Wednesday, May 26, 2010

रवींद्रनाथ आणि मी

आपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर सार्‍या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी तीन व्याख्याने पुणे विद्यापीठाच्या टागोर व्याख्यानमालेत दिली होती. त्यातील एका व्याख्यानाचा हा संपादित अंश.

रवींद्रनाथांचं साहित्य वाचणं, त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अर्थ समजून घेणं हा माझा छंद आहे. जानपदापासून ते विबुधजनांपर्यंत सर्व थरांवर रवींद्रनाथांनी एक अलौकिक विश्वास संपादन केला होता. त्यांचा एकदा संग जडला की, त्यांची संगत सतत हवीहवीशी वाटते. बंगाली माणसाला तर त्यांच्या बाबतीत ‘तू माझा सांगाती’ म्हणावं असंच वाटतं. एखाद्या वातावरणात सुगंध दरवळून राहावा तसे ते बंगाली जीवनात भरून राहिलेले आहेत. आजच्या सर्व नामवंत बंगाली साहित्यिक, संगीतप्रेमी, चित्रकार यांच्यावर त्यांचे खोल संस्कार आहेत. आपल्याला जे काही म्हणायचंय ते परिणामकारक शब्दांत सांगायचं झालं की त्यांच्या लेखणीतून नकळत रवींद्रनाथांचा सूर उमटतो. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतका एकरूप झालेला असतो की, तो रवींद्रनाथांचा आहे. याचं त्यांना भानही राहात नाही. इंग्रजी भाषेत जसा शेक्सपियर कधी उमटून जातो ते कळतही नाही तशीच बंगाली साहित्यात रवींद्रांची उपस्थिती आहे. आपण जसे बोलता बोलता संतवाणीचा नकळत आश्रय घेतो तसेच बंगाली लोक रवींद्रनाथांचे बोट धरतात. माझं आजचं भाषण म्हणजे रवींद्रांच्या बोटाला धरून त्यांच्या दुनियेत केलेल्या प्रवासाच्या कथेसारखं आहे. प्रवासात आपण बागाही पाहतो आणि बाजारही पाहतो. देऊळ पाहतो आणि एखादा प्रचंड कारखानाही पाहतो. त्या पाहण्यातून मनावर उमटलेल्या निरनिराळ्या चित्रांविषयी बोलत असतो. तसंच रवींद्रनाथांचं मला जे निरनिराळं दर्शन घडलं त्यासंबंधी मी बोलणार आहे. त्यामुळे विषयांतर हाच आजच्या माझ्या बोलण्याचा स्थायीभाव असण्याची अधिक शक्यता आहे. ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. खुद्द रवींद्रनाथांना म्हणे कोणीतरी प्रश्न विचारला होता- ‘‘तुमच्यातला एकत्र नांदणारा गुण आणि दोष कोणता?’ त्यांनी उत्तर दिलं होतं Inconsistency- असंबद्धता.’

रवींद्रनाथांनी इतक्या क्षेत्रात ही दौलत आपल्यासाठी ठेवली आहे की, काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. ती काही केवळ बंगाली लोकांसाठीच नाही. भाषांतरातूनही ती आपल्याला मिळू शकते. कुठल्यातरी एखाद्या भाषेतल्या शब्दांची शरीरं घेऊनच साहित्यातल्या सौंदर्याला आणि विचारांना यावं लागतं. भाषांतरात त्या भाषेचा प्रत्यक्ष स्पर्श जातो. भाषांतरातून मूळ कवितेचा आस्वाद घेणं हे हातमोजे घालून प्रेयसीच्या गालावरून हात फिरवण्यासारखं आहे, असं म्हटलं आहे तेही खोटं नाही. पण तरीही शब्दांच्या पलीकडलं रहस्य गवसतच नाही असं म्हणता येत नाही.

रवींद्रनाथांची ओढ कुठल्याक्षणी कोणाला आणि कशी लागेल हे सांगणं कठीण आह. ती केवळ साहित्यकलेच्या नित्य उपासकापुरतीच मर्यादित नाही. या माणसाने जिथे जिथे म्हणून स्पर्श केला तिथे तिथे आपला शिक्का उमटवला. चाळिशी उलटल्यानंतर चित्र काढायला सुरुवात केली तर दोन अडीच हजार कॅन्व्हासेस रंगवले. पॅरिसचे चित्रकला- समीक्षक थक्क झाले. सुमारे दोन ते अडीच हजार गाणीच लिहिली नाहीत तर त्यांना चाली दिल्या. त्यामुळे कुठल्या क्षेत्रातल्या माणसाला रवींद्रनाथांना हाक मारावी असं कुठल्या क्षणी वाटेल ते सांगता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर महात्मा गांधींचं देता येईल. गांधीजींची काही कवितेचा आस्वाद घेणारे रसिक म्हणून ख्याती नाही. उलट अनेकांना ते अरसिक वाटतात. ते तितकंसं बरोबर नाही. काही विशिष्ट ध्येयांनी प्रेरित झालेल्या महाभागांना जीवनातले अग्रक्रम ठरवावे लागतात. गांधीजींनी असे काही अग्रक्रम ठरवून इतर दोर कापून टाकले होते असं म्हणायला हावं. तरीदेखील जीवनातल्या एका उत्कट प्रसंगी गांधीजींना रवींद्रनाथांच्या कवितेची आठवण होते हे पाहिल्यावर रवींद्रनाथांच्याच नव्हे तर काव्यकलेच्या सामर्थ्यांची एका निराळ्या रीतीने प्रचिती येते. ज्ञानेश्वरांनी ‘जे चला कल्पतरूंचे आरव’ असं म्हटलं आहे- चालत्या कल्पवृक्षांचे बाग म्हटलं आहे. रवींद्रनाथांनी आपल्या प्रतिभेने उभ्या केलेल्या या कल्पवृक्षांच्या बागेतलं वैभव आता सर्वाचं आहे. फक्त त्या बगीच्यात हिंडायची ओढ मनाला लागायला हवी. थोर साहित्यकृतींकडे, कण्वाच्या आश्रमात जाताना दुष्यन्त म्हणाला होता तसं विनीत वेषाने नसलं तरी विनम्र होऊनच जायला हवं. रवींद्रांच्या सृष्टीत शिरल्यावर, त्यांनी जीवनात ज्या ज्या पार्थिव आणि अपार्थिवाला स्पर्श केला तो एका महाकवीचा स्पर्श होता हे ध्यानात आल्याशिवाय राहात नाही. मी हे केवळ भाविकतेनं बोलतो आहे असं कृपा करून समजू नका. अलौकिक प्रतिभेच्या स्पर्शानी एखाद्या दगडाची जेव्हा घारापुरीच्या लेण्यात प्रचंड त्रिमूर्ती झालेली दिसते किंवा कोणार्कच्या सूर्य मंदिरात, अशाच दगडातून टीचभर उंचीची नर्तकी साऱ्या शंृगाररसाचा अर्कबिंदू होऊन आपल्याला आव्हान देते त्या वेळी आपण प्रथम विनम्रच होतो. शब्दसृष्टीच्या ईश्वरांना वंदन करावं असं समर्थानासुद्धा वाटतं ते उगाच नाही. पण ज्याच्या सृष्टीत हे ‘ऐश्वर्य’ लाभतं असा कविश्वर मात्र शतकाशतकातून एखादाच येतो. एरवी ‘कविता गवताऐसी उदंड वाढली’ असं त्या समर्थाना म्हणावंसं वाटायला लावणारे कवी असतातच.

