Monday, June 29, 2020

काही अंश मिळावा

मी ऑफिसमध्ये होते त्या वर्षी बारा जूनला. अचानक घरून फोन आला. आईचा होता. अतिशय हळव्या आवाजात आई म्हणाली "तुला एक वाईट बातमी द्यायची आहे. पु ल देशपांडे गेले"

मला दोन मिनिट कळलेच नाही. मी काहीतरी बोलून फोन ठेवला आणि वॉशरूम मध्ये जाऊन अक्षरशः घरचं माणूस जावे कुणी तशी रडले. बाहेर आले तर माझी टीम माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. त्यात एक दोघी मुली मराठीही होत्या. बाकीच्यांना फारसे कळले नाही आणि मी कुणाला समजावून सांगण्याच्या मनस्थितीतही नव्हते. काही सांगायला गेले नाही कारण सांगितले असते तर पहिला प्रश्न मला हा विचारला असता की कोण होते ते तुझे? इतके रडू येण्यासारखे?

आजही या प्रश्नाचे उत्तर नाही माझ्याकडे. मला याचे उत्तर मिळले नाही तर फरकही पडणार नाही खरेतर. ज्या घरात पुरणपोळी होती नाही ते घर मराठी नव्हे या त्यांच्याच वाक्याप्रमाणे ज्या घरात पु ल माहित नाहीत ते घर मराठी नव्हे.

त्यांच्यावर बरच काही लिहिले गेले आहे. त्यांचे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांचे दातृत्व, त्यांची तत्त्वनिष्ठा असे सगळेच. त्यांचे किस्से, कोट्या, निर्विष विनोद यावर बऱ्याच जणांनी बोलून लिहून झाले आहे. तरीही नवीन काही ऐकले त्यांच्याबद्दल की कान टवकारतात, चेहऱ्यावर छानसे हसू येते. आपल्याही नकळत त्या विनोदाला दाद जाते. हे असे सुचते तरी कसे याचा विस्मय वाटतोच.

त्यांच्या लिखाणाचे भाषांतर करणे निव्वळ अशक्य आहे. भाषेपेक्षाही तो निरागस, निर्विष हेतू दुसऱ्या भाषेत तसाच्या तसा मांडणे प्रचंड अवघड आहे. आयुष्याकडे रसिकतेने बघताना त्यात असलेल्या उणिवांची टपली मारल्यासारखी चेष्टा करत राहणे हे फार अवघड आहे. कुठलीही पातळी न सोडता हे करणे तर फारच कठीण आहे.

आज चाळी, वाडे कालबाह्य झाले. आपले पाहता पाहता दुसऱ्याचेही आयुष्य थोडेसे सुकर करणारी माणसे तर झपाट्याने आटली. बटाट्याची चाळ वाचताना आजच्या पिढीला त्यातले संदर्भ लागणे कदाचित सोपे असणार नाही पण माणसाची प्रवृत्ती बदलत नाही हे लक्षात आले की तो काळ ती माणसे समजून घेता यावीत. असा मी असा मी मधल्या धोंडो भिकाजी जोशांना प्रश्न पडतो की मुलाला ताप असला की ओल्या पंचाने देवाला प्रदक्षिणा घालणारे वडील आणि आपल्या मुलांना व्हिटॅमिनयुक्त आहार मिळतोय का नाही यावर लक्ष ठेवणारे आपण यातले कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ? बापाचे मुलांवरचे प्रेम असणारच ना कितीही पिढीत बदलली किंवा जमाना बदलला तरी. तो संदर्भ कसा चुकेल? तसेच काहीसे आहे हे.

मी पहिल्यांदा लंडनला गेले होते तेव्हा मी पुलंच्या अपूर्वाईतले लंडन शोधत होते.किती ठिकाणी जाताना बघताना त्यांनी त्या त्या ठिकाणावर लिहिलेले आठवत होते. इंग्लंडमध्ये कावळा दिसल्यावर तो क्रो क्रो करेल का हेच वाक्य मला पहिले आठवले. बेक्ड बीन्स ऑन पोटॅटो खाताना ब्रिटिशाला अंडे, बटाटा आणि मांस यापलीकडे खाता येत नाही तेच डोक्यात आले. पॅरिसच्या बाबतीतही तेच झाले. आयफेलवरती गेल्यावर वरून दिसणारे पॅरिस बघताना लख लख दिव्यांनी उजळलेले शहर आठवले.

काय नाते असेल या माणसाशी आपले? नारायण ऐकताना हळूच शेवटी डोळे पुसतो आपण. म्हैस ऐकताना सचित्र ऐकतो. त्यांनी निव्वळ आवाज आणि शब्दातून उभी केलेली म्हशीची कथा इतकी तगडी आहे की मास्तर कसे असतील, "रक्त !!!" असे म्हणताना ते काय चेहरा करून कसे म्हणाले असतील हे अचूक डोळ्यापुढे उभे राहते. त्या चेहऱ्याची जागा कोण कसा घेऊ शकेल? अचूक शैली, बोलीभाषा, हे सगळे ऐकणारा आणि ते तसेच्या तसे शब्दात उतरवणारा हा माणूस काय विलक्षण प्रतिभावंत असू शकतो याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. जबरदस्त निरीक्षण हा एक गुण झाला पण ते निरीक्षण तसेच्या तसे अचूक वाचणाऱ्याच्या डोळ्यापुढे उभे करणे याला सरस्वतीचा वरदहस्तच हवा.

मला त्यांच्या लिखाणातले सगळ्यात जास्त काय आवडते हे सांगणे अशक्य आहे. शब्द आणि शाब्दिक कोट्या हा एक भाग झाला. जगाच्या चांगुलपणावर असणारा विश्वास भावतो की वाईट अनुभव येऊनही त्या अनुभवातले शहाणपण मांडण्याची अलिप्तता भावते हा आणखी मोठा प्रश्न. त्यांचे सुसंस्कारित मन तर ठायी ठायी दिसते. सामाजिक बांधिलकी दिसते आणि त्याचबरोबर त्या समाजातल्या अनेक दोषांवर हसत हसत केलेली टिप्पणीही दिसते. सदैव जागरूक असलेला लेखक दिसतो. सहज शब्दकळा दिसते. नाना क्षेत्रांमधली मुशाफिरी दिसते. नव्याचा स्वीकार करतानाही जुन्याशी नाळ जोडून ठेवलेली दिसते. आणि हे सगळे एकाच माणसात दिसते. आपण वाचावे, बघावे आणि ऐकावे डोळ्यातले पाणी पुसावे.

आयुष्य जर रिवाइंड करता आले तर मी त्यांना भेटेन नक्की. त्यांची पुस्तके वाचून पिंड घडला. त्यांची थोरवी कळण्याइतकी अक्कलही नव्हती तेव्हा आणि फारच मोठ्या प्रमाणात आपल्याच दुनियेतले मश्गुल असणेही होते. कमला नेहरू पार्कावरून ये जा करताना त्यांचे घर मागच्याच गल्लीत आहे हे माहित असूनही पावले तेव्हा वळली नाहीत. आता वळतात अधूनमधून. त्यांच्या घराकडे बाहेरूनच नजर टाकून समाधान होत नाही पण तेव्हढ्यावरच समाधान मानणेही आले. त्यांनी वर्णन केलेला तो जोशी हॉस्पिटलच्या आवारातील आंबा एकदा मी प्रत्यक्ष जाऊन बघून आले. पण त्याचे त्यांनी केले वर्णन मनात ठेवूनच. एका अर्थी आमची तुमची नजर घडवली या माणसाने. जगाकडे निरागस नजरेने बघणेही चांगले असते यावरचा विश्वास फुलपाखराच्या सोनेरी वर्खासारखा जपला. हसत हसत दुःखाला टोलवायची कला शिकवली.

मला नोकरी लागल्यावर मी विकत घेतलेले पहिले पुस्तक हसवणूक होते. माझे खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक वगैरे वाचून मी एकटीच खो खो हसले होते. त्यांची पुस्तके मी कुणालाही वाचायला देत नाही. कारण ती गेली की परत येत नाहीत. तुम्ही म्हणाल जाऊ दे की चार लोकांना अजून ते कळले तर बिघडले कुठे? मुद्दा बरोबर आहे पण न देण्याचा हेतू मात्र स्वार्थी आहे. त्या पुस्तकांनी अनेक भल्याबुऱ्या प्रसंगात माझी सोबत केलेली आहे. ती माझी जिवाभावाची पुस्तके आहेत. अनेक प्रसंग, घटना त्या पुस्तकांनी सुसह्य केलेल्या आहेत. मला त्यांचा कुठला लेख, कुठले पुस्तक कधी वाचायची हुक्की येईल हे मलाही सांगता येत नाही आणि अशा वेळी ते पुस्तक हाती लागले नाही की वाचणाऱ्याची काय चिडचिड होऊ शकते हे वेगळे सांगणे नलगे.

आज त्यांना न भेटण्याचे दुःख खरेतर उणावले आहे थोडेसे. त्यांना प्रत्यक्ष भेटले नाहीतरी ते भेटतात. त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या शब्दातून. एखाद्या दिवशी अपयशी वाटून डोळे भरून येत असताना प्रत्येक चिंधीने मला काही दिले यासारख्या अप्रतिम लेखातून ते प्रत्येक अनुभव भरभरून जगायला सांगतात. इतिहासाच्या अदृश्य मनगट्या घालणारे हरितात्या भेटतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना अंगावर आपसूक काटा फुलतो. श्रोते हो सुजन हो रसिक हो वाचताना त्यांच्या व्यासंगी बुद्धिमत्तेने थक्क व्हायला होते. आपल्या आसपास भलेबुरे जे काही सुरु असताना मनात जागा असणारा हा माणूस कुठल्याही कसल्याही परिस्थितीत आपल्या ओठावरचे हसू मावळू देत नाही.

मग आपल्या मनाला आपण सांगतो. इतके सगळे दिलेत देशपांडे गुरुजी तुम्ही. पण एक अंश तुमचा असाही मिळावा ज्यामुळे कृतज्ञतेने तुमच्या देण्याचा स्वीकार करताना आपणच आपल्याला म्हणावे

अरे असे जगता आले पाहिजे. सुखाची स्मृती ठेवून, दुःखाला समोर बघत सस्मित चेहऱ्याने आसपासच्या किमान चार माणसांच्या आयुष्यातले किमान चार क्षण तरी उजळता आले पाहिजेत. त्या तेजाचा एक कण तेव्हढ्यासाठी हवा.

समाजातल्या दुःखाने नुसतेच आतडे पिळवटून ओरडण्यापेक्षा आतड्याची माया जागी ठेवून मुक्याने जितकी जमेल तितकी सहज मदत करता आली पाहिजे. तो एक अंश हवा.

गुरुजी तुमच्या आयुष्यातला एक अंश मिळावा. असे स्वतःच्या तत्त्वांवर ठाम राहून जगता येते हे कळण्यासाठी.

एक अंश मिळावा बस . . . बाकी आयुष्य चालूच आहे.

तुम्हाला देवत्व दिलेले तुम्हाला आवडणार नाही आणि तुमच्या तत्त्वांच्या ते विरुद्धही असेल. पण आज तुमच्या निष्पाप, निरागस विनोदाची खरंच गरज आहे हो. एकीकडे असेही वाटते की तुम्ही आज नाही ते एका दृष्टीने बरच आहे म्हणा. तुम्हाला आज जे काही आसपास चालू आहे ते बघवलेच नसते. तरीही जेव्हा एखाद्या दिवशी केशर मडगावकर (उच्चारी अडगावकर), मधू मलुष्टे, कुमार गिरीश असा एखादा नमुना आसपास दिसतो तेव्हा मी खूप हसते. कारण तुम्ही मिस्कील चेहऱ्याने शेजारी उभे राहून हसत हसत ‘काय मी सांगतो ते पटतंय की नाही’ असे विचारत असता.

तुमच्याच भाषेत सांगायचे तर आमची चिमुकली संसारगाड्याखाली दबलेली आयुष्ये हसती रहावी, त्यांना नीट आकार यावा, ती उजळावीत म्हणून देवाने तुम्हाला देणगी म्हणून आमच्यासाठी पाठवले आणि आजच्या दिवशी आम्हाला न विचारताच परत नेले.

©प्राजक्ता काणेगावकर

Friday, June 26, 2020

बटाट्याच्या चाळीतला लॉकडाऊन - कुमार जावडेकर

बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली!

चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली.

