Thursday, January 15, 2009

पं. वसंतराव देशपांडे

'वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.' - पु.ल. देशपांडे


विस्तीर्ण माळावर बिजलीचे जणू काय वादळी थैमान पहात होते. वीस एक वर्षापूर्वीची मैफील. नागपुरात धन्तोलीवर बाबूरावजी देशमुखांच्या बंगल्यावरच्या दिवाणखान्यात ऎकणारेही असे एक्के जमले होते की गाणाऱ्या पुंडलिकालाही आपल्या भेटी परब्रम्ह आले आहे असे वाटावे. तबल्याला मधू ठाणेदार, सारंगीवर मधू गोळवलकर, मी पेटीच्या साथीला आणि गायक वसंत देशपांडे. आम्ही सगळेच तिशीच्या आसपास. आमच्यापैकी कोणीही आदरार्थी बहुवचनात शिरला नव्हता. समोर नाना जोग, बाबूरावजी देशमुख, दोडके, बाबूराव चिमोटे हे सारे आप्त स्वकियच. त्यामुळे दाद मिळायची ती देखील 'क्या बात है वश्या' 'वा मधू-' तशी आपुलकीचीच. कौशीकानड्यातल्या 'काहे करत मौसे बलजोरी'त वसंता घुसला होता. पांढरी चारच्या मुष्किल निघत होती की, सुरांच्या त्या अचाट आणि अत्यंत अकल्पिक स्थानावरून उठणाऱ्या फेकी ठाणेदाराच्या तुकड्यांशी झुंज घेत कुशल धनुर्धाऱ्यासारख्या समेचा केन्द्रबिन्दू वेधून जात होत्या. चिज संपली आणि मैफलीला टाळी देण्याचे भान राहिले नाही. त्या धुंद शातंतेची, त्या सन्नाट्याची दाद, हजार हातांच्या टाळ्यांच्या कडकडाटाहूनही अधिक मोलाची असते. काहीतरी अलौकिक घडताना अनुभवल्यानंतर होणारा आनंद अनिर्वचनिय असतो. त्या मौनाला शब्द शिवला तर त्या क्षणाचे पावित्र्य बिघडले. वसंताच्या गाण्याइतकाच त्या सन्नाट्याचा मजा घेत आम्ही गाणारे वाजविणारे आणि श्रोते काही सेंकद बसलो होतो. तेव्ड्यात, वाढत्या वयाबरोबर ज्यांचा फक्त खडुसपणाच वाढत जातो अशा नमुन्याचा एका म्हाताऱ्याने आपली कवळी वाजवली.

"क्या हॉं - देशपांडे - आपलं घराणं कुठल्यां-"
"आमच्यापासून सुरु होणार आहे आमचं घराणं-" वसंताने ताडकन उत्तर दिलं. दिवाण-खान्यातल्या साऱ्या रसिकतेने त्या जबाबाला छप्परतोड टाळी दिली.

सुरांची माधुकरी
श्रीमंत घराण्याच्या मोठेपणाच्या लोभाने अपमानित जीवन जगण्यापेक्षा आपल्या एकुलत्या एका तान्ह्या पोराला पदराखाली घेऊन स्वाभिमानासाठी खुषीचं दारिद्र्य पत्करणाऱ्या आईला वसंता त्या दिवशी खरा पुत्र शोभला. वसंताने कधी आपल्या व-हाडातल्या कमळापूरच्या वतनदार घराण्याची पिसे लावली नाहीत की संगितातल्या एकाच घराण्याच्या नावाने कान पकडले नाहीत. कुणी अन्नाची माधुकरी मागतो. वसंताने सुरांची माधुकरी मागितली. ह्या एकलव्याचे अनेक द्रोणाचार्य, नागपुरातल्या शंकररावजी सप्रेमगुर्जींनी त्याला संगिताचे प्राथमिक धडे दिले. लाहोरला आपल्या मामाच्या घरी राहत असताना आसदल्ली खां नावाच्या एका अवलिया उस्तादने सहा महिने फक्त 'मारवा' पिसून घेतला आणि म्हणाले, 'बस हो गया बेटे, यापुढलं गाणं तुला आपोआप सापडत जाईल.' सुरेशबाबूंनी अत्यंत आपुलकीने किराण घराणातल्या खुब्या सांगितल्या, अमाअली भेंडीबाजारवाले यांनी आपल्या स्वच्छंद (रोमॅंटीक) गायकीच्या तबियतीचा आणि गळ्याच्या यकूबाचा शागिर्द भेटल्याच्या आनंदात तालिम सुरू केली. दुर्दवाने वर्षदिड वर्षाच्या आत त्यांचे निधन झाले. ह्या सर्व गुरूजनांकडून वसंताने चार गोष्टी घेतल्या खऱ्या, पण त्याचा जीव मात्र गुंतला होता तो एकाच गायकाच्या स्वरजलांत. तोही असाच एक स्वयंभू गायक होता. सुरांच्या वादळांशी झुंजणारा. अभिजात संगीत मोठ्या ताकदीने गाणारा. पण कपाळावर 'नाटकवाला' असा शिक्का बसल्यामुळे संगितातल्या शालजोडी आणि शेरवानीवाल्यांकडून उपेक्षित, वसंताचा हा खरा द्रोणाचार्य. वसंताच्या मर्मबंधात लय-सुरांची जी ठेव आहे ती ह्या गायकाची. त्या द्रोणाचार्याचे नाव दिनानाथ मंगेशकर. राज-संन्यासातल्या तुळशीसारखी सुरांच्या उसळत्या दर्यात गळा फेकायची दुर्दम्य महत्वाकांक्षा बाळगणारे दिनानाथ. स्वरसारसापेक्षा स्वरसाह्सात रंगणारे दिनानाथराव हे वसंताचे आद्य दैवत. त्याकाळी दीनानाथराव म्हणजे गोवा आणि व-हाड नागपूर ह्या सुभ्यांचे अधिपती. गोव्याचा 'दिना' व-हाड-नागपूरला दत्तक गेलेला! वसंताच्या बालमनावर पहिला संस्कार घडला तो दिनानाथांच्या गायकिचा. हनुमंताने जन्मजात सूर्यबिम्ब खायला जावे तसा आठ-नऊ वर्षाचा वसंता एकदम 'रवि मी~' म्हणताच गायला लागला आणि व्यंकटेश थेटरात कानी पडलेल्या तान आपल्या बाल आवाजात फेकायला लागला. सप्रेमगुरूजींच्या गायन-वादन विद्दालयातले हे दोन असाधारण बाल-कलावंत. सप्रे त्यांना रागरागिण्यांच्या वागण्यासवरण्याचे कायदे सांगत होते आणि हे दोन्ही उटपटांग शार्गिद आपले गळे स्वत:च्या तबियतीने फेकत होते. त्यातला एक शिष्य वसंत देशपांडे आणि दुसरा राम चितळकर. राम सिनेमात गेला आणि सी. रामचन्द्र झाला. वसंतालाही बालपणीच सिनेमावाल्यांनी उचलले. भालजी पेंढारकरांनी रामप्रमाणे वसंतालाही हेरले आणि वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी कालियामर्दन सिनेमाच्या हिंदी आवृत्तीत वसंता 'कृष्ण' झाला. नागपूरच्या महाल भागातल्या गल्लीवाल्या आठरापगड पोरात वाढल्यामुळे त्याची मराठीपेक्षा 'टर्रेबाज नागपूरी' हिंदीशीच सलगी अधिक होती. त्याकाळी नागपुरी रईसांची आणि आवामांची भाषा नागपुरी हिंदीच होती. आजही अस्सल नागपुरी मराठी लोक रंगात आले की की तो रंग खुलवायला त्यांना मराठी तोटकी पदते. एकदम हिंदीत घुसतात. मराठीला ती 'किक्‌' येत नाही. आजकालच्या सरकारी हिंदीलात र 'सेक्स्‌ अपील'च नाही. डॊळ्यांत पाणी आणणारा उखडेलपणा आणि जीवघेणी आपुलकी अशा दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या प्रवृत्तीचे नागपुरी स्वभाव हे एक अजब मिश्रण होते. वसंता वाढला तो अशाच 'चल्‌ बे साले' आणि 'अबे बैठ बे' ह्या दोन प्रवृत्तींच्या संगमातून घडाणाऱ्या वातावरणात.


