जातींत आणि पोटजातींत जन्मून बटाट्याची चाळीत वस्तीला आल्यासारखे आले आहेत. वासविक माझ्या उपासाचा निश्र्चय मी आधी माझ्या' मना सज्जना 'खेरीज 'येरा कोणा'लाही सांगितला नव्हता. पण उपासाला सुरवात करून पुरे चार तास लोटले नाहीत तो वर्दळ सुरू झाली.

"पतं--(मला मंडळी उगीचच पंत म्हणतात. वास्तविक म्हणतात. वास्तविक 'पंत' वाटावे असे माझ्या काही नाही. चांगला टेलिफोन ऑपरटेर आहे मी. हं, आता आपल्याला बूटपॅंट आवडत नाही हे खरे, पण म्हणून काय 'पंत'?) पंत, हा काय साला म्याडनेस!" अशा थाटात सोकाजी त्रिलोकेकरांनी सुरूवात केली, "तुम्हाला काय वाटतं? साला तुमचा बॉस अशी करून लिव्ह सॅंक्शन करील?" 

"पण माझं ऎका--" मी चार तासांच्या उपासानंतर क्षीण होत चाललेल्या माझ्या आवाजात सोकाजीनानांची समजूत घालू लागलो. पण नाही! सोकाजी मला 'सर्मन' देण्याचा चंग बांधून आले होते! 

"माय गुड फ्रेंड-- साले फास्टनी काय होतं?.. हा तर मुळी बॉसला कन्विस करण्याचा वे~च नाय! लिसन -- तुम्हाला पायजे तर सिक नोट देतो. माझे कझिनचा साला एम. डी हाय. यू बिल गेट ऍज मच लिव--बट साला उपास काय?" 

"पण माझं ऎका--" 

"अरे काय ऎका? तू काय सांगणार? धिस इज हबंग!" 

चारपाच तासांच्या उपासाने माझी अशक्ततता कणकण वाढत होती आणि इथे सोकाजीनानांना जोर चढत होता. 

"साला लिसन--तू जेवून घे बंर. साला सोन्यासारखा संडे हाय--आज फीश काय मिळाली होती. पण तू उपासबिपास नको करू!" 

साधारण दिड तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर 'एकच प्याला' तल्या 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्ही तुम्हांला सांगु नये; पण तुम्ही दारु सोडा!' ह्या चालीवर सुरुवात केली. 

"पंत- (इथे कुशाभाऊंनी माझ्या पाटीवरुन हातही फिरवला.) पंत, ऎका माझं. दोन घास खाऊन घ्या." (ह्या वाक्याने काही अत्यंत सुतकी संकेत माझ्या मनात डॊकावले!) 

"अहो पण--" 

पण नाही नि परंतु नाही. पंत, आपण चाळीत इतकी वर्षे राहिलो ते भावाभावांसारखे. आमची ही आताच म्हणाली, की तुम्ही उपवास सुरू केला आहे, जेवत होतो , तसाच उठुन आलो! नाही, पंत--तुम्ही जेवायचं नाही, तर कुणी? पंत, ऎका माझं. बाबा बर्व्याच्या नारुची मुंज आठवा . विस वर्षे होऊन गेली. पंचावन्न जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही?" इथल्या 'तुम्ही' वर कुशाभाऊने एक हुंदका देखील काढला. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आत डोळे पुसले. "ते काही नाही पंत, तुम्ही जेवंल पाहीजे--- उपासानं काय होणार" अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता?" 

"जनोबाचा काय संबंध?"माझे हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा "काय संबंध!" एवढेच शब्द उच्चारून कुशाभाउ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला. 

"कळल्या आहेत, कळल्या आहेत मला सा-या गोष्टी! टमरेलची चोरी ती काय! अरे, जाताना बरोबर थोडीच न्यायची आहे आपल्याला ही चीजवस्तु ? सांर इथंच टाकून जायंच आहे बंर!"--कुशाभाऊ 

"टमरेल?" 

"पंत उजाडल्यावर टमरेल--नाही टमारेल उजाडल्यावर कोंबडं झाकलं काय उजाडल्या राहतंय थोडचं ! तिन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर?" 

"चोरी?" मला काही कळेना. 

"पंत, तुम्ही नका कष्ट करुन घेऊ. मी जनोबापुढं शभंर टमरेलं भरून ठेवतो. वापर म्हणांव दिवसभर, पण पंत, तुम्ही हा उपासाचा नाद सोडा---ही अन्नब्र्म्हाची उपेक्षा आहे, पंत." 

"मला काही ऎकायचं नाही नि बोलायचं नाही. मला फक्त एकच पाहायचं आहे ते तुम्हांला भरपूर जेवताना. पंत, सोडा हा नाद --नाही हो, अंतःकरण पिळवटुन सांगतो मी तुम्हांला. नका, पंत, नका ह्या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू!" 

कुशाभाऊंना आवरणे मुश्किल झाले. शेवटी त्यांच्या गेल्याच आठवद्यात झालेल्या एका नाटकाबद्दल मी बोललो तेव्हा गाडीने रूळ बदलले. पण ते किती,अगदी थोडा वेळ, आणि गाडी पुन्हा मेनलाइनवर आली! 

"नका--नका हो पंत, असं करू!"

"अहो , काय करतोय मी!" 

"कळतंय मला--तिळतीळ तुटतं माझं आतडं! पण पंत, सोडा हा अविचार!" 

आता मात्र मला काय बोलावे ते सुचेना. मी डोळे मिटून स्वस्थ बसलो. नाट्यभैरव कुशाभाऊ सुमारे पाऊण तास माझे अक्षरही ऎकून न घेता बडबडत होता.बाकी कुशाभाऊची ही तारीफ आहे. नाटकातदेखील उत्साहाच्या भरात त्याने स्वतःचे, स्वतःच्या नोकराचे, आणि 'पडद्यात गलबला' ही सगळी भाषणे एकट्याने केली होती. रंगभूमीच्या दुस-या कोण्त्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचे नाही हा त्याचा संकल्प असल्यासारखा तो वागतो. चाळीतले गडी जसे दुस-या गड्याला 'टिकू' देत नाहीत त्यातलाच प्रकार! नाट्यभैरव कुशाभाऊंच्या भीमदेवी भाषणाने सा-या चाळीला माझ्या उपासाची वार्ता पोचली! आणि बि-हाडात हळूहळु, पावले न वाजवता, मंडळी गोळा होऊ लागली. मी तोंड उघडले की सर्व जण एकमुखाने "तुम्ही बोलू नका--तुम्हांला त्रास होईल!" अशांसारखे उद्गार काळजीयुक्त स्वरात काढायचे. आचार्य बाबा बर्व्याखेरीज सर्व शेजारी जमले. 

तळमजल्यावरच्या किराणा-भुसार मालाचा व्यापारी शा चापशीतेखील आला! 

"असा कोणी अपासबापास करायला शरुवात केला म्हणजी आमाला तो लय धास्ती वाटते. आमची कच्छमदी ते एक रावळबाप्पा होता-- असाच अपास करून मरून गेला. पंत अपास नाय कर तू--आमाला धास्ती वाटते!" 

"बरोबर आहे --- सगळ्यांनी उपास करायचं तर ह्यांच दुकान कसं चालणार?" काशीनाथ नाडकर्ण्याच्या कानात जनोबा रेगे कुजबुजले. माझ्या उपासाचे एक सोडा, पण जनोबा कुठल्याच प्रसंगाचे गांभीर्य कळत नाही! 

मी स्वस्थ डोळे-मिटून पडलो होतो. बाकी त्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हतो. मंडळी त-हे त-हेच्या मुद्रा करून माझ्याकडे पाहत होती. लहान मुले खिडक्यांच्या गजांतून आळीपाळीने डोकावत होती. 

"चिंत्याचे बाबा मरणार का रे चंदू?" कुठलेसे कारटे तेवढ्याच माझ्या जिवावरदेखील उठले! परस्पर त्याच्या पाठीत कोणीतरी धपका घातल्याचे मी ऎकले. 

आत येणारा प्रत्येक जण "पंताना स्वस्थ पडु द्या--" असे सांगत होता, आणि आपण स्वतःच आमच्या खोलीत गर्दी करीत होता. माझ्या पाकीटातले सगळे 'पिवळे हत्ती' चौकशीला आलेल्या मंडळींनी संपवले होते. सुपा-या लांबवल्या होत्या. तबकात फक्त 'देठ, लवंगा, साली' शिल्लक होत्या. मी काहीही बोलायला तोंड उघडले की ",पंत, नका. तुम्ही स्वस्थ पडा!" असा एकमुखाने आवाज उठायचा! तेवढ्याच कुणीतरी माझ्या उशाशी उदबत्तीदेखील आणून लावली! 

शेवटी अगदी कळवळून मी ओरडलो, "अहो, असं काही नाही. मी जो हा उपास सुरू केला आहे--" 

"तो सोडा, पंत सोडा, सोडा!" नाट्यभैरव कुशाभाऊला नाटकात दुस-याची वाक्ये तोडायची इतकी भंयकर खॊड की 'भाऊबंदकी' त राघोबाचे काम करताना रामशाश्र्याच्या पार्ट्याने 'देहान्त प्रायश्रित्ता'तला 'देहान्त'म्हटल्यावर "प्रायश्रित्तावाचून गत्यंतर नाही!" हे न्यायधीशाचे उरलेले वाक्य आपण राघोबा आहोत हे विसरून त्याने स्वतःच म्हणून टाकले होते!

