Friday, July 29, 2022

वसंता माझ्या अंतरंगात शिरलेला माणूस - पु.ल. देशपांडे

१६.८.८३
१, रूपाली, पुणे ४

दिनेश,
तुझं पत्र आल्यानंतर तुला एखादं मजेदार पत्र पाठवावं अस म्हणत होतो. गेल्या महिन्यापासून सुचेता आणि सुधीर लोकरे आमच्या शेजारीच राहायला आले आहेत. त्यांच्या चिनूमुळे तू दोन वर्षाचा होतास त्यावेळच्या 'आशीर्वाद'मधल्या तुझ्या सर्व कार्यक्रमांची पुनरावृत्ती सुरू झाली आहे. (माझ्या पोटावर बसून गुद्दे मारण्यापासून ते 'कोकिळा दिशत का नाही? नुशती कशाला ओललते?' असल्या अनेक प्रश्‍नापर्यंत.) चिनूच्या गमतीजमती तुला लिहिणार होतो. पण दैवम्‌ अन्यत्र चिंतयेत्‌ म्हणतात त्याप्रमाणे ३० जुलैला वसंतराव देशपांड्यांना खूप जोराचा हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचं एकदम प्राणोत्क्रमण झालं. मधुमेह, ब्लड प्रेशर, स्पॉण्डिलायटिस, किडनी स्टोन यांच्याशी त्याचा झगडा चालू होता. पण हृदयविकाराचा इतका जोरदार आघात होऊन वसंतराव असे एकदम जातील अशी कल्पना नव्हती.

आदल्या दिवशी आम्ही दोघे त्याच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. रविवारी २४ तारखेला भाई केवळ वसंताला भेटायला म्हणून पुण्याला आले होते. त्यावेळीही आम्ही मजेत बोलत होतो. त्याला श्वास घेताना धाप लागत होती. पण आजाराचे स्वरूप त्याही वेळी इतकं गंभीर वाटलं नाही. ३० जुलैला पुणे विद्यापीठात भीमसेनची संध्याकाळची मैफिल होती. यमन संपवून ७।। च्या सुमारास भीमसेननी मारवा सुरू केला. तेवढ्यात एका गृहस्थांनी मला अर्जट टेलिफोन आलाय, हा निरोप सांगून बैठकीतून उठवून बाहेर नेले. टेलिफोनवरून वसंत देशपांडे वारल्याची बातमी आली होती. ती ऐकत असताना हॉलमधून भीमसेनचा मारवा ऐकू येत होता. मारवा हा वसंताच्या मालकीचा राग! त्याच्या निधनाच्या बातमीला त्याच मारव्याचे पार्श्वसंगीत असावे हा योगायोगही किती विचित्र, वसंता गेल्यावर लगेच बापूने आमच्या घरी फोन केला. त्यावेळी सुनीता वसंताकडे जायला निघाली होती. आम्ही रोज त्याच्याशी तास दीड तास गप्पागोष्टी करून येत होतो. त्या दिवशी संध्याकाळी चिनू वगैरे घरी आले म्हणून सुनीता भीमसेनच्या गाण्याला आली नाही. मुलं घरी गेल्यावर ती वसंताकडे जायला निघाली आणि बापूचा फोन आला. तिने लगेच युनिव्हर्सिटीत फोन करून मला निरोप पाठवला. मी आणि पाटणकर लगेच निघालो. मैफिलही थांबवली. सगळ्यांना धक्काच बसला.

आम्ही दोघेही जोडीनेच वाढलो. त्याचं गाणं तर मोठं होतंच, पण त्याची नुसती भेट होणे हादेखील किती आनंददायक अनुभव असे हे  तुला ठाऊकच आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी, त्याचा नकला, नाना विषयांतली माहिती, ती सांगण्याची त्याची खास पद्धत हे आठवताना हसू कोसळायचं, आता हसू येतं पण त्यापासून लगेच अश्रूही उभे राहतात. मला तर खचल्यासारखंच वाटत आहे. आता पुन्हा गाण्याची किंवा गप्पागोष्टींची तशी मैफिल जमणार नाही. त्याच्या निधनाने हजारो माणसे हळहळली. 'कट्यार' किंवा टीव्ही, रेडिओवरील नाट्यसंगीत यामुळे सामान्य श्रोत्यांपर्यंत तो जाऊन पोहोचला होता, पण तो खरा अभिजात संगीतातला श्रेष्ठ कलावंत. साधेपणाने राहिला, आपल्या ज्ञानाचा दिमाख न मिरवता ते ऐश्वर्य गाण्यातून दाखवले. ते पाहण्याची नजर असणारे थोडेच असतात.