चाळकऱ्यांचं 'लॉकडाउन' यामुळे होऊ लागलेल्या 'अप-डाउन'मधून मार्गी (?) लागलं. 'निदान गच्चीतली हवा आणि ऊन तरी खायला मिळतील,' अशा समजातून ते मेंढेपाटलांना दुवा देऊ लागले. (अनेक जण भाडं देत नव्हतेच त्यामुळे मेंढेपाटलांना चाळीकडून जी काही नवीन प्राप्ती झाली ती इतकीच.)

'गच्चीत सुरक्षित अंतर ठेवून धान्य-विक्री करता येईल' असा चापशीचा अंतस्थ हेतू होता. तो जाणल्यामुळे किंवा गच्चीमुक्तीच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान न लाभल्यामुळे आचार्य बाबा बर्वे मात्र हिरमुसले. त्यातच चापशीच्या कुलूप उघडण्याचा सोहळा पोंबुर्पेकरानं त्याच्या 'चाळभैरव' या (अ-)नियतकालिकाच्या 'फेसबुक' पानावर 'लाइव्ह' दाखवला!

नागूतात्या आढ्यांचा प्रत्येक गोष्टीलाच विरोध. 'खोलीबाहेरच पडता कामा नये' असं त्यांचं म्हणणं होतं.

'सगळेच लोक जर एकदम गच्चीत जायला लागले तर त्यांच्यांत अंतर राहणार कसं?' असा प्रश्न जोगदंडांनी एकदा जिना चढताना विचारला. त्यावर 'आपण प्रत्येक खोलीसाठी वेळ ठरवली पाहिजे' असं कोचरेकर मास्तरांनी वरच्या दारातून सुचवलं. अर्थात, त्याची अंमलबजावणीही त्यांच्यावरच आली.

दुसऱ्या दिवशी जिन्याखालच्या भिंतीवर एक वेळापत्रक चिकटवलेलं चाळकऱ्यांना दिसलं. सोबत गच्चीचा आराखडा आणि त्यावर आखलेले एक-दिशा मार्ग! 'सुरक्षित अंतर ठेवून वीस मंडळी एका वेळी गच्चीत मावू शकतात. चापशीच्या दुकानाच्या वेळेत ही संख्या दहावर येईल' अशा सूचनेसकट.

वेळापत्रकाची फक्त झलक -

५.५५ ते ६.०० - जिना चढण्याची वेळ.

६.०० ते ६.३० - बर्वे (पहिला क्रमांक मिळाला म्हणून बाबा खूष!), सोमण, पावशे, गुप्ते.

६.३० ते ६.३५ - जिना उतरण्याची वेळ.

६.३५ ते ६.४० - पुढील मंडळींच्या जिना चढण्याची वेळ.

.... अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या चाळकऱ्यांसाठी स्वतंत्र वेळा होत्या.

काही दिवसांतच 'नळ आणि इतर विधींचा वेळापत्रक?' अशी तळटीप त्यात सामील झाली. मालवणीत 'चे' चा 'चा' होतो हे काहींना माहिती होतं. मग त्यावर 'जनोबा तुझो आणि नळाचो काय संबंध?' अशी अजून एक टिप्पणी आली. हळू हळू या भित्तीपत्रकाशेजारी 'चाळभैरव', कविता (नाही निर्मळ हात? - करोना करेल घात!), 'आज रात्री नऊ वाजता टाळ्या' (त्यात नागूतात्यांची 'मग शिट्ट्याही का नाहीत?' ही भर) इत्यादी बातम्याही चिकटू लागल्या.

मंगेशराव, वरदाबाई आणि काशिनाथ नाडकर्ण्याचा मुलगा यांची वेळ एकच होती. त्यांनी गच्चीत पेटीवादन, तबलावादन आणि गायन दोन-दोन मीटरचं अंतर ठेवून सुरू केल्यावर आणि त्याला नाट्यभैरव कुशाभाऊंच्या स्वगतांची जोड मिळाल्यावर चाळकऱ्यांनी आपल्या खोलीतच आपल्याला 'विलग' केलं!

चाळीच्या (विशेषतः जिन्याच्या) दीर्घारोग्यासाठी बाबलीबाईंनी मात्र स्वतःच गच्चीप्रयाण करणं टाळलं.

नागूतात्या मोदी-ट्रंप यांच्या निवेदनांपासून बटाट्याच्या चाळीतल्या या संवेदनांचं धावतं वर्णन आपल्या खोलीच्या दारात उभं राहून, जो कोणी जिन्यात दिसेल त्याच्याशी करत होते. प्रत्येक संभाषणाचा शेवट मात्र 'मी हे आधीच ओळखलं होतं' हा असायचा.

एकदा ते दारात दिसले नाहीत तर चाळकऱ्यांनाही चुकल्यासारखं वाटलं.

... त्यांना करोनाची बाधा होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं!

बटाट्याची चाळ अजूनही आत्मनिर्भरपणे का उभी आहे हे तेव्हा जगाला कळलं. त्या बाजूच्या खोल्यांचं विलगीकरण झालं. कुणी त्यांच्यासाठी नाश्ता पाठवला तर कुणी जेवण. डॉ. (कंपाउंडर) हातवळणे, चवाथे नर्सबाई, समेळकाका (न्यू गजकर्ण फार्मसी) यांनी त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारी घेतली. दोन आठवडे, रोज, अण्णा पावशे त्यांची कुंडली मांडत होते आणि आचार्य बाबा बर्वे एका वेळच्या उपोषणावर होते.

अखेर नागूतात्या बरे झाले. ते पुनः दारात आल्यावर अख्ख्या चाळीनं टाळ्या वाजवल्या.

'मी हे आधीच ओळखलं होतं' एवढंच ते म्हणाले...

- कुमार जावडेकर

आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांनी पु. ल. स्मृतिदिनानिमित्त (१२ जून २०२०) आयोजित केलेल्या 'पुलोत्सव - करोनावरची वरात' या स्पर्धेत निवडली गेलेली कथा.
मुळ स्रोत - https://www.misalpav.com/node/47003

Wednesday, June 24, 2020

आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट - सतीश पाकणीकर

पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर पूर्वी व्हरायटी स्टोअर्स नावाचे एक स्टोअर होते. शाळेतून येताना बऱ्याच वेळा त्या दुकानाच्या बाहेर उभा राहून, भल्यामोठ्या काचेतून आतील रॅक्सवर ओळीने मांडून ठेवलेल्या अनेक वस्तू मी पाहत बसे. त्यावर पाडलेल्या प्रकाशामुळे त्या वस्तूंचा चकचकीतपणा अजुनच खुलून दिसे. त्यात अगदी काचेच्या जवळ काही अल्बम ठेवलेले असत. पोस्टाची तिकीटे गोळा करणाऱ्यांसाठी ते अल्बम म्हणजे चैनीचा भाग असे. त्रिकोणी, चौकोनी, आयताकार, षटकोनी तिकिटे चिकटविण्यासाठी त्या आकाराच्या ठिपक्यांच्या ओळी असलेली ती पाने पाहिली की आमची तिकीटांची साधी वही एकदम केविलवाणी वाटू लागे. पैसे साठवून कधीतरी तो अल्बम घ्यायचाच हा विचार करीत तेथून पाऊले हलवावी लागत. वर्गातल्या काही मित्रांना काड्यापेटीचे छाप जमवण्याचा छंद असे. पण पोस्टाची तिकीटे गोळा करून त्यांचा संग्रह करणारे जरा उच्च श्रेणीतले समजले जात. कारण ज्यांच्या घरी पत्र-व्यवहार जास्त होत असे त्यांच्याकडे जास्त तिकीटे गोळा होत. त्यातही ज्यांचे नातेवाईक परदेशात असत त्या मुलांचा भाव जास्त असे. कारण त्यांच्या संग्रहात विदेशी तिकिटेही असत. मग त्यांची देवाण-घेवाण होत असे. एखादे दुर्मिळ तिकीट मिळाले की खूप आनंद होत असे. ते मित्रांना कधी दाखवू असे होऊन जात असे. बरीच वर्षे हा छंद टिकला. मग कॉलेज शिक्षण व व्यवसाय यात तो छंद एकदम मागे पडून गेला. विस्मरणात गेला.

त्या छंदाची आठवण उफाळून यावी अशी एक घटना घडली. २००२ सालचा मार्च महिना असेल. मला एक फोन आला. पलीकडची व्यक्ति बोलली- “ मी पी.एम.जी. अनिल जोशी बोलतोय. माझं तुमच्याकडे एक तातडीचं काम आहे. कधी भेटू शकतो आपण?” मला अनिल जोशी हे नाव कळले होते. पण पी.एम.जी. म्हणजे काय हे कळले नव्हते. अज्ञान प्रकट करायला लागणार होते. तसे मी ते केले. त्यावर ते म्हणाले – “ मी अनिल जोशी, ‘पोस्ट मास्टर जनरल’, पुणे, म्हणून नुकताच रुजू झालोय. कधी भेटू या?” मग मला वाटले की त्यांच्याकडून राँग नंबर लागलाय. मी तसे म्हटल्यावर ते घाईने म्हणाले- “ नाही हो. मी भेटल्यावर तुम्हाला सांगतो. फोनवर सर्व सांगता येणार नाही. पण काम महत्वाचे आहे आणि तातडीचंही!” वेळ ठरली संध्याकाळी साडेचारची. ठिकाण लॉ कॉलेज रोडला फिल्म इंन्स्टिट्यूटच्या बाहेर.

मी पाच मिनिटे आधीच जाऊन पोहोचलो. बरोबर साडेचारला एक पांढरी ॲम्बॅसिडर गाडी तेथे येऊन पोहोचली. मी अंदाजाने ओळखले. त्यांनीही मला गाडीत बसण्याची खूण केली. मी गाडीत बसल्यावर अनिल जोशी यांनी सांगायला सुरुवात केली. “ मी रुजू व्हायच्या आधी काही दिवस येथे उत्तर हिंदुस्थानी बाई ‘पीएमजी’ होत्या. त्यांच्या काळात पु.ल.देशपांडे यांच्यावर टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांना पु लं विषयी फारशी माहिती नव्हती. त्यांनी परस्पर त्यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याला पु लं च्या घरी त्यांचे फोटो आणायला पिटाळले. तो तेथे गेला व त्याने सुनीताबाईंना फोटो हवे आहेत असे सांगितले. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सुनीताबाईंनी त्याला चार-पाच दिवसांनी या असे सांगितले. सुनीताबाईंनी मुंबईहून फोटो मागवले. त्या फोटोग्राफरने दोनच फोटो पाठवले होते. एक पु. ल. व विजया मेहता असा. व दुसरा पु. ल. सिगारेट ओढत आहेत असा. ते फोटो घेऊन तो माणूस ऑफिसवर पोहोचला. ते फोटो मग दिल्लीस पाठवले गेले. पण असे फोटो तिकिटासाठी चालणार नव्हते. त्यामुळे ते रिजेक्ट झाले. तेथून तशी सूचना आली. त्यानुसार परत एकदा तीच व्यक्ती सुनीताबाईंच्यासमोर पोहोचली. त्याने सरळ सुनीताबाईंना सांगितले की “तुम्ही दिलेले फोटो रिजेक्ट झालेत नवीन फोटो द्या.” त्या व्यक्तीचे असे बोलणे ऐकून सुनीताबाई वैतागल्याच. त्या म्हणाल्या – “ माझ्याकडे फोटो नाहीत. तुम्ही पुलं वर तिकीट काढूच नका. नाहीतरी तुम्ही माझ्या नवऱ्याचे तिकीट प्रसिद्ध करणार आणि त्याच्या चेहऱ्यावर परत शिक्का मारणार. त्यापेक्षा तुम्ही तिकीटच काढू नका ना!” असे म्हणून त्यांनी त्याची बोळवण केली. त्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला. मी चार्ज घेतल्यावर आधीचे सर्व प्रकल्प बघताना माझ्या ही गोष्ट लक्षात आली. इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग केवळ माहिती करून न घेतल्याने घडला आहे हे जाणवून मी आता त्याला प्रथम प्राधान्य दिलेले आहे. एक मराठी म्हणून मला अभिमानाने सांगता येईल की माझ्या कारकीर्दीत मी पुलं वर तिकीट काढू शकलो. मी नुकतेच एका पुस्तकात तुम्ही काढलेले पुलं चे फोटो पाहिले. मग नाव सर्च करून तुमचा नंबर मिळवला व फोन केला.”

आता माझ्या मनात विचार आला की – ‘यांना आपण फोटो दिले की काम झालं असतं. त्यासाठी इथे असं बोलावण्याचं काय प्रयोजन?’ त्यांनी बहुतेक माझा विचार ओळखला असावा कारण ते लगेचच म्हणाले – “ आपण आत्ता येथूनच सुनीताबाईंना भेटायला जाऊ. मी तुमच्याकडून फोटो घेणार आहे हे त्यांना सांगीन. पण त्यांची त्या आधी समजूत काढावी लागेल. म्हणून तुम्ही बरोबर चला.”

