Friday, September 30, 2022

भाईंच्या "नव"दुर्गा - (मकरंद सखाराम सावंत)

मुळात असं काही नाहीय, लिहिताना भाईनी हा विचार केला हि नसणार कि लिहित असलेली व्यक्तिरेखा स्त्री आहे कि पुरुष, त्यांच्यातली विसंगती टिपून काढताना भाई नेहमी दाखवून देत होते कि जसे या विसंगतीला जात, धर्म नसतात तसेच लिंग हि नसतं, पण मला आवडलेल्या त्यांच्या साहित्यातल्या नव दुर्गा आणि त्याचं महात्म्य लिहावं असं वाटलं, तोच हा प्रयत्न, अर्थात भाईंनी जी काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिली त्यातलीच काही मी घेतोय, त्यांनी बयो , हिराबाई याचं व्यक्तिचित्र जे लिहिलं त्या बद्धल नंतर कधी तरी, या लिखाणात असामी असामी, व्यक्ती आणि वल्ली तसेच बटाट्याची चाळ मधल्या व्यक्तिरेखा जास्त येऊ शकतात कारण त्यातली पात्र जास्त वेळ आपल्या सोबत होती आणि जास्त खुलली गेली आहेत तरी , आवडल्यास वाचा नावडल्यास दुर्लक्ष करा, वाईट साहित्य हे विरोधा पेक्षा दुर्लक्षल्याने मरतं. आणि चांगलं तरतं, गाथा सकस असली कि ती बुडवण इंद्रायणीला सुद्धा जमत नाही, तेव्हा सादर आहेत भाईंच्या नव दुर्गा.

१ ) अन्नपूर्णा
असामी असामी मधली धोंडो भिकाजी जोशी यांच्या पत्नी अन्नपूर्णा, आवड - नवऱ्याला उघडा टाकून तंबोऱ्यास कापडं शिवणे, झंपरचंद्रिका च्या नियमित वाचिक, डोक्यावर ग्रंथ घेऊन चालण्याचा अभ्यास, नाटकास गेल्यास पात्रांपेक्षा पडद्यांवर जास्त लक्ष, मुंबईत नक्की माहेर कुठे हे माहित नाही पण पार्ल्यास एक मावशी रहाते. अपत्य - भरपूर. वज्र - कांद्याचं थालीपीठ, ज्याच्या वासाने धोंडोपंतांचं वैराग्य पळून जातं , बाकी भजन गायल्यावर मिळालेली ढाल आहेच.

२ ) इंदू वेलणकर
नऊवारी साडी, आंबाडा, हातात पुरुषांनी बांधावं तसं एवढं लठ्ठ घड्याळ. हातावर पुस्तकांचा ढीग, रात्रभर मंगळागौरीचं जागरण करून आल्या सारखी दिसणारी. विश्वविद्यालयात इंग्रजी या विषयात सगळी बक्षीस मिळवलेली, कल्हई वाल्या पेंडशेंच्या बोळात राहणाऱ्या ज. गो वेलणकर ( रिटायर्ड एज्युकेशनल इन्स्पेक्टर ) यांच्या तीन बायकांपेकी बहुतेक पहिल्या बायको पासून झालेली मुलगी. कार्ला केव्हज ला जेव्हा इंग्लिश ऑनर्स च्या मुलांची ट्रीप गेली होती तेव्हा उठलेल्या मधमाश्यांच्या मोहोळात इंदू वाचली पण नंदा प्रधान ला माश्या चावल्या, रात्री इंदू नंदाच्या खोलीवर आली, रात्रभर नंदा चं डोकं मांडीवर घेऊन रडली, नंदाला चमच्याने चहा पाजला , इंदू ला कुणीतरी सांगितलं नंदाची आई त्याला सोडून लहानपणी पळून केली, नंदाला एका रात्रीचं बालपण देणारी इंदू. नंदा आयुष्यात फक्त त्या रात्री रडला . इंदू नंदा सोबत रजिस्टर लग्न करणार होती आणि लग्ना नंतर त्याला न्हाऊ घालून झारीने दुध पाजून तीट लावणार होती, इंदू ने घरी काही सांगण्या आधी ज गो वेलणकर याने काठीने तिला मारलं, नंदा मध्ये पडला तसा म्हाताऱ्याने दोन पोरांना इंदूच्या समोर टाकलं या पोरांना मारून जा म्हणाला, पुन्हा इंदू भेटली नाही.


३ ) ( आपली ) सरोज खरे
हेडमास्तरीण बाईंच्या मुख्याध्यापिका झाल्यावर घडलेल्या सडपातळ बदलाचे मूर्तिमंत उदाहरण, सरोज खरे. नुसत्या दाताने “ नअस्कार आवल्याला तसदी दिली” म्हणायच्या या वाक्यात सुद्धा लिपस्टिक आड यायची. पाल्याच्या अभ्यासा पेक्षा पालका च्या माहिती मध्ये जास्त इंटरेस्ट असणारी मुख्याध्यापिका. खाद्यावर वेणीचा शेपटा उपरण्या सारखा पडलेला. पालकांकडून फॉर्म भरून घेणाऱ्या, मध्येच शेपटाचा सव्य, अपसव्य करणाऱ्या, पाल्याचे ट्रेटस पालकात शोधणाऱ्या. प्रोफेसर ऑस्ट्रोजेम च्या थिअरी वर प्रचंड विश्वास असणाऱ्या (स्वतःच्या) ओठान ओठ न लावता बोलणाऱ्या, दातांतून कुरमुरे उडवल्या सारख्या हसणाऱ्या सरोज खरे.

४ ) पणती
किराणाभुसार दुकाना समोरच्या गर्दीत दिवाळीत दिसणारी, फाटक्या परकर पोलक्यातली पोरगी, टेल न्यायला जिच्या कडे फक्त एक मातीची पणती आहे. दुकानदाराने भांड कुठेय विचारल्यावर न गांगरता दारिद्रयाने शिकवलेल्या धिटाईने दिवाळी साठी नाही खायला तेलं हवंय असं उत्तर देणारी. दहाच पैसे दुकानदाराच्या हातावर ठेवत जेवढं पणतीत देता येईल तेवढं टेल मागणारी, आमच्या कडे एवढेच पैसे आहेत म्हणणारी, दहा पैशाच्या तेलाने पणती भरेल एवढं तेल हि नसताना , तेवढ्याच तेलात दिवाळी साजरी करणारी मुलगी, पणती.

५ )श्यामा चित्रे
नाथा कामात ला झालेली सर्वात खोल जखम . श्यामा खरं तर फर्स्ट इअरलाच रुतत होती, पण नाथाच्या सिव्हिक आणि इंग्रजीच्या नोट्स वाचून पास झाली, नाथाचं अक्षर पाहून श्यामा म्हणाली होती “असल्या अक्षराचा मुका घ्यावासा वाटतो “ फर्स्ट इअर चा रिझल्ट लागला त्याच संध्याकाळी चौपाटीवरच्या मावळत्या सूर्याला साक्ष ठेऊन श्यामा म्हणाली होती “ मी तुला आजन्म विसरणार नाही नाथा, “पांढर पातळ नेसलेली, पांढरा ब्लाउज, गळ्यात पांढरी माळ. केसात पांढऱ्या जाईचा सर, आणि हो मिश्चीफ चा मंद वास.हे सगळं लेऊन नाथा सोबत टिळकांच्या पुतळ्या जवळ बसलेली श्यामा आपल्या गुलाबी निमुळत्या बोटांनी नाथा कामात हि अक्षर इंग्लिश मध्ये कोरत होती.पुढे मधु शेट्ये च्या badminton वर भाळली, पुढे मधु शेट्ये सोबत तिने लग्न केलं आणि डिवोर्स सुद्धा घेतला, एकदा रुपारेल ला असलेली डॉक्टर नेन्यांची मुलगी सुषमा नेने, हिला बघून नाथा म्हणाला होता हिचे डोळे श्यामा सारखे आहेत.

६ ) मंजुळा दगडू साळुंखे
मुसळधार पावसात थीएटर बाहेर आपली फुलांची टोपली घेऊन उभी असायची मंजुळा.समद्या जंटलमन लोकांना रामभाव नाहीतर वसंतराव म्हणणारी, थोडा पिकलेला असेल तर रामभाव नाही तर वसंतराव.आणि सगळ्या बायकांना एकजात शांताबाय म्हणणारी मंजुळा.फ्लोरीस्टातली शिळी फुलं पाणी मारून विकणारी मंजुळा हिच्या डोळ्यात कधी तरी आपण सुद्धा या काचच्या मागं हूब राहून शेळी फुलं इकाची स्वप्न बघते.मंजुळा चिंचपोकळीच्या झोपडपट्टी मध्ये रहायची, बाप दगडू , अगदी कंडम माणूस.पोरगी बंग्ल्यावाल्या बरोबर गेली असं कळलं तसा तिच्याकडून पैसे काढायला पोचला, पण बाप परत आला तर त्याच्या अंगावर कुत्रं सोडा सांगणारी, आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा आंघोळ करताना अंगभर आरश्यात पाहिलं तेव्हा खरं तर मंजुळा तो आरसा फोडणार होती पण दगड सापडला नाही, मग तिने त्यावर स्वतःचे कपडे अंथरले आणि आरश्या पासून स्वतःला लपवलं.नकळत अशोकच्या प्रेमात पडणारी मंजुळा त्याला सोडून जाताना त्याचा चष्मा त्याच्या वस्तू कुठे आहेत ते आठवण करून देणारी मंजुळा, जिला सुप्रसिद्ध उच्चारशास्त्रज्ञ प्रोफेसर अशोक जहागीरदार याने सारंगपूर ची राजकुमारी मंजुश्रीदेवी म्हणून मिरवलं ती ती गटाराकाठी जन्मलेली आणि वाढलेली, मंजुळा दगडू साळुंखे.

७) सुबक ठेंगणी
खरं तर हि एकटीच नाहीय, हि प्रतीनिधी आहे, बऱ्याच सरला पित्रे , गोदी गुळवणी, रतन समेळ, राघुनानाच्या मुली या सगळ्यांची, मे महिन्यात एष्टी ने मुंबईला दाखवायला आणलेल्या किंवा अश्याच मुंबईहून कुठे तरी निघालेल्या या सगळ्या, कुठल्या तरी मधु मलुष्टेच्या समेवर यायची वाट बघत असताना दिसतात.

८) सुभद्रा
आबुराव ची सुभद्रा, देवगावकर तमाशा मंडळात कधी नाचायला आली आणि कधी आबुराव ची झाली तिचं तिला हि कळलं नाही, तसं तिला बरंच काही कळलं नाही. अंगभर लादलेली मेहंदी आवडली कि आबुराव ने बांधलेला आंबाडा यात तिला मोरपीस कधी भावलं तेही कळलं नाही, सिनेस्टार मेनकेने येऊन जेव्हा आबुराव चा हात हातात घेतला तेव्हा आपली नखं दरवाजाच्या लाकडी चौकटीत रुतु लागलीत हे सुद्धा सुभद्रेला कळलं नाही.आबुराव कायमचा मेनके सोबत फिल्म लाईन ला गेला तेव्हा आपल्या गळ्यातल्या सोन साखळी ला गाठ कशी पडली हे सुद्धा कळलं नाही, आबुराव ची पोर जाई आपल्या पोटात आपण का वाढवली, आणि आबुराव ची वाट बघत एक दिवस आपण कायमचे डोळे मिटले, ती वाट पाहण्याचं कारण सुद्धा सुभद्रेला कधीच कळलं नाही.

