Sunday, January 30, 2022

गांधीजी आणि त्यांचे घड्याळ

गांधीजींनी जीवनातल्या अनेक गोष्टींतून आम्हाला मुक्त होण्याची शिकवण दिली. पण एका वस्तूशी मात्र कायमचं जखडून ठेवलं. ती ही वस्तू. त्या घड्याळाकडे मोठ्या कौतुकाने एखाद्या अवखळ पोराकडे पाहावे तसे पाहत बाळकोबा बोलत होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जाणत जगणे ही एक साधनाच आहे. गांधीजींच्याविषयी विचार करताना अनेक तऱ्हेची कोडी पडतात. गांधीजी आणि भगवद्गीता. माणसाला नव्या नव्या कोड्यातच टाकणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. गांधीजींचा जीवनग्रंथ आणि व्यासांनी दिलेला गीताग्रंथ; अवघड गणितांसारखा सोडवत बसावा. उत्तर सापडले असे वाटावे आणि सापडले त्याहूनही निराळे असावे अशी लगेच शंका यावी. गीतेप्रमाणेच गांधीजींनीही जीवनाच्या किती विविध अंगांना स्पर्श केला. गीता जशी भक्तियोग, कर्मयोग असे अनेक योग सांगते तसाच गांधींचा जीवनग्रंथ असंख्य योगांचे दर्शन घडवतो. पण त्यांचे घड्याळाशी जुळलेले नाते पाहिले म्हणजे वाटते की गांधींना प्रिय असलेला योग एकच होता : तो म्हणजे उद्योग.

ह्या माणसाने एका आयुष्यात किती उद्योग केले ! लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींचा किती खोलात जाऊन विचार केला. ते राजकारणी होते, धर्मजिज्ञासू होते, शिक्षक होते, डॉक्टर होते, वकील होते, विणकर होते, चांभार होते, भंगी होते, पत्रकार होते, संघटक होते, प्रयोगशील ऋषी होते, कृषिक होते, स्वतःचे अर्थशास्त्र निर्माण करणारे अर्थशास्त्रज्ञ होते, अहिंसात्मक युद्धतंत्र निर्माण करणारे सेनापती होते....ही यादी सरता सरणार नाही. इतक्या निरनिराळ्या उद्योगांत स्वतःला गुंतवून घेणाऱ्या ह्या माणसाच्या दिवसाला तास तरी किती होते ? वैज्ञानिकांनी चंद्रावर स्वारी करताना वेळेची जी आखणी केली त्यात तासांची आणि मिनिटांची नव्हे तर सेकंदांचीही विभागणी केली होती. कुठली क्रिया कुठल्या सेकंदाला व्हावी ह्याचे वेळापत्रक त्यांनी आखले होते. गांधीजींनी आपल्या आयुष्यात त्या कालमापक यंत्राकडे वैज्ञानिकाच्या निष्ठेने पाहिले, क्षणाक्षणाचे वेळापत्रक आखले आणि पाळले. अमूक वाजून अमूक मिनिटांनी अमूक एक कार्य करायचे म्हणजे ते करायचेच असे ठरवून त्याप्रमाणे वागायला माणूस कमालीचा निश्चयी लागतो. काळाच्या गणितात स्वतःला इतके बांधून घ्यायला माणूस मनाने फार स्वतंत्र असावा लागतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे असे मानून तो क्षण सोन्याचा कसा होईल याची चिंता करणारा माणूसच कर्माचे प्रचंड पहाड उचलू शकतो. गांधीजींची सारी शक्ती त्यांनी जीवनात क्षणाक्षणाशी जोडलेल्या नात्यातून निर्माण झाली. हीच व्रतबद्धता.

खरे व्रत अपवाद मानीत नाही. निर्जली एकादशी म्हणजे निर्जली एकादशी. आमच्या सारखे निश्चयहीन लोक धर्मापेक्षा आपद्धर्माच्या पळवाटा शोधीत असतात. व्रती माणसाला पळवाटा मान्यच नसतात. व्रतात तडजोडीला जागा नाही. आपला आहार, पोशाख, वाणी हे सारे त्यांनी व्रतनिश्चयाने बांधून घेतले होते. विज्ञानात जशी तडजोडीला जागा नाही तशीच व्रतनिश्चयात नाही. गांधींचे दर सोमवारी मौन असे. साधे कौटुंबिक जीवन जगणाराला असल्या व्रतात कितीतरी वेळा तडजोडी कराव्या लागल्या असत्या. गांधीजींना तर साऱ्या राष्ट्रकुटुंबाचे नेतृत्व करायचे होते. रोज किती तऱ्हेच्या प्रश्नांना आणि ते प्रश्न विचारणारांना तोंड द्यावे लागत होते. पण त्यांनी सोमवारचे मौन चालू ठेवले, वाणीचे कार्य लेखणीने केले. पण जिभेचा पट्टा म्यान करून ठेवला. दिसायला किती साध्या गोष्टी. पण करायला अती बिकट. अचपळ मन माझे नावरे आवरीता असे समर्थांना म्हणावे लागले. बुद्धाच्या जीवनातला मार किंवा येशूचा सैतान म्हणजे आपल्या दुबळ्या मनाचेच अवखळ अपत्य. पण गांधीजींनी आपली व्रते विलक्षण दृढनिश्चयाने पाळली. इंग्लंडच्या बादशहाला साधा गुडघाभर पंचा नेसून भेटायला जाणे ही वरपांगी साधी गोष्ट. पण गोऱ्या कलेक्टराच्या भेटीला जाताना चाललेली सुटाबुटाची आटापीट ज्यांना आठवत असेल त्यांना ह्या साध्या वाटणाऱ्या आचरणामागला निश्चयाचा पहाड दिसेल. आजही साधा सिनेमा पाह्यला जाताना आपल्याला पंचा नेसून जाण्याचे धैर्य होणार नाही. त्यातून इंग्लंडमधल्या तसल्या त्या थंडीत नुसता गुडघाभर पंचा आणि उघड्या अंगावर खादीचे जाडेभरडे धोतर पांघरून जाण्यात शारीरिक क्लेश काय कमी होते ? पण गांधीजींनी हे सारे सहजतेने केले. चर्चिलसारख्या कट्टर साम्राज्यवाद्याला तर गांधीजींची ही अर्धनग्नता त्यांच्या राजकीय आंदोलनापेक्षाही भयंकर चीड आणत होती. गांधींचा उल्लेख त्यांनी सतत अर्धा नागवा फकीर; असाच केला होता. हा अर्धा नागवा फकीर ब्रिटिश साम्राज्यशाहीला नागवून जाईल अशी त्यांनाही कुठेतरी भीती असावी. कारण गांधीजींच्या असल्या वरपांगी विक्षिप्त वागण्यामागले तत्त्वज्ञान न कळण्याइतका चर्चिल हा महापुरुष काही दूधखुळा नव्हता. एका अमेरिकन गृहस्थाने गांधींना त्या वेळी विचारले होते,  मिस्टर गांधी, तुम्ही असल्या ह्या तुटपुंज्या कपड्यांत साक्षात सम्राटांना भेटलात? थंडी नाही वाजली ? 

गांधीजी हसत हसत म्हणाले,

थंडी ? छे! आम्हा दोघांच्या थंडीचे निवारण होईल एवढे कपडे एकट्या बादशहांच्या अंगावर होते ! 

पोशाखाप्रमाणे आहारातल्याही व्रतनिश्चयाचा आणखी एक मजेदार प्रसंग आहे. गांधीजींची आणि त्या वेळचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन ह्यांची बोलणी चालू होती. व्हाइसरॉयने गांधींना आपल्या त्या राजप्रासादात बोलणी करायला पाचारण केल्याचे ऐकून चर्चिलचा तर भडका उडाला होता. ब्रिटिश सम्राटांच्या प्रतिनिधीने ह्या एके काळच्या बॅरिस्टर पण हल्ली उघड्यानागड्या हिंडणाऱ्या देशद्रोही फकिराला राजप्रासादाच्या पायऱ्यांना स्पर्श करायला लावणे आणि त्याच्याशी बोलणी करणे ह्यासारखी किळसवाणी आणि अपमानास्पद घटना नाही; अशा शब्दांत चर्चिलने संताप व्यक्त केला होता. पण एवढ्याने काय होणार होते ? गांधीजींचे लक्ष चर्चेच्या ओघातही घड्याळाकडे होतेच. चर्चा लांबली होती. संध्याकाळच्या भोजनाची वेळ झाली. गांधीजींचा निरोप गेला. जेवण व्हाइसरीगल लॉजवरच आणावे. त्या काळी गांधीजी संध्याकाळी खजूर आणि दूध असा आहार घेत. मीराबेन ते  घेऊन तिथे गेल्या. येरवडा तुरुंगातून सुटताना आठवण म्हणून, कैद्यांना ज्यांतून जेवण देण्यात येते ती भांडी गांधींनी जवळ ठेवली होती. पुढल्या आयुष्यात त्याच वाडग्यातून आणि ताटलीतून ते अन्न घेत.

व्हाइसरॉयना गांधीजींचा आहार पाहण्याची इच्छा अनावर झाली. त्यांनी गांधींना विचारले, आपण कसला आहार घेता ?

खजूर खाता खाता गांधीजी म्हणाले, महमद पैगंबराचा !  आणि चमच्याने वाडग्या- वर टकटक करीत सांगितले, ही येरवडा तुरुंगातली भेट आहे.  जिथे प्रतिबादशहा राहतात त्या दिल्लीच्या राजप्रासादात भोजनाची सारी इंग्रजी आणि शाही शिस्त मोडून हा अर्धनंगा फकीर जेलातल्या कथली कटोरीतून बकरीचे दूध पीत बसला होता हे त्या चर्चिलला कळले असते तर त्याने त्याच वेळी गांधींचा तरी जीव घेतला असता किंवा लॉर्ड आयर्विनचा तरी! आज ह्या गोष्टी किती साध्या वाटतात. पण नावाच्या गोष्टीबद्दल त्या काळी बसलेल्या भयंकर भीतीचा ज्यांना अनुभव आहे त्यांना गांधीजींच्या ह्या आपल्या व्रताशी तडजोड न करता निर्भयपणाने जगण्याचे विलक्षण कौतुक वाटे. हे धैर्य अल्पांशाने का होईना आपल्याला लाभावे अशी तळमळ वाटे.

असले निश्चय पाळायला लोकविलक्षण सामर्थ्य लागते. विलक्षण ढोंग, शिष्टपणा, आचरटपणा अशा अनेक दूषणांचा स्वीकार करावा लागतो. गांधीजींनी ही सारी चिखलफेक मोठ्या मजेत अंगावर घेतली. व्रती माणसात पुष्कळदा कर्कशपणा येतो. गांधीजींना इथे त्यांच्या विनोदबुद्धीने तारले. विनोदाचे मानवाच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाशी नाते तुटले की विनोदाला नासलेल्या पदार्थाची घाण येते. गांधी तर जग जालिया वन्ही संतमुखे व्हावे पाणी; ह्या स्वभावाचे. त्यातून त्या पाण्यात विनोदाचे गुलाबपाणी मिसळलेले. वैयक्तिक सत्याग्रहात विनोबांना पहिले सत्याग्रही म्हणून अग्रमान मिळालेला पाहून नेहरू तडकले. त्यांनी गांधींना चिडून विचारले,  हा विनोबा कोण ? गांधी शांतपणाने म्हणाले, आमचे तीर्थरूप. स्वतःवरच्या कठोरांतल्या कठोर किंवा असभ्यांतल्या असभ्य टीकेला उत्तर देताना त्यांनी संयम सोडला नाही. हिंसा-अहिंसाविचारात कठोर भाषण हीदेखील हिंसा आहे असा त्यांचा पक्का सिद्धांत होता. प्रतिपक्षाच्या मुद्द्यांची उत्तरे द्यायची, गुद्दयांची दखल घ्यायची नाही हे त्यांचे व्रत होते. गांधींना विरोध करणारांनी कित्येक वेळा सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून टीका केली आहे. मला वाटते, मिस मेयोच्या मदर इंडिया ह्या पुस्तकाला त्यांनी गटार- तपासनिसाचा अहवाल; म्हटले हाच कदाचित सर्वांत अधिक कठोर शब्दप्रयोग त्यांच्या हातून झाला असेल. वर्तमानपत्रांच्या जगात शिव्याशाप हा जिथे नियम असल्यासारखी परिस्थिती असते अशा ठिकाणी पत्रकार गांधी मात्र आपल्या सभ्य भाषेच्या निश्चयापासून चळले नाहीत. किंवा त्यापूर्वीचा यंग इंडिया वाचणे हा वाचकांना एक सुंदर आध्यात्मिक अनुभव वाटायचा तो त्यांच्या लिखाणातल्या ह्या सात्त्विकतेमुळे. वायफळ शब्द लिहिणे हाही शेवटी काळाचाच अपव्यय. नेमक्या मुद्द्यांचा परामर्श नेमक्या शब्दांत घ्यायला नेमका वेळ लावावा हा विचार ह्या साऱ्या कृतीच्या मागे असावा. गीतेने युक्ताहार- विहाराचे मोल सांगितले आहे. गांधीजींच्या आहाराप्रमाणे त्यांच्या वाणीनेदेखील शब्दांचे मोल प्राणापलिकडे जतन केले.