पहिली एण्ट्री
वसंताची आणि माझी भेट झाली ती त्या दोन्ही प्रवृत्तींचे दर्शन घडवीतच, एकेचाळीस सालची गोष्ट. म्हणजे होतील आता तीस वर्षे. पुण्याच्या अलका टॉकीजजवळ एक तिनमजली सडपातळ चाळ आहे. तळमजल्यावरच्या एका गळ्यात सारंगिये महमदहुसेन खांसाहेबांचा एक गायन क्लास होता. अजूनही आहे. खांसाहेबांची ती आवडती डेकचेअर मला आजही येता-जाता त्याच जागी दिसते. खांसाहेबांचे चिरंजीव वडलांच्या तालमीत सारंगीत तयार झालेले. त्या क्लासात आमचा अड्डा असे. मी तसा नुकताच पुण्याला आलो होतो. भावगीत म्हणणारा एक कॉलेज स्टुडंट म्हणून, इंटर्वलमधल्या सार्वजनीक कॉफिशिवाय एक खास कप चहा किंवा कॉफिच्या मोबदल्यात चार घरी गाण्याच्या बैठकी झाल्या होत्या. अशाच एका मैफलीत महमदहुसेन खांसाहेबाशी स्नेह जुळला होता. संध्याकाळी खांसाहेबांच्या क्लासात गाणे बजावणे चाले. शेजारी अलका टॉकीज उभे राहिले नव्हते. टिळक रस्ताही माणसांनी आणि वाहनांनी इतका तुडुंब वाहत नव्हता. खांसाहेब खूप आतिथ्यशील. विशेषत: कॉलेजमधल्या मुलांत रमणारे. त्यामुळे फर्ग्युसन, एस.पी. कॉलजामधल्या गाण्या-बजावण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांची त्या एवढ्याश्या जागेत नित्यनैमित्तिक हाजरी असायची. शिवाय मधू गोळवलकर खांसाहेबाकडून सारंगीची तालिम घेत होता. आमच्या भावगीत गायनात गोळवलकर आमचे कादरबक्ष! संध्याकाळी खांसाहेबांच्या क्लासात असाच कुठलेअतरी पद म्हणत बसलो होतो. तेवढ्यात नागपुरी रुंद काठाचे धोतर डॊक्याला तिरकी टोपी, अंगात स्काउटचा शर्टा सारखा खाकी शर्ट. हातात एक सोटा, तातीत नाकाचा उगम आणि भेदक डोळ्यांचा मध्य. कानाच्या पाळ्या आणि गळ्यांच्या दोन्ही बाजू इतक्या ठिकाणी पानवाले भय्ये लावतात तसा मारूतीचा शेंदूर लावलेला. अशा थाटात आणि उभी हयात पैलवानी किंवा भांग-ठंडाईचे दुकान चालवण्यात अशा ढंगात वसंतराव देशपांड्यांनी त्या क्लासात आणि माझ्या आयुष्यात पहिली एन्ट्री घेतली. हा काय प्रकार झाला आहे असे वाटेपर्य़ंत

महमदहुसेन खांसाहेब म्हणाले- "आईये बसन्त-रावजी-" आज वर्षाचा हिशोब मांडल्यावर लक्षात आलं की, अश्या त्यावेळी फक्त एकवीस वर्षाचा होता. ह्या दोन मे रोजी त्याचा पन्नासावा वाढदिवस. माझ्या पेक्षा सहा महिन्यांनी लहानच. पण तो शेंदूर, तो सोटा, ते नागपुरी धोतर, डोक्याला तिरकी टोपी, उणीपुरी सव्वापाच फूट उंची आणि तिन फूट रुंद छाती असावी अशा थाटातले ते पैलवानी चालणे पाहून माझा गळा सुकला.
"हॉ भय्या-चलने दो, बंद क्यू हो गये-" म्हणून मला पद चालू ठेवण्याची फर्माईश केली आणि समोर येऊन बसले.
"बसन्तरावजी हे नाव कळले. एकूण थाटावरून आडनाव पूछवाहे, बनातवाले, फरासखानवाले की गवालियरचे आणखी कोण-वाले असतील याचा अंदाज करीत होतो. पण बसन्तरावजी माझ्यासारखे नुसते देशपांडेच निघाले.
वसंताला 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातल्या खांसाहेबांच्या वेषात पाहताना पटकन दिसला मला तो तीस एक वर्षापूर्वीचा महमदहुसेन खॉंच्या क्लासात प्रथम भेटलेला वसंता. वेश निराळा पण पेश आला तो त्याच दरबारी ढंगात. दोन-पाच मिनिटे माझे गाणे ऎकले आणि स्वारी साथीच्या त्या उमेदवार तबलियाला म्हणाली - 'बेटे इधर लाव साज' आणि माझ्या उडत्या गाण्याबरोबर वसंताने लग्गीचाट सुरू केली. त्यानंतरचा दैवदुर्विलास म्हणजे पुणे शहरात मी गाणारा देशंपांडे आणि वसंता तबलजी देशपांडे! देणम्‌ नास्ति घेणम्‌ नास्ति. त्यामुळे आम्हाला कार्यक्रमांच्या सुपाऱ्या भरपुर. योग्य वेळी आवश्यक थारेपालट झाला आणि मी गवयाचा पेटीवाला झालो. वसंता गवयी. 'मधू गोळवलकर सारंगीनवाज आणि के मधू तिसगांवकर तबलिये असा फड जमला. -आम्ही सारे जण एकाच पंथातले होतो. म्हणजे गाण्यात आम्हाला पंथच नव्हता. मी काय, वसंता काय मधू गोळ्वलकर काय आम्ही तिघेही संगीतातले अनाथ विद्यार्थी! कुठल्याही एका गुरुच्या दीक्षेची मुद्रा आमच्या कपाळी नव्हती. सूर आणि लय हीच आमची विठ्ठल रखुमाई. आम्हाला ना जयपूर घराणे ना आग्रा घराणे. एका अर्थी हे ठीकच होते. कुणा एकाच्या नावाने तर्पण करायला नको. तुकोबा म्हणतात तसे 'बरे देवा शुद्र झालो ना तरी दंभे असतो मेलो!' आपापल्या तबियतीचे शार्गिद. आमचा फड रागरागिण्यापासून भावगित-लावण्यापर्यंत कोर्माकोफत्याकडे अधिक होती. अशीच मजेत वर्षे चालली होती आणि आमच्या मधू तिसगांवकरचा खून झाला. सुदैवाने मधू ठाणेदार त्याच काळी पुण्यात आला आणि आमचा तबलजी झाला. ठाणेमियांही आमच्याच तबियतीचे निघाले.