रागावलेल्या सुनीताबाईंच्या समोर आणि तेही त्यांना आधी फोन न करता जाणे हे धाडस होते. पण मी आधीही बऱ्याच वेळी त्यांना फोन न करता गेलो असल्याने व त्यांनी मला सहन केलेलं असल्याने मी होकार दिला.

आम्ही त्यांच्याच गाडीतून पाच मिनिटात ‘मालती-माधव’ येथील त्यांच्या घरी पोहोचलो. बेल वाजवल्यावर सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. त्यांच्या नेहमीच्या आवाजात म्हणाल्या- “ हं, काऽऽय हो?” मी त्यांना अनिल जोशी यांची ओळख करून दिली. सुनीताबाईंच्या लगेच सगळं लक्षात आलं. त्या म्हणाल्या – “काऽऽय हो तुमची माणसं? कसं बोलायचं असतं याचं त्यांना काही शिक्षण दिलेलं नसतं का?” अनिल जोशी यांनी लगेच त्यांची माफी मागितली. अर्थात सुनीताबाईही लगेचच निवळल्या. त्यांचं नेहमीचं मंद हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आलं. त्या परत म्हणाल्या – “ आता मी काय करू तुमच्यासाठी?”

ही संधी साधत अनिल जोशी यांनी सुनीताबाईंना ‘फिलाटेली’ विषयी इथ्यंभूत माहिती द्यायला सुरुवात केली. “ जगभरात लहान–थोर असे करोडो लोक पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद जोपासतात. त्यातून आपल्याला जगभराचा चित्रमय इतिहास पाहायला मिळतो. प्राणि, फळे-फुले, शास्त्र, कला, उद्योग याबरोबरच जगभरातील महान व्यक्ती, इतिहासकार, कलाकार, शास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ यांचे स्मरण आपल्याला पोस्टाच्या तिकिटांवर झालेले दिसते. अशी प्रसिद्ध झालेली तिकीटे जमवण्याच्या छंदास ‘फिलाटेली’ असे म्हटले जाते. फिलाटेलीस्ट हा फक्त तिकीटे जमवतो असे नाही तर त्या तिकीटांच्या व त्या अनुषंगाने छापल्या जाणाऱ्या एरोग्राम, पोस्ट कार्ड, पत्रके, नोंदणीकृत लिफाफा, मुद्रित लिफाफा, प्रथम दिवस आवरण या सर्वांच्या छपाई, संरचना यामध्येही त्याला रस असतो व या सर्वांचा संग्रहही तो करीत असतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट एकदा म्हणाले होते की- “ माझा तिकीट संग्रह ही अशी एक जागा आहे की जेथे सर्व देश गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.” हा असा छंद आहे की ज्यामुळे लोकांच्या मनात शांती आणि प्रेम याचा संदेश आपोआप पसरला जातो.” असे सांगत त्यांनी पुलंवरील स्मरणार्थ तिकिटाचे आपल्याला कसे महत्व आहे हेही पटवले.

त्यांच्या या सविस्तर कथनाने सुनीताबाईंच्या मनातील आधीच्या भावना नाहीश्या झाल्या. त्या उठल्या व त्यांनी पुलंवरील ‘चित्रमय स्वगत’ हा ग्रंथ जोशी यांना दाखवत म्हणाल्या – “ याचा काही उपयोग होईल का पहा. यात भाईचे शेकडो फोटो आहेत.” जोशी यांनी तो ग्रंथ चाळला. व म्हणाले- “ मी जाता जाता डेक्कन जिमखान्यावरून हा ग्रंथ घेईन.” अचानकपणे सुनीताबाई माझ्याकडे हात करीत म्हणाल्या- “ अहो, ह्यांनी काढले आहेत की खूप फोटो भाईंचे. यांच्याकडून घेता येतील तुम्हाला.” जोशी म्हणाले – “ हो मला माहित आहे. त्यांना मी सांगणारच आहे.” चहापान झाले आणि आम्ही तेथून आनंदात निघालो. मलाही हुश्श झाले होते.

जोशी यांनी केलेले वर्णन ऐकल्यामुळे मी त्यांना म्हणालो- “ मी तुम्हाला काही फोटोंच्या प्रिंट्स करून देतोच पण त्या बरोबर स्टॅम्प, फर्स्ट डे कव्हर व कॅन्सलेशन स्टॅम्पचे डिझाईनही करून पाठवतो. त्याची निवड झाल्यास उत्तमच नाहीतर मला मी काही काम केल्याचे समाधानही मिळेल.” आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुढच्याच आठवड्यात अनिल जोशी यांना मी त्यांच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधील कार्यालयात सर्व साहित्य नेऊन दिले. त्यांनी ‘चित्रमय स्वगत’ व मी दिलेले सर्व साहित्य दिल्लीस पाठवून दिले.

जवळजवळ दीड महिन्याने मला अनिल जोशी यांचा फोन आला. तारीख होती ६ मे २००२. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले- “ पाकणीकर, तुमचा फोटो पुलंच्या तिकीटासाठी निवडला गेला आहे. त्या तिकीटाचं डिझाईन आजच मला दिल्लीहून आलं आहे. पण तुम्ही आत्ताच ही बातमी कोणाला सांगू नका. पुढच्या महिन्यात १६ जूनला पुण्यातच त्याचं प्रकाशन माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते होणार आहे. निमंत्रण मी देईनच तुम्हाला.” त्या फोन नंतर काहीच वेळात त्यांनी मला त्यांना आलेली मेल फॉरवर्ड केली. झाले ते सर्व स्वप्नवतच घडले होते.

१६ जून २००२. आपल्या लाडक्या व्यक्तीमत्वाच्या सन्मानार्थ निघणाऱ्या पोस्टाच्या तिकिटाचा कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ पाहता यावा यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांनी तुफान गर्दी केली होती. प्रमुख पाहुणे होते आदरणीय पं. भीमसेन जोशी. “बहुविध गुण असणाऱ्या ऋषीतुल्य पु.ल.देशपांडे यांच्या सन्मानार्थ त्यांचे टपाल तिकीट काढून कळत न कळत मी पुलंना आपली गुरूदक्षिणा अर्पण केली आहे. ते आम्हाला पुण्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात रेडिओ पत्रकारिता हा विषय शिकवण्यास येत असत. हे ऋण फेडण्याची संधी योगायोगाने मी या खात्याचा मंत्री असताना मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.” अशा भावपूर्ण उदगारांसह प्रमोद महाजन यांनी ते तिकीट, प्रथमदिवस आवरण व कॅन्सलेशन स्टॅम्प या सर्वांचे प्रकाशन केले. तर भीमसेनजी म्हणाले – “ गाणे, साहित्य आणि कलांवरील प्रेमामुळे पु.ल.देशपांडे कायम अमरच आहेत.”

पुलंची बहुविविधता दाखवण्यासाठी या तिकीटावर त्यांच्या प्रकाशचित्रासह, मागे ‘जोहार मायबाप’ मधील त्यांनी साकारलेला चोखा मेळा, लेखणी, पुस्तक, रंगमंच, चित्रफित व त्यांची स्वाक्षरी अशी चित्र विराजमान आहेत. प्रथम दिवस आवरणावर त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील सहा प्रतिमा तर कॅन्सलेशनच्या खास शिक्क्यात तानपुरा व लेखणी एकाकार झाले आहेत.

कार्यक्रम संपन्न झाला. पण तो पाहण्यास सुनीताबाई मात्र येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे काही मोजक्याच व्यक्तींसह श्री. प्रमोद महाजन ‘मालती-माधव’ वर पोहोचले. अनिल जोशी यांनी मलाही येण्याचे आमंत्रण दिले. आम्ही सर्व पोहोचलो. तिकीट व त्याबरोबरचे सर्व साहित्य पाहून सुनीताबाईंना किती आनंद झाला आहे हे त्यांच्या डोळ्यात जमलेले आनंदाश्रूच सांगत होते. श्री. अनिल जोशी यांनी पुढे येत श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते मला भारतीय टपाल खात्यातर्फे तिकीट, प्रथमदिवस आवरणावर चिकटवलेले तिकीट, त्यावर उमटवलेला कॅन्सलेशन स्टॅम्प व या तिकीटाची विवरणिका (ब्रोशर) असा एक सुंदर अल्बम भेट म्हणून दिला.

कविवर्य कुसुमाग्रज पुलं विषयी यथार्थपणे म्हणतात- “ आपापले कार्यक्षेत्र व्यापून टाकणारे प्रतिभावंत असतात, पण त्यातला एखादाच आपल्या समाजाच्या समग्र संस्कृतीलाच व्यापून उरतो. पी.एल. हे असे विरळा प्रतिभावंत आहेत. मराठी संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगात जे जे सत्वशील, सुंदर, उदात्त, उन्नत, नवनिर्मितीशील, सुरेल, नाट्यपूर्ण व मूल्ययुक्त आहे ते ते पी.एल. च्या व्यक्तिमत्वात आणि कलानिर्मितीत व्यक्त झाले आहे.”

व्हरायटी स्टोअर्सच्या त्या काचेमागील ते तिकीटांचे अल्बम तेव्हा माझ्या नशिबात नव्हते. पण मराठी सारस्वताचा मुकुटमणी असलेल्या, मला वेगवेगळ्या संगीत मैफलींना आमंत्रण देऊन संपन्न करणाऱ्या, माझ्या सुरुवातीच्या काळात माझं मनोमन कौतुक केलेल्या, एन.सी.पी.ए. च्या संगीत विभागासाठी माझी प्रकाशचित्र विकत घेणाऱ्या त्या आनंदपुरुषोत्तमाच्या सन्मान तिकीटावर मी टिपलेलं त्यांचं प्रकाशचित्र निवडलं जावं व त्यांच्या ऋणातून काही अंशानं का होईना उतराई व्हावं हे त्या नियतीच्याच मनात होतं नां? आणि आदरणीय सुनीताबाई, पं. भीमसेनजी व श्री. प्रमोद महाजन यांच्या स्वाक्षऱ्यांसह अमूल्य झालेला तो खास असा तिकीट अल्बम माझ्या संग्रही कायम राहावा हे ही त्या नशिबानेच ठरवले असणार नां ?

- सतीश पाकणीकर
http://www.sateeshpaknikar.com/

Monday, June 15, 2020

तरुणाईचे लाडके पु.ल.

पुलंना जाऊन (१२ जून रोजी ) आता वीस वर्ष लोटलीत. परंतु त्यांचं मराठी जनमानसावरील अधिराज्य अजूनही कायम आहे. तरुणाईच्या मनांवरही ते तितकंच गडद, गहिरं आहे. याचाच हा वानवळा..
                     
जीवनात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला आपली वाट गवसते किंवा चुकते. मला माझी वाट २००० साली गवसली. महाराष्ट्र त्यावेळी एका मोठय़ा धक्क्य़ातून सावरत होता. पु. ल. देशपांडे निवर्तले होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या मराठी वर्तमानपत्रांतून पुलं गेल्याची बातमी छापून आली होती. जवळजवळ अख्खा पेपर ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ या नावाशी संबंधित लेखांनी भरलेला पाहिला. तत्पूर्वी पु. ल. देशपांडे नावाचे एक थोर साहित्यिक आपल्या महाराष्ट्रात आहेत, एवढंच जुजबी ज्ञान माझ्या बालमेंदूत शिक्षण खात्यानं घुसवलेलं. त्यामुळे प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे ही काय चीज आहे मला माहीत नव्हतं. मग मी ‘पुलं कोण होते’ याचा शोध घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. कॅसेट हाऊसमधून पुलंच्या ‘रावसाहेब’, ‘नारायण’ व ‘सखाराम गटणे’ या कथाकथनाची कॅसेट आणली आणि प्लेयरवर लावली.

