पु. ल. देशपांडे
हो, मीही पु. ल. देशपांडे यांना ओळखत होतो, ते महाराष्ट्राचे ‘लाडकं व्यक्तिमत्व’ होण्यापूर्वीपासूनच. मी नाटककार, लेखक, नट, गायक, वादक नसून देखील आमची ओळख झाली. कारण मी त्यांचा विद्यार्थी होतो. पुलंनी अनेक नोक-या केल्या, त्यात दादरच्या ओरीएंट हायस्कूलमधली एक नोकरी शिक्षकाची होती. हे आमचे भाग्य होते. ही नोकरी त्यांनाही लाभदायक ठरली. पुलंची पत्नी सौ. सुनीताबाई म्हणजे पूर्वाश्रमीच्या कु. सुनीता ठाकूर यांची गाठ पडली ती याच शाळेत. आम्ही त्यांना ठाकूरबाई म्हणत असू व पुलंना देशपांडे सर. ते साल होते १९४४. मी त्यावेळी इंग्रजी सहावीत ( आत्ताची दहावी ) होतो. देशपांडे सर आम्हाला इंग्रजी शिकवीत. ठाकूरबाई पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवीत. दोघेही कलासक्त. दोघांनाही नाटक, संगीताची आवड. याशिवाय ठाकूरबाईंना नृत्याची चांगली जाण होती हे विशेष.
गौरवर्ण, सरळ नाक, हसतमुख चेहरा, उंची बेताचीच असली तरी ठुसठुशीत बांधा, कोकणी हेल असला तरी लाघवी बोलणे, संपूर्ण खादीच्या वेशात त्या दिसायच्या. १९४४ साली ज्यांनी ठाकूरबाईंना पहिले असेल, त्यांना ते पटेल. पुलंना हे पटले म्हणून ते ठाकूरबाईंवर इंप्रेशन मारायला त्यांच्या अवतीभवती असायचे. ठाकूरबाईंचे मामा, पाटकर सर हे आमचे ड्रॉइंग टीचर होते. त्यांच्याच ओळखीमुळे ठाकूरबाई आमच्या शाळेत आल्या होत्या. हे पाटकर सर शाळेच्या गॅदरिंगसाठी छान नृत्यनाटिका बसवीत असत. स्वातंत्र्यापूर्वीचे ते दिवस. इंग्रज आमचा छळ करताहेत, आपण त्यांना प्रतिकार करतो आहोत, भारतमाता किंवा देव प्रसन्न होतो व आपल्याला स्वातंत्र्य मिळते, अशा प्रकारची सुखांतिका हा नृत्यनाटिकेचा विषय असायचा. या नृत्यनाटिकेत मी ‘चर्चिल’ म्हणजे खलनायक झालो होतो. ठाकूरबाई ‘पार्वती’ झाल्या होत्या. मॅट्रिकमधला एक देखणा विद्यार्थी ‘शंकर’ झाला होता. पार्श्वसंगीताची चाल देण्यासाठी पुल तालमीच्यावेळी येत असत. या चाल देण्यामागे पुलंची काय चालबाजी होती हे समजण्याचे आमचे वय नव्हते. पण दोघांनी एकमेकांकडे चोरून पाहणे, बोलण्याचा प्रयत्न करणे जाणवत असे.
या नृत्यनाटिकेचा प्रयोग गोवालिया टॅंक मैदानावर झाला. ठाकूरबाई पार्वतीच्या भूमिकेत इतक्या सुंदर दिसत होत्या की ख-या पार्वतीलाही त्यांचा हेवा वाटावा. अर्थात पुल या प्रयोगाला हजर होते. टाळ्यांच्या गजरात एक टाळी त्यांचीही होती.
या नृत्यनाटिकेच्या वाद्यवृन्दात व्हायोलिन वाजवायला श्रीकांत ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे वरच्या वर्गात होते व श्रीकांत ठाकरे खालच्या वर्गात होते. माझ्या चर्चिलच्या भूमिकेत मला चिरूट ओढायचा होता. एरव्ही तालमीच्या वेळी मी चिरूट म्हणून पेन किंवा पेन्सिल तोंडात ठेवायचा. पण प्रयोगाच्यावेळी मला कुणीतरी चिरूट आणून तो शिलगावून दिला. रंगमंचावर चिरुटाचे एकदोन झुरके घेऊन हवेत धूर सोडला. भूमिका खरीखुरी वाटली पाहिजे ना ! पण क्षणभरात रंगमंच गरागरा फिरतो आहे असा भास होऊ लागला. मी चक्कर येऊन पडणार असे वाटू लागले. कसाबसा रंगमंचाच्या दुस-या टोकाला पोचलो. उलटी झाली तेव्हा बरे वाटले. चर्चिलची ही इतकी एकच एंट्री होते म्हणून निभावले.
त्या वर्षी ओरिएंट शाळेच्या शिक्षकांनी मामा वरेरकरांचे ‘सत्तेचे गुलाम’ हे नाटक बसवले. पुल कान्होबा व ठाकूरबाई क्षमा. पुढल्या वर्षी ( १२ जून १९४६ ) त्यांचे लग्न झाले. त्यांचे कोर्टींग पाहाण्याचे थोडेफार भाग्य आम्हाला लाभले.
इतर शिक्षकांहून पुल वेगळे होते. त्यांचे वेगळेपण जाणवायचे. आजही आमच्या वर्गावरील त्यांचा पहिला तास आठवतो. चौकडीचा शर्ट,भु-या रंगाचा कोट, शर्टची कॉलर बाहेर काढून कोटाच्या कॉलरवर बसवलेली, काच्या मारलेले धोतर, पायात कोल्हापुरी चपला. पुल कधी वुलनची ढगळ पॅन्ट घालून येत. वर्गातील टारगट पोरांना लगेच शेरा मारण्याची हुक्की यायची, “सर, आज भावाची पॅन्ट घालून आलेत. ठाकूरबाईंवर इम्प्रेशन मारायला ! ” त्याकाळी बहुतेक शिक्षक धोतर नेसत आणि फार थोडे पॅन्ट घालीत. धोतरावर बूट किंवा पॅन्टवर चपला असल्यास त्यात वावगे वाटत नसे. पॅन्ट मात्र टांगेवाल्यासारखी आखुड असे.