किराण्याशी जवळीक
एव्हाना वसंताने माझे कान साफ खराब केले होते. इतरांचे जाऊ दे. एकतर मला माझेच गाणे ऎकवेना. इतर बऱ्याच लोकांची गाणी मिळमिळीत वाटायला लागली. त्यातून दीनानाथराव. कृष्णराव या सहद्य मंडळीवर माझ्याइतकाच वसंताचाही लोभ. मलका-ए-गझल बेगम अखतर ह्या नामोच्चाबरोबर पहिली हिर्य मधू गोळवलकरची आणि लगेच माझे आणि वसंताचे उष्ण की काय म्हणतात तसले दोन निश्वास! हिराबाई हा आमचा आणखी एक विक पॉंईट. वसंतरावांना तर चंपूताई म्हणजे वडील बहिंणीसारख्या. सुरेशबांबूचे वसंतरावांच्यावर निरतिशय प्रेम. पुण्यावाल्या बुधवारातल्या एका दिश खणी खोलीत आमची मैफल जमायला लागली. त्या खॊलीबाहेर भरगोस बोर्ड होता. आर्य संगीतोत्तेजक मंडळ. हे मडळ अब्दुल करीम साहेबांच्या प्रेरणेतून निघाले्ले. त्यामुळे तिथे सगळी किराणा घराण्याचुआ प्रेमी मंडळीमध्ये संगीत रसिकतेच्या बाबातीत औदार्य मल अधिक वाटते. कारण हे घराणेही बरेचसे स्वच्छंदतावादी आहे. घराण्यातून येणारा अभिमानी कडवेपणा इथे कमी आहे. चिजांच्या लोभापेक्षा सुरांचा लोभ अधिक असणारे. उदारमतवादी घराणे. आमच्या ह्या मंडळीत सवाई गंधर्वाचे जामात डॉ. नाना देशपांडे, वामनराव देशपांडे, त्याचे जेष्ठ बंधू कै पांडुरंगशास्त्री देशपांडे, दत्तोपंत देशपांडे, वसंत देशपांडे, पु.ल. देशपांडे अशी मुळी अर्धाएक डझन देशपांडे मंडळीच होती. बाळासाहेब अत्रे उत्साही कार्यकर्ते. शिवाय विठ्ठल सरदेशमुख, पाथूरकर झालंच तर हे-काका, ते-अण्णा अशी मंडळी जमे. किराणा घराण्यातल्या मंडळीशी उदंड प्रमाणात लाभली ती चंपूताईअकडेच! किंबहुना संगीताताल्या गुणी उपेक्षितांचे हे फार मोठे आश्रयस्थान. गाण्याच्या क्षेत्रात मुके, आधंळे, पांगळे आणि थोटे गोळा करायचा त्यांना नादच आहे. वसंताचा ऋणानुबंध सुराच्या सामर्थ्याने नसला तरी अंत:करणाच्या ओढीने हिराबाईशी फार निकटचा आहे. पुष्कळदा असे वाटवे की सुरेशबाबू अधिक निराळ्या तेजाने चमकणारा गाण्याचा एक स्वतंत्र थाट वसंताच गायकीत दिसला असता. आजही खास मैफलीत कुणी फर्माईश केली तर सुरेशबाबूंची गायकी वसंता आति तलमपणाने पेश करतो. मात्र सुरेशबाबूंची ती झुळझुळणारी पेटी ऎकायची असेत तर वसंताकडेच ऎकावी. गाण्यात आक्रमक असणारा वसंता पेटी मात्र विलक्षण हळुवारपणाने वाजवतो, सतार वाजवतो. पण तानांची जात अगदी झुळकी सारखी शीतल. वसंताच्या गाण्यावर दीनानाथरावांचा जबरदस्त संस्कार, पेटीवर सुरेशबाबूंचा. तबल्याचा इतका डौलदार आणि चपळ अशा विरोधातून उठणारा बाज त्याच्या बोटात मात्र कुठुन शिरला देव जाणे. बहुधा देवच जाणे. कारण आईच्या गरिबीच्या संसारात बालपणी वसंता चार आण्याची भर टाकायचा तो देवळातल्या किर्तनकारांचा तबलजी म्हणून मिळबलेल्या मोबदल्यातून! त्याकाळी मैफलीतल्या तबलजीची बिदागी शिकस्त म्हणजे पाच रुपये. दोन रुपये हाच वहिवाटीचा दर. कुहे करी बुवांच्या तबलजींचा हिशोब अधेलीपर्यंत पोचला तर ते नवलच असायचे, बहुधा देवळातले वतनी गुरवच मृदंगावर धुमाळीचा भजनी ठेका कूटायचे. पण वसंताचा ठेका अतिशय रेखीव असतो. एकदा पुण्यात एका मैफलीत हिराबाई गात होत्या. तबल्याला वसंता. असा सुरेख ठेका चालला होता की, भीमसेन जोशी भर मैफलीला ऎकू जाईल एवढ्या मोठ्याने म्हणाले, "गाणाऱ्याला गात ठेवणारा ठेका तो हा-" "वा बुवा-"


बसन्तरावजी असली गवैय्ये है!
ह्या तबल्याच्या उत्तम जाणकारीमुळे वसंता गाताना तालाशी हुकमतीने खेळतो. त्याच्या गायकीतला 'अंदाज' मुष्किल आहे. एकतर गळ्यातलं स्वरयत्रं डोक्यातल्या कल्पनांचे गुलाम आणि दुसरी ही तालावरची पकड. खांसाहेब अहमदजान थिरखवा म्हटले की, मी मी म्हणाऱ्या गवयांच्या अंगाला घाम फुटतो. एकदा हिराबाईच्या घरी खांसाहेबाम्चा मुक्काम होता. वसंतरावांचा तिथेच तळ. एका संध्याकाळी वसंतरावांनी दीनानाथरावांच्या ढंगात रूपकात 'चद्रिका ही जणू' सुरू केले. रूपक हा खांसाहेबांचा लाडला ताल. बालगंधर्वाच्या 'मम सुखाची'ला खांसाहेबांचा रूपक नुसते डिवचत होतो. आणि खांसाहेबांनी रुपकाची आपली सारी यादगारी ओतायला सुरुवात केली होती. खांसाहेबांचा रुपक चालूच. "आमा रुकते नही? दीड तास चंद्रिका, दिश तासांची कहर आतषबाजी! तसल्या त्या तापलेल्या हतांनी खांसाहेबांनी वसंताची पाठ थोपटली. त्याच दिवसांतली कथा आहे. खांसाहेबांचा पुण्यात आठ-दहा दिवस मुक्काम होता. लालजी गोखल्यांच्या घरी. आठ रात्री खांसाहेबांच्या आठ मैफली. काल ऎकलेला तबला आज नाही असा भरणा. रोज रात्री नऊ-साडेनऊपासून दीड-दोन वाजेपर्यंत पेटीवर लहेरा धरून वसंतराव आणि खांसाहेबांचा सोलो तबला! आम्ही त्यांची शेपटी धरुन सगळ्या मैफालीत हजर. त्या आठवड्यात खांसाहेबांनी आम्हाला धोधो तबला ऎकवला. आयुष्यात इतका तबला ऎकला. बाकिच्यांच्या तबल्यांनी कान तृप्त करणारा तबला खांसाहेब अहमदजान थिरकवांचाच! मुक्कामाच्या शेवटच्या रात्री प्रोग्राम होता आबासाहेब मुजुमदारांच्या वाड्यात. वसंता आणि महमदहुसेन खांसाहेब लहेऱ्याला. ऎकायला जाणकरांची गर्दी होती. पण समोर बसले होते तबल्यातले फार मोठे विद्वान मरहूम मेहबूब खांसाहेब. थिरकवा खांसाहेबांनी मैफलीला अधीच इशारा दिला. "हे पहा, आज मी जे वाजवणार आहे ते समोर माझे बुजुर्ग उस्ताद मेहबूब खांसाहेब बसले आहे त्यांच्यासाठी:. फार सुरेख बोलले थिरकव खांसाहेब त्या रात्री म्हणाले, "माझ्या उस्तादांनी दिलेला जुना किमती खजाना आज मेहबूब खांसाहेबांच्या पुढे पेश करण्याचा मौका अल्ला मियाने मला दिल्‍या आहे त्याबद्दलची शुक्रगुजारी व्यक्त करुन मी मेहबूब खांसाहेबांची त्तबला सुरु करण्यापूर्वी इजाजत घेतो." मेहबूब खांसाहेबांना हेच कुमार गंधर्वाचे बालवयातले त्यांचे तबलजी. त्यामुळे परिचय जुना. वसंतावर तर ज्यांचं निरतिशय प्रेम. ठाणेदारचेही गुरू. अत्यंत भाबडा माणूस. त्यांचे रांगडेपणही अतिशय लोभसवाणे असं. भाषेत विरामचिन्हांच्या जागी स्वत: बनवलेले शिव्यांचे फिक्रे असत. धुवट मंडळींनी तर नाकाशी सतत कांदा किंवा अमोनिया धरावा असे अमाप सौंदर्य.
"आहाहा- कोई सम्जले वशेन्वराव, धेव बरं करो तिच्यातला तुमचं-गुनाचं येवढंसं येस तरी दिसलं. तरी गांडीचं धोतार सोडुन भर मैफलीत गुनीजनाच्या टाळक्याला आपल्या हातानं बांदनारी अवलाद की हो आमची-" अशी गुणग्राहकता. मेहबूब खांसाहेबांची इजाजत घेऊन खांसाहेबांनी वसंतरावांनी पेटीवर चाळा म्हणून सहज बोटे फिरवली. खांसाहेबांनी तेवढ्या करामतीला मोठ्या कौतुकाने "जियो" म्हणून दाद दिली. तेव्ढ्यात एक आगाऊ निघाले आणि हिदीची पुणेरी चिंधी फाडीत म्हणाले.
"खांसाहेब वसंतराव देशपांडे मास्टर दीनानाथकी नक्कल बहुत अच्छा करता है-"