भरत नाट्यमंदिरात शोकसभा झाली. भीमसेन, हिराबाई, ज्योत्स्नाबाई, सुरेश खरे (नाटककार), चित्तरंजन कोल्हटकर, त्याचा शिष्य पद्माकर कुलकर्णी, विश्‍वास मेहेंदळे आणि मी त्याप्रसंगी बोललो. वाय. डी. जोशी अध्यक्ष होते. प्रचंड गर्दी होती. अत्यंत गंभीरपणानं सभा पार पडली. पुष्कळदा शोकसभेत एखादा वक्ता वाहवत जातो तस॑ झालं नाही. शेवटी वसंताची 'आज मैं लडूंगी सैंया' ही भैरवी लावल्यावर लोकांना हुंदके आवरेनासे झाले. वर्तमानपत्रांनीही अग्रलेख लिहून त्याला श्रद्धांजली वाहिली. अजूनही लेख येत आहेत. वसंता यापुढे “आहेस का...' म्हणत त्या, त्या दिवशीचा त्याचा जो गंमत करायचा मूड असेल त्यासकट उभा राहिलेला दिसणार नाही, हा विचार सहन होत नाही. आपल्या अंतरंगातलाच एक भाग गळून पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे कशातही लक्ष लागत नाही. क्षणोक्षणी त्याची आठवण येते. एखादा माणूस आपल्या अंतरंगात किती शिरला आहे याची जाणीव त्याच्या हयातीत येत नसते.

गेले तीन दिवस (१३,१४,१५ ऑगस्ट) इथे किशोरीची आणि मन्सुरांची गाणी केली. तशी सकाळ, संध्याकाळ, रात्र तीन गाणी झाली. मी १३, १४ च्या मैफिलीला गेलो होतो. १५ ला गेलो नाही. १४ च्या बैठकीत किशोरी मारवा गायली. चांगला गायली. पण श्रोत्यांतला प्रत्येक जण इंटरवलमध्ये वसंताच्या मारव्याची आठवण काढीत होता. त्या जागी ३-४ महिन्यांपूर्वी झाकिर हुसेनच्या तबल्याच्या साथीत वसंताचं गाणं किती अप्रतिम झाले होते ते तुला मी पाठवलेल्या टेपवरून कळलंच असेल. त्याची शास्त्रीय संगीतातली ती शेवटली मैफिल. माझं हे पत्र तुला मिळण्यापूर्वी वसंताच्या निधनाची बातमी तुला कळली असेल. यापूर्वी तुला पत्र पाठवायचं म्हणत होतो, पण सुन्न होऊन गेलो होतो. सध्या सगळीकडेच निरुत्साही वातावरण आहे. अतिवृष्टी- महापूर- काय विचारू नकोस. माईआत्ते तुला स्वतंत्रपणे पत्र पाठवीत आहे.

तुझा
भाई

Tuesday, July 26, 2022

भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन - पु.ल. देशपांडे

इंग्लंड वरून परततांना बोटीवरील हिंदी पोरांच्या इंग्रजी बायका आणि त्यांचे प्रयत्न बघून मनात आलेले विचार मांडताना पु.ल. 'अपुर्वाई'त म्हणतात,