‘एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही..’ हे पुलंचं पहिलं वाक्य कानावर पडलं आणि माझी त्यांच्याशी त्याच दिवशी वेव्हलेंग्थ जुळली. त्यानंतर पुलंच्या विचाराशिवाय एकही दिवस गेला नाही. पुलंच्या ऑडियो क्लिप्स ऐकून आणि त्यांची पुस्तकं वाचून झालेलं तृप्तीचं समाधान अतुलनीय आहे. एखादा विचार व्यक्त करत असताना योग्य शब्द निवडण्याचं कसब पुलंना सहजी अवगत होतं. शाळकरी मुलापासून ते नव्वदीत पोचलेल्या वृद्धांपर्यंत वाचकांची मोठी रेंज लाभणं- यातून पुलंच्या साहित्याचा समाजावरील गहिरा प्रभाव दिसून येतो. पुलंच्या समकालीन किंवा सद्य:कालीन अन्य कुणा लेखकाला हे भाग्य लाभलेलं दिसत नाही. पुलंनी दैनंदिन जीवनातील घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याला अनुपमेय शब्दरूप दिलं आणि समाजाला जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली. ती देताना त्यांची भाषा कुठेही प्रचारकी नव्हती. आजची पिढी पुलंची वाक्यं एखाद्या संदर्भात वापरते त्यावरून खात्रीनं वाटतं, की पुलं हेच मराठी साहित्यातील सर्वात जास्त लोकप्रिय लेखक आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर पुलंची जन्मशताब्दी साजरी झाली त्यानिमित्ताने ‘मालती-माधव’मधल्या पुलंच्या घरी त्यांचा सहवास लाभलेले कित्येक स्नेहीसोबती जमले होते. या कार्यक्रमाला पुलंवरच्या प्रेमापोटी आम्ही तरुणांनी बनवलेल्या ‘आम्ही असू ‘पुलं’कित’ या ग्रुपच्या सदस्यांना ठाकूर दाम्पत्याने मोठय़ा आपुलकीनं बोलावलं होतं. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर ते पार बेळगावहून मंडळी जमली होती ती केवळ पुलंवरील प्रेमामुळेच. वाटावं- हे एकच कुटुंब आहे! डॉ. जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, श्रीकांत मोघे, अरुणा ढेरे, माधव वझे, सुधीर गाडगीळ यांसारखी कलाक्षेत्रातील मंडळी त्या दिवशी जमली होती. त्यांच्यासमवेत वयाचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा कसलाही भेद न बाळगता आम्हा मुलांना ‘मालती-माधव‘मध्ये काही तास घालवता आले ही कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याईच! दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांशी बोलताना आम्हा मुलांच्या तोंडी फक्त पुलंचीच वाक्यं होती. जसं की आमच्यातला मृणाल ‘सर, हे पेढे!’ म्हणत गटण्याच्या भूमिकेत शिरून सर्वाना पेढे वाटत होता. मी बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल, माधव वझे यांच्याशी बोलताना एकच वाक्य म्हणायचो- ‘आपल्याशी एकदा (पुलं) या विषयावर बोलायचंय!’ डोंबिवलीहून आलेल्या आनंद मोरेंची ओळख करून दिली तर ते एकदम ‘म्हैस’मधल्या बाबासाहेब मोरे या पुढाऱ्याच्या भूमिकेत शिरून म्हणाले, ‘(मंत्रालयात) मालती-माधवमध्ये मीटिंग आहे..’ दुपारी जेवताना आम्ही एकमेकांना ‘अरे, घ्या.. घ्या, लाजताय काय च्यायला स्वत:च्या घरी असल्यासारखे!’ अशी टपली मारत होतो. पुलंच्या लोकप्रियतेचा मला आलेला एक अनुभव सांगतो. २०१५ साली मी मित्रांसमवेत तोरणा किल्ल्यावर अभ्यासासाठी गेलो होतो. चालून थकल्यामुळे दुपारच्या वेळी गडावर सावलीत निवांत झोपलो होतो. अचानक दुरून बारीक आवाजात ‘गोदाक्का, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ बघू?’ हे चितळे मास्तरांचं वाक्य कानावर पडलं. कुठल्याशा कॉलेजात शिकणारी मुलं सुट्टीत गडावर फिरायला आली होती. त्यातल्याच एकाच्या खिशातून ‘चितळे मास्तर’ ऐकू येत होते. गड चढताना कष्ट जाणवू नयेत म्हणून त्याने मोबाइलवर चितळे मास्तरांची क्लिप लावलेली आणि बाकीचे मन लावून ते ऐकत ऐकत गड चढत होते. वयोगट साधारणत: २०-२१ वर्षे. असं काही अनुभवलं की वाटतं, जगात आपल्यासारखे ‘पुलंयेडे’ बरेच आहेत.

मला वाटतं, पुलंना केवळ ‘विनोदी लेखक’ म्हणून जी ओळख मिळाली ती जरा अन्यायकारकच आहे. खरे पुलं त्यांच्या भाषणांतून आणि वैचारिक लेखांतून समजतात. पुलंच्या एकूण साहित्यसंपदेपैकी विनोदी साहित्याचं प्रमाण हे वैचारिक साहित्यापेक्षा कमीच असावं. पुलंची गोळी कडू नसे. त्यामुळं ती घेणाऱ्याचं तोंड कधीही कडवट झालं नाही. परिणाम मात्र योग्य तो व्हायचाच. पुलं वाचताना आपण उगाच काहीतरी गहन वाचतोय असं निदान मला तरी कधी वाटलं नाही. हो, अंतर्मुख जरूर झालो. अगदी पुलंचं विनोदी साहित्यही वाचूनही. पुलं वाचताना नेहमी मला संवादाचा भास होतो. माझं आपलं असं कुणीतरी माझ्याशी गप्पा मारतंय असं वाटत राहतं. ‘हा माणूस आपला आहे’ असं वाटणं ही भावना वाचकाचं लेखकाशी अदृश्य नातं जोडते. यामुळंच पुलं प्रत्येक पिढीशी आपलं नातं जोडून आहेत.

पुलं एक कमाल आस्वादक होते. जीवनाचा आनंद त्यांनी स्वत: तर घेतलाच आणि तो इतरांनाही वाटला. समाजातलं उत्तम ते- ते पाहावं, आस्वादावं आणि आयुष्य आनंदानं जगावं ही मूलभूत शिकवण पुलंनी आपल्याला दिली. पुलंमुळे मी पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे यांचं गाणं ऐकणं शिकलो. चार्ली चॅप्लिन समजला. व्यक्त होणं शिकलो. उत्तम मैत्र जोडणं शिकलो. कला, साहित्य, संगीत, नाटक यांत मनापासून काम करणाऱ्या मंडळींशी गट्टी जमवून आपली सांस्कृतिक भूक भागवणं शिकलो. रवींद्रनाथ टागोर समजावेत म्हणून वयाच्या पन्नाशीत पुलं शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषा शिकायला गेले होते, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. त्यांनी रवींद्रनाथांचं भाषांतरित साहित्य वाचलं असतं तरी चाललं असतं, पण पुलंनी ते टाळलं. जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेणं ते हेच.

मी मुद्दाम कुणाला ‘पुलं’ ऐकवण्यापेक्षा माझ्यासाठी त्यांची ऑडियो क्लीप लावतो. तो आवाज ज्या- ज्या माणसांच्या कानांवर पडेल, त्यांतून ज्याला जे भावेल तो पुलंचा झाला असं साधं-सरळ समीकरण आहे. समाधानाची बाब ही, की पुलंच्या लिखाणाला काळाचं बंधन नसल्यामुळे ज्याला मराठी भाषेचा सेन्स आहे अशा प्रत्येकाला पुलं भावतात. त्यामुळं ‘आजच्या पिढीला पुलं समजायला हवेत’, ‘इतरभाषिकांना पुलं समजायला हवेत’ वगैरे कल्पना वांझोटय़ा आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. अभिजात गोष्टी शाश्वतच असतात. कदाचित दृश्य किंवा वस्तूरूपात त्यांचं अस्तित्व नष्ट होईलही; परंतु परिणामस्वरूपात त्या काळावर मात करतात. पुलंचं कलेतलं योगदान शाश्वत आहे. ते बरोब्बर जिथं पोचायचं तिथं पोचणारं आणि चिरंतन टिकणारं आहे. त्यासाठी आपण वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज नाही.

अमोल लोखंडे
amolslokhande1984@gmail.com
लोकसत्ता
१२ जून २०२०

Thursday, June 11, 2020

‘मन’ : पु.ल. नावाचं - प्रवीण दवणे

एखाद्या जिवलग मित्राची ओळख नेमकी केव्हा झाली, हे जर पन्नास वर्षांनंतर कुणी विचारले, तर ज्याप्रमाणे आपण एका मजेशीर अडचणीत सापडतो, त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके भाई म्हणजे पुलं यांच्याशी माझी वाङ्मयीन मैत्री केव्हा झाली, हे आज मला सांगणे अवघड जाते. माझ्या शालेय वयात पाठ्यपुस्तके ही केवळ पाठीवर न्यायची नव्हती, तर ती वर्षानुवर्षे जपावीत अशी होती आणि भाषेचे शिक्षकसुद्धा अनुक्रमणिकेच्या पाट्या टाकणारे नव्हते. आपल्याला केवळ मराठी शिकवायला नेमलेले नसून, मुलांना भाषेची गोडी लावण्यासाठी आपली नियुक्ती आहे, असे मानणारे होते. याचा परिणाम असा झाला की, आम्ही मुले वाचू लागलो. मराठीच्या तासाची वाट पाहू लागलो. त्या वाटेवरच प्रसन्न भाषेचे एक व्यक्तिमत्त्व माझ्या विद्यार्थिआयुष्यात आले आणि अर्थातच ते व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे!’

गंमत म्हणजे आजच्याप्रमाणे लेखकांचे किंवा कवींचे फोटो धडे किंवा कवितांवर नसत, तर त्यांची रेखाचित्रे असत आणि ती पाहून आम्ही ‘लेखक दिसतो तरी कसा?’ या उत्सुकतेची तहान भागवत असू. अशा क्षणी पु. ल. देशपांडे यांचे रेखाचित्र मी पाहिले आणि त्याही वयात मनाची मिस्कीलता जपणारे त्यांचे टपोरे डोळे, गंभीरतेचा खूप प्रयत्न करूनही, सज्जातून डोकावणार्‍या दोन उनाड मुलांसारखे डोकावणारे ते दोन दात, माझ्या वय वर्षे दहा या मनावर बिंबले गेले. आणि एकतर आवडलेला धडा पुन:पुन्हा वाचावा तसा इतर लेखकांच्या रेखाचित्राहूनही अधिक वेध घेतलेला हा चेहरा, यामुळे दुसरे कुणी म्हणायच्या आतच पु. ल. हे माझे लाडके व्यक्तिमत्त्व झाले. नेमका कुठला धडा होता ते आज आठवत नाही, पण पुढील वाचनाची गोडी लागावी असे काहीतरी त्यात होते. मात्र ‘इयत्ता’ पुढे सरकल्यानंतर साधारणत: आठवी-नववीच्या वयात मी माझ्या जगण्याचेच एक अंग असावे इतक्या सहजपणे पुस्तके वाचू लागलो. याच वाचनयात्रेत ‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णन माझ्या हाती आले. जग पाहण्याच्या माझ्या उत्सुकतेची मी उघडलेली ती पहिली खिडकी होती. एकाच वेळी प्रवासाचे वाचन आणि वाचनाचा प्रवास सुरू होता. खरेतर या आधी वाचलेली प्रवासवर्णनेही एकप्रकारची देश कसा बघावा याची गाईडस् होती. परंतु, पु. ल. देशपांडे यांच्या अपूर्वाईने एक वेगळेच गारूड माझ्या मनावर केले. ते नुसते वर्णन नव्हते. प्रवासात घडणार्‍या अनेक फजिती, गडबड-गोंधळ, त्यातून उडणारी भंबेरी, स्वत:चीच घेतलेली फिरकी, यामुळे पुस्तक वाचताना मी खो खो हसत असे. हा अनुभव मला फक्त चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणरावचे चर्‍हाट’ वाचताना आला होता. इतकं निर्मळ, नितळ असं लेखन माझ्या आयुष्यात पु. लं.च्या लेखनाच्या रूपाने आले होते आणि मग काय, एकच उद्योग सुरू झाला. शाळा सुटल्यावर वाचनालयात जावे आणि पुलंचं पुस्तक तेथून घेऊन यावे आणि पहाटेपर्यंत जितके जमेल तितके वाचावे, हसावे, असा दिनक्रमच सुरू झाला. ‘पूर्वरंग’, ‘जा जरा पूर्वेकडे’ अशी प्रवासवर्णने, जगण्याचा प्रवासही प्रवासातल्या जगण्याने आनंददायी करता येतो, हे सांगून गेली.