शाळेच्या गणेशोत्सवात पुलंच्या गाण्याचा कार्यक्रम असे. त्यांचा आवाज गोड नसायचा, पण गाणे ठसक्यात होई व प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळे. आमचे ड्रिलमास्तर खूष होऊन कार्यक्रमात पुलंसाठी एक कप ‘पानी कम’ चहा मागवीत व तो सर्वांसमक्ष पुलंना प्यायला लावीत. ( ‘कटिंग’ हा शब्द त्याकाळी अस्तित्वात नव्हता. )
पुल आम्हाला इंग्रजी शिकवायचे. हे म्हणजे सोनाराने लोहाराचे काम करण्यासारखे. पण ते त्यांना जमले. ” नव्या शिक्षकाचे कपडे पाहण्याऐवजी धड्याकडे लक्ष द्या. आता सांगा बरं ‘जजमेंट’चं स्पेलिंग ? ” सगळ्यांची विकेट उडाली. ‘जजमेंट’च्या स्पेलिंगमध्ये ‘जी’ नंतर ‘ई’ नसते. ‘कोको’ च्या स्पेलिंगमध्ये शेवटी असलेले ‘ए’ अक्षर ‘कोकोनट’ लिहिताना गायब होते हे त्यांनी त्यावेळी सांगितलेले आजही आठवते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, सिनेतारका कामिनी कदम ( माणिक मुदलीयार ), ‘अमरचित्रकथा’चे अनंत पै, बॅडमिण्टनपटू बोपर्डीकर, शास्त्रज्ञ बाळ गोठोस्कर, सत्यकथेचे संपादक राम पटवर्धन, अभिनेत्री रतन किनरे, अशा पुढे प्रसिद्ध पावलेल्या अनेक व्यक्ती त्याकाळी त्यांचे विद्यार्थी होते. पोवाडेगायक शाहीर पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर, कवी प्रफुल्लदत्त, प्रो. जी. एन. नाबर हे त्याकाळी असलेले पुलंचे सहाध्यापक.
पुल पेटी छान वाजवीत. कधी सोलो तर कधी स्वतः भावगीत म्हणत पेटी वाजवायचे. दुसरे एक शिक्षक शास्त्रोक्त संगीत गात. त्यांचा आवाजही गोड होता ; गाण्याची तयारीही भरपूर होती. पण त्यांच्या पीळदार गाण्यांहून आमची पसंती असायची पुलंचे गाणे बजावणे. कारण त्यांच्या गाण्यात सहजता, माधुर्य व खुमारी असायची. ठेक्याबरोबर ठसका असायचा.
त्यावेळी पुलंचे वय सुमारे पंचवीस असावे ; पण या वयातही पुलंचे अनेक गुण प्रकर्षाने जाणवत असायचे. गायक, वादक, लेखक, नट, विनोदकार असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसत होते. पुढे पुल सिनेमात गेले, त्यांची नाटके गाजली, एकपात्री प्रयोग गाजले. त्याचबरोबर त्यांचा दानशूरपणाही भावला. हे सर्व नंतरचे. ‘पुरुषराज अळुरपांडे’ या नावाने त्यांचे लेख बडोद्याच्या ‘अभिरुची’मासिकात यायचे. ‘माझे घर’ , ‘वहिनी’, या नाटकात त्यांनी कामे केली. जे जे पुल करीत त्याचे आम्हाला कौतुक वाटायचे ; अभिमान वाटायचा. आजही वाटतो. अशा ग्रेट माणसाचे आपण एकेकाळी विद्यार्थी होतो हे छाती फुगवून सांगतो.
***
पुलंनी शब्दांवर, सुरांवर व माणसांवर प्रेम केले. साहित्यावरही तितकेच प्रेम केले. पुल ओरिएंट शाळेत येण्यापूर्वी तेथे नाटक किंवा साहित्यावरील कोणताही कार्यक्रम होत नसे. पुल आले आणि चैतन्य अवतरले.
आपण पुलंचा विनोद वाचून सुखावतो खरे; पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला चकाकी आली ती त्यांच्या परिश्रमामुळे. त्यांचे पाठांतर जबरदस्त होते. इंग्रजी, मराठी व संस्कृत उतारे ते धडाधड म्हणून दाखवीत. आम्हालाही ते इंग्रजी उतारे पाठ करायला लावीत. त्याना वाचनाची खूप आवड असायची. ते सांगत, ” मुलानो, वाचन, पाठांतर याच वयात होतं शक्य होईल तितकं वाचा. ” आम्हाला पेलतील अशी त्यांनी काही पुस्तके सांगितली. त्यात गोरा, दि रेक, पिक्विक पेपर्स अशा अनेक सदाबहार पुस्तकांचा समावेश होता. पी. जी. वुडहाउस त्यांचे आवडते लेखक. त्यांनी दिलेली यादी लक्षात राहिली हे खरे, पण ती पुस्तके वाचून काढणे आम्हाला जमले नाही हेही तितकेच खरे.
पुलंच्या विनोदाला कारुण्याची किनार आहे. ती त्याकाळी देखील होती. त्यांना दीनदुबळ्याविषयी, गरीबांविषयी कणव होती. पण भीक मागणे हा धंदा कसा होतो हे ते सांगत. पद्धतशीर नवजात बाळाच्या डोळ्यांना शिंपले बांधून त्याला आंधळा बनवायचे किंवा मनगटाला करकचून दोरा बांधून त्याला लुळेपांगळे बनवायचे यात अशा मुलांना अधिक भीक मिळावी हा दुष्ट हेतू असतो हे त्यांनी त्याकाळी आम्हाला सांगितले होते. ‘तीन पैशांचा तमाशा’ या त्यांच्या नाटकाचा ‘जर्म’ तेव्हापासून त्यांच्या मनात घोळत असावा.
माझी व पुलंची विशेष जवळीक नव्हती. अलिबाबाला चाळीसाव्या बुधल्यात बसणा-या चोराची जितकी ओळख असेल तितकीच पुलंना माझी ओळख होती. कारण मीही वर्गातल्या चाळीस विद्यार्थ्यांतील एक होतो. नंतरच्या काळातही ओळख वाढणे शक्य नव्हते ; कारण त्यांच्या व माझ्या व्यवसायाचे नाते हे विळ्याभोपळ्यासारखे होते. पण तो काळ वेगळाच होता. आमच्यात ‘सखाराम गटणे’ संचारलेला असायचा. त्यामुळे आमच्या शिक्षकांच्या प्रत्येक कृतीचे आम्हाला कौतुक वाटत राहिले. पुलंची भाषणे, रेडियोवरील कार्यक्रम, मैफली, नाटके, एकपात्री प्रयोग, सिनेमे, त्यांनी लिहिलेली पुस्तके हे सर्वच आम्ही खूप उत्कंठतेने पाहिले, ऐकले,वाचले. ‘असा मी असा मी’ चा पहिला [प्रयोग पाटकर हॉलमध्ये पहिल्या रांगेत मधल्या सीटवर बसून पहिला. ( दहा रुपयांचे महागडे तिकीट काढून. ) त्यांनी लिहिलेली पुस्तके व नाटके इतक्या वेळा वाचली की त्यातील संवाद आपोआप पाठ झाले. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने वाचून प्रवास केला. त्यांची सरकत्या पट्टीची संवादिनी पाहून मीही तशी एक कलकत्त्याहून आणली; पण ती न वापरल्यामुळे आता तिची सूरपेटी झाली आहे. भाता मारला की तीतून एकाच वेळी अनेक सूर बाहेर पडतात. प्रीती, भक्ती असणे योग्यच, पण म्हणून त्या व्यक्तीचे प्रत्येक बाबतीत अनुकरण केले की अशी फसगत होते.