असल्या जगण्याला काय विलक्षण संयम लागत असेल! महान निश्चयाशिवाय संयम संभवत नाही. कारण संयम म्हणजे मुख्यतः नकार. नकाराला भलतेच सामर्थ्य लागते. साऱ्या धर्मांनीही नकारातूनच आत्मबल वाढवण्याची शिकवण दिली आहे. सामान्य जीवनात नकारांची चेष्टाच होत असते. आपला दुबळेपणा आपण थट्टेवारी गोष्टी घालून लपवीत असतो. साधेसाधे मोह आपला कबजा घेतात. कर्मयोगी माणसाचा जीवनातल्या श्रेयस आणि प्रेयसशी सतत झगडा चालूच असतो. दुर्दैवाने कर्मयोगाचे कच्या, अनिश्चयी आणि अविवेकी माणसाच्या हाती पोकळ कर्मकांडच होते. ही माणसे कर्मरत नसतात. तद्रुपतेचा त्यांना अनुभवच येत नाही. गांधीजी वहाणा करण्यापासून ते अग्रलेख लिहिण्यापर्यंत कसल्याही कामात तद्रुप होत असत. तद्रुप न होता कर्म सुरू झाले की चिडचिडेपणा सुरू होतो. असली माणसे धर्माला मंत्रचळेपणाचे स्वरूप आणतात आणि कर्मयोगाचेही हास्यास्पद विडंबन करतात. पण दुबळ्या हाती व्रतबद्ध जीवनाची शोकांतिका होते म्हणून संयमी, व्रतबद्ध जीवनाचे मोल कमी होत नाही. माणसाला असले जीवन पहाडाएवढे उंच करते आणि टणक करते. अशा त-हेने जगणारा माणूस मिळालेला आयुर्दाय हीच सगळ्यात मोलाची देणगी मानतो आणि क्षणाक्षणावर पाहारा ठेवून जगतो. त्या मोलाच्या क्षणाना हातातून निसटू देत नाही. ते क्षण सोन्याच्या नाण्यासारखे वापरतो. घड्याळाकडे पाहणे म्हणजे आल्यागेल्या क्षणाचा हिशेब ठेवून त्या क्षणाच्या मोबदल्यात आपण काय कमावले ह्याचा विचार करणे. गांधीजींच्या अपरिग्रही जीवनात कनवटीचे घड्याळ ही एकच महाग वस्तू होती. प्रार्थनेच्या वेळीदेखील त्यांनी ब्रह्मानंदी टाळी लागू दिली नाही. प्रार्थनेसाठी दिलेली ठराविक मिनिटे ते तन्मय होऊन ईशचिंतनात घालवीत, पण ती मिनिटे संपली की (परमेश्वरालाही बरं आहे, उद्या भेटू-ह्याच वेळी म्हणून) उठत. वेळेचे भान ठेवणे म्हणजे भान हरपून काम न करणे अशी सामान्यांची समजूत असते; पण गांधीजींनी उचललेले कामाचे डोंगर पाहिले म्हणजे ठरवलेल्या कालावधीत माणूस एकाग्र होऊ शकला तर काळाची आणि कर्माची सांगड घालून किती काम करू शकतो याची कल्पना येते. मला तरी गांधींचे सारे मोठेपण काळ आणि कर्म ह्यांची सांगड घालण्याच्या त्यांच्या निश्चयात दिसते. कर्म त्यांना काळाबरोबर ओढीत नेऊ शकत नसे की काळ त्यांना बेसावध अवस्थेत पकडू शकत नसे. गांधीजी कालप्रवाहात सारी धारणाशक्ती जागृत ठेवून पोहत होते. स्वतःला त्यांनी त्या प्रवाहातून वाहू दिले नाही. आज आमचे तथाकथित नेते बेभान वाहणाऱ्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवाहातून दिशाहीन असे वाहताना दिसताहेत. कसलीही ऋतबद्धताच नाही. कसलाही अटीतटीने केलेला निश्चय नाही. गटंगळ्या खात, हाती लागेल त्या तडजोडीच्या लाकूडफाट्याचा आधार घेत डोके वर ठेवण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व हे नेतृत्वच नव्हे. ते स्वतःलाच जिथे सांभाळू शकत नाही तिथे इतरांना काय सांभाळणार? गांधीजी वाहणाऱ्या वादळी वाऱ्याशी आणि उसळणाऱ्या लाटांशी समर्थ निश्चयाच्या बळाने झुंज घेत पोहत होते. इतरांना हा निश्चयी जीवनाचा तारक धर्म सांगत होते. काळाच्या प्रत्येक वाहत्या बिंदूची जाणीव ठेवून हा माणूस सदैव जागृतपणाने जगत होता. ज्या झोपेचा धर्मच कालप्रवाहाला विसरणे हा असतो त्या झोपेतसुद्धा गांधींनी घड्याळाची सोबत सोडली नाही. त्यांना गजराची गरज नव्हती. जागेपणीचा निश्चय त्यांना गाढ झोपेतूनही आखलेली कालमर्यादा संपली की उठवायचा.

घड्याळयाशी गांधींनी जुळवलेले हे अजब नाते होते. हल्ली आपण प्लॅनिंगविषयी खूप बोलतो, लिहितो. आपल्या सगळ्या राष्ट्रीय योजना पैशाच्या हिशेबात बोलल्या जातात. अमुक एका कामासाठी इतके लाख रुपये मंजूर झाले आहेत ही आपली भाषा आहे. पण इतकेच तास मंजूर झाले आहेत आणि तितक्या तासांतच ते काम झाले पाहिजे हा निर्धार मात्र नाही. तासांचा निर्धार हा फार महत्त्वाचा. चंद्राच्या प्रवासाला निघालेल्या अवकाश यानाच्या सारथ्यांना वेळेचे बंधन सर्वांत महत्त्वाचे होते. दांडीयात्रा निघाली. तिथी ठरलेली. हा महान यात्रेकरू ठरल्या वेळी आपल्या जोडीला कुणी आहे की नाही याची चिंता न करता निघाला. ठरल्याक्षणी ठरलेली प्रतिज्ञा पुरी करायला हा महात्मा निघणारच ह्याची जनतेलाही इतकी खात्री की ह्या तेजस्वी बिंदूमागून जनसिंधूही निघाला. सत्याग्रहाचा मुहूर्त साधायला माणसे घरादारावर तुळशीपत्र ठेवून निघायची. ही वेळेची गुलामी माणसाला स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देते. घरी आलेल्या पाहुण्याला आता माझे दुसरे काम सुरू होते आहे. उठा. म्हणण्याचे धैर्य आपल्यात नसते. लोक आपल्या घरी आणि आपण लोकांच्या घरी खुशाल तळ ठेवून बसतो. गांधीजींच्या भेटीला हजारांनी माणसे आली आणि गेली. पण ह्या भाऊगर्दीत त्या घड्याळासारखी गांधीजींची दिनचर्या शिस्तीत चाल. ते त्या घड्याळाचे स्वामी होते आणि सेवकही होते. इंग्रजीत घड्याळाच्या काट्यांना हात; म्हणतात. आपल्याला घड्याळाचे काटे बोचतात. गांधींना घड्याळ हात देत असे. हा साक्षात काळाशीच झालेला वाङ्निश्चय. धर्मे, अर्थे, कामे ते त्या काळाशी निगडित झाले. इथे माणसाच्या आळस नामक सर्वांत मोठ्या शत्रूशी झुंज असते. गांधीजींच्या जीवनात विसाव्याचेही यथायोग्य क्षण होते. पण त्या विसाव्याच्या क्षणांनाही त्यांनी घड्याळात गुंतवले होते. विसाव्याचे रूपांतर जसे आळसात केव्हा होईल ते सांगता येत नाही, तसे कामाचे रूपांतरही भ्रमिष्टासारखे विचारहीन राबण्यात केव्हा होईल हेही सांगता येत नाही. शरीराच्या यंत्रालाही शक्तीबाहेर ताबडण्यात येते. साऱ्या ज्ञानेंद्रियांची आणि कमेद्रियांची नीट साफसुफी करावी लागते. तेलपाणी द्यावे लागते. विश्रांती लागते. नाहीतर यंत्र बिघडते आणि बिघडलेल्या यंत्राची कामे वेडीविद्री होतात. गांधीजींच्या देहाचा ताबा आळसानेही घेतला नाही आणि कामानेही घेतला नाही. गांधीजी सर्वांचे होते. पण ते प्रथम त्यांचे स्वतःचे होते. म्हणून गांधी नावाचे लेबल लावलेले ते देहाचे आणि मनाचे यंत्र त्यांनी सदैव लख्ख ठेवले. सव्वाशे वर्षे जगण्याचा करार जणू काय त्यांनी त्या घङ्याळाशीच केला होता. त्यांच्या पोटाशी बिलगलेल्या त्या चिमुकल्या मित्राचा आणि त्यांचा ऋणानुबंध अलौकिक होता. त्या स्नेहात त्यांनी बिघाड येऊ दिला नाही. जीवन ही कालपुरुषाची देणगी मानली आणि त्याने दिलेल्या क्षणांचा अलौकिक व्यापार करून दाखवला. त्या चिमुकल्या घड्याळाशी प्रतारणा न करण्यासाठी, ती जगावेगळी मैत्री अभंग टिकवण्यासाठी त्यांना किती कठोर निश्चयाचे पालन करावे लागले असेल, किती लोकांचे अहंकार दुखवावे लागले असतील ? किती गैरसमज ओढवून घ्यावे लागले असतील ? किती आरोपांना शांतपणाने तोंड द्यावे लागले असेल ? अमूक एक वाजता मला संडास साफ करायचा असल्यामुळे त्या वेळी मला आपल्याला भेटता येणार नाही, असे ज्या कोणाला ऐकावे लागले असेल तो किती संतापला असेल! पण आपल्या सगळ्या कर्मांना सारखेच लेखणाऱ्या गांधींना हे सांगताना कसलेही कष्ट झाले नाहीत. सूत काढणे असो, मैला साफ करणे असो की हरिजन मधला अग्रलेख लिहिणे असो, सारी कर्मे जेव्हा कृष्णार्पणमस्तु;च्या भावनेने होतात त्या वेळी प्रत्येक कर्माला भगवंताच्या पूजाविधीचेच पावित्र्य येते. मग त्या कर्मात लहानमोठेपण राहतच नाही. आई ही आपल्या पोराची सैपाकीण असते, शिंपीण असते, दाई असते आणि भंगीणही असते. त्यातल्या कुठल्याही भूमिकेतले काम करताना तिच्या मातृपदाला कमीपणा येत नसतो. सूत काढणारे कोष्टी गांधी आणि संडास साफ करणारे भंगी गांधी हे त्यांच्या कामाशी इतके समरस होत की त्या कामांना चिकटलेली उच्चनीचता नष्ट होऊन जाई. गांधीजींनी सर्व माणसांना समानतेच्या भूमिकेवर आणण्याचा प्रयत्न केला तो सर्व श्रमांना समानतेवर आणून. एकदा काही वकील गांधीजींच्याकडे राष्ट्सेवेची इच्छा व्यक्त करण्यासाठी आले. गांधी भाजी चिरत होते. गांधींनी त्यांना आपल्या जोडीने भाजी चिरायला सांगितले. वकीलमंडळी रागावून निघून गेली. त्यांच्या दृष्टीने वकिलांनी भाजी चिरणे हे हलके काम होते. गांधींच्या दृष्टीने भोजनाच्या वेळी भोजनाची पूर्वतयारी आणि खटल्याच्या वेळी खटल्याची पूर्वतयारी ह्यांची किंमत सारखीच होती. जे क्षण ज्या कामा साठी त्यांनी नेमस्त केले होते त्या क्षणांना त्या त्या कामाचे देणे देऊन टाकणे हा त्यांचा कर्मयोग होता. इथे उच्चनीचतेच्या विचारांना वावच नव्हता. वास्तविक, हा आदर्श प्राचीन आहे. गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण रथाच्या घोड्यांना खरारा करीत असे, आणि राजसूय यज्ञात विद्वान ब्राह्मणांशी चर्चा करण्यापेक्षा पंक्तीतली खरकटी काढण्यात त्याला अधिक आनंद वाटला होता.

कामाची कमीजास्ती अशी प्रतवारी ठरवणारी माणसे गाफील राहतात. काळाचा गुलाम राहणारा माणूसच शेवटी अशी काही कर्तबगारी करतो की तो कार्याने अमर होतो. कालातीत होतो. म्हणून त्या क्षणांवर पहारा हवा. समर्थांनी अखंड सावधपणाविषयी जो इतका आग्रह धरला आहे याचे कारण दुष्ट प्रवृत्ती गाफील क्षणी माणसाचा कबजा घेतात. गांधीजी जीवनातल्या कुठल्याही क्षणी गाफील राहिले नाहीत. ह्याचा अर्थ स्वतःचा जीव सांभाळीत राहिले असा नव्हे. प्रत्येक क्षणाला राबवीत जगले. जेव्हा आपण एखाद्या वैतागाच्या क्षणी गांधींच्या तत्त्वज्ञानाचा पराजय झाला म्हणतो तो पराजय वास्तविक आपला असतो. आपल्याला सारी सुखे आयती हवी असतात. इतका सावधपणा, इतकी सत्कर्मरती आपल्याला झेपत नाही. पण गांधींसारख्या लाखातल्या एखाद्याला जरी ती झेपली तरी त्यातून केवढा मोठा सामर्थ्याचा प्रवाह सुरू होतो ह्याचा अनुभव गांधीजी जिवंत होते त्या काळात आपल्या देशाने घेतला आहे. गांधींच्या निश्चयी जीवनातून मिळालेल्या स्फूर्तीच्या काही थेंबांनी ह्या मरगळलेल्या देशात नवे चैतन्य निर्माण झाले होते. गांधीजींचा वध झाला. नकाराचे, लोकांना सत्यासाठी नाखूष करण्याचे सामर्थ्य असलेले निश्चयी नेतृत्व संपले. गांधीजींना लोकांमध्ये अप्रिय होण्याची भीती नव्हती. लोकप्रियता न मागे तयाची रमा होय दासी ह्या न्यायाने त्यांच्या मागून येत होती. गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेत केवळ सत्ताधीशांचा खांदेपालट नव्हता. एका व्रतबद्ध, स्वतःच्या मनाने आणि आनंदाने लादून घेतलेल्या शिस्तीत वाढणाऱ्या, माणसा-माणसातल्या आणि निरनिराळ्या कामांच्या भेदाने उभ्या राहिलेल्या भिंती नष्ट झालेल्या अशा समाजाची नवी घडण होण्याची शक्यता डोळ्यापुढे दिसत होती. पण दुर्दैव असे की ह्या महात्म्याचा सहवास ज्यांना आयुष्यभर लाभला अशांच्यातही अनिश्चयी, दोलायमान, तडजोडवादी, सत्ताकांक्षी आणि म्हणून भीरू प्रवृत्ती शिरल्या. सारा डावच उधळला. पुढला सगळा इतिहास हा केवळ गाफीलपणाचा इतिहास आहे. प्रत्येक निर्णय कधीही वेळेवर घ्यायचा नाही; दिरंगाई, टाळाटाळी- थोडक्यात म्हणजे साक्षात काळाशीच बेइमानी करण्याचा आहे. काळ धावला. आम्ही मागे राहिलो. आमची योग्यताच तितकी. नव्हे, युगानुयुगे तितकीच असते. जीवनातला क्षणन क्षण नीट वापरणारा एखादा गांधी येतो. परावर्तित प्रकाशात आमची जीवने उजळतात. मूळ प्रकाश नाहीसा झाला की पुन्हा अंधारून येते. मला वाटते, ही अशी महान माणसे अधूनमधून उभी करायची इतिहासाला खोडच आहे. एकच शंका येते की पुन्हापुन्हा लढायांच्या आणि रक्तपाताच्या खड्डयात जाऊन पडणाऱ्या ह्या मानवी समाजाला ही असली अलौकिक देणी देण्यात इतिहासाचा, निसर्गाचा किंवा असलाच तर त्या देवाचा हेतू तरी काय असेल? कृष्ण येतो आणि जातो. राम येतो आणि जातो. ख्रिस्त, बुद्ध, गांधी येतात आणि जातात. काळावर मात करून जगतात. त्यांचे नित्य, नैमित्तिक नामस्मरण होते. पुन्हा युद्धे चालू, वैर चालू. द्वेष चालू. आणि भाबडेपणाने नव्या अवताराची वाट पाहाणेही चालू!