९)बटाट्याची चाळ
चाळीचे आद्य मालक, कै. धुळा नामा बटाटे. नंतर यांच्या वंशजांनी करू नये ते धंदे केल्याने चाळीच्या मालकीचा खांदेपालट होत आता ती कोथिंबीरीचे व्यापारी असलेल्या मेंढे पाटलांच्या घराण्याकडे गेली आहे. खरं तर चाळ आता थकलीय. खिडक्यांचे गज अर्ध्याहून अधिक उडालेत , जिने आता आपली पायरी सोडून वागू लागलेत.आज जो रंग दिसतोय ती छटा कोणत्याही डबीतून आलेल्या रंगाची नाही,अनेक वर्ष अनेकांनी पुसलेल्या बोटांतून , टेकलेल्या डोक्यांतून धुरातून तयार झालेला हा रंग आहे. चाळीला मुळचा पांढरा रंग होता तो . आता कुठेतरी कुणीतरी खिळ्याने कुणीतरी डुक्कर आहे किंवा दुष्ट आहे असं लिहिलेलं आहे.त्या शिवाय जागोजागी खिळ्यानेच उडते पक्षी उगवता सूर्य काढलेला आहे.दसरा दिवाळीला चार सहा पणत्या , कधीतरी झेंडूची तोरणं, आंब्याच्या डहाळ्या सोडल्यास त्या व्यतिरिक्त चाळीवर सौंदर्याचे संस्कार असे झालेच नाहीत. पण तरीही चाळ सदैव नांदती जागती राहिली. मलेरीयात कुडडली , प्लेगात गाठी आल्या , देवी आल्या पण साठीच्या आतलं काही कुणी कुणाच्या खांद्यावरून गेलं नाही.चाळीचा चिवटपणा माणसांत हि उतरला. मुलांच्या मुंजी, मंगळागौर, बारशी, हळदीकुंकू असे वर्षभर या ना त्या बिऱ्हाडात सांकृतिक कार्यक्रम असायचे पण चाळकरी घरचं कार्य असल्यासारखे वावरायचे,हौसेला घटनांच्या नियमात बांधलं ते नंतरच्या पिढीने , मग निवडणुका आल्या, भांडण आली चाळीतला ओलावा सरला फक्त ओल उरली.पण अजून धागे तुटले नाहीत , अजूनही कार्य असलं कि लोकं अंग मोडून काम करतात .कुठेतरी एकाच नळातून आलेल्या पाण्याने प्रेम टिकवून ठेवलं आहे.चाळीला भीती आहे ती आपण कोसळण्याची नाही, तर आपल्या नंतर जी वास्तू इथे उभी राहील त्यात माणसं दारं बंद करून रहाणाऱ्या ब्लॉक मधल्या माणसांसारखी राहतील हि.तेव्हा चाळीला वाटे आपला भुईसपाट झालेला देह तीन मजल्यांनी उठून उभा राहील आणि म्हणेल “अरे नाही रे ! माझ्या पोटात या पेक्षा खूप खूप माया होती !!”

मकरंद सखाराम सावंत

Wednesday, September 28, 2022

पुलं'च्या नावाचा सन्मान हे भाग्य - लता मंगेशकर

"वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनी मध्ये गाण्यांना पुलंनी दिलेली दाद आणि अखेरच्या आजारातही आपली मिस्कील विनोदी वृत्ती टिकवलेले पुल.... " महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक आठवणी उलगडत गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी ३० जानेवारी २००८ रोजी विनम्रतेने "पु. ल. स्मृती सन्मान' स्वीकारला.

"पुलंच्या नावाचा सन्मान शिवशाहिरांच्या हस्ते मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. आज माझ्या जीवनातला फार मोठा दिवस आहे,'' असेही त्या म्हणाल्या.

"आशय सांस्कृतिक' आणि "परांजपे स्कीम्स' आयोजित पाचव्या "पुलोत्सवा'चे उद्‌घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पु. ल. स्मृती सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते लतादीदींना देण्यात आला. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी चंद्रकांत कुडाळ, प्रदीप खिरे, सारंग लागू, विजय वर्मा, श्रीकांत आणि शशांक परांजपे, महोत्सवाचे निमंत्रक डॉ. नरेंद्र जाधव, "सकाळ'चे संचालक-संपादक आनंद आगाशे, सरिता वाकलकर व्यासपीठावर उपस्थित होते.

दीदी पुढे म्हणाल्या, ""प्रत्यक्षात पीएल आणि मी फारच कमी वेळा भेटलो. आमची पहिली भेट माझ्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीला झाली. तेव्हा धोतर, पांढरा शर्ट आणि ब्राऊन कोट घातलेले पुल न सांगता आमच्याकडे आले आणि त्यांनी माझ्या गाण्याचे कौतुक केले. मला "यशस्वी होशील', असा आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आणि दोन गाणी त्यांनी मला शिकवली. "करवंदीमागे उभी एकटी पोर' असे त्यातल्या एका गीताचे शब्द होते. त्यानंतर मी मुंबईत आले आणि दीर्घकाळ आमची गाठ पडली नाही. त्यांच्या अखेरच्या आजारात मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हाही त्यांच्यातील मिस्कील विनोदी वृत्ती कायम होती. पायाला सूज आलेली आणि व्हीलचेअरवर बसलेले पुल मला म्हणाले, ""लता, पूर्वी "पाव'ला "डबलपाव' का म्हणत असावेत, हे मला आज समजतेय. आज साठ वर्षांनी त्यांच्या नावाचा सन्मान मिळणे म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे, अशी माझी भावना आहे. आताही ते कुठे तरी आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत, असे वाटते आहे.''

पुरंदरे म्हणाले, ""लतादीदींसाठी आता स्तुतिपर विशेषणे सापडत नाहीत, अशी अवस्था आहे. परमेश्‍वराने महाराष्ट्रात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही भावंडे जन्माला घातली आणि त्यानंतर पाच मंगेशकर भावंडे जन्माला घातली. हवेची लाट जर पकडता आली तर त्यातूनही दीदींचे सूर, मध पाझरावा तसे पाझरताना दिसतील. दीदींना हा सन्मान मिळालेला पाहून पुलंचा आत्माही आनंदला असेल.''

प्रा. हातकणंगलेकर यांनी पुलंच्या काही आठवणींना उजाळा दिला. ""बहुआयामी, विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे पुल हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. या महोत्सवाच्या रूपाने पुलंचे स्मरण इतक्‍या मोठ्या प्रमाणावर केले जात आहे, ही आनंदाची बाब आहे. पुलंच्या "अंमलदार' नाटकाच्या पहिल्या अंकाचा पहिला श्रोता मी आहे. सांगलीला ते विलिंग्डन कॉलेजमध्ये पेटीवादनासाठी आले होते. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी आले होते,'' असे सांगून जुना स्नेहबंध त्यांनी उलगडला.

""पुलोत्सव हे सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. जीवन समृद्ध करणाऱ्या या सांस्कृतिक प्रयत्नांची पाठराखण करणे हे कर्तव्य समजून "सकाळ'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारले आहे,'' असे आगाशे यांनी सांगितले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. सतीश जकातदार यांनी स्वागत केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात लतादीदींच्या हीरकमहोत्सवी गान कारकिर्दीचा मागोवा घेणारा "स्वरलता' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

(हा पुरस्कार जानेवारी २००८ मद्धे देण्यात आला.)


Tuesday, September 20, 2022

काशिनाथ एक बुद्धिमान नट

काशिनाथचा आणि माझा, तो कलाकार आणिं मी दिग्दर्शक अथवा आम्ही सहकलाकार म्हणून फार अल्प सहवास झाला. त्यामुळे त्याबद्दल मी सांगू शकेन असे वाटत नाही. पण एका त्रयस्थाच्या दृष्टिकोनातून विचार करता मला काशिनाथ कसा वाटला हे सांगताना मी म्हणेन, की काशिंनाथमध्ये तीव्र अशा स्वरूपाची 'इन्टेन्सिंटी' (भावनातिशयता) होती. त्याने एखादे काम एकदा हाती घेतले की, तो त्याचे डोके फुटले तरी हरकत नाही पण तो ते काम पूर्णत्वाला नेल्याशिवाय सोडायचा नाही. पण त्याचे हे 'इन्टेन्सिटीने' कुठलेही काम करणे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींच्या टोकाला जायचे. त्याच्या ह्या अशा स्वभावाचा अभ्यास झाला पाहिजे.
पण हे करताना एक लक्षात ठेवले पाहिजे की, माणूस जन्मत:च 'स्वभाव' नावाची एक गोष्ट स्वत:बरोबर घेऊन येत असतो, जो कधीही बदलणे शक्‍य नसते. काशिनाथचा हा स्वभाव काही बाबतीत चांगल्या गोष्टींसाठी उपयोगी झाला तर वाईट बाबतीत त्या स्वभावाचा अतिरेकही झाला. काशिनाथवरील पुस्तकामध्ये या सर्वांचा शोध घेतला जावा, असे मला वाटते.

काशिनाथ हा अलीकडच्या काळात ज्याचे नाव असामान्य लोकप्रिय कलावंतांच्या यादीत अग्रक्रमाने घालावे असा नट होता. नाटक हा त्याचा केवळ व्यवसाय नव्हता तर ते त्याचे सर्वस्व होते, जीवन होते, ध्येय होते.

रंगभूमीवर एंट्री करताच एक विलक्षण वातावरण तो निर्माण करीत असे. त्याच्या आगमनाबरोबर सभागृहात लकाकणारे झुंबर पेटल्यासारखे वातावरण निर्माण व्हायचे. किती पाहू किती नको अशा जिव्हाळ्याने सर्वसामान्य प्रेक्षक काशिनाथचा अभिनय पाहायचे. तो बुद्धिमान नट होता आणि तेवढाच भावनाप्रधानही होता.

त्याच्या अकाली निधनाची दु:खद वार्ता ऐकून प्रत्येक नाट्यप्रेमी माणूस विलक्षण हळहळल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा वयाने किती तरी मोठा असलेल्या माझ्यासारख्याला तर 'वळचणीचे पाणी आढ्याला गेले' असेच वाटेल. असंख्य रसिकांच्या डोळ्यांतील आसवांनीच काशिनाथला महाराष्ट्रभर श्रद्धांजली वाहिली जाईल.