माझ्या भोवतालची गर्दी ह्ळूहळू वाढत होती. आमचे कुटूंबदेखील वस्तादच.आत जमलेल्या बायकांना काय काय सांगत होते परमेश्र्वर जाणे! स्वयंपाकघरातून बाहेर पडणारी प्रत्येक बाई 'हे या महाभागाचं आता अखेरचंच दर्शन!' असा चेहरा करून माझ्याकडे पाहायची आणि बाहेर पदायची. एरवी कुठल्याही बाईने माझ्याकडे वर डोळा करून पाहील्याचे मला आठवत नाही. उपासाचे निराळे निराळे म्हणतात ते 'तेज' इतक्या लवकर तोंडावर चढत असेल याची मला कल्पनाही नव्हती! ह्या सा-या जमावातून माझी सुटका करायला गजेंद्रमोक्षाच्या वेळी साक्षात श्रीविष्णू धावत आले तसे एच० मंगेशराव सोबत तबला आणि आपल्या सुस्वर पत्नी वरदाबाई यांना घेऊन आले. वरदाबाईंच्या हातात तंबोरा होता. 

"पंत, येकट डिवोशनल सॉंग म्हणायचं इच्छा आहे--" अशी प्रस्तावना करून माझ्या कॉटच्या पायथ्याशी मंगेशरावांनी सपत्नीक तळ ठोकला व वरदाबाईंनी मीराबाईच्या 'तूमबिन मोरी' त तोंड घातले. वरदाबाई 'गोवरधन गिरीधारी' पर्यंत पोचल्याही नसतील. इतक्यात सोटाछाप मलमातल्या जाहीरातीत जसे 'उंदरास पाहून मांजर' न्यायाने रोग पळतात तसे आमचे सारे शेजारी पळाले! खोलीत फक्त मी आणि हट्टंगडी कुटूंबाचे संगीत एवढीच शिल्लक राहीलो. वरदाबाईंच्या स्वरातले आणि त्याहूनही एच्च० मंगेशकरावांच्या तबल्यातले सामर्थ्य त्या वेळी मला ख-या अर्थाने प्रतीत झाले! 'खडी सभामें द्रौपधी ठाडी- राखो लाज (वरदाबाई 'राकौ लाज्ज' म्हणत होत्या) अमारी' म्हणताना वरदाबाई असा एकेक सूर लावीत होत्या आणि मंगेशराव तबल्यावर अशा काही करामती करीत होते, की एखाद्या वेळी गोवर्धनगिरिधारी माझ्या उपासाची 'खबर' घ्यायला ख्ररोखरीच येईल की काय अशी धास्ती मला वाटायला लागली! माझ्या पोटात विलक्षण कालवाकालव सुरू झाली. (ती त्या संगीतामुळे होती की भुकेमुळे होती हे अजुनही मला उमगलेले नाही.) हट्टंगडी दंपतीचे संगीत केव्हा संपले कोण जाणे, मी जागा झालो त्या वेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. 

पहिल्या दिवसाच्या उपवासात मी फक्त कॉफी, कॆळी, एक अंडे (उकडून), दोन संत्री, भुईमूगदाणे आणि भुईमूगदाण्यांनी पित्त होऊ नये म्हणून लिंबाचा रस, कॉफीने मला बद्दकोष्ठ होतो म्हणून दूध आणि दुध पचायला जड जाऊ नये म्हणून काळ्या मनुका आणि दोन चमचे मध एवढ्यावरच भागवले. 

दुस-या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चाळीतले एकमेव साहित्यिक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर यांनी 'चाळकरी' ह्या चाळीतल्या हस्तलिखित मुखपत्राचा अंक आणून, एखाद्या राज्याच्या सनदा अर्पण कराव्या अश्या नम्रतेने माझ्या हातात दिला. 

"पंत, उपोषण-विशेषांक आहे." पोंबुर्पेकर म्हणाला. 

वास्तवीक 'चाळकरी' दैनिकाच्या साधा अंक अजून निघालाच नाही. प्रत्येक अंक हा विशेषांकच असतो. आज उपोषण-विशेषांक, कालचा स्वच्छता-विशेषांक, त्यापुर्वी चाळपुनर्रचनासमीति-विशेषांक (गच्चीपुरवणीसकट), एकदा भय्या-विशेषांक, दुस-यांदा भाडे-विशेषांक, नळ-विशेषांक---असे विशेषांकावर विशेषांक काढायची ह्या पोंबुर्प्याला खोडच आहे! त्यामुळे त्याच्या उपोषण-विशेषांकाचे मला विशेष काही वाटले नाही. अंकावरील ठळक मथळा पाहून मात्र मी स्तंभीत झालो: 

"चाळीय ऎक्यासाठी पंतांचे आमरण उपोषण" 

"पोंबुर्पेकर--" मी अठरा तासांच्या उपोषणानंतर शरीरात उरलेले सारे त्राण (महीन्याच्या शेवटी बि-हाडातल्या फणीकरंड्याच्या पेटीपासून ते रावळीपर्यंतच्या दिडक्या-आणेल्या एकवटून अखंड रुपया जमवतो त्याप्रमाणे) एकवटून ओरडलो. माझ्या ओरडण्याने पोंबुर्पेकर तिळमात्र हलला नाही. त्याच्या प्रत्येक अंकानंतर कोणी ना कोणी त्याच्यावर असेच ओरडतो! 

"काय?" शांतपणे तो विचारता झाला. 

"कुठल्या गाढवानं सांगीतलं, की मी चाळीय ऎक्यासाठी उपोषण करतो आहे म्हणून?" 

"सगळे जण असंच म्हणताहेत--" पोंबुर्पेकर उद्गारला. 

"मग सगळे जण गाढव आहेत!" मी म्हणालो. इटंरला मी लॉजिक घेतले होते; त्यामुळे दोन प्रमेयांतून हा सिद्धांत सटकन बाहेर पडला आणि पोंबुर्पेकर चूप झाला. 

"माझा हा उपास अगदी खाजगी स्वरुपाचा आहे. त्याचा चाळीशी काय संबंध?" 

"असं कसं? समेळाकाका म्हणाले, की चाळीतल्या जातीयतेविरूद्ध तुम्ही हे उपासांच शस्र उगारलंत!" 

"समेळकाका गेला खड्ड्यात!"--मी. 

"ठीक आहे. पावशे म्हणाले, की हेडक्लार्कनं तुमची लिव्ह सॅक्शन केली नाही म्हणून कारकुनांच्या दुःखांना तोंड फोडण्यासाठी तुम्ही हा उपास म्हणुन तुम्ही उपास केला--" 

"पावशे गेला मसणात!"---मी 

"ठीक आहे. नाट्यभैरव कुशाभाऊ म्हणतो, की जनोबा रेग्यांनी त्यांचं टमरेल चोरण्याचा आरोप केला, म्हणून त्यांच्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून तुम्ही उपास केला--" 

"जनोबा गेला--" वरच्या दोन वाक्यांत खड्डा आणि मसण ह्या जागा भरल्यामुळे जनोबाला कुठे पाठवावे हे मला सुचेना! त्यामुळे जनोबा गेला "ह्यात", असे म्हणून मी सर्वनामावरच भागवले. परंतु पोंबुर्प्यावर परिणाम झाला नव्हता. रेफ्रिजरेटरमध्ये मेंदू ठेवल्यासारखा तो वागत होता. 

"ठीक आहे! उद्याचा अंकात तुमचा खुलासा प्रसिद्ध करू." 

"काही गरज नाही. माझ्या उपासाशी चाळीचा काहे संबंध नाही." 

"मग कशाशी संबंध आहे?" पोंबुर्पेकर म्हणाला. 

"माझं वजन उतरवण्याशी!" 

"ऑं?" 

"हो!" 

"पण उपास हा समाजात आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना?" 

"मला ठाऊक नाही. हे पाहा--" मी खण उघडून वजनाचे कार्ड त्याच्या डोळ्यांपुढे नाचवीत म्हटले, "वाचा!" 

"आप बहूत समझदार है!" पोंबुर्पेकर वाचू लागला. 

"ते काय वाचता? वजन वाचा-- हे पाहा,बारा स्टोन आणि तेरा पाउंड." 

"फक्त तेरा पाउंड वजन तुमचं पंत--" 

"आणि 'बारा स्टोन' वाचलं ते काय बारा गुणिले चौदा म्हणजे किती?" 

"किती?" पोंबुर्पेकर. 

"किती?"--मी. 

"किती?"--पोंबुर्पेकर 

"किती?"--मी. 

"किती?"--- पोंबुर्पेकर. 

"किती-किती काय करता? चौदा गुणिले बारा--चौदं बारे?" "चौदं दाहे चाळाशे--म्हणजे चाळीस--" "ऎकशॆ चाळीस ! अधिक चौदा दुणे अठ्ठाविस, म्हणजे किती झाले?" 

"हो!" 

"हो काय?"--एकशेअड्डूसष्ट अधिक तेरा म्हणजे एकशे एक्यायशी पाउंड!" 

"कुणाचं वजन आहे हे?" पोंबुर्पेकर तोच थंडपणा चालू ठेवून म्हणाला. 

"तुझ्या बापांच! मला दुस-याची वजनं करायची आहेत काय? हे माझं वजन आहे." 

"असेल!" 

"असेल नाही--आहे! आता सांग, माझ्या वजनाशी चाळीचा काय संबंध? एकशे एक्यायशी पौंड वजन झालं माझं--ह्यातून उद्या मला मधुमेह होणार- ब्लडप्रेशर होईल, हार्ट ट्रबल होईल! मेलो पटकन तर चाळ येणार आहे का मदतीला?" 