गांधीजींसंबंधी विचार करायला लागताना माझी मलाच लाज वाटायला लागते. माझ्या टेबलावरच्या टिकटिकणाऱ्या घड्याळाकडे पाहताना भीती वाटते. माझ्या आयुष्यातल्या वांझोट्या क्षणांची बेरीज करण्याचेच मुख्य काम घेऊन आलेले हे घड्याळ, आणि क्षणन्क्षण सत्कर्माने धन्य करणाऱ्या गांधींच्या कमरेचे ते घड्याळ. माणसाप्रमाणे घड्याळांनाही पूर्वजन्म, नशीब वगैरे गोष्टी असाव्या !

- पु. ल. देशपांडे 
(एक शुन्य मी)

Saturday, January 29, 2022

पु.ल. आणि बाळासाहेब

आचार्य अत्र्यांनंतर, ज्यांच्यावर त्यांच्या गुणदोषांसकट महाराष्ट्राने मनस्वी प्रेम केलं ते दोन दिग्गज म्हणजे पु.ल. देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे, एक विनोदसम्राट तर दुसरे हिंदुहृदयसम्राट. ही बिरुदंही त्यांच्या नावांमागे जनताजनार्दनानेच आदरापोटी लावली होती. एकाने साहित्यक्षेत्रात शब्दरूपी केशराचे मळे फुलवले तर दुसऱ्याने शड्डू ठोकून, राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतील आणि आपल्या अणकुचीदार कुंचल्याने भल्याभल्यांचं वस्त्रहरण केलं! दोघांची स्मरणशक्ती प्रखर होती. त्यांचा हात नेहमी जनतेच्या नाडीवर अचूकपणे ठेवलेला असायचा. पु.लं.नी आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या जोरावर साहित्याच्या प्रांतात स्वतःकरता एक मानदंड तयार केला, तर बाळासाहेबांनी आपली वाणी-लेखणी आणि कुंचला असा भेदक ‘त्रिशूळ’ वापरून राज्यकर्त्यांची (त्यात स्वकियही आलेच) नींद हराम केली!

पु.ल. हे बाळासाहेबांचे शालेय शिक्षणात शिक्षक होते असा कधीकधी उल्लेख होतो पण तशी वस्तुस्थिती कधीच नव्हती. पु.ल. आणि सुनीताबाई हे दादरच्या ओरिएंट स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना, त्या शाळेत बाळासाहेब, यांच्या ज्येष्ठ भगिनी दि. सुशीलाबाई आणि धाकटे बंधू श्रीकांत हे विद्यार्थी होते. गुणग्राही बाळासाहेबांनी एकलव्याच्या निष्ठेने पु.लंचं बहारदार वक्तृत्व, नाटक-सिनेमांतून पुढे प्रत्ययास आलेलं प्रभावी सादरीकरण, प्रसन्न विनोदशैली हे सर्व गुण एखाद्या टीपकागदाप्रमाणे टिपून घेतले आणि आत्मसातही केले. त्या दोघांत सुमारे १० वर्षांचं अंतर होतं. पण त्यांच्या परस्परांविषयी असलेल्या आपुलकी आणि जिव्हाळा यांमध्ये कधीच अंतराय आला नाही. ज्याप्रमाणे आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर पु.लं.नी साहित्य-नाट्य आणि संगीत या तिन्ही क्षेत्रांत आपल्या नावाचा एक रूळ तयार केला तर बाळासाहेबांनी आपलं संघटनाकौशल्य आणि व्यंगचित्रकार या गुणांमुळे स्वतःचा ठसा उमटवणारा एक रूळ बनवला. हे दोन्ही रूळ, आगगाडीच्या रुळांप्रमाणे नेहमी समांतर अंतरावरून जीवन वाटचाल करत राहिले. क्वचित या रुळांचं घर्षणही झालं, पण ते अळवावरचं पाणी होतं.

दोघांच्याही आयुष्यातली पहिली चार दशकं प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्यातच गेली, पु.लंनी शिक्षण सोडून नाट्य आणि चित्रपट या क्षेत्रांत झेप घेतली. त्यांची आयुष्यातील पहिली आवड ही संगीतच राहिली. त्यांचं पहिलं नाटक ‘तुका म्हणे आता’ हे पहिल्या प्रयोगाच्या तिसर्या अंकातच कोसळलं होतं! ‘गुळाचा गणपती’ हा तर सबकुछ पु.ल. असा चित्रपट होता. लेखन, संगीत, दिग्दर्शन, प्रमुख भूमिका सर्व गोष्टी त्यांनी एकहाती केल्या होत्या. पण चित्रपटसृष्टीइतकी कृतघ्न की पु.लं.ना त्या चित्रपटाच्या प्रीमिअर शोचं आमंत्रणही नव्हतं. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, ‘ही कुणी छेडीली तार’, ‘इंद्रायणी काठी’ अशी अप्रतिम संगीतबद्ध केलेली पु.लं.ची गाणी अजूनही रसिकांच्या कानामध्ये गुंजन करत असतात. सुरुवातीच्या काळात पु.ल. – पुरुषराज अळूरपांडे अशा टोपण नावाने लेखन करत असत.

बाळासाहेब चित्रकलेचं शिक्षण घ्यायला कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये गेले नाहीत. ती त्यांच्या रक्तात ती उपजतच होती. त्याला प्रबोधनकारांनी प्रोत्साहन दिलं. बाबूराव पेंटरांनी उत्तेजन दिलं. व्यंगचित्र काढणं म्हणजे एखाद्याचं व्यंग चितारणं नव्हे याची त्यांना जाण होती. त्यात कोणती तरी कल्पना साकार झाली असली पाहिजे ही जाण लहानपणापासूनच होती. ‘मार्मिक’कार बनल्यावर त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरता नवोदित चित्रकार जायचे. एकाने एक थोटा माणूस दाखवला होता आणि चित्राखाली लिहिलं होतं, I am a shorthand typist! बाळासाहेबांनी चित्रकाराला समजावून सांगितलं – त्या माणसाला हात नाहीत म्हणून तो शॉर्टहॅण्ड होत नाही. हे व्यंगचित्र नाही, तर व्यंगचित्रण आहे! उद्या तू एखाद्या लंगड्या माणसाचं चित्र काढशील आणि म्हणशील, मी एका पायावर उभा आहे. व्यंगचित्र प्रभावी ठरतं, ते त्यामधील आशयामुळे. बाळासाहेब फ्रिप्रेसमध्ये काम करत असताना ‘मावळा’ या टोपणनावाने इतर नियतकालिकांत व्यंगचित्रं काढत असत. म्हणजेच टोपणनाव घेऊन काम करणं हे त्यांनी आणि पु.लंनीही केलं होतं! पु.लंनी भाऊसाहेब हिरेंच्या शब्दाखातर त्यांच्या मालेगावच्या शिक्षणसंस्थेत नोकरी घेतली होती तरी स्वाभिमानाशी तडजोड न करण्याच्या स्वभावामुळे त्या नोकरीवर पाणी सोडलं होतं. बाळासाहेबांच्या कलेवर बंधनं यायला लागल्यावर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता-हे दोघांमधलं आणखी एक साम्य. १९६० साल हे दोघांच्या जीवनाला कलाटणी देणारं ठरलं. देशात नुकत्याच सुरू झालेल्या टीव्हीसाठी प्र्रोगॅ्रम प्रमुख म्हणून पु.लंना दिल्लीस जावं लागलं. आपल्या विनोदी स्वभावामुळे हे ‘पांडेजी’ उत्तर हिंदुस्तानात कमालीचे लोकप्रिय ठरले. पुढे ते इंग्लंडला जाऊन आले. खुसखुशीत शब्दांत प्रवासवर्णन कसं लिहावं याचा आदर्श त्यांच्या ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकांनी मराठी भाषेत निर्माण झाला. त्याच सुमारास त्यांचं ‘वार्यावरची वरात’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने इतिहास घडवला. बाळासाहेब भल्या पहाटे बिर्ला मातोश्री सभागृहात जाऊन रांगेत उभं राहून तिकिटं घेऊन आले होते. त्या प्रयोगावर ते इतके खूश झाले होते की त्यांनी ‘मार्मिक’च्या पुढच्या अंकात संपूर्ण ‘रविवारची जत्रा’ त्या वरातीवर काढली होती. पु.ल. पंख्याच्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या हातामधली संहितेची पानं इतस्ततः उडत आहेत आणि त्या पानांवर ‘वार्यावरची वरात’ हे शब्द उमटवले होते! त्यात पु.लंना सोंड दाखवून ‘द गॉड ऑफ विसडम्’ असं संबोधलं होतं आणि त्या खाली लिहिलं होतं, पु.लंच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि सरस्वती भांडी घासते! एका चित्रात ते पेटी वाजवताना दाखवले होते आणि खाली कॉमेंट होती-अशी लाजवाब पेटी ऐकल्यावर वाटतं, रेडिओवरची पेटी वादनावरची बंदी उठवलीच पाहिजे आणि शेवटी स्वतः साहेब पु.लं.च्या पुढील बाजूने कडेवर चढून, आपल्या हातांनी त्यांना कवेत घेऊ पहात आहेत असं चित्र होतं पण त्यांचे हात पु.लंच्या पाठीमागे जाण्यास तोकडे पडत होते आणि कॉमेंट होती-पु.लंची थोपटावी तेवढी पाठ थोडीच ठरेल-पण काय करणार, हातच पुरे पडत नाहीत.

अत्रे आणि ‘मार्मिक’ हा वाद चिनी आक्रमण काळात कमालीचा चिघळला. ‘मराठा’च्या कम्युनिस्ट धार्जिण्या धोरणावर कोरडे ओढणारा ‘मार्मिक’चा अग्रलेख ‘प्रतिभासंपन्न अत्रे मावळले व उरला गलिच्छ वाणीचा कम्युनिस्ट’ प्रसिद्ध झाल्यावर अत्रे कमालीचे भडकले आणि त्यांनी ‘कमोदनकार ठाकरे व त्यांची कारटी’ असे तीन सणसणीत अग्रलेख लिहिले. लेखणी आणि कुंचला यांच्यातला कलगीतुरा कित्येक महिने रंगत होता! बाळासाहेबांनी अत्र्यांना सतत डुकराच्या रूपात चितारून त्यांची भंबेरी उडवून दिली. ‘मराठा’ने एकेदिवशी बाळासाहेबांचा फोटो छापला आणि त्याखाली लिहिलं- महाराष्ट्राचा भंगी चित्रकार! त्याला ‘मार्मिक’ने पुढच्या अंकात व्यंगचित्राद्वारे उत्तर दिलं. त्यात स्वतः बाळासाहेब हातात झाडू घेऊन कचरा काढताना दाखवले होते. कचर्यात अत्रे मृत डुकराच्या रूपात होते आणि भाष्य होतं-मी भंगीच आहे, कारण अत्र्यांसारखा कचरा मला दर आठवड्याला काढावा लागतो. त्या प्रतिहल्ल्यामुळे पु.ल. खूश झाले आणि त्यांनी फोनवरून आपली दाद दिली.