माझ्या बोटीवर ज्या काही गौरकाय सुनबाई दिसत होत्या, त्यांची मात्र मला मनापासून दया येत होती. त्या बिचाऱ्या आपल्याकडून अगदी खूप साड्या नेसायचा आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण पदरदेखील नीट न सावरता येणाऱ्या पोरी इथे संसार कसा सावरणार, ह्याची मला उगीचच चिंता वाटत होती. पुष्कळजणी खूप उत्साहाने येतात आणि तितक्याच निराशेने परततात. पण आमच्या तरुणांनी तिथे जी गौरांगनांसह बिऱ्हाडे थाटली आहेत, त्यांची तर अवस्था फारच करुण आहे. हिंदी लोकांच्या संगतीला हे मडमांचे देशी नवरे सारखे टाळतात आणि गोऱ्यांच्या कुटुंबात त्यांचे स्वागत फारसे मनापासून होत असावेसे वाटत नाही.
 
गोऱ्या बाईशी लग्न केलेल्या एका मराठी मित्राची एक गोष्ट मला आठवते. तिने मराठी शिकायचा खूप प्रयत्न केला होता. पण तिला ‘खरकटं’ म्हणजे काय ते समजावून सांगता सांगता आमचा मित्र टेकीला आला होता. ती म्हणे, “जेवून ताटात उरलेलं जर खरकटं, तर हात कसा खरकटा? पेला कसा खरकटा?” मला वाटते, संसारात भावनात्मक एकात्मता वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत. खरकटे म्हणजे काय? पारोसे म्हणेज काय? पाण्यातली दशमी ओवळ्याची आणि दुधातली सोवळ्याची कशी? निऱ्या काढणे आणि घडी करणे ह्यातला फरक करणारी रेषा कुठली? कुंकवाची पिंजर कधी होते आणि लसणाचा ठेचा केव्हा होतो आणि चटणी कधी होते? पिठले आणि झुणका ह्यांच्या सीमारेषा कुठल्या? हे कळणे अधिक महत्वाचे! जेवताना सणसणीत भुरका जोपर्यंत मारता येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन कसे होणार?
धागे जुळतात ते अशा चिल्लर गोष्टींनी!
ओंजळीतले तीर्थ पिऊन तो ओला तळवा डोळ्यांना लावताना जे गार वाटलेले असते, ते बर्फाचा खडा घेऊन वाटत नाही. माणसाची घडण काय असंख्य चमत्कारिक गोष्टींनी होते! इंग्लंडच्या मुक्कामात मला चटकन हिंदुस्थानात जाऊन केळीच्या पानावर मऊ मऊ भात, वरण, लोणकढे तूप आणि ताज्या लिंबाची फोड त्यावर पिळून दोन घास खाऊन यावे, असे डोहाळे लागले होते. आजन्म पाश्चात्य वातावरणात राहिलेल्या माझ्या जेष्ठ मित्राने मृत्युशय्येवरून पिठलंभात खायची इच्छा व्यक्त केली होती. रक्ताच्या थेंबा थेंबात लपलेला तो आत्माराम अशा काही चमत्कारिक गोष्टींची मागणी करतो आणि – ‘गड्या तू वंशाचा दिवा नाहीस तर केवळ दुवा आहेस’ याची जाणीव करून आपल्याला एकदम लहानांत काढून टाकतो.

'अपूर्वाई' मधे इंग्लंड/फ्रान्स फिरून झाल्यावर परतीच्या प्रवासात पु.ल. म्हणतात
 
'मला सदैव वाटे की, इंग्रजी अन्न्पाण्याचे माझ्या नसांतून रक्त झाले नाही. केवळ देह्धारणेच्या ते कामी आले. पॅरीसला सर्व प्रकारची मुक्तता असूनही सीन नदीच्या काठी एका संध्याकाळी आम्ही भटकत असताना कोणी नाही असे पाहून मी जोरजोरात 'मनाचे श्लोक' ओरडून घेतले तेव्हा जिवाला गार वाटले.'