"का नाही येणार?" पोंबुर्पेकर म्हणाला, "पावश्यांची आजी वारली तेव्हा--" 

"बाहेर हो!" त्याच्या थंडपणाचा कळस झाला होता.

"रागावू नका पंत. पण हे तुम्ही आधी का नाही लोकांना सांगितलं?" 

"पण तुम्ही माझं ऎकाल तर ना!" 

हळूहळू माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्यी माझ्या कानांवर येऊ लागली. पण मी कोणत्याही टिकेला भीक घालणार नव्हतो! 

'ऎकशे एक्यायशी पौंड'! रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वन्न कमी झाले पाहिजे, ह्या विचाराने माझी झोप उडाली! झोप कमी झाली तर वजन उतरते ह्या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही ह्यावर माझ्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर!" अशासारखी दुरत्तरे मला करीत असे. 

"दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी भिष्मप्रतीज्ञा करून मी आहारशास्रावरच्या पुस्तकांत डॊके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्क्त द्र्व्ये, वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. सा-या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्याच 'कॅलरीज' मला दिसू लगल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की, वजन उतरविण्याच्या शास्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. इतकेच्काय, परंतू ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच डाएटचा सल्ला दिला. 

उदाहरणार्थ, सोकजी त्रिलोकेकर-- "तुला सांगतो मी पंत, डाएट कर साला बटाटा सोड! बटाट्यांच नाव काढू नकोस!" 

"हो! ,म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा! 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खीः खीः खीः!" 

जनोबा रेगे ह्या इसमला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. 

"ए ईडियट! सगळ्याच गोष्टींत जोक कय मारतोस नेमी? मी सांगतो तुला पंत--तू बटाटा सोड." मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरु झाली. 

"बटाट्याचं ठिक आहे; पण पतं आधी भात सोडा!"-एक सल्ला. 

"भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळी सोडा!"--काशीनाथ नाडकर्णी. 

"मुख्य म्हणजे साखर सोडा!" 

"मी सांगू का? मीठ सोडा!" 

"लोणी-तूप सोडा--एका आठवड्यात दहा पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं." 

"तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा!"--बाबुकाका. 

"स्मोकिंग सोडा." 

"दिवसा झोपणं सोडा." 

"खरं म्हणजे पत्ते खेळायंच सोडा! बसून बसून वजन वाढतं." 

आणि सगळ्यात कहर म्हणजे भाईसाहेब चौबळ म्हणाले, "पंत, नोकरी सोडा!" 

"काय, म्हणता काय?" 

"उगीच सांगत नाही. दिवसभर खुर्चीवर बसून बसून वजन वाढत राहतं. फिरतीची नोकरी बघा!"

काही धुर्त लोकांनी मला 'मुंबई सोडा' असाही उपदेश केला. हा उपदेश माझ्या वजनाकडे पाहून केला नसून चाळीतल्या दोन खोल्यांच्या जागेकडे पाहून केला होता, हे न कळण्याइतका मी काही 'हा' नव्हतो! फक्त 'बायको सोडा' एवढे सांगणारा महाभाग भेटायचा राहीला होता. एकाने भर ट्राममध्ये मला 'धोतर सोडा' असे सांगून, तिकीट वगैरे घेतल्यावर, 'आणि पॅंट वापरायला सुरुवात करा म्हणजे पटटा बांधून पोट आवळता येईल!" असा उत्तरार्ध पुरा केला होता. 

मी मात्र ह्य सर्व जनांचे ऎकून मनाचे करायाचे ठरविले होते. पहीला उपाय म्हणून तीनचार निरनिराळ्या काट्यांवर वजन करून पाहिले. प्रत्येक ठिकाणी निरनिराळे वजन आले; परंतु एकशे एक्यायशीच्या खाली जायला कोणताही काटा तयार नव्हता. शेवटी रेल्वे-पार्सल-हपिसातल्या काट्यावर हूंडेक-याच्या वशिल्याने मी उभा राहिलो; आणि शेरा-मणाच्या बंगाली मण, देशी मण ह्या भानगडींत माझे वजन कधी शंभर पौंडांखाली तर कधी दोनशे पौंडांवर असे बदलू लागले. तिकिटवाल्या काट्यात तर वजनाबरोबर भविष्य़ेही बदलत होती. एका तिकीटावर मी स्वभावाने धूर्त, आपमतलबी आहे असे छापले होते, तर दुस-यावर माझ्याइतका साधा माणूस 'दुनिया में क्वचितही मिलेगा' असे वार्तिक होते. एका काट्याने माझे वजन दोनशे तीन पौंड दाखवून माझ्यावर कौटुंबिक संकट कोसळणार असल्याची पूर्वसूचना दिली होती! ह्या सा-या प्रकारात मला फक्त चौदाचा पाढा 'चौदे सोळे चोवीसदोन' पर्यंत येऊ लागला, एवढाच फायदा झाला. शेवटी आपले वजन हपीससमोरच्या इराण्याच्या काट्यावर करायचे ठरवुन मी 'आहारपरिवर्तन' सूरू केले. 

साखरेत सर्वात अधीक क्यालरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहील्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही, घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटामिठावर उरकायची अक्त ताकीद दिली. "मुलांसाठी म्हणुन काय थोंड गोडाधोडाचं करांयच ते कर" एवढी सवलत ठेवली. पहील्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजीबात वर्ज्य करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत 'ही' निराळे काय करते ह्याचा अजुनही अंदाज आला नाही. पहीला दिवस सुरळीत गेला आणि दुस-या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला! 

पहील्या दिवशी निम्म्याहून अधीक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती; परंतु दुस-या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने सा-या सेक्शनला पार्टी दिली, भटाने तर माझ्या 'डाएट' वर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार! बिचारा सहा वर्षांनी 'एफिशिएन्सी बार' च्या जाळ्यातून बाहेर पडला होता. भटाने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासागणिक सहस्रवधी क्यालेअरीज पोटात चालल्या होत्या! त्यामूळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटेवडे होते-- म्हणजे आणखी क्यालरीज! चिवडा अस्सल 'वनस्पती'तला, त्यामुळे आणखी क्यालरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी "भज्ज्यांशीवाय पार्टी कसली?" या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने भटाला भज्यांची परत आर्डार दिली. शेवटी मला राहवेना! भज्यांची सहावी प्लेट उडवल्यावर, मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी 'डाएट'वर असल्याचे सांगीतल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले! 

"अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध ?" भिकोबा मुसळे म्हणाला. "मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले--एवढंच काय, आपण तर आयुष्य़ात एक्सरसाईज नाही केला. तुझी कुभं रास नि कुभं लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार! लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे!" "नॉन्सेन्स!" जगदाळे ओरडला, "रनिंग कर रोज." 

"रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट चाळीस पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी!" कु० कमलिनी केंकरे म्हणाली. 

ह्या सर्व लोकांच्या सल्ल्यांत स्वतःची पत्नी, शेजारी, चुलतभाऊ अगर मामेबहीण यांची वजने उतरल्याचे दाखले होते; स्वतःचे उदाहरण द्यायला कोणी फारसा राजी नव्हता. रनिंग आणि दोरेवरच्या उड्यां ह्यांत एक 'मी पोहावे' अशीही उपसुचना येऊन फेटाळली गेली! शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी साताव्या बशीमधले भजे उचलले. 

कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती दोन पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा, वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीप्लॉवर, वगैरे बाळसेदार मंडळींची सैपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहादेखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. 

बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. ह्याविषयी विशेष चौकशी करता कुटुंबाकडून खुलासा मिळाला तो तिच्याच शब्दांत सांगणे बरे. "म्हंजे मी आपलं मनाशी म्हटलं- बंर का (वायफळ शब्दांचे डबे जोडण्यात बायकांचा हात धरणे अशक्य आहे.) की आपलं तुमचं हे वजनाचं काढलंय तुम्ही ते-- म्हंजे नीट ध्यानात घ्या बरं का मी काय म्हणत्येय ते, नाही तर उगाच डोक्यात राख घालाल! (अजून मुद्याला स्पर्श नाही!) हो, तुमच्या घराण्याचाच गुण आहे तो! नीट ऎकायचं नाही नि मग एकदम खेकसायचं, गेल्या वर्षी सासुबाई आल्या होत्या--" 

"चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढंच सांग. उगीच वायफळ बडबड नको मला!" 

"हेच ते-- म्हटंल ते उगीच?.. अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हांला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी!" 

"नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस?" 

"अहो. थोडीशीच राहीली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता!" 

"म्हणजे खलास! अग किती लाख क्यालरीज गेल्या असतील माझ्या पोटात! कसलं कमी होतंय माझं वजन? पण सांगीतलं का नाहीस मला?" 

"उगीच आरडाओरड नका करू. वजनांच ते काय मेलं? होईल हळूहळू कमी! आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही; स्वतःच कमवुन खातोय म्हणावं! वाढलं तर वाढू ते वजन." मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवीत आणि माझ्या वजनक्षय -संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. "लाडू कशाला केलेस साखर असेल त्यांत!" 

"इश्श! साखरेशीवाय लाडू आमच्या नाही घरण्यात केले कुणी!" 

कुटुंबाचे 'घराणे' हा एक स्वतंत्र विषय आहे. वादाच्या कुठल्याही प्रसंगी स्वतःच्या 'सदावर्ते' घराण्याचा एकदा तरी उद्गार झालाच पाहीजे असा संकल्प आहे तीचा. आणि त्याच्या तुलनेने आमचे घराणे हे कसे 'सामान्य' आहे, हे एकदा दाखवले की ती 'सूटते'! तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रुपाने काही क्यालरीज पोटात गेल्याच! 

