Friday, July 19, 2024

फलाट

आदर्श टुमदार सुंदर खेड्याबद्दल माझ्या काही अपेक्षा असतात. त्या खेड्याच्या उशाशी टेकडी असावी. त्या गावाच्या गळ्यात जाता जाता लडिवाळपणे हात टाकून गेलेली नदी असावी. घाटदार कळसाचे देऊळ असावे. गावाच्या पाठीशी पहाऱ्याला रमे असलेले उंच आकाश-निंब असावेत. पिंपळाचा पार असावा. त्या पारावर घडलेली कहाणी असावी. गावाकडून वाट मुरडत मुरडत यावी आणि एखाद्या अगदी चिमुकल्या स्टेशनाला मिळावी. स्टेशन इतके चिमुकले हवे की, तिथल्या फलाटाला "प्लॅटफॉर्म" म्हटलेले ऐकल्यावर त्याने लाजावे! एखाद्या शेतकऱ्याच्या धाकल्या सुनेला तिच्या माहेरच्या माणसाने "काय पाटलीणबाई" म्हटल्यावर ती लाजेल, तसे लाजावे !

असल्या ह्या चिमुकल्या फलाटाचे मला विलक्षण आकर्षण आहे. तिथे एखाद-दोन येणाऱ्या आणि एखाद-दोन जाणाऱ्या एवढ्याच पाशिंजर गाड्या थांबाव्या. भुकेची वेळ झाल्यावर पाळण्यातले तान्हे जसे चुळबुळते, तसे गाडी येण्या-जाण्याच्या सुमाराला थोडेसे जागून झोपणारे स्टेशन हवे ! सकाळच्या पाशिंजरला कोण आले न् सांजच्याला कोण गेले, हे साऱ्या गावाला कळावे. असली जवळीक असलेला फलाट, आणि "काय पाटील
, आकाताई चालल्या का सासरी ?" म्हणणारा स्टेशनमास्तर आणि ''अगऽ आन्सूये, पोराला कुंची बांधावी का न्हाइ नीट ? वारं कसं झणाणतंय - सर्दी भरली म्हंजी मऽग ?” म्हणणारा निळ्या कपड्यांतला, कपाळाला बुका न् गळ्यात तुळशीमाळ घातलेला पोर्टर हवा. मग मास्तरसाहेबांस्त्री पाटलाच्या पोरीचा भर फलाटावर वाकून नमस्कार बडावा, आणि "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" म्हणताना जमशेटपूर किंवा असल्याच दूरच्या ठिकाणी दिलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीने मास्तर आपले गहिवरणे दडवायला "सेवण्टीन अप लेट आहे आज..." म्हणत खिडकीशी आलेल्या माणसाला तिकीट द्यायला निघून जावेत. असल्या आपुलकीचा फलाट !

गावंढी माणसे शब्दांचे टोचणारे कोपरे काय सुरेख घासतात. प्लॅटफॉर्मचा 'फलाट' करतील. स्टेशनाचं 'ठेसन' झाल्याबरोबर त्याला प्राण आला. ठेसनाला जीव आहे. 'स्टेशन' हे टाइमटेबलातल्या नामावळीत ठीक आहे. पण 'ठेसन' म्हटल्यावर तिथे तहेतऱ्हेच्चे भाव दाटतात. "पोचल्याबराब्बर कार्ट टाकायचं बरं अंतुल्या, इसरायचं न्हाई..." इथपासून "बराय... बघू पुन्हा केव्हा जमतं ते. सध्या लीव्ह-बीव मिळवायची म्हणजे देअर आर हंड्रेड अँड वन् डिफिकल्टीज..." इथपर्यंत असंख्य भाव दाटतात. काही बोलके, काही मुके- म्हणून अधिक बोलके, लोकांच्या अनवाणी आणि पायताणी तळव्यांची भृगुचिन्हे मिरविणाऱ्या ह्या फलाटांनी काय काय म्हणून पाहिले असेल ! कान लावून फलाटाचे बोलणे ऐकता आले पाहिजे.

- पु. ल. देशपांडे
काही अप - काही डाउन 
हसवणूक
 

Friday, July 5, 2024

तुमने हमको हसना सिखाया.. - (निमिष वा.पाटगांवकर)

".....इंग्लडला जायला कोणती इंजेक्शने घ्यावी लागतात ह्या प्रश्नाला फक्त दमा, रक्तक्षय आणि बाळंतरोग याखेरीज बहुतेक सगळ्या रोगांची नावे मला सांगितली गेली.. ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता. पिवळ्या तापावर फारच दुमत होते. पिवळा ताप फक्त अमेरिकेला जायला अडवतो हे त्यांचे म्हणणे".. "अपूर्वाई"तल्या या प्रसंगाला मी नुकताच जेव्हा सामोरा गेलो तेव्हा लक्षात आले कि पु.ल. आपल्या आयुष्यात किती भरून राहिले आहेत.

वेस्ट इंडिजला विश्वचषकासाठी जायच्या तयारीचा भाग म्हणून मला पिवळ्या तापाची लस टोचून घ्यायची होती. आपण वेस्ट इंडिज म्हणतो पण हे वेगवेगळे देश आहेत आणि बरीच छाननी केल्यावर कळले फक्त गयानाला जायला किंबहुना तिथून परत येताना हा पिवळा ताप टोचून घेतलेला आवश्यक आहे. हि लस कुठे मिळते कळल्यावर विमानतळाजवळच एक आरोग्य सुविधा केंद्र आहे तिथे हि लस आठवड्यात फक्त दोनदाच मिळते हे कळले. असेही कळले कि एकदा लसीची बाटली उघडली कि दहा लोकांना ती दिली जाते नाहीतर ती वाया जाते तेव्हा तिथे दहा लोकं असतील का? हा माझ्यापुढे वेगळाच प्रश्न होता. पुन्हा अपूर्वाईचाच प्रसंग बघितला तर या गडबडीत पासपोर्ट मात्र मी न विसरता नेला पण फक्त अर्धा बुशशर्ट घालायचा विसरलो आणि मला तिथे सलमान खान व्हावे लागले इतकाच काय तो आमच्या दोघांच्या लसीकरणातला फरक. मला दहा माणसांची चिंता होती पण इथेही सुमारे शंभर माणसांची बारी लागली होती. दहा दहाचे जथ्थे ते आत सोडत होते. काही लोकं खरंच गोंदवून घेतल्याच्या खुशीत होते. त्या भाऊगर्दीत बहुतेक सगळे आफ्रिकेला जाणारेच होते. माझ्यासारखा दक्षिण अमेरिकेच्या वाटेला जाणारा कुणी भेटला नाही.

खरंच पु.ल. नावाचं गारुड आज पुलंना जाऊन चोवीस वर्षे झाली तरी काही कमी होत नाही. जिकडेतिकडे पुलंनी पेरलेली माणसे दिसत असतात. आजकाल लग्न हे एखाद्या इव्हेंटसारखे असते तरी त्यातही कुणीतरी नारायण पटकन दिसतो. माझे शिक्षक आता फार कमी राहिले आहेत पण काहींची आठवण आली कि चितळे मास्तरांची आठवण येते. यू सी..यू सी ...करत गोंडा घोळणारा मधू मलुष्टे आता एसटीमध्ये न दिसता कधी कधी विमानात एअरहोस्टेसवर इम्प्रेशन मारताना दिसतो. आमची पिढी पन्नाशीची झाली तरी आमच्या वेळच्या इंदू वेलणकर कुठे राहायच्या नाही तर आता कुठे राहतात हे आमच्यातल्या अनेक नंदा प्रधानांना आजही माहित असते. कधीकधी त्यांचे खविस बापही भेटतात. आमच्यातल्या काहींचे केस आता काळ्या रंगाशी फारकत घ्यायला झालेत तरी मनाने नाथा कामतचे उसासे टाकत असतो. हे झाले काही वल्लींचे नमुने तर "आमची व्हिक्टोरिया अशी नाही हं" हा श्वानमालकांचा नमुना जसाच्या तसा बघायला मिळतो.

अत्यंत सोप्या भाषेत, आपल्याला दिसते तेच पण वेगळ्या शैलीत मांडून आपल्याला पुनर्प्रत्ययाचा सुखद धक्का देणारे पु.लंचे लिखाण म्हणूनच कालबाह्य होत नाही. मुंबईतल्या चाळी आता नामशेष व्हायला लागल्या आहेत पण जरी तिथे चाळी जाऊन टॉवर उभे राहिले तरी कुणीतरी एच. मंगेशराव असतील, लोकांना ब्रह्मज्ञान पाजणारे बाबा बर्वे असतील, चापशी असेल आणि टॉवरच्या कुठच्यातरी दोन मजल्यावर असलेले सरोज गुप्ते आणि मधू चौबळ आता पत्रे नाही तर चॅट करून आपले मन उलगडून दाखवत असतील. मला वाटते आजूबाजूचे जग झपाट्याने बदलले तरी माणसाचा मूळ स्वभाव तसाच असतो. पु.लंनी तो अचूकतेने टिपला म्हणून आजही ते वाचताना आपल्या चेहऱ्यावर हास्याची किनार उठते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे हे सर्व सात्विक जग बघून आपण त्या नॉस्टॅलजियामध्ये हरवून जातो.

पु.ल. गेले तेव्हा मी अमेरिकेत होतो. त्यांची तब्येत खालावत चालल्याचा बातम्या रोज वाचून काळजात चर्रर्र होत होते. जे अटळ आहे ते समोर दिसत होते. माझ्या वाढदिवसाला (११ जूनला) हे व्हायला नको म्हणून मी स्वार्थीपणाने देवाकडे एक दिवस मागून घेतला. देवानेही तो मान्य केला असावा. १२ जूनचा ऑनलाईन पेपर उघडायची हिम्मतच नव्हती. मला आठवतंय त्या डेक्कनवरच्या प्रयाग हॉस्पिटलच्या समोरच्या गर्दीत एक माणूस हातात फलक घेऊन उभा असेलेला फोटो आजही मी विसरलो नाही. त्या फलकावर लिहिले होते ..."तुमने हमको हसना सिखाया...." आजकाल दुर्मिळ होत चाललेली हि गोष्ट भरभरून दिलेल्या पुलंचे "एहसान" व्यक्त करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात.
- निमिष वा. पाटगांवकर

Tuesday, July 2, 2024

हशा-टाळ्या पलीकडचे पु.ल. - (विनायक होगाडे)

पुलंची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. 'हशा-टाळ्या पलीकडचे पुलं' समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

ज्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला फारसा माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे हे या प्रकारातले ग्रेट एंटरटेनर होते. मात्र, त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. याशिवाय ते शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, पट्टीचे वक्ते होते. यापैकी कोणती ओळख अधिक ठळक करावी आणि कोणती फिकट करावी, असा प्रश्न सूज्ञ मराठी माणसाला पडू शकत नाही. कारण, ज्यांना पुलं देशपांडे कळलेत तो पुलंच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक धाग्यांपैकी कोणतातरी एकच धागा आपलासा करून बसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जे काही पैलू होते, त्या सगळ्याच पैलूंना आलेल्या चकाकीमुळेच पुलं नावाचा हिरा मराठी साहित्य-संस्कृतीमध्ये चमकताना दिसतो. पुलंचे स्मरण दरवेळी त्यांच्या पुस्तकांवरून, सादरीकरणावरून होते, ते करणेही फारच सोयीचे आहे. मात्र, त्यांची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. ‘हशा-टाळ्या पलीकडचे पुलं’ समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

गांधीवादी-समाजवाद्यांशी वैचारिक नाते
पु.ल. देशपांडे हे प्रामुख्याने कला क्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्त्व असले तरीही राजकारण-समाजकारणापासून विलग करून त्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे करता येत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही त्या-त्या काळाचे अपत्य असते. त्यामुळे तिच्यावर त्या काळात घडलेल्या राजकीय-सामाजिक घटनांचा आणि विचारांचाही प्रभाव असणे स्वाभाविक आहे. तिने वेगवेगळ्या गोष्टींबाबत भूमिका घेणेही स्वाभाविक आहे. बरेच लेखक-कलाकार आपली राजकीय-सामाजिक भूमिका काय आहे, हे उघड करणे टाळतात. किमानपक्षी भूमिका घेणे तरी टाळतातच. मात्र, पुलं त्यापैकी नव्हते. आपला जन्म शहरी मध्यमवर्गीय घरात झाला आणि आपली वाढ स्वातंत्र्य चळवळीच्या आणि गांधीजींचे नेतृत्त्व प्रस्थापित होण्याच्या काळात झाली, या त्या दोन गोष्टी पुलंनी वारंवार सांगितल्या आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी सांगितले की, “महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचा पुलं देशपांडेंवर विशेष प्रभाव होता. दुसरी गोष्ट त्यांची पत्नी ही समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या ‘राष्ट्र सेवा दल’ या संघटनेची कार्यकर्ती होती. त्यामुळे या तिघांच्या प्रभावामुळे ते डाव्या आणि गांधीवादी विचारसरणीच्या बाजूला झुकणे स्वाभाविक होते. सुरुवातीची त्यांची कारकीर्द फारशी वैचारिक आणि तात्त्विक अशी दिसत नसली तरीही सुनीता देशपांडेंसोबत विवाह झाल्यानंतर त्यांच्या एकूण जीवन व्यवहाराला हाच विचार जवळचा वाटला.” पुढे ते म्हणाले की, “ते उत्तम कलावंत होते. त्याकाळी त्यांच्यातल्या कलेला उत्तम दाद या लोकांकडूनच मिळत होती. मात्र, त्यांच्या लिखाणातून गांधीवादी-समाजवादी अशी सगळीच मूल्ये पूर्णपणे उमटतात असे दिसत नाही. मात्र, त्यांनी आपल्या कलेतून उपलब्ध झालेले संचित या विचारांकरिताच दिल्याचे दिसून येते. जे आपल्याला करता येत नाही, ते ही मंडळी करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण इतके करू शकतो, असे म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते.”


पु. ल. देशपांडे यांनी साने गुरुजी, विनोबा भावे, डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, नाथ पै, हमीद दलवाई, राम नगरकर, ग. दि. माडगूळकर इत्यादींचा गौरव केल्याचे दिसून येते. ही सगळी प्रामुख्याने गांधीवादी-समाजवादी-प्रागतिक विचारांचीच माणसे होती. मुस्लीम धर्मात सुधारणा व्हावी म्हणून ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना करणाऱ्या हमीद दलवाईंवर लिहिलेल्या एका लेखात पुलं म्हणतात की, “हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दु:ख जाणवले होते असे नाही; फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दु:खांना कुठे वाचाच फुटत नाही, ती फोडायला कुणी धजावत नाही याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती.” पुढे ते म्हणतात की, “हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मीळ हात गेले. हमीद अनेक दृष्टींनी अकाली गेला. विरोधकांना त्याला हरवता आले नसते. एका दुर्धर रोगाने ऐन बहरात त्याचे जीवनपुष्प कुस्करून टाकले. या दु:खाबरोबरच भारताच्या जीवनात एक नवे क्रांतिपर्व सुरू होते आहे, अशा काळातले हमीदच्या निधनाचे दु:ख मनाला अधिक यातना देणारे आहे. केवळ मुसलमान समाजाचेच नव्हे, तर साऱ्या भारतीयांचे हे दु:ख आहे. आजवर या ना त्या पूर्वग्रहामुळे एकमेकांपासून दूर राहिलेले भारतातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे प्रवाह एकमेकांत मिसळण्याचा एक ऐतिहासिक क्षण आला आहे. अशा क्षणांना पकडून त्यांचे युग करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या हमीदच्या हातांसारख्या हातांची कधी नव्हती इतकी आज गरज आहे. ते सामर्थ्य आता हमीदच्या विचारांतून मिळवावे लागणार आहे.” (संदर्भ : ‘मैत्र’- मौज प्रकाशन गृह, मुंबई / हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार)

राजकारणावर सडेतोड मते
‘राजकारण आणि संस्कृती उत्तरार्ध’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “वस्तुतः केवळ राजकारणी लोकांना सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांत ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार पोचतो! वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या आहारी जाऊन ‘येन केन प्रकारेण’ निवडणुका जिंकणे व सत्तास्थाने काबीज करणे, हेच ज्यांचे ध्येय, त्यांना नीती-अनीती, धर्माधर्म, सुसंस्कृतपणा, रानटीपणा यांचे कसलेही सोयरसुतक नसते. निवडणुकांचे राजकारण हे केवळ निनैतिकच नसते, तर ते सर्व नैतिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनमूल्यांची पायमल्ली करणारे असते; ही गोष्ट आपल्या देशापुरती तरी आता सिद्ध होऊन चुकली आहे. सांस्कृतिक जीवनमूल्यांची भेसुर विटंबना करणाऱ्या या अशा राजकारणी लोकांकडे जनतेच्या सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाची जबाबदारी राहू देणे म्हणजे सिद्ध होऊन चुकलेल्या पापाचरणाला अमरपट्टा बहाल करणे होय!”
इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ‘ठोकशाही’लाही विरोध
१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर पुलं देशपांडे त्या विरोधात सक्रिय भूमिका घेऊन उभे राहिले. कलावंताचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्यांना प्रिय होते. त्यामुळे त्यांनी आणीबाणीनंतर काँग्रेसविरोधात प्रचारच केला. तत्कालीन परिस्थितीत जसा विरोधी प्रचार त्यांनी काँग्रेसविरोधात केला अगदी तसेच महाराष्ट्रात हिंदुत्ववादी युतीचे सरकार असताना ते ‘ठोकशाही’वरही बोलले होते. “लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ”लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? ‘निराशेचा गाव आंदण आम्हासी’ ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते”, असे वक्तव्य पुलंनी केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे वक्तव्य आवडले नव्हते. त्या दोघांमधील संबंध एरवी सलोख्याचे असले तरीही पुलंनी केलेल्या वक्तव्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी केलेले वक्तव्यही चर्चेत आले. “झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता?”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांनी पुलंना ‘मोडका पूल’ असेही म्हटले होते. हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत पुलंचे संबंध कसे होते, याबाबत बोलताना जयदेव डोळे यांनी म्हटले की, “सावरकर आणि देवल दोन हिंदुत्ववादी आणि संघपरिवारातील माणसं सोडली, तर या परिवाराला आपल्यापासून चार हात दूर ठेवणंच पुलंनी पसंत केले. सावरकरांना त्यांनी ऐकलेलं-पाहिलेलं होतं. महाराष्ट्रावर सावरकरांची भुरळ पडलेला तो काळ होता. आता आपल्याला उपलब्ध असलेले सावरकरांच्या कर्तृत्वाचे ऐतिहासिक वस्तुनिष्ठ मूल्यमापन त्या काळात झालेले नव्हते. त्यामुळे पुलं देशपांडे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून एकाच वेळी साने गुरुजींच्याही प्रेमात होते आणि एकाच वेळी ते सावरकरांच्याही प्रेमात होते. कारण या दोघांच्या विचारातील विरोधाभास ७०-८० वर्षांपूर्वी मराठी समाजाला फारसा समजत नव्हता, तो पुलंच्याही स्वभावात आणि वागण्यातही दिसून येत होता.”

पु.ल. देशपांडे – प्रामुख्याने एंटरटेनर
१९४६-४७ च्या सुमारास साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून आंदोलन छेडले होते. त्यासाठी दहा दिवस प्राणांतिक उपोषणही केले होते. या उपोषणालाही पुलं देशपांडे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. साने गुरुजींची भूमिका नाटक, पथनाट्य, वगनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे कलापथक सक्रिय होते. या कलापथकाला लिहून दिलेले एक गीतही प्रचलित झाले होते. त्या गीताचे बोल असे होते,
हरिचे प्यारे हरिजन आम्ही आलों हरिचरणी
पंढरिराया राउळिं तुमच्या बसूं धरुन धरणीं ॥
चोखामेळ्याच्या भक्तिची शक्ती आम्हाला
मिराबाईचें घुंगुर चरणीं सखुच्या करताळा ||

साने गुरुजींबद्दल लिहिलेल्या ‘स्वप्न आणि सत्य’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “गुरुजींच्या वाङ्मयात केवळ काव्यातलाच निसर्ग आहे असे नाही, त्यांनी विज्ञानाच्या उपासनेला फार महत्त्व दिले आहे. गुरुजींनी म्हटले आहे, ‘विज्ञानग्रंथांची भाषांतरे करा, तुम्हाला प्रतिशब्द मिळाले नाहीत तर ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणा; कार्बनला कार्बन म्हणा, पण विमाने उडतात कशी? आकाशापर्यंत लोक कसे जातात, हे मुलांना कळू द्या.”