- पु. ल. देशपांडे


Saturday, September 17, 2022

बापू काणे

पहिल्या भेटीत स्वतःबद्दल अत्यंत वाईट मत व्हावे असे वागण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याला कुठल्या मास्तराने मराठी शिकवले देव जाणे! मराठी भाषेत चांगले शिष्टाचार दाखवणारे शब्द आहेत हे त्याच्या गावीच नाही. स्टेशनावर उतरलेल्या पाव्हण्यांना हा काय बोलेल हे सांगणे अवघड आहे. चुकून पाव्हण्यांनी हमाली दिली कि हा लगेच "तुम्ही देऊ नका" हे सांगण्याऐवजी "किती दिलीत?" म्हणून विचारतो. "एकदा पुण्याचे ते पळसुले की कोण लेखक आले हातात नुसती पिशवी घेऊन आणि जाताना दीड रुपया हमाली दिली म्हणून मागून घेऊन गेले. त्याची पिशवी दीड रुपयाला विकत नसती घेतली कुणी !" आता ही हकीकत पहिल्या भेटीत सांगायच्या का लायकीची आहे? पाव्हण्यांना घरी नेतो, जेवू घालतो, चांगली शिक्रणबिक्रण करतो. पाहुणे संकोच करू लागले की म्हणतो,

"घ्या, घ्या शिक्रण - "

"नको, नको !" पाहुणे संकोचाने म्हणतात.

"का ? मधुमेह वगैरे आहे का?"

"छे हो - "

"मग खा की." ही आग्रहाची तऱ्हा !

बापू बाळपणापासून एकूण आगाऊच. गाणाऱ्या बाईला घ्यायला त्याला सहसा पाठवीत नाही. एक बाई अशाच तयारी करीत होत्या, तर बापू बाहेर कोणाला तरी ओरडून सांगत होता, "अरे, तिला म्हणावं, तुला गायला न्यायला आलोय, दाखवायला नव्हे !"

पण हाच बापू आभाराची भाषणे उत्तम करतो. गाण्यातला एकही सूर अगर व्याख्यानातला एकही शब्द न ऐकता पाचदहा मिनिटे बोलतो. क्वचित जातीवर जातो, नाही असे नाही. एकदा, "बाई स्थूल असल्या तरी आवाज मधुर आहे" म्हणाला होता. त्या बाईंनी पुन्हा आमच्या गावाला पाय लावला नाही! एकदा एका खांसाहेबांची अभक्ष खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी बापूवर आली. बापू स्वतःच्या हाताने तो डबा घेऊन त्यांच्या खोलीवर गेला आणि "घ्या - तुमची कोंबडी, कुत्री सगळी आणली आहेत. अकरा रुपये टिचवले आहेत. लवकर चेपा आणि चला." ह्या शब्दात खांसाहेबांची संभावना केली. सुदैवाने खांसाहेबांना मराठी येत नव्हते. रात्री गाणे झाल्यावर बापूला "त्या कोंबडीचं चीज झालं का रे?" हा प्रश्न खांसाहेबांचा टांगा हलण्यापूर्वी विचारण्याचे कारण नव्हते!

(अपूर्ण)
बापू काणे
व्यक्ती आणि वल्ली



Friday, September 16, 2022

पु.ल.देशपांडे माझे आवडते कथा लेखक – सु. र. कुलकर्णी

पु.ल.देशपांडे! कोण होते? असे विचारण्या पेक्षा काय काय होते हे विचारणे संयुक्तीक होईल.

लेखक, नाट्य, ललित, प्रवास वर्णन, भाषणे, पटकथा लेखक, दिग्दर्शक, कवी, संगीत दिग्दर्शक, उत्तम रसिक खवय्ये, जाणकार श्रोते, शिक्षक आणि एक विद्यार्थी सुद्धा! पंडित नेहरूंची दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या प्रसारणासाठी मुलाखत घेणारे पहिले मुलाखतकार पु.ल.च होते. रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका पण त्यांच्या हातातून सुटल्या नाहीत! आणि एक छान ,उमदा माणूस!असे all -in -one व्यक्तिमत्व माझ्या पाहण्यात तरी नाही.

मी पु.ल.देशपांडे यांचा मोठा चाहता आणि छोटासा वाचक आहे. पण जितके वाचलय त्यानेच मला आपलस केलंय आणि आपण पु.ल.ना अनेक जन्मान पासून ओळखतो, हि भावना पण मनात रुजून गेलीये. ते कधी परके वाटलेच नाहीत. बैठकीत अण्णा(माझे वडील )सोबत रोज गप्पा मारत बसत असावेत असेच वाटते. पण असे त्यांच्या सगळ्याच वाचकांना वाटत असावे. माझ्या वाचनात त्यांचे सगळेच्या सगळे साहित्य आलेले नाही. ’व्यक्ती आणि वल्ली’, ‘असामी असा मी’, ‘बटाट्याची चाळ’,आणि ‘मराठी वांग्मयाचा(गाळीव)इतिहास’ इतकीच पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे मी त्यांचा ‘इतकाच’ वाचक आहे.

पु.ल.नी विपुल लिखाण केल आहे, पण त्या पेक्षाही त्यांच्या लिखाणावरील लिखाणासाठी इतरांनीच अधिक लेखण्या  झिजावल्यात! (त्यात अस्मादिक सुद्धा आहेत.) पु.लंच्याच भाषेत सांगायचे तर ‘नाका पेक्षा’उपऱ्या लेखनाचा मोतीच जड!

पु.ल. म्हटल कि ‘व्यक्तीरेखांचा ’ ब्रम्हदेव उभा रहातो.’गणगोत’,’गुण गाईन आवडी’,’मैत्र’ हे त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसांवर लिहिले आहेत. तर ‘व्यक्ती आणि वल्ली’या काल्पनिक व्यक्तींवर लिहलय. निखळ ‘कथा’त्यांनी लिहल्या नसल्या तरी त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा ही एका अर्थी कथाच आहे. म्हणूनच मी ‘माझे आवडते कथा लेखक’ यात पु.ल.ना घेवून आलोय. त्यांनी फक्त कथा सुत्रा ऐवजी विनोदनिर्मितीस प्राधान्य दिले आहे. त्या मुळे त्यांच्या लेखनात ‘कथा’गौण ठरते.’म्हैस’हे एकमेव कथा वाचलीय. पु.ल.ची म्हणून ती ग्रेट. पण ‘कथा’म्हणून मला ती सुमारच वाटली!

‘व्यक्तिरेखा’ हा प्रांत अनेक लेखकांनी पालथा घातलाय, पण हुकुमत आहे ती पु.लंचीच! अगदी आजही! ’असामी असा मी’,’बटाट्याची चाळ’या जरी व्यक्तीरेखा नसल्यातरी त्यात हि अफलातून व्यक्ती चित्रण आहे. ‘बटाट्याच्या चाळीचा’डोलारा तर अशाच अवलिया आणि भक्कम व्यक्तीरेखाच्या ‘नगा’वर उभा आहे!

मी त्यांच्या काल्पनिक व्यक्तीन पुरतेच लिहणार आहे.खरेच अशी कोणती रसायने या व्यक्तिरेखांना ‘चिरंजीव’करून गेलीत? हा मला नेहमीच प्रश्न पडतो. त्यांची कोणतीही व्यक्ती रेखा घ्या, झटकन डोळ्या पुढे उभी रहाते. खरे तर त्यांच्या लेखनात त्या व्यक्तीचे ‘बाह्य’वर्णन नेसतेच किवा खूप त्रोटक असते.जसे ‘होका यंत्रा सारखी टोपी’,’मळखाऊ कोट’ किवा ‘गुड्ग्याखाली दोन बोट धोतर’असेच काहीसे.वय,उंची आकार.यांचा उल्लेख नसतो. भव्य कपाळ, कुरळे केस /विरळ केस, टपोरे /मिचमिचे डोळे,असल्या वर्णनाची त्यांच्या पात्रांना गरज नसते. ते सारे व्यक्ती रेखा वाचताना संदर्भात समजते.तरी ‘नंदा प्रधान’,’पेस्तन काका’यांना त्यांनी उदार मनाने एखाद दुसरे वाक्य दिले आहे. ‘नंदा प्रधान’ साठी —‘जवळपास पावणे सहा फुट उंची,सडपातळ,निळ्या डोळ्याचा,लहानश्या पातळ ओठाचा,कुरळ्या केसांचा नंदा—–‘ इतकेच वाक्य खर्ची पाडले आहे! असे असूनही त्यांचा नारायण, हरितात्या, सखाराम गटणे, म्हटले कि ती व्यक्ती चटकन डोळ्या समोर, खरे तर असे म्हणणे बरोबर नाही, ती व्यक्ती आपल्या मनात साकारते.प्रत्येकाचे नारायण,हरितात्या, नामू परीट यांच्या आकृत्या वेगळ्या वेगळ्या असतील. कारण आपण नामुचा कोडगेपणा, नारायणचा कार्यात झोकून देण्याचा गुण, किवा हरीतात्यांच इतिहासात रमण्याची वृत्ती मानत साठवून ठेवतो आणि नकळत आसपासच्या मंडळीत शोधात असतो,आणि तो सापडतो पण! आणि हेच ते पु.ल.नचे ‘चिरंजीव रसायन’!असे मला वाटते. या शिवाय त्या प्रत्येक व्यक्तीची एक अंगभूत कथा असते.आणि म्हणूनच त्या तुमच्या माझ्या इतक्या सहज आणि सजीव वाटतात.त्यांच्या सगळ्याच व्यक्ती रेखा ‘देखण्या’आहेत. हरितात्या,चितळे मास्तर शेवटी डोळे ओले करून जातात.अंतू बर्वा आपली आंतरिक व्यथा वाचकांच्या पदरी बांधून जातो.(आणि माझ्या सारखा वाचक त्या जपून पण ठेवतो!), नंदाच उद्धस्त जीण हेलकावून जात.

खरे तर ‘नंदा प्रधान’हि पु.लंची सगळ्यात वेगळी व्यक्ती रेखा आहे. एक अनोख्या पद्दतीने लिहिलेली कथाच आहे. त्यांच्या इतर व्यक्ती आणि वल्ली आपल्याला आसपास सहज सापडतात.पण ‘नंदा प्रधान’शोधूनही सापडत नाही!हेवा करावा असे देखणे व्यक्तिमत्व,अमाप पैसा, तरी दुर्दैवी आणि उधवस्त जीण नशिबी आलेला जीव!आई ,बाप,प्रियासी,बायको– अहो प्रत्येक नात्याचा विस्कोट झालाय!इतके घाव सोसलेला माणूस काहीसा अबोल होतो. पु.ल.नि ‘नंदा’तसाच साकारलाय!पु.ल.नचा ‘नंदा प्रधान’उभा करताना नक्की कस लागला असणार. 

मला दुसरी भावलेली व्यक्ती रेखा आहे ‘जनार्दन नरो शिंगणापुरकर’! या भारदस्त नावाच्या फाटक्या ‘बोलट’ ची व्यथा तुम्हाला ऐकायचीय? फक्त खालील संवाद वाचा.

“जन्या! माझ्या म्हातारपणा बद्दल बोलतोस–आणि गाढवा तू पंचावन्न वर्षाचा थेरडा ,तू माझ्या बाजूला रुख्मिणी म्हणून उभा होतास तो ?”