दोरीवरच्या उड्यांना फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली! कारण आठ गुणिले दहाच्या आम्च्या दिवाणखाण्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड! एकदा डोक्यावरून दोरी पलिकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली! दुस-यांदा अर्धवट गॅलरीत आणि अर्धावट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बाबा बर्व्यांच्या गळ्यात! त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सर्व मंडळी 'समाचारा'ला येऊन गेली. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असुनही आले नाहीत. कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

"हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणा-या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षम करतो." 

"पण... मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी." 

"काही उपयोग होणार नाही!" 

"का?" 

"का म्हणजे? जिभेवर ताबा नाहे तुमच्या. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील!" 

"आता ह्या उड्या मारायला मी लाजदेखील सोडली हे पाहता ना तुम्ही, बाबा?" 

"ठीक आहे. प्रथम बोलणं सोडा!" 

"बोलणं सोडू?" 

"अजिबात! खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही पंत; पण बोलण्यासाठीदेखील त्याचा वापर बंद केल्याशीवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही." 

"पण मला बोललंच पाहिजे, बाबा." मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. 

"का पण? एवढा संयम नाही तुमच्यात ? मौनांच सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही....." उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास 'मौनाचं महत्व' ह्या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्यप्रवाह अडवून मी ओरडलो, 

"पण बाबा, मी बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय!" "मी टेलिफोन-ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला." 

"मग कसलं वजन उतरवणार तुम्ही?" 

अत्यंत कारूण्यपूर्व कटाक्ष 'टाकूनिया बाबा गेला'! आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही, ह्या विचाराने मला पश्र्चाताप झाला! 

मग मात्र मी चिडलो आणि निश्र्चय केला की बस्स. यापुढे उपास-वजन उतरेपर्यंत उपास! मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिनसाखरेचा आणि बिनदुधाचाच काय, पण बिनचहाचा-देखील चहा पिऊ लागलो! साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. केळी पाहिली की मला त्यांतली जीवनसत्वे दिसून अनादी तत्व सापडलेल्या ऋषिमुनींप्रंमाणे अष्टसात्विक भाव माझ्या अंगावर दाटू लागले. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटु लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या 'दुष्टपणाने व आकसाने' केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. दहा उड्या पाय न अडकता मारण्यापार्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगावरस्त्याने घावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ दहाबारा दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता! लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोज उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. 

बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो. एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दुध! दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. 'गायींना चारा'वाल्या बायांकडल्या गायी इथूनतीथून सगळ्या भाकड निघाल्या. केवळ चौकशीपोटी दोन रुपयांचा चारा गायींना चारावा लागला. दोन रुपयांत सोळ दुणे बत्तीस गायींची चौकशी केली. दोनचार वेळा त्याच त्याच गायीची चौकशी झाल्यामुळे चारावाली बाईही उखडली. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. पंधरवडाभरात फक्त दोन वेळा साखरभात झाला-एकदा अण्णा पांवश्याकडेस त्यनारायणाला आमचे मेहूण गेले होते तेव्हा आणि एकदा आमच्याच घरी मी उपास सुरू केला तेव्हा हिने सत्यनारायण 'बोलून' ठेवला होता. त्या दिवशी. त्याशिवाय सोकाजीने चोरून एकदा कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी परसवटवारांनी एकदा नागपूरी वडाभात पाठविला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात केमी गेली. 

माझा एकूण निश्र्चय पाहून चाळीतल्या मंडळीचा आदर दुणावल्याचे माझ्या सुक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करीत होती त्यांनीच "पंत, फरक दिसतोय हं!" अशी कबुली द्यायला सुरूवात केली. जनोबा रेग्यांसारखा अत्यंत कुजकट शेजा-यालाही "पंत, भलतेच की हो रोडावलेत!" असे मान्य करावे लागले. 

मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची---म्हणजे मूठभर मांस वाढण्याची! पण असली तुरळक तारीफ ऎकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी विस ते पंचवीस पौंडानी तरी माझे वजन घटलेच पाहीजे, अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी ह्याच यंत्राने माझे वजन एकशेक्यांयशी पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या, इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकीटावर वजन.... मिनीटभर माझा विश्र्वासच बसेना! एकशेब्याण्णव पौंड! आणि भविष्य होते: 'आप बहूत समझदार और गंभीर है!" 

सुमारे सहा आणेल्या मी त्या यंत्रात टाकल्या ---वजन कायम. फक्त भविष्य बदलत होते. शेवटी 'आपके जीवन में एक स्री आयेगी' हे वाचल्यावर मात्र मी हात आवरला. हल्ली मी वजन आणि भविष्य ह्या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडुन दिले आहे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जातो.

- पु.ल. देशपांडे 
बटाट्याची चाळ 

Friday, April 20, 2007

पुलंचं देणं - चंद्रकांत राऊत

पुलंचं लिखाण, त्यांचे परफॉर्मन्सेस आजही अनेकांना आनंद देतात, क्षणभर का होईना त्यांच्या निखळ विनोदातून जगण्यातल्या दैनंदिन विवंचनांचा विसर पडतो... 'पुलंच्या या मोठेपणाची जाणीव मराठीतून एमए करूनही केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या या लेखकाला आहे. म्हणूनच कामाच्या निमित्ताने त्यांचा 'पु.ल.' आणि सुनिताबाईंशी जो काही संबंध आला, ती त्यांना त्यांच्या आयुष्यातील फार मोलाची कमाई वाटते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात, निमित्त पुलंच्या नुकत्यात पार पडलेल्या जयंतीचं...

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ; विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार उघडून आत आला. 'तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे.' त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून 'सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत' त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गिऱ्हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 'हो लगेच निघतो' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गिऱ्हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. 'पुलं'चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गिऱ्हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. 'राहू द्या होे; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही.' त्याच्या या वाक्यातून 'पुलं'बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.


थोड्याच वेळात मी 'रुपाली'मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि 'या' म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले. 'थोडावेळ बसा; भाई जरा नाश्ता करतो आहे' असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या. आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो. इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. 'चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका' म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या. त्यांचे लक्ष नाही असे पाहून 'फार लहान करू नका, थोडेच कापा' पुलं माझ्या कानात कुजबुजले. माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या. पहिल्याच दिवशी पुलं त्यांना 'पुलं-स्वामिनी' का म्हणतात याचा अर्थ उमगला. त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतींच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व 'वा छान!' म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सर्वोच्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले. 'चंद्रकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं, 'नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की 'हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणाऱ्या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील.' त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या 'तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय?' मी मनात म्हणालो 'मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते. म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता. शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो, 'एक आनंदाचं देणं'. पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… '

- चंद्रकांत बाबुराव राऊत
शनिवार, नोव्हेंबर ११ २००६
महाराष्ट्र टाईम्स

आपण सारे भारतीय आहोत!

... प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाती-धर्मनिरपेक्ष अशी एकत्र येऊन करायची सामाजिक कामं कुठली? तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल? टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य एकत्र येऊन करायच्या कार्यांत साध्य होतं.' ह्मा ऐक्यासाठी विधायक कामं कुठली, याचा विचार व्हायला हवा. 'बोल होतोस की नाही भारतीय!' असं दरडावून विचारलं तर मी देखील'नाही होत जा' म्हणेन! केवळ मतपेटीशी प्रणयाराधन करणाऱ्यांना लोक गटागटांनीच जगायला हवे असतात. माणसांचे कळप केले की, हाकायला सोपे पडतात! समता वगैरे ते नेते बोलतात, पण समता ही फक्त बोलायला आणि ममता मात्र निवडणुकीतल्या गठ्ठा मतांवर, हे आता लोकांनाही कळायला लागलं आहे.

मी अधूनमधून आपल्या देशाविषयीच्या हायर एज्युकेशन-साठी खेड्यांत जातो. तिथल्या लोकांशी गप्पागोष्टी करतो. ती माणसं ह्मा नेत्यांविषयी काय बोलतात ते जर नेत्यांनी ऐकलं तर ह्मा देशांतल्या वर्तमानपत्रांतल्या टीकेला मानपत्र मानावं, असं त्यांना म्हणावंसं वाटेल! रेडिओ, टी. व्ही. यासारखी समर्थ प्राचारमाध्यमं दुर्दैवानं सरकारच्या ताब्यात आहेत. अंधश्रद्धा, भडक, धर्मवेड्यांना दुखवायला सरकार तयार नाही. त्यामुळे वाटेल त्या भाकडकथांचा आमची आकाशवाणी आणि दूरदर्शन यथेच्छ प्रसार करीत असते! समाजाला पथ्यकर असलेलं अप्रिय सत्य सांगायची आमच्या सरकारी प्रचारमाध्यमांची ताकद नाही. त्यामुळे आमचा रेडिओ सकाळी संपूर्ण अंधश्रद्ध आणि धार्मिक, दुपारी संततिनियमनाचा प्रसार करणारा समाजसुधारक आणि संध्याकाळी खोटे बाजारभाव सांगणारा लुच्चा व्यापारी! मी एकदा टॅमॅटोचा रेडिओवरचा भाव आमच्या भाजीवाल्या बंडोबांना सांगितला तर ते म्हणाले, 'मग साहेब त्या रेडिओवरच जा सस्ते टमाटे घ्यायला!'