रवींद्रनाथांची शब्दसृष्टी आपल्याला वेळोवेळी या ऐश्वर्याची साक्ष पटवीत असते. त्यांच्या अभिव्यक्तीचं त्यांचं सर्वात आवडतं माध्यम म्हणजे कविता. ते प्रथम कवी होते, नंतर इतर सर्व. अर्थात त्या इतर सर्वातही त्यांच श्रेष्ठत्व त्यांनी सिद्ध केलेलंच आहे. शरदबाबूंसारख्या कादंबरीकाराने ‘गोरा’ कादंबरीबद्दल म्हटलंय की ‘‘ती मी साठ पासष्ठ वेळा वाचली आहे. मी लोकांसाठी लिहिणारा कादंबरीकार असलो तरी रवींद्रनाथ हे माझ्यासाठी लिहिणारे कादंबरीकार आहेत.’’ हे जरी खरं असलं तरी त्यांचा जीव जडलाय तो कवितेशीच. आपल्या आणि कवितेच्या नात्यासंबंधी रवींद्रांनी आपल्या पुतणीला एक सुंदर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे- ‘कविता माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या वयाचा होतो तेव्हाच माझा तिच्याशी वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मोलकरणींच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी, हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करीत असे. त्या वेळची माझ्या मनाची धुसर पण अपूर्व अशी अवस्था समजावून सांगणं अवघड आहे. एक मात्र मी नक्की सांगू शकेन- की त्या काळी कवितेबरोबरच माझं शुभमंगल झालं होतं. पण या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊन दे पण मोठंसं भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार, पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते पण कधी कधी तिच्या त्या घट्ट मिठीतून हृद्पिंडातलं रक्त बाहेर काढते. एकदा तिनी एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्थ बसेन म्हणायची सोय नाही. तरीसुद्धा माझं खरं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ‘साधने’त लिहितो. जमीनदारीही सांभाळतो. पण ज्या क्षणी कविता लिहायला लागतो त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. हे माझं स्थान मी चांगले ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं, आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधी खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे एकच आश्रयस्थान. रवींद्रनाथांच्या कवितेच्या बाबतीत आणखी एक घटक आहे, तो म्हणजे संगीतातला सूर. काही अपवाद सोडले तर कविता गद्यात वाचणं त्यांना रुचतच नव्हतं. आपल्याकडे ‘गीत’ हा शब्द काहीशा तुच्छतेनेचे कवितेच्या संदर्भात वापरायची फॅशन आहे. रवींद्रांनी आपल्या कवितांचा उल्लेख ‘गीत’ असाच केलेला आहे. ज्या त्यांच्या संग्रहाला नोबेल पारितोषिक मिळाले ती ‘गीतांजली’ आहे. मला पुष्कळदा वाटतं की सुरांशी नातं तुटलेली कविता ही इंग्रजांमुळे आपल्या देशात आली. एरवी आम्ही आमचे वैचारिक तत्त्वज्ञानपर श्लोक आणि ओव्यासुद्धा सुरात बुडवून स्वीकारले. इंग्रजी कविता ही अशी नैसर्गिक रीतीने सुरातून आमच्या मनात झिरपली नाही. याचा अर्थ अंग्रजी कवितेला ताल छंद नाही, असा नव्हे. आम्ही ती कविता प्रथम मनातल्या भाषांतर विभागात टाकून शब्दार्थाना महत्त्व देत समजून घेतली. वैचारिक साहित्याचा स्वीकार आणि कवितेचा स्वीकार हा एकाच पद्धतीने होत नसतो. कविता गायला किंवा ओव्या गायला आमच्या देशातल्या लोकांना काही गायन क्लासात जाऊन शिकावं लागत नव्हतं. सुरांचं हे सामथ्र्य रवींद्रनाथांइतकं आधुनिक काळातल्या इतर फारशा कवींनी ओळखलेलं दिसत नाही. पण संतांसारखं त्यांनी सुरांना केवळ भक्तिरसातच स्थान आहे, असं मानलं नाही. रवींद्रनाथांना संगीत हे सर्वव्यापी वाटत होतं. जीवनातले सुख- दु:खाचे, हर्षशोकाचे सारे अनुभव प्रकट करताना शब्दांनी सुरांची साथ सोडणं हे त्यांच्या प्रकृतीला मानवण्यासारखंच नव्हतं. क्रियापदाहूनही अधिक वेळा आलेले आहेत. त्यांच्या तोंडून त्यांच्या गीताचं गायन ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांनी तर त्या अनुभवाचं वर्णन करताना आपली सारी शब्दशक्ती पणाला लावलेली आहे. तद्रूपतेच्या क्षणी प्रथम त्यांच्या मनात सूर जागायचा. त्यांची ‘रांगिये दिये जाव’ अशी एक कविता आहे. जाव, जाव, जाव गो एबार, जाबार आगे रांगिये दिये जाव- जा जा पण जाण्यापूर्वी मला एकदा संपूर्ण रंगवून जा – मला जागवून जा. असा अर्थ आहे. रसिकत्वी परतत्वस्पर्श म्हणजे काय ते कळायला रवींद्रनाथांचं जीवन, त्यांची कार्यक्षेत्रं, त्यांची ध्यानक्षेत्रं, त्यांची कलानिर्मितीची क्षेत्रं यातून आपल्या सर्वाच्याच असलेल्या ‘मी’ला आपण यात्रा घडवली पाहिजे. त्या यात्रेचं पुण्य एकाच वरदानाने आपल्या पदरात पडण्याची शक्यता आहे. ते म्हणजे चित्ताला भयशून्यता लाभणे आणि चित्त भयशून्य झाल्याखेरीज ‘आनंद’ या शब्दाचा अनुभवातून येणारा अर्थ आपल्याला कळणार नाही. उपनिषत्कालीन ऋषींची ‘अमृताच्या पुत्रांनो’ ही हाक आणि ‘पितानोऽहसि’ ही प्रार्थना रवींद्रांच्या फार आवडीची. पारतंत्र्याच्या काळात सारा धीर गमावून बसलेल्या देशबांधनांना त्यांनी ‘अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात’ हेच नाना प्रकारांनी पटवण्याचं कार्य केलं आणि हे सारं त्यांच्या जोडीने गात गात केलं. पंचविशीतल्या रवींद्रनाथांनी ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही कविता लिहिली होती. नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणाचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो. मग कडय़ावरून उडय़ा टाकीत, अभेद्य खडक फोडीत सारं जीवन एका नव्या चैतन्याने कसं फुलवून टाकतो हे या कवितेत सांगितलं आहे. असंख्य सत्कर्मामध्ये झोकून दिलेलं रवींद्रनाथांचं जीवन आणि निर्मिती पाहिली की, त्यांच्या कवितेतला निर्झरच रवींद्रनाथांचं रूप धारण करून आपल्यात आला होता असं वाटतं. शांतिनिकेतन जर रवींद्रनाथांची tangible poem असेल तर निर्झरेर स्वप्नभंग म्हणजे intangible Rabindranath असंच म्हणायला हवं. ही कविता मूळ बंगालीतूनच अनुभवली पाहिजे. मी त्या कवितेचं मराठी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आपल्याला अंधुक कल्पना यावी म्हणून-

