पुलं च्या साहित्याचा माझ्यावर झालेला हा पहिला परिणाम. आणि पुढे हा परिणाम वाढतच गेला. वडिलांचा व्यासंगही वाढतच होता. पुस्तकाचं कपाट आता अपुरं पडत होतं त्यामुळे कपाटावर पुस्तकं ठेवावी लागत होती. अनेक लेखकांची पुस्तकं संग्रहात सामील होऊ लागली होती. त्यामुळे जे आवडेल ते पुस्तक वाचायला घ्यायचं. साहित्याची मेजवानीच म्हणा ना . आणि बरं का ! हे वाचनवेड एकदा लागलं ना की आपण सगळ्यांपासून अलिप्त होऊन एका वेगळ्याच दुनियेत रंगून जातो. अनेक उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला मिळाली , परंतु पुलं च्या साहित्यातून जे मिळालं त्याचं गारूड अगदी आजही तसच आहे. त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही.
वाचनाची आवड नसलेल्या एखाद्याला किंवा वाचनाची सुरवात करणाऱ्या कुणाला जर वाचनाकडे वळावं असं वाटतं , तर त्याने श्रीगणेशा पुलं च्या साहित्याने करावा असं माझं ठाम वैयक्तिक मत आहे. आता का ? म्हणाल , तर जसं एखाद्याला संगीत शिकण्याची इच्छा असेल आणि त्याला एकदम शास्त्रीय संगीतातील राग , आरोह अवरोह , मात्रा , ताना , पलटे याबद्दल सांगायला सुरवात केली तर तो धास्ती घेऊन , हे काही आपल्याला जमणारं नाही असं वाटून संगीतापासूनच दुरावला जाईल. याउलट त्याने जर सुंदर सोपी बालगीतं , भावगीतं , भक्तीगीतं आधी ऐकायला आणि म्हणायला सुरवात केली तर त्याचा विचार सकारात्मक होऊन "अरे हे आपल्याला जमू शकतं" या भावनेतून तो संगीताकडे ओढला जाईल. तसच साहित्याचं आहे. कुणी जर सुरवातीलाच एकदम थोरामोठ्यांची चरित्र , न पेलणाऱ्या जड भाषेत लिहिलेली पुस्तकं , तत्वज्ञान सांगणारी पुस्तकं वाचायला घेतली तर संभ्रमित होऊन आणि कंटाळून तो साहित्यापासून आणि पर्यायाने वाचन संस्कृती पासूनच दूर जाईल.
आता पुलं च्या साहित्यापासून सुरवात का करावी तर त्यामध्ये हास्यानंद तर आहेच पण त्याबरोबरच एक निरागस सौंदर्य आहे. सोपी भाषा आहे. हेवेदावे , इर्षा , चढाओढ त्यामध्ये कुठेच नाहीत. छान , निखळ आणि आपले वाटणारे , आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे जाणवणारे सुंदर अनुभव व्यक्तिरुप घेऊन आपल्यासमोर येतात. वाचताना मध्येच उत्स्फूर्तपणे खळखळून हसवतात आणि जेव्हा जेव्हा ते मनात उभे राहतात तेव्हाही हास्याचा तोच अनुभव देऊन जातात. आपण अगदी कोणत्याही मनस्थितीत असलो तरीही. पुलंच्या साहित्यात निर्मळ विनोद भेटतो. तो कुणालाही बोचत नाही अथवा ओरबाडतही नाही. खुदकन मात्र हसवतो. वाचकांना आपल्या साहित्यातून ते असा आनंद देऊन जातात कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन तसाच असतो. मग ते शास्त्रीय संगीत असो , लावणी असो किंवा लोकसंगीत असो , खाद्य वर्णन असो किंवा प्रवास वर्णन असो. त्यांच्या लंडन प्रवासात एकदा सायंकाळी ते फिरायला बाहेर पडलेले असताना त्यांनी पाहिलं की जागोजागी प्रणयाच्या बहराने लंडन फुलले होते. त्या प्रेमी युगुलांना बाहेरच्या जगाची शुद्ध नव्हती. ते आपल्या जगात धुंद होते. अशा प्रकारचं ते वर्णन आहे. त्या जागी आपण काय म्हट्लं असतं "शी ! लाज नाही , काही नाही. काय हे रस्त्यात". कोणत्याही गोष्टीकडे पहाताना सौंदर्य दृष्टी जागी ठेवली की असे विचार मनात येत नाहीत. आपला प्रॉब्लेम काय असतो कुणास ठाऊक. म्हणजे मनातून ते आवडलेलं असतं पण आपण असं काही करु शकत नाही याचं वैषम्य वाटत असतं की उगीच आणलेला सोवळेपणाचा आव असतो की दिसलेल्या कोणत्याही गोष्टीवर मतप्रदर्शन केलंच पाहिजे या भूमिकेतून बोलत असतो हे आपल्यालाच कळत नसतं. पुलंच्या या सौंदर्य दृष्टीतूनच तुझे आहे तुजपाशी नाटकातलं काकाजी हे पात्र साकार झालं असावं. आचार्य आणि काकाजी ही दोन टोकाची पात्र या नाटकात पुलंनी आपल्या शब्द श्रीमंतीने अप्रतिम रंगवलीयत.