पुलं देशपांडे यांनी चित्रपटात संत चोखोबांचीही भूमिका केली होती. व्यंकटेश माडगूळकर यांची कथा आणि ग. दि. माडगूळकर यांची पटकथा, संवाद आणि गीते असलेला हा सिनेमा १९५० साली ‘जोहार मायबाप’ आणि १९८१ साली ‘ही वाट पंढरीची’ या नावाने प्रदर्शित झाला होता. पुलं देशपांडेंनी समतेच्या आणि मानवतावादी चळवळीला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी प्रसंगी राजकीय भूमिका घेण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. देवा-धर्माबाबत वैयक्तिक जीवनात ते नास्तिक आणि निधर्मी होते. देवधर्म व कर्मकांडांत ते कधीही गुंतले नाहीत तसेच कोणत्याही माध्यमातून त्यांचा पुरस्कारही केला नाही. मात्र, तरीही विचारसरणीच्या भिंती ओलांडून ते संपूर्ण महाराष्ट्राचे ठरले. याबाबत बोलताना जयदेव डोळे म्हणाले की, “पुलं देशपांडे सर्वात आधी एंटरटेनर होते आणि एंटरटेनर माणूस हा विशिष्ट वर्गांसाठी काहीही करत नाही. त्यावेळी पुलंना शाहीर अमर शेख, आण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे असे समकालीन लोक होते. एवढी तीन मोठी व्यक्तिमत्त्वे उघडपणे राजकीय विचारसरणी मांडत होती. त्या काळात दलित आणि बहुजन समाजामध्ये या तिघांचीही लोकप्रियता पुलंहून अधिक होती. मात्र, त्यांच्यासारखी थेट राजकीय भूमिका पुलं मांडत नव्हते. दुसऱ्या बाजूला एंटरटेनमेंट हाच त्यांचा पाया असल्यामुळे त्यालाही थेट राजकारणाचा पाया देणे त्यांना योग्य वाटले नसावे. शिवाय त्यांचा चाहतावर्ग हा ग्रामीण, शेतकरी, कामगार, कष्टकरी नव्हे तर शहरी मध्यमवर्ग होता. हा मध्यमवर्ग समाजवादी असो वा हिंदुत्ववादी असो, तोच त्यांचा चाहतावर्ग ठरला.”

विनायक होगाडे
लोकसत्ता 

Friday, June 28, 2024

शाहूमहाराज - आकाशाएवढा मोठा राजा

.....'संस्थानिक' ह्या कल्पनेला चांगल्या अर्थाने तडा देणारी जर कुणा एका संस्थानिकाची कथा माझ्या कानावर माझ्या लहानपणी पडली असेल तर ती कोल्हापूरच्या शाहूमहाराजांची. त्याला कारण होते. माझे आजोबा कोल्हापूर संस्थानात भाग-कारकून नावाच्या महिना तीनचार रुपयांचे वेतन मिळवायच्या हुद्द्यावर होते. 'करवीर दरबारातली नोकरी' असा ह्या नोकरीचा प्रौढ भाषेतला उल्लेख असायचा. माझ्या वडिलांचा जन्म आणि शिक्षण कोल्हापूरला. माझ्या आत्या कोल्हापूरच्या आसपासच्या एकदोन खेड्यांतल्या कुटुंबांत दिलेल्या. त्यामुळे 'कोल्हापूर 'विषयी मनात ओढ होती. अशा काळात मला माझ्या आत्याबाईने शाहूमहाराज आपल्या संस्थानातल्या एका शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन त्याच्याबरोबर भाकर खायला बसले होते ही कथा सांगितली होती.. माझ्या लहानपणी कोल्हापूर संस्थानातल्याच एका खेड्यात शेती करणाऱ्या माझ्या आत्याने सांगितलेल्या कथेतले शाहूमहाराज हे खेड्यातल्या पारावर बसून फिरत्या चिलमीच्या लयीत रंगणाऱ्या कथांतले लोकप्रिय कथानायक होते. उत्तुरजवळच्या त्या माझ्या आत्याच्या खेड्यातले सुट्टीच्या दिवसांतले माझे मुक्काम मला खूप आठवतात.

'शाहूम्हाराजांच्या वख्ताला' असा पीस जोडून महाराजांच्या कथा उलगडणारी बरीचशी मंडळी आता देवाघरी गेली. त्या कथांत त्यांच्या शिकारींच्या शौर्याच्या कथा असत. गोरगरिबाच्या दारात न सांगता दत्त म्हणून उभे राहण्याच्या असत. खेड्यातल्या गरीब माणसाचे दुःख महाराजांनी जातीने लक्ष घालून कसे दूर केले ह्याच्या असत. 'कुणा स्नेह्याच्या लग्नाच्या पंक्तीत भज्यांचा हाराच्या हारा कसा फस्त केला' यासारखी त्या भज्यांची संख्या मनसोक्त वाढवून सांगितलेली कथा असे. जुलमी अधिकाऱ्यांची फटफजिती कशी केली याच्या कथा असत. आणि "आता त्ये समदं ग्येलं म्हनाना..." असे सुस्काऱ्याच्या साथीतले भरतवाक्य असे. ह्या साऱ्या कथांतून शाहूमहाराजांचे एक मोठे लोभसवाणे चित्र डोळ्यांपुढे रंगत असायचे. असला धिप्पाड राजा आपल्याला बघायला मिळायला हवा होता असे वाटे. त्या कथांतून दिसणाऱ्या लोभसवाणे- पणाबरोबर एका थट्टेखोर काहीशा खट्याळ पण चेष्टा करता करता फार मोठा शहाणपणा शिकवणाऱ्या राजाचे चित्रही डोळ्यांपुढे उभे राही. देहाच्या धिप्पाडपणासारखा मनाचाही धिप्पाडपणा दिसे. वाढत्या वयाबरोबर वाचनही वाढले. स्वातंत्र्याच्या चळवळी डोळ्यांपुढे चाललेल्या असताना त्यांतला संस्थानिकांचा वाटा फारसा अभिमानास्पद नव्हता हेही दिसायला लागले. पण त्याबरोबर औंधचे महाराज, सयाजीराव गायकवाड, शाहू छत्रपती यांची चित्रे त्या इतर संस्थानिकांशी मिळतीजुळती नाहीत हे ध्यानात यायला लागले. औंध किंवा बडोदे ह्या संस्थानांशी माझे काही नाते नव्हते, पण कोल्हापूरशी होते. त्यामुळे तसे काही खास कारण नसूनही ह्या राजाविषयीचे कुतूहल वाढीला लागले. 'शेतकऱ्याच्या झोपडीपाशी जाऊन त्याच्या चुलीवरची भाकर खाऊन ढेकर देणारा राजा' ह्या प्रतिमेने मनात घर केले होते. ते आजतागायत तसेच आहे. त्यानंतर शाहूमहाराजांविषयी खूप वाचायला मिळाले आणि दिवसेदिवस ही प्रतिमा उज्ज्वलच होत गेली.
    
माझ्या सुदैवाने मी जिथे धर्म-जाती असला भेदाभेद नाही अशा कुटुंबात वाढलो. आमच्या आप्तमंडळीत जरी देवाधर्माचे महत्त्व असले तरी माझ्या घरी देवबाप्पांचे फारसे लाड झाले नाहीत. पूजेचे भटजी येऊन एखादे धर्मकृत्य करताहेत हे दृश्य मी माझ्या बालवयात क्वचित पाहिले असेल. पुढे घरात गणपतिबाप्पा आले तरी त्यांच्या पूजेला भटजीबुवा आले नाहीत. माझ्या वडलांच्या निधनानंतर तर श्राद्धपक्ष वगैरेही आम्ही केले नाही. अशा वेळी समान विचाराच्या शोधात मन हिंडत असतानाच बुद्धीला न पटणाऱ्या ह्या रूढीविरुद्ध जे निबंध किंवा ग्रंथ लिहिले गेले, असल्या बंडखोरांची जी चरित्रे वाचली त्यांतून जन्मजात श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्याच्या प्रवृत्तीची चीडच येत गेली, मग ते श्रेष्ठत्व मानणारा ब्राह्मण असो की क्षत्रिय असो. मला आपण अमुक गोत्री ब्राह्मण आहे हे सांगणारा माणूस जितका हास्यास्पद वाटतो तितकाच आपण शहाण्णवकुळी असल्याचा अभिमान मिरवणारा मराठाही हास्यास्पद वाटतो. आणि ही रूढी मोडायला निघालेला प्रत्येक माणूस माझा वाटतो. शाहूमहाराजां- विषयीचे माझे 'माझेपण' त्यांच्या ह्या जन्मजात वर्चस्वाला ठोकरण्याच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा जो मला इतिहास वाचायला मिळाला त्यातून निर्माण झाले आहे. शाहूमहाराज 'हा किती मोठा राजा होता त्यापेक्षा किती मोठा माणूस होता हे पाहणे मनाला आनंद देणारे आहे.

......
ज्योतिबा फुल्यांनी 'सार्वजनिक सत्य' नावाचा सुंदर विचार सांगितला आहे: देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही आणि त्या माणसाचेही नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळीच त्या आराधनेला किंमत असते. गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते त्याचप्रमाणे गावची विहीर सर्वांना पाणी देऊन गेली पाहिजे. एका माणसाला उत्तम वैद्यकीय मदतीची सोय असावी, पैशाच्या बळावर त्याला धन्वंतरी विकत घेता यावा आणि उरल्या गावाने औषधावाचून तडफडावे ही लोकशाहीची रीत नाही. रयतेच्या पोरांना मुन्शिपालटीची काळोखी शाळा आणि व्यक्तिगत श्रीमंतीच्या बळावर दोघाचौघांच्या पोरांसाठी अद्ययावत ज्ञानसाधनांनी युक्त अशी विद्यालये ही समाजाला सार्वजनिक बौद्धिक श्रीमंती न देता पुन्हा एकदा सत्तेच्या नव्या सोयी करून देणारा नवा ब्राह्मणच निर्माण करतील. एकाच लोकशाहीत पुन्हा एकदा बडे लोक आणि छोटे लोक असे घटक तयार होतील आपल्या योजनांचा हा असा बोजवारा का उडावा ?

मला याचे एकच कारण दिसते. ते म्हणजे ह्या सर्व कार्यामागे मला कुठे अंतःकरणाचा ओलावा दिसत नाही. ह्या योजना करणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे तो पटकुरे नेसलेला माणूस येत नाही. ह्या साऱ्या योजना कागदावर होतात आणि कागदासारख्या कोरड्या राहतात. ही केवळ आकडेबाजांची हातचलाखी होते. शहरांत हजारो स्त्रीपुरुष भर रस्त्यात शौचाला बसताना दिसतात, हजारो पोरे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून पावांचे तुकडे शोधताना आढळतात. ह्या दृश्याने अंतःकरण द्रवून अस्वस्थ होणारे लोकनियुक्त प्रतिनिधी अभावानेच आढळतात. माणसांना किड्यांसारखे जगायला लावणारी झोपडपट्टी हा त्यांना लोकशाहीचा अपमान वाटत नाही. हरिजन स्त्रियांवरील अत्याचारांची सत्ताधीशांच्या मनाला जखम होत नाही. फक्त चौकशीची कायदेशीर भाषा ऐकू येते. रॉकेलच्या रांगा पाहून स्वतःला मंत्री, जिल्हा- परिषदेचा अध्यक्ष वगैरे म्हणवून घेताना खेद वाटत नाही. सकाळी शिवाजीमहाराजांचा उत्सव आणि रात्री 'ओबेराय शेरेटन' मध्ये जागतिक सौंदर्यस्पर्धा ह्या दोन्ही कार्यक्रमांना आमचे लोकनेते निर्लेप मनाने जातात. अशा वेळी सर्व स्पृश्य समाजाच्या तथाकथित धार्मिक भावना टाचेखाली तुडवून अस्पृश्याने उघडलेल्या हॉटेलात चहा प्यायला जाणारा हा राजा, राजा म्हणून आणि माणूस म्हणून आकाशाएवढा मोठा वाटायला लागतो. ह्या थोर माणसाने भारतीय समाजाच्या अभ्युत्थानातले अग्रक्रम नेमके ओळखले होते. सरंजामशाही संस्कारांत वाढलेला हा राजा लोकशाहीच्या उभारणीची बीजे पेरत होता आणि आमचे लोकशाहीतले राजे आणि राण्या भाडोत्री गर्दी जमवून स्वतःवर पुष्पवृष्ट्या करून घेताना भुकेल्या जिवांचे आक्रोश आपल्या कानी पडू नयेत याची खबरदारी घेताना दिसतात.

महाराष्ट्राच्या राजाच्या गळ्यात कवड्यांची माळ, असे म्हणतात. मला ती माळ फार सूचक वाटते. लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवावी लागते. 'उपभोगशून्य स्वामी' ह्यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदा- वली नाही. शाहूमहाराजांच्या पुण्यस्मरणाच्या वेळी आमचे लोकनियुक्त सत्ताधीश 'उपभोगशून्य स्वामी' हे बिरूद मोलाचे मानून स्वतःच्या आचरणाने ते सिद्ध करण्याची ज्या दिवशी प्रतिज्ञा घेतील त्या वेळीच असल्या शतसांवत्सरिक उत्सवाला काही अर्थ येईल. एरवी उत्सवप्रिय भारतात आणखी एक उत्सव साजरा झाला याहून त्याला काहीही महत्त्व राहणार नाही. ही प्रतिज्ञा कोल्हापुरात घेतली गेली तर त्या नगरीशी जुळलेल्या माझ्या बालपणा- पासूनच्या ऋणानुबंधामुळे मला अधिक गोड वाटेल. चांगल्या कार्याचा आरंभ कुठेही झाला तरी चांगला हे खरेच, पण आपल्या गावी झाला ह्याचा अभिमान वाटला तर ते चूक नाही !

(अपूर्ण)
लेख - शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस
पुस्तक - मैत्र
लेखक - पु. ल. देशपांडे
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवा.

Wednesday, June 26, 2024

पु. ल. आज तुम्ही हवे होतात. - (अविनाश चंदने)

पु. ल. देशपांडे यांचा जन्म हा देण्यासाठीच झाला होता. त्यांनी महाराष्ट्राला उत्तम साहित्य दिले, उत्तम संगीत दिले, सुंदर काव्य दिले, मराठीजनांना पोट धरून हसवले, सामाजिक संस्थांना न बोलता ओंजळी भरून दिले. गुणीजनांचे तोंडभरून कौतुक करण्याची ख्याती पुलंचीच! साहित्य, नाटक, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संगीत मैफल या सर्वांवर त्यांची हुकूमत होती. पुलंनी प्रत्येक गोष्टीला चार चाँद लावले. आजच्या इंटरनेटच्या युगात पुलंचे सर्व साहित्य, त्यांचे प्रयोग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आजही त्याचा आनंद घेतला जात आहे. १२ जून रोजी पुलंचा २४ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने या निर्लेप, सज्जन मनाच्या माणसाची ही आठवण.

गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून माझ्या जुन्या मित्राचा मुलगा भेटायला आला होता. एसटीने आलो म्हणाला आणि डोळ्यासमोर उभी राहिली ती पुलंची ‘म्हैस’. मी त्याला हातखंब्याविषयी विचारले आणि अजूनही तिथे एसटीसमोर म्हैस आडवी येते का असे विचारले. त्याला काही कळले नाही, मात्र माझ्या चेहर्‍यावरचे हसू त्याच्या नजरेतून सुटले नाही. मग त्याने कारण विचारले. त्याला एकच उत्तर दिले, एकदा पुलंची ‘म्हैस’ ऐक नंतर मला विचार. लगेच त्यांनी यूट्यूबवर म्हैस शोधली आणि ऐकली. त्यानंतर पुलंचे बरेच एकपात्री प्रयोग पाहिले, ऐकले आणि एकदम खूश झाला.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राला लाभलेले दैवी देणे होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रात त्यांचा सिद्धहस्त वावर होता. त्यांना अख्खा महाराष्ट्र ‘पुल’ म्हणून ओळखतो आणि फिल्म इंडस्ट्रीत तसेच देशात ‘पीएल’ नावाने त्यांना हाक मारायचे. हे सांगण्याचे कारण म्हणजे पुलंना जाऊन दोन तपं झालीत. 12 जूनला पुलंचा 24 वा स्मृतिदिन आहे. 12 जून 2000 रोजी पुलंनी शरीराने हे जग सोडले, मात्र त्यांनी साहित्याची, कलेची, त्यांच्या संगीतप्रेमाची छाप कायमची अवघ्या मराठीजनांवर सोडली आहे. तिचा कधीही कुणाला विसर पडणार नाही. 

पु.ल. म्हटले की डोळ्यांसमोर सर्वात प्रथम येतात ती त्यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पात्रे. ज्यांनी पु.ल. देशपांडे वाचले आहेत तो माणूस हातखंब्याला आला की हमखास एसटीतून बाहेर डोके काढून बघणार! न जाणो एखादी म्हैस एसटीला आडवी येईल आणि मग उगाचच तीन-चार तासांचा खोळंबा येईल, मात्र तो खोळंबा सर्वांना हवाहवासा वाटेल. कारण त्यात बाबूतात्या, खादीवाले, उस्मानशेट, मास्तर, मुलस्ट्यांचा मधू, ती सुबक ठेंगणी या सर्वांच्या भेटी होतील. ही सर्व पात्रे पुलंनी रत्नागिरी ते मुंबई या एसटी प्रवासात अजरामर करून ठेवली आहेत.

पुलंचे आणखी एक असेच विशेष पात्र म्हणजे ‘नारायण’, जो सगळी कामे बिनदिक्कतपणे करतो आणि त्यानंतर नामानिराळा होतो तो नारायण. पुलंनी नारायणाला असा काही घडवला आहे की विचारू नका! काही वर्षांपूर्वी लग्नानिमित्ताने पुण्याला मुक्कामी होतो. सर्व काही सुरळीत सुरू होते आणि तिथला एकजण सारखी धावपळ करत होता. जणूकाही लग्नाची सर्व सूत्रे त्याच्या हातात दिली होती. हे पाहून एका पाहुण्याने मला विचारले, हे सद्गृहस्थ आहेत तरी कोण? नारायण, असे उत्तर माझ्या तोंडून नकळत बाहेर पडले. 

लग्नसोहळ्यात एखादी व्यक्ती अशी असते जिच्याशिवाय पानदेखील हलत नाही. तो ‘नारायण’ असे पुलंनीच म्हटल्याने नारायण अजरामर झाला. पुलंची सर्व पुस्तके गाजली. त्यांना कायम मागणी राहिली. या सगळ्यांत ‘व्यक्ती आणि वल्ली’ने अमाप लोकप्रियता मिळवली. ही पात्रे पुलंना खरंच भेटली होती का, असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यावर ‘म्हटले तर भेटली आहेत, म्हटले तर नाहीत,’ असे उत्तर पुलंनी दिले होते.

पुराव्यानं शाबीत करीन म्हणणारे ‘हरितात्या’, ‘परोपकारी गंपू’, विलेपार्ले ते चर्चगेट हा प्रवास कधीही बसून न करणारा आणि बाबा रे तुझं जग निराळं आणि माझं निराळं म्हणणारा ‘नाथा कामत’, नुसतीच सोबत करणारा टेस्टलेस-कलरलेस-ओडरलेस ‘गजा खोत’, पोरगं तावडीत सापडलं की त्याला घासून पुसून जगात पाठवणारे ‘चितळे मास्तर’, बुद्धीजीवी ‘लखू रिसबूड’, बदनाम झालेला ‘बबडू’, बेळगावमध्ये वेव्हलेन्थ जुळलेले ‘रावसाहेब’, पावणेसहा फूट उंच आणि निळ्या डोळ्यांचा ‘नंदा प्रधान’, रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतील लोकोत्तर ‘अंतु बर्वा’, प्राज्ञ मराठी बोलणारा ‘सखाराम गटणे’ ही आणि अशी अनेक पात्रे केवळ आणि केवळ पुलंनी जन्माला घातलीत आणि त्यांना चिरंजीव केले.