आज पहाटे रविकर आला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला
प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला आणि जाहला अंधाऱ्या ह्य़ा
गव्हरात मज स्पर्श आज त्या
पहाट पक्ष्याच्या गीताचा
इतुक्या दिवसामागुनि माझा प्राण कसा मज
नकळे ऐसा जागुनि उठला.
जागुनि उठला प्राण
अरे अन् उसळुन आले नीर
प्राण वासना रोधु न शकली
मत्प्राणांचा धीर।
थरथर थरथर कंपित भूधर
शिलाखंड कोसळून पडले
फुलून फुलून मग फेस उसळला
गर्जत जल संतापुनि उठले
इथे तिथे मग वेडय़ापरि जल
मत्त भिंगऱ्या मारीत सुटले
शोधू लागले- तरी न दिसले
बंदिगृहाचे दार कोठले
सांग विधात्या पाषाणांच्या
कशास येथे राशी पडल्या
चहू दिशांना कशास त्यांच्या
उंच उंच ह्य़ा भिंती घडल्या?
हृदय आता
सर्व बंधने । तोड तोड ही
प्राणांची साधना करोनी
मने जोड ही ।।
लाटेवरती उचलुनि लाटा
आघातावर कर आघाता
मत्त होउनी प्राण जागला
कुठला तम अन् फत्तर कुठला
उसळुनि उठता सर्व वासना
जगती कोणाचे ही भय ना ।।
करुणाधारा आता ढाळिन
पाषाणांच्या कारा फोडिन
बुडवुनि सारे जग हे टाकिन
चहू दिशांना भटकत भटकत
पिशापरी मी गाइन गाणी
केस पिंजुनी- फुले उधळुनी
इंद्रधनूने रंगवलेले
पंख पसरुनी
रविकिरणातून हासू फुलवित
टाकिन पंचप्राण उधळुनी
या शिखरातून त्या शिखरातून
देईन झोकून
ह्य़ा खडकातून त्या खडकातून
घेइन लोळण,
हसेन खळखळ गाइन कलकल
धरुनि ताल मग टाळी देऊन
माझ्यापाशी कथा कितीतरी
गाणी कितीतरी
प्राणांची अन् शक्ती कितीतरी
सुखे किती अन् अनंत ऊर्मी
मम जीवाची कोण उभारी
काय आज मज झाले न कळे,
कानी माझ्या महार्णवाचे
गाणे आले
चहू दिशांना कसले हे कारागृह दिसते
फोड फोड रे कारा ती तव वज्राघाते
पहाट पक्षी कसले गाणे गाऊ लागला
कुठला रविकर आज असा मज स्पर्शुन गेला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला

‘आमार जीबोन आमार बानी’ या रवींद्रनाथांच्या उक्तीची सत्यता पटवणारी ही कविता आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया यातला साचभाव आणि वर्तन या दोन्हींची अनुभूती लाभून आपल्यातला सतत मलिन आणि दुबळा होणारा ‘मी’ सबळ आणि निर्मळ होतो. आपल्यातल्या त्या ‘मी’ ची मरगळ घालवायला रवींद्रनाथांकडे काहीही मागायला जावे. अशी मागणाऱ्यांची भूमिका घेऊन मी त्यांच्यापाशी जेव्हा जातो तेव्हा माझ्या झोळीत जे पडले त्याबद्दल मी आपल्याशी बोललो. रवींद्रनाथ आणि मी असं ज्या वेळी मी म्हणतो त्या वेळी एक उदार दाता आणि सदा अतृप्त याचक हेचं आमचं नातं असतं.

(‘रवींद्रनाथ : तीन व्याख्याने’ या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकातून साभार.)
सौजन्य – लोकसत्ता
९ मे २०१०

Thursday, May 13, 2010

पं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण

 नोंद- (भाऊ मराठे यांनी प्रचंड मेहेनत घेऊन पुलंची काही भाषणे आणि पुलंच्या घेतल्या गेलेल्या काही मुलाखती ज्या ऑडिओ / व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध होत्या त्यांचं संकलन करुन स्वत:च्या मोत्यासारख्या अक्षरात लिहून काढल्या. त्यांनी अशी अनेक संकलनं केली आहेत आणि हा असा ठेवा लिखित स्वरुपात त्याच्या स्वत:पुरता उपलब्ध असला तरी तो कायम स्वरुपी जतन व्हावा या उद्देशाने विवेक काजरेकर यांनी त्याला विचारणा केली की 'हे हस्तलिखित स्वरुपातलं संकलन टंकलिखित करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देऊ शकतो का ?' तेंव्हा भाऊंनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांची पोतडी काजरेकरांच्या स्वाधीन केली. टंकलेखनाचं काम विवेक काजरेकरांनी केले आहे.)

मुळ स्त्रोत- http://www.kajarekar.com/node/546
विवेक काजरेकर आणि भाऊ मराठे यांचे शतश: आभार.

पंडित सी. आर. व्यास ह्यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीचा समारंभ २ नोव्हेंबर १९८४ रोजी मुंबईच्या पोदार कॉलेजमधे साजरा झाला होता.त्या समारंभात पु. ल. देशपांडे यांनी केलेलं अध्यक्षीय भाषण..