“तेच. त्यासाठीच बोंबलतोय मी! ह्या ह्या लेखकाला तुम्ही तेव्हडे म्हातरपणी सुभद्रेच काम करताना वाईट दिसला” हातातले वर्तमानपत्र नाचवत म्हणाला “ आणि मी –माझ बोलक झालेलं तोंड घेवून रुख्मिणी म्हणून उभा होतो. मी नाही दिसलो त्याला? अरे साल्यानो, टीका करायची म्हणून तरी आमच नाव एकदा आयुष्यात कागदावर छापलं असत तर काय जात होत तुमच्या बापच!”

नट – बोल्ट हि नाटकाच्या संदर्भात वेगळी संकल्पना असते.याच नाव होत ,कौतुक होत तो ‘नट’ होतो आणि बाकी जे दुर्लक्षित असतात त्यांना ‘बोलट’ म्हणून हिणवल जात. जनार्दन नरो शिंगणापूरकर या बोलटाची व्यथा कुठे तरी पीळ पाडून जाते.

तर पु.लंच्या व्यक्तीरेखांमधील ‘कथा’ शोधण्याचा माझा प्रयत्न केला आहे. आपणास ही भावेल हि आशा. शेवटी सर्वाना एकच आशिष —-‘पु.ल.म भवतु !’

- सु. र. कुलकर्णी

मूळ स्रोत --> https://www.marathisrushti.com/articles/my-favorite-authors-pu-la-deshpande/

Sunday, September 11, 2022

वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल पुलंचे एक सुंदर पत्र

पुलंच्या प्रचंड पत्रव्यवहारातील हे एक वेगळे पत्र. वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल पुलंनी अतिशय समजुतीच्या सुरात लिहिलेल्या या पत्राचे म्हणूनच महत्त्व. या पत्रातील नावे मुद्दाम बदलण्यात आली आहेत.

सुमन,

मुंबईहून परत आल्यावर तुझे पत्र मिळाले म्हणून उत्तर पाठवायला उशीर झाला. तुझे पत्र वाचून खूप वाईट वाटले. अत्यंत समंजस सुशिक्षित सुसंस्कृत अशा तुमच्यासारख्या तरुण जोडप्याच्या आयुष्यात ही अशी विपरीत घटना का घडून यावी हे समजत नाही. त्यातून पती-पत्नी संबंधांचे धागे इतके नाजूक आणि गुंतागुंतीचे असतात की त्यातून दुःखदायक तणाव नेमके कशामुळे निर्माण झाले हे त्रयस्थाला कळणं जवळजवळ अशक्य असतं. अशावेळी हे धागे जोडून ठेवावे की तोडून ठकावे याबद्दलचा सल्ला द्यायला आपण खरोखरीच समर्थ आहोत का, असा विचार मनाला कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू देत नाही.

परदेशात लग्न हा एक करार आहे. इतर कराराप्रमाणे तो कोरडेपणाने तोडला जातो. पण वरपांगी तो जरी कोरडेपणाने तोडला गेल्यासारखा वाटला तरी पती-पत्नी या नात्याने एकदा एकत्र आल्यावर ते नाते करारासारखे कोरडे राहूच शकत नाही. कारण कितीही नाकारले तरी त्यात एकमेकांच्या सहवासात काढलेल्या सुखदुःखाच्या, सुख द्विगुणित केल्याच्या दुःख विभागून हलके केल्याच्या आठवणी मनात रुजलेल्या असतात. त्या संपूर्णपणाने उपटून टाकता येत नाहीत. एखाद्या संगीताच्या मैफिलीचा आस्वाद जोडीने घेतलेला असतो. एखादी सुरेख कलाकृती जोडीने पाहून तिचा आस्वाद घेतलेला असतो. एखादी कविता जोडीने वाचलेली असते. एखादा सूर्योदर्य / सूर्यास्त सोबतीने पाहिलेला असतो. एखाद्या क्षणी झालेल्या स्पर्शाने अंगावर काटा फुललेला असतो. या सार्‍या सुखद अनुभूती जाळून नष्ट करता येत नाहीत. पती- पत्नी म्हणून एकत्र नांदले नाही तरी जोडीने काढलेल्या आयुष्यातल्या या आठवणी पुन्हा त्या दिवसांत मनाने नांदायला घेऊन जातच असतात. अशा नाजूक नात्यात विकल्प निर्माण होण्याची कारणेही अनेक असू शकतात. आणि आजवर या परिस्थितीत सापडलेल्या पती-पत्नीमधील दुरावा नाहीसा करण्याच्या प्रयत्नांत माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे ती म्हणजे हा दुरावा नेमका कशामुळे निर्माण झाला याचा पत्ता त्रयस्थाला लागतच नाही: 'पटत नाही तर घटस्फोट घ्या' असा उपदेश करणारे तुला भेटतील. पण मला मात्र हा उपाय तुझ्यासारख्या चारित्र्य, शील इत्यादी मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या कुटुंबातल्या उत्तम संस्कारात वाढलेल्या मुलीला पुढील आयुष्यात सुखकारक ठरेल असे वाटत नाही. म्हणून हा निर्णय घेण्यापूर्वी झाले-गेले विसरून जाण्याचे सर्व मार्ग मिटले आहेत की काय, याचा शांत मनाने विचार करावा.

ज्या कारणांमुळे आपले एकत्र राहणे शक्‍य वाटत नाही, ती कारणे खरोखरीच दूर करण्यासारखी नाहीत की काय, याची खात्री करावी, शेवटी संसार म्हणजे तडजोड आणि तडजोड याचा अर्थ अन्याय निमूटपणाने सहन करणे असा नव्हे आपला अहंकार काही ना काही कारणाने दुखावला जातो आणि प्रेमाचे दुवे तुटल्यासारखे वाटतात. ज्यामुळे आपला अहंकार दुखावला गेला ते कारण लग्नबंधन तोडण्याइतके महत्त्वाचे आहे का, याचा विचार करायला हवा. अशा प्रकारचे आत्मपरीक्षण ज्याचे त्यानेच करायचे आहे. सुदैवाने माझी तुझ्या सासू-सासऱ्यांशीही ओळख आहे. इतर ठिकाणी आपण ऐकतो त्याप्रमाणे तुला वाटणारा त्रास हा तुझ्या किंवा तुझ्या वडिलांकडून द्रव्य उपटण्याच्या लोभावून होत असेल असे चुकूनही मला वाटणार नाही. त्यांचे शत्रूदेखील त्यांच्यावर अशा प्रकारच्या स्वार्थाचा आरोप करणार नाहीत. उलट तुमच्या वैवाहिक जीवनाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये हीच त्यांची इच्छा असणार तुझ्या वडिलांचीही तुझा संसार मोडला जाऊ नये हीच इच्छा असणार. अशा परिस्थितीत मला सुचतो तो उपाय असा... तू. तुझे आई-वडील, उमेश व त्याचे आई-वडील एवढ्यांनीच एकत्र बसून आपली मने एकमेकांपुढे त्या बैठकीत मोकळी करावीत. बैठकीला बसताना हे संबंध तोडायचे नसून जोडायचेच आहेत या भावनेने एकत्र यावे. It is never too late to mend human relations याबाबतीतही लागू आहे. तोडून टाकण्यात आपल्या अहंकाराला समाधान लाभते. पण अहंकार पोसणे एवढे एकच सुखाचे साधन नसते. तू अजून लहान आहेस. पण एका मुलाची आई आहेस. त्या मुलाचा तुला कायदेशीर ताबा मिळेल. पण त्याची मानसिक वाढ होताना आपल्याला वडील नाहीत- या आघाताचा त्याच्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आपल्या समाजात पाश्चात्यांप्रमाणे घटस्फोटिता माता ही घटना सहजपणाने स्वीकारली जात नाही. अशा स्त्रीशी आणि तिच्या मुलाशी आजूबाजूची माणसे पुष्कळदा तऱ्हेवाईक रीतीने वागतात. त्याचा मानसिक जाच फार होतो. या सार्‍या भावी यातनांची शक्‍यता टाळता येण्यासारखी स्थिती उरलीच नाही का, याचा विचार करायला हवा.

दुर्दैवाने आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे. ती परिस्थिती बदलण्याची चिन्हे मला दिसत नाहीत. त्यामुळे घटस्फोटानंतर एका जाचणाऱ्या बंधनातून स्त्रीला मुक्ती मिळाली तरी तिला आपला परंपराप्रिय समाज सुखाने जगू देत नाही असाच अनुभव आहे. सदैव एक प्रकारचे असुरक्षित आयुष्य तिला कंठावे लागते. परत विवाह केला तरी पूर्वानुभव प्रतिकूल असल्यामुळे नव्या वैवाहिक जीवनाच्या यशापयशाबद्दलही मन साशंकच राहते. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की दोन माणसांना एकत्र राहायचे असेल तर तडजोड ही अपरिहार्य आहे. आणि परस्परांत प्रेमभाव असला की ती तडजोड आपण दुय्यम भूमिकेवर आहोत असे आपणाला वाटूच देत नाही. तसं पाहिलं तर समाजात जगताना सर्वस्वी मुक्‍त रीतीने कुणी जगूच शकत नाही. अनेक आवश्यक-अनावश्यक बंधने पाळतच जगावे लागते. पदोपदी तडजोड करावी लागते, पडते घ्यावे लागते. 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम्‌ त्यजाति पंडितः' म्हणतात तसे काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यातूनच आपण बचावतो. मात्र, ज्या तडजोडीसुळे आपण ज्या जीवनमूल्यांना पवित्र मानून जगत आलो तीच टाकून द्यावी लागत असतील तर तसली तडजोड करण्यापेक्षा आपल्या मूल्यांना उराशी धरल्यासुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना अधिक सुखदायक ठरतील. तेव्हा तुझा हा झगडा तुला सर्वात महत्त्वाच्या वाटणाऱ्या मूल्यांचा आहे, की केवळ तपशिलातीलच 'भेदातून निर्माण झालेला आहे की संपूर्ण गैरसमजावर आधारलेला आहे हे तुमच्या या चर्चेतून निष्पन्न होईल आणि तुला निर्णय घेता येईल. तो निर्णय दुरावलेले संबंध पुन्हा जुळवणारा व्हावा अशी माझी इच्छा आहे. आज उभा राहिलेला पेचप्रसंग तात्पुरता ठरो आणि तुझे जीवन सुखाचे जावो, हीच शुभेच्छा.

माझे हे पत्र सुरेशला दाखवायला माझी हरकत नाही.

तुझा,
पु. ल. देशपांडे
(आणखी पु.ल. - लोकसत्ता)

Thursday, September 8, 2022

पुन्हा कधीच आयुष्यात कुणाचा ‘ऑटोग्राफ’ घेतला नाही - धनंजय देशपांडे

लहानपणी अनेकांना असतो तसा मलाही मोठ्या लोकांच्या सह्या घेण्याचा व त्याचा संग्रह करण्याचा छंद होता. लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये गॅदरिंगला मंगेश पाडगावकर, क्रिकेटपटू एकनाथ सोलकर, जितेंद्र अभिषेकी अशी माणसे यायची. त्यांच्या सह्या घेतलेल्या. मिळेल त्या कागदावर सही घेऊन नंतर ती एका विशेष अशा रजिस्टरटाइप वहीत चिकटवून ठेवायचो.