‘मार्मिक’ साप्ताहिक १३ ऑगस्ट १९६० साली, अत्र्यांच्या जन्मदिनी सुरू झालं. पु.ल. ‘मार्मिक’च्या वाढदिवसाला यावेत अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पण ते जमलं नाही. विनंतीचा स्वीकार करता येत नाही हा खेद व्यक्त करण्याकरता पु.लंनी पत्र पाठवलं. त्यात बाळासाहेब-श्रीकांत या बंधुंच्या व्यंगचित्रकलेची भलावण केली होती, पण त्याचबरोबर ‘मार्मिक’मध्ये येणारा सर्वच मजकूर सामान्य दर्जाचा असतो अशी मल्लिनाथीही होती! त्याचवेळी पु.लंनी एका मुलाखतीत, मराठी रंगभूमीवरील प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अॅम्बॅसेडर गाडी असावी असं मला वाटतं, असे उद्गार काढले होते. त्यांच्या तुफान लोकप्रिय ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री, बहुरूपी प्रयोगाला मात्र प्रत्येक प्रेक्षकाला जास्तीत जास्त चार तिकिटंच मिळतील, पाच वर्षांखालच्या मुलास प्रवेश नाही, अशी बंधनं सुनीताबाई घालत होत्या. तरीही बुकिंग सुरू झाल्यापासून चार तासांत प्लॅन विकला जायचा! पुलंच्या सामान्य दर्जाच्या मजकूर शब्दप्रयोगावर बाळासाहेब चिडले आणि त्यांनी पुढच्याच अंकात पु.लंकडून नटांचा नाटकी कैवार आणि प्रेक्षकांवर छडीमार हा बोचक अग्रलेख लिहिला.

१९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली आणि बाळासाहेब अल्पावधितच मराठी माणसांच्या गळ्यातला ताईत बनले. घणाघाती वक्तृत्व, भेदक कुंचला, मराठी अस्मितेचा जयघोष, नोकर्यांचा रोजीरोटीचा प्रश्न हाती घेतल्याने त्यांची Larger than life! प्रतिमा साकार झाली. त्याचवर्षी ३० ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर भव्य मेळावा भरला तेव्हा, ‘मी लोकशाही मानत नाही. ठोकशाही मानतो. माझा कम्युनिस्टांना कडवा विरोध आहे तसाच दाक्षिणात्य प्रांतीय संकुचिततेलाही. मुंबईत उपर्यांनी येऊन आमच्या नोकर्या बळकावायच्या हे यापुढे चालणार नाही. इथला गुंडसुद्धा मराठीच पाहिजे आणि हातभट्टीवालासुद्धा मराठीच पाहिजे. यंडूगुंडू ही महाराष्ट्राच्या आचळाला लागलेली गोचीड आहे’, असा स्फोटक दारूगोळा भरलेली बाळासाहेबाची भाषणं लाखालाखांची गर्दी खेचत होती आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांच्या रूपाने एका देदीप्यमान तार्याचा उदय झाला होता. इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. वृत्तपत्रांवर कडक बंधनं आली. बाळासाहेबांनी इमर्जन्सीला पाठिंबा दिला. ‘तुरुंगवास वाचवण्याकरता शिवसेनेच्या वाघाने शेपूट पायांत घातले’ अशा शब्दांत पु.लंनी खाजगीत निषेधही केला. ती बातमी साहेबांच्या कानावर गेली तरी नसावी किंवा समजूनही त्यांनी प्रतिभाष्य करण्याचं टाळलं असावं.

शिवसेना काँगे्रसमध्ये विलीन होणार अशा वावड्या उठवणार्या क्षुद्रबुद्धींना बाळासाहेब हा कसा धगधगता अंगार आहे हे समजलंच नव्हतं. इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यासाठी राजकीय किंमत शिवसेनेला मोजावी लागली. १९८० साली तर बाळासाहेबांनी काँग्रेसची तळी उचलून धरली आणि त्याबदल्यात दोन विधानपरिषदेच्या जागा पदरात पाडून घेतल्या. इंदिराजींनी निरोप पाठवला, ‘ठाकरेजी को कहो, मै उनको उंचेसे उंचाँ पद दुंगी.’ ते अशा विलोभनाला भुलणं शक्यच नव्हतं. १९८५ मध्ये मुरली देवराच्या मुंबई काँग्रेसच्या वर्चस्वाला अडसर घालण्याकरता मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलांनी ‘मुंबई केंद्रशासित करणार ही अफवा खोटी आहे’, असं विधानपरिषदेत प्रमोद नवलकरांच्या एका ठरवून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्याचं भांडवल करून ‘मराठी माणसा रात्र वैर्याची आहे. मुंबई तुझ्यापासून तोडण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे’ अशी पोस्टर्स लागली आणि प्रत्येक फलकावर बाळासाहेबांचा फोटो झळकत होता. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कब्जामधून मुंबई नगरपलिका शिवसेनेने हिसकावून घेतली आणि त्यावर वर्चस्व ठेवलं ते आजतागायत.

जुलै १९८७. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या न्यूजर्सीच्या अधिवेशनास पु.ल. अध्यक्षपद भूषवणार असल्याने तोबा गर्दी झाली होती. शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी, मनोहर जोशींनी हजेरी लावली होती. परदेशात मराठी भाषिक हजारोंच्या संख्येने एकत्र जमणार आहेत त्याचं बाळासाहेबांना अप्रूप होतं, म्हणून त्यांनी जोशींच्याकरवी अधिवेशनास संदेश देताना म्हटलं होतं, ‘सर्व जातिंचे मतभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा!’ याचं पु.लंनाही कौतुक वाटलं. हा संदेश शिवसेना स्थापनेपासून बाळासाहेबांनी कृतित उतरवला होता. भिन्न जातिंना मूठमाती देऊन शिवसेना उभारली गेली होती.

१९८९ मध्ये भाजपशी युती केलेल्या शिवसेनेला राज्यातलं विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि पाच वर्षांनंतर युती थेट सत्तेचा सोपान चढली. बाळासाहेबांनी झंझावती दौरा करून, एका महिन्यात ११५ विक्रमी सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. सरकार स्थापन झालं. ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार देण्याचं ठरलं. शिवसेनानेत्यांना तो दस्तुरखुद्द बाळासाहेबांनाच द्यावा, असं प्रकर्षाने वाटत होतं. त्या सूचनेला फटकारताना ते म्हणाले, ‘मी महाराष्ट्रदूषण आहे हे पुरेसे नाही का?’ पुरस्काराचे पहिले मानकरी पु.ल. ठरले. मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात सोहळा होणार होता. पु.ल. कंपवाताने बेजार होते. म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत सुनीताबाईंनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. त्यात पु.लंनी म्हटलं होतं, ‘आयुष्यभर मी लोकशाही मूल्यांचं जतन करत आलो. ती जेव्हा धोक्यात आली तेव्हा माझ्या कुवतीनुसार ती जपण्यासाठी लढ्यातही भाग घेतला. पण आज ठोकशाहीचा उघडउघड पुरस्कार करणारे सरकार राज्यात सत्तारूढ झाले आहे हे पाहून माझ्या मनाला अपार यातना होतात.’ अशी टीका बाळासाहेबांच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. समारंभानंतर पुढच्याच आठवड्यात त्यांच्या हस्ते एका पुलाचं उद्घाटन होणार होतं. तेव्हा भाषणात बाळासाहेब म्हणाले – आता जुने पूल मोडून टाकले पाहिजेत. नवे पूल उभारले पाहिजेत! त्यात पूल हा शब्द Bridge या अर्थीही घेता येत होता आणि पूल म्हणजे ती साक्षात पु.लंवर टीकाही असू शकत होती!

त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे असं चित्र वृत्तपत्रांनी उभं केलं होतं. पु.लंची थोरवी जाणणाऱ्या  बाळासाहेबांनी त्यांच्या पुण्याच्या घरी जाण्याचं ठरवलं. पुण्याची भेट घडली तेव्हा सुधीर गाडगीळ उपस्थित होते. त्यांनी या घटनेचं वर्णन असं केलं… ‘बाळासाहेबांनी घरात प्रवेश केला. सुनीताबाईंनी ‘या बाळासाहेब’, या शब्दात त्यांचं स्वागत केलं. चेहर्यावर नम्र भाव असलेले साहेब उत्तरले, ‘मी बाळासाहेब बाहेरच्यांकरता. या घरात मी बाळच आहे!’ पु.ल. त्यांच्या चाकांच्या खुर्चीत जखडून बसले होते. अंग कंपवातामुळे थरथरत होते. बाळासाहेब त्यांच्या समोर गेले. खाली गुडघ्यावर बसले आणि वाकवून डोकं पु.लंच्या पायांवर ठेवलं. पु.ल. गहिवरले. खोलीत असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. पु.लंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, ‘बाळ, मला तुझा अभिमान वाटतो!’

पल्लेदार, समयोचित वक्तृत्व ही बाळासाहेबांना ईश्वराची देन होती. सुधीर फडक्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्यावेळी मुख्य वक्ते साहेब होते. त्यांनी सांगितलं, ‘बाबूजी व मी दोघेही कडवट हिंदुत्ववादी आहोत. फरक एवढाच की जन्मभर त्याचा संबंध सुरांशी आला व माझा असूरांशी!’ साऊथ बॉम्बे लायन्स क्लबच्या समारंभातखच्चून भरलेल्या हॉलमध्ये नजर फिरवून साहेब म्हणाले, ‘In this room, You are all Lions. I am the only Tiger, here!’

पु.लंच्या आयुष्यातलं शेवटचं दशक आजारपणातच व्यतीत झालं. घर ते प्रयाग हॉस्पिटल एवढाच प्रवास नियमितपणे घडत होता. बाळासाहेबांनाही अनेक व्याधींमुळे घरातच जखडून बसणं भाग पडलं. लीलावती हॉस्पिटलला चेकअपसाठी जाणं एवढंच क्रमप्राप्त होतं. त्यांना आधाराशिवाय चालणं मुश्कील व्हायचं. तरीही त्यांची उल्हसित वृत्ती कायम होती. अनेक संदर्भ त्यांना बिनचूकपणे देता यायचे. दोघेही मेहफिलीचे बादशाह होते. त्यांना आपल्याभोवती माणसांचा गराडा असलेला आवडायचा. पु.लंना एका वार्ताहराने विचारलं, ‘कंपामुळे तुम्हाला स्वतः लिहिणं शक्य होत नाही तर डिक्टेट का करत नाही?’ त्यांनी हजरजबाब दिला – I am not a Dictator!’ १९८५ नंतर बाळासाहेबांनी व्यंगचित्रं काढणं सोडून दिलं, कारण त्यांचा हात थरथरत असे. त्यावरही त्यांचं भाष्य होतं, ज्या हाताने काढलेली व्यंगचित्रं पाहून राज्यकर्ते थरथर कापायचे, तोच हात आता थरथरतो!’ पु.लंना वाचनाचं अफाट वेड. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणार्या डॉ. तात्याराव लहानेंनी त्यांच्या डोळ्यांत शक्तिशाली लेन्स बसवली होती. ‘मला वाचता येणार नसेल तर मला जगायचेच नाही’, असे त्यांचे उद्गार होते. बाळासाहेबांना कथा-कादंबर्या वाचण्यात रस नव्हता. १९६९ साली ते, जोशी आणि साळवी येरवडा तुरुंगात तीन महिने होते तेव्हा अनघाताई जोशींनी त्यांना रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ पुस्तक दिलं. त्यातल्या खाजगी संवादाची बाळासाहेब खिल्लीच उडवायचे. ‘माझ्या वडिलांनी मला बजावले होते, काय वाटेल ते बन, पण कधी विद्वान होऊ नकोस! थोडक्यात गंभीर, सुतकी चेहर्याने वावरू नकोस!’ बाळासाहेब रोज डझनभर वृत्तपत्रं वाचायचे. टिव्ही सहसा पहात नसत. अपवाद-क्रिकेट सामन्यांचा. पु.ल. आणि बाळासाहेब ही व्यक्तिमत्त्वं चुंबकीय होती. त्यांच्याकडे विविध भाषिक, धर्माचे, जातिचे, प्रांताचे लोक आकर्षले जायचे.

न. चि. केळकरांनी म्हटलं होतं, ‘ज्याच्या अंत्ययात्रेला जास्त लोक जमतात, तो मोठा!’ खुद्द केळकरांच्या वेळी लाखांचा समुदाय उपस्थित होता. तसाच पु.लंच्या वेळेसही. बाळासाहेबांसाठी त्याच्या दसपट लोक रस्त्यावर उतरले होते. दोघांनाही सरकारी इतमामाने अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत जन्मलेल्या पु.लंनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला तर पुण्यात जन्म झालेल्या बाळासाहेबांचं देहावसान मुंबईमध्ये झालं! पु.ल. अत्यवस्थ आहेत, हे समजल्यावर बाळासाहेब स्वतःच्या प्रकृतिच्या सर्व तक्रारी बाजूला ठेवून पुण्याकडे धाव घेते झाले. गाडीमध्ये ‘वार्यावरची वरात’ची टेप ऐकत होते. साल २०००, लोणावळा आलं आणि फोनवर पु.ल. गेल्याची बातमी समजली. सुनीताबाईंना सांत्वनपर शब्द सांगितले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, ‘वरात ऐकत आलो, आता त्या वरातीत सामील व्हायला लागत आहे!’ दोघेही अलौकिक, महान किमयागार, अफाट लोकप्रिय. पु.ल. हे शब्दांचे चित्रकार होते तर बाळासाहेब हे रेषांचे व्यंगचित्रकार होते! त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे.

डॉ विजय ढवळे
२९ जून २०१४

कलमनामा
http://kalamnaama.com/pu-l-ani-balasaheb/

Thursday, January 27, 2022

भांडकुदळ बायको

..कविजनांनी त्या लग्नातल्या ध्रुवदर्शनाचे वर्णन केले आहे. आम्ही आमच्या कुटुंबाला कुठले नक्षत्र ध्रुव म्हणून दाखवले देव जाणे! लग्नानंतर तिच्या डोळ्यांवर असा काही परिणाम झाला आहे की, माझ्या कुठल्याही कृतीतून उलटेच काहीतरी तिला दिसते. आम्ही सहज म्हणावे, "तुझ्यामाहेरच्या मंडळीचं आरोग्य चांगलं आहे हां!!" लगेच "इतकं काही आमच्या आईच्या लठ्ठपणाला हिणवायला नको. तुमची आत्या कोठीतल्या कणगीजवळ बसली होती तर मेली कणगी कुठली नि आत्या कुठली कळत नव्हतं!" म्हणून माझ्या बिचाऱ्या देवदयेने वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी देखील जरासे अंग धरून राहिलेल्या भीमाआत्यावर ती आपल्या तोंडाची गोफण भिरकावून मोकळी होते.