मित्रहो,
आजवर मी व्यासपीठावर असंख्य वेळा बसलो आहे, पण आजच्या सारखं व्यासपीठ यापूर्वी मी कधीही अनलंकृत केलेलं नव्हतं. अनलंकृत अशासाठी म्हणतो की इथे माझ्या दोन्ही बाजूला संगीतातले इतके थोर लोक बसले आहेत की त्यांच्या मधे बसताना मी कुठल्या अधिकाराने बसतोय या प्रश्नाचं माझं मलाच उत्तर सापडत नाही. त्यात आमच्या विद्याधर गोखल्यांनी माझ्याबद्दल इतके गौरवाचे उदगार काढलेले आहेत की आणखी काही वेळ ते तसेच बोलले असते तर सत्कार माझा आहे की व्यासांचा आहे हा प्रश्न पडला असता. आणि त्याच्यावर कडी म्हणून त्यांनी मला शालजोडीही दिली. पत्रकाराकडून नुसती शालजोडी मला पहिल्यांदाच मिळाली आहे.

आजचा हा समुदाय पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद एका गोष्टीसाठी झाला की माझ्या जीवनातलं एक अतोनात सुंदर दृश्य मी पहातोय असं मला वाटतं. भारतीय संगीताच्या संदर्भात बोलायचं झालं तर भारतीय संगीताचं भूत, वर्तमान आणि भविष्य आज इथे बसलेलं आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीतात घातलं असे बुजुर्ग कलावंत आहेत, जे धडपडताहेत आणि संगीतात येऊ पहाताहेत असे आहेत आणि ज्यांच्याकडे उद्याची आशा केंद्रित झाली आहे असेही कलावंत मला दिसताहेत. मघाशी मी इथे पाहिलं आणि आताही पहातोय. यात मला अनोळखी कोणीही वाटत नाही. गेल्या चाळीस पन्नास वर्षांमधे मी ज्या मैफली ऐकल्या आहेत त्याच्यात केंव्हा ना केंव्हा तरी आलेले असेच सगळे चेहेरे मला दिसताहेत. मी व्यासांना सांगू इच्छितो की हे जे सगळे चेहेरे इथे आलेले आहेत ते तुमचा गौरव करायला आलेले नसून आपल्या मनातली कृतज्ञता व्यक्त करायला आलेले आहेत. " मनुष्य सगळ्यात सुंदर केंव्हा दिसतो?" असं जर मला विचारलं तर मी सांगेन की "त्याचा चेहेरा ज्या वेळेला कृतज्ञतेच्या भावनेने दाटून आलेला असतो त्या वेळेला !" कृतज्ञता हा फक्त मनुष्य प्राण्यालाच दिलेला गुण आहे आणि कृतघ्नता हाही. कारण इतरांच्या चेहेर्‍यावर ही कृतज्ञता फारच क्वचित दिसते. आणि ही कृतज्ञता कशासाठी ? जे कुणालाही वर्णन करता येत नाही असं एक कलेचं स्वरुप दिलं की ज्याचं वर्णन फक्त परमेश्वराच्याच बाबतीत शक्य आहे - निर्गुण आणि निराकार असं स्वरुप असलेला एक आनंद दिला.

भारतीय संगीताचे अनेक प्रकार आहेत. इथे जे गायलं गेलं ते भारतीय संगीतच आहे. त्याला निराळं "भारत" नाव देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण त्याचं पुष्कळ वेळेला "भरीत"ही होण्याचा संभव आहे. आणि एखाद्या गोष्टीचं वांगं होणं म्हणजे काय हे तुम्हाला महित आहेच. अर्थात व्यासांच्या हातून ते होणं शक्य नाही हे मला माहित आहे. परंतु ते जे गात होते किंवा पूर्वीचे लोक जे गात होते ते हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनामधे खदखदताहेत तेच सूर होते. दुसरं काय होतं ? मला भारतीय संगीताची गंमत वाटते की इथे वार्धक्यच नाही, जराच नाही. कल्पना करा की कसं वय लावायचं ? व्यासांना साठ वर्ष झाली म्हणून इथे आज आपण सत्काराला जमलेलो आहोत. त्यांना कुठली साठ वर्ष झाली ? त्यांना माहिती आहे का विचारा ? होणंच शक्य नाही. साठ वर्ष ही म्युनिसिपालिटीत किंवा सरकारात नोकरीला असलेल्या माणसाला होत असतात. कारण पुढे त्याला पेन्शनीचा वगैरे विचार करायचा असतो. इथे ज्यांच्या मनामधे गानसरस्वतीनेच मुक्काम ठोकलेला आहे ती त्यांना वार्धक्य जाणवूच कशी देईल ? जोपर्यंत व्यासांना गावंसं वाटतंय तोपर्यंत ते सोळाच वर्षांचे आहेत, साठ वर्षाचे नाहीत. माणूस थकतो केंव्हा ? "मला काही करावंसं वाटत नाही - कोणाशी बोलावंसं वाटत नाही" असं ज्या वेळी म्हणतो, त्यावेळी वीस वर्षाचा तरूण सुध्दा ऐंशी वर्शाचा झालेला असतो. आणि ज्या वेळेला वयाचा हिशेब विसरुन माझा आता शुध्द कल्याणाशी मुकाबला आहे, आता तो तुमच्या पुढे असा उभा करतो ... ही जिद्द ज्यावेळी राहते - ही गायनविद्येची जिद्द ही साठ वर्षाच्या कधीही म्हातार्‍या न होणार्‍या तपश्चर्येची जिद्द आहे - आणि तपश्चर्येला वय नसतं. आज लावलेला त्यांचा जो एकेक स्वर होता, तो त्यांच्या तपश्वर्येचा होता.

हे गायक लोक बैठकीमधे भूप वगैरे गायला लागले म्हणजे मला नेहेमी असं वाटतं की आज आपण आधुनिक जगात जगतो आहोत, आपल्याकडे रेडिओ आलेला आहे, टेलिव्हिजन आलेला आहे. अशा काळामधे एक भूप नावाचा राग दिड एक हजार वर्षांपूर्वी अशाच एका मैफिलीने ऐकला असेल आणि दाद दिली असेल आणि १९८४ साली सुध्दा त्याला दाद दिली जाते. ह्याच्यापेक्षा अजरामर असं दुसरं काय असणार ? चांदण्याला जसं मरण नाही तसं आमच्या रागांना मरण नाही. त्या निर्मितीचा कोणी अधिकारी नाही. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यच असं आहे की ज्यांनी भव्य दिव्य असं काही निर्माण केलं त्यांनी आपलं नाव तिथे कधीही ठेवलेलं नाही. ही निर्मिती "झाली" आहे अशीच त्यांची भूमिका आहे. एके काळी कुठेतरी मनामधे प्रकाश पडला तो प्रकाश मी लोकांना दाखवू शकलो हीच त्यांची भूमिका होती. म्हणून तुम्ही बघा, आपली जी लेणी आहेत ती कोणी खोदली, स्कल्प्टर अमूक अमूक किंवा पेंटर तमूक तमूक असं काहीही नसतं. ती पहायला गेलेले लोक तिथे आपली नावं लिहितात. संगीतातला कोणीही कितीही चमत्कार करो, काहीही करो - एक ऋण मानावंच लागतं. शिवकुमारांनी कितीही चांगलं वाजवलं, कुमार गंधर्व कितीही चांगले गायले तरी त्यांच्या मनात असतं की तो जो कोणी अज्ञात आहे, ज्यांनी हा राग तयार केला त्याचं मी तुमच्यासमोर मांडतो आहे, आमचे संत नेहेमी काय म्हणत आले ? "फोडिले भांडार धन्याचे मी तो हमाल भार वाही". "मी तो हमाल भार वाही" ह्या भूमिकेतून त्या भांडाराची किंमत ओळखून ज्यांनी तो डोक्यावर बाळगला त्यांनाच व्यासांसारखं कृतार्थ जीवन जगल्याचा आनंद मिळतो. ज्यांनी तो बाळगला नाही आणि माझं कर्तव्य आहे आणि मी केलं वगैरे म्हणायला लागले तेंव्हा त्यांच्यातला "मी" काही काळ लोकांच्या पुढे दिसतो - राग दिसतंच नाही. कोणाचं गाणं झालं असं कळल्याबरोबर आपण लगेच विचारतो -"काय गायले?". याचं चांगलं उत्तर मिळेपर्यंत कोणाचं गाणं झालं याला भारतीय संगीतामधे काहीही स्थान नसतं. सदारंग - अनरंगांची चीज गायले, अशी गायले की सदारंग आणि अनरंग दोघेही त्यांच्या कबरीमधे फिरायला लागले, असंही होतं. त्यात त्या नावाला काही अर्थ नाही. हे असं आहे की त्यांनी जो राग गायला घेतला तो निभावला कसा ?