"आमा क्या बात करते हो? नकल करता है? वसंतरावजी दीनानाथरावकी गायकी पेश करते है-नक्कल नाही करीत. त्या दोघांचा मिजाज सारखा आहे. आयंदा ऎसी बात मत करना-वसंतरावजी गवैय्ये है!"

वसंतराव गवैय्ये आहे, अप्रतिम नट आहेत ही दाद फार मोठ्या प्रमाणात मिळायला दाव्हेकरांनी आमच्यासरख्या, वसंताची गवई म्हणून फार मोठी योग्यता आहे. पुरुषोत्तम दारव्हेकरांनी आमच्यासारख्या, वसंताची गवई म्हणून फार मोठी योग्यता आहे. असं माणणांरावर खरोखरीच फार मोठे उपकार केली . वसंताची ही तडफ, ही अचाट कल्पकता, लयसुरावजी हुकुमत आम्ही गेली तीस वर्षे पाहतो आहे. गेली तीस वर्षे आम्ही जोडजोडीने काढली. नाटक सिनेमाच्या माझ्या प्रत्येक खटाटोपात साथीला वसंताहवाच. माझ्या 'तुका म्हणे आता' नाटकातला संगीत दिगदर्शक वसंत देशपांडे. मी संगीत दिग्दर्शन केलेल्या प्रत्येक चित्रपटात वसंता गायला आहे. 'माझ्या कोंबड्याची शान' पासून ते गुळाच्या गणपतीतल्या 'ही कुणी छेडिली तार' पर्य़ंत नाही नाही त्या चाली मी त्याला गायला लावल्या आहेत. वास्तविक तो त्यावेळी मिलीट्री अकांउंटसमध्ये नोकरीला होता. पण रात्री रात्री जागवून त्यांचे केवळ प्लेबॅक आर्टिस्ट नव्हे तर ऑर्गनवादक म्हणून माझ्या स्नेहासाठी काम केले आहे. भीमसेन जोशींनी लोकपिय केलेल्या 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी'ह्या माडगूळकरांच्या अभंगाची चाल माझी. त्या रेकॉर्डींगला ऑर्गन वसंताने वाजवला आहे. आता पुण्यातून माझा मुक्काम हलल्यामुळे आणि सध्याच्या आम्हा दोघांच्याही जीवनक्रमामुळे रोजच्या मैफलीची चैन साधता येत नाही. एकेकाळी आज माझ्या घरी. उद्दा मधू गोवलकराच्या घरी, परवा भाऊ नाडकर्णीच्या घरी, शनिवारी आर्य संगितेत्तेजक मंडळात. असा अड्डा जमायचा. शिवाय शहरभर नॉटपेड बैठकी चालुच. खांसाहेबांच्या क्लासात त्यावी आणि माझी फिली भेट झाली. त्यावेळी वसंताला के. नारायण काळ्यांनी सिनेमात उचलला होता. वास्तविक कालियामर्दनानंतर वसंता बालनटच व्ह्याचा. पण आईने त्या लोभाला बळी न पडता त्याची पुन्हा नागपुरात उचलबांगडी करुन शाळेत घातले. तिथे मॅट्रिक पास झाला आणि वसंतराव पुण्यात आले. के. नारायण काळे त्याकाळी म्युन्सिपालटी नाटकावरून सिनेमा करीत होते. त्यात वसंतराव एक गाणे ऎकवायची विनंती केली. "सुलतान शहरके यार-ये तो म्युन्सिपालटीवाले-" अशी ती एक उडती छक्कड होती. वसंताने त्या गाण्यात असल्या सणसणीत आणि पंजाबी रंगाच्या तिरपागडी ताना फेकल्या की अंगावर काटाच आला. मी आयुष्यात गायला सुरुवात केव्हा केली ते मला आठवत नाही. पण आपण गवयी व्हायचे नाही-ती मंझिल फारच दूर आहे हा निर्णय मात्र मी वसंताचे गाणे ऎकून घेतला. वसंताकडून ते गाणे मी लकडी पूल ते खजिन्याची विहीर एवढे एंतर चालताना भर रस्त्यात दहा वेळा तरी म्हणून घेतले असेल. सगळ्याच स्नेह्यांची आणुइ माझी फिली भेट केव्हा झाली हे मला नीट स्मरत नाही. पण भानुविलास थिएटरच्या बाजूला आऊटहाउसजवळ खॊलीत झालेली ग.दि. माडगूळकरांची भेट आणि महमदहुसैन खांसाहेबांच्या क्लासात झालेली वसंताची भेट मी कधीही विसरणार नाही. पहिल्या दिवशी मी आणि माडगूळकर असेच रात्री भटकत निघालो होतो. गडकर्‍यांविषयी बोलत असता वसंता आणि मीही टिळक रोडवरून असं जोडीने निघालो. सुलताना शहरके यार-गात-ऎकत! गेली तीस वर्षे असेच जोडीने चालतो आहोत.

आज 'कट्यार'चा खेळ पाहून आलेले लोक मलाच ऎकवायला लागतात. "वसंतराव देशपांडे नुसतेच गायक नाहीत. नटही किती चांगले आहेत हा!" मी मनात म्हणतो लेको आमच्या "तुका म्हणे आता" ह्या आपटलेल्या नाटकात वसंताचे संतु तेल्याचे काम पहायला का नाही आला? 'दूधभात' नावाच्या माझ्या एका चित्रपटात वसंताने खानदानी गवयीबुवाचे काम कोती अप्रतिम केले आहे. एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने भ्रमिष्ट झालेला तो बुवा रिकाम्या तंबोऱ्याला "गा गा यशवंत गा" म्हणून रोजच्या रिवाझासारखा गायला सांगतो तो प्रसंग वसंताने अभिनयाच्या कसल्या वठवला आहे हे पाहिले आहे का? पंजाबी अंगाची तान काय जबरदस्त आत्मविश्वासाने फेकत होते. आज "कलावती" हा जणू काय आपणच शोधून काढलेला राग आहे अशा थटात गायक सतारिये हा राग पेश करतात. तीस वर्षापूर्वी कलावती, सालगवराळी, देवसारव. लच्छासारव, नागसुराळी, झिलप असले अनवट राग गाऊन वसंता मैफली रोशन करत होता. आणि हे सारे एका तांबड्या पैशाची अपेक्षा न बाळगता.

