मी आणि पु.ल आमच्यामधे एक सहृदयतेचा पुल मी दहा बारा वर्षाची असताना बांधला गेलाय.तो एवढा मजबूत आहे की मी मरेपर्यंत तो टिकेलच.पण त्या पुलावरुन माझी मुलं नातवंडं पण आरामात आवडीने जातील .याची खात्री वाटते. कदाचित पुढच्या पिढीचं वाचन कमी होईल.
कारण त्यांची त्रोटक वाचायची सवय डेव्हलप झालीय. मग त्यासाठी पुलंच्या आॕडीओ कॕसेट आहेत.व्हिडीओ आहेत.ते इतके सुंदर आहेत की आपल्याला वेगळ्या काळात खेचून न्यायचं सामर्थ्य त्यांच्या मधे आहे.
मी तर पुल वाचायच्या आधी त्यांच्या कॕसेटच (अलुरकरांच्या ) ऐकल्या होत्या . एवढा प्रसन्न खेळकर चतुर मिस्कील बावळट भासणारा विनोदी माणूस मी पहिल्यांदाच कानांनी बघत होते. मग दहावीला असताना बटाट्याची चाळ मधला एक लेख भ्रमणमंडळ धडा म्हणून अभ्यासाला आला.तो शिकवत असताना (माझी आईच दहावीला मराठी शिकवायची ) आम्ही सर्व जण वर्गात किती हसलो होतो.
माझे बाबा अत्यंत कडक शिस्तीचे होते.सार्वजनिक जीवनात ते दिलखुलास असले तरी घरी बडबड त्यांना चालायची नाही. त्यांनीच नवीन टेपरेकॉर्डर आणि ह्या कॕसेट त्या काळी आणल्या होत्या .ही गोष्ट मला महान आश्चर्याची वाटली होती.आणि बाबा त्यातले विनोद ऐकून उघडपणे हसत होते.ते बघून शोले मधला गब्बरसिंग हसल्यावर जसे बाकीचे दरोडेखोर सावकाशीने घाबरत घाबरत हसतात तसे आम्ही हसलो होतो.हे बघून आईला पण हसु आवरत नव्हतं ! मग हळुहळु भीड चेपत गेली.बाबांना पुल आवडतात म्हटल्यावर पुलं बद्दलचा आदर सहस्त्र पटीने वाढला.कारण पुलं मुळे आम्ही घरात मोठ्याने हसु शकलो.
काॕमेडीचं एक वेगळं दालन कॕसेटच्या रुपात खुलं झालं .( बाय द वे अंध मुलांच्या शाळेत या आॕडीओ कॕसेट लावल्या जातात का ? नसतील तर जरुर लावाव्यात.) अजूनही घरात काही कॕसेटी असतील.पोटात लांबलचक आतडी असलेल्या या कॕसेटी तेव्हा घरोघरी दिसायच्या.मधेच ते आतडं बाहेर पडायचं मग आम्हीच ते सर्जन होवून हिराने नीट आत ढकलायचो. आमची सर्जनशीलता अशी बहराला यायची.
पुलं बरोबरच वपु काळे होते. शिवाजीराव भोसले होते.ते पण ऐकायला आवडायचे.पण पुलंची जादू वेगळीच होती.घरेलु प्रसन्न वातावरण त्यात खेळत असायचं. एकतर त्यांना नेहमी सोताकडे कमीपणा घ्यायची सवय.त्यामुळे चला हा माणूस आपल्या सारखाच आहे.असं तेव्हा वाटायचं .आपुलकी वाढीस लागली होती.आता कळतय ते बावळट नव्हते आणि नाहीत.पण फार व्यवहाराने किंवा काटेकोरपणे जगणे त्यांच्यातल्या माणसाला अवघड जायचं . असं जगून आपण काय साधणार हा त्यांचा साधा विचार असावा.