... पण एक घटना अशी घडली की त्यानंतर मी आयुष्यात कधीच कुणाची सही घेतली नाही.

ते साल होते १९८४, ऑगस्टचा महिना. लातूरहून पुण्यातील अभिनव चित्रकला महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी आलेलो. होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी शिवाजीनगरला विद्यार्थी सहायक समितीचे वसतिगृह होते. तिथं प्रवेश मिळालेला. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे मिळावेत म्हणून तिथं ‘कमवा व शिका’ योजना असायची. अभ्यास सांभाळून रोज दोन तास बाहेर कुठे तरी काम करायचे अन् त्याचे जे १०० रुपये मिळायचे ते वसतिगृहात राहणे-जेवणे शुल्क म्हणून जमा व्हायचे. बाकी शिक्षणखर्चासाठी चित्रकार असलेला मोठा भाऊ मनिऑर्डर करायचा.

...तर त्या काळात टिळक रोडवरील ता. रा. देसाई यांच्या गॅस सिलिंडर वितरण कंपनींत मी कामाला असायचो. पावत्या फाडणे, सिलिंडर नोंदणी करणे वगैरे!! तर असेच एक दिवस ते काम उरकून सहा वाजता पायीपायी लकडी पुलावरून हॉस्टेलकडे निघालो होतो. अन् अचानक त्या पुलावरील फुटपाथवरून साक्षात पु. ल. देशपांडे अगदी सावकाश असे एकटेच चालत चालत जाताना दिसले. मी एकदम आनंदित झालो. मला अजून आठवतंय, की त्या दिवशी कामावरून निघताना तिथले ज्योती गॅस कंपनीचे एक ब्रोशर माझ्या हातात होते. त्याच्या पहिल्या पानावर बरीच पांढरी जागा होती. तर क्षणभर वाकून ‘पुलं’ना नमस्कार केला. त्यांनी एकदम दचकून माझ्याकडे पाहिले. (कदाचित त्यांना सखाराम गटणे पुन्हा समोर आला की काय असं वाटलं असावं) मग मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगून त्या गॅस कंपनीच्या ब्रोशरच्या पानावर त्यांना ‘ऑटोग्राफ प्लीज’ म्हणालो. त्यांनीही हसत हसत त्यावर सही केली; पण गडबड काय झाली की ते ब्रोशर गुळगुळीत कागदाचे असल्याने त्यावर बॉलपेन नीट उमटेना. मग ‘पुलं’नीच जरा जोरात पुन्हा सही गिरवली अन् हातात दिली.

आणि म्हणाले, ‘सही गोळा करणं मी समजू शकतो; पण त्यापेक्षा ज्यांची सही घेतोस त्यांचे वाचत पण जा आणि नुसते वाचू नको तर त्यातलं चांगलं काही असेल तर जगण्यात ते आणत जा. तर या तुझ्या छंदाला अर्थ आहे.’ असं म्हणून पाठीवर हलकेसे थोपटून ते पुढे गेले.
              
त्यानंतर असेच काही महिने गेले असतील. लेखिका, कवयित्री गायिका अशी चौमुखी प्रतिभा लाभलेल्या माधुरीताई पुरंदरे आमच्या हॉस्टेलला अभिनय शिकवायला यायच्या. तर त्या वर्षी गॅदरिंगसाठी म्हणून त्यांनी ‘पुलं’चेच एक नाटक बसवले होते. बऱ्यापैकी ते बसलेही होते. तर त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून ‘पुलं’ना बोलवावे असे ठरले. आमच्या त्या हॉस्टेलचे ‘पुलं’ देणगीदार देखील होते. लक्षावधी रुपये त्यांनी तिथं दिलेले. तर त्यांना निमंत्रण देण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी व संस्थेचे श्री. क्षीरसागर सर ‘पुलं’च्या घरी गेलेलो. रीतसर निमंत्रण दिले अन् निघताना मी सहज त्यांना म्हणालो, ‘सर, मी तोच सह्या घेण्याचा छंद असलेला, लकडी पुलावर तुमची सही घेणारा.’ (अर्थात त्यांना ते आठवण शक्यच नव्हतं; मात्र नुसतं हसून त्यांनी ते ऐकलं. अन् म्हणाले, ‘नंतर अजून कुणाकुणाच्या घेतल्यास रे बाबा?’

मी म्हणालो, ‘नाही सर, नंतर कुणाचीही सही घेतली नाही. मी सह्या घेणं बंद केलं आहे; मात्र त्या सर्वांची पुस्तकं वाचणं सुरू आहे,’ असं म्हणून व. पु. काळे यांना मी लिहिलेली पत्रं व त्याचे त्यांनी दिलेले उत्तर ‘पुलं’ना दाखवले. मग मात्र ते मनापासून हसले. कदाचित त्यांनी मागे कधी तरी पेरलेलं आज त्यांना उगवून येताना दिसलं असेल.

डीडी क्लास : जेव्हा सहीचा ‘ऑटोग्राफ’ होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी झालेला असता, असं म्हटलं जातं. कदाचित ते खरेही असेल; पण जसे ‘पुलं’नंतर मी कुणाचीच सही घेतली नाही, तशीच नंतर माझी काही पुस्तकं प्रकाशित झाली, काही स्टेजशो झाले, व्याख्यानमाला सुरू झाली; मात्र आजवर मी कधीच कुणाला कुणीही मागितली तरी सही दिली नाही. याचे कारण एकच. पुलं जे म्हणाले तेच, की सहीपेक्षा त्या माणसाचे विचार पाहा. त्यावर विचार करा. हेच मला पटलं. लोकांना आनंद देत राहा हा त्यांच्या जगण्यातून त्यांनी दिलेला संदेश पॉइंट झिरो झिरो वन पर्सेंट का होईना, नंतरच्या जीवनात अंमलात आणता आला, हे समाधान नक्कीच मला आहे!

पण ही मोठी माणसं मोठी का असतात? तर अशाच अनेक छोट्या छोट्या संदेशातून ते अनेकांचे जीवन उजळून टाकतात. माझ्या मित्र परिवारातील अनेक जण आज खऱ्या अर्थाने सेलेब्रिटी झालेत. अनेक नामवंत झालेत. ते पाहताना समाधान होतं; पण त्याच वेळी त्यांच्यापैकी एकदोन अपवाद वगळता कुणीही ऑटोग्राफ देण्याच्या व्यसनात अडकले नाहीत. कष्ट करावेत. मोठं व्हावं, नाव कमवावं, हे सगळं नक्कीच; पण त्याच वेळी जमिनीला धरून राहावं. ते जास्त प्रभावी.

नाही का?

- धनंजय देशपांडे
मूळ स्रोत -> https://www.bytesofindia.com/P/MZPRCG


Tuesday, September 6, 2022

चिनी शिंपी

एकेका गावाच्या उरावर एकेक भूत असते . हाँगकाँग च्या मानगुटीवर शिंप्याचे भूत आहे. हाँगकाँग मधला प्रत्येक चिनी नागरिक हा क्षणाचा चिनी आणि अनंत काळाचा शिंपी आहे. हाँगकाँग मधल्या चिनी पोराचे पाय पाळण्यात देखील मिशनीवर चालल्यासारखे हलतात. आता माझे आणि शिंप्याचे कधीच सूत जमले नाही ही गोष्ट मी कपडे घालायला लागल्यापासून मला पाहिलेल्या जगात तरी जगजाहीर आहे. भगवंताने हा देह एक डगळ पायजमा आणि त्याहून डगळ नेहरू शर्ट नामक अभ्रा ह्याच योजनेने घडवला आहे अशी माझी ठाम श्रद्धा आहे.

आमच्या लहानपणी आम्हा गरीब कारकूनांच्या पोरांची फ्याशनची कमाल डोक्यावरची शेंडी नाकाच्या शेंड्याला लागते की नाही ह्यावर ओळखली जात होती. आता ह्या संस्कारात बाळपण घालविलेल्या माझ्या सारख्या पोशाखाच्या बाबतीतल्या बालपणच्या अल्पसंतुष्ट आणि मोठेपणीच्या अघळ -पघळ माणसाला हाँगकाँगचा शिंपी काय किंवा शेणोली ताकारी बिच्चूद ह्यापैकी कुठल्याही आडगावच्या ठिकाणीचा काय दोघेही एकाच दर्जाचे! पण नाही. इथे मंडळी ऐकेनात.

शेवटी सूट शिवायला गेलो. माझ्या देहाकडे आपल्या डोळ्यांच्या फटीतून पाहताना तो चिनी शिंपी चाचरला. अंगाला फिट्ट बसणारा सूट शिवावा तर अंगभूत बेढबपणा जाहीर होतो, तो झाकावा तर सूट बेढब शिवावा लागतो . तो चिनी शिंपी कात्रीत सापडला होता. आधुनिक फ्याशनीची , पोटाखाली कटदोरा बांधायची जागा असे तिथून सुरू होणारी पँट शिवावी तर कंबर आणि पोट ह्यांची सीमारेषा सापडणे कठीण! म्हणजे चढवताना मला आडवा घालून पोटावर पाय ठेवूनच ती चढवावी लागली असती. बरे, जुनी बाबाशाही तुमान शिवावी तर त्याचे नाव बद्दू होऊन त्याच्या पोटावर पाय! माझ्या सुटाचे फिटिंग करताना तो चिनी शिंपी असा नरमला होता की ज्याचे नाव ते!फासावर चढवायची शिक्षा लिहून झाल्यावर न्यायाधीश नीब मोडून टाकतात म्हणतात. मला सूट चढवल्यावर त्या चिनी शिंप्याने आपली सुई मोडली असेल.


लेखक - पु.ल. देशपांडे
पुस्तक - पूर्वरंग

Monday, September 5, 2022

चितळे मास्तर

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.
मुळ स्त्रोत - विकिपीडिया


एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईंपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत.

"कार्टे चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे, ते त्यांच्या हाती सुखरूप आहे." अशी ठाम समजूत असे.

"एके काळी असे" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव.

वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डावरदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन्सिपॉल व्हावे लागले होते, पण पंधरा दिवसांतच मास्तर त्या खुर्चीला वैतागून पुन्हा आपले 'चितळे मास्तर' झाले. त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान असलेले काळे मास्तर हे प्रिन्सिपॉल झाले आणि अजूनही आहेत. डाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य-नैऋत्य दाखवणारी काळी टोपीबाहेर टकलाच्या आसपास टिकून राहीलेले केस आले आहेत, नाक आणि मिश्यांनी ठेवण राम गणेश गडकऱ्यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला. त्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले, आणी आता माझ्या पुतण्यांना शिकवताहेत. आमच्या गावातल्या शंकराच्या देवळातला धर्मलिंग गुरव आणि चितळे मास्तर यांना एकच वर्णन लागू-- नैनं छिन्दन्ति शस्रणि नैनं दहति पावकः! त्यांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे पाहिले आणि आता कदाचित तिसरेही पाहतील.