भारत लवकरच स्वयंपूर्ण होणार हे रेडिओवरुन ऐकतच असताना गॅलरीखाली पाहिलं की, आठ-आठ, नऊ-नऊ वर्षाची मुलं पाठीवर गोणपाट घेऊन कचरा चिवडून त्यातून कागदाचे कपटे गोळा करताना दिसत असतात! आमच्यावर जातिनिविष्ट परंपरांचा तर एवढा पगडा आहे की, लहान शेतकरी, शेतमजूर, शाळामास्तर ह्मांनी गरीबच राहावं, अशी धर्माची आज्ञा आहे असंच आम्हांला वाटतं! खेड्यांतली कुटुंबच्या कुटुंबं शहरांत जगायला येऊन फूटपाथवर पसरलेली असतात, एका देशांतच नव्हे तर एका शहरात राहून सुद्धा आम्ही निरनिराळया उपग्रहांवर राहिल्यासारखे आपापले धार्मिक आणि जातीय पूर्वग्रह जोपासत राहतो. वर्तमानकाळाकडे पाठ फिरवायची आणि स्वत:च्या प्राचीनतेचा दावा करीत देशावर आपला हक्क सांगत गायचा! आपली ही परंपरेची ओढ कुठल्या थराला जाईल हे सांगणं अवघड आहे. दिल्लीत गेल्याच वर्षी सतीच्या चालीचं पुनरुज्जीवन करायला लोक निघाले होते! ऐतिहासिक काळ हा फारच सुबत्तेचा होता आणि त्या काळी सगळयांची चरित्रं धुतल्या तांदळासारखी होती ह्मा भ्रमाची लागण तर भयंकर वाढत चाललेली आहे.

मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास 'ढोरं, गॅंवार, शूद्र, पशु, नारी, ये सब ताडनके अधिकारी' म्हणतो, म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं, खेडवळ माणसं, इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत! बायकांना नवऱ्यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे. 'उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा. हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही.

वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी, मुल्ला, शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे. 'मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है?' असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की 'शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे, वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही!' आमचे तुकोबा विचारतात, 'ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे?' ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल? त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या खऱ्या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको. म्हणूनच केशवसुतांनी 'ब्राह्मण नाही हिंदुही नाही, न मी एक पंथाचा तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख, कूपातिल मी नच मंडूक मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे' असं विचारलं आहे. मुखमें रामनाम बगलमे छुरी, ह्मा तत्वाचं आचरण करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक, कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले, जातिभेदाचं पोषण करणाऱ्यांविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास 'सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही' असं सांगत उभा राहिला. यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला 'मानुषेर धर्म माणसाचा धर्म' म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.

'नान्य: पंथा अथ:नाय विद्यते'- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही' समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन, धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे. 'हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही' असं म्हणून आंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन, अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहे आणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे....

-(पुण्याच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण)

एक शून्य मी..

... मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपिरपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका ह्मांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्रिसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.

परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली. 

दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला. 

ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या." 

"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते. 

लगेच सावरुन म्हणाली, "दिवाळी कसली? खायला त्याल द्या..." 

"ह्मा पणतीत?" दुकानदार म्हणाला.

मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले."यवड्या पैशात किती बसतं ते द्या" 

"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?" 

"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितितही मला मजा वाटली. 

"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?" 

"अँटलीस्ट फिफ्टीन!" दुकानदार. 

त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो. तरीही जगतो.

ह्मा शून्याच्या मागे नकळत एखादा आकडा येऊन उभा राहतो. मला मी कधी दहा झालो आहे, कधी वीस, कधी तीस, असेही वाटायला लागते. कुणीतरी सांगत येतो, की अमक्या अमक्याच्या बायकोने रुग्णशय्येच्या उशाखाली एक चिठ्ठी ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते, की माझ्या मृत्यूनंतर माझे प्रेत ससून हॉस्पिटलमधल्या विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाला द्या. त्यांना उपयोग होइल. ह्मा बातमीने मग माझ्या शून्यामागे एक फार मोठा आकडा उभा राहून मला शून्याची किंमत दाखवून जातो. त्या बाईची आणि आपली ओळख असायला हवी होती असे वाटते. आता जगणे म्हणजे नुसता श्वासोच्छ्वास राहत नाही. 

त्या किराणा-भुसार दुकानदाराच्या दारातल्या पोरीने माझे मातीच्या पणतीचे दिवाळीशी जडवलेले नाते तोडले एवढेच मला वाटले होते : पण त्या पोरीशी माझे नाते कां जडावे ते कळत नाही. ती कुठे राहते? तिच्या हक्काची झोपडी तरी असेल का? झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!

- पु.ल. देशपांडे 

संकुचित प्रांतीयतेचे धोके -- पु. ल.

... जिथं एक देश म्हणून मानला तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणीही कुणालाही परका नाही. शेवटी परका म्हणजे तरी कोण? माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो! इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका! कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्मांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नाेकरीधंदा ह्मांत प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील? माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते.

लोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं आहे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय? कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं! माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आहे.

या जगात सगळयांना नीट जगायला मिळावं, यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य! स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात! सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की! हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा! तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता, प्रांतीयता ह्मांचे धोके कुठले कुठले आहेत, याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे!

Wednesday, April 18, 2007

सखाराम गटणे

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.

मुळ स्त्रोत - विकिपीडिया

"सर, हे पेढे--" सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली.

"कसले रे?"

"प्राज्ञ परीक्षेत पास झालो."

"छान!" प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. "किती पर्सेंट मार्क मिळाले?"

"अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान पासष्ट प्रतीशत तरी मिळावेत."

सखाराम गटणे प्राज्ञ मराठी बोलतो. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यात भिजलेले एखादे दिनवाणे कुत्रे उचलून आपण घरी आणावे, तसाच या गटण्याचा आणि माझा योग आला. ज्याच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करूणा खेरीज दुसरी कोणतीही
भावना जागृत होत नाही अशा कारूण्यभजनांपैकी तो एक आहे. बाकी माणसे तरी चेह-यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात! कूणी सदैव अनाथालयाची वर्गणी मागायला आल्यासारखा, कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा , कुणी सदैव आश्र्चर्यचकित, कुणी उगीचच अंतराळात, तर कुणी निष्कारण कपाळावर आठ्यांचे उभे गंध लावून.सखाराम गटणेच्या चेह~यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे. त्याचे प्रथम दर्शन झाले तेदेखील त्याच भावात. वास्तवीक हा मुलगा माझा कोणीही नव्हे. माझ्या एका व्याख्यानानंतर ह्याची आणि माझी ओळख झाली. हा त्या वेळी मॅट्रीकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सदरा खोचलेला, नाकासमोर गांधीटोपी घातलेला, लहानसेसे भावशुन्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात- अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या दारात उभा राहिला होता. मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला.

"स्वाक्षरी---" आपली वही पुढे करीत तो म्हणाला.

"छे छे, मी स्वाक्षरीबिक्षरी देत नाही." मी उगीचच टाफरलो.

"जशी आपली इच्छा--"

त्याने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. अगदी देवाला नमस्कार करावा तसा. दुस-या एखाद्याने मला तसला नमस्कार केला असता तर मी चिडलोच असतो. पण सखाराम गटण्याचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की, तो नमस्कार मला कुठेतरी जाऊन लागला. स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहीला प्रसंग नव्हता.वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच नाकारतो असे नाही. पण कधीकधी छ्योट्याछ्योट्या पोरांपुढे उगीचच शिष्टपणा करायची हुक्की येते. स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरे; पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असे नाही. सखाराम गटणे कोप-यात उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन माझ्यापुढे आले.

"संस्थेला भेट देण्या-या सर्व थोरामोठ्यांच्या हात आम्ही सह्या घेतो. पुण्यातल्या पुण्यात असून आपल्या भेटीचा स्योग असा आजच येतोय."

मी ते रजिस्टर चाळू लागलो. त-हेत-हेच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केला होता. मीदेखील असंतोष व्यक्त करावा असे काहीच घडते नव्हते, त्यामुळे दोनचार ओळीत संतोष व्यक्त केला. त्यानतंर आर्य्कारी मंडळाच्या सभासदांबरोबर
चहापान (ग्लूको बिस्कीट, चिवडा आणि केळी!!) झाले. सभासंदाचा माफक विनोदही सहन करीत होतो. पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम गटणे मला उगीचच अस्वस्थ करायला लागला होता. अगदी अनिमिष उभा असलेला तो चार-साडेचार फूट उंचीचा जीव--एखादी केरसूणी ठेवावी तसा राहीला होता. त्या मुलाकडे आता पाह्यचे नाही असे दहाबारा वेळा ठरवले. पण हट्टी असह्य झाले आणी मी चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितले.

"कुणाला? सख्याला?" चिटणीस आश्चर्याने म्हणाले.

"मला त्याचं नाव ठाऊक नाही. प्ण तो तिथे उभा आहे तो--"

"सख्याच तो. अरे ए गटण्या--"इतक्या लाबूंनदेखील सखाराम गटण्याचे दचकणे मला दिसू शकले, इतक्या जोरात तो दचकला. एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्यासमोर उभा राहीला.

"काय नाव तुझं बाळ?" मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणित विचारले.

"सखाराम आप्पाजी गटणे."