पुलंच्या साहित्याविषयी मी लिहायचे म्हणजे फौजदाराला डी एस पी चे काम करायला लावण्यासारखे ( हा त्यांचाच जोक. ) पुलंची पुस्तके वाचतांना, नाटके पाहताना लाजवाब विनोदामुळे आपण मनसोक्त हसतो, सुखावतो हे खरे असले. तरी मध्येच त्यातून त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान दिसते; हसता हसता कुठेतरी दुःखाची खपली आढळते; अतिशयोक्तीच्या धबधब्यात कुठेतरी त्रिकालाबाधित सत्याचे तुषार दिसतात; मिश्किलतेच्या ओघात निर्मळ माणुसकीचे दर्शन घडते. त्यांनी रेखाटलेली पत्रे आपण कुठेतरी पाहिली आहेत असे वाटते. कधीकधी आपणच त्यातले एक आहोत असे जाणवते. त्यांचे चिंतनशील उतारे आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात; आपले आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात.
पुलंची दृष्टी कलावंताची आहे. प्रवासवर्णनात टोकियो टॉवर बांधायला टन लोखंड लागते हे लिहून ते आपल्या ज्ञानात भर घालीत नाहीत. किंवा पॅरिसच्या निशागारात आपण किती धुंद झालो होतो हेही ते सांगत नाहीत. पाश्चात्य कलावंतांच्या संगतीत ते कसे धुंद झाले याचे वर्णन इतक्या रसाळपणे करतात की वाचकही त्या धुंदीत पूर्ण बुडून जातो.
पुल काही नवीन सांगतात असे नाही. नेहमीची माणसे, नेहमीचे प्रसंग शब्दात पकडून आपल्या समोर अशा रीतीने मांडतात की ते हृदयाला भिडतात. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील नारायण आपल्याला परिचयाचा वाटतो. प्रत्येकाच्या घरी लग्नकार्याच्या वेळी असा कुणी नारायण उपटतो. लग्नसमारंभ संपल्यावर मांडवात कुडकुडत एकटाच झोपलेला नारायण, सतत अवहेलना पदरात पडलेला नानू शिंगणापूरकर, कमालीचे प्रेमळ चितळे मास्तर, विश्वेश्वराच्या अंगा-याची पुडी देणारे अंतू बर्वा मंडळी पुस्तकातून भेटतात तेव्हा ओठावर हसू फुटते व डोळ्यात पाणी उभे राहते. यावरून कळते की पुलंनी केवळ हसविण्यासाठी आपली लेखणी झिजवलेली नसून माणसातली माणुसकी दाखविण्यासाठी ती वापरली आहे.
पुलंच्या विनोदात उपहास दडलेला असतो. समाजातील दांभिकता, शोषण, फसवणूक पाहून त्यांना गप्प बसवत नाही. ‘असा मी असा मी’ मध्ये ते गुरुदेव संप्रभवानंद स्वामीवर तुटून पडतात ; ‘मी झोपतो करूनी हिमालयाची उशी’ म्हणणा-या नानू सरंजामे या नवकवीची थट्टा करतात; ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकात अतिविशाल महिला मंडळाची खिल्ली उडवतात, ‘वा-यावरची वरात’ नाटकात सामाजिक संस्थांवर कोरडे ओढतात; ‘विठ्ठल तो आला’ नाटिकेत मान्यवर व्यक्तींचा क्षुद्रपणा व ढोंगी स्वभाव दाखवतात, ‘तर तीन पैशांचा तमाशा’ या नाटकात ईश्वरी अवतारासंबंधीच्या भाबडेपणावर हल्ला करतात. हास्यरसाबरोबर पुलंनी विचारांचे टॉनिक दिले आहे.
पुल इतरांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे होते. चांगले – वाईट त्यांना चटकन कळत असे. कधी आवर घालायचा, कधी थांबायचे हेही त्यांना कळत असे. ‘राजमाता जिजाबाई’ असो, ‘वटवट’ असो की ‘वा-यावरची वरात’ असो; प्रेक्षकांना कंटाळा येईपर्यंत ते कुठेच रेंगाळत राहिले नाहीत. नाटकाचे मानधन वसूल करणा-या, कोणत्याही संस्थेला आपल्या नाटकाच्या बिदागीत सवलत न देणा-या पुलंनी अंध- अपंगांच्या संस्था, व्यसनमुक्तीच्या संस्था, कुष्ठधाम, रुग्णालये यासाठी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या; त्या देखील कुठेही वाच्यता न करता !
पुल एखाद्या फाटक्या माणसावर प्रेमाचा वर्षाव करीत, तर साहित्य, राजकारणातील शुक्राचार्याला देखील वाग्युद्धात सपशेल लोळवीत. संतांविषयी आदर बाळगीत , पण देवदेव करणा-यांची व कर्मकांडात गुंतणा-यांची रेवडी उडवीत. आपल्या विनोदाने हसवीत व कारुण्याने डोळ्यात अश्रू उभे करीत. असे हे पुल ‘ग्रेट’ होते.
***
पुलंचे साहित्य वाचतांना पुल हे रमी, फालतू गप्पा, गाण्याच्या मैफली, नाटके, पुस्तके, सिगारेटी, चहा व मित्र यांच्यात रमणारे असे वाटत असले तरी ते ‘टास्कमास्टर’ होते याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे. नाटकाच्या तालमीला कुणी उशीरा आलेले त्यांना खपत नसे. कुणी आपल्या घराला ‘श्रमसाफल्य’ हे नाव दिले तर त्यावर विनोद करणारे पुल आपल्या प्रत्येक कृतीत साफल्य मिळण्यासाठी श्रमांची पराकाष्ठा करीत. पुल कसे ‘परफ़ेक्शनिस्ट’ होते याचा एक किस्सा आठवतो. ‘असा मी असा मी’ या एकपात्री प्रयोगाची सुरुवात तीन एक मिनिटांच्या स्वगताने होते. हे स्वगत अंधारात ऐकायला येते. याचे रेकॉर्डींग पार्ल्याला केले. ते मानासारखे झाले नव्हते म्हणून भुलाभाई ऑडीटोरियममध्ये पुन्हा केले. त्यावेळी ते मुंबईत प्रभादेवी नजीकच्या सेंच्युरी बझारच्या समोर ‘आशीर्वाद’ इमारतीत राहत होते. त्यांच्या शेजारी त्यांचे मेव्हणे डॉ. श्रद्धानंद ठाकूर राहत असत. डॉ. ठाकूर आमचे स्नेही. त्यांच्या घरी आम्ही रात्री जमलो होतो. एवढ्यात तेथे पुल व सुनीताबाई आल्या. त्यांच्याकडून कळले की ते दिवसभर वरील रेकॉर्डींग करण्यात व्यस्त होते. मी पुलंना सहज विचारले, “सर, तीन मिनिटांच्या रेकॉर्डींगला इतका का वेळ लागतो ? ” ते म्हणाले, ” अरे, बाबा, मनासारखं रेकॉर्डींग होईपर्यंत पुन्हा पुन्हा करावं लागतं. नाहीतर थेटरात जाऊन खेटरं खावी लागतील ! ” केलेले काम उत्तम व्हावे यासाठीचा त्यांचा ध्यास दिसतो, तसेच त्यांची विनोदबुद्धीही.