अजूनही गावी गेलो तर मी शंकराच्या देवळात जातो आणि तिथला धर्मलिंग गुरव "पुर्ष्या, शिंच्या राहणार आहेस चार दिवस की परत पळायची घाई?" असेच माझे स्वागत करतो. मला "पुर्ष्या" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर! धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. "पुर्ष्या शिंच्या" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, "पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात? फुगलायस काय!" धर्मलिंगाच्या या सलगीने गावातली नवी पिढी जरा बिचकली होती. आणि चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले होते,
"पुर्ष्या, नाव राखलंस हो शाळेचं! वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे? वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना? अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस...?" "मॅजेस्टी!" मी शाळेतल्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो. "मॅजेस्टी~~! बरोबर!"

चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती. ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांकडुन वदवीत. मला त्यांचा ईंग्रजीचा वर्ग आठवला. "...टेक हर अप टेंडर्ली, लिफ्ट हर विथ केअर --- फॅशनड सो स्लेंडर्ली यंग ऍंड सो....?" "फेअर!" सगळी मुले कोरसात ओरडायची.

इंग्रजी पहिलीत आल्यापासून मॅट्रिकपर्यंत सात वर्षे चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकवले. त्यांच्या मुख्य विषय इंग्रजी. पण ड्रॉइंग आणि ड्रिल सोडुन ते कुठलाही विषय शिकवीत. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक ह्या दोन गोष्टींशी त्यांचे कधीच जमले नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन त्या काळात आमच्या हायस्कूलला परवडण्यासारखी नव्हती. आठदहा शिक्षक सारी शाळा सांभाळायचे. आता शाळा पावसात नदी फुगते तशी फुगले आहे. भली मोठी इमारत, एकेका वर्गाच्या आठ आठ तुकड्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, दोन दोन हजार मुले वगैरे प्रकार माझ्या लहानपणी नव्हते.

हल्ली मुलांना मास्तरांची नावे ठाऊक नसतात. माझ्या मास्तरांना शाळेतल्या सगळ्या मुलांची संपुर्ण नावे पाठ! पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे! एरवी मॅट्रिकपर्यंत पोंरानी आणि चितळे मास्तरांसारख्या मास्तरांनी देखील शाळेचा रस्ता अनवाणीच तुडवला. शाळेतल्या अधिक हुषार आणि अधिक 'ढ' मुलांना मास्तर घरी बोलावून फुकट शिकवायचे. "कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवीत नाही, त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल." असल्या चिठ्या पालकांना येत नसत. पोर नापास होणे हा मास्तरांच्या 'माथ्या आळ लागे' अशी शिक्षकांची भावना होती. 'छ्डी' ही शाळेत फळा आणि खडू यांच्याइतकीच आवश्यक वस्तू होती. चितळे मास्तरांनी मात्र आपल्या तीस-बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत छ्डी कधीच वापरली नसावी. त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की, तो मार पुष्कळ होई. फार रागावले की आंगठ्याने पोरांचे खांदे दाबत. संध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार पाहण्यासारखा असे. फळ्यावरच्या खडूची धूळ उडून उडून पिठाच्या गिरणीत नोकरीला असल्यासारखे दिसत. तरीही शिक्षणकार्य संपलेले नसे. संध्याकाळी त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'मागासलेल्या जमातीचे' वर्ग चालायचे.

चितळे मास्तरांचा वर्गात वापरण्याचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा म्हणून आम्ही नेल्सनसाहेबाचे अगर तर्खडकरांचे पुस्तक उघडून तयारीत राहावे तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारख्या खांद्यावर घेऊन शिरत. मग वर्गात खसखस पिके. मास्तर "अभ्यंकर, आपटॆ, बागवे, चित्रे" करीत हजेरी घेऊ लागायचे. तेवढ्यात शाळेच्या घंटेइतकाच जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावर ठेवी. चितळे मास्तर त्याला तो सगळी पृथ्वी हातावर उचलतो म्हणून 'हर्क्यूलस' म्हणत. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारीत, "हं बृहस्पती, गेल्या तासाला कुठं आलो होतो?" "सर. इंग्लिशचा तास आहे." "ऍ? मग भूगोलाचा तास केव्हा आहे?" "तिसरा." "मग तिसऱ्या तासाला तर्खडकराचं श्राद्ध करू या. भूगोलाची पुस्तकं काढा!" ही पुस्तके तासाला काढण्यात काही अर्थ नसे. कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीच काही शिकवले नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, "कसला तास आहे?" ह्या प्रश्र्नाला "चितळे मास्तरांचा!" हेच उत्तर योग्य होते. सर्वानुमते एखाद्या विषय ठरायचा आणी मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयूष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना अजिबात कधी जमल्या नाहीत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचा नकाशा. पाचदहा मिनीटे फळ्यावर खडू इकडून तिकडून ओढल्यानंतर अगदी ओढगस्तीला लागलेला हिंदुस्थानचा नकाशा तयार व्हायचा! "हिदुस्तान देश जरासा दक्षिण अमेरिकेसारखा आलाय का रे बुवा?" आपणच मिष्किलपणे विचारायचे. खांद्यावरून आणलेली नकाशाची गुंडाळी क्वचितच सोडीत असत. "हां, पांडू, जरा निट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा--" मग आमच्या वर्गात ड्रॉइंगमध्ये पटाईत असलेला पांडू घरत चितळे मास्तरांनी काढलेली मातृभूमी पुसून झकास नकाशा काढायचा. "देव बाकी कुणाच्या बोटांत काय ठेवतो पाहा हं. पांडुअण्णा, सांगा आता. मान्सून वारे कुठून येतात?"

एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते. "हं, गोदाक्का, सांगा आता वारा कुठल्या दिशेला वाहतोय?" वर्गातल्या मुलींना मिस जोशी, मिस साठे म्हणणारे मास्तर तोपर्यंत शाळेत आले नव्हते. टाय बांधून, मिस जोशीबाशी म्हणणारे देशमुख मास्तर प्रथम शाळेत आले तेव्हा हे साहेबाचे पिल्लू शाळेत कुणी आणून सोडले असे आम्हाला वाटले होते. पायांत पांढरे टेनिसचे शूज घालणारे पिसे काढलेल्या कोंबडीएवढ्या रुंद गळ्याचे देशमुख मास्तर आमच्या शाळेतल्या अपटुडेटपणाची कमाल मर्यादा होते. एरवी बाकीचे सगळे धोतरछाप मास्तर मुलांना बंड्या, बाळ्या, येश्या, पुर्ष्या ह्या नावाने किंवा मुलींना कुस्मे, छबे, शांते, कमळे अशाच नावाने हाका मारीत चितळे मास्तर मात्र 'ढ' मुलांना अत्यंत आदराने पुकारीत.

गोदी गुळवणी ही साक्षात 'ढ' होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथीपाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. तिच्या लग्नात चितळे मास्तरांनी नव-या मुलाला "माझी विद्यार्थिनीआहे हो! संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का?" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. "काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा?" चितळे मास्तर गळ्यात दाटलेला आवंढा दडवीत म्हणाले होते. गोदी पडावात चढली तशी त्यांनी हळूच डोळे टिपलेले मी आणि बाळू परांजप्याने पाहिले होते. "मास्तर रडतायत बघ!" बाळू अजागळपणे म्हणाला होता. "चिमण्यांसारखा नाचतात दहाबारा वर्षे ओसरीवर आणि भुर्र्किनी उडून जातात हो--" चितळे मास्तर गोदीच्या वडलांना सांगत होते. ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून चितळे मास्तरांनी वर्गात इतकी चेष्टा केली होती की, आजच्या जमान्यात पालकांची प्रिन्सिपॉलसाहेबांना चिठ्ठी आली असती. चिठ्ठी तर सोडाच, पण आमचे पालक तर शाळेत मास्तरांनी आपल्या कुलदिपकाला बदडले हे ऎकल्यावर घरी पुन्हा एकदा उत्तरपुजा बांधीत.

"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय?" "गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?" गोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. "कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी!" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची. "हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प. "गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या? राम्या तु सांग." मग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा की--" "का रे राम्या?" मास्तर दटावायचे. "मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?" "तिचा पदर कशाला दिसायला हवा?" "मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं?" "भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स?" मग सगळ्या वर्गाकडुन "दिवसा वाहतात ते--" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग "गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचा संबंध.....?" "ना~~~~ही!" पोरे ओरडायची. "

तरी आज आपण आलाय हे ठाऊक आहे त्यांना म्हणून कमी आहे. एरवी शाळेचं छप्पर डोक्यावर घेतात__" चितळे मास्तर शांतपणे त्यांना सांगत होते. "पण जरा शिस्त लावायला हवी!" हसतखेळत संप्रदायाचा पुरस्कार करणाऱ्या इन्सपेक्टरांनी त्यांना गंभीरपणाने बजावले. चितळे मास्तरांनी आपल्या साऱ्या आयूष्यात कुणालाही शिस्त नावाची गोष्ट लावायचा प्रयत्न केला नाही. स्वतःला लावली नाही. त्यांनी त्यांच्यापुढे आलेल्या सर्वोच्यावर फक्त प्रेम केले. प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. वर्गात एखाद्या मुलाने उत्तम निबंध लिहीला की दहापैकी आठ मार्क द्यायचे. मुलगा कुरकुरला की विचारायचे, "का रे बोवा?" "सर, पण दोन मार्क का कापले?" "तीन कापायचं जिवावर आलं माझ्या!" इंग्लिश भाषेवर मात्र चितळे मास्तरांचे फार प्रेम होते. उच्चार अत्यंत देशी! शिकवण्याची पद्धत अगदी संस्कृत पाठशाळेसारखी. पहिली-दुसरीच्या वर्गाबाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे 'ज्ञानेश्वरी'तल्या ओव्या म्हणाताहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती 'आय?' 'गो!' 'यू?' 'गो!', 'वुई?' 'गो!', 'ही' 'गो~ज!' ची चाल आठवते. इंग्रजी साभिनय शिकवायचे. "आय ऍम?" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे "ईटिंग" म्हणायची. मग तुरूतुरू चालत "आय ऍम....?" की पोरे "वॉकिंग" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, "आय ऍम...?" "स्लीपिंग" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, "गाढवांनो, माझी झोप मोडलीत!" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, "आय ऍम...?" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात "स्ली~पिंग" म्हणायची. "आय ऍम स्लीपिंग" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की "मुगूट पडला का आमचा?" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भान हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. "आय ऍम क्रॉलिंग" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा! त्यांच्या तासाला तास कधी वाजला ते कळत नसे. दुसऱ्या तासाचे मास्तर दारात येऊन ताटकळत उभे असायचे. शाळेतल्या सर्व मास्तरांना चितळे मास्तरांची खोड ठाऊक होती. त्यामुळे एक वर्ग संपवून दुसऱ्या वर्गाची पुस्तके किंवा वह्या गोळा करायला चितळे मास्तर कॉमनरुममध्ये जाऊन पोहचेपर्यंत त्या वर्गाची लाइन क्लियर झाली नाही हे ते ओळखीत.