पुल केवळ साहित्यात रमले असे नाही तर ते संगीत, गायन, वादन, नाटक, चित्रपट अशा सर्व ठिकाणी त्यांनी उत्तम तेच दिले. जे उत्तम असेल, चांगले असेल त्याचे पुल कौतुक करायचे. नवोदितांना प्रोत्साहन द्यावे तर पुलंनीच. ‘वस्त्रहरण’ हे मच्छींद्र कांबळी यांचे नाटक सर्वांना माहीत आहेच. हे नाटक सुरुवातीला चालले नाही. पुलंनी ते पाहिले, त्याचे जाहीर कौतुक केले. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र आजपर्यंत या नाटकाचे कौतुक करताना दमला नाही. ‘कोसला’ कादंबरीचेही असेच आहे.

पुलंनी ‘कोसला’चे जेवढे कौतुक केले तेवढे कदाचित कुणीही केले नसावे. विशेष म्हणजे ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि पुलंचे फारसे कधी जुळले नाही, मात्र ‘कोसला’चे कौतुक करताना त्यांच्यातील मतभेद कधीही दिसले नाहीत. साहित्य, नाटक, संगीत, चित्रपट आणि हो माणसांत रमणार्‍या पुलंना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. त्यांची पुस्तके, त्यांचे एकपात्री प्रयोग हे सर्व आजही मराठी माणसाच्या मनात घर करून आहेत.

1942 चा लढा असो किंवा 1977 चा आणीबाणीचा संघर्ष, पुलंनी लेखणी बाजूला ठेवून राजकारणात उडी मारली होती. तिथे त्यांनी अनेकांची भंबेरी उडवली होती, मात्र हेतू साध्य झाल्यावर राजकारणातून अंग बाजूला काढून ते पुन्हा लिखाणाकडे वळले. पुल ही व्यक्ती अगदी हटके होती. आताच्या जनरेशनला कदाचित ठावूक नसेल म्हणून पण भारतात दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान पुलंना मिळाला होता.

त्यासाठी त्यांना लंडनमध्ये ब्रॉडकास्टिंग आणि टेलिव्हिजनचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दूरदर्शनमध्ये सर्वकाही उत्तम चाललेले असताना त्यांनी ते सोडले. पुल कधीही एका जागी स्थिर राहिले नाहीत. राज्याच्या साहित्य, कला, संगीत क्षेत्रासाठी पुलंचे एका जागी स्थिर न होणे जमेची बाजू ठरली. पुल सर्व क्षेत्रात वावरले म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐश्वर्यात आणखी मोठी भर पडली.

पुलंनी पन्नाशीनंतर म्हणजे 1970 च्या सुमारास बंगाली शिकण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी ते गुरुवर्यांच्या (रवींद्रनाथ टागोर) पश्चिम बंगालमधील शांती निकेतनमध्ये गेले होते. ते बंगाली नुसते शिकलेच नाहीत तर त्यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्वही मिळवले होते. बेळगावमधील राणी पार्वतीदेवी कॉलेज, मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मालेगावमधील महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते प्रमुख होते.

मुंबई, पुणे तसेच दिल्लीच्या आकाशवाणीत त्यांनी नोकरी केली. पुलंना काहीही वर्ज नव्हते. त्यांची नजर जिथे जायची त्यात ते पारंगत होत असत. असे असले तरी संगीत त्यांच्या नसानसात होते. पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व आदींशी पुलंची खास मैत्री तर बालगंधर्व यांच्याविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा होता. संगीत मैफलीत पुल रमून जायचे.

पुलंची ‘वार्‍यावरती वरात’, ‘रविवारची सकाळ’, ‘बटाट्याची चाळ’ यांचे प्रयोग तर प्रेक्षकांनी उचलून धरले होते. यांचे प्रत्येक प्रयोग कायम हाऊसफुल्ल होत असत. पुलंनी त्या काळी चित्रपटसृष्टीही गाजवली होती. त्यातील ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाला सबकुछ पुल म्हटले जाते. म्हणजे याची कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन पुलंनीच केले होते. विशेष म्हणजे चित्रपटाचे नायकही पुल होते. आता गंमत पाहा, हा चित्रपट खूप चालला, चांगली कमाई केली, पण दुर्दैवाची बाब ही की चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रणही नव्हते. तिकीट काढून पुलंनी तो चित्रपट पाहिला होता.

व्यवहारी जगात पुलांना अनेकांनी फसवले होते, मात्र पुलंनी कधीही कुणावर राग धरला नाही की फसवणूक करणार्‍यांना त्यांनी कधी कोर्टात खेचले नाही. एवढेच कशाला फसवणूक करणार्‍यांबद्दल कुणाजवळ वाईटही बोलले नाहीत. कारण पैसा ही त्यांची गरज नव्हती, तर पुलंची कमाई ही सामाजिक गरज होती.

पुलंनी कुठलाही गाजावाजा न करता समाजाला भरभरून दिले. पुस्तकातून दिले, प्रयोगातून दिले, कवितांच्या कार्यक्रमातून दिले आणि खिशातून न मोजताही दिले. अनेक सामाजिक संस्थांना पुलंनी कुठलीही वाच्यता न करता आर्थिक मदत केली. त्यांच्यासाठी कायमची आर्थिक तजवीजही केली. त्यांनी उजव्या हाताने केलेले दान त्यांच्या डाव्या हातालाही कळले नसेल इतके पुल निर्लेप आणि सज्जन मनाचे होते.

– अविनाश चंदने
९ जून २०२४
उप वृत्तसंपादक आपलं महानगर
मूळ स्रोत - https://www.mymahanagar.com/featured/saransh/pu-la-today-you-are-wanted/752763/

Tuesday, June 18, 2024

स्वरयात्री पु. ल. - (अमृता देशपांडे)

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे हे जग सोडून गेले, त्याला आज २४ वर्षं पूर्ण होत आहेत. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेल्या पुलंचं 'संगीतकार' हे रूपही अतिशय सुरेल होतं. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी व पुलंच्या संगीतप्रेमाविषयी...

१२ जून २००० या दिवशी पुलंचं देहावसान झालं. त्या दिवशी पु. ल. देशपांडे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता, तर अवघ्या महाराष्ट्राचा साहित्य आणि संगीतातल्या अमूल्य आठवणींचा ठेवा स्वर्गातल्या देवांचं मनोरंजन करायला निघून गेला होता. त्यांनीच म्हटलंय, 'स्वर्गात गेल्यावर ब्रह्मदेव मला विचारेल, 'वत्सा पुरुषोत्तमा, विनोदाचं भांडवल देऊन मी तुला पृथ्वीवर पाठवलं ते तू कुणाकुणाला दिलंस?' तेव्हा मी उत्तर देईन, 'मी कुणाला काय दिलं याचा हिशेब ठेवत नाही; पण तमाम मराठी माणसांनी मला आपलं अनमोल हास्य दिलं; हे मी कधीही विसरणार नाही !'

अजूनही मराठी रसिकांचा दिवस 'इंद्रायणीकाठी देवाची आळंदी' या भजनानं किंवा 'कबिराचे विणतो शेले' अशा गाण्यांनी होतो, तर 'दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया...', 'सख्यांनो करू देत शृंगार' ही गाणी ऐकण्यानं एखादी संध्याकाळ फुलून येते. कधी जीवनातल्या अवघड वळणावरून जाताना 'माझे जीवनगाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मी जाणे' अशी त्यांनी संगीत दिलेली गाणी जगण्याचा धीर आणि जीवनातला आनंद देऊन जातात. 'शब्दावाचून कळले सारे'सारखी अत्यंत तरल चालीची गाणी प्रेमातल्या पूर्णत्वाचा आश्वासक आनंद देऊन जातात. पुलंच्याच शब्दांत 'कशासाठी जगायचं, तर संगीत ऐकण्यासाठी जगायचं' हा जीवनाचा हेतू देऊन जातात.

विनोदी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, अभिनेते म्हणून पु. ल. महानच होते. उभ्या महाराष्ट्राला त्यांनी हसवलं. त्या पुलंचा मला अतिशय भावणारा गुण म्हणजे त्यांच्यातला सूरग्राही संगीतज्ञ... गायक, वादक आणि संगीतकार !

त्यांना लहानपणापासूनच सुरांची विलक्षण ओढ होती. लहानपणच्या अगदी पुसट आठवणींबद्दल बोलतात, तेव्हा ते प्रसंगांपेक्षा सूरांचींच आठवण अधिक असल्याचं सांगतात. त्यांची आई खूप चांगली पेटी वाजवत असे आणि आजोबा कीर्तनकार होते. त्यांच्या घरात गाणं-बजावणं कायम होतंच. आवाजाच्या आणि सूर-लयीच्या ओढीबद्दल ते म्हणतात, 'ज्या काळात लहान मुलांचं लक्ष प्रसादाच्या खिरापतीकडे असतं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमधे आणि अभंग, श्लोक, आर्या यांच्यामधे असायचं.' वयाच्या अगदी आठव्या दहाव्या वर्षापासून त्यांनी बालगंधर्व, बाई सुंदराबाई, सवाई गंधर्व, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर, फैयाझ खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर यांचं गाणं ऐकलं. या सगळ्यांच्या गाण्याचे सूर त्यांच्या मनात आणि हृदयात घट्ट वसले होते. त्यांच्याच वयाचे असणारे पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्यांची मैत्री आजन्म राहिली. त्यांच्या मैत्रीतली एकतानता 'इंद्रायणीकाठी', 'ही कुणी छेडिली तार...' अशा अनेक गाण्यांतून दिसते.

पुलंना सगळ्या प्रकारची गाणी आवडायची. नाट्यगीतं तर ते अगदी समरस होऊन गायचे. बालगंधर्वांवर पुलंचं निरतिशय प्रेम. त्याबद्दलचे अनेक किस्से आहेत. लहानपणी ते पेटी शिकायला दत्तोपंत राजोपाध्ये मास्तरांच्या क्लासला जात असत. त्यांच्या क्लासचं स्नेहसंमेलन होतं. त्याला अध्यक्ष म्हणून प्रत्यक्ष बालगंधर्व आले होते. त्यांच्यासमोर अकरा वर्षांच्या पुरुषोत्तमानं पेटीवर त्यांचीच नाट्यगीतं वाजवायला सुरुवात केली; तसे बालगंधर्व खुर्चीवरून उठून पुलंच्या समोर येऊन बसले आणि भरभरून आशीर्वाद दिले. बालगंधर्वांची गायकी पुलंनी आयुष्यभर आपल्या हृदयात साठवली.

लेखक व्हायच्या आधी पुलंना गायकच व्हायचं होतं. ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याचे कार्यक्रम करीत असत. पुढं वसंतरावांची आणि पुलंची ओळख झाली. पु. ल. वसंतरावांसमोर गायले. वसंतरावांनीही पुलंच्या गाण्याचं कौतुक केलं; पण वसंतरावांनी आपली गायकी पेश केली, तेव्हा आपण काहीच नाही असं वाटून पुलंनी गाणं म्हणणं सोडून दिलं. आयुष्यभर पेटी वाजवली अन् गाण्यांना संगीत दिलं. वसंतरावांच्या गाण्याबद्दल पु. ल. म्हणतात, 'वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवणारी नाही. ती दऱ्याखोऱ्यांतून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वारासारखी आहे.'
        
पेटी वाजवण्याबरोबरच अभिनय, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण आणि फार काय; पण त्यांनी तमाशाही लिहिला आहे. हे सगळं एकच माणूस करतो, हे आजच्या 'स्पेशलायझेशन'च्या पिढीला खूप आश्चर्यकारक वाटण्यासारखं आहे. याबद्दल ते म्हणतात, 'एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक माझ्यामध्ये लहानपणापासून दडलेला आहे. यांच्यापैकी कोण केव्हा उसळी मारून वर येईल काही सांगता येत नाही.' त्यांनी रेडिओ आणि 'दूरदर्शन'मध्ये नोकरी केली. त्यानिमित्तानं देशाभरातल्या अक्षरशः शेकडो संगीत कलाकारांशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. संगीतप्रेमी मंडळींशीही स्नेह जुळला. तिथंच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं विपुल संगीत ऐकलं. पुलंना कोणतंही गाणं वर्ज्य नव्हतं. याबद्दल त्यांनी एका ठिकाणी खूप सुंदर लिहिलं आहे. ते म्हणतात, 'मी सूर-तालाचा लोभी आहे. त्या लोभात सारंगीही आहे आणि एकतारीही आहे. मृदंगही आहे आणि ढोलकीही आहे. कपाळभर आडवं गंध लावलेला धृपद धमार आहे आणि डोळ्यात सुरमा घातलेली गझलही आहे...'

किती रसिकतेनं लिहिलं आहे हे! पुलंनी संगीत दिलेली गाणी आजही आपल्या मनात ताजी आहेत. त्यात ज्योत्स्नाबाई भोळेंनी गायलेलं पहाटेचं चित्रमय वर्णन करणारं 'झाली पहाट झाली पहाट' हे गाणं, मागच्या अनेक पिढ्यांनी ज्या गाण्यावर ठेका धरला ते आशा भोसलेंच्या आवाजातलं 'नाच रे मोरा नाच' आहे, तर माणिक वर्षांनी गायलेलं खट्याळ चालीतलं 'हसले मनी चांदणे'ही आहे. या गाण्यांच्या आठवणीही अत्यंत रमणीय आहेत. एकदा गदिमा आणि पु. ल. रस्त्यानं जात होते. तेव्हा गदिमांनी पुलंना आपल्याला ते रागविग काही कळत नसल्याचं म्हटलं आणि 'केदार राग कसा असतो,' असं विचारलं. त्यावर पुलंनी उत्तर दिलं, 'समोर प्राजक्ताचं डवरलेलं झाड दिसतंय ना तोच केदार!' क्या बात है! गदिमाही काय समजायचं ते समजून चुकले आणि एक गीत त्यातून तयार झालं, 'ही कुणी छेडिली तार, प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार...' या गाण्याला पुलंनी केदार रागातच चाल दिली !

एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पुलंनी 'बिल्हण' या मूळ संस्कृत नाटकाचं मंगेश पाडगावकरांना मराठीत रूपांतर करायला सांगितलं. मंगेश पाडगावकरांनी ही सांगीतिका - लिहिली. त्याला पुलंनी संगीत दिलं. ही सांगीतिका आकाशवाणीवर दोनदा प्रसारित झाली. एकदा किशोरी आमोणकर आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायली, नंतर पं. जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी आमोणकर यांनी गायली. त्यात शोभा गुर्टू, रामदास कामत आणि पं. हरिप्रसाद चौरसिया असे अनेक मातब्बर कलाकार होते. या सगळ्यांची मोट पु. ल.च बांधू शकतात. याच्या रेकॉर्डिंग आता फारशा उपलब्ध नाहीत. त्यातलं एकच अप्रतिम गाणं 'सात समुद्रापलीकडून विहंगाला......' ऐकायला मिळतं. पुलंच्या अशा अगणित आठवणी आहेत. हा आपल्याला मिळालेला अमूल्य ठेवा कितीही वाटला तरी न संपणारा आहे. पुलंच्याच शब्दात सांगायचं म्हटलं, तर 'आपलं संगीतच मुळात चिरतरुण आहे'. म्हणूनच पुलंची आठवण आल्यावर मागच्या संपूर्ण शतकाचा संगीतपट व डोळ्यासमोर उभा राहतो, डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि टागोरांच्या कवितेतल्या ८. त्यांच्याच ओळी, त्यांच्याच आवाजात मनात निनादत राहतात...

हसेन खळखळ, गायीन कलकल
धरुनी ताल मग टाळी देईन,
माझ्यापाशी कथा किती तरी,
गाणी किती तरी,
प्राणांची अन शक्ती किती तरी..
सुखे किती, अनंत ऊर्मी,
मम जीवाची कोण उभारी...


अमृता देशपांडे
संपर्क क्रमांक - ९६८९९४७०१४
(लेखिका संगीत अभ्यासक आहेत.)
महाराष्ट्र टाईम्स
१२ जून २०२४

Monday, June 17, 2024

एक चाळीशी.. हवीहवीशी - (प्रेरणा कुलकर्णी)

गेल्या आठवड्यात पुलं चा स्मृतिदिन होता त्यानिमित्त हा लेख. कितीतरी महिने हे डोक्यात घोळत होतं. आज त्याला शब्दरूप देता आलं. पुलं च्या स्मृतीस त्रिवार वंदन!

गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा एखादा निबंधाचा विषय दिला तर माझा विषय अगदी पक्का- तो जाडा काळा चौकोनी चष्मा किंवा त्यापलीकडची ती दृष्टी.. ती जादुई नजर. तसं तर आपल्या सगळ्यांनाच रोज शेकडो लोकं दिसत असतात. मुंबई सारख्या महानगरात राहत असू, लोकलने जात असू तर तोच आकडा हजारावरही जाऊ शकतो.

ही लोकं, काही अत्यंत कंटाळवाणी अगदी टाळू वाटावी अशी तर काही महाभयंकर अगदी चार हात दूर राहाव अशी, काही रागीट तर काही अतिप्रेमळ, काही बेफिकीर, तर काही बेरकी, काही भोळसट तर काही परोपकारी तर काही चाकोरीबद्ध जीवन जगणारी. हातावर पोट असणारी, दोन पैसे गाठीशी बाळगणारी, ऋण काढून सण साजरा करणारी, पोटाला चिमटा काढून पै न पै साठवणारी. अशी नाना प्रकारची, नाना स्तरावरची, आपणही त्यांच्याशी कधी हसतो, बोलतो, चिडतो, टाळतो, दुर्लक्ष करतो, प्रेम करतो, द्वेष करतो, कौतुक करतो किंवा क्वचित कधी थोडी असुयाही बाळगतो.

आपण अगदी सामान्य माणसं, म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त बघितला म्हणजे काही लगेच आपल्याला कविता स्फुरणार नाही, की झाडाखाली बसलो म्हणून न्यूटन सारखे शोध लागणार नाहीत, किंवा परिस्थितीने चटके दिले वा प्रेमात पडलो म्हणून लगेच कादंबरी लिहायला सुचणार नाही. तेथे पाहिजे जातीचे. या लेखक, कवी, नाटककार मंडळींचं आपल्यापेक्षा सगळंच वेगळं. पण तरी त्यातही डावं उजवं असतंच नाही? म्हणजे बघा अगदी कितीही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक म्हंटला तरी त्यांची काही पुस्तकचं लोकप्रिय होतात.. त्यातही एखादी लेखांची पुस्तकांची मालिका लिहिली की त्यातील एखादे पात्र अजरामर होणार.

पण मग असा एखादा अवलिया, ज्याच्या एका पुस्तकात त्याने वीसेक पात्र तरी खुबीनं रंगवलीयेत आणि ती सगळी लोकप्रिय झालीयेत. आणि हे असं एखादच पुस्तक नाही तर कितीतरी पुस्तकं, नाटकं, कलाकृती.. आणि त्या प्रत्येक कलाकृतीतली अनेक पात्र, व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यात नव्हे तर अजरामर झाल्यात. इतक्या की नंतरच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीलाही एखादा शब्द किंवा वाक्य त्यांच्या कुठल्या पुस्तकातील कुठल्या पात्राच्या तोंडी होत हे अगदी तत्परतेनं सांगता येतं. बरं ती पात्र किंवा व्यक्ती रेखाही काही शूरवीर राजे महाराजे, किंवा अमानवी शक्ती असलेले जादूगार किंवा देवदूत नाहीत तर अगदीच सामान्य किंवा अतिसामान्य माणसं… परिस्थितीचे तडाखे सोसलेली, जनरीतीच्या रहाट-गाडग्यात फिरणारी तुमच्या आमच्यासारखीच सुख दुःख असलेली.. किंबहुना
कदाचित ती तशी होती म्हणूनच ती इतकी लोकप्रिय झाली असावीत का?