"अक्षर झकास आहे बंर का ह्याचं! आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती, बोर्डहाच लिहीतो. वडलांचं साइनबोर्डपेंटरचं दुकानच आहे, आप्पा बळवतं चोकात.""अरे, तुझं अक्षर इतकं झकास आहे मग स्वाक्ष-या कशाला गोळा करतोस?" ह्यात इतकं खास मोट्याने हसण्यासारखे नव्हते, पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले. "कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्या आहेस बघूं---"

"मी फक्त साहित्यिकांच्याच स्वाक्ष-या घेतो." स्वाक्ष-यांचे पुस्तक माझ्या हातीदेत सखाराम गटणे म्हणाला.

मी त्याचे स्वाक्ष-यांचे पुस्तक चाळू लागलो. प्र्त्येक साहित्यिकाच्या लिखाणातून एक-एक वाक्य निवडून काढून गटण्याने त्याखाली त्या त्या साहित्यिकाची सही घेतली होती. मी शेवटले माझे पान उघडले. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती.

"हे वाक्य कोणाचं आहे?"

"आपल्याच एका नाटकातलं!" सखाराम गटणे अत्यादरपूर्वक म्हणाला. संदर्भ सोडून काढलेले ते माझे वाक्य वाचताना माझी मलाच दया आली.

"हे वाक्य का निवडलंस तू बाळ?"

"हे वाक्य मला आपलं जिवनविषयक सूत्र वाटतं."

"बापरे!" मी मनात म्हणालो. त्या चार-साडेचार फुटी उंचीच्या दिनदुबळ्यादेहातून जीवनविषयक सूत्र वैगेरे श्ब्दांची अपेक्षा नव्हती. मी सखारामच्या चेह-याकडे पाहत राहिलो. कार्यकारी मंडळाच्या एका म्हाता-याशा सभासदावर गटण्याच्या
'जीवनविषयक सूत्र' ह्या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा. त्यांनी गटण्याला खुर्चीवर बसायला सांगितले.

"कशावरून? तू माझी पुस्तकं वाचली आहेस का?"

"आपली छापून आलेली ओळ न ओळ मी वाचली आहे. आपण आणि सानेगुरूजी हे माझे आदर्श लेखक आहात."

"अरेम पण गेल्या खेपेला ते कोण आले होते त्यांना तू ते आणि सानेगुरूजी म्हणालास--"

सेक्रेटरी ह्या मनुष्यविशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित दंडक असावा. वास्तविक गटण्याने दुस-या एखाद्या लेखकालाही सानेगुरूजींच्या जोडीने बसवले असेल, किंबहुना आणखी एकदोन आडवड्यांत एखादा तिसरा साहित्यिक आला की तो आणि सानेगुरूजी अशीही जोडी होईल. ह्याचे मुख्य कारण गटणे अजून सानेगुरुजींच्या इयत्तेतून बाहेर पडला नव्हता; पण खिडकी बाहेरची इतर दुश्येही आता त्याला आवडायला लागली होती.

सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलण्याच्या द्रूष्टीने म्हणालो,

"काय शिकतोस?"

"यदां एसेस्सीला बसणार आहे."

"अस्सं!" मी त्याची ती अनेक साहीत्यिकांच्या जिवनविषयक सुत्रांच्या गुडांळ्यांनी भरलेली वही पाहत म्हणालो. स्वाक्षरीसाठी भित भित पुढे येणारा सखाराम गटणे हा काही पहीला नमूना नव्हता. अमुक अमुक इसम हा स्वाक्षरी घेण्यालायक आहे असा गैरसमज एखाद्या अफवेसारखा पसरतो. पण स्वाक्ष-या जमवण्या-या पुष्कळ पोरांच्या आणि पोरींच्या चेह-यावर बहुधा एक खट्याळ भाव असतो. वही पुढे सरकवताना चेह-याव्र असतो तो आदरांच्या बिलंदर अभिनय! सराईत स्वाक्षरी करणारांना तो ओळखू येतो. सखाराम गटण्याच्या चेह-यावरची रेषा न रेषा कमालीची करी होती. त्याचे ते लहानसहान डोळे काही खोटा, दडवलेला, लुच्चा व्यक्त करायला केवळ असमर्थ होते.

"आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म अपकृत होईन."

सखाराम गटण्याच्या तोडूंन हे वाक्य ऎकताना त्याच्या तोंडात दातांऎवजी छाप-खान्याचे खिळे बसवले आहेत असे मला वाटते. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो, पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्या
जीवनविषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरचा सखाराम गटण्याच्या नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. साडेसातीने पछाडलेली माणसे शनीचा काटा काढणा-या मारूतीलादेखील इतका करूण आणि भाविक नमस्कार करीत नसतील. माझ्या आयूष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो.

'सखाराम गटणे' हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयूष्याच्या खातेवहीत नोंदला गेला. ह्या घटनेला आता खूप वर्षे झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी येऊ लागला. प्रथम आला तो दस-याच्या दिवशी सोने वाटायला. माझे काही मित्र घरी
आले होते. त्यांतला एकानेही मी लिहीलेली एकही ओळ वाचलेली नाही आणि यापुढेही ते वाचणार नाहीत. त्यामुळे मैत्री अबाधीत आहे. रमी, फालतू गप्पा, जागरणे करण्याची अमर्याद ताकद, असल्या भक्कम पायावर ती उभी आहे. साहित्यीक
मंडळीत एकूण माझा राबता कमीच! त्यामुळे एकटादुकटा अस्लो तर ह्या साहित्यविषयक गोष्टी मी सहन करू श्कतो. पण माझ्या ह्या खास मित्रांच्या अड्ड्यात मला माझा वाचकच काय, पण प्रकाशदेखील नको वाटतो.

सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले.माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते.

"आपण मला कदाचित ओळखलं नसेल--"

"वा वा ! ओळखलं की! मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --"

"हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे!" गटण्याने सरवाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले.आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला. त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो.

"मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते."

"आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का?"

"केव्हा येऊ? आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा!"

मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे. तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसली डोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांत छप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता."

हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या."

"निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे."

"कुणी?"

"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक."

"अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती.ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

गटणे त्यानंतर असाच सणासुदीला येत गेला. संक्रांतीची कार्डे, दिवाळिचे अभीष्टचिंतन, नववर्षाच्या सुभेच्छा वगैरे न चुकता पाठवीत असे. माझे कुठेही काही लिहून आले की आपल्या सुंदर अक्षरात ते वाचल्याचे कळवीत असे.
अधूनमधून भेटातही असे.

त्यानंतर एका संध्याकाळी सखाराम गटणे घरी आला. नेहमीप्रामाणे नाकासमोर टोपी, हातात पिशवी, असे त्याचे ते हडकुळे आणि डोळ्यावर घालीन लोटांगण असा भाव असलेले ध्यान येऊन दारात उभे राहिले.

"या!" मी त्याला आत बोलावले."

आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला?"

"अहो, साधना कसली? आराम करीत पडलो होतो--"

"चिंतन वगैरे चालंल होतं का?"

"छे हो! चिंतनविंतन काही नाही. हं, काय, चहा घेणार?"

"नको. मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयांपासून मी पहील्यापासून अलिप्त आहे."

ह्या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सारी साहित्यीक श्ब्दांची जळमुटे धूऊन काढता येतील का, अशा विचारात मी पडलो.

"अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कोणी सांगितलं?"

"उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चोखुरेगुरूजींच्या लेख आहे. 'जीवनोन्नतीचे सहा सोपान!'" 'जीवनोन्नतीचे सहा सोपान; हे शब्द गटण्याच्या वेद्यावाकड्या दातांतून पोरांच्या चड्ड्यांतून खिसे उलट केल्यावर गोट्या पडाव्यात तसे पडले!

"माझं ऎकाल का गटणे--असले लेख नका वाचत जाऊ."

"मी आपलं ह्याच बाबतीत योग्य मार्गदर्शन घ्यावं म्हणून आलो होतो."

"कसलं मार्गदर्शन?"

"मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्यिमत्वाचा पैलू
पडत नाहीत."

"कुठल्या गाढवानं सांगितलं हे तुम्हाला?"

गटणे दचकला. त्याच्या असंख्य गुरूजीपैकी कुठल्यातरी गुरूजीच्या पंच्याला मी नकळत हात घातला होता. गटणे गप्प उभा होता. त्याच्या त्या केविलवाण्या डोंळ्यात फक्त आसवे जमा व्हायची राहिली होती. मला हे माझ्या उद्गारांचा राग आला होता. पण गटण्याने एक एक वाक्य माझा अतं पाहत होत. ह्या मुलाला आता नीट बिघडवायचा कसा ह्या विचारात मी पडलो.

"हे बघा, प्याच थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होतात ना?"

"हो-- पूर्वी पीत होतो." एखद्या महान पातकाची कबुली द्यावी तसा चेहरा करून गटणे म्हणाला.

माझ्या आदेशानुसार तो चहा प्यायला. त्याच्या अनेक गुरूजीपैकी मीही एक होतो. चहा पिताना त्याच्या चेह-याकडे पाहवत नव्हते. सर्कशीत वाघाच्या ताटात शेळीला जेवायला लावतात त्या वेळी शेळीचा चेहरा कदाचीत तसा होत असेल. बाकी गटण्यात आणि शेळीत काहीतरी साम्य होते. शेळी झाडाची पाने खाते, हा पुस्तकांची पाने खात होता. त्याला मी जी जी काही आठवतील ती पुस्तके लिहून त्यांची यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेह-यावर विलक्षण कृतज्ञतेचा भाव दाडला होता. त्यांची यादी दिली. काहीतरी विस पुस्तकांची नावे असावित.

