गाण्यातल्या दर्दी लोकांना जसं गवयानं पहिलं ’ट्यॅ ह्यॅ’ केलं की भीमपलास की भूप किंवा जो कोणता राग असेल तो कळतो त्याचप्रमाणे आवाजाच्या दुनियेतील आरोळ्यांचं आणि नाना तरहेच्या ध्वनीचं होतं. ते ध्वनी नव्हतेच. ती संपृर्ण ध्वनिचित्रंच होती. "येत्रिउरो~स." म्हणजे छत्री दुरुस्त हे कळायला जाणकारीच हवी. "लायचियल्हिहो" ही कल्हय वाल्याच्या आगमनावी नांदी होती. "आयरे प्पो ओ ~स" म्हणजे पायरी हापूस होता. हे सगळे ध्वनीचित्रकार गेले कुठे.. हापुसवाले आणि कल्हई वाले दिसतात. पण मग ते आपण आलो आहोत असं सांगणारी ती ललकारी का देत नाहीत. "पायरेप्पोहोस" ची आरोळी प्रथम कानी यायची ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या. चोवीस एप्रिलला जे काही बरे वाईट निकाल लागायचे ते लागले की चाळी ओस. मंडळी पोरांना घेऊन आपापल्या गावाला पळायची. कोकणवाल्य़ांना बोटीचा भोंगा केव्हा ऐकीन असं व्हायचं. घाटावरची माणसं अगिनगाडीची शिट्टी झाली की डोळ्यापुढे आपापल्या गावाकडं वळणारी वाट आणीत गाडीच्या गर्दीत बसायची आणि परवाच मी पाहिलं.. आगगाडीच्या शिट्टीचासुद्धा बदलला. हल्ली ती पूर्वीसारखी ’कू~ क’ करत नाही. ’भ्या.~’ असा बिभस्त आवाज काढते. विस एक म्हशी एकदम हंबरल्यासारखी हंबरते आणि "नेते रे चांडाळानो तुम्हाला ओढीत" असं म्हणते. ’भ्यां’ चा अर्थ तो आहे. ’कू~~क’ म्हणजे "अरे चला चला.. मज्जा येइल आता" असा होता.
आगगाडीत तर आवाजाच्या कसल्या एकेक तरहा. बोटीत फक्त इंजीनची धडधड आणि अधुन मधून पूर्वी ट्रामची घंटा असे तसली टण टण टण टण अशी खोल कुठे तरी वाजणारी घंटा. आगगाडी एक तर ठेक्यात जाते. लेझमीत जशी आधी संथपणाने तांग टुक ताकड तुं तुं तांग तुक्क ताकड तुम अशी धीमी लय सुरु होते तसंच इंजिनाचाही. इंजिन.. तबलजी जसा आधी उगीचच डग्याचे ढूं~म करुन तबल्यावर थाप मारतो तसा ’फा~~स.. फ्फू~~स" असा वाफेचा भलाथोरला निश्वास टाकतं. मग चाकापासून ते कूठे कुठे लोंबणाऱ्या साखळ्या.. पंखे .. हापटणारी दारं ह्या सगल्य़ा वाद्दांसकट लेझमीसारखा तो संथ ठेका सुरू होतो. आणि हळू हळू वाढत्या लयीचा गमतीचा रंग भरायला लागतो. मला वाटतं अनेक तबलजींना आगगाडीच्या ठेक्यांतून तुकडे सुचले असतील. आगगाडीसारखा तालिया नाही. गाडीच्या खिडकीशी बसावं आणि आवाज लावावा. हव्या त्या तालाचं गाणं घांव.. मस्त साथ चालू असते. लांबच्या पल्ल्यांना लय वाढल्यावर तर बघायलाच नको. पण आपण स्वत: न गातादेखील आगगाडीत खास स्वतःची मैफल चाललेली असते. विशेषत: फर्स्ट क्लासच्या वरच्या बर्थवर झोपावं पंख्याने सुर धरलेले असतात. त्यातून अक्षरक्ष: सतारीसारख्या गती चाललेल्या असतात. बरं हा फर्मायशी प्रोग्राम असतो हे पुष्कळांना ठाउक नसावं. पण खानदानी गाण्याची आपण पंख्याला फर्माइश करावी.." बेटा चलो भूपही सुनेंगे .." मनाशी भूप घोळवावा की पंख्यातून चक्क भूप सुरु होतो.’ ज्यांना भूप येतो त्यानी आपल्या जोखमीवर गाऊन पहावा’. डब्याखालची चाकं लगेच ठेका पकडतात. अर्थात पंख्याची एक सवय आहे. सांगणाराला गाण्याची जाणकारी आणि चिजाबीजांची याददास्त चांगली असली तरच ही मैफल ऎकायला मिळते. मात्र कऱ्या खानदानी कलावंताप्रमाणी पंख्याची मैफल ड्युटी बजावत असतो. त्याचा सुरू लागत नाही. गाडीत पंख्याच्या मैफली मी खूप ऐकल्या आहे. आणि मैफैलींचे इंटर्वलही सुरेख पडायचे. स्टेशन आलं की एकदम अनेक आवाजांची नुसती कारंजी उडायची. "च्याय ये रे म" "पानी डिग्रेट व्यॅ च्ये ~स" पासून ते "रम दो ~ध" पर्यंत वेदांचे जसे ठाराविक उच्चार आहेत तसे फेरीवाल्यांचेही आहेत. उद्या कोणी "च्यायेरेम" ऎवजी "गरम चहा~" असं स्वच्छ म्हणाला तर त्याला काढून टाकतील. खानदानी गाण्याला हे असले आवाज काढण्याचं शास्त्र जरा अधिक जवळ आहे. इथे बोलताना अडवणूक करणाऱ्या व्यंजनांना मुळी स्थानच नाही. आवाजची फेक म्हणजे नुसत्या स्वरांची फेक. तिथे "चहा गरम" किंवा "पान विडी सिग्रेट माचीस हे एवढं म्हणून आवाज फेकलाच जात नाही. ही दुनिया आवाजाची आहे. इथे अर्थ आहे तो आवाजाला. "च्यायरेम" म्हटलं की एकदम चहाच्या भरलेल्या किटलीतून ’चुळळळळ’ असा आवाज होत कप भरत आला हे दृश्य डोळ्यापुढे आलं पाहिजे.
----
गडबड - आवाज - आरडाओरडा हे मुळी साध्याभोळ्या मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण आहे. आतल्या गाठीची माणसं गप्प बसतात. मुंबईची ट्राम गेली त्यावेळी आपली जुनी मैत्रीण गेली म्हणून त्या वेळी त्या मोकळ्या अनाथ रुळाकडे पाहून तिच्या ठणठणाटाला संगीत मानणाऱ्या मुंबईकरांनी डोळ्यातून टिपू काढली होती. हे आवाज असे जातात आणि नव्या आवाजाच्या दुनियेत आम्ही परके होतो. मग ते जुने ध्वनिमित्र आठवत पडायचं.
मध्यरात्र उलटून जाते. बाहेरचं ध्वनिविश्व शांत झालेले असतं. आता फक्त ऐकू येतो एकच आवाज भिंतीवरच्या घड्याळाचा टिक टिक टिक टिक. कालपुरूषाचं ते कायमचं पुटपुटणं. त्याला प्रतिसाद देणारा आवाज सहसा येत नाही. पण मध्यरात्री इतर आवाज बंद झाल्यावर बिछान्यावर पडल्यापडल्या ती टिकटिक ऐकताना सहज छातीवर हात जातो. तिथल्या टिकटिकीचं भिंतीवरच्या त्या पुटपुटणाऱ्या काल पुरुषाशी त्या निवांत वेळी संभाषण चालू असतं. अजूनही त्याचा अर्थ लागत नाही. छे छे! आवाज हवा. आयुष्य म्हणजे आवाज. ते संपल की पुढं मग काय, शांतताच.
मध्यरात्र उलटून जाते. बाहेरचं ध्वनिविश्व शांत झालेले असतं. आता फक्त ऐकू येतो एकच आवाज भिंतीवरच्या घड्याळाचा टिक टिक टिक टिक. कालपुरूषाचं ते कायमचं पुटपुटणं. त्याला प्रतिसाद देणारा आवाज सहसा येत नाही. पण मध्यरात्री इतर आवाज बंद झाल्यावर बिछान्यावर पडल्यापडल्या ती टिकटिक ऐकताना सहज छातीवर हात जातो. तिथल्या टिकटिकीचं भिंतीवरच्या त्या पुटपुटणाऱ्या काल पुरुषाशी त्या निवांत वेळी संभाषण चालू असतं. अजूनही त्याचा अर्थ लागत नाही. छे छे! आवाज हवा. आयुष्य म्हणजे आवाज. ते संपल की पुढं मग काय, शांतताच.
अपुर्ण (उरलंसुरलं)
- पु.ल. देशपांडे
मुळ स्त्रोत -- मायबोली
मुळ स्त्रोत -- मायबोली