आमचे घराणे सनातनी! पण लग्नानंतर, बाँब तयार करायचे सामान आणावे त्याप्रमाणे चोरून मी हिच्यासाठी पावडर आणि स्नोची बाटली आणली. वाटत होतं, ही म्हणेल, "इतका का इकडचा स्वभाव हौशी आहे?" पण बापहो, कुठले काय? एकदम, "माझ्या काळेपणाला इतकं काही हिणवायला नको! गोरीच पाहिजे होती तर आणायची मड्डम!!" आता मी बापडा काय बोलणार? हिला काळी म्हणायला माझे का डोळे फुटले आहेत? कोळसे, डांबर, शाई वगैरे मंडळींचा रोष मी सुखासुखी कशाला पत्करीन? वास्तविक ह्या साऱ्यांना हेवा वाटावा असा हिचा वर्ण! त्याच्यावर पावडर लावली, स्नो चोपडला की, भेगा पडलेल्या पंपशूसारखा हिचा चेहरा दिसणार आहे, हे मला कळत का नव्हते? पण नाही, तिने तो पावडरचा डबा सरळ बाहेर भिरकावला आणि पेन्शन घेऊन परतणाऱ्या तिर्थरूपांच्या डोक्यावर तो रिकामा झाला. आणि आमचे तीर्थरूप दोन दिवस पिठाच्या गिरणीच्या मालकासारखे चाळभर वावरून आमचे कौतुक चाळीला पुराव्यानिशी सांगत हिंडत होते.

केवळ काळेपणाने त्या निर्गुणनिराकार विधात्याचे समाधान झाले नाही. त्यामुळे आधुनिक छायाचित्रकाराच्या कौशल्याने, पुढे आलेल्या पांढऱ्या दातांचा त्याने पार्श्वभूमी म्हणून आधार घेऊन, आसुरी आनंदाचा अनुभव घेत, मागला चेहरा घडवला. विधात्याच्या सौंदर्याच्या रसायन शाळेतील प्राध्यापक रजेवर जाऊन तिथल्या नोकरांनी काही गोंधळ केला की काय कोण जाणे! गजगतीची आणि सिंहकटीची जरा उगीच गफलत झाली आणि गजकटी आणि सिंहगती असा प्रकार इथे झाला आहे. केसांना भुंग्यांचा वर्ण हा फाॅर्म्युला ठरला असताना तो भुंगा अनेक बाबतीत केवळ नवऱ्याच्या मागे लावण्यासाठी राखून ठेवला गेला आणि तिथे हल्ली विद्यमान असलेल्या केसांइतकाच परमेश्वराने आपला हात आखडता घेतला! डोळ्यातील सामर्थ्य जिभेवर ठेवले. नवरा आणि मुले यांच्यावर जणू एकाच वेळी स्वतंत्र नजर ठेवता यावी अशी नेत्ररचना केली. त्यामुळे माझ्यावर तिचा डोळा आहे म्हणावे तरी पंचाईत! नाही म्हणावे तरी पंचाईत! ओठांचा उपयोग केवळ आपल्या नवऱ्यावर दात खाण्यासाठीच करावयाचा असतो, या पलिकडे नवऱ्याचा त्याच्याशी संबंध नाही, अशी तिची कायमची भावना आहे! नेत्रचुंबनाबद्दल मागे एकदा खूप चर्चा झाली होती; परंतु दंतचुंबन नावाचाही शृंगारात एक भाग असू शकेल यावर अधिकाराने बोलू शकणारा एकच पामर आहे, असे मी नम्रपणे सांगू इच्छितो.

- खोगीर भरती
- पु. ल. देशपांडे

Monday, January 24, 2022

काव्य आपल्याला जगायला कारण देतं - पु.ल. देशपांडे

मॅजेस्टिक बुक स्टॉलतर्फे प्रकाशित झालेल्या ‘पु. ल. : एक साठवण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १८ नोव्हेंबर १९७९ रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला होता. त्या समारंभात ‘पुलं’नी केलेल्या भाषणातील काही अंश.

माझ्या साहित्याबद्दल सांगताना कविवर्य बोरकर, मं. वि. राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत या तिघांनी सांगितलं, की मला कवितेचं प्रेम आहे. माझं म्हणणंच असं आहे, की कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच कलावंत होऊ शकणार नाही - विनोदी तर नाहीच नाही. जो चांगला वाचक आहे, तो मनातून कवितेचा वाचक असतो. एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो - वयाबरोबर आता ‘एखादी’चं वगैरे म्हटल्यावर लोक काय म्हणतील अशी मला भीती वाटायला लागली आहे!

काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे - ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच ‘आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर’ असं म्हटलं आहे. आता ते आपल्यालाच म्हटलेलं आहे असं काही लोक समजतात, तो भाग निराळा! हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु कवीला उगीच वंदन केलेलं नाही. गणपतीला ‘कविः कविनाम्’ म्हटलेलं आहे. ‘कवी’ ही माणसाला मिळालेली सर्वश्रेष्ठ पदवी आहे. काव्याचं आणि विनोदाचं जमत नसतं असं नाही. विनोदी लेखकाला बेसूर जास्त जाणवतो. त्यामुळे तो सुरांच्या मागे जास्त जातो. त्याला जीवनाचा बेतालपणा जास्त जाणवतो. म्हणून जीवन तालात येण्यासाठी त्यातला बेतालपणा काय आहे, हे तो लोकांना दाखवतो. राजकारणातली माणसं नीट वागत असती, तर आम्ही कशाला लिहिलं असतं? आता तर त्यांनी आमच्याशी चांगलीच स्पर्धा सुरू केली आहे यात शंकाच नाही. रोज त्यांचे विनोदी कार्यक्रम पाहिल्यावर आता आमचं कसं होणार, अशी भीतीही आमच्या मनात उत्पन्न झाली आहे; पण तो भाग निराळा! आजच्या ह्या चांगल्या प्रसंगी उगाच भलती नावं तोंडून निघून जायची.

- पु. ल. देशपांडे
पुस्तक - पाचामुखी

Thursday, January 20, 2022

माझे खाद्यजीवन - हसवणूक

हसवणूक पुस्तकातील 'माझे खाद्यजीवन' ह्या अप्रतिम लेखातील काही निवडक उतारे.

"एका जुनाट घरातले स्वैपाकघर आहे. काळोखे. कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते आहे. एके काळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे. चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत. पोटात भुक आहे. डोळ्यांत निज आहे. दारातून वाकून वडील आत येत आहेत. ते काहितरी गुण-गुणताहेत. पलिकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ ट्यॅ ट्यॅ करुन रडणे आणि बोलणे ह्यांच्या सीमारेषेवरचे आवाज काढत आहे. इतक्यात निखार्‍यावर टाकलेल्या पापडांचा वास येतो. झोप उडाल्यागत होते. पोटाची मागणी वाढते. "झालं हं---" म्हणून आई तो चिमटीत धरुन फू~~ फू~~ करते. वडील शेजारच्या पाटावर बसतात. इतक्यात कढईच्या पोटात चर्र होते. पळीतून अंबाडीच्या भाजीच्या पोटात शिरलेली लसूण सार्‍या घराचा ताबा घेते. झोप पळते. पोटात रणकंदन सुरू होते. चुलीच्या एका बाजुला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरी चतकोरा-चतकोराने पानात पडतात. "आज काय शिकवलं रे मास्तरांनी?" ओट्यावर नित्यनियमाने येऊन बसणारे शेजारचे दादा कणखर आवाजात विचारतात आणि गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला आंबाडीच्या खमगं वास घश्यात अडकतो.

----
मी शाकाहाराचा भोक्ता आहे, तसाच स्वाहाकाराचा! मला तळलेले निषिद्ध नाही, पोळलेले नाही. लाटलेले (दुसऱ्याचे नव्हे, पोळपाटावर) नाही, वाटलेले नाही. ऊन-ऊन भात, वरण, लिंबू, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, चटणी, चांगले ताक हा मेनू मला जितका प्रिय, तितकीच 'तिरफळ' घालून केलेली बांगड्याची लालभडक आमटी, भात आणि खोबरेल तेलाचे बोट लावलेला पापड, सोलाची कढी! मात्र दुसऱ्या मेनूनंतर नुकत्याच फोडलेल्या नारळाची कातळी हवी, आणि पहिल्या मेनूनंतर पान हवे. भारतीय संस्कृतीबद्दलचा माझा आदर दर सणामागल्या पक्वान्नातून (ताटाबाहेर) सांडतो. होळीच्या पोळीची चव रामनवमीला नाही. रामनवमीचा सुंठवडा कृष्णजन्माला पटत नाही. बुंदीचा लाडू दिवाळीला चालतो, तसा दसऱ्याला चालवून पाहावा! आणि भुसभुशीत मोतीचूर लाडवावर माझी श्रद्धा नाही. मुगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे. अनारशावर आणि चिरोट्यावर मात्र माझी अजिबात भक्ती नाही. अनारशाला काही 'कॕरेक्टर'च नाही. अनारशामागे कोणतीच संस्कृती उभी नाही. आणि चिरोटा? कुण्या पुस्तकी सुगरिणीचा घरी करायला घेतलेल्या खाऱ्या बिस्किटांचा साचा मीठ घालायला विसरून बिघडला,आणि ते पीठ थापून त्याच्यावर साखरपेरणीची मखलाशी करून बिस्किटाऐवजी चिरोटा म्हणून तिने नवऱ्याला बनवले.

खाद्यांचेदेखील एक खानदान आहे. ह्या खानदानाचा ते पदार्थ तिखट-गोड किंवा आंबट-तुरट असण्याशी काही संबंध नाही. चकलीला खानदान नाही. ती उपरी आहे. तिच्याभोवती वातावरण नाही. ती खुसखुशीत असो, अरळ झालेली असो, पण तिला आपला असा स्वभाव नाही. नुसतीच तुकडेमोड आहे. पण कडबोळ्याला मात्र कूळ आहे. उद्या पदार्थांच्या जातीच करायच्या ठरविल्या, तर कडबोळे हे देशस्थ वैष्णव कुळीचे, कानडी उच्चाराने मराठी बोलणारे आहे म्हणावे लागेल, तर चकली आंतरजातीय विवाहातून जन्मलेले अपत्य आहे. कारवारकडे कडबोळ्याचेच दोन वळसे कमी करून मुदी करतात. कारवारीत मुदी म्हणजे अंगठी. चकली भानगडगल्लीतली, तसा चिवडाही. पण चिवड्यात अठरापगड गोष्टी असून त्याच्या भोवती मित्रमंडळीच्या अड्ड्याचे कुंपण आहे. मात्र चिवडा हा एकट्याने खाण्याचा पदार्थ नव्हे. चिवड्याची चव खाणाऱ्यांच्या संख्येने गुणले असता वाढते! पण चिवड्यातला अत्यंत चविष्ट भाग तळाशी उरलेले तिखट-मीठ इतरांची नजर चुकवून तर्जनीने चेपून ती जीभेवर दाबल्यावर कळतो. ह्याला धैर्य लागते! चिवड्याचे मूळ स्वरूप म्हणजे भत्ता. ह्याला मजूर-चळवळीच्या प्रथम चरणात 'लेनिन मिक्श्चर' म्हणत असत. म्हणजे भोवती मार्क्सवादी गप्पा सुरू झाल्या की भत्त्याचे लेनिन मिक्श्चर होत असे! कुरमुरे, डाळ, दाणे, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर, मिरच्या आणि उघड्यावर गप्पा! चारचौघांत जो ओतला की "अरे बाप रे! एवढं हे कोण संपवणार?" असा सार्वजनिक उद्गार निघून ज्याचा शेवट रिकाम्या कागदाखाली पडलेला शेंगदाणा हळूच उचलून तोंडात टाकण्यावर होतो, तो खरा भत्ता!