भारतीय संगीताचं एकाने मला वैशिष्ट्य विचारलं होतं. पाश्चात्य संगीतातले लोक येतात आणि मग आम्हाला काही प्रश्न विचारतात. त्यांनी आपल्या संगीतात खूप रस घेतला आहे, त्यात तज्ञही झालेले आहेत यात शंका नाही. पण त्यातलाच एक उमेदवार होता. तो मला म्हणाला की "तुमचे गवई इतके हातवारे कशाला करतात ?". मी म्हणालो "तुमचा कंडक्टरसुध्दा हातात बॅटन घेऊन हातवारे कशाला करतो?" आमच्या गाण्यामधे कंडक्टर, कंपोज करणारा आणि गाणारा हा एकच मनुष्य असतो. त्याला तिन्ही भूमिका एकदम वठवाव्या लागतात. या तिन्ही भूमिका एकत्र करायच्या म्हणजे आमचं प्रत्येक गाणं हा त्रिवेणी संगमच असतो. निर्मिती करणारा, ती लोकांपुढे मांडणारा आणि स्वतःचं गाणं स्वतःच ऐकणारा श्रोता अशा तिन्ही भूमिका निभावून न्यायला लागतात. आणि हे कधी ऐकवू शकतात ? ज्या वेळी मनामध्ये संगीताचं गुंजन सारखं चालू असतं तेंव्हा. आणि तेच तुम्हाला तरुण ठेवतं. थिरकवा खांसाहेब वयाच्या ८०-८५ व्या वर्षी मला एकदा भेटले होते. त्यांची किती वर्ष झाली हे त्यांचं त्यांनाही माहित नसायचं. मी विचारलं "खांसाहेब, आपकी उमर क्या होगी?" "होगी सत्तर - अस्सी - नब्बे!" असंच सांगायचे. त्यांनी आयुष्यात हिशेब केला तो वयाचा नाही, पैशाचा नाही. त्यांनी हिशेब केला तो सोळा का दहा का सात मात्रांचा. एकदा तबला वाजवायला चालले होते. तर हाताला धरुन बसवताना मी म्हटलं "कुछ थकान नहीं मालूम होती ?" ते म्हणाले "बेटे, क्या बोल रहे हो ? थकान ? जब बजा लेता हूं घंटे -देढ घंटे, तो जवान हो जाता हूं!". जवानीसाठी मला वाजवायचं असतं. ह्यांच्याकडे इथे जवानीचं औषधच परमेश्वराने लिहून ठेवलं आहे. ज्याच्या गळ्यामधे सूर आहे तो म्हातारा होईलच कसा ? आणि गळ्यातला सूर जरी थकला तरी अंतःकरणात जी अक्षय्य वीणा वाजत असते तिचं काय करणार? आमचे मोठे मोठे गवई इथे बसलेले असतात. खूप वार्धक्यात मी मोठे गवई पाहिले आहेत. असे कानाला हात लावून बसलेले असताना एकदम "क्या बात है!". म्हटलं बुवा काय झालं ? "काय बागेश्रीतली जागा गेली बघ रे!". जागा एकदम आत गेलेली असते आणि अशी आत जागा जाण्याची ज्यांना सवय झालेली आहे तोच गवई होऊ शकतो.

क्लासात जाऊन क्लासिकल गाणं येतं ही समजूत चुकीची आहे. तुमच्या आतच ती तार लागलेली असावी लागते. त्याला काय करणार ? कलेच्या क्षेत्रामधे ट्यूशनला महत्व आहे तितकंच इंट्यूशनलाही महत्व आहे. दोन्ही पाहिजे. नुसती ट्यूशन असून चालत नाही. नुसती ट्यूशन असली तर प्रमाणपत्र मिळतात - "संगीतालंकार" अमूक अमूक वगैरे ! दोन तंबोरे जुळवता येत नाहीत. आधी एकच येत नाही तर दोन कसले जुळवता येणार ? त्याला काही अर्थ नसतो. इथे काय आहे की तुम्हाला काय येतं ते गाऊन दाखवा. "सुरसंगत रागविद्या जो कंठ करबत है". जो गाऊन दाखवतो, जो वाजवून दाखवतो - "वाकौ मानो" - त्यालाच माना ! बाकी आमच्यासारखे चर्चा करणारे लोक काय कामाचे ? भारतीय संगीताचं भवितव्य काय ? अरे कोणी सांगितलं वाईट आहे म्हणून? तुम्ही वर्तमान बघता का किती तेजस्वी आहे ते ? माझा जर इथे बसण्याचा एक कुठला अधिकार असेल तर ह्यांनी जितक्या निष्ठेने गाणं करण्याची मेहेनत केली तितकी आयुष्याची पंचावन्न वर्ष (आयुष्याच्या सातव्या आठव्या वर्षापासून म्हणा हवं तर ... मला जास्त वय झालेलं आठवलं तर झोप कमी येते बरं का!) मी गाणं ऐकण्याची तितकीच मेहेनत केलेली आहे. आम्ही ऐकणारे नसतो तर या गवयांना कुणी विचारलं असतं ? भगवंताचं महत्त्व भक्तांमुळे सिद्ध झालेलं आहे. उद्या विठ्ठलाच्या वारीला कोणी जायचं नाही असं ठरवलं तर भगवंताचे कटीवरचे हात कपाळाला जातील. त्याचं जे सगळं महत्व आहे ते भक्तांमुळे आहे, तुमच्यासारख्या रसिकांच्यामुळे आहे, आम्ही ऐकल्यामुळे आहे. आम्ही मिजासीने सांगतो की तुमची काय गाणं ऐकवायची तयारी आहे ? आम्ही म्हणतो "आम्ही फैयाझ खांसाहेबांना ऐकलं आहे, आम्ही वझेबुवांना ऐकलं आहे, आम्ही निवृत्तीबुवांना ऐकलं आहे, आम्ही मल्लिकार्जुन मन्सूरांना ऐकलं आहे, आज कुमारांना आणि व्यासांना ऐकतोच आहोत. इतकं साठवलंय आमच्या मनामध्ये .... त्यातलं कुठलं दार कधी उघडेल आणि आमची अंतर्वीणा सुरू होईल हे तुम्हाला कोणालाच सांगता येणार नाही.