शाळा – कॉलेजात आम्ही नाटके बसवीत असू. पंधरावीस दिवसात नाटक बसवून होत असे. सर्व पात्रे फक्त प्रयोगाच्या दिवशी रंगमंचावर एकत्र यायची. तालमीला भेटलो की अर्धा वेळ गप्पात व अर्धा वेळ खाण्यापिण्यात जायचा. त्यामुळे नाटक अक्षरशः बसत असे. प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या नसल्यामुळे कुणाचे स्टेजवर धोतर सुटले, मिशी पडली, संभाषणातील वाक्य विसरले गेले तर प्रेक्षक सांभाळून घेत ; शिवाय नाटकाचा प्रयोग झाल्यावर मित्रमंडळी स्टेजवर येऊन ‘छान झालं , अभिनंदन !’ वगैरे प्रोत्साहन देत. त्यातून मुली आल्या तर गुदगुल्या होत. (तसे नशीब फक्त हीरोचे असायचे. ) एके वर्षी ‘तुझं आहे तुजपाशी’ हे नाटक आम्ही बसवायला घेतले. दिग्दर्शक होते पुलंचे धाकटे बंधू रमाकांत देशपांडे. एकदा नाटकाची तालीम पाहण्यासाठी रमाकांत देशपांडे पुलंना घेऊन आले. पुलंनी शब्दावर वजन कसे असते, टायमिंग कसे सांभाळायचे, रंगमंचावर कसे वावरायचे ते सांगितले. त्यांच्या गाढ्या अभ्यासाचे कौतुक वाटले आणि आमच्यातील उणिवा जाणून आम्ही खजील झालो. एकूण, विनोदी नाटक हे गंभीरपणे घेतल्याशिवाय पर्याय नाही हे कळले.
पुलंना गुणग्राहकता होती. आमच्या मेडिकल कॉलेजातील डॉ. सुधा आगाशे व्हायोलिन वाजवीत असत. त्यांचा हात चांगला होता , पण योग्य मार्गदर्शन नव्हते, म्हणून पुलंनी पं. डी. के. दातारांना सुधाला व्हायोलिन शिकवण्याची विनंती केली. व्हायोलिन शिकता शिकता मदनाने आपली कामगिरी पार पाडली. डॉ. कु. सुधा आगाशे डॉ. सौ. सुधा दातार झाल्या. लग्नगाठ ब्रम्हदेव बांधतो म्हणतात, इथे पुलंनी बांधली. आता डॉ. सुधाच्या अफ़ाट प्रॅक्टिसमुळे त्यांचे व्हायोलिन धूळ खात पडले आहे.
पुलंचा हजरजबाबीपणा सर्वांना माहीत आहे. पुलंच्या एका सत्कार समारंभावेळी अध्यक्ष होते आचार्य अत्रे. ते म्हणाले, ” गडकरी आमचे गुरु. गडकरी वारले तेव्हा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्मदेखील झाला नव्हता. ” पुल बोलायला उभे राहिले तेव्हा म्हणाले, ” आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणाले ते खरं आहे. गडकरी वारले तेव्हा माझा झाला नव्हता. पण त्यांना माहीत नाही की गडकरी वारले त्यानंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला. ” श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रचंड दाद दिली.
***
कवी प्रफुल्लदत्त हेही आमचे शिक्षक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या कविता कारावास भोगत असलेले स्वातंत्र्यसैनिक गात असत. शब्दांवर कवींचे स्वामित्व होते. ते मराठीचा तास घेत त्यावेळी विद्यार्थी मंत्रमुग्ध होत. एकदा त्यांनी निबंधासाठी आम्हाला विषय दिला ‘माई’. माईवर काय लिहायचे, ते आम्हाला सुचेना. कुणी लिहिले, ” माई एक विधवा होती. ती फार चांगली होती. ती दुस-यांना मदत करीत असे. ” वगैरे. आम्ही प्रफुल्लदत्त सरांना निबंध दाखवला. कुणाचाही निबंध त्यांना पसंत पडला नाही. ते म्हणाले, ” अरे, माई म्हणजे जिव्हाळा, माई म्हणजे त्याग, माई म्हणजे क्षणाक्षणाला कणाकणाने झिजणारी व इतरांना प्रकाश देणारी मेणबत्ती, असं काही लिहा. ” आम्हाला त्यांचे हे बोलणे भावत होते, आवडत होते; पण पंचवीस ओळी काय, पण मोजून पाच ओळी लिहिणे देखील नव्हते. आम्ही सर्वांनी पुलंना भेटून मदतीची याचना केली. पुल म्हणाले, ” अरे, माईचं वय विचारून घ्या. माई अठरा वर्षांची असेल तर ? ” योगायोग असा की सुनीताबाईंना घरी ‘माई’ असे म्हणत आणि त्यांचे वयही तेव्हा अठरा वर्षांचे होते.
गिरगावातील साहित्य संघात कवी प्रफुल्लदत्तांचे व्याख्यान होते. व्याख्यानात प्रफुल्लदत्त मानवी मूल्यावर हिरीरीने बोलत होते, ” कार्याची कळकळ असायला हवी. कळ असल्याशिवाय कळकळ निर्माण होत नाही. ” श्रोत्यांत पुल बसले होते ; ते हळूच म्हणाले, ‘ कळ ‘ले. आजूबाजूच्या श्रोत्यांत खसखस पिकली.
मैफलीत पु. ल.
डावीकडून तिसरे हार्मोनियमवर पु. ल.
माजी आरोग्यमंत्री डॉ,. ललिता राव यांच्या घरी एकदा मित्रमंडळी जमली. त्यात पुलही होते. मनोरंजनाखातर कुणी चुटके सांगितले; कुणी गाणे म्हटले. मित्रमंडळीत एक गायनेकॉलॉजिस्ट होते. ते गायला लागले. पुल माझ्या शेजारी बसले होते ; माझ्या कानात म्हणाले, ” अरे, त्यांना सांग, गायन आणि गायनेकॉलॉजी यांचा काहीएक संबंध नाही. ” माझी हसता हसता पुरेवाट झाली.