कारकून वसंतराव
रात्र रात्र मैफली जागवायचा. पुन्हा आपला सकाळी सायकलीवर टांग टाकून सदाशिव पेठेतून शाहू पॅलेसपर्यंत प्यॅडल मारीत मिलीट्री अकाउंटसमध्ये खर्डेघाशीला जायचा. आयुष्यातली एक-दोन नाही सोन्यासारखी बावीस-चोवीस वर्षे या दर्जेदार गायकाने कारकुनी केली. पण एक गोष्ट खरी की कारकुनीदेखील मोठ्या तबियतीने केली. कारकुनांच्या अड्ड्यात वसंता शंभर टक्के कारकून. आपण कलावंत असुन कारकुनीत झिजतो आहोत या चालीची रड नव्हे. निराशेचा उसासादेखील वसंताने टाकलेला मला आठवत नाही. वसंताच्या व्यक्तिमत्वात एक खट्याळ कार्ट आणि एक गंभीर वयोवृद्ध अशी दोन्ही व्यक्तिमत्वे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असतात. तसा वसंता पूर्वापार वयाती. पेन्शनर मंडळीत वसंता कहर समतो. साठीच्या पलिकडच्या एफ.सी.एम.ए. कंपनीचा एक स्पेशल अड्डा आहे. त्यात वसंता ट्रान्सफर्म, प्रेमशन्स, जॉन्सन साहेबापासून सुब्रम्हण्यम साहेबापर्यंतच्या कथा ह्यात रमून जातो. बर वृद्ध मंडळीदेखील वसंताशी भलत्या विश्वासाने बोलतात. एखादा वृद्ध म्हाताराभल्या पहाटे वसंताच्या बि‍र्‍हाडी "अरे देशपांड्या, मटार स्वस्त झालाय म्हणतात. लेट अस्‌ मेक अ ट्रीप टू मंडई म्हणाले~~~" करीत उगवतो. वसंताचे ते एका खोलीतले बिर्‍हाडदेखील असल्या पेन्शनरी सुखसंवादाला योग्य सेतींग आहे. जगातल्या सार्‍या स्थापत्या विशारदांना बुचकाळ्यात टाकणारी अशी पुण्यातल्या सदाशिव पेठेत ती के चाळ आहे. त्यातल्या फक्त एका खोलीत वसंताचा संसार तीस-बत्तिस वर्षे चालू आहे. परवाच नविन ब्लॉक घेतलाय म्हणाला. माझा विश्वास नाही. जागा बदलण्याची आवई वसंता गेली कित्येक वर्षे उठवतोय. पुण्यात आल्यापासुन आजतागायत वसंअता त्या चाळीत राहतो. मालक बदलले असतील पण भाडेकरू घट्ट. संडास बांधायचे राहिले तेथे चाळ बांधून झाल्यावर ओरीजिनल मालकाच्या लक्षात आलेले दिसते. कारण पहिल्या मजल्यावर एकडून तिकडे उगाचच एक लांब गॅलरी जाते. ती विशाल सोंधावर गेल्याच्या ऎटीत निघून जाते. मात्र संडासात ! दारातला कचर्‍याचा ढिग ओलांडून, चाळीतल्या बाळगोपांळाच्या कलाकुसरी हुकवीत जिन्यातून वर गेले की "वसंताराव देशपांडे ख्यातनाम गायक-नट, पेन्शनर मिल्ट्री अकाउंटस, यांचे बि‍र्‍हाड लागते." खिडकीत एक आफ्रिकेहुन आणलेला कस्सकू नामक उदी तपकिरी रंगाचा काकाकुवा आहे. एका खोलीचा अर्धा भाग मुदपाकखान्याचा. उरलेला दिवाणखाना. पण त्या एवढ्याश्या जागेतली टापटिप आणि वसंताच्या आई आणि सौ. विमलाबाई यांच्याकडून होनारे अभ्यागतांचे आतिथ्य मनाचे पार मोठे वैभव दाखवून जाते. वसंता जितका उत्तम गायक आहे, तितकाच उत्तम 'गृहस्थ' आहे. नाटक-सिनेमा-गायन क्षेत्रात पाय घसरायची निसरडी हवी तितकी. पण त्या एका खोलीत राहून स्वत:ला अनेक चैनी नाकारून वसंताने गृहस्थाश्र्माचे सारे आदर्श पाळले आहेत. (हल्ली असल्या आदर्शाना जपत वागण्याला मध्यमवर्गीय दुबळेपणा म्हणतात.) अर्थात ह्या श्रेयाचे मुख्य भागीदार वसंताची आई आणि सौ विमल. घरात सासू, सून, आशा, बापू, नंदा ही रुलिंग पार्टी असून वसंतराव मायनॉर्टी पार्टीचे एकमेव सभासद आहेत. नवख्या माणसाची समजूत आई आनि विमल ह्या मायलेकी असून वसंतराव नुसते बसून खाणारे घरजावई आहेत अशीच व्हावी. विमल आता आजी झाली तरी नव्या नवरी इतकीच बुजरी आहे. वसंताच्या कितीतरी बैठकींना त्या हजर असतात. पण गर्दीत कुठेतरी, वसंताचे जावईबुवा गणिताचे प्रोफेसर. पण घराणे कीर्तनकरांचे. पिलुबुवा वडुजकरांचे चिरंजीव. त्यामुळे सुरांचे लोभी. वसंताने आपल्या मुलाला बापूला लहानपणी चक्क गांधर्व महाविद्दालयात घातले होते. बहुधा शाळेत निट अभ्यास करीत नाही म्हणून असेल. पण बापू वठणीवर आला. मन लावून अभ्यास करण्याचे वचन देऊन तिथून आपली सुटका करुन घेऊन आता तो बी.कॉम. ला आहे.

धाकटी नंदा नृत्य शिकते. हे शेंडेंफळ नुसती पैरण लेंगा चढवून हातात पिशवी घेऊन हिंडणार्‍या आपल्या बाबांना लोक इतका मान का देतात कोण जाणे ह्या आश्चर्यात वावरत अस्ते. छान सुट-बूट घालून येणार्‍या आपल्या मैत्रणींच्या डॅडींसारखे आपले बाबा का राहत नाही हे गणित आता मॅट्रिकच्या वर्गापर्यंत आली तरी तिला सुटत नाही. वसंताचा हा सारा चिमुकला संसार अमर्याद ताकदीने गाणार्‍या कलावंताच्या बेफिकीरीच्या कुठे तसूभर निशाणी दाखवित नाही. मध्यमवर्गिय मर्यादशीलतेचे सारे गुणदोष तिथे दिसतात. त्या खोलीत तंबोरे कुठले मावणार!

अनेक वर्षे घरी धुतलेला पायजमा आणि सदरा हाच त्याचा कारकुनी वेष. हातात पिशवी. त्यात चुना-तंबाखुच्या बारांची डब्बी. सायकलीच्या क्लिपा आणि पोटातल्या अल्सरच्या व्यथेवरच्या गोळ्या. आणि चक्क योगवसिस्ठा किंवा पतंजली भाश्य असला ग्रंथ. विस-बाविस वर्षापूर्वी वसंतराव हिराबाईंच्या बरोबर आफ्रिकेच्या दौर्‍यावर तबलजी म्हणुन गेले होते. त्यावेळी त्यांना आम्ही प्यांटीत पाहिले होते. परत आल्यावर मिल्ट्री अकाउंटसमधली आपली नोकरी संपली असेल ह्या समजुतीने कचेरीत गेलेच नाहीत. दुसर्‍या दिवशी कचेरीतले तात्या, अण्णा वसंताच्या बिर्‍हाडीत. वनवासी रामाचे सिंहासन भरताने सांभाळावे तसे ह्या मंडळींनी वसंताची नोकरी सगळ्या कारकुनी हिकमती लढवून सांभाळली होती.