असं टिकून राहिलेलं संगीत ह्या लोकांनी आम्हाला दिलं. या लोकांनी आम्हाला काय दिलं ? एक आनंद यात्रा घडवली. आपल्या भारतीय संगीताला सुंदर नाव दिलं आहे - "सुर संगत राग विद्या". ही रागविद्या आहे आणि म्हणूनच ती अशरीरी अशी आहे. तिला देह वगैरे आपण कल्पना द्यावी. तो आहे. तुम्ही कल्पना करा की शब्दातून सुध्दा त्याचे जे अर्थ प्रतीत होत असतात त्यांचं नातं आपण हळूहळू सोडत जातो. अगोदर बंदिशीसाठी आपण शब्द घेतो, व्यंजनं घेतो (काही वेळेस झनन झनन पायल बाजे वगैरे. मग कोणातरी तरुण माणसापुढे पायल वाजवणारी मुलगी - तो जितका नॉर्मल असेल - ते सारं असतं) पण होता होता आपण हळूच तो नाद सोडतो आणि त्या माणसाला कळण्यापूर्वीच - जसा टेक ऑफ कधी झाला ते कळत नाही - तसं एकदम टेक ऑफ होतो आणि एकदम रागाच्या दुनियमध्ये हिंडायला आपली सुरुवात होते. त्यावेळेस पायलही नसतात - झननही नसतं - असते फक्त एक लय आणि एक सूर ! ह्या दोन गोष्टींत आपला विहार सुरु होतो. हा विहार ज्याला साधला त्याला गाणं साधलं. ही क्षणाक्षणाला गाण्याची उत्कंठा वाढवायची कुठे तर या रागांच्या दुनियेत हिंडताना. आमचे हे सगळे गवई आम्हाला रागाच्या एका दुनियेमध्ये प्रवासाला घेऊन जातात ती एक आनंदयात्रा आहे. भीमपलासाच्या, यमनाच्या, बागेश्रीच्या दुनियेत घेऊन जातात आणि मग सांगतात - "हे पहा इथे कसा झरा वाहतो आहे, हे फूल कसं आलं आहे पहा .. आणि हे सगळे त्या प्रांतातलेच असतात. बागेश्रीत नवीन काय करायचं म्हणजे भीमपलासात शिरायचं नाही. बागेश्रीमधेच प्रवास करायचा आणि त्या अनोख्या जागा दाखवायच्या. तसल्या अनोख्या जागा कुमारांसारख्या लोकांना दिसतात तिथेच त्यांचं मोठेपण सिध्द होतं. आपण म्हणतो "अरे पन्नास वेळा मी या प्रदेशात आलो आहे, पण मला हे दृश्य दिसलंच नव्हतं ?" असं म्हणतो म्हणून तो बागेश्री आपल्याला नवा आणि चांगला वाटतो.

कलेच्या क्षेत्रामधे काही पाठांतर करणारे लोक असतात आणि काही निर्माण करणारे असतात. पाठांतरालाही किंमत आहे. उत्तम पाठांतर हे सुध्दा आवश्यक आहे. आपण सुरुवातीला जो वेदघोष ऐकला ते एका उत्तम पाठांतराचं लक्षण होतं. त्याच्या मधे आज दोन तीन हजार वर्षपूर्वींच्या लोकांचं विस्डम, ज्ञान, नादाची जी काय ताकद आहे ती सगळी साठवलेली होती. त्यालाही महत्त्व आहे. परंतु कलावंत त्याला म्हणावं जो निर्माता आहे. बा. भ. बोरकरांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलं आहे "देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे" हात सुंदर कुठले ? ज्यांना निर्मितीचे डोहाळे आहेत ते हात सुंदर. तो कलावंत सुंदरच दिसायला लागतो. असे कित्येक कलावंत मी पाहिले आहेत - पुरुष आणि स्त्रिया- की जे गाण्याच्या पूर्वी नुसते येऊन बसलेले असतात (याला आता तीन तास बघावं लागणार का किंवा हिला ! विशेषतः "हिला" च्या वेळेला मनाला जास्त त्रास होतो). पण तुम्हाला सांगतो, सूर जर तिथे बरोबर लागला आणि त्या रागाचं स्वरुप दिसायला लागल्यानंतर तीच व्यक्ती मोहक - सुंदर सगळं काही दिसायला लागते. सूरच ही दाद देत असतात. त्याच्यातली एकाग्रता नेहेमीच सुंदर दिसत असते आणि भारतीय संगीताला या एकाग्रतेची सगळ्यात अधिक गरज आहे. कारण प्रत्येक क्षण हा नवा असतो. आणि प्रत्येक क्षण हा तितक्याच उत्कटतेने लोकांच्यापुढे द्यायचा असतो. सहज आपलं जाता जाता काहीतरी केलं असं चालतच नाही. याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षणाला तुम्ही नवीन टेन्शन मानता. प्रत्येक क्षणाला नवीन निर्मिती करत असता. ही तुमची नवी निर्मिती पाठांतरीत आहे अशी लोकांना शंका आल्याबरोबर ते उदास व्हायला लागतात. ते मैफिलीत असून सुध्दा कान बाहेर हिंडायला लागतात, आणि म्हणून ती निर्मिती नवीन आहे म्हणूनच उत्कंठा वाढवणारी असते.