पुलंना आयत्यावेळी कधी कधी सुंदर कल्पना सुचत असत. पार्ल्याला हिराबाई बडोदेकरांचे गाणे होते. त्यांचा सत्कार करायला पुल उभे राहिले. म्हणाले, ” हिराबाईंचा आम्ही सत्कार काय करणार ? त्यांना तर देवाने गोड गळा देऊन त्यांचा सत्कार करून इथे पृथ्वीतलावर पाठवलं आहे. याहून अधिक तो कोणता सत्कार असणार ? ” श्रोत्यांनी टाळ्या वाजवून पुलंना मनसोक्त दाद दिली.
शिवाजी पार्कला डॉ. श्रद्धानंद ठाकूरांच्या घरी वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. पेटीवर पुल होते. कार्यक्रमानंतर जेवणे झाली. गप्पा ऐन रंगात आल्या. खालून एक भिकारी मालकंसचे सूर आळवीत जातांना ऐकू आले. पुल थांबले. गोड गळ्यातील ते सूर ऐकून पुलंना राहवेना. त्यांनी त्या भिका-याला वर बोलावले; त्याच्याकडून काही गाणी गाऊन घेतली, त्याला जेवू घातले. त्याच्या खिशात नोट सरकवली आणि त्याची बोळवण केली. तो गेल्यावर पुल म्हणाले, ” तोही आपल्याप्रमाणेच सुरांवर प्रेम करणारा ; पण आपल्याला संगीताचं मार्गदर्शन लाभलं , तसं त्याला लाभलं नाही. माणसाने कुठे जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसतं. समजा, आपला जन्म त्याच्या घरात झाला असता तर … ? ” संगीतात कोणताही भेदभाव याचे दर्शन त्या दिवशी घडले.
जीवनात कोणतेही समीकरण बांधता येत नाही अशी पुलंची धारणा असावी. डॉ. श्रद्धानंद ठाकूरांच्या मुलीचे लग्न होते. लग्नात पुल भेटले. मला त्यांनी आपल्या शेजारी बसवून घेतले व म्हणाले, ” आज दुपारी ‘अनुराधा’ मासिकातला तुझा लेख वाचत होतो. स्वास्थ्यासाठी काय करावं, काय करू नये लेख वाचत असताना एक किस्सा आठवला. एका दीर्घायुषी माणसाची मुलाखत घेणं चाललं होतं. मुलाखतकाराने त्याच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं. त्याने सांगितलं, ‘ मी सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, सकस आहार घेतो; मला कोणतंच व्यसन नाही ‘ वगैरे. बाहेर गडबड गोंधळ चाललेला आवाज ऐकून मुलाखतकाराने विचारलं, ‘बाहेर काय गडबड चालली आहे ? ‘ तो माणूस म्हणाला, ‘ते माझे वडील. वय वर्षे ९०. रोज दारू पिऊन बडबड, दंगामस्ती करतात ! ”
कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या यशाचे श्रेय अंशतः त्याच्या पत्नीला जाते. इथे पुलंच्या यशाचे श्रेय पूर्णतः सुनीताबाईंना द्यायला हवे. पुलंचा विवाह सुनीताबाईंशी झाल्यावरच महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या पुलंचा जन्म झाला. सुनीताबाईंचे प्रोत्साहन व सहकार्य नसते तर पुलंना इतकी उंची गाठता आली नसती. पुलंना वेठीला धरून लिहायला बसवणे, आल्या गेल्याची उठबस, नाटकाची भाषणाची तयारी, नको असलेल्या पाहुण्यांना वाटेला लावणे इथपासून प्रुफे तपासणे, मानधन घेणे वगैरे सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने सुनीताबाईंनी पार पाडली. ‘अर्धांगी’ शब्द त्यांच्या बाबतीत थिटा वाटतो. कायम पडद्याआड राहून सर्व सूत्रे सांभाळणा-या दिग्दर्शकाप्रमाणे सुनीताबाईंनी पुलंना सांभाळले. त्यांची भूमिका ढालीप्रमाणे होती. सुनीताबाई त्यांच्या जीवनात आल्या नसत्या तर पुल ‘सुशेगात’ जीवन जगात राहिले असते. पुल व सुनीताबाई ही दोघे परस्परपूरक होती.
एकदा सुनीताबाईंच्या वाढदिवशी प्रफुल्ला डहाणूकर फुलांचा गुच्छ घेऊन सुनीताबाईंना भेटायला गेल्या. सुनीताबाईंनी दार उघडल्यावर, “शू हळू बोल. भाईने सकाळी मला विचारलं, तुला वाढदिवसाची काय भेट देऊ ? ‘ सांगितलं, ‘ तुझं आहे तुजपाशी’ नाटक लिहून पूर्ण कर. तेच माझी भेट. भाई ते लिहित बसलाय. ” पुलंनी एका बैठकीत नाटक लिहून पूर्ण केले.
उत्तरार्ध
एकेकाळी ” मी पु. य. देशपांडे नव्हे, माझं नाव पु. ल. देशपांडे आहे ” असे सांगणा-या पुलंना पुढे त्यांचे आडनाव लावण्याचीही गरज पडली नाही. ‘पुल’ ही दोन अक्षरे म्हणजे ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’. महाराष्ट्राच्या गळ्यातील ‘ताईत’ होऊन राहिले. यात अबोल राहिलेल्या सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे.
पुलंचा लोकसंग्रह प्रचंड होता. त्यांनी आयुष्यभर एक नियम पाळला; त्यांना आलेल्या प्रत्येक पत्राचे आवर्जून उत्तर पाठवणे. पुलंनी अक्षरशः हजारो पत्रे लिहिली असतील. काही पत्रे त्यांच्या संबंधीच्या पुस्तकातून प्रकाशित झाली आहेत. माझ्याजवळही त्यांनी पाठवलेली पत्रे आहेत. त्यातील काही पत्रे इथे देत आहे. पत्रांवरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. सुमारे तीस वर्षांपूर्वी मी पुलंवर एक लेख ‘अनुराधा’ मासिकात लिहिला होता व त्याची एक प्रत पुलंना पाठवली. लगेच त्यांचे पत्र आले ते असे :
(१)
१ रूपाली
पुणे ४
प्रिय प्रभू,
तुझे पत्र आणि अनुराधा मासिकात तू माझ्यावर आणि सुनीतावर लिहिलेला लेख वाचला. पैकीच्या पैकी मार्ज द्यायची मला सवय नाही हे तुला आठवत असेल ; पण तू ते उपटलेस. त्यातला गुरुगौरवाचा भाग जाऊ दे पण तुझ्या वाहत्या शैलेतले लेखन वाचून मीही ‘डॉ. प्रभू ना ? – अहो, तो माझा शागीर्द ! ‘ असे मी अभिमानाने सांगेन.