आपल्या भोवती चालणाऱ्या कोलाहलातून, गराड्यातून, माणसांच्या जत्रेतून छोटे छोटे बारकावे, त्यांच्यातील नातेसंबंध, देवाण-घेवाण टिपणारे, त्यांच्या लकबी, लय, ढब, शब्दफेक, चढउतार हेरणारे ते ठसठशीत काळ्या जाड्या फ्रेममागचे ते मिश्किल डोळे. वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपासून पुलंना ऐकायला, वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते वेगवेगळे कळत गेले, उमजत गेले. अर्थात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते ते उमजणं, आवडणं वेगळं होतं. शालेय किंवा महाविद्यालयीन दिवसांत त्यातला विनोद, कोपरखळ्या, गोष्टीवेल्हाळता ह्यांनी वेड लावलं.
पुढे नोकरी, संसार सुरु झाल्यावर त्यातील व्याप, ताणतणाव विसरायला लावून काही क्षण हसायला लावणारा तो एक हलकासा विरंगुळा झाला. चाळीशीच्या आसपास अजून आयुष्य, माणसे बघितल्यावर, त्यांचे अनुभव घेतल्यावर त्या विनोदामागचे कारुण्य, टोकदारता, विसंगती जाणवू लागली आणि तीच विसंगती, विक्षिप्त माणसे किंवा त्यांचे स्वभाव, परिस्थिती मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात आल्यावर बसणारी तिची झळ जराशी सुसह्य होत गेली.
वाचता वाचता कधीतरी छोटे मोठे अनुभव, मनोगत लिहायला लागल्यावर मग मात्र पुलं च श्रेष्ठत्व, वेगळेपण अजूनच भावत गेलं. कारण त्यांची एक एक कलाकृती, आणि त्यात चपखल बसणारी ती पात्रं.

आता हेच बघा ना..
असामी असामी मधे फक्त ४०-५० च्या दशकातला कारकुनी करणारे धोंडोपंत जोशीच रंगवले नाही तर त्यांचं पूर्ण कुटुंब, कॉलनीतील, चाळीतील माणसे, कचेरीतील सहकारी, त्यावेळची मुंबई, आणि अर्थात सरोज खरे .. आपली .. सगळं सगळं चित्र शब्दसामर्थ्यावर उभं केलय. तीन मजली बटाट्याची चाळ त्यातील अनेक बिऱ्हाडकरुंसकट इतकी सुंदर रंगवलीये की चाळसंस्कृती कधीही न अनुभवलेला, पाहिलेला वाचक/ श्रोताही त्यात रंगून जातो.
व्यक्ती आणि वल्ली म्हणजे तर एक खजिनाच आहे. नावाप्रमाणेच अनेक वल्ली तुम्हाला भेटतात अगदी कडकडून.
त्यात उच्चभ्रू नंदा प्रधान, साठाव्या दशकात मराठी कुटुंबियांच्या घरात सर्रास आढळणारा नारायण, गुलछबू नाथा कामत, बेरकी नामु परीट, अभ्यासातील किडा सखाराम गटणे, भोळसट गज खोत, परोपकारी गंपू, इरसाल पण तरीही हतबल असा अंतू बर्वा, उच्चमध्यमवर्गीय सरळमार्गी गुळगुळीत ते चौकोनी कुटुंब, नगण्य तरीही विक्षिप्त असा मिडिऑकर लखू रिसबूड, मिश्किल खट्याळ पेस्तनकाका - काकी, स्वतः मुखवटा घालून दुनियादारी करणारा आणि अंतर्मुख व्हायला लावणारा ‘तो’.

सुंदर मी होणार मधील दीदीराजे, बेबी राजे किंवा तुज आहे तुजपाशी मधील जिंदादिल काकाजी, कठोर आचार्य किंवा ती फुलराणी मधील फुलराणी, प्राध्यापक किंवा रविवार सकाळ मधील एकेक हरहुन्नरी चाळकरी, मालू, तिच्या उच्चभ्रू मैत्रिणी किंवा वार्यावरची मधील गावातला महाबेरकी साक्षीदार, टुरिंग टॉकिज दाखवणारे गावकरी, स्वागत समारंभातील मान्यवर .. केव्हढा मोठा तो स्पेक्ट्रम! जिथे एका लेखकाला एक पात्र तयार करून ते लोकांच्या मनावर ठसवायला फक्त एक पुस्तक नाही तर पुस्तक मालिका कराव्या लागतात.

तिकडे एका नाटकात, पुस्तकात असणारी अनेक पात्रे त्यांच्या संवादासह प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनावर राज्य करतात आणि पुस्तक/ नाटक संपल्यावरही हलकेच मनात त्यांची सोबत करत राहतात.. अगदी काही दशकांपूर्वीच्या काळातील त्या व्यक्ती अगदी ह्या काळातही त्यांना भेटत राहतात.. खरंच अगदी अद्भुत वाटतं सारं! म्हणूनच ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना ‘अ फ्लाय ऑन द वॉल’ अगदी तसच त्या चष्म्यात बसून त्यांना काय काय आणि कस कसं दिसतं ते बघत राहावं .. अगदी तासनतास .. दिवसेंदिवस .. वर्षानुवर्षे पण म्हणजे आत्ता नाही हं कित्येक दशकं मागे जाऊन अगदी पार ६०च्या दशकापासून!
- प्रेरणा कुलकर्णी

Monday, June 10, 2024

मांजर

हल्ली मांजरे उंदीर पकडीत नाहीत हे मी स्वानुभवावरून सांगतो. आमच्या घरी उंदीर झाले. गेल्या युद्धात रूझवेल्ट, चर्चिल आणि स्टालिन कुठेसे भेटले होते, त्याच सुमाराची गोष्ट आहे. घरात सर्वत्र उंदीर झाले होते. उंदराच्या गोळ्या खाऊनही ते जिवंत राहत. रात्रंदिवस खुडखूड चाले. सापळे झाले. पिंजरे झाले. ओली पिंपे आणली. आता पिंपे ओली करायची, की उंदीर ओले करून त्यांत टाकायचे, ह्यावर घरात मतभेद होता. शेवटी नाइलाजाने मांजरी आणली.

प्राणिपालनाविषयी आमच्या खानदानात कुणालाच फारशी आस्था नाही. षौकाने काहीतरी ठेवून असावे असे कुणाला कधी वाटले असल्याचा कुठेच पुरावा नाही. प्रस्तुत मांजरी ही केवळ विशिष्ट कामगिरीवर ठेवण्यात आली. परंतु ह्या मांजरीने घरातल्या दुधाशिवाय आपण होऊन दुसऱ्या कशालाही तोंड लावले नाही. घरात रिकामी घाट असती, तर आमच्या उंदरांनी एखाद्या बोक्याच्या अध्यक्षतेखाली तिच्या गळ्यात समारंभपूर्वक बांधली असती याची मला खात्री आहे. फार काय, समोरून दोनतीन उंदीर चाल करून आले, तर हीच पांघरुणात लपायची. हे म्हणजे नौसेनादलाच्या एखाद्या रिअर अॅडमिरलला मालवणच्या बंदरातला पडाव लागून उलट्या होण्यापैकी आहे. पण आमच्या नशिची आलेली मांजरी तशीच होती. आणि पडाव लागण्याचा प्रकार भारतीय नौसेनादलात अगदीच अशक्य आहे, असेही मानण्याचे कारण नाही. एके दिवशी मांजरीकडून कसलीच झटापट होत नाही हे पाहून ते उंदीर आल्या वाटेने हताश होऊन निघून गेले. पण मांजरी राहिली. तिला कुणीही कधीही जवळ केली नाही.

शेवटी घरात दुर्लक्षिलेल्या, वयात आलेल्या मुली जे करतात तेच तिने केले. गल्लीतल्या एका मवाली बोक्याशी सूत जमवले. तिचा सारा दिवस आरशासमोर राहून अंग चाट, मिश्या साफ कर, शेपूटच फेंदारून पाहा, असल्या गोष्टींत जाऊ लागला. पुढे-पुढे तो निर्लज्ज बोका फारच बोकाळू लागला. रात्री खिडकीखाली येऊन आर्त स्वरात हाका मारीत असे. आमची खिडकी आणि समोरच्यांची ओसरी ह्यांतून द्वंद्वगीते चालत. बाकी बोका आणि मांजरी ह्यांचा प्रेमसंवाद हा जवळजवळ माणसाच्या बोलीत चालतो. मला तर बोक्याच्या स्वरातून "माझ्या मनिचें हितगुज सारें ऽऽ” अशासारखे शब्दही ऐकू येत. त्या वेळच्या मन्या फारशा गात नसत. मधूनच "म्यां यावें कसें-रे-बोक्या सख्या" म्हटल्यासारखे वाटे. हल्ली मनीच "माझा होइल का ? बोका" अशी आपण होऊन प्रस्तावना करते म्हणतात. ती काय बिचारी मुकी जनावरे. भोवताली पाहतात, त्यातून घेतात एकेक. असो. पुढे बोक्याची म्याँवगीते बंद झाली, आणि आमच्या मनीची कूस धन्य झाली. तेव्हापासून प्रत्येकाच्या पांघरुणात एक ह्या दराने मांजरे वाढली.पंक्तीला प्रत्येक जण डाव्या हातात छडी घेऊन बसायला लागला. एका हाताने छडी आपटीत आणि बंड्याच्या कृपेने फुललेल्या मनीच्या वंशाची पांगापांग करीत जेवणे उरकावी लागत. गोणत्यातून सोडा, बसमध्ये विसरून या, विरार लोकलमध्ये टाका - पुन्हा आपले जैसे थे ! इकडे बंड्याही ऐकेना. शेवटी मांजरे घर सोडीनात, म्हणून आम्ही सोडले. आणि ही जात अशी कृतघ्न, की इतक्या वर्षाच्या खाल्लया अन्नाला स्मरून त्यांतले एकही मांजर आम्हांला दाराशीदेखील पोहोचवायला आले नाही. उलट, सोवळ्यातल्या लोणच्या-पापडाच्या बरण्या वगैरे बिऱ्हाड-बदलीतला शेवटला किंमती ऐवज घेऊन व्हिक्टोरियात बसलो, त्या वेळी कौलावर आमची मनी शेजारच्या बंड्या बोक्याचे लाडात येऊन अंग प्वाटीत होती. मांजर माणसाला नाही, घराला धार्जिणी, म्हणतात ते खोटे नाही. असल्या दगडा-विटांत गुंतणाऱ्या प्राण्याला माणसे का पाळतात, देव जाणे.

पाळीव प्राणी (पु. ल. देशपांडे)
पुस्तक - हसवणूक
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.
https://amzn.to/3UfqOxi

Tuesday, June 4, 2024

रक्तदान हे राष्ट्रकार्य

इंग्लंडसारख्या देशात रक्तदान हा हिंदूंच्या सोळा संस्कारांसारखा संस्कार मानला जातो. तिथे रक्त विकणे ही कल्पनाच मानली जात नाही. आपल्या आध्यात्मिक देशात मात्र रक्त विकत देणारे लोक आहेत. रक्त विकून त्यांना पोटाची खळगी भरावी लागते. नित्य नेमाने रक्त विकणारी माणसे ह्या देशात आहेत. ह्या मुंबई शहरातल्या सार्वजनिक रुग्णालयात वर्षाला सुमारे एक लाख बाटल्या रक्ताची गरज असते. रक्त देणाऱ्यांना दहा बारा रुपये दरवेळी द्यावे लागतात. क्वचित प्रसंगी ही माणसे पन्नास रुपये बाटलीपर्यंत दर वाढवतात. दर आठवड्याला स्वतःचे रक्त विकून उपजिविका करणारी माणसे ह्या मुंबई शहरात आहेत. इतकेच नव्हे, तर ह्या धंदेवाईक रक्तविक्यांची आता युनियन झाली आहे. दरिद्री आणि गुंड लोकांचा ह्यात फार मोठा भरणा आहे. पैसे वाढवून द्या अशा त्यांच्या मागण्या आहेत.

दारिद्र्य, लाचारी, पाजीपणा, असहायता, अमानुषता, अनेक घृणास्पद आणि केविलवाण्या घटनांनी कुजून, नासून गेलेला आपला समाज ! वर तोंड करून पुन्हा आम्ही जगाला अध्यात्म शिकवायला जातो. पाकिस्तानने हल्ला केला त्या काळात मात्र लोकांनी फार मोठा उत्साह दाखवला. आमचे राष्ट्रप्रेमदेखील असे नैमित्तिक उफाळणारे आहे. विशेषतः युद्धाच्या वेळी ! त्या काळात जवानांसाठी रक्तदान करणे हे राष्ट्रकार्य होते, पण युद्ध आटपले आणि आमचे रक्तही थंड झाले.

आमचे रक्त आधीच गोठलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक, गांधी किंवा सावरकर, भगतसिंग असल्या लोकांनी ते उगीचच तापवले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते पुन्हा गोठत गेले. दैन्य, दारिद्र्य आणि मानसिक अधःपतन नित्य पाहण्याइतके आपले रक्त थंड झाले आहे. आमची सामाजिक नीतिमत्ता तर फारच वरच्या दर्जाची. एका हॉस्पिटलमधल्या रक्त साठवण्याच्या थंड खोलीत हॉस्पिटलचे प्रमुख आपली भाजी, फळे वगैरे ठेवतात. थंड पाणी पिण्याच्या बाटल्या ठेवतात. त्या काढायला आणि ठेवायला शंभरवेळा ती खोली उघडतात. त्या खोलीचे तापमान बिघडते आणि मोलाने जमवलेले रक्त फुकट जाते. गुन्ह्याचे मूळ हे आर्थिक दारिद्र्य नसून मनोदारिद्र्य आहे. गरिबांनी शेण खाल्ले, तर भुकेपोटी खाल्ले म्हणता येते, पण श्रीमंत खातात त्याची कारणे कुठे शोधायची?

पु. ल. देशपांडे
नवे नाते रक्ताचे - भावगंध ह्या लेखातून 

Wednesday, May 29, 2024

मोत्या शीक रे अ आ ई

शिक्षण आणि शिक्षक या विषयावर असंख्य चर्चा, परिषदा आणि परिसंवाद, लेख, भाषणे चालूच असतात. पुष्कळदा वाटते, की या भानगडीत वेळ घालवण्याऐवजी आसपासची चार पोरे जमवून त्यांना चार अक्षरे शिकवण्यासाठी जर ही तज्ज्ञ मंडळी धडपडतील तर हा वेळ सत्कारणी लागेल. आणि म्हणूनच शिक्षण यासंबंधी कोणी काही बोलायला लागले, की मला माझ्या लहानपणी पाठ केलेल्या 'मोत्या शीक रे अ आ ई'ची आठवण होते. आपल्या मोत्याला अ आ ई शिकवायला निघालेली ती पोर अधिक प्रामाणिक होती. फक्त हा शिक्षणाचा व्यवहार एकतर्फी होता. इथे शिक्षक शिकवायला आतुर होता; शिष्य मात्र नव्हता. आपल्याही प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा प्रकार बराचसा असाच आहे. कुठे शिकवायला उत्सुक असणारे शिक्षक आणि सर्वस्वी अनुत्सुक विद्यार्थी, कुठे शिक्षकही अनुत्सुक आणि विद्यार्थीही अनुत्सुक, कुठे विद्यार्थी उत्सुक, शिक्षक अनुत्सुक ! बहुतेक ठिकाणी शिकवायची इच्छा नसणारे शिक्षक आणि शिकायची इच्छा नसणारे विद्यार्थी अशीच गाठ मारलेली असते. पहिलीपासून ते अकरावी-बारावीपर्यंत आणि पुढेही ह्या गाठी कशाबशा सोडवत जायच्या आणि एकदाचे मोकळे व्हायचे.

शिक्षकाकडे शिकायला मुले पाठवतानादेखील केवळ इतके रुपये देऊन मुलाला इतके तास शिकवण्याच्या आर्थिक कराराचे या व्यवहाराला स्वरूप नसते; कारण इथे मुलांना शिकवून तयार करणे हे निर्जीव वस्तू तयार करण्यासारखे काम नव्हे. तसले काम हा एक वेळ शुद्ध आर्थिक व्यवहार असू शकेल. पण अशा निर्जीव वस्तू बनवणारा माणूसही कित्येकदा त्यात आपला जीव ओततो. 
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे: कोल्हापूरला मी चप्पल विकत घ्यायला गेलो होतो. लहानसे दुकान होते. मी चप्पल पायात घातली आणि सहज चांभारदादांना म्हणालो, "अंगठा पक्का आहे ना? चपलेच्या अंगठ्याला भलत्या वेळी तुटायची हौस असते." चांभारदादा म्हणाले, "साहेब, तसल्या वांड सोभावाची वाण पायताणं आपल्या हातून नाही घडायची." मला त्यांचे ते 'वांड सोभावाचे पायताण' ही कल्पना फार मजेदार वाटली. मला त्याच्या त्या बोलण्याची मजा वाटलेली पाहून चांभारदादांचीही कळी खुलली, आणि चार इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगताना त्यांनी आपल्या धंद्यातली गुरुकिल्ली मला सांगितली, "हे बघा साहेब, नवी चेपली नव्या बायकूसारखी. नवराबायकू संसारात रुळेपोत्तूर चार दिवस लागत्यात. एकदा का रुळली दोघंजणं-मग? नवरा न् बायकू येकजीव. तसंच पावलाचं आणि चपलीचं असतं. चप्पल चांगली कंची? जी पायात असतानी असल्याचं भान नसावं, आन् नसली का म्हंजी पाऊल टाकताना अवघड वाटावं."

माझ्या पायांत इतक्या मायेने त्यापूर्वी कुणी चप्पल सरकवली नव्हती. जीवनात स्वीकारलेल्या कामात असा जिव्हाळा येणे हेच महत्त्वाचे. दुर्दैवाने शिक्षकाच्या कामात असा जिव्हाळा यावा याची समाजालाच आच लागलेली मला दिसत नाही. याचे मुख्य कारण शिक्षकाचे हात निर्मितीत गुंतलेले आहेत याची जाणीव कमी झाली आहे. राजकारणात आपण अमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा, तमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा हे सतत ऐकतो, पण शिक्षकाचे हात बळकट करा असे म्हणणे आपल्याला सुचत नाही. केवळ आर्थिक दृष्टीने नव्हे तर इतर अनेक दृष्टींनी शिक्षकाचे जीवन हे त्याच्या शिक्षणकार्यात त्याला आनंद वाटावा अशा प्रकारचे कसे होईल याची समाजच चिंता करत नाही, आणि उगीचच शिक्षकांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा मात्र करत राहतो. 

(अपूर्ण)
एक शून्य मी
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक घरपोच मागवा.

Wednesday, May 22, 2024

कानिटकरांनी लिहिलेल्या पत्राला पुलंचे उत्तर..

पुलंचा सत्कार करावा म्हणून कानिटकरांनी पत्र लिहिलं त्याला उत्तर देताना (दिनांक ९.४.७७) पु.ल. म्हणतात..

तुमचे पत्र मिळाले तुमच्या आणि आनंदच्या सदभावना मी समजू शकत नाही असे नाही. परंतु तुम्ही योजित असलेल्या सत्काराला मान्यता द्यायला माझ्या मनाला प्रशस्त वाटत नाही.

हाती आलेल्या पैशांचा समाजिक सत्कार्यासाठी उपयोग करावा या भावनेनेच मी व सुनीताने आवश्यकतेहून अधिक पैसे न खर्च करता संसार केला. फार मोठे त्यागपूर्ण जीवन जगलो असे नाही. परंतु चैनीच्या बाबी मर्यादित ठेवल्या. विशेषतः सुनीताने घरात नोकरचाकर, स्वैपाकी वगैरे न ठेवता सारी कामे, एखाद्या मध्यम उत्पन्नात संसार करणाऱ्या गृहिणीसारखी स्वतःच केली. ही सारी काटकसर आणि व्यवहाराबाबतची दक्षता आपल्या मिळकतीचा लाभ सामाजिक कार्याला मिळावा ह्या हेतुनेच पाळलेली होती. सुदैवाने आम्हा दोघांनाही भपकेबाज राहणीची हौस नाही. त्यामुळे हे सारे जमले. ह्याबद्दल सत्कार किंवा गौरव याची खरोखरच अपेक्षा ठेवली नाही. तेंव्हा आजवर जे टाळत आलो ते तसेच चालू ठेवावे असे वाटते.