पु.ल.देशपांडे
-अपूर्वाई

संपूर्ण पुस्तक मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

केशवराव एक चांगला माणूस - पु.ल. देशपांडे

केशवराव हे अशा एका व्यवहारात होते की ज्यात 'लेखक' नावाच्या काहीशा 'स्फोटक' घटकाशी सतत संबंध येतो. केशवरावांनी हे सारे स्फोटक पदार्थ खूप चातुर्याने सांभाळले. मला वाटतं, त्यांना पुस्तक आणि पुस्तकाशी संबंधित असणारा जो कोण असेल त्याच्याविषयी आतूनच प्रेम असावं. 'पुस्तक' या गोष्टीवरच त्यांचं अतोनात प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी केवळ स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरच प्रेम केलं नाही, आपल्या पुस्तकालयात सर्व मराठी प्रकाशकांकडची पुस्तकं ठेवली. मॅजेस्टिक ग्रंथप्रदर्शनात सगळ्या मराठी साहित्याच्या वैभवाचं प्रदर्शन दिसेल याची दखल घेतली.
लेखकांत आपले लेखक आणि इतर प्रकाशकांचे लेखक असा पंक्तीप्रपंच केला नाही. उत्तम पुस्तकाला पुरस्कार देतांना ते मॅजेस्टिकचं प्रकाशन असावं असा कधी अप्रत्यक्ष सूचनेतून सुध्दा प्रयत्न केला नाही. या ग्रंथप्रेमामुळेच ते संबंध आलेल्या प्रत्येक ग्रंथप्रेमी माणासाला सोयरे सकळ आप्तजन या भावनेनेच भेटले. आणि त्यांच्याशी संबंध आलेल्या प्रत्येकाला जाणवला तो हा त्यांच्या आप्तभावापोटी आलेला चांगुलपणा.

मॅजेस्टिक गप्पा ऐकायला आनंदाने जमणारा ग्रंथप्रेमी श्रोत्रृसमुदाय पाहणे याचाच आनंद त्यांना मोठा होता. ग्रंथजत्रेला जमणारी आबालवृध्दांची गर्दी हे त्यांचं टॉनिक होतं. लेखकांच मन:पूर्वक आदरातिथ्य करणं हा व्यावहारिक डावपेचाचा भाग नसून एक प्रकारचा कुळाचार असल्यासारखा हा प्रसंग ते साजरा करीत. या सर्व उपक्रमांचं नेतृत्व पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असे. पण चुकूनही त्यांनी कधी ते नेतृत्व किंवा यजमानपण मिरवलं नाही. मॅजेस्टिक गप्पांना येणार्‍या, ग्रंथप्रदर्शनात हिंडणार्‍या, ग्रंथ विकत घ्यायला येणार्‍या कित्येकांनी केशवराव कोठावळे यांना पाहिलेलंही नसेल. किंबहुना आपण दिसावं यापेक्षा आपण दिसू नये याच धडपडीत ते असायचे.

केशवरावांचं हसणं मिस्किल असे. ते कधी आवाज चढवूनही बोलत नसत. व्यवसायाचा व्याप प्रचंड होता. पण आसपासच्या मित्रमंडळींना त्यांनी कधी तो व्याप किती प्रचंड आहे, हे भासूही दिलं नाही. एक विलक्षण शांत, संयमी आत्मविश्वासानं ते हा व्याप सांभाळत असत. त्या व्यापाचा त्यांनी स्वत:चं मोठेपण सिध्द करायला कधी बाऊ करून दाखवला नाही.

लक्षावधी रूपयांची उलाढाल करणार्‍या या माणसानं स्वत:च्या यशाची जाहिरात सदैव टाळली. यामागे नुसती खुबी नव्हती. एक प्रकारची सभ्यता होती. आपलं मोठेपण सतत दुसर्‍याच्या डोळ्यात खुपेल अशा पध्दतीनं मिरवणं ही असभ्यता आहे- नव्हे बराचसा अडाणीपणा आहे. अशा रीतीनं मिरवणं हास्यास्पद ठरतं हे कळण्याच्या सभ्यतेइतकीच सूक्ष्म विनोदबुध्दीही केशवरावांना होती. त्यांच्या सार्‍या वागण्या वावरण्यात एक प्रकारचा साधेपणा होता. कुणावर छाप टाकण्याचा प्रयत्न नव्हता. आपलं श्रेष्ठत्व सिध्द करण्याचा अट्टहास नव्हता. त्याबरोबरच गुळमट गोडवा किंवा भावनांचं प्रदर्शनही नव्हतं.