----
महाराष्ट्रातल्या चारी वर्णांनी आणि सार्‍या जाती-जमातींनी जर एकमताने मान्य केलेली गोष्ट कुठली असेल, तर पुरणपोळी ! हीसुद्धा जसजशी अधिक शिळी होत जाते, तसतशी तिची चव वाढते. ती दुधाबरोबर खावी, तुपाबरोबर खावी किंवा कोरडी खावी. महाराष्ट्राच्या सीमा ठरविताना पुरणपोळीचा निकष वापरायला पाहिजे होता. मात्र हे नाजूक हाताचे काम नव्हे. चांगल्या पुरणपोळीला चांगले तीस-पस्तीस वर्षांचे तव्याचे चटके खाल्लेला हात हवा. म्हणूनच आज्जीने केलेल्या पुरणाच्या पोळीची सर आईच्या हाताला येत नाही; पत्नीच्या तर नाहीच नाही. वडीलधार्‍यांनी ती करावी आणि लहानांनी खावी !
----
भेळ, मिसळ आणि उसळ ह्या ’ळ’-कारान्त चिजांनी जिभेचा चावटपणा खुप वाढवला. इथे ’चावट’पणा हा शब्द गौरवार्थी आहे. कारण चावट हा शब्दच मुळी ’चव’ ह्या धातूचे लडिवाळ स्वरूप आहे. चविष्ठ --> चविट्ट --> चावट्ट आणि चावट ! ह्या शब्दाचा चावण्याशी काही संबंध नाही. बेचव शब्दपंडितांनी तो जोडला आहे.
---
शाकाहारी मंडळींना शाकान्न आणि शाक्तान्न जोडीजोडीने कसे नांदते हे कळणार नाही. तुरीच्या डाळीच्या सांबाऱ्याबरोबर भाजलेल्या सुक्या बांगड्याचा तुकडा काय विलक्षण साथ जमवून जातो | मटारीत कोलंबी आणि वांग्यांत सोडे. व्हिस्की-सोडा आणि वांगे-सोडा ह्या जोडीत श्रेष्ठकनिष्ठ ठरविणे कठीण आहे. काळ्या वाटण्याची किंवा मसुरची मसालेदार आमटी असली, तर उगीच जोडीला कोलंबी किंवा ताजे बोंबील तळून पाहावे. स्वर्ग ताटात येतो! मटणात बटाटा घरच्यासारखा येऊन बसतो. पण कोंबडी एरवी स्वतः शाकाहारी असली, तरी पकवल्यावर तिला पालेभाजीचा सहवास चालत नाही. तीच गत हरभऱ्याची. हरभरे आणि मासे यांचे जमत नाही. म्हणून पिठल्याच्या जोडीला मासेमटण 'चालत नाही. मसूर ही जातीने शाकाहारी असली तरी वृत्तीने सामिष. नागपुरी वडाभात हा पुढे अक्खी दुपार झोपायला मोकळी असली तर खावा. आणि डाळबाटे या इंदुरी प्रकारात बाटे हुकवून नुसती डाळ ओरपता आली तर पाहावी.
----
माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे. चराचर सृष्टी याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे. आदिमानव मिळेल त्यावर चरला. पुढे तो सुधारला आणि चरता चरता दुसरयाला चारू लागला. त्यानंतर फारच सुधारला तेंव्हा इतरांचे चोरून स्वतः चरू लागला. मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे, चारणे, चिरणे, आणि चोरणे ह्या चकारी बाराखडीतून होत होत ' चम-' चः ' पर्यंत आली आहे.
----
बाकी भोजनाचे ताट हेदेखील एखाद्या चित्रातल्यासारखे रंगसंगती साधून जाते! पहिला भात मूदस्वरूपात असावा. वरण-भाताबरोबर डाळिंब्या असाव्यात. बाकी वाल खावे कायस्थांनी. असे बिरडे अन्यत्र विरळा! बटाटा जसा मुंबईला झावबाची वाडी ते भाई जीवनजी लेन ह्या परिसरात 'गोडी बटाटीचा रस' होऊन शिजतो, तशी वालाची डाळ कायस्थाघरीच शिजते, अन्यत्र नाही. आधुनिक जमान्यात जातीय दृष्टी वाईट खरीच. पण जीभ जर योग्य वळणाने वळेल, तर भोजन हे उदरभरण न राहता एक मैफिल होऊन जाईल. पुष्कळदा मला केवळ या खाद्यविशेषांच्या परंपरागत संरक्षणासाठी जाती टिकाव्यात, असे वाटते! उद्या सगळ्यांचे खाणेपिणे सारखे झाले की महाडच्या सोड्यांचे कळावं खायला जायचे कुठे? कोल्हापूरच्या पाणकोंबडीने सद्गतीसाठी कुठल्या सवळेकराकडे पाह्यचे? भेजा आणि कालेज तळायचा नाय, असे मटनप्लेट हाउसवाल्यांनी ठरवले, की खेळ खल्लास! आंतरजातीय विवाह व्हावेत, पण उभयपक्षी खाद्यस्वातंत्र्याच्या करारावर सह्या होऊन. अगदी कळाहीन जेवण पाहायचे असेल तर, नवश्रीमंतांच्या घराच्या पार्टीला दिल्लीला जावे. एक तर पंगत नाही. आणि टेबलावर पायरेक्स डिशेसमध्ये तेच पदार्थ! तोच निस्तेज मसाला घातलेली मुर्गी, तीच कळाहीन बिर्यानी, तीच ती फ्लावरची नि:स्वाद भाजी, त्याच टमाटो-मुळं-कांदे-बीटच्या चकत्या, तीच मटणबॉल्सची करी, त्याच पुऱ्या, तीच पंडुरोगी चटणी, आणि तेच दहीवडे! अत्यंत संस्कृतीशून्य जेवण! आपणच ओढायचे आणि आपणच गिळायचे! ज्या कोंबडीच्या आणि आपल्या पहिल्या ओठीभेटीत डोळे पाणावत नाहीत, ती कोंबडी खाण्याऐवजी दुध्या भोपळा खाल्लेला काय वाईट? जो बोकड जाता जाता जिभेला चटका लावून जात नाही. त्याचा निष्कारण बळी का द्यायचा.? पाश्चात्यांचे हे नुसतेच उकडणे म्हणजे आधुनिकता, असं समजण्याच्या काळात भारतीय खाद्ये आपली सांस्कृतिक पातळी (आणि जाडी) गमावून बसताहेत. दहीवडा हा काय रात्रीच्या जेवणाबरोबर खायचा पदार्थ आहे? मला 'दहीवडा' हा शब्द मोठ्याने म्हणायलादेखील आवडत नाही. 'गोसावडा' म्हटल्यासारखे वाटते.
----
ज्या पुण्याची 'लग्न' ह्या उद्योगधंद्याबद्दल उगीचच ख्याती आहे, तिथल्या पंगतीतल्या जेवणाइतकी तर जेवण या संस्कृतीची इतर कोणीही अवहेलना केली नसेल. एक तर 'पत्रावळ' हा प्रकार गळ्यात काड्या अडकवणारा. त्यातून महत्वाच्या जागी उसवणे हे पत्रावळीने तुमानीकडून शिकून घेतले असावे. चुकून एखादी भाजी आवडलीच, तर ती जिथे वाढली जाते तिथेच नेमकी पत्रावळ आ वासते.! असल्या त्या पत्रावळीत-मिठात ओघळलेले लोणचे, कोशिंबीर ह्या नावाखाली केलेला टोमॅटो आणि शेंगदाण्याचा सत्यानाश, त्यात घुसणारे जळकट खोबऱ्याचे तुकडे टाकलेले पंचामृत, त्याच्या बाजूला मठ्ठ्याच्या द्रोणाला टेकण ह्याहून अन्य कार्य न साधणारा तो वांग्याची भाजी नामक चिखल, ह्या सर्व पदार्थांना पानशेतच्या लोंढ्यासारखा वाहून नेणारा अळवाच्या फतफत्याचा लोंढा, गारगोट्या भाताची उदबत्त्या लावायच्या सोंगटीएवढी मूद, तिच्यावर डाळीपासून फटकून निघालेले वरण आणि त्या मुदीची गोळी पोटात जाईपर्यंत तिथे येऊन कोसळणारा मसालेभात नावाचा भयाण ढीग.! एवढ्याने संपले नाही, म्हणून नुसतेच तळून काढलेले भज्याचे पीठ आणि मग 'जिलेबीचे जेवण' ह्या मथळ्याला शोभणारा मजकूर नसला तरी ठसठशीत मथळा हवा म्हणून पडणारी ती अंगठ्या एवढी जाड वळणाची जिलबी.! एवढ्याने संपत नाही. मग "मठ्ठा, मठ्ठा" असा आरडाओरडा होतो, आणि त्या लवंड्या किंवा बिनलवंड्या द्रोणात कोथिंबिरीच्या देठासकट पाचोळा घातलेले आंबूस पाणी ओतले जाते.! कोंड्याचा मांडा करून खावे हे खरे, पण उगीचच उंदराला ऐरावत म्हणून कसे चालेल.? ज्याला 'ताक' म्हणणे जीवावर येते, त्याला 'मठ्ठा' कसे म्हणावे.? आणि असल्या भोजनाला अमका बेत होता, तमका बेत होता, म्हणून वाखाणायचे.! प्राणाखेरीज इतर कशाशीही न बेतणारा हा बेत 'पेशवाई थाट' वगैरे शब्दांनी गौरविला जातो.
----
आपण "खातो" हे सांगण्याचीही एक नवी ऐट आहे. जन्मजात 'खाणारा' आपण कधी मासा खाल्ला किंवा मटण खाल्लं. हे मुद्दाम म्हणून बोलणार नाही. "आज काय मिळालं होतं हो?" ह्या प्रश्नाचे उत्तर बांगडा, कर्ली, पापलेट, कुर्ल्या किंवा जैतापूरची कालवे ह्यांपैकी कुठल्यातरी अर्थाचे हवे असते. त्यामुळे "आम्ही आज फिश खाल्लं," म्हणणारी मंडळी ही होतकरू आहेत, हे समजावे! "आम्ही नॉनव्हेज खातो बुवा!" हे एक असेच बावळट वाक्य.

.. युरोपातील प्रत्येक चांगली गोष्ट ज्याप्रमाणे त्यांनी आमच्याचकडून उचलली असे चांगल्या चांगल्या विद्वानांचे मत आहे, त्याप्रमाणे हे 'सूप'देखील त्या लोकांनी आमच्याचकडून चोरले, आणि आमच्या चांगल्या गोष्टी पाहायला आम्हांला आता तिथे जावे लागते तसे चांगले सूप प्यायलादेखील आता युरोपात जावे लागते! एरवी, आपल्या भोजनविद्देला 'सूपशात्र' कशाला म्हटले असते? ज्यात सूप अजिबात नाही ते सूपशात्र होईलच कसे? मात्र युरोपाने सुपाची कितीही ऐट केली, तरी 'सूप' करावे चिन्यांनीच. सध्या चिनी मंडळी आपल्याकडे जरा तिरक्या डोळ्यांनी पाहू लागली असली, आणि 'हिंदी-चिनी भाऊ-भाऊ' हे राहिले नसले, तरी 'हिंदी-चिनी भोजनभाऊ' हे मान्य करावे !
माझ्या खाद्यजीवनात मी उत्कृष्ट म्हणवणाऱ्या हॉटेलांना निकृष्ट स्थान दिले आहे. तिथे पार्टी देता येते, चवीने खाता येत नाही. ज्या पंगतीत "अरे, जरा मसालेभात फिरवा--", "वाढ-वाढ, मी सांगतो, वाढ जिलबी---" असल्या आरोळ्या उठत नाहीत ती काय पंगत आहे? पंगत ही तिथल्या आरड्याओरड्याने रंगत असते, पानातल्या पदार्थानी नव्हे!

हल्ली हाॅटेलना नंबर दिले आहेत .हे नंबर तिथल्या चवीच्या गुणानूक़माने नसून टेबलावरच्या काटे चमचा ,वेटरचा गंभीरपणा ,मॅनेजरचा सुट आतली कृत्रिम थंडी ,आणि अनेक दिवे लावून केलेला अंधार या कारणाने दिले आहेत .खाणार्याने सावध राहावे. आपल्या आरोग्यापेक्षा खिसा पाकीट सांभाळावे. टेबलावरच्या त्या चकचकीत सुरयानी लोणी कापले जात नाही पण खिसे मात्र सफाईने कापले जातात. खरी हाॅटेले म्हणजे जिथे माणसे माशा आणि "ए पोरया फडका मार;ही आरोळी सुखाने एकत्रीत नांदतात. ती विशेषतः "पोरया फडका मार:आणि दोनिस्सवं यातल्या पहिल्याचा खर्ज व दुसर्यातला तार सप्तक एक हामंनी साधून जाते. ते हाॅटेल. तिथला बटाटावडा नुसती जीभ
,झणझणारे कान ,आणि डोळेच काय सारे पंचेद्रीयाची खबर घेऊन जाते. इथल्या वेटरला टीप दिली तर गिराईक खुळे वाटते. त्या मोठ्या हाॅटेलमधे वेटरला केवळ टिप घेण्यासाठी नेमलेले असते त्यातून आपण देशी भाषेतून बोलणारे असलो की ,खेळ खल्लास !ही मोठी हाॅटेल व खाणावळी महणजे जेवणाच्या जागाच नव्हेत. मोठ्या
हाॅटेलमधून केवळ फॅशन म्हणून व खाणावळीत अविवाहित किंवा कुटुंब माहेरी गेले म्हणून जायचे असते .

---
माझी सुखाची कल्पना एकच आहे. आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफल रंगलेली असावी. सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा. हवा बेताची गार असावी. हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी. ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे. आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद घातल्यासारखा स्वाद घालावा. दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी. आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे. यथेच्छ भोजन व्हावे. मस्त पान जमावे. इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा. गार पाणी प्यावे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही. त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की, संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवर्यासारखा फिरायला देखील जातो; विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणी देखील घेऊन देतो!

--
माझे खाद्यजीवन
हसवणूक
पु. ल. देशपांडे

Wednesday, January 19, 2022

भिकाऱ्याचे नाव

आमच्या घरासमोर उजव्या हाताच्या वळणावर एक भिकारी बसत असे. लहानपणी लवकर जेवलो नाही तर "हां, जेव लवकर, नाही तर त्या आंधळ्याला सांगते धरून न्यायला -" असे सांगून आमची आजी आम्हांला भेडसावत असे. शाळेत असताना परीक्षेच्या वेळी मारुतीच्या खडीसाखरेच्या नवसाबरोबरच त्या आंधळ्याला दिडकीचा दानधर्म करून देवाच्या हिशेबी आम्ही पोरे पास व्हायला उपयोगी पडण्याचा चांगुलपणा किंवा पुण्यही जमा करीत होतो. मोठेपणी - खोटे कशाला सांगू? ' बरोबरच्या मैत्रिणींबरोबर आपल्या सच्छील वर्तनाची छाप पाडायला उसन्या बेफिकिरीने त्याच्या वाटीत मी आणेल्याही टाकल्या होत्या. वळणावरचा आंधळा ! कितीतरी जुना होता ! दोन्ही डोळ्यांच्या पार खाचा झालेला आंधळा ! "आंधळ्याला दाता दे भगवान !" - किती वर्षे आम्ही त्याचा हा पुकार ऐकत आलो होतो, पण त्याच्याबद्दल कधी मुद्दाम दया उत्पन्न व्हावी असेही वाटले नाही, इतका तो नेहमीच होता.