चितळे मास्तर अत्यंत विसराळू होते. वर्गात वहाणा विसरून जाणे हा नित्याचा कार्यक्रम. मग विद्यार्थ्यापैकी कोणीतरी त्या पुढल्या वर्गात पोहचवायच्या. "अरे, भरतानं चौदा वर्षे सांभाळल्या! तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत?" जोडीचे शिक्षक त्यांची खूप थट्टा करीत असावे. सहलीच्या वेळी हे लक्षात येई. चितळे मास्तरांना सहलीचा विलक्षण उत्साह. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले आम्ही त्यांच्याबरोबर पाहिले. पहिलीत गावाबाहेरच्या आमराईपासून सुरवात होई. चितळे मास्तर आमचे स्काउटमास्तरही होते. स्काउटमास्तरांच्या पोषाखात त्यांना जर वेडन पॉवेलने पाहिले असते तर सारी स्काउटची चळवळ आवरती घेतली असती. त्या वेळी स्कॉउटमास्तर हिरवा फेटा बांधायचे. चितळे मास्तरांच्या डोक्यावर तो फेटा दादासाहेब खापड्यांच्या फेट्यासारखा गाठोडे ठेवल्यासारखा दिसे. गावातल्या य्च्चयावत पोरांना त्यांनी पोहायला शिकवले. पोहायला शिकवायची मात्र त्यांची डायरेक्ट मेथड होती. मेहंदळे सावकाराच्या प्रचंड विहिरीत शनिवारी दुपारी ते पोरे पोहायला काढीत. आणि नवशिक्या पोराला चक्क काठावरून ढकलून देत. मागून धोतराचा काचा पकडून आपण उडी मारीत. कधी कधी खांद्यावर पोरगे बसवून उडी घेत. जो नियम मुलांना तोच मुलींना! माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे! साताआठ वेळा नाकातोंडात पाणी गेले की पोरे बॆडकासारखी पोहत. पोहून संपल्यावर डोकी ओली राहीली की ते स्वतः पंच्याने पुसत.

आमच्या गावातले सगळे आईबाप, देवाला बोकड सोडतात तशी चितळे मास्तरांना पोरे सोडून निर्धास्त असत. शाळेतच काय पण रस्त्यात किंवा देवळातदेखील पोराचा कान धरायची त्यांना परमिशन होती. मॅट्रिकच्या वर्गात पोहचल्यावर निवडक पोरांना वर नंबर काढण्यासाठी चितळे मास्तरांच्या घरी पहाटे पाचला जावे लागे. मास्तर आंघोळबिबोंळ करून खळ्यात मोठ्यामोठ्याने कसले तरी स्तोत्र म्हणत उभे! एका जुनाट बंगलीवजा घरात त्यांचे बिऱ्हाड होते. मास्तरीणबाईंना आम्ही मुलेच काय पण स्वतः चितळे मास्तरदेखील 'काकू' म्हणत. "काकू~~ वांदरं आली गो. खर्वस देणार होतीस ना?" असे म्हणत अधून-मधून खाऊ घालीत. आणि मग शिकवणी सुरू व्हायची. ही शिकवणी फुकट असे. आणि शिकवण्याची पद्धतदेखील वर्गापेक्षा निराळी. त्या वेळी आमच्या गावात वीज नव्हती आली. मास्तरांच्या घरातल्या डिटमारचा दिवा आणि आम्ही घरातून नेलेले दोनचार कंदील ह्या प्रकाशात अभ्यास सुरू होई. चितळे मास्तर एक आडवा पंचा लावून उघडेबंब असे भिंतीजवळच्या पेटीवर बसत. ही भेलीमोठी पेटी हे त्यांचे आवडते आसन होते. त्या पेटीत खच्चून पुस्तके भरली होती.

मास्तरंचा गोपू माझ्या वर्गात होता. वेणू माझ्यापेक्षा मोठी आणि चिंतामणी धाकटा. ही तिन्ही मुले गुणी निघाली. गोपू मॅट्रीकला दहावा आला होता. हल्ली तो दिल्लीला बड्या हुद्यावर आहे. वेणूदेखील बी०ए० झाली. चिंतामणीने मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले. त्याला मास्तरांनी चिपळूणला सायकलचे दुकान काढुन दिले. त्याला मास्तर एडिसन म्हणत. हे कारटे लहानपणापासून काहीतरी मोडतोड करीत असे. गोपू आमच्याबरोबर शिकायला बसे. एरवी तो मास्तरंना आप्पा म्हणे. शिकायला बसला की आमच्याबरोबर 'सर' म्हणत असे. आम्ही चितळे मास्तरांनी नक्कल करायचे तसा तोदेखील करत असे. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा, पण मास्तरांनी पार्शलिटी केली असे चुकुनदेखील आम्हाला वाटले नाही. कारण वर्गात इतर मुलांप्रमाणे त्यालादेखील ते "गोपाळराव चितळे, उठा. द्या उत्तर ." असे म्हणायचे . कान धरून उभे करायचे. चारचौघांसारखाच तोही!

पहाटचे त्या अधुंक प्रकाशीत चितळे मास्तरांच्या ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात चाललेला तो स्पेशल क्लास अजूनही माझ्या स्वप्नात येतो. तिथे मी 'रघुवंश' शिकलो, टेनिसन, वर्डस्वर्थ ह्यांच्या कविता वाचल्या. वर्गात शिकवताना त्यांच्या आवाज चमत्कारीक वाटे. पण पहाटे घरी ते 'रघुवशं' म्हणायला लागले की गुंगी यायची.

आमच्या आधी ह्या वर्गात शिकलेल्या तीनचार मुलांनी 'जगन्नाथ शंकरशेट' मिळवली होती. आमच्यात कुणी तसा निघाला नाही. जरा ओशाळेच होऊन आम्ही त्यांना पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो होतो. "काकू, कुरुक्षेत्रातले विजयी वीर आले. ओल्या नारळाच्या करंज्या ना केल्या होत्यास? एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे! तुझ्या बापसाला बोललोय मी! उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन! बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात?" "एलफिन्स्टन!" "स्पेलिंग सांग." मग काकू करंज्या पुढे ठेवता ठेवता म्हणाल्या होत्या, "आहो, मिस्त्रुडं फुटली त्यांना आता! स्पेलिंग कसली घालता? मुंबईस जायचास की पुण्यास?" "बघू, बाबा धाडतील तिथं जायचं___"

चितळे मास्तरांच्या आणि असंख्य मुलांच्या वाटा इथून अशाच तऱ्हेने वेगळ्या झाल्या आहेत...

(अपूर्ण)
पुस्तक - व्यक्ती आणि वल्ली 

संपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक मिळवा.

Friday, September 2, 2022

पुलंच्या पुस्तकांमधील सजीव झालेल्या अनेक आठवणी - शिबानी नाबर

पु.लं.च्या पुस्तकांमधील सजीव झालेल्या अनेक आठवणी मध्यंतरी ५-६ वर्ष मी परदेशात होते. संपूर्ण वेळ गृहिणीपण आणि परदेशात सर्वच कामांच्या बाबतीत स्वयंसिध्दा हे व्रत यामुळे स्वत:च्या करमणुकीसाठी फार कमी वेळ मिळायचा. पण स्वत:साठी कितीही कमी वेळ मिळाला तरीही वाचनमैत्रीमुळे आधी वाचलेल्या पुस्तकांची पुन्हा पुन्हा पारायणं करायला तो खूपच असायचा. मी स्वत: अशी वारंवार वाचायचे ती महाराष्ट्राचे अत्यंत लाडके लेखक स्वर्गीय श्री. पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं. अजूनही त्यांच्या लिखाणाची स्वदेशात आणि परदेशात सुध्दा कशी वारंवार मार्मिक आठवण येते ते सांगण्यासाठी मी हा लेख लिहायचा एक प्रामाणिक प्रयत्न करते आहे.

काही वर्षांपूर्वी भारतात माझ्या ऑफिसमधील एक सहकारी मैत्रीण पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली'चा नवीन संचातील प्रयोग बघून आली होती. मी अत्यंत उत्सुकतेने तिला त्याबद्दल विचारलं तर म्हणाली की मूळ पुस्तक सुरेखच आहे, आताच्या या प्रयोगातील कामंही छानच आहेत, पण आता सगळे संदर्भ बदलले आहेत Enjoy नाही करता येत. माझ्या डोळ्यांसमोर 'व्यक्‍ती आणि वल्ली' मधले बबडू, चितळे मास्तर, नाथा कामत, सखाराम गटणे तरळायला लागले.

'बबडू' मधील 'स्कालर' पावसामुळे भिजून कागदी पिशवीतील साखर विरघळल्याबद्दल चिंता करतो. आणि आज कागदाऐवजी प्लास्टिकच्या पिशव्या आल्या आहेत. एवढाच संदर्भ बदलला आहे. ह्याच प्लास्टिकच्या पिशवीला भोक पडलं आणि एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीची साखर रस्त्यावर सांडून फुकट गेली तर त्या मनाला वाटणारी हळहळ तीच आहे !

'मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात नाही पण डोळ्यांत मोती पडले आहेत' असे स्वत:च्या पत्नीच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगणारे चितळे मास्तर आठवले. आजही भारतातील खेड्यांमध्ये, गावांमध्ये असे कित्येक चितळे मास्तर आहेत की ज्यांनी घडवलेले विदयार्थी समाजाला आणि देशाला भूषण ठरतात, पण स्वत: गुरुला मात्र आपल्या कुटुंबासाठी आभूषणच काय, पण प्राथमिक गरजादेखील पुरवणं सोपं नसतं.

आजही शिवाजी पार्कच्या मैदानाला एक फेरी मारली की आपली मान ३६० अंशांत फिरवणारे कितीतरी नाथा कामत दिसतील !

माझ्या बहिणीचा मुलगा ओम (वय वर्षे ७) वयाच्या मानाने खूपच पुस्तकं वाचतो. साधी 'खूप भूक लागलीय' हे सांगायलादेखील तो "I'm Ravernously hungry" असे अवजड शब्द वापरतो. त्यामुळे आम्हा दोघींना पु.लं.चा तोंडी छापील भाषा वापरणारा सखाराम गटणे आठवतो. इथे फक्त साने गुरुजी, मालतीबाई दांडेकर यांसारख्या लरेखक-लेखिकांची जागा जे. के. रोलिंगने घेतलीय. बाकी कुठे बदलले आहेत हो संदर्भ ?

मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी आपापल्या प्रत्येकी दोन मुलांना घेऊन अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी. व ओर॒लँडो, फ्लोरिडामधील डिस्नेवर्ल्डच्या टूरवर गेलो होतो. परदेशातसुध्दा प्रत्येक ठिकाणी पु.लं.च्या पुस्तकातील संदर्भ प्रकट होऊन आम्हाला हसवत होते.