मी डॉक्टर झालो नाही आणि तू साहित्यिक झाला नाहीस. पण मी डॉ. झालो असतो तर देवी टोचण्यापलीकडे प्रगती झाली नसती. माझ्या दवाखान्याशेजारी म्युन्सिपाल्टिच्या पासाचे टेबल टाकून कारकून बसवावा लागला नसताच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही – पण तू साहित्यिक झाला असतास तर मात्र भल्या भल्या साहित्यिकांचे वांधे केले असतेस.
लिखाणाची सुरुवात तू गुरुचरित्रापासून केली आहेसच. आता लेखणी ही केवळ प्रिस्क्रीप्शन लिहिण्यासाठी असते असे न मानता – लिहित जा.
तुझे पत्र व लेख याबद्दल तुला माझे व बाईंचे धन्यवाद.
तुझा
सर
पुलंनी लेखकाला लिहिलेले पत्र क्र. १ (प्रत )
***
(२)
२६ जानेवारी १९८४
प्रिय डॉ. प्रभू,
‘निरामय कामजीवन’ आणि ‘आरोग्य : समज आणि गैरसमज’ ही तू लिहिलेली दोन्ही पुस्तके रवींद्र कोठावळे यांनी मला पाठवली. धन्यवाद.
कामजीवनावर लिहिणे सोपे नाही. हा विषय नाजूकही आहे आणि आपल्यासारख्या गतानुगतिकीच्या समाजात स्फोटकही आहे. आपल्या श्लीलाश्लीलतेच्या, नीतिअनीतीच्या योनिशुचितेच्या कल्पनांशी निगडित असल्यामुळे कामजीवनाविषयी लिहायला तज्ज्ञसुद्धा कचरतात. तुझ्या पुस्तकाची काही समीक्षणे माझ्या पाहण्यात आली होती. समाजात ह्या विषयाबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा वाढीला लागते आहे हे चांगले लक्षण आहे. कामवासनेशी सदैव पापाचे नाते जुळवल्यामुळे ह्या बाबतीत एकतर रोगट कुतूहल ढोंग या दोनच प्रवृत्ती वाढीला लागल्या. त्यात पुन्हा ‘ ब्रम्हचर्य हेच जीवन’ सारख्या पुस्तकांनी प्रचंड गोंधळ घातला. जडीबुट्टीवाल्यांनीही लोकांमधले अज्ञान टिकून राहील आणि कामजीवन संपुष्टात येण्याची दहशत कायम राहील खबरदारी घेतली.
अशा या विषयावर लिहिण्याचे धाडस करणा-या र. धों. कर्व्यांसारख्या माणसाला खूप छळ सोसावा लागला. त्यांनी स्वीकारलेल्या वैद्न्यानिक दृष्टीचा पाठपुरावा करून सोप्या शब्दात आणि बोलक्या शैलीत तू हा विषय समजावून दिला आहेस. अज्ञानामुळे कामजीवनाबाबतीत निराश झालेल्यांना तुझ्या पुस्तकांतून खूप धीर लाभेल. गैरसमज दूर होतील. अशा मार्गदर्शक पुस्तकाची गरज होती. तू ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडल्याबद्दल तुझे अभिनंदन.
तुझा
पु. ल. देशपांडे
पुलंनी लेखकाला लिहिलेले पत्र क्र. २ (प्रत )
लैंगिकता, शिक्षणाची आजची परिस्थिती, अशा शिक्षणाची गरज, अज्ञानाचे परिणाम आणि हे ज्ञान संपादन केल्यामुळे होणारे यासंबंधी रकानेच्या रकाने लिहून जे साधले नसते ते नेमक्या शब्दात पकडून पुलंनी एका आंतर्देशीय पत्राच्या मर्यादित जागेत नेमकेपणाने मांडले. लैंगिकता हा विषय सर्वसामान्यपणे वाच्यता न करण्याजोगा आहे असे अनेकांना वाटते. पण पुलंनी भावात्मक व वैद्न्यानिक दृष्टीकोन बाळगून आपले विचार व्यक्त करण्याचा लाजवाब निर्भीडपणा दाखवला आहे. यातच पुलंचा मोठेपणा आढळतो. पुल हे केवळ विनोदी लेखकच नव्हे, तर विचारवंतही होते याचा हा पुरावा.
***
(३)
पुलंना सांधेदुखीचा खूप त्रास होतोय असे कळल्यावरून मी त्यांना सल्लाकीच्या गोळ्या घेण्याचा सल्ला पत्राने कळवला, त्याला उत्तर आले ते असे :
पुणे ४
१६ – ६ – ८४
प्रिय प्रभू,
तुझं पत्र मिळालं. मिळाल्याचं कळवायला उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.
गेल्या तीनचार वर्षात या संधिवाताविरुद्ध इतका गोळीबार केला आणि सगळेच नेम चुकून वाया कशा जातात याचा इतका अनुभव गाठीला लावला की आता गोळी म्हटली की पोटात गोळा येतो. त्यामुळे यापुढे दोनतीन महिने – म्हणजे साधारण दसरा सण मोठा येईपर्यंत गोळी – रसायन – काढे – मिक्श्चर ( हा शब्द लिहायला इतका अवघड असतो हे आत्ताच ध्यानात आलं ) – इत्यादीपासून दूर राहून पाहायचं ठरवलं आहे. ‘काय दुखायचं तितकं दुखा लेको’ असं मीच माझ्या सांध्यांना सांगत आहे. त्यातून अतीच आखडूपणा करायला लागले तर ‘क्लोनोरिल’ मागवीन. सल्लाकीच्या गोळ्या खाऊन झाल्या. माझ्या खांद्यांनी आणि ढोपरांनी त्या उडवून लावल्या.
असो . तू इतक्या आपुलकीने औषध सुचविल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
तुझा
सर
पुलंनी लेखकाला लिहिलेले पत्र क्र. ३ (प्रत )
***
पुलंची वाटचाल मी पाहात आलो. एकदोन नव्हे, पन्नास वर्षांहून अधिक काळ. हे भाग्य आमच्या पिढीला लाभले. त्यांच्या लेखनाने केवळ मनोरंजन केले असे नसून आमच्या घडत्या बिघडत्या वयात आम्हाला एक दिशा मिळाली. आनंदाने कसे जगावे मंत्र मिळाला. खरे तर पुलसारखे व्यक्तिमत्व कधीतरी केव्हातरी एकदाच घडते. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणा-या पुलंचे अखेरचे भाषण ऐकण्याचा योगही मला लाभला. प्रसंग होता ‘चित्रमय स्वगत’ या त्यांच्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ. जिथे पुल लहानाचे मोठे झाले त्याच पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघात हा समारंभ पार पडला. तो दिवस होता वीस मार्च एकोणीसशे शहाण्णव. माझ्या हॅण्डिकॅमवर हा समारंभ मी चित्रित केला.