भारावून जाऊन मी पुलंना एक पत्र लिहिले. तोपर्यंत पुलंना खाजगी नात्यात ‘भाई’ म्हणतात, हे मला कळले होते. मी आपलं वांग्याच्या झाडाने वडाच्या झाडाशी मैत्री करावी, त्याप्रमाणे त्यांना लिहिले- ती. भाईस, सा. न. वि. वि. आणि पुढे त्यांची पुस्तके मला किती आवडतात ते थोडक्यात लिहिले. पंधरा-वीस दिवस गेले असतील, मी आपला उत्सुकतेनी पुलंचं दोन ओळींचं तरी उत्तर येईल म्हणून चातकासारखी वाट पाहात राहिलो. माझ्यासारख्या बारा-तेरा वर्षांच्या मुलाला पुलं कसले उत्तर देतात या कल्पनेने, अर्थातच त्यांना मी पत्र पाठवले हेही मी विसरून गेलो आणि ते विसरल्यामुळेच की काय, एका संध्याकाळी शाळेतून मी घरी परतताच, हाती नजराणा द्यावा त्याप्रमाणे माझ्या आईनेच मला एक पत्र ‘नजर’ केले. आतापर्यंत जो वाक्प्रचार मी मराठीच्या उत्तरपत्रिकेत एका गुणासाठी उपयोगात आणला होता तो वाक्प्रचार मी साक्षात जगत होतो. अर्थात ‘आनंद गगनात मावेनासा होणे’ हा तो वाक्प्रचार होता. अवघ्या मराठी मनाला भुरळ पाडणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अक्षरश: माझ्यासमोर होते. त्या पत्राच्या तीन-चार ओळीतसुद्धा भाईंनी माझी एक चूक जिव्हाळ्यानी काढली होती. भाईंनी लिहिले होते, चि. प्रवीण, अनेक आशीर्वाद. तू मला ‘ती.’ केल्यामुळे मी तुला ‘चि.’ करणे ओघानेच आले. माणसाने विनम्र असलेच पाहिजे; पण प्रवीणमधला ‘वी’ हा दीर्घच असला पाहिजे. तुझ्या पत्राला उत्तर देण्यास विलंब झाला, कारण काही महिने मी बंगालच्या दौर्‍यावर होतो. आणि पत्राच्या शेवटी ‘तुझा भाई’ असे मायेने लिहून स्वाक्षरी केली होती. पुलंच्या या पत्रामुळे मी चांगलाच धीटावलो आणि अधूनमधून पत्रं पाठवीत राहिलो.

का कोण जाणे, पुलंच्या केवळ लेखनामुळेच मला त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटली नाही, तर त्यांची पत्रे, त्यांची भाषणे, दूरदर्शनवरील त्यांच्या मुलाखती, कथाकथने हे सारेच मायेने ओतप्रोत आहे, हे मला जाणवले. पुलंना भरपूर ऐकण्याचा एक वेगळाच योग तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामुळे आम्हा भाग्यवंतांना लाभला. आपण ओळखलेच असेल, आणिबाणीचे काळेकुट्ट पर्व देशात सुरू झाले आणि मेणाहून मऊ असलेले पुलं वज्राहून कठीण कसे आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन महाराष्ट्राला घडले.

मला आठवतं, त्याच वेळी यशवंतराव चव्हाण आणि पु. ल. देशपांडे यांच्यातही शाब्दिक चकमक रंगली होती. यशवंतरावांची आणि पुलंची मैत्री होती व नाते जिव्हाळ्याचे होते; तरीही आपली मते परखडपणे मांडताना ही मैत्री आड आली नाही. त्याच वेळी दुर्गाबाई भागवत कराडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या. दुर्गाबाई आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील वैचारिक मतभेद, ही जशी माझ्यासारख्या तरुण वाचकांना पर्वणी होती, तशीच त्याच संमेलनात पु. ल. देशपांडे यांनी केलेले भाषण हेसुद्धा माझ्यासाठी शब्दांची आणि विचारांची दिवाळी होती! इचलकरंजी येथील पुलंचे अध्यक्षीय भाषण म्हणजे प्रसन्न आणि खुमासदार शब्दांत किती ‘गंभीर’ बोलता येते, याचा नमुना होता. पुलंवरचे माझे प्रेम असे वेगवेगळ्या प्रकारे अधिक अधिक दृढ होत गेले. एक वेडच लागले म्हणा ना, जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे पुलंना पाहावे, त्यांना ऐकावे, त्यांना वाचावे, असे झपाटलेपण माझ्याच नव्हे, तर माझ्या पिढीतील असंख्य तरुणांमध्ये दाटून येत गेले. दरम्यान एक विद्यार्थी म्हणून मी पुलंना पत्र पाठवीत गेलो आणि मला त्यांची उत्तरेही येत गेली. इतकी लोकप्रियता आणि वेळेची व्यग्रता असूनही पुलं माझ्यासारख्या विद्यार्थ्याला उत्तर देत होते, याचे आजही मला नवल वाटते. त्याच दरम्यान एक अगदी दुर्मिळ आनंदयोग योगायोनानेच माझ्या वाट्याला आला तो म्हणजे, परमपूज्य बाबा आमटे यांच्या आनंदवनात जाण्याचा. कोण असावे तेथे? तर साक्षात पु. ल. देशपांडे! प्राचार्य राम शेवाळकर आणि पु. ल. देशपांडे दैवतासारखे समोर आहेत आणि आनंदवनाच्या गाभार्‍यात, स्वागताला बाबा आमटे आहेत. तीन दिवस त्यांच्यासह मी होतो. बालतरूची पालखी घेऊन त्याचे भोई कोण? तर पुलं आणि राम शेवाळकर. आनंदवनाच्या कार्याबद्दल भाईंनी काढलेले उद्गार आजही कानात गुंजत आहेत. भाई म्हणाले होते- ‘‘उद्ध्वस्त माती आणि उद्ध्वस्त माणूस यांचे नाते जोडण्याचे काम बाबांनी केले.’’ पुलंच्या वक्तृत्वाचा एक निराळाच नमुना मी थक्क होऊन अनुभवत होतो. त्यात पुलंना वाटणारी सामाजिक कार्याची तळमळ, परमपूज्य बाबांबद्दल वाटणारी श्रद्धा, उपेक्षितांबद्दल वाटणारी आस्था, या सगळ्याचा माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की, त्यांच्या अवघ्या लेखनाकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलून गेली. लोक म्हणतात तसे पुलं हे केवळ विनोदी लेखक नाहीत, तर विलक्षण करुणा असलेले हे एक सहृदय व्यक्तिमत्त्व आहे, या दृष्टीने मी त्यांचे लेखन वाचू लागलो. पुन्हा एकदा त्यांचे आधीचे लेखन वाचताना मला जाणवले, सर्कशीतल्या सर्वांना हसवणार्‍या विदुषकाच्या डोळ्यांतही अश्रू दिसावा, त्याप्रमाणे हे लेखन कारुण्याने मनाला अंतर्मुख करणारे आहे.

पुलंची व्यक्तिचित्रे, वार्‍यावरची वरात आणि बटाट्याची चाळ यासारखे स्वत:शी व समाजाशी केलेले मुक्तचिंतन मी पुन्हा नव्याने वाचले. एकीकडे त्यांच्या सभांच्या लोकप्रियतेमुळे आणि पुस्तकाच्या प्रचंड खपामुळे, त्यांना लेखकच न मानणारा साहित्यातला न्यूनगंडाने पछाडलेला साहित्यिकांचा आणि समीक्षकांचा एक वर्ग मी बघत होतो आणि दुसरीकडे समाजाला जीवनावर भरभरून प्रेम करायला लावणारा, सांस्कृतिक मूल्ये मानणारा, केवळ स्वत:च्याच साहित्यावर प्रेम न करता अगदी नव्या लेखकांनाही भरभरून दाद देणारा खराखुरा माणूस मी पाहात होतो.
माझे वयच असे होते की, नवे काही चांगले ऐकले की मन तुडुंब भरून यायचे. कधी कुणी टीका केली की मतेही बदलत जायची. श्रद्धांच्या मोडतोडीचा हा काळ नव्या लेखकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ असतो. पुलं, दुर्गाबाई भागवत, गंगाधर गाडगीळ, चिं. त्र्यं. खानोलकर, जयवंत दळवी ही माझी तेव्हा साहित्यातील दैवते होती. त्यांच्यामध्येही मतभेद होतेच, पण कुठेही कडवटपणा नव्हता. म्हणूनच परस्परांतील मतभेदांचा परिणाम त्यांच्याबद्दलच्या वाटणार्‍या ओढीतच झाला. कुसुमाग्रज, बोरकर ही जशी कवितेतील दैवते त्याचप्रमाणे पुलं, गाडगीळ, खांडेकर ही गद्य लेखनातील दैवतेच ठरली. ही मंडळी केवळ उत्तम लेखकच होती असे नाही, तर त्यांच्या लेखनातून समाज सुसंस्कृत करण्याचे एक वेगळेच सामर्थ्य होते.

कामवलेल्या, रियाझी गळ्याच्या गवयाचे साधे गुणगुणणेही संमोहक वाटते. पुलंचे अगदी साधे बोलणेही तसे वाटायचे. काय त्या स्वरात जादू होती ते पुलच जाणे! कारण ‘देव जाणे’ म्हणण्याची पंचाईत; कारण रूढ अर्थाने ते देवभोळे नव्हते, पण देवत्व मात्र मानणारे होते. देवमाणूस जाणणारे होते. पंढरपुरीचा विठोबा पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत; कारण त्याच्या पायांवर ज्ञानेश्‍वर, तुकारामांनी माथा टेकला आहे, त्यांचे स्पर्श तेथे रेंगाळलेत, हा भाव त्यांच्या मनात दाटून येई. पुलं समजून घेताना त्यांचं हे हळवेपण समजून घ्यायला हवं.

अध्यापनाच्या आरंभीच्या काळात मी जरा जास्तच प्रयोगशील होतो. त्या जरा ‘जास्तीच्या’ उत्साहात मी केलेले प्रयोग कसे होते, याचा एक नमुना मला इथे सांगायचा आहे. वर्गात पुलंचा ‘अंतुबर्वा’ शिकवल्यानंतर पुलभक्तीची एक वेडी लाट वर्गात उसळली. अर्थात ही किमया पुलंच्या लेखणीची होती. त्या भरात मी विद्यार्थ्यांना पुलंच्या घराचा पत्ता देऊन म्हटले, त्यांना पत्र लिहा. त्यांच्या लेखनाने तुम्हाला दिलेला आनंद त्यांना कळवा. त्या काळात विद्यार्थी जरा विशेषच आज्ञाधारक होते. दोन वर्गांतील जवळजवळ दीड- दोनशे विद्यार्थ्यांनी भरभरून पत्रं लिहिली. पंधरा-वीस जेमतेम गेले असतील. दहा-पंधरा मुला-मुलींचा घोळका रोज ‘स्टाफरूम’मध्ये जमू लागला. माझी लोकप्रियता अचानक वाढल्याचे सावट स्टाफरूममध्ये पसरले. पण, ती किमया पुलंची होती. मुलांच्या हाती पत्रं होती आणि ती पुलंची त्यांना आलेली उत्तरे होती. हा सोहळा पाच-सात दिवस सुरू होता. पुलंनी सर्व मुलांना वेगवेगळी उत्तरे- त्यांच्या पत्रातील मजकुराचा सूर धरून लिहिली होती. (आजही ती आता पन्नाशीची झालेली मुले भेटतात-त्या पत्रांजलीने गहिवरतात.) गंमत म्हणजे रवींद्र नाट्यमंदिरातील त्यांच्या षष्ट्यब्दीला ‘चतुरंग- मुंबई’ या संस्थेने त्यांची थेट मुलाखत आयोजित केली होती. मी त्यातील एक मुलाखतकार होतो. पुलंच्या पत्रव्यवहारातील तत्परतेबद्दलचा प्रश्‍न विचारताना मी जाहीरपणे हा दीडशे पत्रांच्या प्रयोगाचा किस्सा सांगितला, तेव्हा पुल मिस्कीलपणे डोळे वटारून म्हणाले, ‘‘बरा सापडलास! तो अघोरी प्रयोग माझ्यावर करणारा तूच का तो!’’ नाट्यगृह हास्यरसात कल्लोळत राहिले. आता या गोड माणसाशी प्रत्यक्षही छान सूर जुळले होते; तरीही मी आदराने भान व मर्यादेचे अंतर राखून होतो. त्यात सुनीताबाईंचा सर्वश्रुत धाक- याचे एक कारण होतेच.