अहो हे गवई काय करतात ? काही करत नाहीत. अगोदर षड्ज लावतात, मग गंधार लावतात. गंधारावर गेला रे गेला की सर्वांना उत्कंठा की आता हा कुठे चालला ? आपल्याला वाटत असतं की हा अमका एक राग आहे तेंव्हा हा षड्जावर येणार ही आपली अपेक्षा असते. पण तो चटकन पंचमावर जातो, म्हणजे अपेक्षाभंगाचाही आनंद आणि अपेक्षापूर्तीचाही आनंद. हा आनंद इतका सुंदर आहे की शृंगारामधे जसं "प्रेम करते" म्हटलं तरी आनंद आणि "चला" असं म्हटलं तरी आनंदच आहे. आता तिथे जर एखाद्या क्लासात शिकलेल्या मुलाने "चला" याचा अर्थ "उठून चालते व्हा" असा घेतला तर काय करणार ? त्यावेळेला "चला" याचा अर्थ "या" असा असतो. "बसा" असा असतो (हे विद्याधर गोखले जवळ बसले आहेत म्हणून मी असं बोलायला लागलो. म्हणजे व्यासांचा आणि कुमारांचा परिणाम होण्याऐवजी त्यांचा परिणाम माझ्यावर जास्त झाला आहे. आम्ही दोघे नाटकवाले आहोत, दुसरं काय?) पण आज मात्र मी नाटकातलं काहीही करत नाहिये. कारण तिकिट लावल्याशिवाय मी काहीही करत नाही. त्यामुळे व्यासांच्याबद्दल जे काही मनापासून सांगायचं तर व्यासांनी ही साधना केली (आणि साधना केली हा सुध्दा चुकीचा शब्द आहे. साधना - तपश्चर्या म्हटलं की मला भयंकर राग येतो) ही साधना - तपश्चर्या नाहीच. आईला कधी वाटतं का की मी मुलाची सेवा केली म्हणून ? मुळीच नाही. ते मूल काही घेत नाही म्हटल्यानंतर ते पहिल्यांदा ज्यावेळेस खुदकन हसून घेतं, त्याच्यासाठी तिचा जो तास-दीड तास गेलेला असतो त्याचं सार्थक झालं हाच तिला आनंद असतो. गाताना ज्या माणसाला कंटाळा आला त्याने गाणं सोडून राजकारणात शिरावं. तिथे बेसूर लोकांची फार आवश्यकता आहे. कारण तिथे सुराला सूर न जमणं यालाच महत्व आहे. सूर जमणं याला महत्वच नाहिये. मग स्थान जातं. तेंव्हा अशा ठिकाणी ठिकाणी, ज्या वेळेला एका सुरामधे, एका रसामधे मनुष्य राहतो तेंव्हा त्याला कष्ट कुठले ?

मला तुम्ही सांगा, व्यासांचा आपण काय गौरव करणार ? त्यांना तो राग गाताना मिळालेला जो आनंद आहे त्याच्या एक शतांश तरी गौरवाचे शब्द आम्ही त्यांना देऊ शकू का ? तेवढी आमची ताकद कुठे आहे ? त्यांचा तो स्वर - वरचा षड्ज लागला आणि वरची मैफल जमली की त्या आनंदात त्यांना अंतर्स्नान घडतं. अशा प्रकारचं स्नान घडून जे शुध्द होतात त्यांना तुम्ही आणखी काय देणार ? कुठला अलंकार घालणार? आपल्याला फक्त एकच वाटतं की आपण काहीतरी करुन आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून आपण अशा प्रकारचे समारंभ करतो. दुसरी त्यांची कृतज्ञता अशाबद्दल की ही विद्या त्यांनी जशी ठिकठिकाणाहून घेतली तस तशी ही विद्या देण्याचं कार्य त्यांनी चालू केलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. भारतीय संगीतावर जुन्या काळातल्या लोकांचे जसे उपकार आहेत तसेच त्यांनी त्यांच्या काही अडाणी समजुतींमुळे अपकारही करुन ठेवले आहेत. चिजा चोरुन ठेवायच्या, रागाचं नाव सांगायचं नाही ... असल्या प्रकारचा मूर्खपणा केला. ते एक अडाणीपणाचं लक्षणही आहे आणि काही प्रकारचे व्हेस्टेड इंटरेस्टही होते. कारण त्यांची मुलं त्यांना गवई म्हणून तयार करायची होती. म्हणून तीच चिज जर तिसर्‍या मुलाला आली तर ह्याला एक काँपिटिटर उभा राहतो अशा प्रकारची ही भावना होती. गुरुच्या सेवेबद्दल वगैरे सांगतात. पण प्रत्येक गुरु सेवा करण्याच्या लायकीचा असतोच असे नाही. गुरु विद्या शिकवतो याचा अर्थ जो विद्या शिकवतो तो गुरु असतो असा नाही. कॉन्व्हर्स इज नॉट ट्रु. त्यालाही एक अधिकार लागतो. तो अधिकार एकमेव अधिकार असतो की गुरु हा आयुष्यभर जर शिष्याच्या भावनेने जगत असला तरच तो उत्तम गुरु होतो आणि व्यासांचं मला सगळ्यात कौतुक वाटतं की आजही त्यांचा नवा शोध चालू आहे. नवीन कार्यक्रम बसवायचा आहे, नवीन राग तयार करायचे आहेत, नवीन शिष्य तयार करायचे आहेत. व्यास - गिंडे वगैरे मंडळींनी आपलं जे रागचक्र फिरत असतं त्यावर "रागमाला" नावाचा कार्यक्रम केला आणि रागांचं एक अप्रतिम दर्शन लोकांना घडवलं. असं काही घडवलं पाहिजे, अजून काही तरी दिलं पाहिजे ही जी आंच आहे ती आंचच त्यांना तगवून ठेवणार आहे. आणि ही आंच आहे म्हणूनच आपल्या सगळ्या लोकांना वाटतं की साठ वर्ष म्हणजे काय काहीच झालेलं नाहिये, अजून पुष्कळ व्हायचं आहे.

वय हे मनाला असतं. शरीराला वय असतं असं मला वाटत नाही. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. पंडित सातवळेकर होते - ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं. त्यांना जेंव्हा शंभरावं वर्ष लागलं तेंव्हा मला असंच वाटलं की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या पायावर नमस्कार करुन यावं. म्हणून मी पारडीला गेलो. शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. आजारी असतील, आपण दोन मिनिटात नमस्कार करावा,बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं तपासत बसले होते. तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते. मी नमस्कार वगैरे केला. मला म्हणाले "मी वाचलं आहे तुमचं". मी घाबरलोच एकदम. "असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा" असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पं. सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे - म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं. ते म्हणाले "आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या तरुण पोरांना माहित नाहीत ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात पुढली आठ-दहा वर्ष जातील". शंभराव्या वर्षी पुढल्या आठ-दहा वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता. पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं. व्यासांना - कुमारांना हा प्रश्नच पडत नाही. तुम्ही जगताय कशासाठी ? माझ्या दोन तंबोर्‍यांना विचारा - मला कशाला विचारताय असंच ते म्हणतील. असं प्रयोजन ज्यांना सापडलं अशी माणसं फार थोडी असतात. बाकी आपण गतानुगतिक नेहेमीच्या चाकोरीतून जाणारे. त्यांना संजीवन त्यांची विद्याच देत असते. दुसरी काही गरज त्यांना लागत नाही.