आणि एकदा दुपारी कुठूनसा घरी परतत होतो. वळणावरचा आंधळ्यासमोर एक भिकारणीने अंगावरच्या चिरगुटांशी स्पर्धा करणारे फाटके कपडे पसरले होते, त्यावर वरणात बरबटलेले भाकरीचे तुकडे होते, आणि हातातला ॲल्युमिनियमचा गडवा उचलीत ती आंधळ्याला सांगत होती, "यवढी भाकर खाऊन घे ! मी कमिटीच्या नळावर पाणी भरुनश्यान आनते - बरं का मुरारी."

मुरारी ? आंधळ्या भिकाऱ्याचे नाव - भिकाऱ्याला नाव असते? - आज वीसपंचवीस वर्षात माझ्या मनात कधी चुकून विचार आला नव्हता की, वळणावरच्या भिकाऱ्याला नाव असेल.

मुरारी ! भिकाऱ्याला नाव असते? छे ! वळणावरचा आंधळा ! चावडीसमोरचा लंगडा ! देवळापुढला महारोगी ! ह्या सर्वांना नावे आहेत? छे ! भिकाऱ्याला नाव असू शकते ? त्याचे कधी बारसे झाले होते? शेजारच्या 'करत्यासवरत्या' आजीने कधी त्याच्या इवल्याश्या कानात कुर्र् करून बारशाला त्याचे नाव सांगितले होते ? आपल्या पोराला मुरारी म्हणून प्रथमच हाक मारताना त्याचा बाप किंचित लाजून मुरारीच्या आईकडे पाहून लाजला होता? छे! भिकाऱ्याला - भिकाऱ्याला नाव नसते, त्याला फक्त विशेषणे असतात -

आंधळा - लंगडा - थोटा - मुका -

- उरलंसुरलं 
पु.ल. देशपांडे

Thursday, January 13, 2022

असे हे पु. ल.

असे हे पु. ल.

हे आहे एका पुस्तकाचं शिर्षक. बालशंकर देशपांडे (वसंत मासिकाचे संपादक) यांनी १९६८ साली लिहीलेल्या. मनोरंजन प्रकाशनातर्फे 'असे हे पु.ल.' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. सुमारे २५० पानांच्या या पुस्तकात बालशंकर देशपांडे यांनी पु.लं.च्या तोपर्यंतच्या साहित्यिक कार्य कर्तृत्वाचे सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाची विभागणी दोन भागात आहे -


१) व्यक्तिदर्शन
२) वाॾमयविवेचन

पहिल्या भागात पु लंची लहानपणापासूनची जडणघडण, शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध नोकऱ्यांमध्ये भटकंती करताना सुरू झालेली पु लं ची कला आनंद यात्रा, मखमलीच्या पडद्याकडून रुपेरी पडद्याकडे झालेला सहज प्रवास आणि त्याहीपेक्षा सहजतेने सिनेसृष्टीचा घेतलेला निरोप, मधल्या काळात झालेला प्रेमविवाह, मग ऑल इंडिया रेडिओतील ड्रामा प्रोड्यूसर, त्यानंतर बी.बी.सी.मधे प्रशिक्षण घेऊन दूरचित्रवाणीवर सांभाळलेली जबाबदारी, पुढे सुरू केलेले बहुरुपी प्रयोग, पद्मश्री चा किताब आणि साहित्य अकादमी पुरस्कार, नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद असा १९६८ पर्यंतचा पु.लंचा प्रवास या भागात येतो.

वांॾमय विवेचन या भागात पु.लंचे विनोदी लेख संग्रह, प्रवासवर्णन, एकांकिका, नाट्यकृती, व्यक्तिचित्रण, बालवाॾमय याबरोबरच त्यांनी लिहीलेली लोकनाट्यं (आजचा वग, पुढारी पाहिजे), कादंबरी - अनुवाद (एका कोळियाने, काय वाट्टेल ते होईल), विडंबन यांच्याबाबतचे विवेचन ही बालशंकर देशपांडे यांनी केले आहे. विशेषतः 'काय वाट्टेल ते होईल' या पुस्तकाची दखल घेतल्याबद्दल लेखकाचे खास आभार मानायलाच हवेत. त्याच प्रमाणे पु.लं. नी रूढार्थाने विडंबन लिहीले नसले तरी 'कवटपोळियेचा दृष्टांतु' , अंमलदार मधील बेबंदशाहीतल्या स्वगताचे विडंबन, 'अंगुस्तान विद्यापीठ', 'शांभवी - एक घेणे' असे पु.लं. च्या लेखनातले निवडक नमुने सादर करून अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांचा गद्य अवतार पु.लं. नी आणला याकडे लक्ष वेधल्याबद्दलही लेखकाचे कौतुक करायलाच हवे.

मराठी वांॾमयाचा गाळीव इतिहास, खुर्च्या - एक न नाट्य हे सगळं नंतरच्या काळात अवतरलंय पण विडंबनकार पु.लं. वर शिक्कामोर्तब करणारं आहे. पुस्तकात शेवटी पु.लंचा जीवनपट, पु.लं.बाबत तो पर्यंत प्रकाशित झालेल्या लेखांची सूची, पु.लं.च्या तोपर्यंतच्या साहित्य आणि कला निर्मितीची सूची जोडलेली आहे. तसेच पु.लं. चे काही विशेष फोटो या पुस्तकात पाहायला मिळतात. 'असे हे पु.ल.' या पुस्तकाला पु.लं. चे सुहृद मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांची रसाळ प्रस्तावना आहे. खास मंवि शैलीत (आठवा पुरूषराज अळूरपांडे) राजाध्यक्षांनी पु.लं. चे गुणविशेष आणि लेखक बालशंकर देशपांडेंच्या लेखनाचे विशेष अधोरेखित केले आहेत. बालशंकर देशपांडे यांच्या विधानाचा आधार घेऊन या पुस्तकामुळे एखाद्या समर्थ समालोचकाला पु.लं.च्या समग्र वाॾमयाचं आणि व्यक्तिमत्वाचं यथार्थ दर्शन घडवण्याचा चेव आलाच तर इथे देशपांडेंनी बरीचशी प्राथमिक सिध्दता टापटिपीने मांडून ठेवली आहे हे देखील राजाध्यक्ष आवर्जून सांगतात.

हे पुस्तक लिहीलं तेंव्हा पु.ल.पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभे होते. ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा, एक झुंज वाऱ्याशी अशा कलाकृती त्यांच्या हातून निर्माण व्हायच्या होत्या. आणीबाणी पर्वातील पु.लं.चे तिखट दर्शन व्हायचे होते, पु.ल.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे होते .... आणि बरंच काही घडायचं होतं त्यामुळे आज हे पुस्तक वाचताना त्याचं अपरिहार्यपणे असलेलं अपुरं रुप जसं रुखरुख लावतं तसंच निदान एका टप्प्यापर्यंतच तरी त्यांचं कर्तृत्व एकत्र मांडलंय याचं समाधान ही वाटतं. त्याचबरोबर मराठीतल्या अन्य कोणा साहित्यिकाबाबत - त्याची लेखन कारकीर्द सुरू - खरंतर ऐन बहरात असताना असं पुस्तक सिध्द झालेलं नाही हे जाणवून पुन्हा एकदा पुरुषोत्तमाय नमो नमः म्हणावसं वाटतं.

माझ्यासाठी हे पुस्तक खासमखास आहे कारण पुस्तकांच्या आतल्या पानावर खुद्द पुलंची स्वाक्षरी आहे (सोबत फोटो टाकलाय) आता पु.लं. ची सही घेतलेलं पुस्तक मला रद्दीच्या दुकानात मिळावं हा माझा भाग्ययोग...

- मकरंद जोशी
makarandvj@gmail.com

Wednesday, January 12, 2022

पुलंची मजेशीर पत्रे - ८

नोव्हेंबर १९४३ मध्ये पुलंचे पार्लेकर मित्र श्री. माधव खरे विवाहबद्ध झाले. त्यांना पुलंनी लिहिलेलं 'उपदेशपर' पत्र असं :
 
लग्न करणाऱ्या माणसाला आणि नोकरी शोधायला निघालेल्या माणसाला वाटेल त्याकडून उपदेश ऐकून घ्यावा लागतो.

१) मुख्य म्हणजे हाफीस सुटल्यावर तडक घरी येत जा.
२) बायकोला केवळ खूष करण्यासाठी म्हणून काही जिन्नस विकत आणायचा हा परिपाठ ठेवू नकोस. आज तू कौतुकाने बायकोच्या डोक्यावर गजरा चढवशील; पण चार दिवसांनी गजऱ्यासह ती तुझ्या डोक्यावर बसेल. (पुरे बुवा !)
३) महिन्यातून एकदोनदा रागवायची सवय ठेव. डोके दुखण्याची सवय कर पत्नी गाणारी असल्यास ती आपोआप होईल.
४) कॉलेजमधून प्रथम नाव काढून टाक
5) मित्रांना नेहमी जेवायला बोलवीत जा
6) ६) एक दत्ताची तसबीर आण. नट्यांचे विवस्त्र फोटो अलूरकरांना बहाल कर आणि ते अल्बम मला दे
7) ७) टिळक मंदिराच्या सामान्य सभासदत्वाचा राजीनामा दे. ह्या सात 'श्लील' आज्ञा आहेत. इतर तोंडी सांगेन. ह्या सप्तपदीच्या वेळी पावला पावलाला मनात म्हण, देव तुम्हा उभयतांचे कल्याण करो हा आशीर्वाद
आर्या : माधव नमाधव' कसा हे कूट सोडवा गाजी
प्रेमें सर्वासंगे दोघेहि सदैव गोड वागा जी ॥

(सध्या कुशलवोपाख्यानाचा अभ्यास चालू आहे- तेव्हा क्षमस्व)

*तळटीप (ही पत्राचा भाग नाही) : माधव खरे यांच्या पत्नी 'नर्मदा' , 'नमा' हे माहेरचं लाडकं नाव आणि न- माधव , नमा-धव ही पुलंची कोटी.


संदर्भ: अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ७

नंदा नारळकर यांना १९ जानेवारी १९७९ रोजी पुलंनी घटप्रभेहून पत्र लिहिलं, कर्नाटकातला मुक्काम म्हणजे भाषाही त्या ढंगाची लिहिणं ओघानं आलंच. त्या पत्रात पुल लिहितात,

प्रिय नारळकर अण्णा,
काल तुमचं भयंकर म्हणजे भयंकरच म्हणायचं असं आठवण झालं. काय झालं बघा तर संध्याकाळचं सूर्य अस्त जाण्यापूर्वीचं वेळ डोचकीवर झाडाचं सावली धरून अंगणात येकटच इजिच्येअरवर आंग आणि स्टूलवर पायगिय टाकून तुमचं वुड्डहौससाहेबचं युक्रिजचं गोष्ट वाचत होतो. ते साहेब- पोटात हासून हासून गोळी आणतंय बघा

'Who is he?"

'An uncle of mine," Ukridge.

"But he seemed respectable."

यवढं वाचलं आणि यकटाच ठोऽऽ करून हसलो तर झाडाचं मागची बाजूनी 'काय झालं हो साहेऽऽब ?' अशी आवाज आली. घाबरून पाळण्यातलं पोरगी आंग काढतात तसं अंग काढलं- काय भूतगीत काय की म्हणून तर आमचं जुनं ब्याळगावातलं वळकीचं गोव्याचं कपिलेश्वरी म्हणून येक थोड गवयकाम करणार- (पाप ! चांगलं माणूस) बरोबर हितलं पोष्टमास्तरण्णांना तुमच्या पायावर घालायला आणलं म्हणून घेऊन आलं बगा.


-सोनल पवार
संदर्भ :अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ६

श्री. वामनराव यांना मालवणीत पत्र लिहितानाही पु.ल. असेच मजा करून सोडतात.

प्रिय वामनरावांनू, तुमचा पत्र मेळला. वाचून खूब बरां वाटलां. कशाक म्हणश्याल तर तुमचो गाव धाम्पूरच्या तळ्याक लागून तशी माझी सासूरवाडी खुद्द धाम्पूरच. (धाम्पूरच खरा धामापूर न्हय.) तर सांगत काय होतो, धाम्पूरच्या ठाकुरांचो मी जावांय ! धाम्पूरच्या तळ्यात गुरां पाण्याक् घेवन् कोणच जात नाय ह्यां तुमचा म्हण्णा खरांच. पण चुकलां माकलां ढ्वार जाता मागसून गुराख्याचो पोर नसलेला. मगे बापडा पाय घसरून पडता तळ्यात , म्हणीचो अर्थ काय ? की माणसाक तान लागल्यावर खैसर जांवां आनि सर जांव नये ह्येचो इचार खणा नाय ! असां आपला माका वाटता, तां काय जरी आसला तरी धाम्पूरच्या तळ्याची सर काश्मीरच्या डाल लेकाक नाय. खरां की खोटां ? (१०-१-७८)

या पत्राच्या शेवटी "चुकीचं मालवणी वाचण्याचा तुम्हाला इतका त्रास दिल्याबद्दल क्षमा करा" अशी पुस्तीही पुल जोडतात. इतका लोभस त्रास पुनःपुन्हा दिला तरी चालेल, अशीच यावर वामनरावांची प्रतिक्रिया झाली असणार.