तुम्ही आणि आनंद यादव भेटलात तर आनंदच वाटेल. आधी फोन करून कळवा म्हणजे निवांतपणे गप्पागोष्टी करता येतील.

तुमचा
पु. ल. देशपांडे


Monday, May 20, 2024

मी एक असामी

माझ्यासाठी कुणीही कोकिळा कधी गायली नाही. मुगभाटात आंब्याच्या मोसमात कोकिळा न येता 'पायरे हाप्पोस' येतो. वसंत, हेमंत वगैरे ऋतू मुंबईच्या वाटेला जात नाहीत. मुंबईला दोनच ऋतू - उन्हाळा आणि पात्रसाळा. एक पावसाच्या धारा, नाहीतर घामाच्या धारा. मोर नाचताना मी कधी पाहिले नाहीत. चांदण्याला शोभा असते ही ऐकीव माहिती. जाई-जुई चमेलीला बहर आलेला मी वेणी- वाल्याच्या टोपलीत पाहिलाय फक्त. आकाशात मेघांची दाटी झाली की मला 'नभ मेघांनी आक्रमिलें' वगैरे गाणी न सुचता छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे हे आठवतं. सागराच्या अफाट विस्ताराचं मला यत्किंचितही कौतुक नाही. कारण मला बोट लागते आणि कोकणात जाताना सागराचा विस्तार एवढा मोठा करायची ह्या विधात्याला काही गरज होतीच का हा प्रश्न विचारीत मी डोकं धरून आलं-लिंबू चोखीत रत्नागिरी बंदराची वाट पाहत असतो.

साहित्य-संगीत-कला-विहीन माणूस म्हणजे बिनशेपटीचा बैल असं मला नानू सरंजामे एकदा म्हणाला होता. पण ह्या नानूनंच सांगितलेल्या साहित्यिकांच्या लाथा- ळ्यांच्या कथा मी ऐकल्या आहेत. मानकामेशेटनी गवई लोक एकमेकांवर कशी शिंगं खुपसून धावतात तेही सांगितलंय ! साहित्य, संगीत वगैरेची शेपटं लावून अशी शिंगं खुपसणारे बैल होण्यापेक्षा बेनसन जानसन कंपनीत एक तारखेला पडेल ते हातावर घेऊन मान मोडून खर्डेघाशी करणारा बिनशेपटीचा, त्रिनशिंगांचा, साधा, सरळ ओझ्याचा बैल होणंच बरं असं मला वाटायला लागलंय !

कसा मी कसा मी हे माझं मला नीटसं कळत नाही. पण ह्या जगात येताना जसा गपचूप आलो, तसा जातानादेखील आपल्या हातून त्या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे. आणि म्हणूनच असल्या ह्या माणसाचं नाव रवींद्रनाथ, सुभाषचंद्र, वगैरे नसून धोंडो भिकाजी जोशी कडमडेकर असं असलं म्हणून बिघडलं काय ? उलट बरंच आहे. उगीच आडनाव भोसले लावायचं आणि चालवायची पिठाची गिरणी, यात काय अर्थ आहे ?

बाकी चारचौघांपुढे आपण साधे सरळ ओझ्याचे बैल आहोंत हे कबूल केलं म्हणजे कसं मोकळं मोकळं वाटतं. 

पु. ल. देशपांडे 
असा मी असामी 
संपूर्ण पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.

Tuesday, May 7, 2024

नेपोलियन कुत्रा

माझ्या परिचयाच्या एका गृहस्थांचा कुत्रा फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो,असा त्यांचा दावा आहे. सिनेमातली गाणी सुरु झाली, की रेडियोवर "जंप घेऊन ऐक्चुली भुंकायला लगतो."! त्याच्या मालकीणबाईचेदेखील "आय सिंप्लि हेट फिल्म म्यूज़िक" असे आहे. कुठल्याशा दिगंबरबुवा पुढे आठवड्यातले तीन दिवस बसून त्या केदार, हमीर वगैरे मातब्बर मंडळींची आकंठ अब्रू काढीत असतात. समाजकल्याण ,बैडमिंटन, रमी, स्लिमींग, सिनेमे, आमचा शनिवार, गायन, बॉलरुम डान्सक्लास आणि ज्ञानेश्वरी एवढे सगळे एका आठवड्यात कोंबणाऱ्या ह्या शिष्या आणि ते दिगंबरबुवा यांचा केदार-हमीरांचा त्रिसाप्ताहिक आक्रोश ऐकुनही त्यांच्या नेपोलियनला (कुत्र्याचे नाव) आयुष्यात कशावरही भुंकण्याची वासना तरी कशी राहते, त्याचे तोच जाणे. मी जर कुत्रा असतो तर त्या घरात मुके जनावर हेच नाव सार्थ करीत राहिलो असतो.

बाकी ते नेपोलियन देखील नुसते भुंकतच असते. दुसरे एखादे स्वाभिमानी कुत्रे असते, तर त्याने गुरूशिष्या पैकी एकाच्या तरी नरड़ीचा घोट घेतला असता. हे फक्त भुंकते. एकदा मात्र आशाळभूतपणाने हा नेपोलियन आपल्या खिडकीतून समोरच्या मल्होत्रांच्या खिडकितल्या 'प्रिन्सेस'कडे डोळ्यांत केवळ कुत्रीच आणू शकतील इतके कारुण्य आणुन बघत बसलेला मी पाहिला होता. काही वेळाने त्याच्या डोळ्यात ते अवघ्या अभाग्याचे अश्रू इतके दाटले, आणि त्याच्या जिभेची लांबी इतकी वाढली, की हा आता लवकरच "चौधवी का चाँद...." म्हणायला सुरवात करतो की काय असे मला वाटले. पण तो शास्त्रोक्त संगीतवाला कुत्रा असल्यामूळे जोगिया रागात "पियाको मिलन की आऽऽसा" म्हणाला असता. मी गेल्यावर म्हणालाही असेल. हिंदी सिनेमातले नायक गायक झाले, की त्यांचा मिनिट्भर आधी नेमका अस्सा चेहरा होतो. हा नेपोलियन म्हणे लेबले पाहून रेकॉर्ड ओळखतो.

"नेपोलियऽऽन बडे गुलामअली आण!"

म्हंटल्यावर टेबलावरच्या दोन तीन रेकॉर्डसमधून शिंच्याने नेमका गुलामअली दातात धरुन आणलाही होता. पण बाई आत गेलेल्या पाहून हळूच मी टेबलावरच्या उरलेल्या रेकॉर्डस पाहिल्या, त्याही गुलामअलीच्याच होत्या. ही जादू करुन दाखवण्यात त्यांनी मला फसवले, स्वत:ला फसवले की नेपोलियनला ते मला अध्यापही कळलं नाही. त्या नंतर नेपोलियन दिगंबरबुवाच्या तराण्याची हुबेहुब नक्कल करतो हे ऐकुन मला यत्किंचितही आश्चर्य वाटलं नाही. कारण दिगंबरबुवा आजपर्यंत, कित्येकवर्ष भुंकण्याचीच नक्कल करुन त्याला तराणा म्हणत आले आहेत.

कुत्र्यांसारखी वागणारी कुत्री ही मला माणसांहूनही आवडतात. कारण माणसांसारखी वागणारी माणसे भेटायला आयुष्य खर्ची पडते. समोरून गेलेल्या कुत्रीकडे पाहण्यासाठी मान न वळविता जाणारी कुत्रीं भलतीच शिष्ट वाटतात. नाकासमोर जाणारे कुत्रे हे तर कुत्रेच नव्हे. कुत्र्याने मागे राहत, पुढे पळत, बाजूच्या गटाराकडे हुंगत, वाटेतल्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालीतच चालले पाहिजे. रात्रीच्या वेळी मुन्सिपाल्टीच्या दिव्याच्या प्रकाशात चारपाच कुत्रे एखाद्याच प्रेयसीभोवती रिंगण धरतात, ते कसे प्रामाणिक वाटते. कुत्र्यांनी श्वधर्म सोडायचे कारणच काय? पण हा धर्म त्यांना माणसे सोडायला लावतात. त्यांना साबण लावून आंघोळी काय घालतात, पावडरी काय लावतात, ब्रशाने त्यांचे दात साफ काय करतात ! काही उत्साही मालकिणी त्यांना लिपस्टिक लावून त्यांच्या डोळ्यांत सुरमा घालतात, असे मी ऐकले आहे.

कुत्री ज्या वातावरणात वाढतात त्याच्याशी एकरूप होतात. मांजरासारखी अलिप्त राहत नाहीत. शिवाजीमहाराजांच्या कुत्र्याने मालकाच्या चितेत उडी टाकली याप्चे एकमेव कारण तो काळच मुळी आत्मसमर्पण, निष्ठा ह्यांसारख्या बुरसटलेल्या इतिहासजमा गुणांचा होता. आजच्या काळातल्या कुत्र्याने त्या नेत्याची सद्दी संपलेली पाहून नवा घरोबा केला असता. बिचाऱ्या कुत्र्याला 'नेपोलियन' म्हणा, 'म्याकमिलन' म्हणा, की आणखी काही म्हणा, त्याचे सुखस्वप्न एकच. सभोवती हाडकांची रास आहे... आपण स्वस्थपणाने त्यांतलेच एखादे चघळतो आहो... समोरच्या गल्लीतून शेपूट उडवीत एक अंगा- पिंडाने भरलेली कुत्री येते आहे... मोसम सोहाना आहे... गल्लीतली इतर सर्व कुत्री मुन्सिपाल्टीवाल्यांनी गोणत्यात पकडून नेली आहेत... गल्लीत आता फक्त ती आणि मी... इतर कुणाचे भुंकणे नाही... गुरगुरणे नाही... काही नाही... काही नाही... असल्या सुखस्वप्नातच त्याला रंगू दिले पाहिजे.

- पाळीव प्राणी
हसवणूक
पु. ल. देशपांडे

सैनिकांचा जयजयकार

गेल्या वर्षी मुंबईच्या कुलाबा भागातील एका बराकी पुढून जाताना मी एक दृश्य पाहिले होते. तिथे राहणारी एक तुकडी, मला वाटते, आघाडीवर चालली होती. ट्रंका रस्त्यावर आल्या होत्या. मोठमोठे लष्करी ट्रक उभे होते. त्या सैनिकांची बायका - पोरे - कुणी खिडकीतून, कुणी फाटका जवळून - मुक्या डोळ्यांनी ते दृश्य पाहत होती. मला वाटले, पुढे जावे आणि त्या सैनिकांचा 'जयजयकार' करावा. पण माझ्याही मनाला ती सवय नव्हती.

गेल्या कित्येक वर्षांत आम्ही मुळी सैनिकांचा जयजयकारच केलेला नाही. सवय मोडली आमची! पूर्वी युद्धाला जायला निघालेल्या सैनिकांना गावच्या साऱ्या सुवासिनी पंचारती ओवाळत. पौरजन पुष्पवृष्टी करत. वृध्द आशिर्वादासाठी थरथरते हात उंचावत. आपल्या देशात पौरूषाचा हा असा भरगोस सत्कार व्हायचा. इंग्लंडमध्ये गेल्या युद्धातही लहान लहान खेड्यांतून ज्या वेळी तरुण सैनिक निघाले, त्या वेळी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली होती. तरुणी बेभान होऊन चुंबनांचा वर्षाव करत. गावातला बँड दिवसभर वाजे.

आमचा जवान गाठोडे पाठीला बांधून एकाकी चालताना पाहिला, की माझी मलाच कीव येते. अजूनही तो आमचा ' हिरो ' झाला नाही. क्षात्रधर्माला इथे अवकळाच आली होती. चीन्यानी बरी आठवण करून दिली. आम्ही साहित्यकार तरी काय करीत होतो म्हणा!

- शुरां मी वंदिले 
(एक शून्य मी)
पु.ल. देशपांडे

Friday, April 26, 2024

अभिनय साधना

सोलापूर येथील अभिनय साधना मंदिरातर्फे आयोजित पार्श्वनाथ आळतेकर स्मृतिदिनानिमित्त नोव्हेंबर १९६४ मध्ये पु.ल. देशपांडे यांनी केलेले भाषण.

रसिकहो,

अभिनयसाधना मंदिराने महाराष्ट्रातील एक निष्ठावंत नट पार्श्वनाथ आळतेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण करायला मला येथे बोलावून आळतेकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याची संधी दिली याबद्दल मी मंदिराच्या कार्यकारी मंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. आळतेकरांचा आणि माझा अतिशय निकटचा परिचय होता. मराठी रंगभूमीवर मी ज्या काळात नाट्यकलेचे प्राथमिक धडे घेत होतो, त्या काळात मराठी रंगभूमीवर काही नवीन सुधारणा घडवून आणावी म्हणून जी मंडळी धडपडत होती अक्षरशः तनमन आणि धन – स्वतः चे – खर्च करीत होती त्यांत आळतेकरांचं स्थान हे अतिशय मोठं होतं. त्या माणसाच्या रंगभूमीविषयक निष्ठा अलौकिक होत्या. व्यावहारिक अर्थाने हा एक वेडा माणूस होता. नाटक हे त्यांचं वेड होतं. वास्तविक ते स्वतः उत्तम नट होते मोठ्या तोलाचे दिग्दर्शक होते त्यांना – मानमान्यता होती, चित्रपटांतून अमाप पैसा मिळवण्याची संधी होती. परंतु हे सर्व बाजूला सारुन त्यांनी आजन्म नाट्यकलेच्या विद्यार्थ्याची भूमिका पत्करली. आध्यात्मिक भाषा वापरायची तर नाट्यसाधना करणारे ते एक साधक होते. साधकाचा मार्ग हा नेहमीच कष्टाचा असतो. अल्पसंतोषाचे आणि साधनेचे जमत नाही. उपासना ही नेहमी दृढ चालवावी लागते. स्वतःचे आयुष्य ही एक प्रयोगशाळा करावी लागते. ह्या नाट्यकलेच्या संशोधकाने हे व्रत आजन्म पाळले. तुच्छता-निंदा पराजय- उपहास ही दूषण भूषणासारखी अंगाखांद्यावर वागवली. असल्या ह्या थोर मनाच्या कलासाधकाच्या स्मृतीला अत्यंत नम्र अभिवादन करुन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो –

माझ्या भाषणाचा विषय “अभिनयसाधना” असा आहे. डॉ. दिवाडकरांनी मला विषय विचारला आणि मी ‘अभिनयसाधना’ हा विषय सांगितला. पण ज्या क्षणी सांगितला त्या क्षणापासून आतापर्यंत मी विलक्षण अस्वस्थ झालो आहे. जेव्हा मी त्यांना म्हणलं की मी ‘अभिनयसाधना’ ह्या विषयासंबंधी बोलेन, त्यावेळी मी काय भयंकर आपत्ती स्वतःवर ओढवून घेतली आहे याची मला कल्पना नव्हती. अभिनय कसा करावा हे शिकवणं – अभिनय करण्यापेक्षा सहस्रपट कठीण आहे याची मला कल्पना नव्हती. यापूर्वी कधीही मी हे गुह्यतम शास्त्र समजावून सांगण्याचा आव आणला नव्हता. एका गाफील क्षणाला कबूल करुन गेलो आणि आता जंगलात वाट चुकलेल्या मुशाफिरासारखा त्यातून हिंडतो आहे. आजही आपणापुढे तसाच हिंडणार आहे. नाट्यकलेच्या ह्या जंगलात निरनिराळी कातडी पांघरुन मी गेली वीस-पंचवीस वर्षं हिंडतो आहे. त्यामुळे त्यातली चार ओळखीची स्थळ मी आपल्याला दाखवीन यापरते जास्त काही माझ्या हातून होईल असे मला वाटत नाही. हा सगळा कलेचा मामलाच मुळी शोध घेण्याचा आहे.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामबुवांनी आध्यात्मिक अर्थानं म्हटलं. कलात्मक जीवनातदेखील असंख्य आघाड्यांवर हे युद्ध चालू आहे. इथे स्वस्थतेला वाव नाही. त्यातून एखादा गुरु फारतर बोटाला धरुन ह्या जंगलातल्या दोन-चार वाटा दाखविल. पुढला सारा रस्ता आपला आपण शोधून काढायचा आहे. उस्तादजी आपल्या शिष्याला सांगेल, बेटा, हा त्रिताल आहे. ही यमन रागातील ‘येरी आली पियाबिन’ ही चीज आहे. हे ह्या रागाचं स्वरुप आहे. हा त्रितालाचा स्वभाव आहे. ही सम आणि हा काल. थोडी आलापी थोडी तान दाखवेल तिथून पुढे मात्र तो त्रिताल – आणि बोलतान तो यमन – ती येरी आली पियाबिन आणि त्या जाणत्या अजाणत्या श्रोत्यांपुढे बसलेले तुम्ही ! इंग्रजीत एक म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत तुम्ही नेऊ शकता, पण प्यायला लावू शकत नाही. अभिनयकलेचे तेच आहे नव्हे, कुठल्याही कलेचे तेच आहे. माझ्या ड्रॉइंग मास्तरांनी माझ्यापुढे हात टेकले पण मला कधी एक सरळ ओळ काढता आली नाही. पण पेटीवर मात्र बोटं पडली ती प्रेमात पडल्यासारखीच पडली. रंगांच्या पेटीवर प्रेम जमलं नाही- सुरांच्या पेटीवर जमलं ! आता वर्षावर्षात हात लागत नाही तरी रुसली नाही ती माझ्यावर. आमचा संगीत संसार दृष्ट लागण्यासारखा नसेल झाला, पण धरली संगत सुटली नाही !

कुठलीही कला यायला आधी तिच्या प्रेमात पडावं लागत आणि प्रेमात जस पुस्तक वाचून पडता येत नाही क्रमांक सहा, पोटकलम दोन बरहुकूम काही गालावरचे बदलते भाव आणि डोळ्यांतली सूक्ष्म हालचाल होत नाही त्याचप्रमाणे कलेचे प्रेमदेखील जडणे हा माझ्या दृष्टीने तरी योगायोगाचा भाग आहे. माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही – पण माणूस शिकून फारतर वकील किंवा दिवाडकरांची हरकत नसेल तर मी म्हणेन डॉक्टर होईल. पण मुळातच योग असल्याशिवाय तो खरा कलावंत होणार नाही. अर्थात उपजत ह्याचा अर्थ बालपणीच ते देणे घेऊन येईल असेही नाही. कदाचित राजापूरच्या गंगेसारखा तो झरा एकदम प्रकट होईल. पण तो कुठेतरी गुप्त असावाच लागतो. तेव्हा अभिनयसाधना कधी करावी ह्याचा काही गुरुमंत्र मी सांगणार आहे अशी आधी कृपा करुन कल्पना करुन घेऊ नका. कलेवर मुख्य म्हणजे उपजत प्रेम असावे लागते. (आणि मी ‘प्रेम’ हा शब्द प्रेमाच्या सर्वांत उदात्त अर्थाने वापरतो. खऱ्या प्रेमाविषयी बोलताना खाडिलकरांनी म्हटलं आहे की ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनीं!’ असं हे लोभरहित निर्मळ – नितांत प्रेम हवं ! प्रेयसीला भेटायचा संकेत ठरला म्हणजे प्रियकर कसा मोहरुन आलेला असतो तशी नाटकाची तारीख ठरली म्हणजे लग्नाची तिथी ठरल्यासारखे जे तहानभूक विसरु शकतात आपली सामाजिक – प्रतिष्ठा, इतर कामधंदा, उशिरा येण्याबद्दल लग्नाच्या बायकोचं बोलणं कानावर घेत नाहीत, अंगात ताप असताना तालमींना उभे राहतात ज्यांना तालमींना आणण्यासाठी दिवाडकरांसारख्या नाट्यवेड्यांना गाड्या घेऊन जावं लागत नाही आज नाही आलो किंवा आले तर चालणार नाही का असला आचरट प्रश्न जे विचारीत नाहीत त्यांनीच ह्या नाटकाच्या क्षेत्रात यावे. हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे ! तुम्हाला अभिनयाची साधना करायची आहे ना ? मग ती समस्तांची लज्जा त्यजुनि केलेल्या भगवच्चिंतनासारखी करता येणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि ह्या फंदात पडा ! नाट्यकलेवर आपण प्रेम करतो आहो का उगीच एखाद्या उनाड माणसासारखी तिच्याशी लगट करतो आहो हा प्रश्न स्वतः च्या मनाला विचारा आणि मग तोंडाला रंग लावा. नारायणराव बालगंधर्वांचा एकुलता एक मुलगा वारला त्या दिवशीदेखील त्यांनी नाटक बंद ठेवलं नाही. कलावंताला केवळ आपला विचार करुन नाही भागत. ही आमची वैयक्तिक दुःखं कलावंत म्हणून आमची जी सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्या आड येऊन नाही चालणार ! इंग्रजीत म्हण आहे – The show must go on !!