तरीही तो न जुमानता एकदा मी जरा ‘अधिकपणा’ केलाच. निमित्तही मजेशीर होतं. आळंदीला माउलीचं दर्शन घेऊन मी न माझे प्राध्यापक मित्र प्रा. दत्तात्रेय चितळे व मेव्हणे प्रशांत देशमुख पुण्यातून फिरत होतो. अचानक ते म्हणाले, ‘‘सर, अंतिम वाटावी अशी माझी एक इच्छा आहे.’’ मी थोडा चपापलोच. एवढा उत्साही माणूस एकाएकी असं का बरं म्हणतो आहे? बरं, आमचा दिवसही तसा छान गेला होता. मी फक्त प्रश्‍नार्थक पाहिले. ते म्हणाले, ‘‘एकदा- फक्त एकदा- पुलंना पाहायचंय. दुरून का होईना, बस्स् एकदा योग आणाच.’’ चितळेसरांचं पुलप्रेम मनापासून होतं, हे मला माहीत होतं. आता त्यांच्या स्वरातील ‘पुल’कित भाव मला स्पर्शून गेला होता. पंधरा-वीस पावलं जेमतेम मी चाललो. विचार करीत नि एकदम रस्त्यालगतच्या फुलवाल्याकडून पुष्पगुच्छ घेतला नि रिक्षाला हात केला. चितळेसरांना तर काय घडतंय हेच कळेना. रिक्षाचालकाला मी फर्मावले- ‘‘कमला नेहरू पार्क, रूपाली.’’ चितळेसर तर केवळ नि:शब्द होते. अवाक् व्हायला काही क्षण होते. काही मिनिटांत आम्ही एका दरवाजासमोर उभे होतो. पाटी होती. पु. ल. देशपांडे. स्वाक्षरी शैलीतील ती पाटी. बेल दाबली. अपेक्षेप्रमाणे सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. माझी धडधड वाढली. इतर दोघांचे काय झाले मला कळले नाही. मी नाव सांगताच सुनीताबाईंनी हसल्यासारखे केले.

‘‘फोन करून यायला हवे होते.’’
‘‘फोन नंबर नव्हता.’’
‘‘त्यासाठी आपल्याकडे डिरेक्टरीची सोय असते.’’
‘‘सुचलं नाही.’’
‘‘मग निदान वन् नाइन् सेव्हन्ला विचारून फोन नंबर घ्यायला हवा होता.’’
‘‘फक्त पाचच मिनिटं.’’
‘‘जो लेखक आवडतो- त्याच्या आरोग्यासाठीच त्यांना आरामाची गरज ओळखून मी म्हणतेय.’’
सगळी झाडमपट्टी सोसल्यावर एकदम चित्र पालटले. समोर खुर्चीत चक्क पुल! डोळ्यात तेच उत्साही बुद्धिमान मूल! चेहर्‍यावर केवढं निर्मळ हासू!

चॅर्ली चॅपलीनला पाहिल्यावर पुलंना जो अपरिमित व अवाक् करणारा आनंद झाला होता- प्रा. चितळे यांच्या चेहर्‍यावर तोच भाव होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते नि त्यांनी पुलंचे पाय धरून चक्क साष्टांग नमस्कार घातला. शब्दातीत असं ते भक्तिचित्र मी जन्मात विसरणार नाही. पार्किन्सनने कंप पावणारे हात- त्यांनाही दाटून आलेले- असे पुल मला म्हणाले, ‘‘प्रवीण, अरे हा इतका वाकलाय की त्याच्या वाकण्यापुढे मला वाकावं लागतंय.’’ आणि त्या भावकल्लोळातही हास्यकल्लोळ झाला. संध्याछाया नुसत्याच ‘भिववू’ लागण्याच्याच नव्हे, तर- ओढू लागण्याच्या वाटेवरही ‘पुल नावाचं एक मन’ केवढं प्रसन्न होतं. खरंच, पुलंच्या माणूसपणाची थोरवी मराठी मन निरंतर गातच राहीन.
मी एवढंच म्हणेन-
पुल असताना मी जन्माला आलो, त्यांना पाहता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांचा हात पाठीवरून फिरला. माझ्यासारख्या मराठी भाषेच्या एका रसिकाला दुसरं अजून काय हवं असतं…!
प्रवीण दवणे
https://tarunbharat.org/?p=69307

पुलस्पर्श - शाली

सांगायचं म्हटलं तर ‘अफाट’ या एकाच शब्दात पुलंची कहाणी सांगता येईल पण लिहायचं ठरवलं तर मात्र हजारो पानांचे खंड लिहूनही त्यात पुलंना पकडता येईलच याची खात्री नाही. काय लिहायचं भाईंविषयी? त्यांच्या लेखनावर लिहायचं की त्यांच्या संगीतावर लिहायचं, त्यांच्या अभिनयावर लिहायचं की एक माणूस म्हणून त्यांच्यातल्या नैतिकतेविषयी लिहायचं, दातृत्वाविषयी लिहायचं की समाजाचे ऋण फेडण्याच्या त्यांच्या प्रामाणिक वृत्तीबद्दल लिहायचं? एका माणसात खरं तर किती गुण विधात्याने द्यावेत याला काही मर्यादा असतात. पण त्या सर्व मर्यादा ओलांडून ईश्वराने त्यांना घडवलं असावं असं वाटतं. ‘व्यर्थ जन्मास आलो’ असं वाटायला लावणाऱ्या या काळात पुलंची नुसती आठवण आली तरी असं वाटतं की माझं भाग्य म्हणून मी या पुरुषोत्तमाच्या कालखंडात जन्मास आलो. माझ्या आयुष्यातील काही वर्षांना त्यांचा जवळून स्पर्श झाला. या माणसाला कधीही देशाची सीमा आडवी आली नाही की कधी भाषा आडवी आली नाही. जात, धर्म, वर्ण यांची कधी अडचण आली नाही की विशिष्ट विचारसरणीची बाधा आली नाही. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर’ तेथे तेथे पुलंनी मुक्तसंचार केला. मनमुराद आस्वाद घेतला. आणि महत्वाचे म्हणजे या सर्व प्रांतात मुसाफिरी करताना त्यांनी सदैव मराठीपण जपले. समाजात असलेल्या काही दांभिक वृत्तींवर अतिशय परखड शब्दात लिहिताना त्यांनी कधीही स्वतःचे संतुलन ढळू दिले नाही. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर

जगभरच्या अनेक देशांत
देशस्थ होऊन फिरले
पण मनातील मराठीपणा
कधी मावळला नाही-

दुनियेच्या बाजारपेठेत
मनमुराद वावरले
पण काळजातील बुध्द
कधी काजळला नाही

विनोदी लेखन हा पुलंच्या अनेक पैलूंपैकी फक्त एक पैलू आहे. खरे पुलं त्यापलीकडे कितीतरी आहेत. भाईंचे आजोळ तसे पहायला गेले तर गोवा. पण काही कारणाने ही दुभाषी मंडळी कारवारला स्थलांतरित झाली. भाईंनी ’गणगोत’मध्ये ‘ऋग्वेदी’ नावाने आजोबांविषयी लिहिले आहे. या ऋग्वेदींचा म्हणजेच वामन दुभाषी यांचा जन्म कारवारला झाला. ह्यांचीच एकुलती एक मुलगी कमल म्हणजेच भाईंची आई. कमल बेळगावच्या (चंदगड) लक्ष्मण देशपांडे यांच्या पत्नी म्हणून आल्या. या लग्नाअगोदर लक्ष्मणरावांचे एक लग्न झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना वत्सला नावाची मुलगीही होती. ही वत्सला भाईंची सावत्र बहीण असली तरी त्यांच्यात फार जिव्हाळ्याचे नाते होते. भाई कधीही दादरला त्यांच्या या वत्सीताईकडे जात. या वत्सीताईचाही आपल्या बाबूलवर फार जीव होता. सावत्रपणा कधी या भावा-बहिणींच्या आड आला नाही. आईनंतर भाईंना ‘बाबूल’ म्हणून हाक मारणारी वत्सीताई ही एकमेव व्यक्ती होती. भाईंमध्ये असलेले संगीताचे वेड हे आईकडून आलेले. आईंचा आवाजही अतिशय सुरेल होता. त्या पेटीही वाजवत असत. वडिलांनाही गाण्याचे प्रचंड वेड. फिरतीची नोकरी असल्याने बरेचदा ते बाहेरच असत. कुटुंबावर निस्सीम प्रेम करणारा हा माणूस व्यवहारात अतिशय सचोटीने वागणारा होता. नाटकांचे तर त्यांना प्रचंड वेड. बालगंधर्व म्हणजे तर त्यांचे गाण्यातले देवच होते. पण भाईंवर कलेचे खरे संस्कार झाले ते आजोळकडून. एकूण दुभाषी कुटुंब हे कलेची आवड जोपासणारे. आजोबा कीर्तन सुरेख करत. आज्जी तर अगदी हजरजबाबी आणि विनोदाची उत्तम जाण असलेली होती. भाईंनी ’गणगोत’मध्ये आज्जीविषयीही अगदी भरभरुन लिहिले आहे. या ‘बाय’नेही भाईंवर नकळत अनेक संस्कार केले. आधी बेळगाव, मग मुंबईत जोगेश्वरी आणि नंतर पार्ल्याला हे कुटुंब स्थिरावले. पार्ल्यामध्ये देशपांडे आणि दुभाषी या दोन्ही कुटुंबांनी अगदी शेजारी शेजारी घरे बांधली. पुढे पार्ल्याचा हा ‘अजमल रोड’ भाईंमुळे अगदी सामान्य माणसालाही माहीत झाला. भाईंच्या पार्ल्याच्या वास्तव्यामधल्या आठवणी त्यांच्या लेखनात अनेक ठिकाणी आढळतात. पार्ल्यातल्या दिवसांना भाईंच्या आयुष्यात फार महत्वाचे स्थान होते. मॅट्रिक झाल्यानंतर पुलंनी जोगेश्वरीच्या ‘इस्माईल युसुफ कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजनेही पुलंना अगदी भरभरुन दिले. मर्ढेकर या कॉलेजमध्ये त्यावेळी इंग्रजी हा विषय शिकवत. कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतर भाईंनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली. आबांची फार इच्छा होती की आपल्या या मुलाने वकिल व्हावे. साधारण याच काळात भाईंची ओळख ‘रेडिओ’ या नव्या माध्यमाशी झाली. भाईंनी स्वतःच सांगितलंय की “बातम्या आणि बाजारभाव सोडून सगळं मी केलं” त्यांचे रेडिओवर गाणी, नाटकं, भाषणं वगैरे सुरु होते. मित्रांबरोबर गाण्याच्या बैठकी रंगत होत्या. याच दरम्यान भाईंच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांना नाईलाजाने पार्ल्याहून पुण्यात शिफ्ट व्हावे लागले. पुण्यात आल्यानंतरही पुलं शांत बसले नाहीतच. त्यांनी फर्ग्युसनला धमाल सुरु केली. पुण्यात त्यावेळी गणपतीचे दहा दिवस गाण्यांची अगदी चंगळ असे. रोशनआरा बेगम, हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीमखाँ, मास्टर कृष्णराव यांच्यासारख्या दिग्गजांच्या स्वरांनी सगळ्या पुण्याचा माहोल कसा भारावून जात असे. भाईंसाठी हे दहा दिवस म्हणजे अगदी पर्वणीच असत. या पुणे मुक्कामीच त्यांना केशवराव भोळे आणि जोत्स्नाबाई यांची सोबत-संगत मिळाली. हा मजेचा काळ सुरु होता. पुढे भाई बेळगावला गेले. तेथल्या आर्ट सर्कलमध्ये रमले. खरं तर मुंबई काय, पुणे-सांगली काय किंवा बेळगाव काय, भाईंना काहीच फरक पडत नव्हता. त्यांनीच म्हटल्या प्रमाणे ‘रांगोळीचा कण जेथे पडतो तेथे आपला रंग घेऊन पडतो’ या उक्ती प्रमाणे ते जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी माणसे जोडली, आवडत्या कामात मन रमवले आणि तेथील तिळतांदूळ संपताच पुढच्या मुक्कामाकडे अत्यंत आनंदाने प्रस्थान ठेवले. बेळगावच्या आर्ट सर्कल मधे रमलेले पुलं पुन्हा एकदा पुण्याला आले.