‘ चित्रमय स्वगत ‘ पुस्तकाचे मुखपृष्ठ
पुल व्यासपीठावर होते. कंपवातामुळे त्यांना भाषण देणे अवघड होत असल्यामुळे त्यांचे मित्र अरुण आठल्ये यांनी पुलंचे भाषण वाचून दाखवले ते असे :
” मित्रहो, आजच्या या प्रकाशन समारंभाला आपण इतक्या आपुलकीने हजर राहिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. या ग्रथाच्या निर्मितीत अनेकांचे सहकार्य मला लाभले आहे. कसल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता माझ्यावरच्या प्रेमाने या माझ्या मित्रांनी ग्रंथनिर्मितीचा प्रचंड भार उचललेला आहे. ज्या हौसेपोटी या चित्रमय स्वगताची निर्मिती झाली त्याच हौसेने माझ्या वाचकांनी या ग्रंथाला प्रतिसाद दिला. आयुष्यभर मला रसिकांची फार मोठ्या प्रमाणात दाद मिळालेली आहे. जेव्हा जेव्हा समोर जमलेल्या रसिकांच्या गर्दीसमोर मी उभा राहतो त्यावेळी आनंदाच्या बरोबर माझ्या मनात कृतज्ञतासुद्धा दाटलेली असते. आज त्याच भावनेने मी तुमच्यासमोर हजर राहिलो आहे.
माझ्या या भावना तुमच्यापुढे बोलून दाखवाव्यात अशी माझी इच्छा होती. पण कंपवात नावाच्या वाह्यात विकारामुळे जाहीर भाषण करणे मला थोडेसे अशक्य झाले आहे. माझे हे कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण माझ्यावतीने माझा तरुण मित्र अरुण आठल्ये यालाच आपल्यासमोर दाखवायची मी विनंती केली. अरुणने माझ्या स्नेहापोटी या माझ्या भाषणाचे स्वतःच्या आवाजात डबिंग करण्याचे मान्य केल्याबद्दल मी त्याचा अतिशय आभारी आहे —
या ग्रंथाची निर्मिती करण्याचे श्रेय कुणाकुणाला म्हणून मी देऊ ? हे ‘चित्रमय स्वगत’ सुंदर स्वरूपात व्हावे एकमेव हेतू मनाशी बाळगून त्यांनी अपरंपार परिश्रम केले. त्यात कुणीही त्यातल्या श्रेयाच्या वाट्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. एखादे घरचे कार्य असावे अशा भावनेने माझी ही मित्रमंडळी राबली. लोकमान्य सेवा संघाच्या इथल्या इमारतीमध्ये लग्नसमारंभ चालू आहेत. नारायण निःस्वार्थ स्नेहभावनेने वावरत असतील, त्याच जिद्दीने आणि त्याच भावनेने माझ्या मित्रांनी या ग्रंथाच्या निर्मितीत स्वतः नारायणाची भूमिका मोठ्या खुषीत स्वीकारली आणि हे कार्य सिद्धीस नेले.
कुठल्याही नव्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ मला पहिल्या प्रवासाला निघालेल्या जहाजासारखा वाटतो. सामाजिक जीवनात नेहमीच अनुकूल वारे मिळतात असे नाही. लोकप्रियतेच्या लाटासुद्धा समुद्राच्या लाटांसारख्या लहरी असतात. आपल्या प्रवासात सदैव अनुकूल वारे वाहावेत अशी प्रत्येक नाविकाची प्रार्थना असते. साहित्याच्या आणि एकूण सर्वच कलांच्या बाबतीत यशापयशाचे गणित मांडून भविष्य वर्तवता येत नाही. जीवनाचा हा प्रवास कधीतरी थांबवावाच लागतो. तो प्रवास सुरु करणे जसे आपल्या हाती नसते त्याचप्रमाणे त्याचा शेवट करणेही आपल्या हाती नसते. आपण फार तर या प्रवासाच्या आठवणी आपल्या डोळ्यांपुढे आणत असतो. माझ्या सुदैवाने जवळजवळ पन्नास वर्षे माझ्या जीवनातल्या प्रसंगांची, व्यक्तींची शेकडो छायाचित्रे सुनीताने जपून ठेवली होती. ती पाहता पाहता मला माझे बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ दिसायला लागला आणि मी त्या त्या चित्रांचे मथळे आणि मजकूर लिहिला. अशा रीतीने अनेकांच्या सहकार्यातून तयार झालेला हा ग्रंथ आज प्रवासास निघत असतांना ‘शुभास्ते पंथानः सन्तु’ हा आशीर्वाद द्यायला माझ्या सुदैवाने प्रा. मेघश्याम रेगे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. माझ्या आयुष्यात ज्या ज्या वेळी माझ्या ग्रंथांची, नाटकांची, अभिनयाची वाटचाल सुरू केली त्या त्या वेळी मला हजारो रसिकांचा ‘शुभास्ते पंथानः सन्तु’ हा आशीर्वाद मला लाभलेला आहे. या आशीर्वादामुळेच माझा उत्साह वाढत राहिला आहे.
या मैफलीची आता भैरवी सुरू झाली आहे. सुरूवातीला गायिलेल्या यमनकल्याणसारखी भैरवीलाही दाद मिळत असल्याचा अनुभव मला येतो आहे. माझ्या आजच्या अवस्थेत माझ्या लोकांनी मुक्तमनाने आणि तितक्याच सद्भावनेने दिलेली ही दाद हीच माझी मोठी कमाई आहे. ज्यांनी मला, पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘ या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असे वाटायला लावले, त्यांच्या सहवासातल्या क्षणांचा हा चित्रसंग्रह आहे. हा संग्रह पाहतांना तुमच्याही आयुष्यात आनंद देऊन गेलेल्या व्यक्तींचे कृतज्ञ स्मरण तुम्हालाही होईल असा मला विश्वास वाटतो. आयुष्याची जी काही वर्षे आता उरली असतील त्या वाटचालीला माझ्या वाचकांच्या, श्रोत्यांच्या आणि रसिकांच्या आशीर्वादाचे पाथेय मला शक्ती देईल माझी श्रद्धा आहे. धन्यवाद ! ”
अरुण आठल्ये यांनी पुलंचे भाषण वाचून दाखवले. टाळ्यांचा कडकडाट झाला; पण प्रेक्षकांचे समाधान झाले नाही. पुलंनी थोडे तरी बोलावे अशी त्यांना प्रेक्षकांनी गळ घातली. पुलंच्या आवाजातच थोडेफार ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसले होते. पुलंनी कोणतेही आढेवेढे न घेता माईक आपल्या तोंडासमोर घेतला. ते म्हणाले,
” माझी इच्छा खूप आपल्याशी बोलावं अशी होती. पण संकल्प आणि सिद्धी यांच्यामध्ये पार्किन्सन्स डिसीज नावाचा एक वाह्यात रोग आलेला आहे, तो मला माझं मनोगत पूर्ण करू देत नाही. मला नेहमीच रसिकांचं पाठबळ लाभत आलेलं आहे. त्यासाठी मला काहीच खटपट करावी लागली नाही. लोकांनी मला आपण होऊन ‘आपलं माणूस’ म्हटलं. आणखी काय दुसरं लेखकाला किंवा कलावंताला लागतं ? मानसन्मान याच्यापेक्षा सुद्धा आपण निर्माण केलेलं जे काही असेल त्यामध्ये रमून गेलेला आस्वादक हेच बक्षीस असतं. असं बक्षीस मला उदंड प्रमाणात मिळालं आहे. याच्यासाठी, लोकप्रियतेसाठी म्हणून मला काही खटपट करावी लागली नाही. जे झालं ते लोकप्रिय झालं एवढंच. पण त्यामुळे माझ्या हातून जे झालं ते काही अद्वितीय झालं, असामान्य झालं, असा मी गैरसमज करून घेतलेला नाही. तेवढी मला विनोदबुद्धी आहे. आता जी सगळी मंडळी बोलत होती मराठी भाषेमध्ये फक्त सुपरलेटिव्ह नावाचीच एक डिग्री आहे असं समजून बोलत होती. ती सगळीजणं बोलली ती अत्यंत मनापासून बोलली ; प्रेमाने बोलली.