लबाड, ढोंगी, स्वार्थी ,उथळ ,कद्रु ,दिखावू ,मत्सरी, आपलं तेवढं साधून घेणाऱ्या अति शहाण्या माणसांना ते ओळखून होते. नाही असं नाही.पण त्यांना उघडं पाडणं त्यांच्या जीवावर यायचं. या अर्थाने ते आळशी होते.कारण एकदा वैर पत्करलं की ते झक मारत जोपासत ठेवावं लागतं. डाव प्रतिडाव, शह प्रतिशह लय राबणूक असते. त्यापेक्षा साधी माणूसकी जोपासायला सोपी. हिणकसपणाची कलाकुसर करावी लागत नाही.
शिवाय आपल्या समोर कुणाचा चेहरा पडलाय..किंवा आपल्या मुळे कुणाची मानहानी झालीय , कुणी तोंड फिरवलय ही गोष्ट त्यांना अजिबात रुचायची नाही. या बाबतीत मी अगदी पु.लं.सारखीच आहे.
काही माणसांना मात्र दिवसातून चार माणसांचे तरी धडधडीत अपमान केल्याशिवाय..आणि दहा एक माणसांचे चेहरे पाडल्या शिवाय अन्नच गोड लागत नाही.आणि त्यालाच ती आपली बुध्दीमत्ता समजतात.
ज्याला ज्यात आनंद आहे ते करुदेत. आपण मात्र त्यांच्या पासून लांब राहायचे. कदाचित असल्या माणसांशी डावपेच खेळत राहण्यापेक्षा तो वेळ साहित्य ,नाटक , गाणं बजावणं यात सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार असावा.
पुलंचं आणि माझं एक महत्वाचं साम्य म्हणजे माझे पुढचे दोन दात सेम पुलं सारखे आहेत. आम्हाला खाण्या विषयी असलेली आवड..म्हणजे केवळ पदार्थ खाण्याविषयी नाहीतर पदार्थ करण्याचं जस्ट मनात आल्या पासून ते खिलवण्या पर्यंतचे सर्व प्रकारचे सोपस्कार..वगैरे वगैरे आणि वगैरे.
पुलंना विनोदी लेखन करायला खूप आवडायचं.ते करताना त्यांच्या मनावर कसलाही ताण नसायचा.ते अगदी सहज असायचं .माझं सुध्दा अगदी सेम असं..असं म्हणण्याचा मी महाआगावूपणा करणार नाही. पुलं जबरदस्त परफाॕर्मर होते..हा गुण त्यांना इतर विनोदी लेखकांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते त्यांच्या हार्मोनियम वादनाचं संगीत प्रेमाचं आणि अभ्यासाचं.लहानपणी खूप संगीत ऐकून ऐकून आपोआप अभ्यास झाला असं ते म्हणतात .पण तो नुस्ता अभ्यास नाही..रसिला अभ्यास आहे.अभ्यास म्हटलं की एक प्रकारची रुक्षता निदान मला तरी जाणवते.ती यात दिसत नाही .एका रसिक आनंदाची निर्मळ देवाणघेवाण यात दिसते. वादक लोक न बघता पेटी वाजवतात याचं मला कमालीचं आश्चर्य वाटतं !आम्हाला दोन डोळे सताड उघडे ठेवले तरी धोंडे काय वाजवता येत नाही. त्यात पुल पट्टीचे सुरेल वाजवणारे..!संगीताची आवड ज्ञान आणि त्यांना अवगत असलेली कला यामुळे त्यांना आयुष्याचा आनंद शतपटीने घेता आला.
खरोखरच ही दैवी प्रतिभाच होती. पुलंच्या साहित्याचं जर पारायण केलं तर तत्वज्ञानाची वेगळी पुस्तकं वाचायला नकोत. पुलंची पुस्तकं एक प्रकारे मानसिक समाधान वाढवणारी आहेत. पुलं वाचलेला पचवलेला माणूस आत्महत्या करुच शकत नाही.हे त्यांच्या साहित्याचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणून..मानसोपचाराचा भाग म्हणून त्यांची पुस्तकं नियमीत अभ्यासाला लावली पाहिजेत..असं माझं आपलं अभ्यासू मत आहे.
- सई ललित