मुंबईला असताना ओरिएंट हायस्कूलमध्ये भाई शिकवत असताना त्यांनी सत्तेचे गुलाम हे नाटक बसवले होते. त्याच हायस्कूलमध्ये ठाकूरबाईही शिकवत होत्या. या नाटकामुळे ठाकूरबाईंची आणि पुलंची जवळीक जरा जास्तच वाढली. आणि शेवटी रत्नागिरीच्या ठाकूर वकिलांची ही सुनीता नावाची शिक्षिका असलेली मुलगी आणि भाई यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे लग्न रत्नागिरीला सुनीताबाईंच्या घरीच झाले. त्याचे सविस्तर वर्णन पुलंनी अनेकदा केले आहे. नाटक, रेडिओ, संगीत याबरोबरच भाईंना चित्रपटाचेही आकर्षण होतेच. गुळाचा गणपती हा चित्रपट म्हणजे ‘सर्व काही पुलं’ असा होता. वंदे मातरम हा चित्रपटही अगदी झपाटल्यासारखा काढला सगळ्यांनी. यातही मुकुंदाच्या प्रमुख भूमिकेत भाई होते तर कृष्णेची भूमिका सुनीताबाईंनी केली होती. या चित्रपटाकडून सगळ्यांनाच फार अपेक्षा होत्या पण सेन्सॉर बोर्डाने अगदी क्षुल्लक कारणावरुनही त्यात फार काटछाट केली. आज हसू येईल पण “करु वा रणी मरुन जाऊ” सारखी वाक्ये ‘हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी आहेत’ म्हणून कापली. असे अनेक प्रसंग कापून बोर्डाने या चित्रपटाचे अक्षरशः मातेरे केले. पण यातली गाणी मात्र लोकांच्या पसंतीला उतरली. ’वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ यासारखी गाणी लोकांनी उचलून धरली. दुर्दैवाने आज या चित्रपटाची फिल्म देखील उपलब्ध नाही. पण एकूणच चित्रपट सृष्टीतला लबाड कारभार पुलंना काही मानवला नाही आणि त्यांनी चित्रपट क्षेत्र सोडले. पुलंच्या या एका निर्णयामुळे रसिक अनेक चांगल्या कलाकृतींना मुकले. अनेक उत्कृष्ट कलाकृती कधी जन्मालाच आल्या नाहीत. पुलंना एकदा विचारले असता ते म्हणाले होते की “मी चित्रपट नाही सोडला, चित्रपटानेच मला सोडले”. या क्षेत्राने पुलंना अगदीच कडू अनुभव दिले. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या पदवीदान प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पुलंनी अगदी कटु उद्गार काढले होते. ते म्हणाले, “आज मागे वळून पाहताना मी कधी काळी चित्रपटसृष्टीत होतो यापेक्षा मी त्यातून बाहेर पडलो हेच जास्त अभिमानास्पद वाटते”. सिनेमाचे जग सोडेपर्यंत पुलंनी त्यात नजरेत भरेल अशी भर घातली होतीच.

नाट्यक्षेत्रातही पुलं असेच रमले. पण सुरुवात मात्र अतिशय निराशाजनक झाली होती. तुकारामांचे अभंग हे गंगेने तारले म्हणजेच ‘लोकगंगेने’ तारले. लोकांना हे अभंग मुखोद्गत होते. त्यांचेच नंतर संकलन केले गेले. या आशयाचे ‘तुका म्हणे आता’ हे नाटक पुलंनी लिहिले. सगळ्यांनीच हौसेने कामे केली होती. यातील गीते गदिमांनी लिहिली होती. पण प्रेक्षकांनी मात्र हे नाटक सपशेल नाकारले. या नाटकाचे फक्त इन मिन तीन प्रयोग झाले. ’तुका म्हणे आता’मध्ये ‘संतू तेल्या’ची भूमिका वसंतराव देशपांडे यांनी, ‘ग्यानू चांभार’ ही भूमिका वसंत शिंदे यांनी तर ‘शिवाजीमहाराजां’ची भूमिका वसंत सबनीस यांनी केली होती. नाटक अगदी जोरात आपटले. लोक विनोदाने म्हणायचे “तीन वसंत एका संताला वाचवू शकले नाहीत” .या नाटकाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादावर विनोद करताना मी भाईंना पाहिले होते. आणि त्याच वेळी “अरे या नाटकाचा असा शेवट नको व्हायला होता रे!” अशी खंतही मी त्यांच्या तोंडून ऐकली होती. भाईंचे हे नाटक जरी पहिल्याच प्रयोगात पावसाच्या मुसळधार सरीत बुडाले तरी लोकगंगेने मात्र ते तारले नाही हे खरंच फार दुर्दैवी आहे. ’भाग्यवान’ आणि ’तुका म्हणे आता’ या नाटकांनी जरी भाईंना धक्का दिला असला तरी त्यानंतर आलेल्या ’तुझे आहे तुजपाशी’ आणि ’सुंदर मी होणार’ या नाटकांनी मात्र महाराष्ट्राला वेड लावलं. या नाटकांनी भाईंना रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा करुन दिली. या सगळ्या विविध क्षेत्रात पुलंचा मुक्त संचार सुरु असतानाच भाईंना दिल्लीहून आकाशवाणीचे आमंत्रण आले. देशाला  कत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याची नवलाई होती तशीच आकाशवाणीचीही होती. आकाशवाणीवर अनेक प्रतिभावंतांची मांदियाळी जमा झाली होती. नभोवाणी मंत्रालयाचे सचिव प्रमुख सचिव पुरुषोत्तम लाड हे स्वतः कविमनाचे, कलासक्त व बुद्धिमान होते. भाईंना तसेही लिहिण्यापेक्षा बोलण्यात जास्त रस. हा गुण बहुतेक बायकडून आला असावा. त्यामुळे भाई आकाशवाणीवर छान रमले. दर सोमवारी संध्याकाळी एखादी कौटुंबिक नाटिका ते सादर करत असत. ’अमृतवृक्ष’, ’जनाबाई’ या त्यांच्या संगीतिका श्रोत्यांना खूप आवडल्या. ’गोफ’ सारखा कार्यक्रमही खूप गाजला.

पुलंचे पहिले पुस्तक माझ्या हातात आले ते व्यक्तिचित्रे असलेले ’व्यक्ती आणि वल्ली’. हे पुस्तक वाचले आणि अगदी झपाटल्यासारखे झाले. यातल्या प्रत्येक व्यक्तीने मला जेवढे हसवले तेवढेच रडवले देखील. पुलंच्या या लेखनशैलीच्या मी इतका प्रेमात पडलो की सुरवातीला मी दुसरे काही वाचायलाच तयार नव्हतो. त्यांची ’गणगोत’, ’गुण गाईन आवडी’ आणि ’मैत्र’ ही व्यक्तिचित्रे असलेली पुस्तके मी अक्षरशः पाठ केली. व्यक्ती आणि वल्लीमधील पात्रे काल्पनिक असली तरी इतर पुस्तकांमधल्या व्यक्ती या खऱ्या होत्या, प्रसिध्द होत्या. त्यांच्याबद्दल वाचताना एक वेगळीच मजा आली. ’गणगोत’मध्ये नावाप्रमाणेच पुलंच्या नात्यातल्या व्यक्तींचे चित्रण होते. त्यातही मला भावून गेले ते बाय आणि दिनेश. दिनेश वाचताना तर असं वाटलं की आता त्याची बोबडी हाक ऐकायला येते की काय. पांडित्यपूर्ण भाषेत लिहिणे सोपे पण बाळबोध लिहिणे अतिशय अवघड. पुलंना ही कला फार अप्रतिम साधली होती. ’मैत्र’मध्ये त्यांच्या आयुष्यात आलेल्या त्यांच्या मित्रांची व्यक्तिचित्रे आहेत. ती वाचायलाही खूप मजा येते. ’गुण गाईन आवडी’मधली माणसे वाचताना अगदी भारावून जायला होते. माणूस म्हटला की त्यात डावं उजवं हे असणारच, पण पुलंची नजर ही फक्त समोरच्या गोष्टीतून सौंदर्यच पहाणारी होती. मग ती एखादी व्यक्ती असो, प्रसंग असो वा प्रांत असो. असं कोणतं क्षेत्र आहे की ज्यात उत्तुंग कर्तृत्व असलेली व्यक्ती पुलंची स्नेही नव्हती? लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार, अभिनेते, समाजसेवक, विचारवंत, गायक, वादक, प्रकाशक, रसिक, जेथे जेथे काही सुंदर आहे तेथे तेथे पुलं अंतरीच्या ओढीने गेले. त्यात स्वतःला आकंठ बुडवून घेतलं त्यांनी. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे करणारी शैली, तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग यामुळे पुलंची ही माणसे आपल्याला क्षणातच ’आपली’ वाटायला लागतात. काही काही व्यक्तिचित्रांमध्ये पुलं अतिशय भावुकतेनेही लिहून जातात. त्यांच्या अशा या व्यक्तिचित्रांचा दर्जा जरा वेगळाच ठरतो आणि मनाला स्पर्श करुन जातो. बेगम अख्तरवरचा ‘जाने क्यूं तेरे नाम पे रोना आया’ हा लेख वाचताना हे सारखे जाणवत रहाते. येथे पुलंमधला चित्रकार हे व्यक्तिचित्र रंगवताना अगदी गहिऱ्या छटांचा
वापर करतो. माणसांचे वेड असलेला हा एक वेडा माणूस होता हेच खरं. अर्थात त्यांनाही आयुष्यात काही नमुने भेटलेच. “आपण फक्त एक विदूषक आहात हे सदैव लक्षात ठेवा” असं स्पष्ट शब्दात सांगणारे पत्रही पुलंना एका व्यक्तीने पाठवले होते. पण अशी उदाहरणे अतिशय क्वचित. एक मात्र आहे, माणसातले फक्त चांगले तेच पहायचे या स्वभावामुळे पुलंनी रंगवलेली ही व्यक्तिचित्रं बऱ्याचदा एकसुरी वाटून जातात. क्षणभर असं वाटून जातं की त्यांना फक्त उत्तुंग व्यक्तिमत्व असलेली, अजिबातच हिणकसपणा नसलेली, फक्त देवमाणसेच भेटली की काय? त्यांच्या या प्रचंड मोठ्या आणि विविधता असलेल्या गोतावळ्यात फक्त आणि फक्त आदर्श व्यक्तीच होत्या का? ते कसं शक्य आहे? शक्यच नाही. पुलंनी मात्र भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिमधील हिणकस जे आहे त्याकडे दुर्लक्ष करुन उत्तमाला प्रतिसाद दिला. परिणामी त्यांनी रंगवलेले हे व्यक्तींचे कॅन्व्हास हे एकाच रंगसंगतीमध्ये रंगवल्यासारखे एकसुरी झाले. अर्थात त्यामुळे त्यातला गोडवा मात्र अजिबात कमी होत नाही. पुलंचा हा हळवा आणि गुणग्राहक स्वभाव लक्षात घेता कुणाचा गैरसमज होईल, पण वेळप्रसंगी पुलंची लेखणी फार परखडपणेही चाले. तिला अशावेळी दुधारी तलवारीची धार चढे. पण हा परखडपणा प्रत्येकवेळीच पुलं वापरत असं नव्हे. ज्याला आपण ‘वाभाडे काढणे’ म्हणतो ते तसे न काढता ते खूपदा उपहासात्मक लिहून त्याची कसर भरुन काढत. असं उपहासात्मक लिहिताना कधी कधी पुलंची लेखणी फार टोकदार व बोचरी होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘भगवान श्री सखाराम बाईंडर’ ही एकांकिका. हिची मी असंख्य पारायणे केली आहेत. या नाटकात पुलंची लेखणी इतकी मर्मावर आघात करत चालली आहे की विचारु नका. अर्थात हे माझे मत आहे. इतरांना हे नाटक वाचताना कदाचित काही वेगळेही जाणवले असेल, नाही असे नाही. विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक रंगमंचावर आले आणि एकच गदारोळ झाला. अश्लील अश्लील म्हणुन समाजातला एक भाग अक्षरशः पेटून उठला. नाटकाचे प्रयोग बंद पाडले गेले. अश्लीलतेचे आरोप करणाऱ्यांना उत्तर द्यायला म्हणू हवं तर पण पुलंनी ’भगवान श्री सखाराम बाईंडर’ हे नाटक लिहिले. तेंडुलकरांची पात्रे कसलाही विधिनिषेध न बाळगता, स्पष्ट आणि बोलीबाषेतले शब्द वापरुन बोलतात. पुलंनी तेंडुलकरांच्या संवादाचा आशय तोच ठेवत शब्दशैली बदलली. या नाटकात बुवाबाजीवरही पुलंनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. आशय तोच ठेवून जर शब्द बदलले तर ते स्वीकारायला समाजाचा फारसा विरोध नसतो हे दाखवण्यासाठी पुलंनी या नाटकात अक्षरशः काही उच्चार करवणार नाहीत अशा शिव्यांचे प्रयोजन देखील केले. भगिनीभोगी, दरिद्रलिंगी ही काही उदाहरण त्यासाठी पुरेशी आहेत. या नाटकाच्या निमित्ताने पुलंनी समाजात असलेल्या अनेक दंभांवर सणसणीत आसूड ओढला आहे. तेंडुलकरांच्या नाटकावर त्यावेळच्या काही प्रथितयश अभिनेत्रींनी खूप टीका केली होती. त्याचा समाचार घेताना पुलं नाटकात सखारामच्या तोंडात अनेक विनोदी आणि उपरोधिक संवाद टाकतात. एका ठिकाणी पुलंनी कंसात टीप देताना लिहिले आहे “आमचा निषेध करु नये ही समस्त परमपवित्र नाट्यचंद्रिका, सौंदर्याच्या तोफा-बंदुका वगैरेंना लेखकाची नम्र विनंती आहे” जाता जाता पुलं त्यावेळच्या ‘सोज्वळ’ नाटकांची टोपी उडवायला विसरत नाहीत. सखारामची एक रखेल सखारामला उद्देशून खालील कविता म्हणते:

केशरमिश्रित मोतीचूर तू, मी साधी रेवडी
वाहते ही दुर्वांची जुडी।

मराठियेचा मत्त मयूर तू, मी देशी कोंबडी
वाहते ही दुर्वांची जुडी।

या अशा हलक्याफुलक्या विनोदाबरोबरच पुलंनी सखाराम या पात्राचा वापर करुन टोकाला जाऊन टीका केली
आहे. एके ठिकाणी तो म्हणतो

सखाराम: कसं राह्यचं ते सोयीनं ठरवू, कसं दिसायचं ते महत्त्वाचं. संस्कृती म्हणजे असं असं असणं नव्हे. असं
असं दिसणं. पुस्तकाला कापडी बाइंडिंग असतं तसं माणसाला मॉरल बाइंडिंग असतं.
चंपा: त्याचा बायंडर कोन?