"ही मी वाचली आहेत.!"

"सगळी?" मी ख्रुर्चीवरून कोलमडायच्या बेतात आलो होतो.

"हो! पण पुन्हा एकदा वाचून काढीन."

"छे छे-- पुन्हा कशाला वाचता?" वास्तविक मला त्याला सांगायचे होते की,

"मित्रा, आणखी पाच वर्षे रोजचं वर्तमानपत्रदेखील वाचू नकोस."

'भस्म्या' नावाचा एक रोग असतो म्हणतात. त्यात माणसाला म्हणे 'खाय खाय' सुटते आणि खाल्ले की भस्म, खाल्ले की भस्म, अशी रोग्याची अवस्था होते. गटण्याला असलाच पुस्तकांचा भस्म्या रोग झाला असावा. ह्या मुलाला काय करावे मला कळेना. शेवटी मी माझे कपाट उघडले. त्यातली पुस्तके पाहिल्यावर खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर पोरांचे चेहरे होतात तसा त्याचा चेहरा झाला.

"ह्यांतली वाटेल ती पुस्तकं घेऊन जा." वस्ता, तुजप्रत कल्याण असो'च्या चालीवर मी त्याला सांगितले.

"असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी--"

गटण्याच्या उद्गारांनी मला भयंकर शरमल्यासारखे झाले. त्या पुस्तकांतल्या निम्म्याहून अधिक पुस्तकांची मी पानेही फाडली नव्हती. आपल्या थैलीत पुस्तके भरून घेऊन गटणॆ गेला आणि मी सुटकेचा निःश्र्वास टाकला.

(अपूर्ण)

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवा.


Thursday, April 12, 2007

आपले पु.ल.

"ए देशपांड्या, तुझा गाव कुठला रे? तू सुटीत कुठं जाणार?" शाळेतील सोबत्यांच्या अशा प्रश्नांना त्या मुलाकडे उत्तर नव्हते. कारण ज्याला गाव म्हणतात ते त्याला नव्हतंच. यामुळे त्याला खुप वाईट वाटायचं. तो सांगायचा, "माझं गाव नं ! माझा गाव कारवार." 

याला प्रत्युत्तर यायचं, "अरे, काय सांगतोस? कारवार कसं असेल? कारवारात नाडकर्णी, वागळे, मुजुमदार तेलंग, कैकणी राहतात. कारवारात देशपांडे नसतातच मुळी." 

"अरे पण, माझ्या आजोबांचे घर आहे ना तिथे. दुभाषी त्यांचं नाव. माझे आजी-आजोबा तिथे राहतात. मामा पण आहे. तेथे सदाशिवगड आहे. सुरुपार्क, काजूपार्क, चौपाटीपण आहे. हे तुला माहीती आहे का.? 

पु.लं. नी कोंकणी भाषेतून भाषणाचा आनंद वर्टी यांनी केलेला मराठी अनुवाद 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये प्रसिध्द झाला होता. त्यात वरील उल्लेख आहे. 

पु.लं. लिहीतात, "खरं सागांयच तर आम्ही देशपांडे बेळगावचे, पण तेथे आमचे घर नाही, शेती नाही, मायेची माणसं नाहीत. कायद्याने बघितंल तर मी कारवारचा नाही, पण भावनेच्या नात्याने मी कारवारचा." 

पु.लं. ना कारवारचे इशाड आबें, तेथील विपुल निसर्गसौंदर्य खूप आवडायचे. सुरूपार्क्मधून पाहिलेल्या सूर्यास्ताचे खूप खूप रंग, काजूबागहून दिसणारा सदाशिवगड हे सारं पु.लं. च्या अंतःकरणाच्या एका कोप-यात राहिलं आहे. रवीन्द्र्नाथ टागोर कारवारचा समुद्र्किनारा पाहून वेडे झाले होते असे म्हणतात.

पु.लं. चे मातूल घराणे कारवारचे असले तरी त्यांचा जन्म मुंबईतील गावदेवी भागातील कृपाळ हेमराज चाळीत १९१९ साली झाला. मुबंईतील गिरगाव गावदेवी भागातील चाळीतून राहणा-या काही कारवारांनी जोगेश्वरी या उपनगरात जाऊन तेथे सहकारगृहाची बांधणी केली त्यात पु.लं. च्या आजोबांच्या सहभाग होता. पु.लं. च्या आजोबांनी लेखनासाठी 'रुग्वेदी' हे टोपणनाव घेतेले होते. पु.लं. ची आई ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांना तिला खूप शिकवायचे होते. परंतू तो काळ अनुकुल नव्हता व आजी जुन्या मतांची असल्यामुळे ते शक्य झाले नाही. रुग्वेदी विचाराने सुधारणावादी असले तरी घरी रोज षोडपचार पूजा होई. त्यांनी पु.लं. च्या आईला पूजा व गणपतीची प्राणप्रतीष्ठा शिकवली. ते 'अण्णा' या नावाने ओळखले जात. ते उत्तम लेखक होते. त्यांनी खूप मेहनत करून "आर्याछ्या सणाचा ईतिहास' लिहिला व त्या पुस्तकाला कै. वासुदेव गोविंद आपटे यांनी पेस्तावना लिहिली होती. आगरकर, रानडे हे त्यांचे आदर्श होते. त्यांनी 'समाजोन्नती' या नावाचे नाटक लिहिले. पन्नाशी उलट्यावर बंगाली शिकून रवीन्द्र्नाथ टागोरांच्या 'गीतांजली' चे मराठी रूपांतर 'अभंग गीतांजली' या नावाने त्यांनी प्रसिध्द केले. त्या वेळी पु.लं. शाळकरी वयाचे होते. पु.लं. च्या घरात त्यांच्या आजोबांच्यामुळे रवीन्द्र्नाथांच्या प्रवेश झाला होता. पु.लं. पंचविशीत असताना त्यांनी रवीन्द्र्नाथ अ शरदबाबू मराठी व इंग्रजीतून वाचलेले होते. पन्नाशी ओलांडल्यावर त्यांनी हे दोन थोर लेखक मूळ बंगालीतून वाचण्याची ओढ लागली व त्यांनी शांतिनिकेतनला मुक्काम ठोकायचा बेत पक्का केला. 

आजोबांच्याकडे भरपूर शब्दभांडार होते. कानडी, बंगाली, हिन्दी, इंग्रजी, गुजराती, कोंकणी या भाषांचे ते जाणकार होते. आचार्य काका कालेलकर हे त्यांचे शिष्य होत. आपल्या आजोबांबद्दल `गणगोत' मध्ये पु.लं. लिहितात, "अण्णांना वक्तुवाचे देणे होते. सहद्य विनोदबुद्धी होती. परिश्रमाची पराकाष्ठा कराण्याची ताकद होती. आणि या साऱ्यांच्या जोडीला वाड:मयाच्या परिशीलनाने आलेली नम्रता होती." पु.लं. ना हाच वारसा मिळाला. पु.ल. कधीही प्रतिपक्षावर तुटुन पडत नसत. या संदर्भात त्यांनी एका लेखात लिहीले, "कुणावरही अतोनात चिडून तुटुन पडायचं हे मला जमतच नाही. कोणाचाही पाण उतारा होऊन तो खाली मान घालून गेला ते दृश्य मला पहावत नाही." 

पु.ल. ची आजी 'बाय' या नावाने ओळखली जायची. तिचे नाव होते 'तुळशी'. पु.ल. चे बरेचसे बालपण त्यांच्या आजोळी गेले असल्यामुळे तेथील आठवणी `बाय' या शब्दचित्रात `गणगोत' मध्ये ग्रथित केल्या आहेत. घरातील पोराबाळांनी भरपूर जेवावे म्हणुन बायने एक युक्ती योजली होती. आजोबा दररोज देवाला नैवेद्द दाखविण्याच्या वेळी मंत्राबरोबर अन्नपदार्थात एक-एक तुळशीचे पान टाकत असत. पोराबाळांच्या पंगतीत ज्या ज्या ताटात तुळशीचे पान येईल तो पुण्यवंत अशी त्यांची समजुत करुन दिलेली होती. बाय विनोदी किस्से, गमतीजमती सांगुन हसवायची. तिच्या बोलण्यात चारपाच उपमा येऊन जात. बायच्या उतारवयात पाचवारी साडीची फॅशन रुढ होऊ लागली होती. तिच्या दुष्टीने पाचवारीतल्या बायका `उभ्या वळकट्या' होत्या. ती नकलाही चांगल्या करायची. फॅशनेबल मुलींची ती अशी नक्कल करीत असे - "अहो, काय करावं? मला म्हणजे टायमच नाही. मॉर्निंगपासून इव्हिनिंगपर्यंत सारखी बिझी बिझी बघा. सारखं वर्क, वर्क, वर्क..." अशा त-हेने पु.ल. ना विनोदाचा वारसा त्यांच्या मातुल घराण्यातुन मिळाला व मोठेपणी निष्ठेने व व्यासंगाने त्यांनी विनोदाचे दालन अधिक समृद्ध करून महाराष्ट्राला खळखळून हसविले.

पु.ल. ची आजी पद फारच गोड गायची. हा गाण्याचा वारसा पु.ल. च्या मातोश्रींकडे आला व त्यांच्याकडून त्यांच्या सुपुत्राकडे. याबाबत पु.ल. लिहीतात, "एक माझे आजोबा सोडले तर सारे आजोळ आणि घर गात होते. वयाच्या अठरा-एकोणीस वर्षापर्यंत मी सुरांच्या साथीत वाढलो." 