नाटकापासून आपल्याला परावृत्त करावं म्हणून नाही मी हे सांगत. नाट्यकलेची कलावंताकडून मागणी किती मोठी आहे हे कळावं म्हणून सांगतो. प्रियकराला भेटायला जाणारी प्रेयसी जशी रात्र असो की दिवस असो की पर्जन्याची वृष्टी असो, की “भीति तयाची मजला नाही प्रियासी रमवाया जाऊ म्हणणारी उत्कंठित प्रेयसी आणि तिसऱ्या घंटेची उत्सुकतेने वाट पाहणारा नट किंवा नटी सारखीच! हे प्रेम केवळ व्यावसायिक नटालाच हवे नि अव्यावसायिक नटाला असण्याची जरुरी नाही हा भ्रम मात्र खोटा आहे. (प्रत्येक नट हा amateur च असावा लागतो. amateur याचा मूळ अर्थ Lover – प्रेमिक – असा आहे. कला ही त्याची प्रेयसी आहे. व्यावसायिक नटाचा संसार ती उभा करीत असेल ही तिच्यावरची स्वतंत्र जोखीम आहे.

नाट्यकलेविषयीचे अव्यभिचारी प्रेम ही नट होण्याला असलेली पहिली अट आहे. ते प्रेम त्या कलेवर हवे स्वतः वर – नव्हे ! एम्. ए. असूनदेखील नाटकात काम करतात किंवा रेडिओवर गातात ह्या वाक्याला कलेच्या क्षेत्रात काही अर्थ नाही ! ‘त्या दृष्टीने बघा म्हणजे झालं’ ही तडजोड कलेला मान्य नाही. कलेक्टरची बायको आहे किंवा मिनिस्टरचा मुलगा आहे म्हणून त्याच्यासाठी त्रितालाच्या मात्रा सोळाऐवजी सतरा-अठरा चालतील हा हिशोब कलेच्या क्षेत्रात मंजूर नाही. कलेक्टरची बायको असो की कमिशनरची सून असो, तालाला चुकली म्हणजे चुकली ! कलावंत म्हणून तिची किंमत शून्य ! अभिनयाच्या क्षेत्रात तेच आहे. थोडक्यात म्हणजे Stanislavesky ने सांगितल्याप्रमाणे Love the art in yourself and not yourself in art For this leads to success in our work!

(भुमिकेशी तादात्म्य वगैरे फार पुढल्या गोष्टी आहेत. प्रथम नाटक करण्याची जी जबाबदारी आपण अंगावर घेतली आहे त्या जबाबदारीशी आपण एकरुप होणार आहोत की नाही ह्याचा विचार आधी करावा आणि मग नाटकात काम करायला उभे राहावे. कलेवरच्या प्रेमापेक्षा हे स्वतःवरचं प्रेम इतकं जबरदस्त असतं की आपलं सौंदर्य बिघडता कामा नये म्हणून दळायला बसलेली सिंधूदेखील मी चांगली जॉर्जेटची साडी नेसून पोज घेऊन दळताना पाहिली आहे आपल्या संगीतविषयक ज्ञानाच्या चुकीच्या कल्पनांनी गाण्याची टाळी घ्यावी म्हणून गाण्यातली भावना न घेता गळ्याची गिरकी फिरवणारे नट मी पाहिले आहेत. आश्विनशेटजीचं काम करायला उभे राहिलेले एक बुवा रेवतीचा हात हातात घ्यायला बिचकले आणि ‘कर हा करी’ हे गाणं तिच्या बोटाच्या नखांना स्पर्श करुन टुणकन् दूर उभे राहून म्हणाले. स्वतःचं चारित्र्य धुतलेल्या तांदळासारखं आहे हे त्यांना त्यावेळी आठवलं !

नाटकाच्या कलेत हा ताप मोठा आहे. अभिनयकला म्हणजे परकाया प्रवेशाची कला. स्वतःचं कलात्मक व्यक्तिमत्त्व नाटककाराने कागदावर उतरवलेल्या पात्रात विसर्जित करायचं आणि लोकांची त्याबद्दल तंतोतंत खात्री पटवून द्यायची हे त्याचं काम आहे. आणि हे विसर्जन करीत असताना स्वतःची शुद्ध मात्र शाबूत ठेवायची ! भूमिकेशी तन्मय होणे याचा अर्थ तन्मय झालो आहोत असे प्रेक्षकांना भासवणे. हुकमी रडणे – हुकमी हसणे हुकमी चिडणे – हुकमी रुसणे आणि ह्या क्रिया चालू असताना ते हुकूम कसे सुटताहेत याची प्रेक्षकाला लवमात्र शंका न येऊ देणे हे ‘ते’ काम आहे. त्यासाठी आवाजाची किंवा एकूणच शरीराची तयारी लागते. पण त्याहूनही मनाची लागते.]

गवई मनसोक्त गाऊ शकतो. त्याचा तो मालक असतो. लय-रागाची बंधने पाळली की पुढे तो स्वतःचा बादशहा, नट मात्र दिल्या रिंगणातच चालला पाहिजे. इथे दुसऱ्या एका व्यक्तिमत्त्वाशी तल्लीन व्हावे लागते – आणि ते होताना केवळ स्वतः तल्लीन होऊन चालत नाही, जोडीचे इतर कलावंतही तल्लीन हवेत. नाटक हे एक वृंदवादन आहे. एक वाद्य बेसूर झाले तरी सगळा ऑर्केस्टा बिघडला. ही तल्लीनता साऱ्या संचाची आहे. माझी वाक्ये म्हणून झाली की आता मी सुखाने मरतो म्हणणाऱ्या बाजीप्रभु देशपांड्यासारखे त्या देखाव्यातून निवृत्त होऊन चालत नाही. तालमीत आणि प्रयोगात हजारदा ऐकलेली वाक्ये त्याच उत्सुकतेने ऐकावी लागतात. सिंधूचे काम करताना बालगंधर्वांनी गणपतराव बोडसांकडून हजारदा ऐकलं असेल की “सिंधू, आजपासून मी दारू सोडली. – ह्या वाक्यावर त्या सिंधूलाही कालच्या प्रयोगात सांगितलं होतंत मला हे, हे दर्शवणारी एवढीशी सुरकुतीसुद्धा चालणार नाही. रोज नव्या उमाळ्याने – “खरं का, अस झाल असेल तर देवच पावला, अमृतेश्वराला लक्ष वाती लावीन.” ही सारी वाक्ये म्हणावी लागतात. आपला तो अनपेक्षित आनंद प्रेक्षकांकडे त्याच उत्कटतेने पोहोचवावा लागतो. प्रेक्षकांच्या अस्तित्वाची उघड दखल न घेता प्रेक्षकांपर्यंत शब्दांच्या हालचालीच्या नव्हे, पुष्कळदा निश्चलपणाने निःस्तब्धपणाने त्या भावना कलात्मक रीतीने संक्रांत करण्याची क्रिया म्हणजे अभिनय । एरवी आपण आयुष्यात अभिनय करतोच की ! तो काही शिकायला जात नाही. पण अभिनय जेव्हा कलात्मक आनंदासाठी करायचा असतो त्यावेळी तो आनंद प्रेक्षकांच्या अंतःकरणात निर्माण करण्याची कला आणि शास्त्र शिकावे लागते. आता मी भाषणासाठी त्या दारातून इथे नुसता आलो. पण स्टेजवर मी ज्यावेळी येतो त्यावेळी entry घ्यावी लागते. मी आलो आहे हे सगळ्यांना कळावं लागतं. माझं पाहणं चालणं – येऊन बसणं आणि बोलणं ह्याला त्या नाटकातले काही संदर्भ असतात. काही नवे संदर्भ तयार होत असतात. भावबंधनातली लतिका ज्यावेळी तो परमेश्वर मला कुठल्या स्वरुपात दर्शन देणार आहे म्हणते त्यानंतर घनश्याम येतो. त्या येण्यामागे एक अखंड साखळी आहे.” राज्यकर्ते ते राज्यकर्ते आणि दास ते दास म्हणणारा कीचक येतो. तो एक उन्मत्त परंपरा सोबत घेऊन येतो. हे नाटकातले येणे आणि जाणेच काय, पण तिथले पडदा वर जाऊन खाली पडेपर्यंत नुसते असणे ह्यालादेखील काही साधना करावी लागते. काही विचार करावा लागतो. रंगभूमीवर निरर्थक असे काही करण्याला वावच नाही. रंगमंचावरची ही पोकळी म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे. प्रत्येक पात्र मग ते लहान असो वा मोठे – ते डिस्टर्ब करून नवी नवी आकर्षणे निर्माण करीत असते. ही आकर्षणे जितकी कलात्मक तितका प्रेक्षक अधिक खेचला जातो. ह्याचा अर्थ रंगभूमीवरच्या प्रत्येक पात्राने सारखे काहीतरी करीतच राहिले पाहिजे असे नव्हे. किंबहुना कित्येकदा काही न करण्यातून फार मोठा अर्थ व्यक्त होतो. नाहीतर काही माणसे अकारण अॅक्टिंग करतात हे आपण पाहिले असेल. वृंदवादनात प्रत्येक वाद्य वाजलेच पाहिजे असे नाही. पण आपली पाळी केव्हा येईल याविषयी सावधान पाहिजे. सगळ्या पात्रांना रंगभूमीवर असे जिवंत ठेवायचे ही तर नाटककाराची फार मोठी किमया आहे. दुसऱ्या पात्रांची आपण योग्य रीतीने दखल घेऊन आणि त्यांना दखल द्यायची तिथे देऊन नाटक फुलवणे हे तर प्रत्येक नटाचे कर्तव्य आहे. संगीत नाटकातदेखील नाटक थांबवून तानांची भेंडोळी सोडणाऱ्या नटाला कोणी मानले नाही. तिथेही संयम हवाच ! दहा-दहा आणि बारा- बारा वन्समोअर घेणे हे काही फारसे शहाणपणाचे लक्षण नाही. प्रेक्षकांना आवडले म्हणून आप्पलपोटेपणाने आपण स्वतःच नाटक खाऊन जाणे हे चांगल्या कलावंताचे लक्षण नव्हे. गाताना दुसरे पात्र समोर असले तर त्याच्या अस्तित्वाची दखल घेऊन नाटकातले गाणे नटवणारे नट हे फार मोठे अभिनयपटूही होते. नारायणरावांची जी गाणी फक्त ते एकटे असताना म्हणायची असत ती ते तज्येतीने गात. एरवी आवश्यक तेवढेच आणि सार्धं गात असत ! म्हणजेच नाटककाराला काय म्हणायचे आहे ते म्हणून दाखवणे एवढेच नटाचे कार्य आहे असा मात्र गैरसमज करुन घेऊ नका. नाटकात काम करण्याच्या तीन महत्त्वाच्या पद्धती सांगितल्या आहेत.

एक: नाटककाराचे म्हणणे सरळ प्रेक्षकाला समजावून सांगणे.

दुसरे आपली वाक्ये झाली की संपले. आपण गाऊन 8 घेतले की झाले. बाकी नाटकात इतर पात्रे आहेत याची दखल न घेणे. एका महान नटाला मी भाऊबंदकीत राघोबादादाचं काम करताना पाहिलयं. रामशास्त्र्यांनी देहान्त प्रायश्चित्त सांगितले त्यावेळी हे नटवर्य आपल्या धोतराची किनार पाहत होते. हे म्हणजे Loving oneself in art पैकी.

तिसरे म्हणजे स्वतः आणि इतर सर्व नट यांनी मिळून उभी करायची ही कला आहे याची जाणीव ठेवून अभिनय करणारे नट !

ह्यांतला पहिला प्रकार आपली भाषणे चोख म्हणून नाटककाराचा मतलब सांगणाऱ्या नटांचा ! आपण असली नाटकं पाहिली असतील. सगळे नट चांगले असे फूटलाइटसमोर येऊन नाटक रांगेत उभे राहून करतात. विशेषतः कव्हरवरच्या scene मध्ये बोलणारे आश्विनशेट, वैशाखशेट वगैरे. आश्विनशेटही सरळ समोर बघतो, वैशाखशेटही बघतो. ते दोघे एकमेकांशी बोलताहेत हे आपण समजायचे ! लोकांना नाटक मास्तरांनी शुद्धलेखन घालावं तसं समजावून देतात. स्पष्ट वाणी ! ढोबळ अभिनय ! अधिक स्पष्ट करताना गोंधळ, स्वगत भाषणदेखील सरळ प्रेक्षकांना उद्देशून बोलायचं नसतं ! वृंदावन जेव्हा म्हणतो की हिच्याकडे पाहिलं म्हणजे पूर्वजन्मावर विश्वास ठेवावासा वाटू लागतो. तो काही तुम्हाला निरोप पोहोचवीत नसतो. ते एक प्रकट चिंतन आहे. ‘स्वगत’ ही एक अभिनयाचा अत्यंत कलात्मक आविष्कार करण्याची संधी असते. ती काही एका माणसाने थिएटरात पिटलेली दवंडी नव्हे ! ‘सृष्टीची उलथापालथ तर झाली नाही ना ? मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना ?’ हे काय ‘नाही संभाजी महाराज, सृष्टीचं ठीक आहे. मुंग्या मेरु पर्वतापर्यंत नाही पोहोचल्या’ असं उत्तर तुमच्याकडून यावं म्हणून विचारलेले प्रश्न नाहीत. विचारांच्या गुहेत तुम्हाला नेलेलं असतं. तुम्ही तिथे आला आहात ह्याची दखल त्या गुहेच्या मालकानं घ्यायची नसते. तुम्ही त्याला उघडपणे द्यायची नसते ! स्वगत भाषण म्हणजे वसंत व्याख्यानमालेतलं व्याख्यान नव्हे ! उत्तम स्वगतं ही तर ख्यालासारखी असतात. शेक्सपिअरसारख्या नाटककारांनी स्वगतांतून चमत्कार करुन दाखवले आहेत. गडकऱ्यांची शिवांगी, ‘राया राजसा हट्ट हट्ट तरी किती करायचा !’ ही soliloquy म्हणायला लागली की गद्यातली ठुमरी चालली आहे, असं वाटलं पाहिजे. एखाद्या नर्तिकेसारखी अदाकारी करण्याचं तिथे सामर्थ्य लागतं ! स्वगत हे नाटकाला काव्याच्या जवळ घेऊन जातं ! मध्यंतरी स्वगतं कृत्रिम असतात वगैरे चुकीचे विचार येऊन गेले. कारण पुष्कळ नटांनी स्वगत व्याख्यानासारखी म्हटली. स्वगत म्हणणाराची दृष्टी ही समोरचे दिसून न दिसणाराची असावी लागते. बोलत आहे ते अंतर्मन याची जाणीव करुन द्यावी लागते. त्याला फार मोठं अभिनयाचं सामर्थ्य लागतं ! केवळ स्वगतातच काय पण सगळ्या नाटकातच वाक्यं पिटापर्यंत फेकणारे नट ही चूक करतात. संवाद सगळ्यांना ऐकू गेले पाहिजेत हे खरं. म्हणजे काय रंगभूमीवरुन संवादाचे हाके घालायचे की काय ? समर्थ नट प्रेक्षकांचे कान आपल्यापर्यंत ओढतो त्यांच्या कानठळ्या नाही बसवीत ! पण असे डायरेक्ट – मेथडवाले काही नट असतात.

दुसरा प्रकार आहे तो मात्र रंगभूमीवरच्या गुन्हेगारांचा ! फक्त आपल्यासाठी लोक तिकीट काढून आले आहेत असं समजणाऱ्या नटवर्यांचा ! रंगभूमीवरची मधली जागा अडवून धरणारांचा. ह्यांना प्रिय असते ती एकच गोष्ट म्हणजे ते स्वतः ! दुसऱ्यांचे संवाद ऐकण्याची देखील हे नट तसदी घेत नाहीत. मी ज्यावेळी नट म्हणतो त्यावेळी नटीही अभिप्रेत आहे हे ध्यानात ठेवा. मी मराठी रंगभूमीवर चांगलं नाव मिळवलेले नट पाहिले आहेत. त्यांना देखील नाटक हा एक सांघिक कार्यक्रम आहे याची जाणीवच नसते. प्रेक्षकांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करुन घेण्याकडे त्यांचा ओढा असतो. ह्या प्रकारात गाणारे नट फार आहेत.. आपल्या क्रिकेटच्या टीममध्ये जसं बोलर म्हणजे वाईट बॅटस्मन असला पाहिजे किंवा चांगला बॅटस्मन असला तर फील्डिंगची जबाबदारी त्याची नाही अशी एक समजूत आहे. त्याचप्रमाणे ह्या गाणाऱ्या नटांची अवस्था असते. बालगंधर्वांसारखे सन्माननीय अपवाद सोडा पण बाकीच्या गाणाऱ्या नटांपैकी पुष्कळांनी अभिनय ह्या गोष्टीशी आपला संबंध न ठेवण्यातच भूषण मानले आणि आजही मानताना दिसतात. ज्याला अभिनयाचं अंग नाही तो कधीही उत्तम नाट्यसंगीत गाऊ शकणार नाही ! नाट्यसंगीत ही काही केवळ गळ्याची करामत दाखवण्याची कला नव्हे ! नारायणराव बालगंधर्वांना तर सगळीच देणगी होती पण बापूराव पेंढारकरांसारखा नट आवाजाची त्या अर्थाने देणगी नसूनही अभिनयामुळे आपले गाणे परिणामकारक करीत असे. मी आजकालचे उदाहरण देतो. चित्रपटसंगीत हा नाट्यमय संगीताचाच प्रकार आहे. लता किंवा आशाच्या फिल्मी गाण्यांत त्या ज्यांना प्लेबॅक देतात त्या नटींपेक्षा जास्त सुरेख वाचिक अभिनय असतो. ह्या मुली नुसत्याच सुरेल नाहीत, तर नाट्याला आवश्यक असलेला अभिनय सुरेल शब्दांतून दाखवण्याचं सामर्थ्य त्यांच्या गळ्यात नव्हे, त्यांच्या अंतःकरणात आहे. मी अंतः करण हा शब्द मुद्दाम वापरतो कारण अभिनयाचा डोक्याइतकाच नव्हे, काहीसा अधिक संबंध अंतःकरणाशी आहे. नाटकातले संवाद भावनेने जाणवून घ्यायचे असतात. तरच त्या संवादांना ओलावा येतो. एखाद्या कोरड्या मनाच्या माणसाचे काम करताना देखील भावनेने ते कोरडेपण दाखवता यावे लागते ! आणि शेवटी नाटक हे प्रेक्षकांसाठी असले तरी प्रेक्षकांच्या अस्तित्वाची दखल घेतल्याचे न दिसता करावे लागते. तिथे दखल घ्यायची असते ती जोडीच्या पात्रांची । कारण नाटक हा त्यातल्या पात्रांच्या सुखदुःखाच्या भावनांचा गोफ विणण्याचा खेळ आहे. म्हणून नाटक हे निवेदन नसून संवादांतून फुललेले एक ‘स्नेहसंमेलन’ आहे ! मूलतः ते निरनिराळ्या पात्रांनी एकत्र येऊन करण्यासाठीच लिहिलेले असते. ते कथन नव्हे तर कथेचे माणसांकरवी केलेले प्रकटन आहे ! इतरांचे अस्तित्व विसरुन सारे काही स्वतःकडेच केंद्रित करुन काम करणारा नट हा माझ्या दृष्टीने नटच नव्हे ! हा रंगभूमीवर शिरलेला दरोडेखोर आहे. तो दुसऱ्यांची सामुदायिक मालकी न मानणारा गुन्हेगार आहे.