सखाराम: ज्यांना कधी आपल्यासारखं झोपडपट्टीत राहावं लागत नाही, ज्यांच्या बायकांना साड्या बदलायला निराळ्या खोल्या असतात, ज्यांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च प्रकारच्या गरजा भागतात. ज्यांना रोज शंभर शंभर रुपयांची विलायती परवडते, जे आकडा लावत नाहीत, घोडा लावतात- 

चंपा: म्हणजे पैशेवाले?
सखाराम: थू; पैशेवाले नाही म्हणायचं, मॉरल बायंडर.
चंपा: मारो गोली
सखाराम: चंपूताई, आपण गोळ्या खाणारे-मारणारे ते. आपला आवाज बंद करणारे ते. आपली भाषा त्यांना सोसत नाही. आपली गटारं त्यांना पाहवत नाही ना, तशी. चंपाताई, तुझी भाषा सुधारली पाहिजे. तरच संस्कृती टिकते. संस्कृतीला खरं बोललेलं खपत नाही, समजलं? संस्कृती म्हणजे वरुन कीर्तन आणि आतून तमाशा.

संस्कृतीबद्दल ही जळजळीत मतं तेच पुलं मांडत आहेत ज्यांनी आम्हाला “संस्कृती म्हणजे सिंहगडावर भरुन आलेली छाती” असं म्हणत संस्कृतीची ओळख करुन दिली. व्यक्तिचित्रे लिहिताना पुलं व्यक्तींमधील हिणकसाकडे दुर्लक्ष करतात पण समाजात जेथे जेथे हिणकस दिसले तेथे तेथे त्यांनी आपल्या पद्धतीने खरपूस समाचार घेतला आहे. ’भगवान श्री सखाराम....’ मध्ये बोचरा होणारा पुलंचा उपरोध बटाट्याच्या चाळीत मात्र अगदी नर्म विनोदी होऊन आपल्याला भेटतो. बटाट्याची चाळ हा ललितलेखनाचा प्रकार. पुलंच्या इतर ललितांमध्ये चाळीला अमाप प्रसिध्दी मिळाली. पुलंनी हे नाव खरंतर पठ्ठेबापूरावांच्या एका वगात ऐकले होते तेच त्यांनी घेतले. पण त्याकाळात खरेच अशी एक बटाट्याची चाळ मुंबईत होती. पुलंच्या या कै. धुळा नामा बटाटे, टोपल्यांचे व्यापारी यांनी वसवलेल्या या चाळीत चार पिढ्या नांदल्या. त्यामुळे पुलंना भाष्य करण्यासाठी वेगवेगळ्या वयाची, स्वभावाची पात्रे आयतीच मिळाली. या चाळीच्या संगीतिकेत पुलंनी अतिशय समर्पकशब्दात चाळीची ओळख करुन दिली आहे. ती प्रत्यक्ष पुलंनीच गायलेल्या ध्वनिमुद्रिकेतच ऐकायला हवी. साठ बिऱ्हाडांच्या चाळीत खास नग राहतात. चाळीतली एक एक प्रकरणं वाचून अक्षरशः चकित व्हायला होते. संगीतिका हा तर माझा सर्वात आवडता भाग. ’गच्चीसह.. झालीच पाहिजे’,’ भ्रमणमंडळ’, ’सांस्कृतिक शिष्टमंडळ’ हे भाग तर निव्वळ अप्रतिम आहेत. भ्रमणमंडळाचा मुंबई ते पुणे हा प्रवास म्हणजे तर धमाल आहे. काय काय घडत नाही या मंडळाच्या बाबतीत? हमाल त्रास देतात, टांगेवाला फसवतो, सामान हरवते, कोचरेकर मास्तरांच्या धोतरावर टिफीनमधला रस्सा सांडल्यावर “किती तिखट घालतात हे लोक भाजीमधे” ही प्रतिक्रिया ऐकून तर मला श्वास घेता येईना इतके हसू आले होते. मनसोक्त हसत आपण जेंव्हा चाळीच्या शेवटच्या अध्यायावर येतो आणि ‘चाळीचे चिंतन’ ऐकतो तेंव्हा खरोखर अगदी भरुन येते. चिंतन ऐकताना सारखं एक जाणवत राहतं की पुलंनी चाळीतली पात्रे जरी काल्पनिक उभी केली असली तरी त्यांचे आनंदाचे ठेवे, दुःखाची कारणे, एकोपा हा अगदी खरा आहे. जुन्या आठवणी काढून ‘आमच्या काळी असे नव्हते हो’ असं म्हणणारा मी नाही तरीही फ्लॅट संस्कृतीत येऊन आपण बरंच काही गमावलं आहे याची मनोमन खात्री पटते.

पुलंनी भारतीय संस्कृतीवर तर प्रेम केलेच पण परकीय संस्कृतींचाही त्यांनी जवळून अनुभव घेतला. त्याचे आलेले कडुगोड अनुभव पुलंनी लिहून ठेवले आहेत. ’अपूर्वाई’ आणि ’पूर्वरंग’ ही दोन्ही पुस्तके पुलंच्या परदेशवारीवर सगळ्या बाजूंनी प्रकाश टाकतात. पुलंनी त्यांच्या पहिल्याच परदेश प्रवासाचे वर्णन केले ते ’अपूर्वाई’मध्ये. पहिलीच परदेशवारी असल्याने पुलंचा प्रवास घरातूनच सुरु झाला. या लहानमोठ्या अनुभवांचे वर्णन, उल्लेख त्यांच्या अनेक लेखांमध्ये अधूनमधून येत राहतात. अगदी ’असा मी असामी’मध्येही याचा वेगळ्या संदर्भात उल्लेख येऊन जातो. ’अंतू बर्वा’मध्येही याचा उल्लेख आढळतो. पुलंनी या प्रवासांमध्ये नाटके पाहिली, संगीत ऐकले. प्रायोगिक रंगभूमीवर केले जाणारे विविध प्रयोग पाहिले, त्यांचे कौतुकही केले. पण महत्वाचा विषय आणि आवड म्हणजे माणूस. या इंग्रज माणसांचे त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तेथील व्यक्तींना भारतातील व्यक्तिमत्वांच्या काल्पनिक वेशभूषेत पाहिले. तेथील लोकांच्या अभिमानाविषयी पुलंनी कौतुकाने लिहिले आहे तसेच त्यांना खटकलेल्या गोष्टींविषयी देखील पोटतिडकीने लिहिले आहे. ’ जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकात पुलं एके ठिकाणी लिहितात की:

"न्यूयार्कच्या रस्त्यातली म्हातारीच भयग्रस्त नाही, तर हा सगळा समाजच भयग्रस्त आणि भ्रमिष्ट झाल्यासारखा मला वाटत होता. ‘सेल’ हा इथला मूलमंत्र आहे! वस्तू विका, बुध्दी विका, कला विका, कौमार्य विका, तारुण्य विका, विकण्यासारखे उरत नाही वार्धक्य! म्हणूनच ते निरुपयोगी होते. कुणालाच ते नको असते. ‘विक्री’ हा ज्या संस्कृतीचा युगधर्म होतो, तिथे वार्धक्याचे निर्माल्य होत नाही, पाचोळा होतो."

असं काही पुलं लिहून जातात आणि ते वाचताना अंगावर काटा उभा रहातो. परदेशातल्या समाजाकडे पाहून जरी
पुलंनी हे लिहिलं असलं तरी ते यच्चयावत समाजाला लागू पडते. भोगवाद किंवा चंगळवाद याविषयी ते जे
म्हणतात ते येथे दिल्या शिवाय राहवत नाही अगदी. ते लिहितात:

"वयाचे पंधरावे वर्ष उलटण्याच्या आत शरीराचे सगळे भोग कुठल्याही जबाबदारीचे घोंगडे गळ्यात अडकवून न
घेता भोगून झाले की पुढे कसलेतरी कृत्रिम उत्तेजन मिळाल्याखेरीज जगणेच अशक्य! त्यातून मग त्या उत्तेजनासाठी मोटार-सायकलींवरुन भन्नाट भटकणे सुरु होते. दिशाहीन भ्रमंती चालू होते. अनोळखी तरुण- तरुणींची भरमसाट शय्यासोबत घडायला लागते. आणि या साऱ्यांच्या अतिरेकानं ती झिंगही भराभरही ओसरायला लागते. मग ती जोरदार करण्यासाठी सायकीडेलिक विद्युतदीपांच्या घेरी आणणाऱ्या प्रकाशात आणि कानठळ्या बसविणाऱ्या संगीतात बेहोषीचा शोध सुरु होतो. आणि शेवटी साऱ्या संवेदनांचा मेंदूत ठेचून ठेचून भरलेला चिखल मात्र उरतो."

पुलंची ’अपूर्वाई’ आणि ’पूर्वरंग’ ही पुस्तकं आपल्याला एक सुरेख अनुभव देऊन जातात. या दोन प्रवास वर्णनांच्या दृष्टीने ’वंगचित्रे’ आणि ’जावे त्यांच्या देशा’ ही पुस्तके प्रवासवर्णने असली तरी फार वेगळी आहेत. या दोन्ही पुस्तकांच्या शैलीमध्ये, मांडणीमध्ये कमालीचा फरक आहे.

पुलंमधल्या लेखक, संगीतकार, गायक, विचारवंतावर लिहू तेवढे थोडेच आहे. त्यांच्या समाजभानावर स्वतंत्र लेख लिहायला हवा. पुलंच्या दातृत्वाविषयी आजच्या पिढीला फारसे माहीत नाही. त्यांनी किती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली त्याची गणती नाही. ग्रंथालयांना, शाळांना, साहित्यपरिषदेला जमेल तेथे पुलं मदत करत होतेच पण समाजातल्या उपेक्षित वर्गासाठी ज्या संस्था काम करत त्यांनाही पुलंकडून सढळ हाताने मदत होत असे. ‘बेरड’कार भीमराव गस्ती यांची ’उत्थान’ ही संस्था देवदासींसाठी काम करते. या संस्थेला पुलंनी केलेल्या आर्थिक मदतीविषयी गस्ती म्हणतात, “ पुलंनी दिलेल्या देणगीमुळे आम्हाला पुढे जाण्यासाठी एक संधी मिळाली. त्यामुळेच संस्थेची इमारत उभी राहिली” अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. या सगळ्यामागे उभे आहे ते ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ . मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लेख लिहीत असल्यामुळे पुलंच्या साहित्यावर लिहायचा प्रयत्न केला आहे. पण मला स्वत:ला साहित्यिक पुलंपेक्षा समाजसेवक पुलं कितीतरी जवळचे वाटतात. एका समाजसेवकाला समाजाचे किती भान असावे याचे एकमेव उदाहरण म्हणजे पुलं. त्यांच्या विषयी जास्त काय लिहू? पाडगावकरांच्या चार ओळींनी लेखाचा शेवट करतो.

पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.

(संदर्भ: पुलंची पुस्तके, अमृतसिध्दी)

-शाली
मुळ स्रोत - https://www.maayboli.com/node/69190