वॉशिंग्टन डी.सी.ला आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो तेथे नाश्त्याच्या रुमचे नाव होते 'आयसेनहावर रुम'. माझ्या चार वर्ष वयाच्या मुलीला ते नाव उच्चारणं जरा कठीण गेलं. पण माझ्या मनात मात्र बटाट्याच्या चाळीतील उखाण्यांमुळे आयसेनहावर अगदी चपखल बसला आहे. 'काही स्त्रीगीते' या भागातील हा उखाणा - 'उंचात उंच राजाबाई टॉवर, गणपतरावांना भितो आयसेनहावर'. बटाट्याच्या चाळीतील सौ. काव्यकलाबाई कोरकेंच्या मते या उखाण्यादवारे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसाद बटाट्याच्या चाळीत उमटले होते.

डिस्नेवर्ल्डच्या 'It's a small world' या एका ride मध्ये जगातील निरनिराळ्या भागांतील बाहुल्या व इतर खेळणी अत्यंत आकर्षक रितीने मांडलेली आहेत. त्यांच्या दर्शनासाठी आपल्याला एका बोटीतून फिरावं लागतं. ह्या खेळण्यांचं असं दुरून दर्शन होऊनसुध्दा माझी मुलगी त्या 'It's a small world' च्या गाण्याच्या तालावर बोटीतल्या बोटीत अशी काही डोलायला, टाळ्या वाजवायला लागली की माझ्या मनाने 'अपूर्वाई' च्या नाताळ वर्णनाकडे धाव घेतली. खरोखर आजूबाजूच्या बाहुल्या बघण्यापेक्षा मझ्या मुलीच्या डोळ्यांतील बाहुल्यांचा नाच मला अधिक मोहक वाटला. 'अपूर्वाई' मधील ते नाताळ वर्णन वाचतानाही इंग्लंडच्या खेळण्याच्या दुकानातील बँडच्या तालावर मंत्रमुग्ध होऊन नाचणारी ती गुबगुबीत इंग्लिश मुलं अशीच माझ्या मनात घर करून बसली होती.

ह्या लेखात आधीच सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील डिस्नेवर्ल्ड वगैरेंची टूर फक्त मी, माझी बहीण आणि आमची एकूण चार मुलं यांनीच केल्री होती. मुलं सोहन (१२ वर्ष), मैत्रेयी (११ वर्ष), ओम (७ वर्ष) आणि शौना (४ वर्ष) या वयोगटातत्री. त्यांच्या वागण्याच्या तर्‍हा, त्यांचे हट्ट आम्हाला वारंवार 'असा मी असामी' मधील शंकर्‍या, शरी, उल्हास, नूतन यांची आठवण करून देत होते. अमेरिका-सिंगापूरमध्ये राहिलेली ही मुलं. या देशांमध्ये soda हा पाण्यासारखा वापरतात. पण तरीही थंड पेयांचं दुकान पाहिल्यावर त्यांना शंकर्‍या-शरीसारखीच 'orange' वगैरेची तहान लागत होती. अमेरिका-सिंगापूरमध्ये 'sidewalk, traffic rules, safety crossing च्या शिस्तीत वाढलेली ही मुलं, Disney World च्या वाहनरहित रस्त्यांवर शंकर्‍यासारखीच अगदी पाचोळ्यासारखी भिरभिरत होती. 'असा मी असामी' च्या काळी मुंबईच्या छोट्या रस्त्यावरही वाहनांची रहदारी माफक प्रमाणातच असणार. त्यामुळे शंकर्‍यासारख्या मुलांना रस्त्यावर पाचोळ्यासारखं मिरमिरणं शक्‍य होतं. आता ते अशक्‍य आहे. काळानुसार एवढाच संदर्भ बदललाय, पण शंकर्‍या, शरी, उल्हास, नूतन आणि सोहन, मैत्रेयी, ओम आणि शौना यांच्या वात्रटपणात, मिश्किलपणात, निरागसतेत. काडीमात्र फरक पडलेला नाही.

एकदा मी सिंगापूरच्या एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये सूट-बूटवाल्या चार-पाच भारतीय तरुणांना काटे-चमचे वापरून जिलेबी खाताना पाहिलं. पु.लंनी ज्याप्रमाणे 'बिगरी ते मॅट्रिक' मध्ये शिवबांना कळवळून विचारावसं वाटलं की "शिवबा, तुम्ही नाटकातच का नाही राहिला? तसंच मला या तरुणांना कळवळून विचारावसं वाटलं की "सभ्य गृहस्थहो, इथे कॅरॅमेल कस्टर्ड सुध्दा मिळतं. तुम्ही ते का नाही खाल्लं ?" कारण खाण्याचा आसन आणि 'बासन यांच्याशी असल्लेला संबंध जो 'हसवणूक' मधील 'माझे खाद्यजीवन' मध्ये पु.लंनी अगदी चेवी-चवीने उलगडला आहे. तो माझ्या मनावर छान कोरला गेला आहे. जिलबी हा हाताने खाण्याचा पदार्थ व त्यातील साखरपाक ही बोटाने चाखण्याची गोष्ट. तरच जिलेबीचा आस्वाद घेता येतो हा माझा पिंड. पु.लं.नीच लिहिल्याप्रमाणे केळीचं पान, वरणभाताची मूद, गणपतीबाप्पा मोरयाच्या संस्कृतीत वाढलेला माझा पिंड.

त्याने आकार घेतलाय तो देशी मडक्याचा ! तकलादू विदेशी कपबश्यांनी जगातील/भारतातील. कितीही संदर्भ बदलले असं म्हटलं तरी पु.लं.चं लिखाण आणि त्यांचं धुवपद अढळ आहे आणि माझ्यासारख्या अगणित निस्सीम पु.ल.प्रेमी देशी मडक्‍यांसाठी ते अढळच राहणार आहे.

- शिबानी नाबर
स्नेहदीप 
दीपावली विशेषांक 
२०१३

Thursday, September 1, 2022

पु.ल. आणि ना.ध. महानोर - निशिकांत ठकार

श्री ना. ध. महानोर लिखीत 'आनंदयोगी पु.ल' ह्या पुस्तकातील श्री निशिकांत ठकार ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.
         
...मध्यवर्गीय मानसिकतेच्या मर्यादा तोडण्याचा प्रयत्न पु. ल. करायचे. महानोरांविषयीची आत्मीयता कदाचित या पोटीही असेल. प्रत्यक्ष शेतीशी संबंध जोडायला पु. ल. व सुनीताबाई दोघांनाही आवडायचे. बापू कांचन हा एक शेतीचा दुवा होता. महानोरांनी पु. लं. च्या कृषिसंस्कृतीच्या प्रेमाच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यात पु.लं. च्या मृद्गंधप्रेमाची असोशी जाणवते. महानोर, कांचन आदी मंडळी म्हणजे शेतावर जायच्या पायवाटा होत्या. महानोर यांच्या पळसखेडला मंडळी पोहोचली. बापू कांचन व महानोरांचे वडील शेतीप्रश्‍नावर चर्चा करीत होते. पु. ल. म्हणाले, 'आम्हांला यातलं काहीच कळत नसलं तरी मोठ्यांदा बोला. काही शिकता आलं नाही, पण समजेल तरी.' पु. ल॑. ना प्रत्येक गोष्टीत लहान मुलासारखी जिज्ञासा होती हे अर्धसत्य आहे. त्यात निरागसपणा होता, उत्साह होता, पण जीवनासंबंधीचे चिंतनही होते. संस्कृतिसंबंधीचा काही विचारही होता. भारत हा कृषी-संस्कृतीचा देश आहे. त्यातली काहीतरी अक्कल आपण उसनी का होईना घेतली पाहिजे, अशी देशी जाणीवही त्यात होती.
भाईकडेच महानोरांना गोविंद तळवलकर भेटले. त्यांच्याकडे भाईंची तक्रार “तुम्ही 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये शेती फार कमी आणता” आणि महानोरांचे शेतीविषयीचे लेखन सुरू झाले. लिहायलाच नव्हे तर प्रत्यक्ष कार्य करायलाही त्यांना प्रेरणा मिळाली. पक्षीनिरीक्षण, निसर्गसौंदर्यदर्शन यांत तर भाईंनी रस घेतलाच, पण महानोर रवींद्रनाथ टागोरांच्या वाटेनं जातोय याचंही कौतुक केलं. ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृतीचं मीलन पु. लं. ना अभिप्रेत होतं. रवींद्रनाथांनी पहिली शेतीची शाळा काढली, नव्या शेतीचं शास्त्र आणलं. पु. लं. नी एक वेगळा रवींद्रनाथ अधोरेखित केला.
   
शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे. शेताकडे वावरण्याच्या त्यांच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यांचा शोध तो साहित्यातून-कवितेतून घेऊ पाहतो. रानातल्या कवितांचा अस्सलपणा पु.लं. ना पळसखेडला जायची प्रेरणा देतो. खरं तर जीवनाच्या आणि विशेषत: कलेच्या, सर्वच क्षेत्रांतल्या आणि पारदर्शी, सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पु.लं. नी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुस्कृंत केलं. एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे. जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेडं व्हायची पाळी यायची तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही. ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता तसाच माणुसप्रेमीही होता. जिथे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. हा भावबोध अर्थपुर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. ’जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ ये पु.लं. च्या आयुष्याचे ब्रीद महानोरांनी नेमके हेरले. पु.लं. बरोबर घालवलेल्या क्षणांत हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला त्याला निर्मळ हास्यविनोदाचा सुंगध लाभलेला होता. पु.लंच्या रम्यतेच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे तशीच एक नैतीकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्व मानतात. देव न मानणारे पु.ल. नास्तिक वाटत नाहीत कारण त्यांनी शिवत्व स्विकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही पण बालगंधर्व चार्ली चॅपलीन, रविंद्रनाथ यांसारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विवीध क्षेत्रांतल्या विवीध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशीवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानविय व्हावे ही त्यांची नैतीकता आहे.

हरवत चाललेल्या मध्यमवर्गीय मूल्य-जाणिवांच्या स्मरण-रमणीतेत हरवणारा कलावंत लेखक म्हणून पु.लं. ना ओळखणारे काही समिक्षक आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं महत्वाचं कारण आहे, असेही त्यांना वाटते. पण पु.ल. वर्गीय जाणीवांनी मर्यादीत नाहीत. आधुनिकतेच्या नव्याच्या विरोधात नाहीत. जे जात आहे त्याची हळहळ अवश्य आहे, पण जे येत आहे ते तेवढ्या गुणवत्तेचे नाही याचा त्रास आहे. तरीही पु.लं. हे स्वागतशीलच राहिलेले आहेत. ते मूळतत्ववादी किंवा पुनरुत्थानवादी झालेले नाहीत. दारिद्र्याच्या आणि आणीबाणीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहतात. शेताच्या, जमिनीच्या, कृषिसंस्कृतीच्या आकर्षणातून ते देशी शहाणपण व बळ मिळवू पाहत होते असे वाटते.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।
उदास विचारे वेच करी॥


हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी?) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, "इतकं असेल. असं वाटलं नव्हतं." पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत?
       
पु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कऱ्हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली.

गेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा
सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा


पु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून? का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते.

- निशिकांत ठकार
पुस्तक - आनंदयोगी पु.ल.