- सोनल पवार
संदर्भ :अमृतसिद्धी

Monday, January 10, 2022

राघुनानांची कन्येस पत्रे यातील शेवटचे तीन उतारे

उपसंहार :

एवंगुणविशिष्ट, श्री. राघूनाना सोमण यांच्या कन्येस पाच पत्रेरूपी मधू वाचकरूपी वाङ्मयमधुकारांपुढे लेखरूपी द्रोणातून सादर करीत आहो. यापुढे नानांनी बरेच दिवस पत्रे लिहिली नाहीत. याचे कारण पुसता, त्यांनी 'गोदीचे नानांस उत्तर' काढून आमच्या हाती दिले. आजवर 'कन्येस पत्र' सर्वांनी प्रसिद्ध केली आहेत. परंतु कन्येचे पित्यास पत्र आम्ही प्रथम प्रकाशित करत आहो. राघूनानांची ही कन्या महाराष्ट्रातली आद्य पत्रलेखिका ठरावी.

चि. गोदीचे ती. नानांस उत्तर१२ :

ती. नाना यांस त्रीकालचरणी मस्तक ठेऊन बालके गोदावरीचा शीर सास्टांग नमस्कार विनंती विशेष. तुमची मोठ्ठीमोठ्ठी पत्रे पोचली. एवढी मोठी पत्रे का पाठवतां असें आईने विचारले आहे. पोस्टाची तिकिटे आपल्याला काही फुकट मिळत नाहीत म्हणावे. आणि खुशाली कळवण्यास काय होते. तुमचे लक्षण लहानपणापासून आसेच, आसे आजी म्हणाली व एकदा हातींपायी धड सुकरूप येवूं दे म्हणाली. गंधाची बाटली व आईने बुंदी पाडायचा लहानसा बेताचाच आणा म्हणावं झारा आणावयास सांगितले आहे.

तुमची पत्रे वाचावयास वेळ लागतो. तुम्ही आल्यावर वाचून दाखवा. आम्ही सर्व खुशाल आहो. दुसऱ्या मजल्यावरच्या भीमामावशी जिन्यावरून पडल्या व त्यामुळे कठडा मोडला आहे. म्हणून दुसऱ्या मजल्यावरच्या भीमामावशींच्या एजमानांचे व चाळीच्या भय्याचे भांडण झाले. आई सौ. लिही मागे व आजी गं. भा. लिहायचं खुशाल आहेत. हे पत्र मी लीहलं आणि मधूनमधून आई सांगत होती. तरी गंधाची बाटली व रिबिनी वीसरू नये.

तुमची अध्याकारक
गोदी कु.

हे पत्र श्री. सोमणांनी हताशपणे आमच्यापुढे फेकले. ह्या हताशपणाचे कारण आम्हांला कळले नाही. त्यांचा हा अकारण आलेला हताशपणा, हे औदासिन्य जावे आणि दुरिताचे तिमिर जाऊन पत्ररूपी सूर्याने प्रकाशावे अशी इच्छा व्यक्त करून हे संपवतो.

रसिकांचा पादरविन्द
म. म. अणणुराव शेषराव मोगलगिद्दीकर
पत्रेतिहासमंडळ, हलकर्णी (मु. व पो.)


पुस्तक - बटाट्याची चाळ 
लेखक - पु.ल. देशपांडे 

Monday, January 3, 2022

'पुल'कित गदिमा -- सुमित्र माडगूळकर

पु.ल.देशपांडे व गदिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यावरुन प्रभातफेरीला निघाले होते,रात्रभर प्रभात स्टुडिओत एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून मंडळी चालायला निघाली होती,पुल ना फारसे चालायला आवडायचे नाही मात्र गदिमांना प्रभात फेरीचे प्रचंड प्रेम, नाईलाजाने का होईना पण गदिमांकडून लवकर गीते लिहून घ्यायची असतील तर पर्याय नव्हता!,तितक्यात रस्त्यात महानगरपालिकेचे दिवे बंद झाले आणि काय गंमत गदिमांना गीत सुचले,

"विझले रत्नदीप नगरात,आता जागे व्हा यदुनाथ".

एक मोठा प्रश्न आज सुटला गदिमा-पु.ल आजच्या काळात का होत नाहीत? तर याचे उत्तर सोपे आहे,अहो आता अनेकदा महानगरपालिकेचे दिवे सकाळी १०-११ पर्यंत बंदच होत नाहीत तर लोकांच्या प्रतिभा जागृत होणार कशा!.

गदिमा व पु.लं चा स्नेह खूप जुना,ज्याकाळात आपल्यात लेखनाचे गुण आहेत हे पु.लं ना उमगलेही नव्हते तेव्हापासूनचा,तेव्हा पुल गायक होण्याच्या मागे लागले होते,महाराष्ट्रभर फिरुन ते भावगीत गायनाचे कार्यक्रम करत असत,कोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्याकाळात खूप प्रसिध्द होता,मेळ्यात त्याकाळात गाणार्‍या गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके, राम गबाले, आबासाहेब भोगावकर,पद्मा पाटणकर (नंतरच्या विद्याताई माडगूळकर)!.मुंबईत संगीत क्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची 'मुंबईचे नामवंत भावगीत गायक' अशी ओळख करुन दिली जात असे ते पु.ल.देशपांडे या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत!.गदिमांची अनेक गीते त्यांना तिथे मिळत असत व त्यांना चाली लावुन ते कार्यक्रम करत असत.यातूनच पुढे दोघांची भेट झाली व दोघात स्नेह निर्माण झाला.

१९४८ सालचा 'वंदे मातरम' चित्रपट,गदिमांनी आग्रहकरुन पु.ल व सुनिता बाईंना या चित्रपटात भूमिका करायला लावली होती,सुनिताबाई माहेरी गेल्या होत्या तर गदिमांनी त्यांना पत्र लिहून त्यांचा होकार मिळवला,"वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम" हे गदिमांचे गाजलेले गीत याच चित्रपटातले (नुकतीच या चित्रपटाची प्रत मिळाली आहे व National Film Archive of India,Pune कडे उपलब्ध आहे)."गुळाचा गणपती" हा चित्रपट 'सबकुछ पुल' अश्या नावाने जरी ओळखला जात असला तरी यात गीते होती अर्थातच गदिमांची, "इंद्रायणी काठी देवाची आळंदी,लागली समाधी ज्ञानेशाची" हा अभंग याच चित्रपटातला,हा गाणार्‍या पं.भिमसेन जोशींना सुध्दा माहित नव्हते की हे गीत गदिमांचे आहे,अगदी एच.एम.व्ही कंपनीच्या रेकॉर्डवर त्या काळात 'एक पारंपारीक अभंग' अशा नावाने तो प्रसिध्द झाला होता,शेवटी गदिमांना सांगावे लागले की अहो हे माझे चित्रपट गीत आहे!.

पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदीराच्या उदघाटन प्रसंगी एक गीत हवे होते,पु.लं नी पंचवटी गाठली व गदिमांनी गीत दिले

"जसा जन्मतो तेज घेऊन तारा!
जसा मोर घेऊन येतो पिसारा!
तसा येई घेऊन कंठात गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!

रतीचे जया रुपलावण्य लाभे!
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे!
सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!"

पु.लं नी याला संगीत दिले व उदघाटन कार्यक्रमात ते बकुळ पंडित यांच्या आवाजात सादर झाले,याशिवाय 'असे आमुचे पुणे' ही सूंदर कविताही गदिमांनी दिली होती त्याचेही सादरीकरण याच कार्यक्रमात झाले.आजही बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्वांच्या छायाचित्राखाली या ओळी लावलेल्या आहेत.(आधी मोठया अक्षरात असलेल्या ओळी आता दुर्दैवाने लोकांनी भिंग घेऊन वाचाव्यात इतक्या बारीक करून लावल्या आहेत हे काळाचे दुर्दैव!)

'नाच रे मोरा' हे गदिमा-पु.ल जोडीचे गाजलेले गीत,एकदा मस्ती करता करता पुलंनी गदिमांना सांगितले माडगूळकर 'नाच गं घूमा कशी मी नाचू' च्या धर्तीवर बालगीत हवे आहे,गदिमा उत्तरले घे लिहून 'नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच'.

या जोडीने अनेक सुंदर सुंदर गीते आपल्याला दिली,नुसती वानगी दाखल नावे घ्यायची झाली तर 'इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे','नाच रे मोरा नाच','इंद्रायणी काठी देवाची आळंदी','श्रीहरी विदुराघरि पाहुणा','इथेच टाका तंबू','ही कुणी छेडिली तार','जा मुलि शकुंतले सासरी','कबीराचे विणतो शेले','कुणी म्हणेल वेडा तुला','सख्यांनो करु देत शृंगार','माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग','दूर कुठे राउळात','केतकीच्या बनात उतरत्या उन्हात' अशी अनेक गीते आहेत.

याशिवाय शाकुंतल व अमृतवेल अश्या दोन गदिमांच्या सुंदर संगीतिकांना पुल नी संगीत दिले होते,याशिवाय 'तुका म्हणे आता' या पुल च्या नाटकासाठी गदिमांनी गीते लिहून दिली होती,दोघांनी मिळून केलेल्या अश्या अनेक कलाकृती आज पडद्याआड आहेत.

"त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे" ही कविता प्रथम गदिमांच्या तोंडून ऐकल्यावर पु.ल म्हणाले होते, "महाकवी,तुम्ही लकी !",तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो मुंबईत,त्या वातावरणात वळणावर असते जळाऊ लाकडांची वखार ! .

गदिमा व पु.ल अनेक साहित्यिक कार्यक्रमांना बाहेरगावी एकत्रही जात असत,कधीकधी रात्री भोजन पुर्व रसपानाचा कार्यक्रमही होत असे प्रथम पु.ल नको नको म्हणायचे त्यावर गदिमा मित्राला म्हणायचे,

'आबासाहेब,यांना डोंगरे बालामृत द्या हो!' (त्यावेळी लहान मुलांसाठी हे औषध प्रसिद्ध होते!)

चेष्टा-मस्करी करीत रसपानाला रंग चढे,पु.ल पुरे,छोटा पेग,छोटा पेग करायचे.ते म्हणायचे "अण्णा,रसपान असे बेताने नि बेमालूम करावे की मासा जसा पाण्यात पाणी पितो.रसपान हे सुध्दा अत्तराप्रमाणे असावे"

लगेच गदिमा म्हणायचे "लावा रे लावा,अत्तराचा फाया याच्या मनगटावर लावा!"

एकदा शरदरावजी पवार दोघांना बारामतीला सांस्कृतिक कार्यक्रमाला घेऊन गेले होते,कार्यक्रम सुंदर झाला ,परत निघताना त्यावेळी पवारांकडे गाडी नव्हती (नसते अहो!,विश्वास ठेवा!) तेव्हा त्यांनी एका व्यापारी मित्राची गाडी घेतली,त्याच वेळी त्या मित्रालाही काम निघाले व तो ही यांच्या सोबत निघाला,गाडीत पवारांनी या गृहस्थांशी ओळख करुन दिली गेली "हे ग.दि.माडगूळकर हे महाकवी आहेत.गीतरामायण यांनीच लिहिले आहे आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्राचे महान विनोदी लेखक आहेत".समोरच्या महाशयांचा साहित्याशी अगदी बादरायण संबंधही नव्हता ते अगदी निष्पाप आणि निरागस पणे उत्तरले

"व्हय! पर हे करत्यात काय?".

त्याप्रसंगावर नंतर या दोघांची जी हास्यरेस सुरु झाली ती लवकर थांबेचना,गदिमा म्हणाले "आमची अजून महाराष्ट्रात अशी कुणी जिरवली नव्हती!"

पु.ल चष्मा काढून हसत होते.त्यावर गदिमा म्हणाले

"पुरश्या,चष्मा घाल.चष्मा काढल्यावर तू चोरासारखा दिसतोस! तू नाटक लिहितोस ना? असा 'Anticlimax' कधी लिहिला आहेस?,असा कनवाळू माणूस आम्ही कुठे बघितला नाही.आपल्या पोटापाण्याची कोण रे चौकशी करतंय!".

पु.ल यांचे बंगाली भाषेवर खूप प्रेम होते,त्यावर गदिमांनी ए.क.कवडा या टोपण नावाने बिंगचित्र लिहीले होते...

"पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"

गदिमा-विद्याताई व पुल-सुनीताबाई यांचेही खूप चांगले संबंध होते,अनेकदा रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगत मग लक्षात येई उशीर झाला ,मग गप्पात खंड न पडता गदिमा-विद्याताई पुल-सुनीताबाईंना सोडण्यासाठी त्यांच्या घरा पर्यंत जात व तिकडे पोहोचल्यावर कधी पुल-सुनीताबाई या दोघांना सोडायला पंचवटीत परत!,कधीकधी तर असे रात्रभर चाले!,किती ही रसिकता व स्नेह!.

७-८ डिसेंबर १९७७ पु.ल रवींद्रनाथांची दोन गीते घेऊन पंचवटीत आले,"माडगूळकर बाबा आमटे यांच्या आनंदवनात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे,त्यासाठी या गीतांच्या तर्जुम्यावर गीतरचना हवी आहे",गदिमा खूप आजारी होते,तरीपण मित्राच्या प्रेमाखातर त्यांनी लगेच दोन गीते लिहून दिली

"येइ रे प्राणा,सर्वात्मका!
उंच उडव या मरुभूमीची गगनी विजयपताका!"

व दुसरे होते

"कोवळ्या रोपट्या,आज तू पाहुणा
भूषवी अंगणा येउनिया"

१४ डिसेंबर १९७७ गदिमा आपल्याला सोडून गेले व पुल,बाबा आमटे यांच्यासाठी लिहीलेली ही गीते गदिमांची शेवटची गीते ठरली. पु.ल १२ जून २००० रोजी आपल्याला सोडून गेले.असे हे दोन जिवलग मित्र, त्यांच्याविषयी किती लिहू आणि किती नाही असे होऊन जाते,गीतरामायणातील "त्रिवार जयजयकार रामा" गीतातल्या ओळी जणू गदिमांनी पु.लं साठीच लिहून ठेवल्या आहेत...

"पुलकित पृथ्वी,पुलकित वायु" तसे हे होते 'पुल'कित गदिमा..

- सुमित्र माडगूळकर