"व्हॉट डू यू थिंक ऑफ अस रे देशपांड्या फ्रॉम टुमारो सिंपली जॉईन ऍज इफ नथिंग हॅज हॅपन्ड! ऑल द नेसेसरी स्टेप्स हॅव बीन टेकन म्हणाले~~" पुरुषसूक्ताच्या चालीवर हे सगळे म्हटले गेले. आम्ही सगळे गेली एकदाची वश्याची नोकरी म्हणून खूष. तर हे पुन्हा सायकलीवर टांग टाकून मिलिट्री अकाउंटसमध्ये हजर! मला कित्येकदा प्रश्न पडायचा की, धड दिडशे रुपयेदेखील महिना पदरात न पाडणार्‍या ह्या नोकरीची हा इतकी काय परवा करतो? सणसणीत गाऊन जायचा आणि एखादा फुटकळ गाय-मास्तर देकील 'व्यवसाय नसूनदेखील हौसेने गाणाऱ्यात वसंतराव चांगले गातात' असली शिष्टपणाची दाद घ्यायचा. वसंताचे कौतुक व्हायचे ते नकला काय छान करतो अशा स्वरुपाचे ! दिड-दिड तास एखाद्या रागाचा धागान्‌ धाग पिंजणारा, कमालीचं बिकट आणि तितकंच डौलदार नोटेशन करणारा, राग-रागिण्यांची शुद्ध स्वरुपं जाणणारा आणि गायनाचे विविध प्रकार इतल्या लीलीने मांडणारा वसंअता आजही बर्‍याच लोकांच्या दृष्टीन 'ए' क्लास गायक नाही. मैफलीत मी मी म्हणणार्‍या जाणकरांची दाद घेणारा वसंअत देशपांडे आजही आकाशवाणी मान्य गायक नाही. त्याच्या ध्वनिमुद्रिका वाजवतात. पण आकाशवाणीवरचे संगीत बृहस्पती त्याला अभिजात संगीताचा गायक मानायला तयार नाहीत.

"मारवा"
मी वसंताचा पेटीवाला. अनेक वर्षे साथ केली आहे. असंख्य मैफली आठवतात. नागपूरला रात्रभर गाणे झाले. सकाळी बाबूरावजी देशमुखांकडे चहा घेऊन अकराची गाडी गाठायची म्हणून गेलो. गाडीला दोन तास अवकाश होता म्हणून तंबोरे जुळवले, संध्याकाळी सहा वाजता मैफली संपली. तोडीने सुरू झालेली मैफल पुरिया धनाश्रीने संपली. तोपर्यंत नागपूरची गाडी मुंबईअच्या अर्ध्या वाटेवर पोहोचली होती. पार्ल्याला तर आम़च्या आणि आमच्या स्नेह्यांच्या घरी वसंताच्या अनेक बैठकी झाल्या. वातावरण गार झाले. वसंत बापट, नंदा नारळकर, माझे बंधू, शरू रेडकर अशी वसंताला आज अनेक वर्षे गवई मानणारी मित्र मंडळी होती. पुन्हा गवसणीतले तंबोरे निघाले आणि तीन वाजता भटियारा सुरु झाला. मारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग ! हा राग वसंता अति आत्मीयतेने गातो. एक जागा पुन्हा नाही असली अचाट विवीध. गझल गायला तर बेगम अखतर सलाम करुन दाद देतात. थिरखवासाहेब 'गवय्या' मानतात. भीमसेन जोशी. कुमार गंधर्व, त्याच्या गुणावर लुब्ध. विद्दाहरणातली अभिजात गायकीवर रचलेली गाणी एखाद्या नवख्या विद्द्या्र्थींची नम्रतेने स्वत: जोत्सनाबाई भोळे शिकतात. चंफुताईच्या घरची मैफल वसंताशिवाय सजत नाही. इतकेच कशाला पण आमच्या सारख्यांच्या आग्रहामुळे त्याने गांधर्व महाविद्यालयाची संगितातली सर्वोच्च पदवी मिळवली. वसंता आता डॉ. देशपांडे आहे. पण आकाशवाणीला त्याचे हे खानदानी संगितातले स्थान मान्य नाही.
वसंत देशपांड्याचा आकाशवाणी वर अभिजात संगीत गाणारा कलावंत होण्याचा प्रश्न बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नासारखा कधीपासून लोंबतो आहे. ज्या अधिकार्‍यांनी तो सोडवायचा त्यांनी कोणाच्या भीतीने तो डावलला आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. ज्यांच्या गल्लीत ताल नाही आणि मोहल्ल्यांत सूर नाही असे गायक-गायिका आकाशवाणीवर नित्य नियमाने राग-रागिण्या नासत बसलेल्या असतात आणि वसंतराव देशपांद्याना मात्र तिथे स्थान नाही. ह्याचे मला वाटते एकच मुख्य कारन की वसंताला घराण्याचा टिळा नाही. वसंताचे दुर्दैव हे की की तान गळ्यात यायला बर्‍याच लोकांना तास तास घासत बसावे लागते ती वसंताला क्षणात येते. स्वर टिपण्याच्या बाबतीतली त्याची धारणा किती अलौकिक आहे ह्याची साक्ष महाराष्ट्रातले सगळे म्युझिक डायरेक्टर्स देऊ शकतील. अनवट राग असो, लावणी असो, असंतराव ब्लॉटिंग-पेपरसारखी सुरावट टिपतात. वसंताचा एकच मोठा दोष की संगीतात हिंदूही नाही यवनही नाही. 'न मी के पंथाचा' म्हणणार्‍या केशवसूतांसारख्या सूरांच्या साकल्याच्या प्रदेशातला हा पांथस्थ आहे. कारकुनाच्या मर्यादशीतलेने घरगिरस्ती चालवणारा वसंता दोन तंबोर्‍यांच्या मध्ये मात्र स्वत:च्या खयाले चालवणारा आहे. तिथे त्याची कलंदरी दिसते. समोरच्या श्रोत्यांवर प्रेम जमले की गंमत म्हणून वसंता नकला करील. नाना गमती करील, पण तिथेही ह्या विदुषकीमागे दडलेली विद्वत्ता लपत नाही.

नकलाकार वसंतराव
वसंताचे केवळ सूरलयीचेच नाही तर शब्दांचे अवलोकन अतिशय सुक्ष्म. लोकांच्या बोलण्यातल्या बारिकसारीक हालचाली. त्यांची विचारशैली. त्यांची शब्दयोजना. ह्या सार्‍यांसकट ती व्यक्ती वसंता उभी करतो. वसंता गाण्याच्याच काय पण बोलण्या-चालण्याच्या नकला करतो. पण भोंड्यासारख्या कलापुर्ण नकला. त्यामागे त्या व्यक्तीविषयी कुठे अनादर, द्वेष, मत्सर नसतो. एकतर भोंडे हेदेखील मिलिट्री अकाउंटसवालेच. त्यामुळे वसंतरावांचे ज्येष्ठ स्नेही. वसंता त्या भोंड्यांच्याची बोलण्याची सुरेख नक्कल करायचा. नक्कल सुरू झाली की मग वसंतराव त्या भूमिकेशी तन्मय! एकदा चिंतामणराव देशमुखांच्या घरी आम्हां सगळ्यांना आमंत्रण होते गंधर्व आणि वसंतराव देशपांडे हे चिंतामणरावांचे आवडते गायक. वसंताला त्यांनी नकलांचा आग्रह केला. कशावरुन तरी 'म्युनिसिपालिटी'कार माधवराव जोश्यांची गोष्ट आली. मी चुकुन बोलून गेलो 'वसंता माधवरावांची नक्कल फार छान करतो'. आणि मग माझ्या लक्षात मी काय घोटाळा केला आहे ते आले. चिंतामणरावांना माधवराव चांगले परिचीत होते. त्यांनीही आग्रह केला. मी मनात रामरक्षा म्हणायला लागलो. वसंतरावांनी नक्कल सुरु केली आणि पहिल्या वाक्यातच माधवरावांच्या ढंगाची असली सणसणीत शिवी गेली की मराठी भाषेचे ते लडिवाळ लेणे चिंतामणरावांच्या पुढे कधीही कोणी दाखवायची हिंमत केली नसेल. चिंतामणरावांनी ती शिवी ऎकली आणि इतक्यात जोरात ह्सले की त्यांच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाले, "आमच्या वडिलाम्च्या निधनानंतर तशा शिव्या आज ऎकल्या."