पुलं च्या प्रवास वर्णनातही माहिती देण्याचा अट्टाहास आणि कोरडेपणा जाणवत नाही तर आपला हात हातात घेऊन हसत खेळत स्वतःबरोबर ते आपल्याला अलवार सफर घडवून आणतात. पुलं चं साहित्य आपल्या मनाला भावतं याचं दुसरं एक कारण म्हणजे सोपी , सुंदर आपलीशी वाटणारी भाषा. उगाच जडबंबाळ शब्दांचा अजिबात न केलेला वापर आणि वाचकांना लिखाणातून काहीतरी शिकवत राहण्याचा न दिसणारा दृष्टिकोन. त्यांच्या वाऱ्यावरची वरात या नाटकातील सुरवातीच्या स्वगतामध्ये ते म्हणतात "आमचा हा कार्यक्रम मजेचा आहे , म्हणजे हसून सोडून देण्याचा आहे. त्यामध्ये साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याचा कृपया प्रयत्न करू नका." इतका छान , सुंदर आणि स्वच्छ दृष्टिकोन घेऊन हा लेखक आपल्यापुढे येतो , आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व बनून जातो.
एखाद्या कलाकृतीचं , नव्या कलाकारांचं कौतुक करताना हातचं राखून न ठेवता करणं , मनापासून दाद देत त्यांचा उत्साह वाढवणं हे त्यांनी आयुष्यभर केलं. आपल्या क्षेत्रात महान कामगिरी केलेल्या अनेक व्यक्तीच्या सत्कार प्रसंगी त्यांनी केलेली भाषणं ही अगदी आजही मनसोक्त आनंद देऊन जातात , कारण ती कौतुक आणि मिश्किल कोट्यानी सजलेली असतात. स्वतःवर विनोद करताना आपली प्रतिष्ठा त्यांच्या कुठेही आड येतं नाही , आणि स्वतःला विदूषक म्हणवून घेताना त्यांना जराही कमीपणा वाटत नाही.
आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचविणारा हा लेखक एकाचवेळी आपल्याला पोट धरून हसवतोही आणि हसवता हसवता हळूच डोळ्यांना पाणावतोही.
टेलिव्हिजन वरील एका विनोदी कार्यक्रमात एका गुंड झालेल्या पात्राच्या तोंडी पुलं बद्दल नेमकं वर्णन आलं होतं. तो म्हणतो "या महाराष्ट्रात एक फार मोठा भाई होऊन गेला. त्यांच्या विनोदाची दहशत आज तो अनंतात विलीन होऊन वीस वर्ष लोटली तरी तशीच कायम आहे. अजूनही ती दहशत कुणी मिटवू शकलेला नाही." त्याचं साहित्य वाचताना आजही वाचक मनमुराद हसतात , कारण त्यामध्ये कधीही न संपणारा जिवंत ताजेपणा आहे. आणि त्या दरवळत रहाणाऱ्या लिखाणातून पुलं आजही आपल्या मनात जिवंत आहेत आणि पुढची कित्येक वर्ष ते तसेच रहाणार आहेत.
लेखक , नाटककार , कथाकार , पटकथाकार , दिग्दर्शक , संगीतकार , अभिनेता , ओजस्वी वक्ता , गायक , संगीतप्रेमी , संवादिनी वादक , सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती , या सगळ्यात मनापासून रमणारा , आस्वाद घेणारा एक रसिक आणि प्रत्येक मराठी माणसाला आपलं वाटणारं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व ,
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु.ल. उर्फ आपले भाई.
- प्रसाद कुळकर्णी