तिसरा आणि खरा अभिनयप्रकार म्हणजे नाटक ही संघकला आहे हे मानणारांचा. इथे मला नाटक हा वाङ्मयप्रकार अभिप्रेत आहे. कथाकथन किंवा मी करतो तसला बहुरुपी खेळ हा अभिनयाचा एक निराळा आविष्कार आहे. त्याविषयी मी आता बोलत नाही. पण एकाहून अधिक पात्रे ज्या नाटकात असतात तिथे करायचा अभिनय हा कसा करायचा ?

नाटक हे संवादांतून फुलतं. मला एकदा एका चांगल्या अनुभवी नटाचं पत्र आलं की तुमच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ ह्या नाटकात मला आचार्याची भूमिका करायची आहे, तरी मला ती समजावून द्यावी ! मी त्याला लिहिलं, तुम्ही माझं नाटक एकदा नीट वाचा. दोनदा वाचा. तीनदा वाचा. एक-दोनदा मोठ्याने वाचा. एवढं करुनही जर आचार्य म्हणजे काय कळत नसेल तर भूमिका करु नका ! एखाद्या नवख्या माणसानं हा प्रश्न विचारला असता तर मी समजू शकलो असतो. माणसं साक्षर असतात म्हणजे चांगलं वाचू शकतात असं नाही. हिरवे हिरवे गार गालिचे

हेही वाचन झालं आणि त्यातला नाद ओळखून वाचणं हेही वाचन झालं. पण एकाने अक्षरं वाचली, दुसऱ्याने अर्थ वाचला. तेव्हा मुख्य म्हणजे नाटकात काम करणाऱ्या माणसाला केवळ आपली वाक्यंच नव्हे तर सगळं नाटक अंतर्बाह्य ठाऊक असावं लागतं ] राघोबा काय आहे हे कळल्याशिवाय रामशास्त्र्यांच काम काय करणार ? मग जे डायरेक्टर नटांना वह्यांवर नाटकातली वाक्यं चिकटवून देतात. त्यांची अगदी धन्य वाटते ! मी एका गावात गेलो होतो. ओळख करुन दिली. एका गृहस्थांशी. ते त्या गावातले डायरेक्टर. ते म्हणाले, ‘वा वा, पु. ल. देशपांडे का ? वा ! गेल्या वर्षी आम्ही याचचं नाटक फाडलं होतं !’ नाटक फाडलं ? नाटक पाडलं हे मला कळू शकतं; पण फाडलं ? तर त्यांच्या गावात जत्रेला गावजेवण आणि नाटक घालतात आणि मग मुहूर्ताच्या कॉप्या फाडतात आणि डिंकानं वहीवर चिकटवतात, म्हणजे प्रत्येकाने आपापली वही पाठ करताना टचिंगचा शब्द म्हणायचा ! आता ‘कोठे जाणार’ म्हणण्याऐवजी ‘जाणार कोठे’ म्हटलं की थांबले. कारण वहीत टचिंग ‘जाणार’ हे दिलेलं !
म्हणजे ‘जाणार’ हा परवलीचा शब्द येईपर्यंत हे स्वस्थ ! सगळ्या होतकरू दिग्दर्शकांना माझी हात जोडून विनंती आहे की, नाटकांची पुस्तकं विकत घेण्यात काटकसर नका करू | एकदा नव्हे, चांगलं चार-पाच वेळा सगळ्या नटनटींपुढे ते संपूर्ण नाटक वाचा ! म्हणजे आपण काय करायला निघालो आहोत ते सर्वांना कळेल. संवाद म्हणजे त्यातले केवळ शब्द नव्हेत तर त्यातली विरामचिन्हे देखील ! नाटकातील शब्दांइतकीच स्थब्धता बोलकी असते आणि नटाचं पहिलं काम म्हणजे शब्दांवरची हुकमत आणि त्या शब्दांच्या मांडणीत सम, ताल, काल कुठे आहे ह्याची समजदारी ! अश्वारुढ बहाद्दरासारखं ज्याला शब्दारुढ होता येत नाही, स्वाराचं घोड्यावर असतं तसं शब्दांवर ज्याचं प्रेम नाही त्याने रंगभूमीच्या दिशेने नट म्हणूनच नाही तर प्रेक्षक म्हणूनसुद्धा येऊ नये ! कुस्त्या बघायला जावं !

‘शब्द’ हे नटाचं मुख्य भांडवल होय भांडवल, त्याचा सगळा धंदा त्या भांडवलावर चालतो म्हणूनच हे भांडवल फार जपून, काळजीपूर्वक, त्यातून अर्थाची योग्य प्राप्ती होईल अशा बेतानं वापरावं लागतं ! संवादलेखन हे काव्यलेखनाइतकंच बिकट आहे. एखाद्या पात्राची भाषा खरी आहे की कागदी आहे हे पाच वाक्यांत जोखता येतं आणि कालच्या काय, आजच्या काय आणि उद्याच्या काय, कुठल्याही काळातल्या रंगभूमीवर नट म्हणून वावरायचं असेल तर ज्या भाषेतले आपण नट आहोत त्या भाषेवर मुख्य म्हणजे नितांत प्रेम हवं. भाषेची शुद्धचं काय पण अशुद्ध रूपदेखील पूर्ण परिचयाची हवीत. रंगभूमीवर अशुद्ध बोलायलादेखील वाणी तयार असावी लागते. जिभेवरुन फुटाण्यासारखे शब्द उडावे लागतात – सतारीची मींड घेताना जशी बोटाची हुकमत लागते तशी शब्दांची हुकमत हवी. संवाद सहजतेने आले पाहिजेत हे तर खरंच ! कलेचा श्रेष्ठपणा हा सहजतेतून तर सिद्ध होतोच, पण ही सहजता विलक्षण परिश्रमापोटी येते. अभिनयाचे वाचिक, आंगिक, कायिक वगैरे भेद करतात. मी ह्याच्याशी अजिबात सहमत नाही. आता बोलण्यातला अभिनय करा मग चालण्यातला करा मग पाहण्यातला करा ही शिकवण एकजात चूक आहे. इब्सेनने म्हटले आहे की माझ्या संवादांतला एक शब्द काढा – My drama will bleed. माझं नाटक रक्तबंबाळ होईल. अभिनय असा – निराळा नाही काढता येत. रंगभूमीवर उमटणारा शब्द हा साऱ्या अंगातून इष्ट सहचारी भाव घेऊनच उमटावा लागतो. जे बोलायचे ते नुसतेच बेंबीच्या देठापासून बोलायचे नसते, अंतःकरणापासून बोलायचे असते. वाणीचा शारीरिक दोष सुधारता येईल पण नाटकातले संवाद म्हणायचे म्हणजे काय निर्जीव पोपटपंची करायची आहे ? नाटक घडाघड पाठ हवं पण का ? तर ते शब्द हवे तेव्हा हव्या त्या स्वरांत बुचकळून काढायला हाताशी सज्ज हवेत म्हणून ! संवादाचा कार्यकारणभाव आधी उमगला पाहिजे. मग व्हॉइस कल्चर ! संवादाचा प्राण सापडला पाहिजे. ही पहिली अट.
मागाहून त्याची फेक. त्या वाक्याची चाल, डायरेक्टरनी सांगितलं तसं आम्ही केलं हे कदाचित शिस्तप्रियतेचं सर्टिफिकेट देऊन जाईल, पण कलेच्या प्रांतात नेऊन सोडणार नाही. मी एक वाक्य सांगतो. खाडिलकरांची द्रौपदी म्हणते : जा दुःशासनाला म्हणावं, द्रौपदी स्वतंत्र आहे ! द्रौपदी कुणाची दासी नाही. आता ह्या वाक्यातला प्राण कशात आहे हे ओळखायला- ‘व्हॉइस कल्चर’च्या जोडीला महाभारतात उभं केलेलं इंडियन कल्चर ठाऊक हवं! ही तेजस्विनी ते वाक्य कसं म्हणाली असेल त्याचं चित्र डोळ्यापुढे हवं. भूमिकेशी तादात्म्य म्हणतात ते ह्याला. मग त्यातून ते वाक्य नीट न्याहाळलं पाहिजे ! ह्या इथे जाणवून घेतलं पाहिजे. द्रौपदीचा त्वेष, तिचा अहंकार अत्यंत परिणामकारक रीतीने कसा प्रकट होईल ते शोधलं पाहिजे. म्हणजेच नाटकातले संवाद म्हणणारी व्यक्ती अंतर्बाह्य ओळखण्याचं जे साधन – संवाद – ते संवाद पाठ होऊन नाही उपयोगाचे. ते नटाच्या रक्तात भिनले पाहिजेत. त्यातल्या अर्थाचा प्राण आणि कानामात्रांनी नटलेलं अक्षरांच शरीर पचलं पाहिजे. म्हणजे मग ते वाक्य आवश्यक तोलामोलानं जातं. आता ह्या शब्दांच्या उच्चाराला लागणारी स्वरयंत्राची साधना, शारीरिक आरोग्य वगैरे उत्तम हवं. पण माझ्या दृष्टीने भाषेतल्या शब्दांच्या आत्म्याची आणि शरीराची उत्तम ओळख ही महत्त्वाची.

अभिनयसाधना ही केवळ शारीरिक कसरत नव्हे. नुसते संस्कृत श्लोक स्पष्ट म्हणून वाणी शुद्ध होत असेल, पण शुद्ध, स्पष्ट वगैरे शब्द फसवे आहेत. अभिनय ही काही यांत्रिक क्रिया नाही. ती कला आहे. नुसते स्पष्ट बोलणारे लोक काय कमी आहेत है खणखणीत आवाजाची माणसंही असतात. एखाद्या कल्हईवाल्याचा आवाज खूप खणखणीत असतो म्हणजे काय त्याला वृंदावनाची काम द्यायचं ? त्याउलट आवाजात दोष असून अभिनयातल्या तेजस्वी सत्त्वामुळे केशवराव दात्यांनी रंगभूमीवर अपूर्व करामत केली. बालगंधर्वांची स्त्रीवेषातली ‘नाऽऽय” ही आर्त हाक शेकडो डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. मिलिट्रीत गेल्यामुळे शिस्त येते. पण ती माणसाचे यंत्र करणारी शिस्त असते. कलेला असल्या यांत्रिक शिक्षणाचं वावडं आहे ! आवाज कशाला ? एखाद्या माणसाची बोटदेखील त्याच्या गळ्यापेक्षा अधिक बोलकी असतात. सारी भरतनाट्यम्ची भाषा नुसत्या बोटांनी बोलते ! [नटाने प्रकृती उत्तम ठेवावी. श्लोकबीक म्हणावे. त्याने काही विवडत नाही. पण नटालाच काय, कुठल्याही कलावंताला मुख्य म्हणजे ह्या जगाकडे नीट पाहता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे आणि जीवनावर उदंड प्रेम करता यायला पाहिजे आणि हे सारं कलेत आणता – आलं पाहिजे. Stanislavesky चं वाक्य आहे “Leam – to see and hear and love life. Learn to bring it into art !

Learn to see and hear ! पाहायला आणि ऐकायला शिका हा साऱ्या कलावंतांना लागू पडणारा उपदेश आहे. नुसते डोळे असले म्हणून दिसत नाही. नुसते कान असले म्हणून ऐकता येत नाही. पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या मागे काही प्रेरणा लागतात. आपण सगळेच गाणं ऐकायला जातो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ध्वनी उमटून कानाच्या पडद्यावर आदळला की सगळ्यांनाच ऐकू येतो. पण जे ऐकायला शिकले आहेत त्यांना मात्र तो निराळा ऐकू येतो. चांगले गवई जेव्हा तंबोरे लावायला लागतात तेव्हा जलशाला जाणं हा एक केवळ उच्च अभिरुचीच्या घाऊक प्रदर्शनाचा भाग म्हणून गर्दी करणारी माणसं असतात ती कुजबुजायला लागतात. कुरकुरायलासुद्धा लागतात. वास्तविक गवई तंबोरा जमवीत असताना गप्पा मारणं हा गाणं चालू असताना गप्पा मारण्याइतका मोठा प्रमाद आहे. ज्यांना तंबोऱ्याच्या किंवा सतारीच्या तारा जुळणं म्हणजे काय आनंद आहे हे कळलंय ते त्या तारा जुळत असताना ऐकतात. अहो, तंबोऱ्याची जोड जुळवणं हे तर प्रणयाराधनासारखं आहे. पहिल्या प्रीतीचे, भीतीचे, काहीसे गमतीचे जे बोल सांगितले आहेत ना तशीच अवस्था असते. स्वर कसे हळूहळू जवळ येत असतात मग दूर जातात – पुन्हा येतात. आले असं वाटतं पण तो भास असतो – आणि असे जवळ येत – दूर जात – लाजत – रुसत शेवटी षड्जाला षड्ज किंवा जोडीला पंचम जेव्हा मिळतो. त्यावेळी स्वरांच्या अलीबाबाची गुहा असते, तिची दारं उघडल्याचा आनंद मिळतो. पण तो कुणाला ? जो ‘ऐकायला’ शिकलाय त्याला ! ज्याला नट व्हायचं आहे त्यानं हे संगीताचंच नव्हे तर गद्यातल्यासुद्धा स्वरांचं सामर्थ्य काय आहे हे ऐकायला शिकलं पाहिजे. शब्द हे भांडवल तसं मोठं स्फोटक आहे ! जरा इकडला स्वर तिकडे झाला की गोंधळ होतो. मी एकदा भावबंधन बघायला गेलो होतो. त्यातली लतिका जराशी लडिकाच होती. कामण्णाचं काम करणाराही जरा चावट होता. कामण्णाचं एक वाक्य आहे ‘ही आली लतिका, आता – डोळे बंद !” त्या पट्ट्याने ‘ही’ शब्द जरा ताणला आणि ‘हीs आली लतिका’ म्हटलं ! तिथून पुढे ती लतिका आली की ‘ही आली’ असंच वाटायला लागलं ! म्हणून शब्दांवर पकड हवी. जी भाषा किंवा बोली आपण वापरणार आहोत ती पक्की ठाऊक पाहिजे. म्हणजेच नाटकात आपल्याला जी भूमिका असेल तिच्या तोंडून ती भाषा कशी उमटेल याचा आपल्याला अंदाज येतो. कित्येक वेळेला नाटककाराने विशेष शैलीदार भाषा वापरलेली असते. जुन्या ऐतिहासिक नाटकांतून अशी भाषा आढळते. असल्या भाषेची आवश्यकता आहे की नाही हा निराळा मुद्दा आहे. परंतु एकदा आपण ते नाटक करायला घेतल्यावर त्या भाषेचा रंग काय आहे तो आपण पारखून घ्यायला हवा. कित्येकदा नाटककार मुद्दाम प्रासयुक्त भाषा वापरून काही परिणाम साधत असतो. उदाहरणार्थ ‘राजसंन्यास’ नाटक घ्या. त्यात असे गद्य आणि काव्य यांच्या सीमारेषेवरचे पुष्कळ संवाद आहेत. रायाजीचं एक वाक्य आहे – आणि बाबांचा पवाडा गाणारा तुळशीदास … आता हे वाक्य मुळातच एखाद्या कवितेसारखं रचलेलं आहे. ती अंतर्गत रचना ओळखूनच ते म्हणायला हवं. इंग्रजीत असल्या संवादांना आणि अभिनयाला ‘स्टायलाइज्ड’ म्हणतात. नक्षीदार वाक्यं नक्षीदार रीतीने मांडताना ती नक्षी कितपत करायची ह्याची खात्री हवी. नक्षीदार वाक्यापेक्षाही अभिनयाला अवघड वाक्यं म्हणजे साधी! संवाद ह्याविषयी आपल्याकडे फार चमत्कारिक समज आहे. टाळीची तान असते तशी काही टाळीची वाक्यं असतात. आणि तसलं वाक्य म्हणताना टाळीसाठी धडपड सुरू होते. लोकांना काही पटलं, रूचलं की लोक टाळी देतात हे खरं आहे. म्हणून ती टाळी लोकांकडून थकलेली बाकी वसूल करणाऱ्या पठाणासारखी वसूल करायची नसते. ते वाक्य काही नाटकातल्या प्रवाहाला सोडून बाजूला नेऊन लोकांवर मुद्दाम टाकायचं नसतं. असली वाक्यं म्हणणारे नट ‘नाटकी’ वाटतात. ज्यावेळी अंगातून संचारून अभिनय येत नाही त्याचवेळी त्याला आपण खोटा ह्या अर्थाने नाटकी म्हणतो. नाटकातलं पात्र असं खोटं असून नाही चालत. जलतरंगातल्या एखाद्या पात्रातलं पाणी कमीजास्त झालं की जसा सूर बिघडतो तशीच ही नेमकेपणा नसणारी पात्रे नाटक बिघडवतात. नेमकेपणा ही एक अभिनयातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रंगभूमीवर जे बोलायचं, जसं बोलायचं, जिथून बोलायचं – नव्हे जिथे उभं राहायचं नि जिथे बसायचं, उठायचं, चालायचं हे तालमीत निश्चित करावं लागतं. तालमीत ते मी आयत्यावेळी करीन, आयत्यावेळी अमकी action घेईन वगैरे बोलणारी माणसं असतात. मी नेहमीच सांगतो, रंगभूमीवर आयत्यावेळी होणारी एकच गोष्ट म्हणजे फजिती !

आणि म्हणूनच नाटकात बोलण्याची वाक्यंच नव्हे तर रंगभूमीवरची प्रत्येक हालचाल ही विचारपूर्वक ठरवावी लागते. रंगभूमीवर जो देखावा उभा करायचा, ज्या वस्तू मांडायच्या, जे कपडे चढवायचे त्याचीदेखील अत्यंत शिस्तबध्द योजना हवी. अर्थात आजच्या व्याख्यानात मी नाटक कसे बसवावे याचा ‘लेसन’ घेणार नाही आहे. एकतर आपण काही होतकरू नट म्हणून ह्या व्याख्यानाला आला नाहीत. आपण बहुसंख्य श्रोते नाटकाचे प्रेक्षक आहात. त्याच दृष्टीने मी हे विचार सांगतो आहे. तर ही नाटकात बोलण्याची तयारी करायची म्हणजे काय

करायचं ? मी आपल्याला सांगितलं की, केवळ स्वतःचे संवादच नव्हे तर ते नाटक आत्मसात केलं पाहिजे. त्यातून प्रत्येक नाटक ही काही संपूर्णपणे निर्दोष कलाकृती नसते. नाटककाराचे म्हणून काही दोष असतात. ते फार उघड न करता नाटक उभं करायचं आहे. ज्या कारणांसाठी आपण ते नाटक करायला सिध्द झालो ती कलात्मक कारणं आपल्याला पक्की कळली पाहिजेत. म्हणजे काय करायचं ह्याहूनही काय करता कामा नये हे तरी कळेल. एकच प्याला नाटक करायचं आहे असं समजा, मग सिंधूची वेशभूषा- केशभूषा, तिची बोलण्यावागण्यातली मर्यादा हे सारे समजावून घेतलं पाहिजे. ती कशी वागेल, कशी बोलेल, तिच्या हालचाली कशा असतील ह्याचं चित्र मनाच्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. तरच ते प्रेक्षकांना दाखवता येईल. ‘मी दारू सोडली’ हे सुधाकराचं वाक्य ऐकल्यावर ती आनंदाने उड्या मारील की आनंदाने गुदमरून जाईल हे कळलं पाहिजे. अशा वेळी सिंधू ज्या कुटुंबातली आहे त्या कुटुंबातली सिंधूच्या स्वभावाची बाई कसे वागेल याचे स्पष्ट चित्र अंतःकरणात उमटले नाही तर सिंधूचा अभिनय करणे अशक्य होईल. भूमिकेशी तद्रूपता म्हणतात ती ही ! पुष्कळ वेळा धाय मोकलून रडण्यापेक्षा डोळे नुसते डबडबले तर अधिक परिणाम साधला जातो. अवलोकन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्या काळी पुरुष स्त्रियांच्या भूमिका करीत. त्यामुळे आपला पुरुषीपणा पार लिंपून टाकण्यासाठी त्यांना वाजवीपेक्षा जास्त परिश्रम करावे लागत. बालगंधर्वांसारखा अभिनय एखाद्या स्त्रीने करायची आवश्यकता नाही. परंतु बालगंधर्वांची तन्मयता मात्र काम करणारा पुरुष असो वा स्त्री दोघांनाही तितकीच आवश्यक आहे नाटकातले बोलणे छापील वाक्ये पाठ केल्यासारखे नसावे- सहज वाटावे. पण ह्या सहजते-सहजतेतदेखील खूप फरक असतो. कुणाची सहजता ? कुत्रंही सहज चालतं आणि वाघही सहज चालतो. पण वाघाच्या चालीत एक सहज डौल असतो. एखाद्या फडतूस माणसाची भूमिका करायची असली तर चालीत तो फडतूसपणा आला पाहिजे. बोलण्यात आला पाहिजे, तेच समजा संभाजीमहाराजांचे बेबंदशाहीतले काम असले तर त्या चालण्यात वाघाचा डौल हवा. पण तो डौल कृत्रिम रीतीने आलेला नसावा. कृत्रिम रीतीने वाजवीपेक्षा छाती फुगवून चालले की ते नाटकी वाटते. पण तो डौल अंगात बाणून आल्यासारखा वाटला तर तो कृत्रिम वाटत नाही. उगीच सहज बोलायच म्हणून सृष्टीची उलथापालथ तर झाली नाही ना हे वाक्य ‘ओ’ रूटची बस गेली नाही ना अशा सहजतेने म्हणून चालणार नाही, औरंगजेबाएवढ्या बलाढ्य सम्राटापुढे न वाकणारा संभाजी आपल्याला उभा करायचा आहे याची दखल त्या नाटकातल्या पहिल्या एंट्रीपासून घ्यावी लागते.