चिंतामणरावाम्च्या डोळ्यातल्या पाण्यात हसण्या बरोबर वडिलांच्या स्मरणाचेही पानी असावे. वसंताने शिव्याबिव्यासकट माधवरावांचे तो वरपांगी उग्र पण आतून अति प्रेमळ व्यक्तिमत्व उभे केले होते. वसंताचे हे असले नकला करने वगैरे त्याच्या प्रतिष्ठेच्या आड येते असे काही जणांना वाटते. बालगंधर्वाच्या अंगाने वसंता गातो. त्यावेळी काही लोकांना वाटते की वसंता चेष्टा करतोय. दुर्दैव हे की बालगंधर्वाविषयीची वसंताला वाटणारी श्रद्धा किती नितांत आहे हे त्यांना ठाऊक नाही. पुण्यातल्या एका भाषणात वसंता म्हणाला होता, '...आम्ही गाताना एखादी सुरेख जागा निघून जाति. दाद मिळते. धन्य वातते दुसर्‍या क्षणी हवेत नारायणराव दिसतात. मग आठवतं की त्यांचा अलंकार होता. आम्ही आमचा म्हणून मिरवला.'


वसंताच्या व्यक्तिमत्वात दडलेले ते खट्याळ कोर्ट एखादवेळी येऊ नये तेव्हाही बाहेर येते. वसंतराव मैफालीत निश्चित एकाच ढंगात चालत येऊन बसतील हे सांगणे अवघड. एखाद दिवशी उगीचच जाम प्यालेल्या माणसासारखाच येतो आणि लोकांचा गैरसमज करुन जातो. कधी कधी अतिच सभ्य! पहिल्या भेटीत स्वत:विषयी गैरसमज करुन दिला नाही तर वसंतालाच चुकल्यासारखे होत असावे. ही खबरदारी तो स्वत:च घेतो. त्याचे थोडे व्यसनासारखे आहे. वसंताचे गाणेच काय वागणेदेखील दारू किंवा सिगरेटसारखे चढत जाते. सिगरेटचा पहिला झुरका काही फारसा सुखद नसतो. बियरचा पहिला घोट आवडलेला माणूस संत किंवा ढोंगीच असला पाहिजे. पण दुसरा झुरका किंवा घोट ट्राय केला पाहिजे अशी ओढ मात्र ही व्यसने प्रथम भेटीनंतर लावून जातात. वरपांगी बेफिकीर वाटणाऱ्या वसंताला रात्रीच्या बैठकीच्या आधी संध्याकाळी पहावे. नवाच्या बैठकीला सात वाजताच लेंगा शर्ट बदलून तयार होऊन 'असे चल भाऊ निघूया करीत असतो.' अर्थात आम्हीही थोडे त्याच गोत्रातले! अध्यक्ष झालो तरी सभेच्या आधीच हजर! पण एरवी उखडेल वाटणारा वसंता कच्च्या साथीदारांना काय विलक्षण सांभाळून घेतो. अशावेळी वसंताच्यातला तो प्रेमळ म्हातारा जागा होतो. आणि लडबड्णाऱ्या पेटी-तबलेवाल्याला हा~~य बेटा,- 'डरो मत बजाव बहुत अच्छे' करीत सांभाळू लागतो. बैठकीचा चमत्कारिक हॉल साथीदार, थंड चहा, बिदागिच्या रकमेत आयत्यावेळी कपात. वाहनांची गैरव्यवस्था ह्याविषयी कधीही त्याची तक्रार नाही. कधी कधी ऎकायला श्रोते मख्ख असतात. वसंतराव हळूच 'हॉं भाई-आज रियाझ कर लेंगे' म्हणून त्यांच्या मख्खपणाची फिकीर न करता गातात. त्याचे कारण वसंताच्या बाह्य विचित्रावताराच्या आंत एक अतिशय बहुश्रुत आणि समंजस व्यक्तित्व दडले आहे. फावल्या वेळात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ह्यातला 'मझा' घेणारा हा माणूस आहे. आज इतक्या वर्षात कुठल्या कलावंताविषयी असूयेचा एक शब्द मी त्यांच्या तोंडून ऎकला नाही. एका चांगल्या गायकाविषयी एक संगीत-समिक्षक वसंताला म्हणाले. "बुवा, त्याच्या गाण्यात तुम्हाला ऎकण्यासारखं काय आहे?" वश्या म्हणतो, "त्याचा पाण्यासारखा निर्मल सूर!" पहिल्या दर्जाच्या मैफलीत त्याला अजून स्थान नाही ह्याची आम्हालाच खंत! वसंतराव संपूर्ण उदासीन. एकदा ह्या बाबतीत तो सुरेश बोलला, 'अरे भई, मान मान क्या बात है! सुरांची दौलत गळ्यात असल्यावर गळ्याबाहेर नाही पडला हार बिघडलं कुठे! कधीकधी मला खूप वाईट वाटते. वसंतापेक्षा ज्ञान आणि तयारी दोन्ही दृष्टीने प्राथमिक दर्जाला असणाऱ्यांची वर्णी शास्त्रीय संगीताच्या परिषदेत लागावी आणि वसंतारावांना नाटकातल्या दोन पदांचे धनी ह्यापेक्षा स्थान मिळू नये ह्याची चीड येते. वसंतरव मात्र त्या पंक्तीत आपल्या टोपल्या टाकायला हजर! वसंताचे स्थान त्याला मानाने दिले. एकेकाळी गोपाळ गायन समाजाच्या गोविंद्राव देसायांनी आणि नंतर सवाई गंधर्व पुण्यतीथीत भीमसेन जोशी, डॉ. नाना देशपांडे यांनी! तीन-तीन अखंड रात्री जागणारे हजारो श्रोते शेवटल्या रात्री वसंता, भीमसेन आणि गण्गुबाईची प्रतिक्षा करीत बसतात. पण रेडियोवाले वसंताच्या ऑडिशन टेस्टचा फॉर्म भरून पाठवण्याची वाट पाहत आहेत. वसंत देशपांडे नावाचा महाराष्ट्रात एक अव्वल दर्जाच्या अभिजात गायकी करणारा कलावंत आहे ही बातमी रेडियोला अजून कळली नाही. नाहीतरी बातम्या कळून शिळ्या झाल्यावरच त्या ऑल इंडिया रेडिओला कळतात म्हणा!

'नॉन-कन्फर्मिस्ट'-
पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्याही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले- 'अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजाहीर असे दण-दणदनदण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील!' वसंताच्या स्वभावाताच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऎकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा 'मिजाज' आहे. निखार्व असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! ,म्हणूनच की काय कोण जाने "शतजन्म शोधितांना" 'असे जीत पहा'. यासारख्या किंत 'रवी मी भाळी चंद्र असे धारिया' ह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रिक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे. पण कलावंताला म्युनिसिपाकिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे?

त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता!

वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. 'कट्यार काळजात घुसली' मध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारतली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे! पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. पण तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हभासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही. नागर आणि ग्रामीण हिंदिचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतारावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट! कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला. आधात्म अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती-त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही. आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्दा तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे 'कारकुनी' ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा. पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही. मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिजे आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी -पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमला पाठ असाव्यात त्याला! जिनमध्ये लाइम कॉंडियलचे प्रमाण काय इथपासून ते अवकहडा चक्र म्हणजे इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य! वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चपूंताईचा घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालवणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे. कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनदं घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदाअर मामला आहे. भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी. परवांनचीची गोष्ट. 'कट्यार' मध्ये तबल्याची साथ करणारा नाना मुळे भीमसेनने मंगळुरात गाणे संपल्यावर मुळ्याला आपल्या गाडीत घातला आणि स्वत: ड्राईव्ह करीत सोलापुरात वसंताच्या साथीला आणून हजर केला. 'वश्याबुवा, हा तुझा तबलजी!" जमलेली साथ नसली तरी वश्याबुवाचे गाणे बिघडेल म्हणुन रात्रभर बैठक करुन थकलेला हा भारतीय किर्तीचा गायक मंगळूर ते सोलापूर गाडी हाकीत तबलजी आणून हजर करतो. ही प्रेमाची कोडी उलगडायला माणसाला जीवनात भान हरपायची स्थाने गवसावी लागतात. एवढ्याने काय झाले आहे. हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे एक मडके, तिळकुटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन "ए बुवा, येता येता ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. तुझ्या आवडिच्या - हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा. रात्री हे चेपा पोटात आणि बोबंला." अशा प्रेमसंवादानंतर भीमसेनबुवा पुण्याला रवाना, तीन वर्षापूर्वी प्रथम ऎकलेल्या वसंताच्या गळ्यातल्या सुलतान षरके यार या गाण्यापासून अगदी परवा ऎकलेल्या बाला जोशीच्या घरच्या जनसंमोहिनी असंख्य मैफलींची आज डोक्यात गर्दी आहे. आज आमच्या दोघांचीही वयाने पन्नाशी गाठली. पण हा वसंता पहिल्या भेटीतच रविंद्राच्या शब्दात सांगायचे म्हणजे 'माझ्या प्राणांना सुरांची आग लावून गेला" त्यानंतरच्या त्याच्या सुरांप्रमाणे त्याच्या सेन्हाने ही मशाल पेटती ठेवली. वाटेल त्यावेळी घातलेल्या हाकेला ओ देणारा मित्र लाभायला भाग्य लागते हे भाग्य माझे. वसंता आज माझ्या कुटुंबियातलाच एक आहे. माझ्या आणि त्याच्या पत्नीच्या कौतुकाइतकीच तो दमदाटीही ऎकून घेतो. विशेषत: दमदाटीचा कार्यक्रम आमचे कुटुंब करते. नव्या पिढीतली जवान मंडळी वसंताच्या गाण्याला गर्दी करताना पाहून धन्यता वाटते. वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपंणाने मिरवीत जाणारी नाही. दर्‍याखोर्‍यातुन बेफाम दौडत जाणार्‍या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. वसंताचे गाणे ऐकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधता येते. सुरांचा हा झणझणीत कोल्हापूरी मटनाचा रस्सा आहे. नाजूक प्रकृतीच्या चाकोरीतून सारेच काही सांभाळीत जाणार्‍यांना सोसणारा हा खुराक नाही. त्यांना घराण्याच्या रुळलेल्या निर्धास्त चाकोर्‍या बर्‍या ! वसंताने कारकून म्हणून चाकोरी सांभाळली. आणि कलावंत म्हणून मात्र झुगारली. दोन्ही भुमिकांविषयी तो तद्रुप होता. कारकुनाला चाकोरी हाच आधार तर चाकोरी मोडण्यातूनच कलावंत उभा राहतो.

कारकुनी सुटली

शेवटी मिलिट्री अकाउंटसमध्ये एक साहेब असा आला की त्याने कायद्दावर बोट टेवून वसंताची बदली नेफाच्या जंगलात केली. वसंताचा कलावंत म्हणून मोठेपणा जाणणारे त्याचे कारकुन मित्र त्याच्याऎवजी आम्ही जातो म्हणत होते. पण पिवळ्या कागदाचे कलेशी जमत नाही. (म्हणूनच रेडिओवरचा कारभार पंडुरोगी) लाखात एखाद्याला मिळावे असे संगीतातल्या तबियतीचे वरदान घेऊन आलेला वसंता त्या जंगलातल्या एक तंबूत पाऊस-पाणी, रोगराई, हिस्त्रं जीवजंतू यांच्या संगतीत राहून लोकांच्या पगाराची बिले खरडू लागला. तिथे त्याची प्रकृती ढासळली. पण अखंड साठ की सत्तर र्य्पये पेन्शन आणि त्या जंगलात जडलेली पोटाची व्यथा एवढे सरकारी सेवेबद्दल केलेले चिज घेऊन वसंतराव निवृत्त झाले. गृहस्थाश्रमाला जागून थोरलीचे योग्य वेळी लग्न केले होते. बापू बी. कॉम. ला नंदा वर्षभरात मॅट्रीक होइल. गृहस्थाश्रमाचे योग्य पालन ही आपल्यासाठी अपंपार झीज सोसलेल्या स्वत:च्या आईच्या ऋणाची फार मोठ्या कर्तव्यबुद्धीने केलेली फेड आहे.

त्या नोकरी मागे दडलेले रहस्य ते! पुत्र, पती आणि पिता ही गृहस्थधर्माची तिन्ही कर्तव्ये पार पाडलेला वसंता मला म्हणाला, " भाई, आता तंबोरा आणि मी!" अनेक वर्षापूर्वी वसंताला त्या भर मैफलीत विचारलेल्या 'तुमचं घराणं कुठलं?' ह्या प्रश्नाच उत्तर तंबोरा आणि मी ह्यातच आहे. आचार्य अत्र्यांनी वसंताच गाणं ऎकुन म्हटलं 'हा स्वरभोगी गायक आहे. तंबोर्‍यांच्या चार तारांतच ज्याने चारी मुक्ती साधियेल्या! त्याला कोण अडवणार ? वसंताचे घराणे हे अस्सल स्वरभोगी घराणे आहे. म्हणून स्वरांच्या कणाकणाचा भोग घेणारा हाताचा सूर असो. एखाद्या भजनात जमलेल्या किर्तनकाराचा असो. लावणी गाणारणीचा असो की भीमसेन, कुमारगंधर्व मल्लिकार्जुन ह्यांच्यासारख्या अभिजात संगीत गायकांचा असो. वसंता दाद देताना भान हरपून दाद देतो. उपरण्यात अहंकार आणि संगीतात प्रतिष्ठा अप्रतिष्ठा ह्यांचे पोथीनिष्ठ विचार मांडून मैफलीतल्या जागा अडवणार्‍यांना हे मानवत नाही. मग मन आणि देह सुदृढ मन घेऊन जगणार्‍या वसंताच्या सांगितीक जीवनातल्या वसंताही नाना तर्‍हेच्या स्वरबहाराने फुललेला आहे. तो तसाच फुललेला रहावा असे म्हणणार्‍यांनी संख्या रोज हजारोंनी वाढायला लागली आहे. हि उशिरा का होईना पण वसंताला मिळालेली जवान रसिकांची दाद आहे. वसंतालाच नव्हे तर तंबोरा आणि मी ह्या विचारांच्या स्वरभोगी सृष्टीतल्या लहानमोठ्या निर्मितीच्या निर्मळ मनाने आनंद घेणार्‍या सर्वांनाच मिळालेली ही दाद आहे. ही दाद आमच्या संगीताची जवानी टिकवणारी आहे. आज पन्नाशीतही वसंताची तडफ विशीतल्या जवानाचीच आहे. ती साठीत, सत्तरीत आणि शंभरीतही तशीत राहो. त्याच्या भवनातले गीत कधीही पुराणी न होवो. ते होणार नाही याची ग्वाही आज तीस वर्षाच्या आमच्या स्नेहाचा इतिहास मला देतो आहे! वसंताचा तंबोरा त्याच्या कानाशी अक्षय वाजत राहो!

लेखक - पु. ल. देशपांडे 
गुण गाईन आवडी