आपण बघतो की आज संगीताचे इतके प्रकार चालू असतात. आपल्याला असं वाटतं की काल आलेलं गाणं आयुष्यभर सगळा भारत येवढंच गाणं गाणार आहे. परंतु एक महिन्यात त्या गाण्याचं आयुष्य संपलेलं असतं. आणि "फुलवन सेज सवारो" मी माझ्या लहानपणापासून ऐकतो आहे आणि मला खात्री आहे की माझा खापरपणतू सुध्दा त्याच्या लहानपणी ते ऐकणार आहे. ही जी एक भारतीय संगीतातली चिरंजीविता आहे ही चिरंजीविता ज्यांनी ओळखली त्या माणसांना आपल्याला हे किती उंच चढायचं आहे हे लक्षात येतं. आणि ते का चढायचं ? आपल्याला चढायला - तिथे जायला आवडतं म्हणून चढायचं. दुसरं काही नाही. ह्याचा फायदा काहीही नाही. फायद्याच्या तत्वज्ञानाचं आजचं जे जग आहे त्याच्यात यातला कोणीही माणूस बसत नाही. भूप गाऊन फायदा काय ? काहीही नाही. मी एक गोष्ट नेहेमी सांगतो. आपल्यापैकी कोणी ऐकली असेल. पुण्याला बालगंधर्व थिएटर बांधत होते. (पुण्यातच ते थिएटर असल्याने विरोध वगैरे होताच. आणि मीही पुण्यातलाच असल्याने तो तसा होणार याचीही मला खात्री होती. त्यामुळे तशी काही भीती नव्हती. पण त्याचप्रमाणे आमच्या बाजूनेही पुष्कळ लोक होते). तर एके दिवशी सकाळी एक म्हातारे गृहस्थ आमच्या घरी आले आणि मला म्हणाले "अहो, म्हणे एवढे काहीतरी पंधरा वीस लाख रुपये खर्च करुन थिएटर बांधणं चाललं आहे, काय फायदा त्याचा?" मी म्हटलं "अहो, चार नाटकं होतील. चांगले कार्यक्रम होतील". परत ते म्हणाले "पण त्याचा काय फायदा?". मी म्हटलं "अहो, असं बघा. त्या थिएटरच्या समोरच झांशीच्या राणीचा पुतळा आहे. तो घोडा टांग्याला सुध्दा लावता येत नाही. काय फायदा त्याचा ? त्यानंतर त्या सारस बागेत गेलात तर त्या गणपतीच्या सभोवती लाखो फुलं फुललेली असतात. काय फायदा त्याचा ?" मग मी विचारलं "आपलं वय काय?". ते म्हणाले "शहात्तरावं चालू आहे". मी म्हटलं "काय फायदा?". म्हणून गाणं हाच गाण्याचा फायदा. तो आनंद हाच फायदा. दुसरा इथे हिशेब नाही. आणि आजच्या फायद्याच्या जगाला हे तत्वज्ञान कळत नाही. नव्या जगाचा जर सगळा प्रयत्न चालला असेल तर तुम्हाला गिर्‍हाईक तरी करायचा किंवा मतदार तरी करायचा. हा प्रयत्न चाललेल्या काळात मला नवी चिज पाहिजे म्हणून धावणारे हे वेडे पीर गुरुची सेवा करता करता स्वतः साठ वर्षाचे होऊनही त्यांना विचारलं तर हेच कळेल की "नाही रे बाबा, अजून काही लक्षात आलेलं नाही, अजून अंत लागत नाही" हेच आहे. अजून पुष्कळ पुढे जायचं आहे. हे राग क्षितिजा सारखे आहेत. इथे आहेत असं वाटतं तर पुढे जावं लागतं. संपतच नाही. तिरखवां खांसाहेबांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी एका रात्री अप्रतिम तबला वाजवला. मला राहवेना म्हणून मी त्यांचे हात असे हातात घेतले आणि बघतो तर अगदी मुलायम हात. मी म्हटलं "खांसाहेब, आपके हाथ कितने मुलायम है?" ते म्हणाले "तो क्या हो गया ?". मी म्हणालो "नही, आपने जिंदगीभर इतना तबला बजाया !" त्यावर खांसाहेब म्हणाले "अरे बेवकूफ, मैने तबलेसे झगडा थोडेही किया ? मैने तबलेसे प्यार किया. बेटे, किसी सुंदर लडकी के गालोंपर हाथ फिराते हो तो हाथ थोडेही खराब होते है?". एवढं सगळं सांगितलं पण पुढचं फार महत्वाचं आहे. मला म्हणाले "मगर एक बात सुनो, अभी अभी त्रितालेका अंदाजा आ रहा है". वयाच्या ऐंशीव्या वर्षी तो मनुष्य सांगतो की मला त्रितालाचा आत्ता कुठे अंदाज यायला लागला आहे. या रागांचा वाह्यातपणा हाच आहे. सगळा राग आला असं वाटत असतानाच तो लांबा जाऊन उभा रहातो. "स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला" असं म्हटलंय ना, त्याप्रमाणे हा राग कुठेतरी दशांगुळे उरलेला असतो. तो पुन्हा तुम्हाला खुणावायला लागतो आणि परत त्याच्याकडे धावावं लागतं. "विठो पालवीत आहे" असं म्हटलंय तसे हे राग "पालवीत" आहे याचा साक्षात्कार ज्यांना झाला तेच गवई व्यासांसारखे मोठे होतात आणि अशा गवयांचे आपण कृतज्ञतेने सत्कार करत असतो.

साठाव्या वर्षी मी यांना काय आशीर्वाद देऊ ? मी ह्यांच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठा आहे आणि माझ्याप्रमाणेच त्यांचाही जन्म नोव्हेंबर महिन्यातच झालेला आहे (फार मोठी माणसं या महिन्यात जन्माला येतात !!) तर मी एवढंच म्हणतो की व्यासांच्या यापुढच्या आयुष्यामधे त्यांचा तंबोरा अखंड वाजत राहो, ते वातावरण त्यांच्या घरामध्ये राहो आणि आपण सतत गात राहिलं पाहिजे अशा प्रकारे वाटण्याची मनाची स्थिती आणि त्या मनाच्या अवस्थेला शरीराची साथ ही दोन्ही लाभावीत अशा प्रकारची इच्छा प्रदर्शित करतो. मला आपण फार मोठा मान दिलात. आमच्या विद्याधर गोखल्यांनी मला "व्हाईसरॉय" वगैरे करुन टाकलं (म्हणजे जी स्थानं आता उरलीच नाहीत त्यातलं एक स्थान देऊन टाकलं !) तर त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि मला आपण हा फार मोठा मान दिल्याबद्दल मी खास माझीही कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो.
-- पु. ल. देशपांडे