एखाद्या पुस्तकाची भरमसाठ स्तुती करतांना मी त्यांना कधी ऐकलं नाही किंवा नावड्त्या पुस्तकाची किंवा लेखकाची अकारण निंदा करतानाही पाहिलं नाही. मतभेदाचा आग्रह किती ताणायचा याबद्दलही त्यांचे काही आडाखे होते. आपल्याला न पटणारी गोष्ट मुळात कुणालाही पटण्याच्या लायकीची नाही अशा हट्टाला पेटून ते कधीच उभे राहिले नाहीत..

- पु.ल.देशपांडे


मॅजेस्टिक कोठावळे
संपादन : वि.शं. चौघुले
आभार आणि सन्कलन : शुभदा पट्वर्धन
मॅजेस्टिक प्रकाशन,

संपूर्ण पुस्तक मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Tuesday, July 19, 2022

पुलं तुम्ही.. - सुधीर जोशी

पुलं तुम्ही जाताना

साठवण इथेच ठेवून गेला
आणि तुमच्या आठवणीने
प्रत्येक डोळा पाणावला

पुलं तुंम्ही जाताना
थोडतरी थांबायच होतं
सा-या व्यक्ती वल्लींना
तुम्हाला एकदा भेटायच होतं

‘बटाटयाची चाळ’
आता पोरकी झाली
त्या ‘फुल राणीलाही’
तुंम्हीच बोलकी केली

‘तुझं होतं तुज पाशीच’
हे आता जाणवत
जेव्हा तस नावीन्य
क्वचीत सापडत

‘पुर्वरंग’ ची ‘अपूवाई’
नेहमीच राहिल मनात
देशो देशी फिरताना
स्वदेश नाही विसरलात

‘वा-यावरची वरात’
पोहोचली घराघरात
लहान थोर वेडे होती
हसण्याच्या भरात

तुम्ही फार बिनधास्त होता
जेव्हां हादरवली दील्ली
‘पुलं तुम्ही स्वत:ला काय समजता’
जेव्हा उडवता ‘खिल्ली’

नाटक, संगीत, सिनेमा, लेखन
काही शिल्लक नाही ठेवल
जे जे मिळवल ते ते
तुम्ही नेहमीच वाटून टाकलं

रहावलं नाही म्हणून
प्रयत्ने काहीतरी लिहीन
जेव्हा पत्राचा मजकूर लिहीणा-याने
पत्यातल्या नावाच्या धन्याला बोलावून नेलं……

सुधीर जोशी

Saturday, July 16, 2022

मनात घर करून बसलेला 'लंपन'

१९६४ साली, सत्यकथेत 'वनवास' नावाची, प्रकाश नारायण संत याची एक कथा छापून आली होती. त्यातला शाळकरी वयाचा 'लंपन' वर्षानुवर्ष मनात घर करून बसला होता. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत ह्या लंप्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडी चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस - अतिशय आर्जवी. एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं.


सत्यकथेत तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे. ज्या उत्सुकतेनं आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्‍याच उत्सुकतेनं आणि आनंदानं, प्रकाशने तीस वर्षांच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि ह्या संग्रहात आलेल्या लंपनच्या कथा वाचल्या. पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे.
          
पौगंडदशा ओलांडताना यौवनाच्या सुगंधी झुळुका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड. लंप्या म्हणतो तसं 'सुमीची आठवण आली की पोटात काहीतरी गडबड होते आहे' असं वाटायला लावणारी ही अवस्था, कोणीतरी ह्या वयाच्या अवस्थेला 'Emotional Sea-Sickness' म्हटलं आहे. ह्या अवस्थेचं इतक्या सहजतेनं दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही. लंप्याची ही कथा त्या वयाचा मॅडनेस अंगात मुरवून लिहावी लागते. त्या लेखनात प्रकाश यशस्वी झाला आहे.

लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, 'एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या' तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चटकन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे.

प्रकाशला धन्यवाद आणि त्याचं अभिनंदन.
- पु.ल. देशपांडे

वनवास पुस्तक खालील लिंकवरून मिळवता येईल.
--> वनवास - प्रकाश नारायण संत

Monday, July 11, 2022

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात - प्रभाकर पेंढारकर

...आनंदवनाला पु.ल.देशपांड्यांची भेट. दरवर्षी 'मित्रमेळा' इथे साजरा होतो. आनंदवनाचा हा आनंदोत्सव. आम्ही कॅमेरा लावलेला होता. आणि रंगमंचावरचे कार्यक्रम चित्रित होत होते. त्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मग आम्ही प्रेक्षकांचे शॉटस घेऊ लागलो आणि एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला. आम्ही कॅमेरा स्टेजकडे वळवला, तिथे पु.ल. आलेले होते. हे त्यांचे प्रेक्षकांनी केलेले मनापासूनचे स्वागत.

प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट. आणि माझ्या एकदम लक्षात आलं की समोरच बसलेल्या मुली मात्र स्तब्ध त्यांना नेमके काय होत आहे, स्टेजवर कोण आलं आहे हे न समजल्यासारखं त्या उभ्याच, मग आजूबाजूला टाळ्या वाजतात म्हणून त्याही टाळ्या वाजवू लागल्या. मी शेजारी उभ्या असलेल्या गृहस्थांना विचारलं,"या कोण मुली?"

"इथल्याचं आहेत. त्यांच्या अद्याप लक्षात आलेलं नाही की स्टेजवर पु.ल. आलेले आहेत. त्या अंध आहेत."

दुसर्‍या दिवशी सकाळी मी पु.लं.ना गाठलं. नागपूरला त्यांचा एक कार्यक्रम होता. त्यांना लगेच निघायचं होतं. मी त्यांना म्हणालो,"मला तुमची फक्‍त दहा मिनिटंच हवी आहेत." ते हसले आणि म्हणाले,"मी काल पाहत होतो तुम्ही माझे भरपूर शॉटस्‌ घेतले आहेत."

“ते घेतलेच आणि आज अगदी वेगळ्या प्रेक्षकांच्या बरोबर काही शॉटस्‌ हवे आहेत."

आनंदवनात बाजूला मुलींचं एक वसतीगृह आहे. तिथे अंगणात मुली थांबल्या होत्या. पु.ल. आले आणि मुलींना समजलं तसं त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पु.ल. एका खुर्चीवर बसले आणि मुली त्यांच्यासमोर बसल्या. त्यांना पु.ल. म्हणाले की, "कालच्या गर्दीत तुम्ही होता पण मला काही तुमच्याशी बोलता आलं नाही. म्हणून मी तुमच्यासाठी आज इथे आलेलो आहे. ओळखलत का मला?" मुली एकदम म्हणाल्या,"हो हो, आमचे बाबा तुम्हाला भाई म्हणतात, तेच ना तुम्ही?"

आणि पु.ल. म्हणाले,"मी भाईच ! मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे." आणि मुली म्हणाल्या, आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे." कॅमेरा पु.लं. कडे वळला. क्लोजअपमध्ये त्यांच्या डोळ्यात उभं असलेलं पाणी क्षणभर दिसलं आणि पु.ल. म्हणाले, "तुम्हाला माहीत आहे का मी सावळा आहे, जरा ढब्या आहे. बराचसा बावळट, वेंधळा त्याशिवाय का लोक मला पाहताच हसतात?

"आणि एक सांगू, ज्यांना दिसतं ते सगळेच पाहतात असं नाही. त्यांना हे समजत नाही की आपण पाहण्याजोग्या या जगात कितीतरी गोष्टी आहेत. पण आपण पाहतच नाही. तुमचं तसं नाही तुम्ही इथल्या बागेत फुलं पाहता. त्यांना पाणी घालता, त्यांना हात लावता, त्यांचा वास घेता. तुम्हाला समजतं की हा गुलाब, शेवंती, हा मोगरा आहे."