बायने गंधर्वाची नाटके सुद्धी बरीच पाहिली होती. पु.ल. नी आजीबरोबर तुकाराम सिनेमा पाहिला होता. शो संपल्यावर आतील प्रेक्षक बाहेर येण्याआधीच पुढच्या खेळाची गर्दी आत येत होती. ते पाहून आजी म्हणाली, "तो तुकारामाचा पार्टी गाऊन गाऊन क्षय रोगाने वैकुंठाला जायचा," यावर पु.ल. म्हणाले, "तो पुढच्या शोला परत जिंवत होऊन येणारच आहे." 

पु.ल.नी संगीताची आराधाना वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी सुरू केली. पु.ल. च्या आईवडिलांनी लहानपणी त्यांच्या गुणांची जोपासना केली. पु.ल. च्या मातोश्रींना संगीत, पेटी शिकण्याची फार हौस होती, पण संसाराच्या जबाबदारीमुळे ती पुरी झाली नाही. तेव्हा आपल्या मुलाने संगीतक्षेत्रात जावं असं त्यांना वाटल्याने पु.ल. ना पेटी शिकण्यासाठी पाठविले. पु.ल. च्या पेटीवादनाला बालगंधर्वानी त्यांच्या पाठीवरून हात फिरवून शाबासकी दिली, त्यावेळी हॉलमध्ये बसलेल्या पु.ल. च्या वडिलाचे अंतक:रण गहिवरुन आले. बालगंधर्वाचे गाणे व अभिनय हे देशपांडे कुटुंबाचे कुलदैवतच आहे असे म्हणायला हरकत नाही. पु.ल. च्या वडिलांनी षौक केला तो बालगंधर्वाच्या गाण्याचा. पु.ल. च्या वडिलांनी सुपारीचे सुद्धा व्यसन नव्हते. पण मुंबईत गंधर्व मंडळी आली की ते मोठ्या उत्साहाने नाटकांची तिकीटे काढीत. पु.ल. ना बालपणीच मोठ्या कलाकारांची नावे वडिलांकडुन ऎकायला मिळाली. 

पु.ल. ना अनेक कला अवगत होत्या. या संदर्भात अनेकांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत पु.ल. सांगत, "या सर्व कलांमध्ये मला संगीत प्रिय आहे. संगीत हे माझे पहिले प्रेम आहे. Music is my First Love. मी संगीताला दुय्यम स्थान कधीच दिलं नाही. या कलेत माझे स्थान आहे हे मला आधीच कळायला लागले. संगीतात असतात फक्त सूर व साहित्यात असतात फक्त शब्द मला वाटे. या क्षेत्रांत आपण कुठंपर्यत जाऊन? बालगंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व अशा दिग्गजांपर्यंत पोहचण्याची ताकद आपल्या पंखात नाही हे मला समजलं. संगीतात मी कोणत्याही घराण्याचा गंडा बांधला नाही. जे गाणे आवडेल ते मी मनमुराद ऎकत असे." 

थोडक्यात म्हणजे संगीत पु.ल. च्या जीवनाच्या प्राण होता. सुर त्यांच्या मुखात लीलया येत असत. त्यांना सूर जणू काही आंदण मिळाले होते. 

एक मध्यमवयीन गृहस्थ आपल्या नऊ-दहा वर्षाच्या मुलाबरोबर मुगभाटातून येत होते. तेवढ्यात त्यांचे लक्ष नाक्यावरच्या हॉटेलातून उतरणाऱ्या एका देखण्या गृहस्थाकडे गेले. 

"अरे, तो बघ कृष्णा गोरे ! काय योगायोग आहे बघ. पुरुषोत्तमा, उद्दा आपल्याला कृष्णा गोऱ्याचे `प्रिये पहा रात्रीचा समय सरूनी येत उष:काल हा...' ऎकायचे आहे नं? पुरुषोत्तमा, आपल्याबरोबर उमाकांतलाही आणायचे बरं का!" 

त्या काळात मुंबईवर बालगंधर्व मोहिनी घालून बसले होते. लक्ष्मणरावांना बालगंधर्वाचा अभिनय व सुरेल स्वर अतिशय प्रिय होते. गंधर्व मंडळी मुंबईला आली की ते स्वत: जाऊन नाटकांची तिकीटे काढत. नाटक पहायला त्यांची दोन्ही मुलंही असत. त्यांनी `एकच प्याला'. `स्वयंवर' किती वेळा पाहिले असेल देव जाणे. नाटक सुरू होण्याआधी ते मुलांच्या बोटाला धरून थिएटरपुढे बराच वेळ उभे असत, व तेथे ते मुलांना नाट्यविषयक गोष्टी सांगत. "अरे पुरूषोत्तमा, नारायणरावांना बालगंधर्व ही पदवी कोणी दिली हे तुला सांगतो; ती आपल्या लोकमान्य टिळकांनी दिली. त्यावेळी पुण्यात प्लेगने कहर केला होता. गावातील रहिवासी वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांतून निवाऱ्यासाठी गेले. अशाच एका झोपडीत लोकमान्यांचा निवासा होता. तेथेच `केसरी' वृत्तपत्राच्या कर्मचारी मंडळींनी गाण्याचा कार्यक्रम केला. गायन चालू असताना लोकमान्य टिळक समोर फेऱ्या मारत होते. "वा ! वा ! या बाळाच्या चांदण्याच्या स्वरांनी मला मोहून टाकले आहे." लोकमान्य स्वत:शीच म्हणाले. दुसऱ्या दिवशी `केसरी'तून समस्त पुणेकरांना या पोरसवदा गायकाला `बालगंधर्व' या पदवीने लोकमान्य टिळकांनी गौरविले आहे ही शुभवार्ता समजली. 

अल्लादियाखॉं, कृष्णा गोरे, तिरखवॉं, कादरबक्ष अशा कलाकांराची नावे पुरुषोत्तमने आपल्या वडिलांकडून प्रथम ऎकली होती. पु.ल. नाटक या नावाशी परिचीत झाले ते जोगेश्वरीच्या सोसायटीत या नावानेच ओळखली जायची. १९२५-२६ साली याच सोसायटीत पु.लं. नी पहिले नाटक पाहिले. त्याचे नाव होते `पुण्यप्रभाव'. ते पहिले नाटक पु.लं. च्या द्दुष्टीने एक चमत्कारच होता. त्या नाटकातील पात्रयोजना तर कित्येक वर्ष त्यांच्या स्मरणात राहिली होती. त्यातून ते नाटक स्त्रीपात्रविरहित होते. पु.ल. ना खेळात रुची नव्हती, पण नाटकांचे वेड होते. नारायणमामा (सतीश दुभाषींचे वडील) हे त्यांचे आदर्श होते. मामाची नाटक मंडळी रामायण, हाणामारी म्हणजे राम-रावण युद्धावर आधारित नाटके करीत. पु.ल. व इतर बालचमू वानरसेनेत सामील होऊन पुढ्याचे मुकूट, धनुष्यबाण, अर्ध्या चड्ड्यांना शेपटं लावून सोसायटीत प्रयोग सादर करीत. 

पु.ल. चा खेळांपेक्षा संगीत, साहित्य, नाटक, वक्तृत्व, नकला या कलांकडे अधिक होता. पु.ल. च्या वडिलांना गाण्याची भारी हौस होती.

पु.ल. ना नाट्याचे शिक्षण लहानपणीच मिळाले. नाटकातील पात्रयोजना, संगीत किंवा गद्द नाटक, संवाद लेखन, नेपथ्य अशी नाट्यकलांची ब्रिजे पु.ल. च्या मनात जोगेश्वरीच्या सारस्वतबागेत रुजली. सोसायटीतील नाटके पाहिल्यावर त्यांच्या मनात आले,`अरे पुरुषा, नाटक असं असतं काय! नाटक असं बसवतात काय!' आपणही नाट्यलेखनात का हात घालू नये, हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला. अशा तऱ्हेने त्यांच्या बालपणाची जडणघडण नाट्यसृष्टीच्या सान्निध्यात झाली. 

१९४४ सालातील ही कथा आहे. दादरच्या एका हायस्कूलमधील दहावीचे विद्दार्थी शिक्षकांची वाट पाहत होते. शिक्षक न आल्यामुळे वर्गात गलका वाढत होता. तेवढ्यात स्वच्छा पायघोळ लेंग्यातील कुरळ्या केसांच्या एका पोरसवदा शिक्षकाने वर्गात रुबाबात एंट्री घेतली. जोधपुरी फॅशनचा कोट, डोळ्याला चष्मा, साधारण सावळ्या वर्णाच्या या तरतरीत नवीन सरांकडे पाहून सारा वर्ग स्तब्ध झाला. सर काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. गणिताचा तास होता. पण सर म्हणाले."मुलांनो, आज गणिताऎवजी आपण जनरल नॉलेजचा पिरिअड घेऊ या ! चालेल नं?" नवीन संराचे हे शब्द ऎकताच वर्गात आनंदाची एक लहर पसरली. सर्वजण मोठ्या उत्सुकतेनं सरांकडे पाहू लागले. सरांनी त्या तासाला नाट्य, साहित्य, चित्रपटांसंबंधी अनेक प्रश्न मुलांना विचारले. पिरिअड केव्हा संपला हे कुणालाच समजले नाही. सर जायला निघाल्यावर सर्व विद्दार्थी सरांभोवती गोळा झाले. "सर, सर, आपले नाव काय?" मुलांनी विचारले. उत्तर आलं, "देशपांडे!" 

क्रमश..