पाडगावकरांनी सांगितल्याप्रमाणे ‘शतदा प्रेम करावे’ असं वाटायला लावलं ते याच कलावंतांनी, कवींनी, चित्रकारांनी, याच गायकांनी. गायनाचं आणि माझं नातं फार जुनं आहे. मला जर कुणी विचारलं, तुमचं फर्स्ट लव्ह काय ? ‘ सुनीता इथं आहे ते सोडून द्या – मी ‘संगीत’ असं सांगीन. गाण्यानं मला जो आनंद दिला तो शब्दांत सांगणं कठीण आहे. एकतरी ओवी अनुभवावी म्हणतात तसं एक तरी सूर अनुभवावा, असं मला वाटतं. एखाद्याचा उत्तम गंधार लागला की काय होतं हे सांगणं कठीण आहे. अनिर्वचनी असं आपण म्हणतो – याला रेग्यांनी ‘परतत्वस्पर्श’ असं म्हटलेलं आहे. हा परतत्वस्पर्श मी इतक्या वेळा अनुभवला आहे, इतक्या मोठ्या व लहान कलावंतांच्या बाबतीत – त्यासाठी मी त्याचं घराणं पाहिलं नाही, त्याचा देश पाहिला नाही – तो निखळ असा आनंद देण्याची संगीतात शक्ती आहे. सगळ्यात सुंदर आनंदाचं स्वरूप हे कैवल्यस्वरूप असतं. तत्वज्ञानाचे प्राध्यापक शेजारी असल्यामुळे मला जरा कठीण शब्द यायला लागले आहेत. दुसरा शब्द सापडत नव्हता, हा कैवल्याचा जो आनंद आहे तो संगीताइतका कुणी देत नाही. कारण ते नुसतं असतं ; ते सिद्ध करावं लागत नाही.
समाज चांगला व्हायला हवा म्हणून मी रोज बांसरी वाजवतो म्हणणारा माणूस हा बांबूचा दुरुपयोग करतोय असं मला वाटतं. एका गिर्यारोहण करणा-या माणसाला विचारलं की ‘तुम्ही का हे गिर्यारोहण करता ?’ तो म्हणेल, ‘मी कुठं करतोय ? तेथे डोंगर आहेत म्हणून मी चढतो. ‘ तसं हे आहे, म्हणून मी लिहिलं. समाजाकडून मिळालं ते मी माझ्या परीने समाजाला परत केलं. हे करत असताना मला जर कुणी ‘याने काय होणार ?’ असं विचारलं तर ‘मला माहीत नाही’ असं सांगितलं असतं. ‘आनंदाशिवाय काही होणार नाही.’ ज्यावेळेस रविशंकरची सतार एखादी मींड काढते, त्यावेळी आपल्याला जो आनंद होतो तो कसा सांगणार ?तो ज्याने अनुभवला त्याला ठाऊक. ते अनुभवण्याचं भाग्य मला लहानपणापासून लाभलं हा माझा सगळ्यात मोठा नशिबाचा भाग म्हणा, योगायोग म्हणा – हा लाभला. त्यातून संगीताच्या अनुषंगाने मी गायनकलेकडे, नाटकाकडे वळलो. असाच निरनिराळ्या क्षेत्रात मी रमलो. या सगळ्या ठिकाणी मला तुमच्यासारखा समुदाय पुढे दिसत आला. आज आलेला समुदाय हे माझे आप्तस्वकीय आहेत असंच मला वाटतं. मी लिहायला बसलो तर मी आप्तस्वकीयासाठीच लिहितो अशी माझी भूमिका असते. तशा प्रकारचे आप्त मला वाचकांमध्ये पुष्कळ लाभले. त्याचा हा परिपाक आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी मला दाद दिली त्या त्या वेळेला कुणी फोटो घेतले; चित्रकारांनी, छायाचित्रकारांनी, सरवटेसारख्या व्यंगचित्रकारांनी ते समूर्त करून ठेवले. “
***
एवढे मोठे लेखक, अभिनयसम्राट, विनोदकार, संगीतकार, दानशूर असूनही आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी दाखवलेली नम्रता व प्रांजळपणा पाहून माणूस थक्क होतो. पुल दिनांक बारा जून दोन हजार रोजी गेले ते साहित्याचा, सुविचारांचा, विनोदाचा, औदार्याचा आणि सौजन्याचा प्रचंड वारसा मागे ठेवून. संगीतातील रागापासून प्रेयसीच्या अनुरागापर्यंत आणि साहित्यातील रसापासून भोजनातील आमरसापर्यंत समानतेने दाद देणारे पुल म्हणजे एक अद्वितीय रसायन होते. कुरळे केस, मिष्किल ओठ, गोल चेहरा, हनुवटीतील खळगा, सशासारखे समोरचे दोन दात, भसभशीत नाकावर काळ्या फ़्रेमचा चष्मा आणि त्या आड दडलेले दोन खोडकर डोळे ही पुलंची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कोरली गेलेली आहे; ती कायमचीच.
***
– डॉ. विठ्ठल प्रभू
२ सी, शिवसागर, पांडुरंग नाईक मार्ग, राजा बढे चौक, शिवाजीपार्क, मुंबई ४०० ०१६.
दूरध्वनी : (०२२) २४४५ २०६५, ९८ २० ६७ ५८ १५
इमेल : vithal_prabhu@hotmail.com
छायाचित्रे आणि पुलंनी लेखकाला लिहिलेली ३ पत्रे : लेखकाच्या संग्रहातून आणि गुगलवरुन साभार.
‘स्नेहबंध’ या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील हा लेख मैत्री अनुदिनीमध्ये पुनःप्रसिद्ध
मुळ स्रोत -- https://maitri2012.wordpress.com/2015/06/12/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%B2/
*********************************************************************************
*********************************************************************************