थोडक्यात अभिनयसाधना ही एक नित्य चिंतनाची गोष्ट आहे. जगताना डोळे नीट उघडे ठेवण्याची बाब आहे. हा निदिध्यास हवा. उत्सवापुरते नाटक करणारांच्या बाबतीत मला काहीच म्हणायचे नाही. हा केवळ हौसेचा मामला नाही. नाटकाची हौस म्हणजे उगीच मिरवण्याची हौस नव्हे. पाच-सातशे माणसांच्या अमूल्य वेळेशी हा खेळ आहे] मी तिकिटासाठी त्यांनी खर्च केलेल्या पैशाबाबत बोलतच नाही. तो भाग आहेच. परंतु एखाद्या नाटकात एखाद्या नटाची बेजबाबदारी त्या लोकांचा वेळ नासून जाते. इतर सहकाऱ्यांच्या परिश्रमांचा चुथडा करून जाते.

अभिनयात शब्दांच्या म्हणजे मुख्यतः त्यातल्या अर्थाच्या, वाक्याच्या लयीच्या हुकमतीवर माझा सर्वात अधिक कटाक्ष आहे.

पाठांतर म्हणजे पन्नास टक्के यश आहे. हे पाठांतर जाणीवपूर्वक झाले की ऐंशी टक्के यश । उरलेले वीस टक्के आपण इतर गोष्टींना वाटून देऊ. प्रॉम्प्टिंगवर नाटक मारून नेणारे नट हे नाट्यकलेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. एकतर हे लोक एकजात अप्रामाणिक आहेत. स्वत: खड्ड्यात पडतात आणि दुसऱ्यांनाही खड्यात टाकतात. समोरच्या पात्राकडे ह्यांचं कधीही लक्ष नसतं. डब्यात विदाउट तिकीट शिरलेल्या माणसासारखा चेहरा घेऊन हे स्टेजवर घोळ घालतात. मी अशी नाटकं पाहिली आहेत की जिथे स्टेजवरच्या प्रत्येक खुर्चीच्या किंवा कोचाच्या मागे चोरासारखे प्रॉम्प्टर लपलेले असतात. कव्हरचा पडदा पडला की आला मागे प्रॉम्प्टर ! ही फसवणूक का करायची ? कसेही करून नाटक केलेच पाहिजे हा धोंडा कुणी दिलाय तुमच्या माथी ! असल्या नालायक लोकांनी नाट्यकलेची सेवा करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे नाटकात कधीही काम न करणे !

वाक्य मनात एकदा रुजलं की ते उमटवण्याची क्रिया हा अभिनयाचा प्रेक्षकांना दिसणारा भाग. पण हे वाक्य हा नट समजून म्हणतो आहे की नाही याची कल्पना सामान्य प्रेक्षकालासुध्दा येते. आपण जे काही रंगभूमीवर करीत असतो ते दुहेरी हेतूने करीत असतो. म्हणजे एका पात्रानं दुसऱ्याशी बोलायचं आणि आपण त्याच्याशी काय आणि कसं बोलतो आहोत ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत सर्वांच्या ध्यानात आणून द्यायचं आणि हे आपण किती कलात्मक रीतीने कराल त्यावर आपला अभिनयाचा दर्जा ठरेल | पिटातल्या प्रेक्षकाला ऐकू तर गेलं पाहिजे आणि आरडाओरडा तर करता कामा नये अशी ही तारेवरची कसरत आहे. ती करायला मुख्यतः नट संपूर्णपणे Relaxed मनाने अगदी हलक्या फुलासारखा झाला पाहिजे. शरीरातले स्नायून स्नायू सैल हवेत, त्यांच्यावर कसलाही मानसिक ताण नको. मनाला धास्तीचा स्पर्श झाला की आटोपलाच कारभार. ही धास्ती किंवा ज्याला मंचभय म्हणतात ते पूर्वतयारी उत्तम असली की कोणत्याच कार्यात येत नाही. भीतीने पांढराफटफटीत पडलेला चेहरा हा कितीही मेकप थापला तरी लपत नाही. चेहरा लपला तरी ‘सीदन्ति मम गात्राणि’ झालेले असते पण नाटकाच्या तालमी उत्तम झालेल्या असल्या, भाषणं – हालचाली ह्या निश्चित असल्या प्रॉम्प्टर नावाच्या माणसाच्या हातात आपली सूत्रं नसली की असल्या भिण्याचे कारण नसते. नाटकाच्या तालमींत सूत्रधार लागतो. पण एकदा पडदा वर गेला की सारी सूत्रे त्या-त्या नटाच्या हाती येतात. त्या पाण्यात एकदा उडी टाकली की कमरेचा दोर सुटला. मग संथपणाने, शांतपणाने पोहावं पाण्यात जाणूनबुजून खळबळ माजवायची असली तर तशी माजवावी – काठावरच्या लोकांना आपण बुडालो-बुडालो असं दाखवून घाबरवून सोडावं आणि ते भरपूर भ्याले की हळूच डोकं वर काढून त्यांना मजा दाखवावी हा जसा पट्टीच्या पोहणाराचा खेळ असतो तसला खेळ नटाला करायचा असला तर पाण्यात उडी मारणाऱ्या अवगाहनपटूसारखीच अभिनयपटूची तयारी लागते. तेव्हा ‘निश्चळ मन’ ही अभिनयाला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मांजर जसं स्वस्थ पडलेले असते दिसला उंदीर की सारी शक्ती एकवटून टुणकन उडी मारतं तसंच अभिनय भ्याल्याचा असो वा शौर्याचा असो, एकप्रकारची सावधानता हवी! मला तर नाटकाची तिसरी घंटा वाजली की त्या जोडीला लग्नासारखं ‘सुमुहूर्त सावधान” म्हणावंसं वाटतं. आता ती मंगलघटका आली, ‘नाट्यकला कविकृष्णा घाला घाली’; अस खाडिलकरांनी म्हटलंय. बोहल्यावर नवऱ्यामुलाचे पाय लटलटायला लागतील म्हणून भटजी म्हणतात ‘सावधान’! तसं रंगमंचावरदेखील पाय लटलटू नयेत अशी इच्छा असली तर मनात म्हणावं सावधान ! आता इतक्या लोकांपुढे आपल्याला नाटक करायचं आहे कसं होतं, काय होतं कोण जाणे ही भीती सगळ्यांनाच असते. ह्याचा विचार जुन्या नाट्यकलाविशारदांनी केला होता. म्हणून ‘नांदी’ आली. नांदीगायन सुरू झालं की समोरचे प्रेक्षक प्रेक्षागारात येईपर्यंत झालेला ताप विसरतात, ते स्वर त्यांची मनं निर्मळ करतात. मग नाटककाराने आणि नटांनी मिळून जो रंग त्यांच्या मनात ओतावा तो तिथे निर्माण होतो. प्रेक्षकांप्रमाणे धूप-पूजा-प्रार्थना-नादी इत्यादी गोष्टी भयशमन करणाऱ्या आहेत, आधुनिक वैद्यकाच्या भाषेत सांगायच्या म्हणजे Tranquilisers आहेत. हे बाह्य उपाय झाले. पण नटाचं मनदेखील शांत हवं ! त्याच्यावर ताण नको. असा ताण असल्यावर मन मोकळं नसतं. मन मोकळं नाही म्हणजे हालचाली मोकळ्या नाहीत, आवाज मोकळा नाही. प्रॉम्प्टरच्या मदतीने काम करणाऱ्या सगळ्या नटांच्या चेहऱ्यावर पाहा कसा एक अपराधीपणाचा सूक्ष्म भाव असतो. कोडग्या मंडळीविषयी मी बोलत नाही. त्यांचं काय सांगावं ! असल्या अवलादी रंगभूमीची विटंबना करतात. सर्व क्षेत्रांत त्या क्षेत्राच्या लौकिकाला बट्टा लावणारी मंडळी आहेतच. पण ज्याला कलावंत म्हणून स्वत:चा दर्जा वाढवायचा आहे, कलेच्या क्षेत्रात आपलंही काही दान अर्पण करायच आहे त्यांच्याविषयीच विचार करायचा ! तर हे असं relaxation हे कष्टसाध्य आहे. ते कष्ट प्रयोग लागण्यापूर्वी झाले पाहिजेत. आणि कलावंत म्हणून जगायच असेल तर सतत पाहिजेत.

आता त्या अभिनयाची बोलण्याचा अभिनय, अंगविक्षेपाचा अभिनय अशी काही वर्गीकरणं केली आहेत. मला स्वतःला ती एका मर्यादित अर्थानेच मान्य आहेत. अभिनयाची अशी ठोकळेबाज विल्हेवारी करता येत नाही. इथे ‘अवलोकन’ हे महत्त्वाचे ! भारतीय नृत्यात अभिनय म्हणजे काही ठराविक संकेताने दाखवण्याच्या खुणा नव्हेत. एकेकाळी नाटकात पात्रनिर्मितीदेखील ठराविक संकेतानेच होत होती. व्हिलन म्हटला की त्याने भुवई उंचावून बोलायचं ! असला अभिनय करणं हे दुय्यम बुध्दिमत्तेचं लक्षण आहे. हा अभिनय नव्हे. हा आपला पूर्वी कोणीतरी करून ठेवलेला मुखवटा वापरण्यापैकी आहे. काही विशिष्ट भावनांचे प्रकटीकरण आपण सामान्यतः एका विशिष्ट तऱ्हेनेच करतो. दु:ख झालं की डोळ्यात अश्रू येतात. तिरस्कार वाटला की नकळत चेहऱ्यावरचं आठ्यांचं जाळं वाढतं. पण हा प्रकार ठोकळेबाज झाला. म्हातारा म्हटला की त्यानं खोकतच यायचं नोकर म्हटला की त्यानं कोचावर फडकं मारीतच यायचं, हे एकान कुणीतरी केलं होतं त्याचं दुय्यम दर्जाच्या लोकांनी फारसा विचार न करता केलेलं अनुकरण आहे. चांगला नट आणि चांगला दिग्दर्शक लेखकाची वाक्यं कशी टाकावी याचा स्वतः विचार करील. रंगभूमीवरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. तिथे निरर्थक हालचालीला अर्थ नाही. कुणीसं म्हटलं आहे, तुमच्या सेटवरच्या भिंतीवर जर पहिल्या अंकात बंदूक ठेवलेली असली तर ती शेवटच्या अंकापर्यंत एकदा तरी ठोदिशी गोळी झाडणार असेल तर ठेवा ! याचा अर्थच असा की मंचावरची सजीव आणि निर्जीव वस्तू प्रेक्षकाला काहीतरी सांगून जाऊ द्या । शोभेच्या वस्तूदेखील सार्थ शोभा आणू द्यात ! डॉक्टरचं पात्र गळ्यात स्टेथास्कोप घालून आणतात. आणा. पण मग त्या स्टेथास्कोपने कुणाची छाती त्याला तपासू द्या ! हातात काठी घेऊन आलात तर त्या काठीचा एखादा असा सहज चाळा होऊ द्या की त्या काठीला अर्थ आला पाहिजे. व्यक्तिमत्त्वाचा रुबाब वाढायला काठी असली तर ती काठी अशी बाळगा की लोकांनी ‘वा !’ म्हणावं । काठीच काय, पण अंगातला पोशाखसुध्दा साऱ्या वागण्याशी जमला पाहिजे.

माणसाच्या हालचाली ह्या पोशाखानुरूप चालतात. एखाद्या क्रांतिकारक कटाची तयारी करणारा माणूस खांद्यावर सोगाबिगा सोडून बोलायचा नाही. कटाचं टेन्शन त्याच्या वाक्यांत नव्हे तर त्याच्या पोशाखातून दिसलं पाहिजे. हे सारं सूक्ष्म अवलोकनातून येतं. माणसांचे हे लक्षावधी नमुने जाणिवेनं पाहणं हा अभिनयाचा फार मोठा अभ्यास आहे. आणि माझ्या मते अभिनयाचं हे दर्शन त्या नाटककारालाच व्हावं लागतं ! तरच त्याची वाक्यं सोळा आणे खरी वाटतात. बोलण्याचा एकच कायदा तुम्ही काय बोलता आहात ते कळलं पाहिजे. त्या बोलण्याचा साचा तुमच्या निरनिराळ्या भूमिकांत बदलला पाहिजे. तुमच्या लहानसहान हालचालींतून त्या भूमिकेचे सारे संस्कार तंबोऱ्याच्या तारांतून जव्हार येते तसे आले तर त्या भूमिकेला गोलाई येते. नाटकातलं बोलणं म्हणजे व्हॉइस कल्चरचं प्रदर्शन नव्हे ! आवाजाची देणगी नसलेले केशवराव दाते हे आपल्या अभिनयाच्या सर्वांगीण दर्शनातून नटश्रेष्ठ झाले. नाहीतर ठणकावून शुध्दलेखन घालणारे अनेक शाळामास्तर नट झाले असते.

आपण काय परकायाप्रवेश केला आहे हे उत्तम कळलं की अभिनय निराळा राहत नाही. संभाजीमहाराजांचा संताप आणि संभू गड्याचा संताप व्यक्त करण्याच्या पध्दतीत फरक पडेल. बायकांचं लाजणं हे मूलतः एकाच भावनेतून आलं तरी त्याची अभिव्यक्ती असंख्य पदर घेऊन येते. तरी सगळं नीट पाहण्याचं काम आहे. ते कसं करावं याचे धडे तुम्हाला कोणीही देऊ शकणार नाही. ते आतून यावं लागतं. ते आपल्यात आहे की नाही हे ज्याचं त्यानं सारा अहंकार गुंडाळून ठरवावं. आहे असं वाटलं तर नाटकात काम करावं आणि रसिकांना आपण समाधान देऊ शकलो आहोत की नाही याचा स्वतःच्याच मनाशी पडताळा घ्यावा.

असल्या साधकाच्या भूमिकेतून जर आपण ही साधना करीत राहिलो तर ह्या कलेचा आनंद स्वतःला घेता येईल आणि इतरानाही देता येईल. अभिनय करण्याचा आनंद आधी स्वतःला मिळायला हवा. त्या धुंदीची मजा काय आहे ते कळायला हवं. नक्कल पाठ नसेल समोरची पात्रं बेजबाबदार असतील काय करणार, पोटासाठी करावं लागतं वगैरे सबबी असतील तर हा आनंद मिळणारच नाही. आणि स्वतःला मिळाला नाही तर दुसऱ्याला देता येणार नाही.

नाटकाच्या तालमीच्या पहिल्या दिवसापासून त्याच्या पहिल्या प्रयोगापर्यंत त्या नाटकाचा आपल्याला ध्यास लागणार आहे का? ते नाटक आपल्याला मनापासून आवडलं आहे का ? संचात खरे नाट्यप्रेमी लोक आहेत का ? हे आधी नीट स्वत: ला विचारून घ्या आणि मगच ह्या फंदात पडा ! तो तुमचा पोटापाण्याचा धंदा आहे की नाही, नोकरी संभाळून किंवा स्वैपाकपाणी संभाळून तुम्ही नाटकात आला आहात यासारखे मुद्दे कलेच्या क्षेत्रात अप्रस्तुत आहेत. कलेवर प्रेम करायचं हे अवघड काम आहे. ही प्रेयसी मोठी जीवघेणी आहे. कठोर आहे. तिची आराधना आपल्या जीवनाचं सर्वस्व देऊन करावी लागते. जगात जे श्रेष्ठ कलावंत झाले त्यांना सदैव काय टाळ्याच

मिळाल्या ? नाही. निंदा, जनीं त्रास अपमान उपहास सहन करावे लागले तरी त्यांनी आपला व्यवसाय सोडला नाही. चार्ली चॅप्लिनचा Limelight नावाचा एक बोलपट आहे. रंगभूमीवर आयुष्यभर नाचून प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरूचीमुळे आणि वयोमानामुळे दृष्टीआड झालेल्या नटाची ही कथा आहे. आता त्याला कोणी विचारीत नाही तरी रंगभूमीवर जायची त्याची इच्छा मावळली नाही. त्याच्यावर माया करणारी त्याची एक मैत्रीण त्याला विचारते बाबारे, दुसरा व्यवसाय कर. तिथे तुला नाही विचारीत कोणी तर जातोच कशाला मरायला तिथे चॅप्लिननं तिथं उत्तरादाखल – सुंदर वाक्य लिहिलं आहे. I hate the sight of blood, but it is in my veins ! मला रक्ताची घृणा आहे, पण माझ्या नसानसांत रक्तच आहे त्याला काय करू ? नाट्यकलेची आवड तुमच्या रक्तात आहे की नाही ते तुम्हीच तपासून पाहा आणि आता तुटो हे मस्तक फुटो हे शरीर म्हणून मारा उडी ! उडी मारण्याचे नियम डोळे उघडून आत्मसात केले असतील तर डोकं फुटणार नाही – त्या डोक्यावर लोकप्रियतेचा मुकुट चढेल. कदाचित लोकांना नाही तुमचं उडी मारणं पटलं तर काटेरी मुकुट चढेल. दोन्हीही त्याच आनंदानं चढवायची तयारी हवी ! आळतेकरांचं मोठेपण ह्या तयारीत होतं. त्यांनी मागलापुढला विचार न करता ह्या लहरी प्रेयसीच्या, जीवनाचं दान मागणाऱ्या देवतेच्या चरणी आपलं सर्वस्व वाहिलं म्हणून तर आपल्यासारखे कलाप्रेमी त्यांचं कृतज्ञतेनं स्मरण करतात ! (समाज कृतघ्न नसतो क्वचित अनवधानानं अज्ञानानं त्याला मोठेपण – लवकर उमगत नाही पण उमगलं की तो कृतज्ञतेची दोन फुलं असल्या लोकांच्या चरणी आपण होऊन वाहतो. निष्ठेचा सुगंध उशिरा का होईना, पण दरवळल्याशिवाय राहत नाही. कलावंतांना ज्यांनी मनोमन दाद दिलेली असते अशा लोकांची संख्या फार मोठी असते. त्यांच्या आशीर्वादाच्या धीरावरच तो पुढे जातो. आपण निष्ठेने ही साधना केलीत तर एकवेळ कलेचा संपूर्ण वरदहस्त नाही मिळणार, पण निष्ठावंत माणूस म्हणून कलाप्रिय समाज आपलं ऋण निश्चित मान्य करील. कलावंतानं एवढेही यश रग्गड आहे असं मानलं पाहिजे.

पुन्हा एकदा आळतेकरांच्या स्मृतीला मी अत्यंत विनम्र अभिवादन करतो आणि अभिनयसाधना मंदिराचे मनःपूर्वक आभार मानून माझं भाषण संपवतो.

-पु. ल. देशपांडे
मूळ स्रोत - https://rangabhasha.com/?p=3599