तुम्ही ही फुलं पाहता, त्यांना समजून घेता, हे समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे."

आणि त्या मुली म्हणाल्या "आम्हालाही फुलं दिसतात म्हणून तर आम्ही त्यांना पाणी घालतो." आणखीन थोड्यावेळा गप्पा चालू राहिल्या आणि मुलींना समजलं की हा भाईही आपल्याला दिसतो आहे. मग पु.ल. म्हणाले, "तुमच्याकडे मी पाहतो आणि मला एका मुलीची अतिशय आठवण येते. ती एक गाणं म्हणायची ते तुम्ही ऐकलं असेल. माझ्याबरोबर म्हणाल का?"

आणि भाई म्हणाले

“नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे.
काळा काळा कापूस पिंजला रे”


आणि मुली उभ्या राहिल्या. भाईच्या आवाजात आपलाही आवाज मिसळून गाऊ लागल्या. आम्हाला समजलं नाही कॅमेराच्या मागे बाबा आमटेही उभे राहीले होते. ते हळूच म्हणाले, "ह्या मुलींच्या डोळ्यांना सूर्याच्या कोवळ्या किरणांनी कधी स्पर्शच केला नाही. भाईंच्या शब्दांनी मात्र त्यांना स्पर्श केला. त्या पाहू लागल्या."

भाई सांगत होते आणि मुलीही त्यांच्या बरोबर म्हणत होत्या,

"काळा काळा कापूस पिंजला रे.
आता तुझी पाळी
वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच,
नाच रे मोरा,
आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच !


-- प्रभाकर पेंढारकर
जीवनज्योत दिवाळी अंक २००९

Friday, July 1, 2022

मनुष्यजन्माची सार्थकता - प्राचार्य प्रकाश बोकील

एकदा पु. ल. देशपांडे के.ई. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. थोडे बरे वाटताच पु.ल. वॉर्डच्या बाहेर फेऱ्या मारू लागले. त्या दिवशी त्यांना एका वॉर्डाच्या बाहेर बरेंच रुग्ण झोपलेले दिसले. ते खूप अस्वस्थ झाले. जागेअभावी रुग्णांना बाहेर झोपावे लागले ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. ते तडक हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना भेटले आणि म्हणाले, “मी आता ज्या वॉर्डाची स्थिती पाहिली, त्याचे विस्तारीकरण करायला हवे आहे. त्यासाठी मी १ लाख रुपयांची देणगी देतो. पण काम मात्र लगेच सुरू करा.”

व्यवस्थापकांनी हे काम लगेच हाती घेतले आणि पुलंच्या म्हणण्याप्रमाणे तो वॉर्ड मोठा केला. त्यांनी ठरवले की याचे उद्‌घाटन मोठ्या थाटामाटात करायचे आणि त्याला नावही 'पु.लं.'चेच द्यायचे. त्याप्रमाणे त्या व्यवस्थापकांनी पु.लं.ना कळवले. यावर पु. ल. लगेच म्हणाले, “हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व्हायला हवा त्याचे उद्घाटन वयस्कर, अनुभवी सेविकेच्या हातून व्हावे. महत्त्वाचे म्हणजे माझं नाव देऊन मोठेपणाच्या ओझ्याखाली मला दडपून टाकू नका." ही अट मान्य करून हा कार्यक्रम साजरा केला. प्रदीर्घ सेवा केलेल्या सेविकेच्या हस्ते उद्घाटन झाले.
         
त्या वेळी पु. ल. आपल्या भाषणात म्हणाले, "मी कोणी मोठा पैसेवाला नाही. माझ्यापुरता पैसा ठेवून मी उरलेला पैसा समाजासाठी खर्च करायचा ठरवले आहे. मला वाटते, स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकानेच जर असे प्रयत्न केले तर मनुष्यजीवनाची सार्थकता होईल. या रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला येथे सगळ्या सुविधा मिळाल्या तर माझा देणगी देण्यामागचा हेतू सफल होईल."

प्राचार्य प्रकाश बोकील